पदकल्पतरु: गौडीय वैष्णवांच्या पदावलीचा (पदांचा वा कीर्तन-गीतांचा) सर्वांत मोठा व लोकप्रिय संग्रह. गोकुलानंद सेन नावाच्या वैष्णवाने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ३,१०१ वैष्णव पदे निवडून यात संकलित केली. गोकुलानंद हा बरद्वान जिल्ह्यातील तेना वैद्यपूर येथील रहिवासी होता. त्याचा जन्म वैद्य जातीत झाला आपल्या संकलनग्रंथात त्याने सर्वत्र ‘वैष्णवदास’ असे टोपणनाव वापरले आहे. ह्या ग्रंथाचे मूळ नाव गीतकल्पतरु असे होते तथापि नंतर पदकल्पतरु असे त्याचे नामांतर होऊन तेच रूढ झाले. बंगालमधील वैष्णवांच्या पदांची पदकल्पतरूच्या आधीची व नंतरची अनेक लहानमोठी संकलने उपलब्ध आहेत तथापि पदकल्पतरू हे त्यांतील सर्वांत मोठे, लोकप्रिय व उत्कृष्ट संकलन मानले जाते.

पदकल्पतरूतील सुरुवातीची २७ पदे स्वतः वैष्णवदासाने रचलेली असून ती चैतत्य महाप्रभूंच्या स्तुतिपर आहेत. यातील ३, १०१ पदे चार मुख्य भागांत (शाखांत) विभागली असून प्रत्येक भागाचे पुन्हा उपविभाग (पल्लव) पाडले आहेत. पहिल्या भागाचे ११ पल्लव असून त्यांत २६५ पदे, दुसऱ्याचे २४ पल्लव ३५१ पदे, तिसऱ्याचे ३१ पल्लव ९६५ पदे व चौथ्याचे ३६ पल्लव १,५२० पदे आहेत. वैष्णव रसशास्त्रानुसार मनात उदित होणाऱ्या भावांच्या अनुसार ग्रंथातील पदांचे वर्गीकरण केलेले आहे. पदकल्पतरू हा ग्रंथ सतीशचंद्र राय यांनी १९१५–३१ मध्ये संपादून ५ भागांत कलकत्ता येथून वंगीय साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्ध केला आहे.

या संकलनात चूडामणी दासांच्या भणितेचे (शेवटी येणाऱ्या नाममुद्रेचे) एक पद आहे. सोळाव्या शतकात बंगाली पदावलिसाहित्याची पायाभरणी झाली. या काळातील पदकर्त्यांत सर्वप्रथम मुरारीगुप्तांचे नाव येते. चैतन्य महाप्रभूंचे संस्कृत भाषेतील चरित्रकार म्हणून मुरारीग्रुप्त प्रसिद्ध आहेत. बंगाली व ब्रजबुलीतही त्यांनी काही पदे रचली. त्यांपैकी दोन पदे पदकल्पतरूत संगृहीत आहेत. ‘पूर्वरागा’ची (वैष्णव रसाशास्त्रात विशिष्ट क्रमाने उदित होणाऱ्या शृंगारभागांची वा अवस्थांची नावे) ‘गौरचंद्रिका’ (चैतन्यगौरवपर पद) म्हणून नरहरिदासांचे पदही यात संकलित आहे. पुढे कीर्तनकारांनी चंडीदासांच्या नावावर खपविलेली परंतु मुळात ज्ञानदासांची असलेली पदेही यात आहेत. याशिवाय विद्यापती, चंडीदास, गोविंददास, नित्यानंदशिष्य बलरामदास इ. पदावलिकारांची पदे यात संगृहीत आहेत.

सतराव्या शतकापासून बंगालमधील मुस्लिम कवींनीही राधा-कृष्णावर अनेक पदे रचली. आतापर्यंत शंभरांहून अधिक मुस्लिम पदावलिकारांची माहिती व त्यांची पदे उपलब्ध झाली आहेत. या पदांच्या अखेरची भणिता पाहिली नाही, तर ही पदे कोणातरी निष्ठावंत वैष्णव कवींनीच रचली असावीत, असे वाटते. अशा कवींपैकी नासीर मामुद, सैय्यद मुर्तजा यांची पदेही पदकल्पतरूत संकलित आहेत. बंगालमधील वैष्णवांत तसेज सामान्य माणसाच्या जीवनात पदकल्पतरूस आदाराचे स्थान असून त्याची लोकप्रियता आजही तेथे टिकून आहे.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)