हारविल : या माशाचा समावेश पर्सिफॉर्मिस गणाच्या प्लेक्टो-र्‍हिंकिडी कुलात होतो. या कुलातील प्लेक्टोर्‍हिंकस प्रजातीत प्ले.नायग्रस (ब्लॅक स्वीटलिप), प्ले. पिक्टस (पेंटेड स्वीटलिप), प्ले. शोटॅफ (ग्रे स्वीटलिप) आणि प्ले. सिंक्टस (थ्री बँडेड स्वीटलिप) या प्रमुख जाती असून त्यांना हारविल असे म्हटले जाते. त्यांचा प्रसार तांबडा समुद्र ते आफ्रिकेचा पूर्व किनारा, अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ते मलाया द्वीपसमूह व त्यापलीकडे पूर्वेस आहे.

 

प्ले. नायग्रस या जातीच्या माशाचा प्रसार भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत (विशेषेकरून मुंबईच्या आसपास) आहे. ते पॅसिफिक महासागरापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स, चीन व पॉलिनीशिया-पर्यंतच्या सागरात आढळतात. ते किनाऱ्यालगतच्या पाण्यातील खडकाळ भागात तसेच खाड्यांमध्ये आढळतात. त्याची लांबी ६०–७० सेंमी. असून शरीर चपटे असते. रंग गर्द तपकिरी, काळसर किंवा राखाडी असतो. जबड्याचे ओठ जाड असून वयानुसार त्याची जाडी वाढते. त्याच्या हनुवटीच्या खालील बाजूस सहा छिद्रे असतात. पृष्ठपर पसरट असून त्यामध्ये १४ काटे असतात. शरीरावर कंकताभ खवले असतात. त्याचे मांस रुचकर असून त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

 

प्ले. शोटॅफ या जातीच्या माशाचा प्रसार भारत, इंडोनेशियापासून दक्षिणेस न्यू गिनीपर्यंत व उत्तरेस ऑस्ट्रेलियापर्यंत आणि हाउटमान ॲब्रोल्होस बेटापासून उत्तर न्यू साऊथ वेल्सच्या सागरापर्यंत आहे. त्याची लांबी सु. ६५ सेंमी. असते. त्याच्या पिलाचा रंग पृष्ठ बाजूस ( वरील बाजूस) गडद तपकिरी वा काळसर असून अधर बाजूस (खालील बाजूस) चंदेरी पिवळसर असतो. डोक्यापासून शेपटीपर्यंत तपकिरी किंवा काळसर पट्ट्यांची रांग असते. अर्धवट प्रौढ माशात पट्टेतु ट क हो ऊ न ठिपक्यांची रांग बनलेली असते. प्रौढ माशाच्या सर्व शरीरावर व परांवर रुपेरी करड्या रंगाचे ठिपके असतात. जबड्याचे ओठ जाड असून हनुवटीच्या खालील बाजूस सहा छिद्रे असतात. पृष्ठपर पसरट असून त्यामध्ये ९-१० काटे असतात. शरीरावर कंकताभ खवले असतात.या माशाचा उपयोग खाद्यान्न म्हणून करतात.

 

प्ले. पिक्टस या जातीच्या माशाचा आढळ मुंबईलगतचा समुद्र व नदीमुखात सर्रास आहे. तो इंडो-पॅसिफिक महासागराचा पश्चिम भाग, तांबडा समुद्र ते नेटल व दक्षिण आफ्रिकेपर्यंत तसेच न्यू गिनीच्या सागरात आढळतो. गोड्या पाण्यातही त्याची वाढ चांगली होते. त्याची लांबी सु. ८० सेंमी. असते. त्याचे डोके आकाराने लहान असून पाठीवरील पृष्ठपर अधिक लांब (सु. ४६ सेंमी.) असतो. त्यामध्ये ९-१० काटे असतात. हनुवटीच्या खालील बाजूस सहा छिद्रे असतात. त्याचा रंग निळसर राखाडी व त्यावर पिवळसर वा सोनेरी-तांबूस रंगाचे ठिपके असतात. सर्व पर काळसर असतात. पिलाची वरील बाजू गडद तपकिरी वा काळसर असून खालची बाजू चंदेरी पिवळसर रंगाची असते. हे मासे समुद्रकिनारी उथळ पाण्यात व खडकाळ भागात राहतात. सुमारे ८० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यात ते राहू शकतात. अपृष्ठ-वंशी प्राणी व लहान मासे हे त्यांचे अन्न आहे. ते उपयुक्त खाद्यमत्स्य आहेत.

 

प्ले. सिंक्टस ही जाती समुद्रकिनारी उथळ पाण्यात आढळते. तिची लांबी सु. ६० सेंमी. असून पृष्ठपरामध्ये १२ काटे असतात. हनुवटीच्या खालील बाजूस सहा छिद्रे असून शरीरावर ठिपक्यांच्या रांगा असतात. या माशाचा उपयोग खाद्यान्न म्हणून करतात.

 

प्ले. ओरिएंटॅलिस, प्ले. ॲल्बोव्हिटॅटस, प्ले. कीटोडॉनॉइड्स, प्ले. क्रायसोटीनिया, प्ले. लेसोनाय या इंडो-पॅसिफिकन जातीच्या माशांच्या रंगांमध्ये खूप विविधता आढळते. त्यामुळे या जाती सागरी मत्स्य संग्रहालयात ठेवल्या जातात.

 जमदाडे, ज. वि. पाटील, चंद्रकांत प.

 

हारविल (प्लेक्टोऱ्हिंकस पिक्टस) हारविल (प्लेक्टोऱ्हिंकस नायग्रस) हारविल (प्लेक्टोऱ्हिंकस शोटॅफ)