राधाकुमुद मुकर्जी

मुकर्जी, राधाकुमुद : (? १८८०–९ सप्टेंबर १९६३). ख्यातनाम भारतविद्यावंत. जन्म पश्चिम बंगालमधील बेऱ्हमपूरचा. आरंभीचे शिक्षण बेऱ्हमपूर येथे घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कलकत्त्याला आले आणि तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाले. एम्. ए. ही पदवी त्यांनी दोनदा मिळवली (१९०१ १९०२). एकदा इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन आणि दुसऱ्या खेपस इंग्रजी हा विषय घेऊन. १९१५ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठाची पीएच्. डी. मिळवली. विद्यार्थिजीवनात त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळविल्या.

राधाकुमुद ह्यांनी जवळजवळ पन्नास वर्षे अध्यापनक्षेत्रात घालविली. रिपन कॉलेज, बिशप कॉलेज (कलकत्ता), बनारस हिंदू विद्यापीठ इ. ठिकाणी अध्यापन केल्यानंतर, १९२१ साली इतिहासाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून लखनौ विद्यापीठात ते काम करू लागले आणि तेथेच सेवानिवृत्त झाले.

त्यांनी लिहिलेल्या उल्लेखनीय ग्रंथांपैकी काही असे : लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन एन्शंट इंडिया, द हिस्टरी ऑफ इंडियन शिपिंग अँड मारिटाइम अँक्टिव्हिटी फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम्स (१९१२), फंडॅमेंटल युनिटी ऑफ इंडिया (१९१४), नॅशनॅलिझम इन हिंदू कल्चर (१९२१), हर्ष (१९२६), अशोक (१९२८), नोट्स ऑन अर्ली इंडियन आर्ट (१९३९), ए न्यू ॲप्रोच टू कम्यूनल प्रॉब्लेम (१९४३), चंद्रगुप्त मौर्य (१९४३), मेन अँड ऑफ एन्शंट इंडिया, एन्शंट इंडियन एज्यूकेशन (१९४७).

ह्या सर्व ग्रंथांतून त्यांच्या सखोल व्यासंगाचा प्रत्यय येतो. राधाकुमुद हे केवळ विद्वान नव्हते. सामाजिक-राजकीय क्षेत्रांतही ते सक्रीयपणे वावरले. १९३७ मध्ये बंगालच्या कायदेमंडळाचे (लेजिस्लेटिव्ह कौन्सिल) ते सदस्य म्हणून निवडले गेले. ह्याच कायदेमंडळात विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. बंगालच्या ‘लँड रेव्हिन्यू कमिशन’चे ते सदस्य होते. १९५२ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. ह्याच साली ग्वाल्हेर येथे भरलेल्या ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. बडोदे सरकारतर्फे त्यांना ‘इतिहासशिरोमणी’ ही पदवी आणि सात हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले होते. कलकत्ता येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, अ. र.