प्राण्यांमधीलसंदेशवहन : प्राणिशरीरातील कोशिका (पेशी) किंवा प्राणी आपल्या विशिष्ट हालचालीने दुसऱ्या कोशिकांचे किंवा प्राण्याचे वर्तन बदलू शकतात किंवा आपल्या मनातील उद्देश व हेतू यांचे ज्ञान त्यांना करून देतात, अशा हालचालींना किंवा वर्तनाला संदेशवहन अशी संज्ञा आहे. अशा संदेशांना दुसऱ्या कोशिकांकडून अगर प्राण्यांकडून प्रतिसाद दिला जातो.

 

अनेक प्राणी तोंडाने अगर इतर अवयवांच्या साह्याने निरनिराळ्या तऱ्हांचे आवाज काढून संदेशवहन करतात. तसेच प्राणी हे आपल्या अंगावरील खवले, पिसे अगर केस ताठ उभारून, शेपटी वरखाली जोरजोराने आपटून, कठोर मुद्रेने बघून अगर डोक्याची वरखाली हालचाल करून संदेशवहन करतात. कीटक, मासे यांसारखे प्राणी आपल्या शरीराच्या हालचालीने संदेशवहन करतात. मानव संदेशवहनासाठी शारीरिक हालचालींपेक्षा तोंडाने शब्दोच्चार करतो. शब्द ठराविक पद्धतीने योजून व त्यांची विशिष्ट अर्थ असणारी वाक्ये तयार करून हे संदेशवहन होते. या शब्दांचा उपयोग करण्याच्या पद्धतीला भाषा म्हणतात. निरनिराळ्या मानवजातींच्या निरनिराळ्या भाषा आहेत. [⟶ भाषा].

 

संदेशवहनाचे ढोबळपणे दोन प्रकार सांगता येतील. पहिल्या प्रकारात नाकतोड्यासारखे कीटक आपले पाय आणि पंख यांचे परस्परांवर घर्षण करून विशिष्ट प्रकारचा आवाज काढून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, तर याच कारणासाठी काजवा आपल्या शरीरातून प्रकाश बाहेर फेकतो फुलपाखरे, मुंग्या यांसारखे कीटक स्वतःच्या शरीरामधून वास येणारी द्रव्ये बाहेर टाकून स्वतःचे अस्तित्व आपल्याच जातीच्या इतर कीटकांना जाणवितात, तर मधमाश्यांसारखे कीटक आपल्या मोहोळांवर विशिष्ट पद्धतीने चालून त्यांना हवे असणारे अन्न म्हणजे मध (मकरंद) आणि परागकण कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहेत, याची माहिती मोहोळातील इतर मधमाश्यांना देतात.

 

दुसऱ्या प्रकारात प्राणी आपल्या शरीराच्या विशिष्ट हालचालीच्या संकेताने संदेशवहन करतात. उदा., माकडे, कुत्री इ. प्राणी आपल्या मालकाकडे प्रेमळ मुद्रेने बघतात. आपले डोके खाली वाकवून, कान मुडपून घेतात व तोंडाने लाडीक आवाज काढून मालकावरील प्रेम व्यक्त करतात परंतु हेच प्राणी अनोळखी माणूस समोर येताच आपल्या अंगावरील केस ताठ उभे करून, डोके उंच करून कान ताठ उभे करतात आणि दात विचकून गुरगुरत त्याच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून जातात आणि आपला तिरस्कार व्यक्त करतात. अशा तऱ्हेने आपल्या शरीराच्या हालचालीबरोबरच इतर अवयवांचा उपयोग करून हे प्राणी संदेशवहन करतात.

 

प्राण्यांचेवर्तनवसंदेशवहन :चार्लसडार्विन या सुप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञांनी प्राण्यांचे वर्तन व संदेशवहन या विषयांवर बरेच संशोधन केले आहे. डार्विन यांच्या मते ज्या वेळी प्राणी आपल्या मनातील विचार बदलतो त्या वेळी तो करीत असलेले संकेतही बदलतो. उदा., वर उल्लेखिल्याप्रमाणे कुत्र्याची आपल्या मालकाशी आणि अनोळखी माणसाशी असलेली वर्तणूक वेगवेगळ्या प्रकारची असते. पाळलेले माकड आपल्या मालकाशी प्रेमाने वागते परंतु जंगलातील माकड अगर पिंजऱ्यात कोंडलेले माकड मनुष्याला पहिल्यावर त्याच्याकडे कठोर मुद्रेने बघते. नंतर काही वेळाने आपले तोंड उघडून, डोके वरखाली हलवू लागते. तोंडाने वेगवेगळे आवाज काढून आपले हातपाय जमिनीवर जोरजोराने आपटू लागते व दात विचकून माणसाचा चावा घेण्यासाठी पुढे सरकू लागते. या संकेतांनी माकड माणसाविषयीचा आपला तिरस्कार व्यक्त करते. तसेच झाडावर मौजेने बागडणारी खार संकटाची चाहूल लागताच आपली शेपटी जोरजोराने वळवून तोंडाने चक्‌चक् आवाज काढू लागते. धोक्याची जाणीव होताच पक्षी आपली पिसे अंगावर ताठ उभी करून आपण आकारमानाने खूपच मोठे असल्याचे भासवितात. कावळ्यासारखे पक्षी संकटाच्या वेळी जोरजोराने कावकाव करून आपले जातभाई एकत्र जमवितात.

 

वेगवेगळे कीटक, पक्षी आणि पशू यांच्या संदेशवहन पद्धतीचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. प्राण्यांच्या आवाजाला, हालचालींना व वर्तनाला काही अर्थ असतो आणि या संकेतांद्वारे प्राणी आपल्या मनातील हेतू इतरांना स्पष्ट करून दाखवीत असतात, असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्राणिसृष्टीचा क्रमविकास (उत्क्रांती) होत असताना प्राण्यांचे वर्तनही बदलत जाते व ते ठराविक परिस्थितीत एखाद्या संकेतासारखे दृढ होते. निरनिराळ्या प्राण्यांत कोणत्या पद्धतीने संदेशवहन करण्यात येते याचे वर्णन खाली दिले आहे.

 

कीटक : प्रसिद्ध जर्मन जीवशास्त्रज्ञ ⇨ कार्लफोनफ्रिश यांनी १९४५ साली मधमाश्यांच्या संदेशवहनासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. कामकरी मधमाश्यांना जेव्हा भरपूर मध आणि परागकण देणारी फुलबाग आढळते त्या वेळी त्या आपल्या मोहोळावर परत येऊन त्यावर विशिष्ट तऱ्हेने चालू लागतात. या मधमाश्यांच्या मागे मोहोळावरील इतर मधमाश्या लागतात. या मधमाश्यांच्या मोहाळावरील आपल्या जलद अगर मंद चालींनी व ठराविक पद्धतीने इतर मधमाश्यांना मध आणि परागकणांनी समृद्ध असलेली बाग मोहोळांपासून किती अंतरावर आहे, त्यात किती प्रमाणात मध आणि परागकण मिळतील यांविषयी माहिती देतात. नंतर ही माहिती देणाऱ्या मधमाश्या आणि त्यांच्यापाठोपाठ इतर मधमाश्या मोहोळावरून उड्डाण करतात व फुलबागेकडे अन्न गोळा करण्यासाठी जातात. फ्रिश यांनी या कामकरी मधमाश्यांच्या मोहोळावरील हालचालींचे स्पष्टीकरण केले असून या हालचालींना ‘मधमाश्यांची भाषा’ अशी संज्ञा दिली आहे. जिप्सी पतंगाच्या आणि रेशमाच्या किड्याच्या बाँबिक्समोरी या पतंगाच्या माद्या प्रजोत्पादन कालात आपल्या उदरखंडावर (पोटाच्या भागावर) असलेल्या ग्रंथीमधून विशिष्ट वास देणारा द्रव पदार्थ शरीराबाहेर टाकतात. या वासाला आकर्षित होऊन मादीपासून शेकडो मीटर दूर अंतरावर असलेले नर मादीजवळ येऊन त्यांचा संयोग होतो. या माद्यांच्या शरीराबाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थांना अनुक्रमे जिप्टॉल आणि बाँबिकॉल असे म्हणतात. अशा तऱ्हेने लैंगिक आकर्षणासाठी या द्रव पदार्थांचा उपयोग होतो परंतु वाळवी, मुंग्या व मधमाश्या हे कीटक संकटाची चाहूल लागताच आपल्या शरीरातील ग्रंथीमधून टर्पिनासारखे रासायनिक द्रव बाहेर टाकून आपल्या वसाहतीमधील इतर कीटकांना धोक्याची सूचना देतात. मुंग्या आणि मधमाश्या सु. १०—२० प्रकारचे संकेत करू शकतात, असे आढळले आहे.

 


मधमाश्यांच्या मोहोळात फक्त एकच प्रजोत्पादनक्षम मादी असते. तिला राणी म्हणतात. शिवाय शेकडो प्रजोत्पादक्षम नर आणि हजारो वंध्य (वांझ) कामकरी मधमाश्या असतात. ही राणी मधमाशी संपूर्ण वसाहतीवर हुकमत चालवीत असते. जोपर्यंत ही राणी मधमाशी तरुण असते व भरपूर संख्येने अंडी घालण्यास समर्थ असते तोपर्यंत ती या मोहोळावर दुसरी राणी मधमाशी उत्पन्न होऊ देत नाही. मधमाश्यांच्या अळ्या एकाच प्रकारच्या असल्या, तरी त्यांना कामकरी मधमाश्यांकडून विशिष्ट प्रकारचे अन्न दिले जाते. अशा अळ्यांचे राणी मधमाशीमध्ये रूपांतरण होते. दुसरी राणी मधमाशी निर्माण होऊ नये म्हणून मूळची राणी आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या ग्रंथीवाटे एक प्रकारचे हॉर्मोन (उत्तेजक स्राव), ज्याला ‘राणी पदार्थ’ असे म्हणतात, उत्पन्न करते. हा स्राव कामकरी मधमाश्या चाटू लागतात व परस्परांना भरवितात. हा राणी पदार्थ खाल्ल्यामुळे कामकरी मधमाश्या एकत्र राहून त्यांचे अळ्यांकडे दुर्लक्ष होते. म्हणून अशा दुर्लक्षित अळ्यांचे कामकरी मधमाश्यांतच रूपांतरण होते. यामुळे मूळच्या राणीला प्रतिस्पर्धी निर्माण होत नाही. तसेच ज्या कामकरी मधमाश्या हा राणी पदार्थ खातात त्यांच्या प्रजोत्पादक ग्रंथींची वाढ खुंटून त्यांना वंध्यत्व प्राप्त होते. राणी पदार्थाचा तिसरा संकेत म्हणजे या वासामुळे नर मधमाश्या राणीकडे आकर्षित होतात व राणी प्रजोत्पादनासाठी जेव्हा मोहोळावरून उड्डाण करते त्या वेळी नर मधमाश्याही तिच्या पाठोपाठ उड्डाण करतात व नंतर हवेत राणीचे एका नराबरोबर मीलन घडते.

 

कित्येक कीटक आपली घरे बांधताना त्यांची बांधणी विशिष्ट प्रकारची करून संदेशवहन करतात. उदा., यूमेनिडी गांधील माश्या आपली घरे झाडाची खोडे पोखरून तयार करतात. ही पोकळी अरुंद असते. मादी या पोकळीत अंडी घालताना ती अशा पद्धतीने घालते की, अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळीचे तोंड खोडाच्या पृष्ठभागाकडेच रहावे. या अरुंद पोकळीत अळीला अजिबात वळता येत नाही. अळीचा काही दिवसांनी कोश बनतो व नंतर कोशातून प्रौढ कीटक बाहेर पडतो. या प्रौढ कीटकाचे तोंड खोडाच्या पृष्ठभागाकडे वळलेले असल्याने तो पोकळीतून जेव्हा वर सरकत जातो त्या वेळी तो आपोआपच खोडाच्या बाहेर पडतो. शास्त्रज्ञांच्या मते अळीने या पोकळीत कसे रहावे याचे संदेशवहन गांधील माशी अंडी घालताना करते. अंडी विशिष्ट पद्धतीने पोकळीत घालणे हाच एक प्रकारचा संकेत असतो.

 

वाळवी, मुंग्या यांसारख्या सामूहिक जीवन जग़णाऱ्या कीटकांत संदेशवहन हे एका कीटकाकडून दुसऱ्या कीटकाकडे न केले जाता एका समूहाकडून दुसऱ्या समूहाला केले जाते. मुंग्या जेव्हा अन्न गोळा करण्यासाठी आपल्या वारुळाबाहेर पडतात त्या वेळी त्यांच्या उदर खंडावर असणाऱ्या ग्रंथीतून वास येणारा द्रव पदार्थ जमिनीवर झिरपत असतो. या द्रव पदार्थाच्या वासामुळे आकर्षित होऊन वारुळातील आणखी मुंग्या वारुळाबाहेर पडतात. वास सौम्य असेल, तर कमी मुंग्या व तीव्र असेल, तर जास्त मुंग्या वारुळाबाहेर पडत असतात. अशा तऱ्हेने ग्रंथीमधून बाहेर पडणाऱ्या वास असलेल्या द्रव पदार्थामुळे संदेशवहन केले जाते.

 

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत ऑसिपोडा हे खेकडे राहतात. नर खेकडे या वाळूत आपली घरे मळसूत्री पद्धतीने बांधतात. घर बांधताना दूर केलेली वाळू घराच्या प्रवेशद्वारापाशी पिरॅमिडसारखा ढीग करून ठेवली जाते. हा पिरॅमिड एक प्रकारचा संकेत असून तो इतर नर खेकड्यांना संदेशवहन करतो. जे नर हा ढीग पाहतात ते या ढिगापासून सु. १००–१५० सेंमी. दूर अंतरावर आपली घरे बांधू लागतात. मादीने पिरॅमिड पाहिल्यावर ती नर खेकड्याच्या घरात शिरते व तेथे तिचे नराशी मीलन होते.

 

मासे : काही जातींचे मासे बदलत्या परिस्थितीनुरूप दहा प्रकारचे वेगवेगळे संकेत करतात. उदा., ट्रोफियस वंशाचा मासा (सिक्लिडी कुल) आपल्या अंगावरील रंग बदलून संदेशवहन करतो. जेव्हा हा मासा संकटाला घाबरतो त्या वेळी त्याच्या अंगाचा रंग फिक्का असतो. जेव्हा तो सुरक्षित ठिकाणी असतो तेव्हा त्याच्या शरीराचा रंग गडद बनतो. प्रजोत्पादन कालात मादीला आकर्षित करण्यासाठी नर माशाच्या शरीरावर पिवळ्या रंगाचा आडवा पट्टा दिसू लागतो.

 

स्टिकलबॅक मासा आपल्या शरीरावरील रंगामुळे व हालचालीने संदेशवहन करतो. प्रजोत्पादन काळात नराच्या गळ्याजवळील भागाचा रंग लाल होतो. या संकेताने तो मादी माशाला आकर्षित करतो. तसेच दुसऱ्या नर माशाने मादीजवळ येऊ नये म्हणून तो आपले डोके वारंवार खाली वळवून नराच्या अंगावर धावून जाण्याचा पवित्रा घेतो.

 

पक्षी :कुरव (गल) पक्षी आपल्या शरीराची निरनिराळ्या प्रसंगी वेगवेगळी हालचाल करून संदेशवहन करतात. आक्रमणाच्या वेळी हा पक्षी आपले डोके शरीराच्या पुढे ताणून नेतो, तर शरणागतीच्या वेळी डोके मागे घेऊन ९०° वळविले जाते. अनेक पक्षी आपल्या वावरण्याच्या टापूत इतर पक्ष्यांनी प्रवेश करू नये म्हणून निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढून त्यांना इशारा देतात. प्रजोत्पादन काळात नर पक्षी आपल्या शरीरावरील रंगीबेरंगी पिसे उभारून, पंख फुगवून आणि गोड गाणी गाऊन मादी पक्ष्यांना संकेत करून त्यांचे लक्ष आपणाकडे वेधून घेतात. नर ⇨ बक (हेरॉन) पक्षी प्रजोत्पादन कालात आपल्या रंगीत पायांचे प्रदर्शन करून मादी पक्ष्याला आकर्षित करतो.

 

काही पक्षी उड्डाण करण्यापूर्वी आपले पाय वाकवून शरीर जमिनीवर टेकतात आणि आपल्या शेपटीची पिसे वर उचलून पंख पसरून नंतर उड्डाण करतात. या पक्ष्यांनी आपल्या शेपटीची पिसे उभारल्यावर त्यांवरील पांढऱ्या रंगामुळे थव्यातील इतर पक्ष्यांचे लक्ष त्याकडे वेधले जाऊन त्यांना संकटाचा इशारा मिळतो व यामुळे सर्व पक्षी सावध होऊन एकदम हवेत उड्डाण करतात. काही पक्ष्यांच्या शेपटीची पिसे उड्डाण करण्यापूर्वी वरखाली होत असतात. प्रजोत्पादन कालात काही नर पक्षी वेगळ्याच रीतीने संदेशवहन करतात. जेव्हा नर पक्ष्याला मादी दुसऱ्या नर पक्ष्याबरोबर फिरताना दिसते त्या वेळी या नराबरोबर भांडावे किंवा नाही असा संभ्रम नर पक्ष्याला पडतो. तसेच या भांडणात आपणास यश येईल किंवा नाही याचीही त्याला खात्री नसते. म्हणून हा नर पक्षी आपला राग भोवतालच्या गवतावर, पानावर किंवा दगडावर काढून त्यांना टोची मारू लागतो अगर आपली पिसे साफ करण्याचे किंवा घरटे बांधण्याचे काम सुरू केल्याचे ढोंग करतो किंवा आपण अन्न व पाणी पीत असल्याचे मादीला भासवून तिला आपणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.

 

ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञ ⇨ सरजूलियनहक्सली यांनी ⇨ डुबडुबीया पाणपक्ष्यांच्या प्रजोत्पादन काळातील वर्तनाचा व संदेशवहनाचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. या काळात नर व मादी पक्षी समोरासमोर येऊन आपल्या चोची विरुद्ध दिशेला वळवितात. नंतर आपली डोकी वारंवार हलवून, पाण्यात सूर मारून हे पक्षी पाण्यावर येतात. या वेळी ते पाणवनस्पती आपल्या चोचीत धरून परस्परांना देतात. या वनस्पतींचा घरटे बांधण्यासाठी उपयोग होत असतो. या पक्ष्यांचे हे वर्तन म्हणजे मीलनासाठी संदेश देण्यासारखे असते. हक्सली यांच्या मते या पाणपक्ष्यांचे हे वर्तन या पक्षिजातीत पुरातन काळापासून प्रजोत्पादन काळातील आपापसातल्या चढाओढी व लैंगिक आकर्षण यांमुळे निर्माण झाले असावे.

 


सस्तनप्राणी : अनेक उच्च वर्गीय पशू शत्रू समोर दिसल्यावर आपले तोंड उघडून तोंडातील तीक्ष्ण दातांचे प्रदर्शन करतात आणि शत्रूला भिती दाखवून हल्ला करण्यापासून परावृत्त करतात. हरिण आपल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर झगडत असताना एकदम तोंड फिरवून दूर पळून जाते. या आपल्या वर्तनाने ते प्रतिस्पर्ध्याला आपण शरणागती दिल्याचे संदेशवहन करते, तर हिंस्त्र पशू शत्रू समोर दिसल्याबरोबर आपल्या अंगावरील केस ताठ करतात, शेपटी वळवळू लागतात, जबडा उघडून दातांचे प्रदर्शन करतात व गुरगुरू लागतात.

 

संदेशवहनाच्या दृष्टीने उच्च वर्गीय प्राण्यांपैकी माकडांवर बरेच संशोधन झाले आहे. माकडे ३०-४० प्रकारचे संकेत करू शकतात, असे आढळले आहे. ऱ्हीसस माकडे कळप करून राहतात. या कळपाचा एक बलवान नर नेत्याचे अगर कळप प्रमुखाचे काम करतो. कळप ज्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालतो त्या वेळी हा प्रमुख नर जमिनीवरून चालताना आपले डोके वर करून, शेपटी उंचावून, कळपातील इतर माकडांकडे वारंवार दृष्टी टाकीत ऐटबाजपणे चालत असतो आणि अशा प्रकारे वर्चस्व गाजवीत असतो. कळपातील इतर नर माकडे कमी बलवान असतात. ती आपली डोकी व शेपट्या खाली वळवून मुकाट्याने चालत असतात. मादी माकडे प्रमुख नराच्या पाठोपाठ जात असतात. अशा तऱ्हेने चालण्याच्या पद्धतीने संकेत करून प्रमुख नर माकड कळपावरील आपला अधिकार व्यक्त करतो. याच माकडाच्या जातीत अनेक वेळा परस्परांशी खेळण्याचे व खोटे भांडण केल्याचे वर्तन केले जाते. या वेळी काही माकडे दुसऱ्या माकडांचा पाठलाग करून खोटी भांडणे करतात. पाठलाग सुरू करण्यापूर्वी ही माकडे आपली डोकी जमिनीवर टेकवून मागच्या दोन पायांमधून इतर माकडांना न्याहाळतात. भांडणे चालू असताना एकमेकांना खोटे चावे घेतात. हे वर्तन बराच वेळ चालते. हे सर्व संकेत एकमेकांबद्दलचे प्रेम आणि स्नेहभाव व्यक्त करणारे आहेत.

 

बॅबून जातीची माकडे कळपाने राहतात. काही नर माकडे शिपायाचे काम करतात. भोवतालच्या प्रदेशात शत्रू आल्याची जाणीव होताच ती जोरजोराने ओरडू लागतात. यामुळे कळपातील इतर माकडे या शिपाई माकडांकडे बघतात व ज्या दिशेला वळून ही शिपाई माकडे ओरडत असतात तिकडे पाहून शत्रूचा मागोवा घेतात.

 

चिंपँझी माकडात प्रजोत्पादन काळात मादी माकडाचा पृष्ठभाग सुजतो व रंगीत दिसतो. या पृष्ठभागाचे प्रदर्शन करून नर माकडांना आकर्षित केले जाते. नर सांबर आपल्या भव्य शिंगांचे प्रदर्शन करून मादीला आकर्षित करतो. अनेक जंगली प्राणी आपापल्या संचारक्षेत्रात आढळणाऱ्या झाडांवर, दगडांवर, गवतावर आपले मूत्र टाकतात (उदा., कुत्रा, लांडगा इ.) अगर आपल्या शरीरामधून पाझरणारा द्रव पदार्थ त्यावर घासतात (उदा., हरणे, रानरेडे इ.). अशा तऱ्हेने संकेत करून ते त्यांच्याच जातीच्या इतर प्राण्यांनी त्या क्षेत्रात प्रवेश करू नये याचे संदेशवहन करतात.

 

मांजरे, वाघ, सिंह यांसारखे हिंस्त्र पशू आपल्या पिलांचा खोटा पाठलाग करतात, त्यांना खोटे चावे घेतात व पंजे मारतात. या सर्व वर्तनात प्रेमाचा संकेतच व्यक्त केला जातो.

 

अशा रीतीने संदेशवहन निरनिराळ्या प्रकारचे संकेत करून केले जाते. संदेशवहनाची निर्मिती आणि विकास कसा होत गेला, या विषयावरही अभ्यास करण्यात आला असून त्याचा गोषवारा थोडक्यात खाली दिला आहे.

 

संदेशवहनाचेप्रकार : संदेशवहनाचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) रासायनिक, (२) श्रावण व इतर तरंगरूपाने, (३) स्पार्शन, (४) चाक्षुष आणि (५) वैद्युत्.

 

रासायनिकसंदेशवहन :फेरोमोन या नावाने ओळखले जाणारे रासायनिक द्रव्य अनेक प्राणी आपल्या शरीरामधून बाहेर टाकतात. हे द्रव्य संकेताचे कार्य करते. रासायनिक द्रव्यांचे अनेक फायदे आहेत. ती क्रियाशील असतात व अतिशय थोड्या प्रमाणात असूनही काही तास अगर दिवस प्रभावी असतात. ती अंधारात आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपला प्रभाव दाखवू शकतात परंतु याचबरोबर या द्रव्याचे काही तोटे असतात. प्राण्याला कोणताही संदेश या रासायनिक द्रव्याच्या साह्याने तात्काळ देता येत नाही. कारण या द्रव्याचा वास दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. तसेच हा वास काही वेळाने नष्ट होतो. अनेक प्राणी निरनिराळ्या वासांवरून भोवताली वावरणाऱ्या इतर प्राण्यांचा अंदाज बांधतात (उदा., हत्ती, वाघ या प्राण्यांना माणसाचा वास येतो).

 

प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या ⇨ अवटूग्रंथीतून व ⇨ पोषग्रंथीतून स्रवणाऱ्या हॉर्मोनांमुळे शरीरांतर्गत संदेशवहन होऊन शरीरातील इतर कोशिकांत योग्य बदल घडून येतात. रासायनिक संदेशवहन समाजप्रिय कीटक, पतंग यांमध्ये आढळते.

 

श्रावणवइतरतरंगरूपानेसंदेशवहन :कीटक, पक्षी आणि पशू निरनिराळे आवाज काढून संदेशवहन करतात. ध्वनितरंग सर्वत्र लवकर पसरत असल्याने या प्रकारचे संदेशवहन लवकर परिणाम घडविते. काही पक्ष्यांचे आवाज २०० मी. दूर अंतरावर, तर कित्येक जातींच्या माकडांचे आवाज १ किमी. अंतरावर ऐकू येतात. आनंदाच्या, दु:खाच्या व संकटाच्या वेळी काढण्यात येणारे आवाज निरनिराळे असतात. अनेक नर कीटक प्रजोत्पादन काळात मादीला आकर्षित करण्यासाठी आवाज काढतात.

 

गेरीड जातीचे पाण्याच्या पृष्ठभागावर वावरणारे कीटक हे आकारमानाने मध्यम असून त्यांना लांब पाय असतात. पाण्याच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या लहान तरंगांची जाणीव करून देणारी ज्ञानेंदिये या कीटकाच्या पायांच्या टोकांवर असतात. माशांच्या पाण्यातील हालचालींनी हे तरंग जास्त प्रकर्षाने जाणवतात आणि अशा वेळी भावी संकटाची चाहूल लागून गेरीड कीटक त्या भागापासून दूर जातात.

 

अशा तऱ्हेच्या तरंगांनी संदेशवहन करण्याची क्रिया जाळे विणणाऱ्या कोळ्यातही आढळते. कोळ्याची पिले लहान असताना जाळ्याच्या मध्यभागी राहतात. भक्ष्य मारण्याचे काम मादी कोळी करते. अन्न खाण्यासाठी अगर धोक्याची जाणीव देण्यासाठी मादी आपल्या पुढच्या पायाने धाग्यांचे जाळे ओढते आणि सोडून देते. संकटाच्या वेळी किंवा अन्न देण्याच्या वेळी धागा ओढण्याची व सोडण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे पिलांना या संदेशाचा अर्थ समजून ती जाळ्याच्या मध्येच राहतात अगर मादीच्या जवळ येतात.

 

स्पार्शनसंदेशवहन : या प्रकारचे संदेशवहन समूहाने राहणाऱ्या प्राण्यांत, प्राण्यांच्या प्रजोत्पादन काळात आणि पिलांचे संगोपन करणाऱ्या प्राण्यांत आढळते. स्पर्शाने उत्तेजित केल्यावर बिनपंखाच्या मावा कीटकांना पंख उत्पन्न होतात व नंतर ते दूरवरच्या प्रदेशात पसरतात. त्यामुळे मूळ ठिकाणी या कीटकांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. समूहात आढळणारे टोळ व मुंग्या एकमेकांना स्पर्श करून ओळखू शकतात. तसेच नर उंदीर मादी उंदराबरोबर अनेक वेळा मैथुन करतो व यामुळे मादीच्या शरीरात दोन महत्त्वाच्या क्रिया घडतात. स्पर्शीय संवेदनेमुळे नराकडून आलेले शुक्राणू (पुं-जनन कोशिका) गर्भाशयाकडे खेचले जातात. हॉर्मोनांच्या स्रवणामुळे गर्भाची गर्भाशयात स्थापना होते.

 


चाक्षुषसंदेशवहन : या संदेशवहनाचे वैशिष्ट्य म्हणजे योग्य दिशावलोकन हे होय. फुलपाखरे, सरडे, पक्षी व अनेक पशू आपले रंगीबेरंगी पंख, खवले, पिसे व केस यांच्या साह्याने संदेशवहन करतात. जे प्राणी दिवसा संचार करतात त्यांना फक्त दिवसाच असे संदेशवहन करता येते. निशाचर फक्त रात्रीच्या वेळीच असे संदेशवहन करतात. तसेच डोळ्यांसारख्या दृष्टिज्ञान असणाऱ्या ज्ञानेंद्रियांनाच हे संकेत ग्रहण करण्याची पात्रता असते. या संदेशवहनाच्या पद्धतीचे तोटे म्हणजे त्याला काळाची मर्यादा असते (दिवसा किंवा रात्री). संदेश प्रेषित करणाऱ्या प्राण्याकडे दृष्टी द्यावी लागते. म्हणूनच या संदेशवहनात प्राण्यांना ठराविक अवस्थेत उभे राहूनच संदेशवहन करावे लागते (उदा., पिसारा फुलवून मोराला उभे रहावे लागते). म्हणून चाक्षुष संदेशवहनापेक्षा रासायनिक किंवा श्रावण संदेशवहन प्रभावी ठरते.

 

वैद्युत्संदेशवहन : शार्क, रे, मार्जारमीन, ईल आणि विद्युत् मासे यांसारख्या माशांमध्ये पाण्यातील कमी विद्युत् दाबाचा भाग निवडण्याची पात्रता असते. वाळूत लपून बसलेल्या चपट्या माशाच्या शरीरातून निघणाऱ्या विद्युत् तरंगांचे ग्रहण करून त्या चपट्या माशावर हल्ला करण्याची शार्क माशात पात्रता असते. विद्युत् माशांच्या शरीरात असणाऱ्या काही विशिष्ट अवयवांमुळे वीजनिर्मिती होऊ शकते. जेव्हा या विद्युत् क्षेत्रात इतर मासे येतात त्या वेळी निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे या माशाला आपले भक्ष्य शोधता येते व ज्या वेळी हा मासा भक्ष्यावर हल्ला करतो त्या वेळी तो विजेची निर्मिती बंद करतो.

 

वरील सर्व विवेचनावरून प्राण्यांमधील संदेशवहनाच्या मनोरंजक पद्धतीची कल्पना येते. निसर्गाने क्षुद्र प्राण्यापासून माणसासारख्या उच्च वर्गीय प्राण्यांपर्यंत सर्वांना संदेशवहनाची क्षमता प्राप्त करून देऊन त्यांचे जीवन सुखाचे केले आहे.

 

पहा : प्रणयाराधन प्राणि-ध्वनि प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांचे सामाजिक जीवन. मधमाशी, मुंगी वाळवी.

 

संदर्भ : 1. Frings, H. Frings, M. Animal Communication, New York, 1964.

            2. McGangh, J. L. and others, Ed., Psychobiology: The Biological Basis of Behaviour, San Francisco, 1967.

            3. Marler, P. R. Hamilton, W. J. Mechanisms of Animal Behaviour, New York, 1966.

            4. Sebeok. T. A., Ed., Animal Communication : Techniques of Study and Results of Research, Bloomington, 1968.

            5. Wilson, E. O. Animal Communication, Scientific American, September, 1972.

            6. Wilson, E. O. Sociobiology, The New Synthesis, Cambridge, Mass, 1975

 

रानडे. द. र.