मीरचंदाणी, लेखराज किशिनचंद ‘अझीज’ : (६ डिसेंबर १८९७–? १९७१). प्रख्यात सिंधी कवी, निबंधकार, समीक्षक व नाटककार. जन्म सध्याच्या पाकिस्तानातील हैदराबाद सिंध येथे. औपचारिक शिक्षण केवळ मॅट्रिकपर्यंतच झाले असूनही त्यांनी स्वप्रयत्नाने सिंधी, उर्दू, फार्सी व अरबी भाषा-साहित्यावर चांगले प्रभुत्व संपादून तेव्हाच्या सिंध प्रांताच्या शासनाचे अनेक पुरस्कार मिळविले. सुराही ह्या त्यांच्या गझल व रूबाया संग्रहास १९६६ चा साहित्य अकादेमी पुरस्कारही मिळाला.
सिंधी साहित्यजगतात ते ‘अझीझ’ ह्या त्यांच्या टोपणनावानेच प्रख्यात आहेत. ते खरोखरीच ‘शब्दप्रभु’ होते. त्यांचे शब्दभांडार अत्यंत समृद्ध असून त्यातून ते अत्यंत समर्पक असे शब्द नेमके निवडून आपल्या काव्यप्रतिमांसाठी वापरतात. त्यांच्या भाषेत विशुद्धता व शुचिता आढळते. अत्यंत अर्थसघन भाषेचा कौशल्याने वापर करण्यात त्यांच्या तोडीचा कवी सिंधीत पूर्वी झाला नाही व आजही नाही. त्यांची सुसंस्कारित भाषा आपणास मिल्टनची आठवण करून देते. मिल्टनप्रमाणेच ‘अझीझ’ यांचा कविपिंड अभिजात साहित्याच्या वातावरणात घडला. त्यांच्या रचनेतील मार्दव व सौंदर्य बुद्धिमंतांना चिरंतन आनंद देते. भाषेचा आत्यंतिक चोखंदळपणा हा त्यांच्या काव्याचा ठळक विशेष आहे.
‘अझीझ’ हे त्यांच्या गझलांसाठी प्रख्यात आहेत. गझल रचणाऱ्या सर्व सिंधी कवींत त्यांचे स्थान सर्वोच्च असून ते ‘गझल रचनेचे राजे’ मानले जातात. उत्कृष्ट रचनातंत्र, उत्तुंग कल्पकता, वर्णनातील मौलिकता, अतिशय संघटित अशी जैव एकात्मता आणि कलात्मक सर्वंकषता यांसाठी ते प्रख्यात आहेत. ‘एका कल्पनेवर एक गझल’ रचण्याचा पायंडा सिंधीत त्यांनीच पाडला. त्यांच्या गझलांत भावनेचा हळुवारपणा व अत्यंत सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती आढळते. वसंत ऋतूचे अनेक मनोहारी रंग आणि शिषिरातील शुष्क उदासीचे अनेक पदर सारख्याच सामर्थ्याने ते शब्दबद्ध करतात. जीवनाचे चित्रण ते अनेक पातळ्यांवरून ताकदीने करतात. कधी रौद्रतेचा तर कधी कल्पकतेच्या अत्युच्च भरारीत स्वर्गीय आनंदाचा, तर कधी यातना-दुःखाच्या खोल गर्तेचा ते साक्षात प्रत्यय देतात. ह्या सर्वच भाववृत्तींशी त्यांची काव्यशैली अत्यंत परिपूर्णतेने मेळ राखते.
त्यांनी लिहिलेल्या रुबायांत दैनंदिन जीवनातील प्रसंगांतूनही वेदान्तातील तात्विक विचारांचे, निसर्गातील परिचित दृश्यांचे, राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वपूर्ण घटनांचे आणि वर्तमान जीवनाचे दर्शन घडते. रुबायांचा आशय अत्यंत बंदिस्त व प्रभावशाली आहे.
त्यांच्या गद्यलेखनात अदबी आईनो ह्या निबंधसंग्रहाचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास इतकी प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभली, की पाकिस्तानमधील सिंध विद्यापीठाने बी. ए. च्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला. गुल-ओ-खार हा त्यांचा उपयोजित साहित्यसमीक्षापर ग्रंथ असून तो उदयोन्मुख कवींना फारच उपयुक्त आहे. त्यांनी मि. मजनू आणि गरिबां मार (दुसरी आवृ. १९५१) ही दोन नाटकेही लिहिली आहेत.
त्यांनी महत्त्वपूर्ण गद्यलेखन केले असले, तरी ते गझल, रुबाया व नज्म (कविता) लिहिणारे यशस्वी कवी म्हणूनच प्रख्यात आहेत. पौर्वात्य काव्यातील जवळजवळ सर्वच छंदशैलींचा-देशी दोह्यांपासून तो परदेशीय गझलापर्यंतच्या-त्यांनी आपल्या काव्यरचनेत वापर केला. त्यांचे उल्लेखनीय काव्यग्रंथ असे : कुल्लियात-ए-अझीझ (१९३८), पैगाम-ए-अझीझ, गुलझार-ए-अझीझ (१९४०), अबशार (१९५३), मिसर जी रानी, सोज-व-साज, सुराही, बहुगुण बोल इत्यादी. यांशिवाय राष्ट्रीय व भक्तिपर रचनेचे त्यांचे काही लहान लहान संग्रहही आहेत.
त्यांच्या गद्यग्रंथांत दोन नाटके, एक निबंधसंग्रह, तसेच सामी आणि गुल-ओ-खार हे समीक्षापार ग्रंथ इत्यादींचा समावेश होतो.
हिरानंदाणी, पोपटी रा. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)