आ. १. नायडोब्लास्टमध्ये असलेली दंशकोशिका : (१) नायडोब्लास्ट, (२) दंशप्रवर्ध, (३) सुतासारखी नलिका, (४) केंद्रक (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज).

दंशकोशिका : दंशकोशिका (नेमॅटोसिस्ट) असणे हे सीलेटेरेट प्राण्यांचे [⟶ सीलेंटेरेटा] एक अनन्यसाधारण आणि वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. दंशकोशिका अंतःकोशिकी (कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या आत असलेली) स्वतंत्र साधक कोशिकांगे आहेत. यांचा उपयोग अन्न मिळविण्याकरिता व स्वसंरक्षणाच्या कामी होतो. सीलेंटेरेटा संघाच्या हाटड्रोझोआ वर्गातील प्राण्यांत दंशकोशिका फक्त बाह्य त्वचेत आढळतात, पण सायफोझोआ व ॲक्टिनोझोआ या दोन वर्गांतील प्राण्यांमध्ये त्या बाह्यत्वचा आणि अंतस्त्वचा या दोहोंतही असतात.

दंशकोशिका द्रव पदार्थाने भरलेली एक लहान पिशवी अथवा संपुटिका (पातळ पटलाने बनलेली पिशवी) असून कायटिनासारख्या एका पदार्थाची बनलेली असते. ही वाटोळी, अंडाकार वा लांबोडकी असून एका टोकाशी गोल व दुसऱ्याशी निमुळती असते. निमुळत्या टोकापासून एक सुतासारखी बारीक नलिका निघालेली असून ती संपुटिकेच्या आत असते व तिला वेटोळी पडलेली असतात. नलिकेची लांबी निरनिराळ्या प्रकारांत कमीअधिक असते. सामान्यतः तिच्या कोणत्या तरी भागावर काट्यांच्या सर्पिल (मळसूत्रासारख्या) ओळी असतात. संपुटिकेची भित्ती दुहेरी असते.

दंशकोशिका सीलेंटेरेट प्राण्यांच्या अंतराली कोशिकांत (बाह्यस्तरीय कोशिकांच्या मधील जागेत असणाऱ्या कोशिकांत) उत्पन्न होतात व त्या उत्पन्न करणाऱ्या अंतराली कोशिकांना नायडोब्लास्ट म्हणतात. एका नायडोब्लास्टमध्ये एकच दंशकोशिका तयार होते. दंशकोशिका सूक्ष्म असल्यामुळे त्यांच्या उत्पत्तीची रीत अद्याप नीटशी कळलेली नाही. नायडोब्लास्टमध्ये एक रिक्तिका (रिकामी जागा) उत्पन्न होते आणि संपुटिकेची आतली भित्ती तिच्या आत स्रावापासून तयार होते व बाहेरची नायडोब्लास्टच्या स्रावापासून नंतर उत्पन्न होते. संपुटिकेच्या आत नंतर एक काय (पिंड) उत्पन्न होतो व त्याच्यापासून बारीक नलिका तयार होते. नायडोब्लास्टला एक देठ फुटतो आणि त्याने तो बाह्यत्वचेत घट्ट चिकटून बसतो. नायडोब्लास्टच्या ज्या भागात दंशकोशिका असते त्या भागाच्या पृष्ठपासून केसासारखा एक दंशप्रवर्ध पुढे आलेला असतो. यानंतर नायडोब्लास्ट मूळ ठिकाणापासून निघून बाह्यत्वचेच्या किंवा अंतस्त्वचेच्या मोठ्या कोशिकांत शिरून प्राण्याच्या आतल्या अथवा बाहेरच्या पृष्ठापाशी येतात. त्यांचे दंशप्रवर्ध (आखूड संवेदनक्षम वृद्धी) पृष्ठाच्या बरेच बाहेर आलेले असतात.

आ. २. दंशकोशिकांचे समूह ) उंचवटे दाखविणारा हायड्राच्या संस्पर्शकाचा एक भाग.

सामान्यतः दंशकोशिकांचा ज्या जागी उपयोग करावयाचा असतो त्या जागेपासून दूर असलेल्या ठिकाणी त्या उत्पन्न होतात. उदा., हायड्राच्या संस्पर्शकांवर (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्ये करणाऱ्या लांब, सडपातळ व लवचिक इंद्रियांवर) असलेल्या दंशकोशिका शरीराच्या बाह्यत्वचेतील अंतराली कोशिकांत तयार होतात व नंतर नायडोब्लास्ट स्थलांतर करून बाह्य त्वचेमधून किंवा आंतरगुहिकेतील (सीलेंटेरेट प्राण्याच्या शरीरातील गुहिकेतील) द्रवातून अंतिम स्थानी पोहोचतात.

काही दंशकोशिका एकेकट्याच असतात. हायड्राच्या शरीरावर त्या पुष्कळ असल्या, तरी प्रत्येक एकेकटीच असते परंतु संस्पर्शकांवर त्या विपूल असून त्यांची व्यवस्था किंवा मांडणी निराळी असते. संस्पर्शकांच्या बाह्यत्वचेच्या उपकला–कोशिकांमध्ये (अस्तरातील कोशिकांमध्ये) यांचे समूह असतात. एका कोशिकेत एकच समूह असतो. समूहात मध्यभागी  एक मोठी दंतकोशिका असून तिच्याभोवती कित्येक लहान दंशकोशिका असतात या समूहांमुळे संस्पर्शकाच्या पृष्ठावर उंचवटे (बॅटऱ्या) आलेले दिसतात. आधार–बिंबावर (शरीराच्या तळावर) दंशकोशिका मुळीच नसतात.

रॉबर्ट व्हाइल या प्राणिशास्त्रज्ञांनी सीलेंटेरेटांच्या निरनिराळ्या वर्गातील ११९ जातींचा दंशकोशिकांच्या दृष्टीने सर्वांगपूर्ण अभ्यास केल्यावर त्यांना एकंदर १७ प्रकारच्या दंशकोशिका आढळून आल्या.


आ. ३. हायड्रात आढळणाऱ्या चार प्रकारच्या दंशकोशिका : (अ) वेधी दंशकोशिका नलिकेचे उत्क्षेपण झालेले आहे : (१) नलिका, (२) काटे, (३) झाकण (आ) सर्पिल दंशकोशिका (इ) स्ट्रेप्टोलाइन ग्लुटिनंट दंशकोशिका (ई) स्टीरिओलाइन ग्लुटिमंट दंशकोशिका.

ठोकळमानाने दंशकोशिकांचे दोन गट पडतात. पहिल्या गटातील दंशकोशिकांच्या नलिकांचे टोक बंद असते. यांचा उपयोग भक्ष्य गुंतवून ते पकडण्याकरिता होतो. दुसऱ्या गटातील दंशकोशिकांच्या नलिकांच्या टोकावर छिद्र असते. या प्रकारच्या नलिका उत्क्षेपाच्या (बाहेर फेकण्याच्या) वेळी भक्ष्याच्या अथवा शत्रूच्या शरीरात घुसून संपुटातील विषारी द्रव पदार्थ त्याच्या शरीरात सोडतात. या विषाच्या प्रभावामुळे पुष्कळ लहान अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी आणि मासे मरतात.

दंशकोशिकेच्या काही प्रकारांच्या रचनेची कल्पना हायड्रात आढळणाऱ्या चार प्रकारच्या दंशकोशिकांच्या पुढे दिलेल्या संक्षिप्त वर्णनावरून येईल. (१) वेधी (भोक पाडून आत शिरणाऱ्या) दंशकोशिका : या मोठ्या आणि वाटोळ्या असून त्यांचा व्यास १६μ (μ= १०–३) मिमी. असतो. संपुटिकेच्या आत असणाऱ्या नलिकेची आडवी वेटोळी झालेली असतात. तिच्या बुडाशी तीन मोठे कंटक (काटे) व लहान काट्यांच्या तीन ओळी असतात. उत्क्षेपाच्या वेळी नळी अतिशय जोराने बाहेर पडून लहान प्राण्यांच्या त्वचेत घुसून विष आत सोडते. त्यामुळे प्राणी बेशुद्ध होतात किंवा मरतात. (२) सर्पिल दंशकोशिका : या नासपतीच्या आकाराच्या असून त्यांची लांबी ९ μ असते. आतली नलिका आखूड व जाड असून तिला एकच वेढा पडलेला असतो. भक्ष्य लहान असले, तर उत्क्षेपानंतर त्याच्याभोवती व मोठे असले, तर त्याच्या शरीराच्या एखाद्या लहान भागाभोवती ही घट्ट गुंडाळली जाते. (३) स्ट्रेप्टाेलाइन ग्लुटिनंट : ही दंशकोशिका अंडाकार ९μ लांबीची असते. आतली नलिका लांब असून तिची तीनचार आडवी वेटोळी असतात. तिच्यावर बारीक काटे असतात. उत्क्षेपानंतर भक्ष्याच्या एखाद्या भागाभोवती ही घट्ट गुंडाळली जाते. (४) स्टीरिओलाइन ग्लुटिनंट : ही ७ μ लांब असून हिच्यातून बाहेर पडणारी नलिका सरळ असते. तिच्यावर काटे नसतात.

पहिले दोन प्रकार भक्ष्य पकडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, बाकीच्या दोहोंपासून एक प्रकारचा चिकट स्त्राव उत्पन्न होतो आणि भक्ष्य अडकवण्याकरिता त्यांचा उपयोग होतो.

दंशकोशिका प्राण्यांच्या तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) नियंत्रणाखाली नसतात, नायडोब्लास्टवर असलेल्या दंशप्रवर्धाचे योग्य रीतीने उद्दीपन झाल्यावर त्यांचे आपोआपच उत्क्षेपण होते. दंशप्रवर्धाला अन्न–कण, भक्ष्य अथवा शत्रूचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचे उद्दीपन होते. याला रासायनिक आणि यांत्रिक उद्दीपकांच्या एकीकरणाची आवश्यकता असते. केवळ रासायनिक किंवा यांत्रिक उद्दीपकांमुळे उद्दीपन होत नाही. दंशप्रवर्धाच्या उद्दीपनामुळे संपुटिकेच्या भित्तीमधून जास्त पाणी आत जाऊ लागते आणि नायडोब्लास्टचे संकोचन होते. जास्तपाणी संपुटिकेत गेल्यामुळे तिच्यातील द्रव पदार्थाचा दाब वाढतो व याच वेळी नायडोब्लास्टच्या संकोचनामुळे संपुटिकेवर बाहेरून दाब पडतो. यामुळे दंशकोशिकेचा ‘स्फोट’ होऊन आतली नलिका उलटी (आतला भाग बाहेर) होऊन जोराने बाहेर पडते. एकदा बाहेर पडलेली नलिका पुन्हा संपुटिकेत ओढून घेता येत नाही वा त्याच नायडोब्लास्टपासून दुसरी दंशकोशिका निर्माण होत नाही. असे उपयोगात आलेले नायडोब्लास्ट आंतरगुहेत जातात व तेथे त्यांचे पचन होते. जुन्या दंशकोशिकांची जागा नव्या दंशकोशिका घेतात.

पहा : सीलेंटेरेटा हायड्रा.

जोशी, मीनाक्षी