आ. १. (अ) ॲरेनिकोला (ॲनेलिडा) पार्श्व दृश्य : (१) क्लोम असलेला मध्यभाग (आ) ॲरेनिकोलाच्या अनुप्रस्थ छेदाचा क्लोम दाखविणारा भाग : (१) क्लोम.

क्लोम :(कल्ले). हा प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागाचा विस्तार असून पाण्यातील श्वासोच्छ्‍वासाचे अंग (इंद्रिय) म्हणून ह्याचा उपयोग होतो. क्लोमांचे पृष्ठ अतिशय पातळ असल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन विसरणाने (दोन पदार्थांचे रेणू एकमेकांच्या मोकळ्या जागेत जाऊन आपोआप मिसळण्याच्या क्रियेने) शरीरात आणि शरीरातील कार्बन डाय-ऑक्साइड तसाच बाहेरच्या पाण्यात जातो. ते तसे नसले तर वायूंची अदलाबदल अशक्य होते. क्लोमाची श्वसनांग म्हणून असणारी कार्यक्षमता वायूंच्या जलद होणाऱ्या अदलाबदलीवरच अवलंबून असते. वायूंची ही अदलाबदल झपाट्याने होण्याकरिता क्लोमाला कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त रक्ताचा सारखा पुरवठा होणे आणि क्लोमाच्या भोवतालचे पाणी वारंवार बदलले जाणे आवश्यक असते.

आ. २ शेवंड्याचा क्लोमकक्षं : (१) क्लोमकक्ष, (२) क्लोम

ज्या प्राण्यांमध्ये परिवहन तंत्र (रक्तभिसरण संस्था) असते त्यांच्यातच क्लोम आढळणे शक्य असते. म्हणूनच स्पंज, सीलेंटेरेट व प्लॅटिहेल्मिंथ यांच्यासारख्या साध्या रचनेच्या बहुकोशिक (पुष्कळ पेशींचे शरीर असणाऱ्या) प्राण्यांमध्ये ते नसतात. त्याचप्रमाणे पुष्कळ डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) व ॲनेलिडा (वलयी संघ), क्रस्टेशिया (कवचधारी) इ. समूहांतील लहान प्राणी यांच्या शरीराचे पृष्ठ इतके पातळ असते की, त्याच्या द्वाराच श्वसन होत असल्यामुळे त्यांच्यात क्लोम नसतात.

आ. ३. लिम्युलसाच्या शरीराच्या पश्च भागाचा अनुदैर्व्य छेद : (१) क्लोम, (२) प्रच्छद, (३) रक्तवाहिन्या.

अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेल्या) आणि पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये निरनिराळ्या नमुन्यांचे क्लोम आढळतात विशेषतः चिखल, अस्वच्छ व साठलेले पाणी इ. ऑक्सिजनाची उणीव असणाऱ्या परिस्थितीत राहणाऱ्या अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये यांचे विविध प्रकार दिसतात. क्लोमांचे मुख्यतः दोन नमुने आढळतात. एक बाह्य क्लोम आणि दुसरा आंतर क्लोम. पहिल्या नमुन्याचे क्लोम प्राण्याच्या  शरीरावरून पुढे आलेले व मोकळे असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या क्लोमांचे एखाद्या आवरणाने संरक्षण केलेले असल्यामुळे ते आत असतात. बाह्य क्लोमात प्राण्याच्या शरीराच्या हालचालीमुळे वा खुद्द क्लोम हालविल्यामुळे त्याच्या भोवताली नवे पाणी सारखे येत असते. आंतर क्लोमांवरून ताज्या पाण्याचा प्रवाह सारखा वाहत राहण्याची व्यवस्था असते.

आ. ४. श्वासनाल क्लोम (हेप्टॅजेनियाच्या इन्स्टारमधील) : (१) क्लोम.

अपृष्ठवंशीय प्राणी :ॲनेलिडांमध्ये क्लोम असेलच तर ते शरीरावरून पुढे आलेल्या तंतूंच्या गुच्छासारखे अथवा शाखित प्रवर्धांच्या (वाढींच्या) स्वरूपाचे असतात. ॲरेनिकोला व लोइमिया ही याची उदाहरणे होत. क्रस्टेशियन प्राण्यांचे क्लोम पायांवर किंवा शरीरावर पायांच्या बुडालगत असतात. साध्या प्रकारात ते बाह्य असतात परंतु शेवंडे, झिंगे, खेकडे इ. प्राण्यांत ते पृष्ठवर्माच्या (पाठीच्या आच्छादक कवचाच्या) वि्स्ताराने-क्लोमावरकाने (पृष्ठवर्माच्या पार्श्व विस्ताराने तयार झालेल्या क्लोमावरील आच्छादनाने) -झाकलेले असतात. क्लोम-कक्षात येणारे पाणी एका परिवर्तित उपांगाच्या (अवयवाच्या) साह्याने बाहेर काढून टाकले जाते व त्याच्या जागी नवे पाणी येते. अशा रीतीने क्लोमकक्षात ताजे पाणी सारखे खेळत असते. ॲरॅक्निडांमध्ये क्लोम क्वचितच आढळतात झिफोसूरा गणातील लिम्युलसामध्ये ते असतात ते पातळ पत्र्यांसारखे असून पुस्तकातील पृष्ठांप्रमाणे त्यांची मांडणी असते. पुष्कळ जलीय कीटकांच्या डिंभांना तंतुमय किंवा पटलित (पत्रे असलेले) क्लोम असतात आणि त्यांत मोठ्या प्रमाणात बारीक श्वासनाल असतात विसरणाने क्लोमात शिरणारा ऑक्सिजन ते गोळा करतात. अशा क्लोमांना श्वासनाल क्लोम म्हणतात. एकायनोडर्म प्राणी सुस्त असल्यामुळे त्यांच्यात क्लोमांचा अगदीच अल्प विकास झालेला असतो. तारामीन आणि समुद्री अर्चिन यांत अगदी लहान बाह्य क्लोम असतात. मॉलस्कांचे (मृदुकाय प्राण्यांचे) क्लोम विविध रूपांचे असतात. उदारपादांचे (एकपुटींचे) आणि शीर्षपादांचे (ऑक्टोपस, स्क्विड वगैरेंचे) क्लोम पिच्छांसांरखे उद्वर्ध (फाटे) असून ते प्रावाराने (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीने) झाकलेले असतात. लॅमेलिब्रँक (द्विपुटी) प्राण्यांमध्ये त्यांचे अतिशय परिवर्तन झालेले असते ते गुंतागुंतीच्या रचनेचे, पट्टिकासदृश (पत्र्यांसारखे) असून पुष्कळ तंतूंचे बनलेले असतात. अन्न गोळा करण्याच्या कामी आणि श्वसनाकरिता त्यांचा उपयोग होतो.

आ. ५.. अस्थिमत्स्याचे क्लोम : (अ) क्लोमकक्षातील क्लोम दाखविण्याकरिता प्रच्छद कापून टाकला आहे : (१) क्लोमतंतू, (२) क्लोमकर्षणी, (आ) क्लोमाचा एक भाग, रक्ताचा मार्ग बाणांनी दाखविला आहे: (१) क्लोमकर्षणी, (२) क्लोमचाप, (३) क्लोमतंतू, (इ) एका क्लोमतंतूचा मोठा करून दाखविलेला एक भाग: (१) पटलिका, (२) केशिका, (३) अपवाही वाहिनी, (४) अभिवाही वाहिनी. रक्ताचा मार्ग बाणांनी दाखविला आहे.

आ. ६. माशांच्या श्वसनाची यंत्रणा : (अ) उपास्थिमिनाची श्वसनयंत्रणा, (आ) व (इ) अस्थिमत्स्याची श्वसन-यंत्रणा. (१) प्रच्छद - (आ) मध्ये मिटलेला व (इ) मध्ये उघडा. पाण्याचा मार्ग बाणांनी दाखविला आहे.

पृष्ठवंशी प्राणी : मासे आणि उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी) यांच्यासारखा खालच्या दर्जाच्या जलचर पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये क्लोम असतात. क्लोमांचा नेहमी क्लोमछिद्रांशी संबंध असतो ही छिद्रे ग्रसनीप्रदेशात (घशाच्या भागात) व देहभित्तीत असून त्यांची एक श्रेणी असते. पाणी बहुधा मुखावाटे आत घेतले जाऊन क्लोमछिद्रांमधून बाहेर सोडले जाते. पाण्याच्या प्रवाहाच्या या मार्गावरच क्लोम असतात. ते दोन प्रकारचे असतात. (१) बाह्य क्लोम : हे देहभित्तीच्या विस्ताराने तयार झालेले, क्लोमछिद्रांच्या मध्ये असणारे व तंतूंचे बनलेले असतात. या तऱ्हेचे क्लोम काही माशांच्या (काही शार्क व पॉलिप्टेरस यांच्या) डिंभात आणि उभयचरांच्या डिंभांत आढळतात. अपृष्ठवंशीय प्राण्यांत आढळणाऱ्या क्लोमांसारखे यांचे स्वरूप असते. (२) आंतर क्लोम : क्लोमछिद्रे एकमेकांपासून क्लोमचापांनी (क्लोमाच्या कमानींनी) अलग झालेली असतात व प्रत्येक क्लोमचापावर क्लोमतंतूंच्या ओळी (सामान्यतः दोन) असतात. क्लोमतंतूच्या दोन्ही बाजूंवर पुढे आलेल्या नाजूक, पातळ दुमडी असतात, त्यांना पटलिका म्हणतात. या पटलिकांत केशिकांचे (केसासारख्या बारीक नलिकांचे) जाळे असते. क्लोमछिद्रांमधून ग्रसनीच्या पोकळीत बाहेरच्या पाण्याशी दळणवळण चालू असते. क्लोमांची अशा तऱ्हेची रचना माशांमध्ये आढळते. उपास्थिमानांची (अपारदर्शक, मजबूत व लवचिक पेशीसमूहांचा– कुर्चेचा– सागांडा असलेल्या माशांची) क्लोमछिद्रे उघडी असतात, पण अस्थिमिनांची प्रच्छदाने (क्लोमाच्या आवरणाने) झाकलेली असतात आणि पाणी बाहेर जाण्याकरिता प्रच्छदात एक छिद्र असते. पाणी मुखातून आत येते व क्लोमछिद्रांतून बाहेर पडताना क्लोमांवरून वाहत जाते. वायूंची अदलाबदल पटलिकांमध्ये होते.

क्लोमांच्या द्वारा होणाऱ्या श्वसनामध्ये ज्यातील ऑक्सिजन कमी झालेला आहे असे रक्त बाह्य माध्यमाच्या (पाण्याच्या) अगदी निकट आणले जाते त्यामुळे आणि विसरणामुळे कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन यांची अदलाबदल सहज होते.

कर्वे, ज. नी.