बनारस हिंदू विश्वविद्यालय (विद्यापीठ) :उत्तर प्रदेशातील या विद्यापीठाची स्थापना वाराणसी (बनारस) येथे ४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाली. विद्यापीठाच्या स्थापनेत पंडित मदनमोहन मालवीय, महाराजा प्रभू नारायण सिंग, डॉ. ॲनी बेझंट आणि महाराजा रामेश्वर सिंग यांचा मोठा वाटा आहे. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व निवासी असून त्याच्या कक्षेत दोन घटक महाविद्यालये व अठरा संलग्न महाविद्यालये आहेत. यांशिवाय शालेय मंडल देखरेख ठेवीत असलेल्या तीन शाळांचा विद्यापीठात अंतर्भाव होतो. ही विद्यालये कला व विज्ञान शाखांतर्गत अभ्यासक्रम चालवीत असतात. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी विद्यापीठाची प्रशासन-व्यवस्था पाहतात.

विद्यापीठाच्या भाषासाहित्यादी मानव्यविद्या, प्रयोगीय कला, दृष्य कला, सामाजिक विज्ञाने, विज्ञान, वाणिज्य, विधी, शिक्षणशास्त्र, भारतीय वैद्यक, वैद्यक, कृषि, प्राच्यविद्या व धर्मशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रविद्या इ. विद्याशाखा आहेत. ‘चक्रवर्ती’ व ‘वाचस्पती’ या पदव्या प्राच्यविद्या आणि धर्मविद्या या विद्याशाखांत दिल्या जातात. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व हिंदी आहे.

राज्याचा सामाजिक-आर्थिक विकास साधण्यासाठी विद्यापीठाने एक प्रसारकेंद्र स्थापले असून तेथे राजकीय घडामोडींसंबंधी संशोधन केले जाते. हे केद्र राज्यांच्या घडामोडींची माहिती देणारे त्रैमासिक व पुस्तके प्रसिद्ध करते. विद्यापीठाच्या बऱ्याच विद्याशाखांत व महाविद्यालयांत पाठपद्धती आणि चर्चासत्र पद्धती सुरू आहे. विज्ञान, वाणिज्य, कृषी आणि विधी ह्या विद्याशाखांत षण्मास परीक्षा पद्धती अस्तित्वात आहे.

विद्यापीठाचे ‘सर सुंदरलाल रुग्णालय’ नावाचे स्वतंत्र रुग्णालय आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी केली जाते व त्यांना मोफत औषधोपचार इ. विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येतात.

विद्यापीठाचे विस्तीर्ण क्रीडांगण असून तेथे फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, टेनिस, इ. खेळांच्या सुविधा आहेत.विद्यापीठाची एक व्यायामशाळा असून विविध प्रकारचे शारीरिक खेळ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी निदेशक नेमले जातात. विद्यापीठाच्या आवारात पोहण्याचा तलावही आहे. नाताळच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाचे शिक्षण देण्याची विद्यापीठाने सोय केलेली आहे.

भारतीय कला व पुरातत्त्वविद्या या विद्यापीठीय शाखांचे मोठे संग्रहालय असून त्यास ‘भारत कला भवन’ असे म्हणतात. या कलाभवनातील चित्रे, शिल्पाकृती, किनखाब, नाणी, कापड यांसारख्या वस्तूंच्या संग्रहास राष्ट्रीय महत्व प्राप्त झालेले आहे.

विद्यापीठाची एकूण ३७ वसतिगृहे असून त्यांपैकी सहा वसतिगृहांत मुलीच राहतात. विद्यापीठीय आवारात २८ वसतिगृहे आहेत. विद्यपीठाचे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय वसतिगृह असून तेथे पन्नास विदेशी विद्यार्थी राहण्याची सोय आहे.

विद्यापीठ निरनिराळ्या शिष्यवृत्त्या व विद्यावेतने देते. जुलै-एप्रिल हे विद्यपीठाचे शैक्षणिक वर्ष असून त्यात तीन सत्रे असतात. विद्यापीठाचे ग्रंथालय मोठे असून त्यात ५,८४,२६८ ग्रंथ व ७८,०५२ नियतकालिके आहेत (१९७९-८०). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न ८.७४ कोटी रु. व खर्च ९.०१ कोटी रु. आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थिसंख्या २०,२९२ व अध्यापकसंख्या १,४०० आहे (१९७९-८०).

मिसार, म. व्यं.