कुष्ठरोग : विशिष्ट जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आणि त्वचा व तंत्रिका (मज्जातंतू) यांमध्ये उद्‌भवणाऱ्या चिरकारी (दीर्घकालीन) रोगाला ‘कुष्ठरोग’, ‘महारोग’ किंवा ‘महाकुष्ठ’ असे म्हणतात.

इतिहास : कुष्ठरोग फार प्राचीन काळापासून माहीत आहे. जगातल्या बहुतेक सर्व प्राचीन वाङ्‌मयांत या रोगाचा उल्लेख आढळतो. इ. स. पू. चौथ्या शतकात ग्रीस देशात तो पूर्वेकडून आला असे मानतात. तेथून पुढे सु. १०००–१५०० वर्षे तो यूरोपभर पसरला. चौदाव्या शतकापासून तो यूरोपीय देशांतून कमी कमी होत गेला आणि आज तो त्या देशांत नाममात्रच दिसतो.

सुश्रुतसंहितेत ‘कुष्ठ’ या नावाखाली या रोगाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. आधुनिक ग्रंथांत या रोगाचे जे वर्णन आहे त्यातील जंतूंचे वर्णन वगळल्यास सुश्रुतसंहितेतील वर्णन आजही संपूर्ण आहे. इतके स्पष्ट वर्णन इतर समकालीन वाङ्‌मयांत इतरत्र कोठेही नाही.

कुष्ठरोग आनुवंशिक आहे असे मानण्यात येई. शिवाय कुष्ठाचे मुख्य लक्षण कुजणे व सडणे हे होय. बोटे, नाक, डोळे इत्यादिकांतसुद्धा कुष्ठ उत्पन्न होऊन ती सडतात. यामुळे जी विद्रूपता येते तीमुळे या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींबद्दल समाजात घृणा व किळस उत्पन्न होते. त्याचा परिणाम म्हणजे हा रोग झालेल्या व्यक्ती समाजबाह्य ठरल्या. अलीकडे कुष्ठरोग हा आनुवंशिक नाही ही गोष्ट सिद्ध झालेली असून, विशिष्ट जंतुसंसर्गामुळेच हा रोग होतो आणि वेळच्यावेळी उपाय केल्यास विद्रूपता येत नाही असे निश्चितपणे ठरलेले आहे.

संसर्गविज्ञान : जगामध्ये सु. एक कोटी कुष्ठरोगी आहेत. कुष्ठरोग उष्णकटिबंधात अधिक प्रमाणात दिसतो. आफ्रिका, आशिया व दक्षिण अमेरिका या खंडांत त्याचा प्रादुर्भाव आहे. भारत, चीन, जपान, आग्‍नेय आशियातील देश आणि पॅसिफिक महासागरातील बेटांत कुष्ठरोगाचे प्रमाण फार आहे. भारताच्या पूर्व व दक्षिण भागांत त्याचे प्रमाण अधिक, मध्य व पश्चिम भागांत मध्यम आणि उत्तर व वायव्य भागांत फार कमी आहे. भारतात एकूण २५ लक्ष कुष्ठरोगी असून त्यांपैकी ३ ते ३·५ लक्ष कुष्ठरोगी महाराष्ट्रात असावेत, असा अंदाज करण्यात आलेला आहे. त्यांपैकी अवघे ५० ते ६० हजार कुष्ठरोगी उपचार घेतात असे आढळलेले आहे. लहान मुले संसर्गक्षम असल्यामुळे घरातच ग्रस्त व्यक्ती असल्यास मुलांना कुष्ठरोग होण्याची भीती अधिक असते. रोगाचा परिपाक काल (रोगजंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) ४ ते ५ वर्षे असल्यामुळे रोगाची प्राथमिक लक्षणे तरुण वयात दिसू लागतात. हवा, पाणी, अन्न, कीटक वगैरे गोष्टींच्या द्वारे रोगाचा संसर्ग होत नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सांसर्गिक आणि असांसर्गिक रोग्यांचे प्रमाण १ : ३ असून स्त्री व पुरुष रोग्यांचे प्रमाण १ : २ असे आहे.

कुष्ठरोगाचा समाजात प्रसार होण्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात : (१) सांसर्गिक रोग्यांचे अस्तित्व व प्रमाण, (२) संसर्गक्षम व्यक्तीचे अस्तित्व व प्रमाण आणि (३) निरोगी व्यक्तींना संसर्ग होण्यासारखी समाजातील व्यक्तींची राहणी व परिस्थिती.

कारणे : कुष्ठरोग एका सूक्ष्मजंतुसंसर्गामुळे होतो. हा जंतू हान्सेन नावाच्या नॉर्वेजियन शास्त्रज्ञांनी १८७४ मध्ये शोधून काढला. त्या जंतूला मायक्रोबॅक्टिरियम लेप्री  असे नाव असून तो क्षयरोगाच्या जंतूच्याच वर्गातला आहे. ‘झील-नील्सेन’ रंजकपद्धतीने (जंतूंना रंगविण्याच्या एका पद्धतीने) तो सूक्ष्मदर्शकाखाली लाल रंगाचा दिसतो. अम्‍लाने त्याच्या रंजकगुणावर परिणाम होत नसल्यामुळे त्याला अम्‍लस्थिर असे म्हणतात. हा जंतू एकेकटा किंवा त्याचे पुंजके ऊतकांत (समान रचना आणि कार्य असणाऱ्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहांत) आढळतात. अधिस्तराभ (ज्यातील दोन कोशिकांमध्ये आधारभृत द्रव्य कमी असते अशा ऊतकासारख्या ऊतकातील) कोशिकांच्या जीवद्रव्यात या जंतूचे पुंजके आढळतात. व्यक्तीची प्रतिकारशक्ती क्षीण असेल, तर ग्रस्त भागातील अधिस्तराभ कोशिका अपकर्षित होऊन (ऱ्हास पावत जाऊन) कुष्ठजंतूंची त्या कोशिकांत वाढ होते. त्या कोशिकांना कुष्ठ-कोशिका असे म्हणतात.

कुष्ठजंतूची शरीराबाहेर वाढ करण्यात अजून यश मिळालेले नाही. तसेच या जंतूंचा संसर्ग होणारे इतर प्राणीही अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे या जंतूंच्या जीवनव्यापारासंबंधी विशेष ज्ञान अजून झालेले नाही.

विकृतिविज्ञान : संसर्गक्षम व्यक्तीचा रुग्ण व्यक्तीशी सहवास घडला, तर रोगजंतू त्या व्यक्तीच्या शरीरात बहुधा त्वचेतून शिरतात. दीर्घकालीन निकट सहवास हे संसर्गाचे महत्त्वाचे कारण आहे. मात्र अलीकडच्या संशोधनाने असे दिसून आले आहे की, संसर्गक्षम व्यक्तीचा अल्पकालीन निकट सहवासही संसर्ग होण्यास पुरेसा आहे. रोग्याच्या सहवासातील शेकडा ३० निरोगी व्यक्तींच्या त्वचेत रोगजंतू सापडतात, असे सिद्ध झालेले आहे. त्यांपैकी काही व्यक्तींतच कुष्ठरोगाचे त्वचेवर दिसणारे चट्टे वा डाग दिसू लागतात. (१) ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती फार प्रबल असेल त्यांना रोग होत नाही. (२) ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी क्षीण नसेल त्यांच्या शरीरांत रोगजंतूंचा प्रवेश झाला, तर ते जंतू संवेदनावाहक तंत्रिकांमध्ये जाऊन तेथे शरीरातील अधिस्तराभ कोशिका जमून त्या कोशिका जंतूंचा नाश करण्याचा प्रयत्‍न करतात. या कोशिका ‘भक्षी-कोशिका’ असून त्या जंतू पचवून टाकण्याची खटपट सुरू करतात. अशा कोशिका फार मोठ्या प्रमाणात तंत्रिकातंतूमध्ये जमल्या तर त्यांचा दाब त्या तंत्रिकातंतूवर पडून तंतूचा अपकर्ष झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते वा नष्ट होते. (३) ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती क्षीण असते अथवा मुळीच नसते त्यांच्या त्वचेमध्ये जंतूंची वाढ प्रचंड प्रमाणात होऊन ते त्वचेत पसरत जातात. त्वचेतही अभिस्तराभ कोशिका जमतात, परंतु त्या निष्क्रिय बनलेल्या असून त्यांच्या जीवद्रव्यांतच कुष्ठजंतूंची वाढ होते. अशा उपकर्षित कोशिकांनाच ‘कुष्ठ-कोशिका’ असे नाव असून या कोशिका सर्व शरीरभर रक्त वा लसीकामार्गे (ऊतकांतून रक्तात जाणाऱ्या द्रव्याच्या मार्गाने) पसरून सर्वत्र जंतूचा प्रसार करतात. या प्रकारात तंत्रिकातंतूचा अपकर्ष रोगाच्या प्रगतावस्थेतच दिसतो.


वर्गीकरण : कुष्ठरोगाच्या वर्गीकरणासंबंधी अजून तज्ञांमध्ये तीव्र मतभेद आहेत. भारतीय कुष्ठरोगतज्ञांच्या सभेत कुष्ठरोगाचे दोन मुख्य अथवा ‘ध्रुव’ प्रकार कल्पिले आहेत. त्यांशिवाय रोग्याची प्रतिकारशक्ती कमीअधिक प्रकर्षाने व्यक्त होत असल्यामुळे या दोन ध्रुव प्रकारांत न बसणाऱ्या या रोगाच्या अनेक अवस्था दिसतात. त्या प्रकाराला ‘मध्यमवर्ती’ प्रकार असे म्हणतात.

(१)ज्या ध्रुव प्रकारात मिश्रतंत्रिकांचा अपकर्ष होतो त्याला ‘ग्रंथिसद्दश’ प्रकार म्हणतात. हा प्रकार प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींतच दिसतो. त्याला इंग्रजीत ‘ट्युबरक्युलॉइड’अथवा ‘टी’ प्रकार म्हणतात. हा प्रकार कमी सांसर्गिक असतो. यालाच सुश्रुतसंहितेत ‘क्षुद्रकुष्ठ’ असे नाव असून त्याचे चार पोटप्रकार मानलेले आहेत.

(२) ज्या ध्रुव प्रकारात त्वचेतच जंतूंची प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्वचेत गाठी उत्पन्न होतात, त्या प्रकाराला ‘कुष्ठार्बुदीय’ (गाठीचा कुष्ठरोग) अथवा  ‘लेप्रोमॅटस’ प्रकार म्हणतात. यालाच सुश्रुतसंहितेत ‘महारुणकुष्ठ’ असे नाव आहे. हा प्रकार फार सांसर्गिक असतो. हा प्रकार प्रतिकारशक्ती अगदी कमी वा मुळीच नसलेल्या व्यक्तीत दिसतो.

लक्षणे : संसर्ग झाल्यानंतर ४ ते ५ वर्षांत किंवा अधिक परिपाक कालानंतर लक्षणे दिसू लागतात.

(१) ग्रंथिसदृश किंवा किंवा क्षुद्रकुष्ठाची दोन मुख्य लक्षणे आहेत : (अ) त्वचेवर चट्टे, डाग, लांछन अथवा उत्स्फोट (पुरळ). या चट्ट्यांच्या कडा जाड, स्पष्ट व उन्नत असतात. मध्यभाग सपाट वा खोलगट असून त्याचा रंग पांढरट अथवा लालसर असतो. तेथील केस आणि स्वेद (घाम) ग्रंथींचा नाश झालेला असल्यामुळे ती जागा शुष्क आणि खरखरीत दिसू लागते. कानाच्या पाळी, पाठ, चेहरा वा हातापायांच्या बाहेरच्या भागांत हे चट्टे प्रथम दिसतात. या चट्ट्यांमध्ये साध्या परीक्षेने कुष्ठजंतू सापडत नाहीत परंतु फिगरेडो, देसाई वगैरे संशोधकांनी विशेष प्रक्रियेनंतर ते सापडतात असे सिद्ध केले आहे. हे चट्टे शरीराच्या दोन्ही भागांत सारख्याच प्रमाणात नसतात. (आ) वर वर्णन केलेल्या चट्ट्यांच्या ठिकाणी स्पर्श, वेदना, उष्ण व शीत या संवेदना कमी होत जाऊन त्वचेच्या तेवढ्या भागाला बधीरपणा येतो. ग्रस्त (रोग झालेल्या) भागाकडे जाणाऱ्या मिश्रतंत्रिका जाड झालेल्या असून संवेदनाभाव, स्‍नायुवैकल्प (स्‍नायूंचा कमजोरपणा), अंगुलिवक्रत्व (बोटे वाकडी होणे) वगैरे लक्षणे दिसतात. संवेदना-नाश झालेला असल्यामुळे इजा, भाजणे, पोळणे वगैरे गोष्टी रोग्याच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे जखमा व त्या जखमांमध्ये जंतुसंसर्ग संभवतो.

(२) कुष्ठार्बुदीय. किंवा महारुणकुष्ठात त्वचेवर लालसर, पांढरट गाठी उठतात. गाठी मोठ्या होत जातात. त्यांच्या कडा अस्पष्ट असतात. शेजारच्या गाठी एकमेकींस मिळून मोठ्या गाठी तयार होतात. गाठीवरची त्वचा लालसर, जाड आणि तुळतळीत दिसते. या गाठी शरीराच्या दोन्ही बाजूंस सारख्याच प्रमाणात दिसतात. या गाठी तोंड, कान, नाक, हात व पाय यांवर अधिक दिसतात. फार प्रगतावस्थेत सर्व चेहराच सुजून गेल्यासारखा दिसतो. नाकातील उपास्थी (मजबूत व लवचिक ऊतक, कूर्चा) झिजून जाऊन नाक बसके होतेडोळ्याच्या बुबुळावर व्रण होऊन दृष्टिनाश होतो. ह्या प्रकारात त्वचेमध्ये असंख्या जंतू असल्यामुळे तो फार सांसर्गिक असतो.

(३) मध्यमवर्ती प्रकारात फिकट, स्पष्ट कडा नसलेले चट्टे अथवा डाग दिसतात. या प्रकारात वरच्या दोन्ही प्रकारांतील लक्षणे संमिश्रपणे झालेली दिसतात. हा प्रकार अनियमितच राहतो अथवा त्याचे पर्यवसान पुढे कुष्ठार्बुदीय प्रकारात होते.


निदान : वर वर्णन केलेली लक्षणे इतकी स्पष्ट आहेत की, निदान करणे कठीण नाही परंतु अगदी सुरुवातीस त्वचेवरील चट्टे लक्षात न घेण्यासारखे लहान असल्यामुळे विशेष काळजीने तपासणी करावी लागते. त्वचेवरील फिकट चट्टे व त्याच ठिकाणच्या त्वचेमध्ये संवेदनाऱ्हास व नाश ही लक्षणे विशेष महत्त्वाची आहेत. तंत्रिका जाड होणे, त्वचेवरील गाठीतील रक्ताची सूक्ष्मदर्शकाने परीक्षा करून तेथे कुष्ठजंतू सापडणे यांची निदानाला मदत होते. नाकाच्या अधिस्तरावरील स्रावामध्येही सूक्ष्मदर्शकीय परीक्षेत कुष्ठजंतू सापडतात.

कुष्ठीय प्रतिक्रिया : कुष्ठजंतूपासून बनविलेल्या प्रतिजनाचा (शरीरात टोचला असता प्रतिपिंडे तयार करणाऱ्या पदार्थाचा) उपयोग करून संबंधित व्यक्तीच्या शरीरात कुष्ठरोग प्रतिकारशक्ती कितपत आहे याची परीक्षा करता येते. या प्रतिक्रियेला ‘कुष्ठीय (लेप्रोमिन) प्रतिक्रिया’ असे म्हणतात. या परीक्षेने प्रतिकारशक्तीसंबंधी माहिती मिळत असली, तरी कुष्ठरोग निदानात तिचा फारसा उपयोग होत नाही.

कुष्ठरोगामुळे होणारी व्यंगे : कुष्ठरोगाच्या प्रगतावस्थेत संवेदना-नाश, स्‍नायुवैकल्प आणि अंगुलिवक्रत्व ही प्राथमिक व्यंगे होत. संवेदना नसल्यामुळे भाजणे, इजा होणे वगैरे गोष्टींपासून ग्रस्त व्यक्तीचे संरक्षण होत नाही. स्‍नायू व सांधे यांची हालचाल थांबते, हातापायांच्या बोटांची हाडे झिजून झिजून झडून जातात. तळपायाला इजा झाल्यास तळव्यावर ‘भेदक’ (आरपार भोक असणारा) व्रण उत्पन्न होतो. नाकातील उपास्थींचा नाश झाल्यामुळे नाक बसके होते अथवा नाकाचा पुढचा भाग झिजून जातो. या व्यंगांमुळे कुष्ठरोगी फार विद्रूप आणि भयाण दिसतो.

चिकित्सा : कुष्ठरोग असाध्य आहे असा सर्वसाधारण परंतु चुकीचा समज आहे. दैवी प्रकोप, गेल्या जन्मीचे पाप वगैरे कारणांमुळे हा रोग होतो अशी कल्पना होण्याचे कारण म्हणजे या रोगाला प्रभावी असे औषध अलीकडच्या काळापर्यंत उपलब्ध नव्हते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ‘चौलमुग्रा’ या नावाचे औषध प्रचारात आले. हे एक तेल असून कडू कवठ (हिद्‌नोकार्पस लॉरिफोलिया) या झाडाच्या फळापासून ते काढण्यात येई. या औषधाचा काही उपयोग होत असला, तरी कुष्ठरोग पूर्णपणे बरा होण्याबद्दलच्या अपेक्षा पुऱ्या होऊ शकल्या नाहीत. १९५० सालानंतर डॅप्सोन हे रासायनिक औषध अतिशय परिणामकारक ठरलेले असून त्याची अनेक संयुगे आता वापरात आहेत. त्याचे रासायनिक नाव ४ : ४– डायॲमिनो-डायफिनिल-सल्फोन असे आहे. म्हणून त्याला ‘डी. डी. एस.’ असेही म्हणतात. हे औषध विषारी असल्यामुळे अगदी सूक्ष्म प्रमाणात सुरू करून हळूहळू वाढवीत जावे लागते. काही वेळा याची मात्रा न सोसल्यामुळे रोगलक्षणे अधिक प्रमाणात दिसू लागतात म्हणून हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. प्राथमिक अवस्थेत सुरू केल्यास ६ ते ७ वर्षे घेतल्यानंतर त्वचेतील जंतू नाहीसे होतात. पुढे आणखी ६-७ वर्षे ते औषध द्यावे लागते आणि मगच रोग पूर्णपणे बरा होतो. काही तज्ञांच्या मते हे औषध कमीजास्त प्रमाणात जन्मभर द्यावे लागते.

कुष्ठरोगात उत्पन्न होणारी कित्येक व्यंगे आता पुष्कळ प्रमाणात दुरुस्त करता येतात. शस्त्रक्रियेचे या बाबतीतले तंत्र आता पुष्कळच प्रगत झालेले असून या शस्त्रक्रियाशाखेला ‘रोपण-शस्त्रक्रिया’ असे म्हणतात [→शस्त्रक्रिया तंत्र].

प्रतिबंध : कुष्ठरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तीन मूलतत्त्वे आहेत : (१) संसर्ग ज्याच्यामुळे समाजात पसरतो त्यांना समाजापासून दूर ठेवणे, (२) अगदी प्राथमिक अवस्थेतील आणि सांसर्गिक रोग्यांचा संपर्क झालेल्या व्यक्ती शोधून काढून त्यांच्यावर प्रदीर्घ उपचार करणे व (३) लोकशिक्षण.

(१) सांसर्गिक रोगी समाजापासून दूर ठेवून रोग नाहीसा करण्यात अनेक पाश्चात्त्य देशांनी यश मिळविले. भारतासारख्या प्रचंड देशातील २५ लक्ष रुग्णांना वेगळे व दूर ठेवणे ही गोष्ट जवळजवळ अशक्य असल्यामुळे निदान सांसर्गिक रोग्यांना तरी असे दूर काढून कुष्ठधामात ठेवावे, असा विचार अधिक शक्यतेचा मानला जातो. तसेच हातपाय झडून गेल्यामुळे अपंग झालेल्या रुग्णांनाही कुष्ठधामात ठेवणेच भाग पडते.

(२) प्राथमिक अवस्थेतील रोगी आणि सांसर्गिक रोग्यांचा संपर्क झालेल्या व्यक्ती शोधून काढून त्यांच्यावर प्रदीर्घ उपचार करणे, ही गोष्ट शक्य असून तिच्यामुळे दोन गोष्टी साधता येतात. एकतर त्या व्यक्तीचा रोग प्रबल होण्यापूर्वीच त्याला आळा घालता येतो आणि दुसरे म्हणजे वेळीच उपचार झाल्यामुळे असा प्राथमिक अवस्थेतील रोगी सांसर्गिक होण्याचे टळून त्याच्यापासून समाजाला होणारा संभाव्य धोका कमी होतो. भारतात याच गोष्टीवर अधिक भर देण्यात येतो. डी. डी. एस. या पोटात घेण्याच्या स्वस्त औषधाचे वितरण व वापर करणे पुष्कळ सुलभ झाले आहे. बी. सी. जी. या क्षयरोगात वापरल्या जाणाऱ्या प्रतिजनाच्या आणि डॅप्सोन या औषधाचा सूक्ष्म प्रमाणात प्रतिबंधक म्हणून वापर करण्यात येत आहेत.परंतु त्यासंबंधी अजून निश्चित निष्कर्ष काढण्यात आलेले नाहीत.

(३) या रोगासंबंधी लोकांमध्ये असलेल्या चुकीच्या समजुती नाहीशा करण्यासाठी लोकशिक्षण हाच उपाय विशेष महत्त्वाचा आहे. दैवी प्रकोप, आनुवंशिकता वगैरे गोष्टी अजून लोक मानतात ती त्यांची कल्पना नाहीशी करणे फार महत्त्वाचे आहे. कुष्ठरोगी असा शिक्का एकदा बसला म्हणजे मनुष्य समाजाला पारखा होतो या भीतीने प्राथमिक अवस्थेतील रोगी आपला रोग लपविण्याचा प्रयत्‍न करतो. त्या अवस्थेतच जर रोग्यावर योग्य उपचार झाले तर तो पूर्णपणे बरा होतो, ही गोष्ट सर्व समाजात जितक्या परिणामकारकपणे समजावून व पटवून दिली जाईल तितक्या त्वरेने हा रोग नष्ट होईल, यात संशय नाही. म्हणून या रोगासंबंधीची किळस व घृणा नाहीशी करून त्या रुग्णांबद्दल समाजात सहानुभूती उत्पन्न करणे हे अगत्याचे आहे. त्यासाठी लोकशिक्षणाची सर्व साधने वापरली गेली पाहिजेत. 


सुदैवाने १९३० सालानंतर भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, या विषयासंबंधी पुष्कळच जागृती झालेली आहे. वर्धा येथील अखिल भारतीय गांधी लेप्रसी फौंडेशन, ३० वर्षे मुंबईत अव्याहतपणे कार्य करणारे ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल व त्याच्या शाखा, वरोरा येथील आमटे गुरुजींनी चालविलेले कुष्ठधाम व अमरावती येथील शिवाजीराव पटवर्धन यांनी चालविलेले कुष्ठधाम वगैरे प्रयत्न उल्लेखनीय  आहेत. आता बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये कुष्ठधामे व कुष्ठरोगासंबंधी कार्य करणाऱ्या संस्था झाल्या असून त्या संस्थांतील कार्यकर्त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्‍नांमुळे या रोगाच्या निर्मूलनाचे कामी उत्तरोत्तर यश येईल, अशी आशा करण्याला जागा आहे.

                  देसाई, शां. द.

आयुर्वेदीय निदान व चिकित्सा : वायु-पित्त-कफ हे त्रिदोष रक्त, मांस व त्वचा यांना बिघडवून कुष्ठरोग उत्पन्न होतो. दोघांची दुष्टी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शोधनचिकित्सा ही या विकारातील प्रमुख चिकित्सा आहे. शरीर-घटकांशी निगडित झालेले कुष्ठोत्पादक दोष ओकारीने व विरेचनाने धातुघटकांना धक्का न लावता निघून जावे म्हणून औषध देणे. रक्त काढणे रक्त शुद्ध करणारी औषधे व त्वचेवरील फोड, चकदळे कमी करण्यासाठी बाह्य उपचार करावेत. हे उपचार फार दिवस (वर्षे) घ्यावयाचे असतात. शरीरातील दोष काढून टाकण्याकरिता शोधक उपचार करावे लागतात. हे शोधक उपचार स्‍नेहन-स्वेदनपूर्वक करावे लागतात. शुद्धी करीत असताना मधल्या काळात अवस्थेप्रमाणे औषधे घ्यावी लागतात. गुळवेळ, खैर, काळे तीळ, बिब्बा, आवळा, बावची, हळद, दारूहळद इ. औषधांचा काढा, चूर्ण अथवा सिद्ध तूप करून त्यांचे सेवन करावयाचे असते. सर्व औषधांत खैराचा काढा, खैर घालून तापविलेल्या पाण्याने अंघोळ, त्या पाण्यात शिजविलेले अन्न घेणे, ते पाणी पिणे इ. प्रकारे खैराचा उपयोग करावयाचा असतो. गलत्‌कुष्ठारी व नागेश्वररस हीही औषधे देवदारू, दारूहळद किंवा बावची यांच्याबरोबर घ्यावी. प्रथम कडू औषधांनी तयार केलेले पंचतिक्तघृत, महाखदिरघृत, महातिक्तघृत यांपैकी योग्य ते घृत ४ ते ८ तोळे पातळ करून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावयास द्यावे. पहिल्या दिवशी दिलेले तूप पूर्ण पचले म्हणजे दुपारी तूप भात किंवा पेज, तूप आणि सैंधव घालून द्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी शौचाला साफ झाले, मलनिस्सरणाचा कुठलाही त्रास गुदमार्गाला न होणे, शरीर हलके होणे ही लक्षणे झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या दिवशी क्रमशः २-२ तोळे तुपाचे प्रमाण वाढवावे. याने सहाव्या किंवा सातव्या दिवशी जिभेला मळमळ सुटणे, डोळे जड होणे, सर्व शरीर जड होणे इ. लक्षणे झाली म्हणजी स्‍नेहपान योग्य झाले असे समजावे. ओकारीसाठी मोरचूद भस्म हे औषध सकाळी पहाटेस सूर्योदयापूर्वी २ गुंज गरम पाण्याबरोबर गिळावयास द्यावे. याने अर्ध्या तासात दोन किंवा तीन ओकाऱ्या होतील. ओकारीतून बराचसा कफ पडेल व शेवटी कडू किंवा आंबट पित्त पडेल. चांगल्या ढेकरा येतील, चांगली ओकारी होऊन गेली असे समजून गरम पाणी प्यावयास द्यावे. हे दिल्यावर तास दोन तास संपूर्ण विश्रांती द्यावी. त्या दिवशी पेज, कढण असा हलका आहार द्यावा, दुसऱ्या दिवसापासून सामान्य आहार द्यावा ह्यामध्ये अभिष्यंदी पदार्थ वर्ज्य करावेत.

वमन दिल्यानंतर प्रकृतिमानाप्रमाणे सात ते चौदा दिवस जाऊ द्यावे व त्या कालामध्ये पथ्याचा आहार (म्हणजे तेल, मीठ, तिखट वर्ज्य केलेला) द्यावा. विरेचनासाठी जलपालयुक्त नाराचा रस ४ ते ६ गुंजा प्रकृतिमानाप्रमाणे सकाळी गरम पाण्याबरोबर द्यावा. तुपातून अगर मधातून बारीक करून एकदम गिळून टाकावा. याने तीन-चार जुलाब झाल्यावर दुपारी मऊ भात तूप जास्त घालून द्यावा. तो सर्व दिवस संपूर्ण विश्रांती द्यावी. याप्रमाणे रोगाच्या तीव्रतेप्रमाणे दर पंधरा दिवसांनी किंवा सात दिवसांनी हा विरेचन कल्प द्यावा. याच वेळी जर कुष्ठ झालेल्या स्थानी किंवा सर्वांगाला ठणका व सूज असेल, तर महायोगराज गुग्गुळ ४-४ गुंजा दिवसातून तीन वेळा तुपातून द्यावा. या कुष्ठविकारात वमन, विरेचन बस्ती, रक्तस्युती व नस्य देऊन शरीर शुद्ध करून घ्यावे व नुसत्या दुधावर राहून दररोज १-२ गुंजा हरताळ भस्म तुपाबरोबर घ्यावे किंवा सर्वांगसुंदर वटी २-२ गुंजा दिवसातून दोन वेळा एक वर्षपर्यंत घ्यावी. याप्रमाणे कुष्ठरोगावर उपयोगी पडणारी सिद्धौषधे आहेत. त्याप्रमाणेच वर लावण्यासाठी महाखदिरघृत, महातिक्तघृत ही तयार औषधे आहेत.

कुष्ठविकारामध्ये खरूज, गजकर्ण, इसब, शिबेनायटे, खवडे हे विकार बऱ्याच वेळा सर्वत्र आढळतात. त्यांवर वर सांगितल्याप्रमाणे शरीर शुद्ध करून गंधक-रसायन दररोज ४-४ गुंजा प्रत्येक वेळी खडीसारखरेबरोबर घ्यावे. महामंजिष्ठादी काढा किंवा खदिरादिष्ट किंवा सारिवासव हे प्रत्येक वेळी २-२ तोळे समभाग पाण्याबरोबर दोन वेळा जेवणानंतर द्यावे. गंधक-रसायन ज्यांना मानवणार नाही, ज्यामुळे ओकाऱ्या, मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे इ. होतील त्या त्या औषधीऐवजी आरोग्यवर्धिनी गंधक-रसायनाप्रमाणे द्यावी.   

                                               

जोशी, वेणीमाधवशास्री

संदर्भ : Cochrane, R. G., Ed. Leprosy in Theory and Practice, Baltimore, 1964.

            2. Yawalkar, S. J. Leprosy for Practitioners, Bombay, 1967.

क्षुद्रकुष्ठ व उजव्या आनन तंत्रिकेचा अंगघात

चेहन्यावरील चट्टे आणि मानेतील डाव्या कर्ण तंत्रिकेची सूज

हाडे झिजून बसके झालेले नाक

महारुण कुष्ठ झिजलेला आंगठा व वाकलेली बोटे क्षुद्रकुष्ठ