व्यालमूर्ती : भारतीय वास्तुशिल्पात सुशोभनाप्रीत्यर्थ वापरलेले एक प्रतिमान वा ज्ञापक (मोटिफ). अर्धमानव-अर्धप्राणी किंवा सिंहाचे शरीर आणि हत्तीचे शीर असे त्याचे काल्पनिक रूप असते. यालाच कलासमीक्षक भारतीय कलेतील ‘विचित्र कल्पनाविलास’ म्हणतात. या प्रतिमानाच्या मूलस्रोताविषयी तसेच प्राचीनत्वाबद्दल तज्ज्ञांत एकमत नाही तथापि ही परकीय संकल्पना असून ती सिथियन वा ऍकिमेनिडियन (इराणी) असावी, असा तज्ज्ञांचा कयास आहे. गांधारमार्गे ती मौर्यकालात (इ. स. पू. ३२१ – १८५) केव्हातरी भारतीय वास्तुशिल्पात प्रविष्ट झाली असावी. मत्स्य, वायु, लिंग, ब्रह्म, वामन आदी पुराणांत व्याल या शब्दास गण, प्रमथ, भूत, यक्ष, राक्षस असे समानार्थी शब्द आढळतात. या सर्वांचे रुद्रसृष्टी असे वर्णन केलेले आहे. या संकल्पनेनुसार गणपती, हयग्रीव, हनुमान, नृसिंह, नृवराह इत्यादी विशिष्ट देवतारूपे उत्क्रांत झालेली आहेत. हीच पशु-मानव आकृति-संकल्पना मूर्तिकारांनी सुशोभनासाठी वास्तुशिल्पांतून अधिक विकसित केली.

शार्दूल : नर-सिंह रूपातील, व्यालमूर्ती, हंपी.वास्तुशिल्पशास्त्रावरील ग्रंथांतून व्यालाचा उल्लेख वरालक, वराल, विराल, विरालिका, व्रलिका, वरालिका इ. नावांनीही करतात. दक्षिण भारतात त्याला ‘याली’ म्हणतात, तर ओरिसात ‘बिडाल’ म्हणतात. पण सामान्यतः व्याल हा शब्द रूढ असून समरांगण-सूत्रधार व अपराजितपृच्छा या अकराव्या-बाराव्या शतकांतील दोन प्रमुख ग्रंथांनी तो सातत्याने वापरला आहे. इसवी सनाच्या सुरुवातीस काही व्यालमूर्तींना पंख दर्शविले आहेत उदा. सांची स्तुपावरील आणि जुनागढ वस्तुसंग्रहालयातील व्यालमूर्ती. अमरावती व नागार्जुनकोंडा येथील स्तुपांत खोदलेल्या व्यालमूर्तींत विविधता आहे, पण पंख नाहीत. नंतरच्या व्यालमूर्ती मंदिरांच्या वास्तूंत प्रदेशपरत्वे विभिन्न ठिकाणी सुशोभनाकरिता योजिलेल्या असून त्यांचे आकार भव्य, सुबक आणि अलंकृत केलेले आहेत. त्यांच्या सन्निध कधी व्यालावर आरूढ झालेली सुरसुंदरी तर कधी व्यालमुखाखाली प्रतीक्षा करीत असलेला यक्ष दिसतो. कर्नाटकातील होयसळ शैलीच्या मंदिरांच्या पिठांच्या थरांत सिंहथर असून, चोल शैलीतील मंदिरांच्या अधिष्ठानात व्यालमूर्ती खोदल्या आहेत. दक्षिण भारतातील उंडवल्ली आणि मोगलराजपुरम् येथील शैलगृहांत स्तंभपादात व्यालमूर्तींचा चपखल उपयोग केला असून, पुढे पल्लव कलाकारांनी हेच प्रतिमान सातव्या शतकानंतर कांची (कांजीवरम्) व महाबलीपुरम् येथील मंदिरांत वापरले. अशी रचना ब्रह्मपुरीश्वर (पुल्लमंगई) मंदिराच्या भित्तिस्तंभांतूनही आढळते. या प्रतिमानाचा सर्वांत अधिक उपयोग विजयानगर राजांच्या (१४–१६ वे शतक) कारकिर्दीतील मंदिरांतून दिसतो. विजयानगर (हंपी), वेल्लोर आणि विरंचिपुरम् येथील मंदिरांच्या कल्याणमंडपातील स्तंभांतून आणि गोपुरांतून त्याचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. कर्नाटक-आंध्र सीमाप्रदेशातील अलमपूर येथील विश्वब्रह्मा आणि स्वर्गब्रह्मा मंदिरांच्या भिंतींवर (कटी) व्याल आढळतात.

उत्तर भारतातील मंदिरांत व्यालमूर्ती स्तंभांऐवजी द्वारशाखेत प्रविष्ट झाल्या. याची उदाहरणे गुजरातमधील रोड आणि शामलजी येथील सुरुवातीच्या मंदिरांतून आढळतात. बाराव्या शतकापर्यंतच्या गुजरातमधील मंदिरांत व्यालप्रतिमा अस्तित्वात होती. त्यानंतर व्यालांची जागा संन्यासी-तपस्वींच्या मूर्तींनी घेतली. तीच स्थिती भुवनेश्वर (ओरिसा) येथील वैताल देऊळ आणि मुक्तेश्वर मंदिरांत आढळते. सामान्यत: उत्तर भारतात दहाव्या शतकानंतर गर्भगृहाच्या आणि मंडपांच्या भिंतींवर सलिलांतरात (मधल्या रिकाम्या जागेत) व्यालांची रचना केलेली आहे.

खजुराहो येथील मंदिरांत वरच्या भागातून, मधल्या रिकाम्या जागांतून तसेच पिठांवरून व्यालमूर्ती खोदलेल्या दिसतात. काही ठिकाणी त्यांच्या शेजारी शालभंजिका उभ्या असलेल्या दाखविल्या आहेत. उत्तर भारतात आणि प्रामुख्याने खजुराहो येथील मूर्ती आकाराने उभट आहेत. त्यांस पोषक अशाच रीतीने व्यालमूर्तींची मांडणी केली आहे. येथील व्याल मागच्या दोन पायांवर उभे असलेले दिसतात अगदी क्वचितच हा प्राणी चार पायांवर उभा दिसतो. ओरिसामधील ब्रह्मेश्वर, केदारेश्वर, लिंगराज, राजाराणी (भुवनेश्वर) आणि सूर्यमंदिर (कोनारक) यांतून बाहेरच्या भिंतीवर खालच्या बाजूस (तलजंघा) व्यालमूर्ती खोदलेल्या आहेत. सोहागपूर येथील विराटेश्वर मंदिरात, मंडपाच्या वेदिकांवर व्यालमूर्ती आढळतात. व्यालांच्या सान्निध्यात कधी व्यालावर आरूढ झालेल्या, तर कधी त्यांच्या दोन्ही पायांत किंवा उंचावलेल्या एका पायाखाली स्त्री-प्रतिमा आढळतात. व्यालांबरोबर दोन हात करण्यासाठी गुडघ्यावर बसलेला शस्त्रधारी योद्धाही पश्चिम भारतात दाखविलेला दिसतो. ओरिसात व्याल सामान्यत: हत्तीवर बसलेला, तर कधी तो हत्तीच्या पायाखाली चिरडला जाताना (गजक्रांत) दाखविला आहे. व्याल एखाद्या लक्ष्यावर झेप घेताना, उडी मारताना, चौखूर धावताना व फिरकी घेताना अशा भिन्नभिन्न अवस्थांत दिसतो. सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, कावेबाज वा बटबटीत डोळे आणि उग्र आविर्भाव यांमुळे त्याची गणना विचक्षण मूर्तिशिल्पात केली जाते. कलात्मक दृष्ट्या खजुराहो व कोनारक येथील व्यालमूर्ती अधिक सुबक, डौलदार असून त्यांच्या शरीराची बाह्यरेषा अत्यंत ओघवती ठेवण्यात आलेली आहे. होयसळ शैलीतील व्याल बुटके, अलंकृत व सौम्य चेहरेपट्टीचे तर विजयानगर शैलीतील व्याल ओबडधोबड आणि अक्राळविक्राळ वाटतात. भारतीय कलाकारांनी व्यालाची परकीय संकल्पना आत्मसात केली आणि तिची अंगभूत वैशिष्ट्ये विविध प्रकारांतून विकसित केली.

संदर्भ : 1. Dhaky, M. A. The Vyala Figures, Varanasi, 1965.

            2. Kramrisch, Stella, The Hindu Temple, 2 Vols, Calcutta, 1976.

देशपांडे, सु. र.