चतर्जी, बंकिमचंद्र : (२६ जून १८३८—८ एप्रिल १८९४). आद्य बंगाली कादंबरीकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील नैहाटीजवळच्या कांठालपाडा गावी जन्म. पिता यादवचंद्र. शालेय शिक्षण संपल्यावर हुगळी येथील महासिन कॉलेजमध्ये प्रवेश. नंतर कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात शिक्षण. ते एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले, त्यांत बंकिमचंद्र होते. यानंतर त्यांनी डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी स्वीकारली (१८५८) व १८९१ मध्ये सेवानिवृत्त होईतो ते विविध हुद्यांवर सरकारी नोकरीतच होते.

बंकीमचंद्र आधुनिक बंगाली साहित्याचे एक प्रवर्तक होते. आधुनिक कादंबरीचे जनक व असाधारण लेखनसामर्थ्याचे विचारवंत म्हणून ते श्रेष्ठ ठरले. त्यांचे साहित्यिक जीवन विद्यार्थीदशेतच सुरू झाले व जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. मुख्यत्वेकरून बंकिमचंद्र गद्य लेखक असले, तरी सुरुवातीस ते कविताही लिहीत असत. काव्यनिर्मितीच्या बाबतीत त्यांच्यावर ईश्वरचंद्र गुप्तांचा प्रभाव होता. त्यांच्या कविता तसेच काही गद्यलेखनही ईश्वरचंद्र गुप्तांच्या संवाद प्रभाकर (१८३१) या नियतकालिकात प्रसिद्ध होत असे.

बंकीमचंद्रांनी आपली पहिली कादंबरी रॉयमोहन्स वाइफ (१८६४) इंग्रजीत लिहिली होती. त्यांची पहिली बंगाली कादंबरी दुर्गेश नंदिनी (१८६५) ही असून त्यानंतर त्यांनी एकामागून एक कपालकुंडला (१८६६), मृणालिनी (१८६९), विषवृक्ष (१८७३), चंद्रशेखर (१८७७), कृष्णकांतेर विल (१८७८), आनंदमठ (१८८२), देवी चौधुराणी (१८८४), सीताराम (१८८६) इ. कादंबऱ्या व कमलाकांतेर दप्तर (१८७५), विज्ञानरहस्य, लोकरहस्य, साम्य, विविध प्रबंध, कृष्णचरित्र (१८८२), धर्मतत्त्व (१८८८) इ. प्रबंधग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. आनंदमठ  या त्यांच्या कादंबरीतील ‘वंदेमातरम्‌’ हे गीत भारताचा मानबिंदू ठरले.

बंकिमचंद्रांनी १८७२ साली सुरू केलेले वंगदर्शन  हे नियतकालिक बंगाली साहित्यात युगप्रवर्तक ठरले. सुशिक्षितांत स्वातंत्र्यप्रेम आणि राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूनेच बंकिमचंद्रांनी वंगदर्शन  सुरू केले होते. त्यांच्या संपादनाखाली वंगदर्शनने बंगाली नियतकालिकांचे प्रभावी पर्व सुरू केले. वंगदर्शनमध्ये त्याकाळातील प्रतिष्ठित आणि प्रख्यात साहित्यिक लिहीत तसेच वंगदर्शनने अनेक नवे लेखकही तयार केले. बंकिमचंद्रांनी रवींद्रनाथांना साहित्यसाधनेत प्रोत्साहन दिले होते. त्यांच्याच प्रोत्साहनाने रमेशचंद्रांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या.

बंकिमचंद्रांच्या बहुतेक कादंबऱ्या अद्‌भुतरम्य वा स्वच्छंदतावादी परंपरेतील आहेत. कथा वस्तू मुख्यत्वेकरून बंगालच्या प्रदेशातील, काल्पनिक आणि प्रेमसमस्यांवर अधिष्ठित आहेत. त्यांच्या लेखनशैलीत

बंकिमचंद्र चतर्जी

कथा व कलात्मकता यांचा अपूर्व संयोग आढळतो. बंगालीत जिला ‘साधु’ भाषा म्हणतात, ती शुद्ध, प्रबुद्ध भाषा आणि बोलीभाषा यांचा समन्वय साधून बंकिमचंद्रांनी बंगाली गद्याला नवे वळण तर लावलेच, पण त्याला मोठे सामर्थ्यही प्राप्त करून दिले. बंगाली साहित्यात विनोदही प्रथम बंकिमचंद्रांनी आणला. कमलाकांतेर दप्तरमधील त्यांचे विनोदगर्भ वैचारिक लेख उल्लेखनीय आहेत.

बंकिमचंद्र यांच्या बहुतेक कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. वा. गो. आपटे यांनी त्यांच्या सर्व कादंबऱ्या संपूर्ण बंकिमचंद्र (तीन भाग) नावाने मराठीत अनुवादित केल्या. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)