स्वर्णकुमारी देवीस्वर्णकुमारी देवी : (२८ ऑगस्ट १८५५—३ जुलै १९३२). प्रख्यात  बंगाली  विदुषी, लेखिका  व  समाजसेविका.  कलकत्ता ( कोलकाता ) येथे प्रख्यात टागोर ( ठाकूर ) घराण्यात जन्म. महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांच्या कन्या, रवींद्रनाथ टागोर यांच्या ज्येष्ठ भगिनी व नादिया जिल्ह्यातील इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे नेते जानकीनाथ घोषाल यांच्या पत्नी. १८६८ मध्ये त्यांचा विवाह झाला. बंगाली कवयित्री सरला देवी, चौधुराणी, हिरण्मयी देवी, ज्योत्स्नानाथ घोषाल ही त्यांची  मुले.स्वर्णकुमारी यांचे सुरुवातीचे शिक्षण मुख्यतः घरीच झाले. साहित्य व संगीत या दोन्हींविषयी स्वर्णकुमारी यांना विलक्षण प्रेम होते. बंगाली साहित्यिक व इतिहासकार रमेशचंद्र दत्त यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. बंगाली साहित्यक्षेत्रातील पहिल्या दर्जेदार लेखिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. टागोर परि-वारातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या भारती या मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी दीर्घकाळ सांभाळली (१८८४ —९५ १९०८ —१५). १८९० मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास स्त्री-प्रतिनिधी म्हणून त्या उपस्थित होत्या. अनाथ मुले, असाहाय्य विधवा स्त्रिया यांच्या कल्याणार्थ टागोर परिवारातील सदस्यांच्या साहाय्याने त्यांनी ‘ सखी समिती ’ची ( सोसायटी ऑफ फ्रेंड्स ) स्थापना केली (१८९६).

कादंबऱ्या, कथा, नाटके, कविता अशा विविध साहित्यप्रकारांत स्वर्णकुमारी यांनी विपुल लेखन केले तथापि त्यांची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांच्या कादंबरीलेखनावर. बंगाली स्त्रीकादंबरीकारांत त्या आद्य व महत्त्वाच्या कादंबरीकार मानल्या जातात. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अधिष्ठित दीपनिर्वाण (१८७६) ही त्यांची पहिली कादंबरी. मिबार राज (१८७७), छिन्नमुकुल (१८७९), मालती (१८७९), विद्रोह (१८९०), स्नेहलता (१८९२), कहाके (१८९८), विचित्रा (१९२०), स्वप्नबनी (१९२१), मिलनरात्री (१९२५) या त्यांच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या. त्यांनी मुख्यतः ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमीवर कादंबरी-लेखन केले. बंगाली समाजातील तत्कालीन आधुनिकतेवर लिहिलेली स्नेहलता ही त्यांची सामाजिक कादंबरी. त्यात कलकत्त्यातील सुधारक मध्यमवर्गीय समाजाचे प्रश्न पहिल्यांदा हाताळले गेले. उत्कृष्ट स्वभावचित्रण व मनोविश्लेषण ही तिची ठळक वैशिष्ट्ये. प्रथमपुरुषी निवेदनातून स्त्रीजीवनातील संघर्षाचे वास्तव चित्रण करणारी कहाके ही त्यांची कादं-बरीही निर्देशनीय आहे. त्यांच्या अन्य लेखनात ‘ मालती , ‘ भीमसिंह , ‘ कॅनो , ‘ आमार जीवन ‘ लज्जावती ’ ह्या कथा राजकन्या, दिव्यकमल या नाट्यकृती गाथा (१८९०), कविता ओ गान, गीतिगुच्छ, बसंत उत्सव हे काव्यसंग्रह आणि पृथिवी हा विज्ञानग्रंथ यांचा समावेश होतो. त्यांची मालती ही पहिली कथा भारती या मासिकात प्रसिद्ध झाली (१८८०). स्वर्णकुमारी देवी यांच्या कथाही त्यांच्या कादंबऱ्यांप्रमाणेच ऐतिहासिक, सामाजिक पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत. मध्यमवर्गीय बंगाली कौटुंबिक जीवनाचे चित्रण त्यांनी ‘ कॅनो , ‘ आमार जीवन ’ या कथांतून केले आहे. त्यांच्या ‘ लज्जावती ’ या कथेचे नाट्यरूपांतर करण्यात आले. १८७९ मध्ये बंगाली आद्य संगीतिका बसंत उत्सवची संगीतरचना त्यांनी केली. विज्ञानविषयक लेखन करीत असता परिभाषेची कमतरता त्यांना जाणवली. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी प्रचलित शब्दांच्या आधारे प्रतिशब्द योजून नवी परिभाषा तयार केली. विज्ञानातील अनुमानात्मक ( इंडटिव्ह ) व निगमनात्मक ( डिडटिव्ह ) विचारपद्धतींमधील फरक ‘ विज्ञानशिक्षा ’ या निबंधात त्यांनी विशद केला आहे. ज्या काळात विज्ञानक्षेत्रात फक्त पुरुषांचाच प्रभाव होता, त्या काळात या विषयावर त्या लिहीत होत्या. ‘ आमादेर कर्तव्य ’ (१९०८) या निबंधात तत्कालीन भारतीय राजकारणाचा विचार त्यांनी समतोलपणे मांडला आहे. 

बापू नरसिंह भावे यांनी स्वर्णकुमारी यांच्या दीपनिर्वाण या कादंबरीचा व शांताराम रघुनाथ नाईक यांनी बकुळमाला या शीर्षकाने त्यांच्या फुलेरमाला या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे.

स्वर्णकुमारी यांना कलकत्ता विद्यापीठाने जगत्तारिणी सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला (१९२७). हे सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या बंगाली महिला होत. याशिवाय त्यांनी बंगीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले (१९२९).

कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.  

पोळ, मनीषा