नाय्‌पॉल, विद्याधर सूरजप्रसाद : (१७ ऑगस्ट १९३२ – ). वेस्ट इंडियन कादंबरीकार आणि कथाकार. इंग्रजीतून लेखन. त्यांचा जन्म त्रिनिदाद येथील एका हिंदू कुटुंबात झाला असला, तरी रक्ताने ते उत्तर भारतीय आहेत. त्यांचे शिक्षण त्रिनिदाद व ऑक्सफर्ड येथे झाले. १९५५ मध्ये पॅट्रिशिया ॲन हेल नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झाला.

त्रिनिदाद येथील मुख्यतः खालच्या वर्गातील निग्रो आणि पिढ्यानपिढ्यांचे रहिवासी हिंदी लोक ह्यांच्या आयुष्यातील कडूगोड अनुभवांचे रोचक चित्रण नाय्‌पॉल ह्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून आढळते. द मिस्टिक मॅसर ही त्यांची पहिली कादंबरी १९५७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर द सफ्रेज ऑफ एलव्हाय्‌रा (१९५८), अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास (१९६१), मिस्टर स्टोन अँड द नाइट्स कंपॅनिअन (१९६३), द मिमिक मेन (१९६७), गरिलाज (१९७५) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. मोहन बिस्वास ह्या एका हिंदी मजूरपुत्राचा जीवनपट ह्या कादंबरीत नाय्‌पॉल ह्यांनी रंगविलेला आहे. आपले स्वत्व शोधण्याची आणि जगाला दाखविण्याची त्याची धडपड आहे. स्वतःचे घर बांधण्याचा त्याचा हव्यास हे त्याच धडपडीचे प्रतीक. वेस्ट इंडीजमधील एका पारंपरिक हिंदी कुटुंबाचे वास्तववादी चित्रण त्यांनी ह्या कादंबरीत केलेले आहे. चरित्रनायकाचे भावविवश न होता घडविलेले मार्मिक चित्रण हे ह्या कादंबरीचे एक ठळक वैशिष्ट्य होय. हास्य आणि कारुण्य ह्यांचे परिणामकारक मिश्रण ह्या कादंबरीत झालेले आहे. मिस्टर स्टोन ….ही त्यांची कादंबरी इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर आहे. मिग्वेल स्ट्रीट (१९५९) आणि अ फ्लॅग ऑन द आयलंड (१९६७) हे त्यांचे कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. निग्रो व हिंदी माणसांचे काही इरसाल नमुने ह्या कथांतून त्यांनी दाखविले आहेत.

कथा-कादंबऱ्यांखेरीज द लॉस ऑफ एल् डॉराडो (१९६९) हा त्रिनिदादचा इतिहास, द मिड्ल पॅसेज (१९६२) हे प्रवासवर्णन, भारताचे बरेचसे एकांगी आणि औपरोधिक वर्णन करणारे न एरिआ ऑफ डार्कनेस (१९६४) आणि इंडियाअ वुंडेड सिव्हिलिझेशन (१९७७) असे ग्रंथही त्यांनी लिहिले. उघड्या डोळ्यांनी समाजाकडे पाहणारा कठोर वास्तववाद, अविस्मरणीय पात्रे निर्माण करण्याची क्षमता, सूक्ष्म मनोवैज्ञानिक दृष्टी, जीवनातील उपरोध व कारुण्य टिपून घेऊन सारख्याच अलिप्ततेने ही दोन्ही वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कसब, सोपी पण आशयघन शैली ह्या गुणांनी नाय्‌पॉल उठून दिसतात.

नाईक, म. कृ.