फुप्फुस : श्वसनक्रियेत हवेचा उपयोग करणाऱ्या व तीमध्ये महत्त्वाचा भाग घेणाऱ्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांतील अंतस्त्याला (शरीरांतर्गत पोकळीतील इंद्रियाला) फुप्फुस म्हणतात. मानवात वक्षीय पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक अशी दोन फुप्फुसे असतात. दोहींच्या मध्ये हृदयाशिवाय मध्यावकाशातील इतर शरीरभाग असतात. प्रत्येक फुप्फुसाच्या हृदयाकडील बाजूवर श्वासनालाची (कंठापासून फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या कूर्चामय व पटलमय नळीची) मोठी शाखा, रक्तवाहिन्या, लसीकावाहिन्या [→ लसीका तंत्र], तंत्रिका (मज्जा) हे अवयव  फुप्फुसात शिरण्याकरिता किंवा आतून बाहेर येण्याकरिता जी जागा असते तिला ‘फुप्फुस-मूळ’ म्हणतात. या ठिकाणी प्रत्येक फुप्फुस श्वासनाल आणि हृदय यांना जखडलेले असते. मुळाखालील परिफुप्फुसाच्या (फुप्फुसावरील स्रावोत्पादक पातळ पटलमय आवरणाच्या) दुपदरी थरापासून बनलेला फुप्फुस-बंधही फुप्फुसास थोडा फार जखडतो. या दोन्ही गोष्टी वगळता प्रत्येक फुप्फुस स्वतंत्र परिफुप्फुस पोकळीत पूर्णतः मोकळे व लोंबकळते असते.

रचना :  फुप्फुस हलक्या, सच्छिद्र व स्पंजासारख्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या–पेशींच्या–समूहाचे) बनलेले असते. श्वसनक्रिया प्रस्थापित झाल्यानंतर ते फुप्फुस पाण्यात टाकले असता तरंगते, तर श्वसनक्रिया प्रस्थापित न झालेले फुप्फुस पाण्यात बुडते. कारण पहिल्याचे वि.गु. ०·९५० (पाण्यापेक्षा हलके), तर दुसऱ्याचे १·०५० (पाण्यापेक्षा जड) असते. अर्भक जन्मतः जिवंत होते वा मृतजात होते, हे ओळखण्याकरिता ही फुप्फुस परीक्षा फार उपयुक्त असते, तिला ‘जलस्थितिक परीक्षा’ म्हणतात. वायुकोशातील (फुप्फुसाच्या हवेने भरलेल्या सर्वांत लहान पिशवीसारख्या भागातील) हवेच्या अस्तित्वामुळे फुप्फुस दाबले असता किंवा चुरगळताना विशिष्ट करकर जाणवते. हवा न शिरलेले फुप्फुस यकृतासारखे घट्ट असते. फुप्फुस अतिलवचिक असते व म्हणून वक्षीय पोकळीतून बाहेर काढताच प्रत्याकर्षित स्थितीत राहते. त्याचा पृष्ठभाग मऊ व चमकदार असून, त्यावर एकमेकींना छेदणाऱ्या सूक्ष्म व गडद रेषा असतात. या रेषांमुळे पृष्ठभाग बहुतल क्षेत्रांत विभागलेला असतो आणि क्षेत्रे फुप्फुस खंडिका दर्शवितात.  

जन्मतः फुप्फुस गुलाबी रंगाचे असते, कारण त्यात पुष्कळ रक्तवाहिन्या विखुरलेल्या असतात. प्रौढावस्थेत हा रंग स्लेटच्या पाटीप्रमाणे गडद काळपट बनतो. वाढत्या वयाबरोबर तो अधिक गडद होत जातो. हा रंग श्वसनावाटे हवेतील कार्बनाचे कण पृष्ठभागाजवळील अवकाशी ऊतकात (ज्यातील घटक एकमेकांपासून दूरदूर असल्यामुळे पोकळसर असल्यासारख्या वाटणाऱ्या ऊतकात) साठल्यामुळे येतो. वाढत्या वयाबरोबर कार्बन-संचय वाढून रंगही गडद होतो. खेड्यातील मोकळ्या हवेत राहणाऱ्यांपेक्षा शहरवासियांच्या फुप्फुसात, तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या फुप्फुसात कण-संचय अधिक होतो. फुप्फुसाची पश्चकडा अग्रकडेपेक्षा नेहमी अधिक काळपट असते. वरच्या कमी चलनक्षम भागात पृष्ठभागाचे रंजन दोन बरगड्यांच्या दरम्यानच्या भागावर अधिक स्पष्ट दिसते.

उजव्या फुप्फुसाचे वजन सु. ६२५ ग्रॅ. व डाव्याचे ५६५ ग्रॅ. असते. यांत व्यक्तिपरत्वे किंवा एकूण रक्ताचे प्रमाण किंवा लसीकाद्रव्याचे प्रमाण यामुळे फेरफार असू शकतात. वक्षीय पोकळीच्या डाव्या भागाकडे हृदयाचा अधिक भाग असल्यामुळे डावे फुप्फुस वजनाने कमी भरते. पुरुषाची फुप्फुसे स्त्रीच्या फुप्फुसांपेक्षा अधिक जड असतात. प्रौढावस्थेत फुप्फुसाची सर्वसाधारण उंची २५ ते २७ सेंमी. असते. उजव्या बाजूस मध्यपटल (वक्षीय पोकळी व उदर पोकळी यांना अलग करणारे स्नायुमय पटल) त्याखालील यकृतामुळे अधिक उंचीवर असते व म्हणून उजव्या फुप्फुसाची उंची डाव्यापेक्षा २·५ सेंमी. कमी असते परंतु हृदय डावीकडे असल्यामुळे उजव्याची रुंदी डाव्यापेक्षा अधिक असते व त्याची धारणक्षमताही (घनफळही) अधिक असते.

फुप्फुसाचा आकार शंकूसारखा असून त्याला अग्र किंवा वरचे टोक (शिखर), बूड अथवा तळभाग, अग्र, पश्च आणि अधःस्थ अशा तीन कडा आणि पर्शुकीय (बरगड्यांशी संलग्न असणारा) पृष्ठभाग व अभिमध्य पृष्ठभाग असे दोन पृष्ठभाग असतात. या भागांचे वर्णन प्रस्तुत नोंदीतच पुढे दिले आहे.

प्रत्येक फुप्फुसावर पातळ लसी-कलेचे (स्रावोत्पादक पातळ पटलाचे) आच्छादन असते व त्याला परिफुप्फुस म्हणतात. हे आच्छादन दुपदरी पिशवीसारखे असून त्याचा  जो भाग फुप्फुसाच्या पृष्ठभागाशी संलग्न असतो त्याला ‘अंतस्त्य- परिफुप्फुस’ म्हणतात व जो भाग बरगड्या, त्यांमधील स्नायू, मध्यपटल आणि हृदय व मध्यावकाशातील इतर अवयवांशी संलग्न असतो त्याला ‘भित्तीय परिफुप्फुस’ म्हणतात. या दोन्हींमधील अव्यक्त पोकळीला ‘परिफुप्फुस गुहा’ म्हणतात. प्राकृतिक (सर्वसाधारण) अवस्थेत दोन्ही भाग एकमेकांच्या नेहमी सान्निध्यात असतात. फक्त रोगजन्य परिस्थितीतच ते एकमेकांपासून अलग होऊन पोकळीत द्रव, रक्त किंवा हवा साचू शकते [→ परिफुप्फुसशोथ]. श्वसनक्रियेच्या वेळी फुप्फुसाच्या हालचालीबरोबर ते एकमेकांवर घासले जातात व हे घर्षण सुरळीत होण्यासाठी पोकळीमध्ये अल्पसे लसीकाद्रव्य पसरलेले असते.

दोन्ही फुप्फुसांचे विशिष्ट भेगांनी छोट्या भागांत विभाजन झालेले असते व या छोट्या  भागाला ‘खंड’ म्हणतात. डाव्या फुप्फुसातील ही भेग तिरपी असून तीमुळे त्याचे ऊर्ध्वस्थ व अधःस्थ असे दोन खंड पडतात. उजव्या फुप्फुसात दोन भेगा असून त्यांमुळे त्याचे ऊर्ध्वस्थ, मध्य आणि  अधःस्थ असे तीन खंड पडतात. प्रत्येक खंड आणखी लहान लहान भागांत विभागलेला असतो व त्यांना ‘श्वसनी-फुप्फुस खंडांश’ म्हणतात. फुप्फुसांचे हे विभाजन १९३२ नंतर स्पष्ट समजल्यावर खंडोच्छेदन शस्त्रक्रिया (फुप्फुसाचा रोगट भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) अधिक बिनचूक करणे शक्य झाले आहे. प्रत्येक फुप्फुसात असे नऊ खंडांश असतात.  


फुप्फुसाचे मूळ त्याच्या मध्यावकाशाकडे असलेल्या (अभिमध्य) पृष्ठभागावर असणाऱ्या नाभिकेतून (खळग्यातून) आत शिरणाऱ्या व बाहेर येणाऱ्या काही अवयवांचे बनलेले असते. त्यांमध्ये मुख्य श्वासनलिका, श्वासनलिका रोहिणी व नीला, दोन फुप्फुसनीला, श्वसन तंत्रिका जाल-लसीकावाहिन्या व संबंधित लसीका ग्रंथी यांचा समावेश असतो. फुप्फुस-मुळावर सर्व बाजूंनी परिफुप्फुसांचे वेष्टन असते. दोन्ही फुप्फुस-मुळांतील घटकांची रचना पुढून मागे बघितल्यास सारखीच असते त्यात फुप्फुस-नीला पुढे, रोहिणी मधे व श्वासनलिका मागे असते. वरून खाली बघितल्यास या रचनेत दोन्ही बाजूंमध्ये फरक दिसतो. 

आ. १. फुप्फुस-एकक : (१) अंतिम श्वासनलिका, (२) श्वसन श्वासनलिका, (३) वायुकोश नलिका, (४) वायुकोश.श्वसनाच्या वेळी फुप्फुसाचे सर्व भाग एकसारखे हालत नाहीत. फुप्फुस-मुळाचा भाग जवळजवळ अचलच असतो. संथ श्वसनक्रियेत फुप्फुसाचा अंतर्भाग फारच थोडा हालतो. पृष्ठालगतचा भाग सर्वांत अधिक प्रसरण पावतो. अभिमध्य पृष्ठभाग, पश्चकडा व वरचे टोक कमी प्रमाणात प्रसरण पावतात, कारण त्यांच्या लगत कमी हालणारे अवयव असतात. मध्यपटलाच्या नजीकचा व पर्शुकीय पृष्ठभाग सर्वांत जास्त प्रसरण पावतात.

फुप्फुस-एकक : श्वसनक्रियेच्या वेळी फुप्फुसाच्या आकारमानातील बदल मुख्यत्वे वायुकोशांत घडून येतो. नवजात अर्भकाच्या फुप्फुसात सु. २ कोटी वायुकोश असतात. ही संख्या बाल्यावस्थेत ३० कोटीपर्यंत वाढते. फुप्फुस-ऊतक गुच्छाप्रमाणे रचलेल्या अनेक ‘हवा अवकाशांचे’ मिळून बनलेले असते. प्रत्येक गुच्छाला ‘फुप्फुस-एकक’ म्हणतात. प्रत्येक एककाला हवा आत जाण्याकरिता व बाहेर पडण्याकरिता एकच श्वासनलिका असते व तिला ‘अंतिम श्वासनलिका’ म्हणतात. या श्वासनलिकेच्या आणखी शाखा होतात व त्यांना ‘श्वसन श्वासनलिका’ म्हणतात. श्वसन श्वासनलिकांकडून वायुकोशाकडे जाणाऱ्या अरुंद भागाला ‘वायुकोश नलिका’ म्हणतात.

आ. २. (अ) फुप्फुस-एककाचा रक्तपुरवठा : (१) अंतिम श्वासनलिका, (२) फुप्फुस-रोहिणी, (३) श्वसन श्वासनलिका, (४) वायुकोश नलिका, (५) वायुकोश, (६) फुप्फुस-नीला (बाण रक्तप्रवाहाची दिशा दर्शवितात) (आ) वायुकोशावरील केशवाहिन्यांचे जाळे.वायुकोश : प्रत्येक वायुकोशाचा व्यास सु. २०० – ३०० मिलिमायक्रॉन (१ मिलिमायक्रॉन = १०–९ मी.) असतो व एक वायुकोश पुष्कळ (सु. १,८००) केशवाहिन्यांशी (सूक्ष्म रोहिण्या व सूक्ष्म नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म वाहिन्यांशी) संलग्न असतो. बाल्यावस्थेतही वायु-अधिस्तर-रक्त हा परस्पर संपर्की पृष्ठभाग (एका बाजूस वायुकोशातील हवा, मधे वायुकोशाचा अधिस्तर – एकमेकींना घट्ट चिकटलेल्या कोशिकांनी बनलेले  स्तरयुक्त आच्छादक ऊतक – व दुसऱ्या बाजूस केशवाहिन्यांच्या जालातील रक्त यांनी मिळून बनणारा पृष्ठभाग) प्रचंड असतो आणि तो सु. ७० – १०० चौ. मी. एवढा असतो.

वायुकोश हे पातळ आवरण असलेल्या खोबणी किंवा कोटरिका असून आवरणाच्या एका बाजूला केशवाहिन्यांतील तांबड्या कोशिका व दुसऱ्या बाजूस हवा असते. या दोन्हींमधील वायूंच्या अदलाबदलीस हे आवरण कमीत कमी विरोध करते. वायुकोशांची भित्ती संयोजी (जोडण्याचे कार्य करणाऱ्या) ऊतकाच्या स्तरावर अधिष्ठित अशा पातळ अंतःस्तराची बनलेली असते. जवळजवळ असणाऱ्या वायुकोशांच्या भित्ती एकमेकींस लागून असतात व त्यांमध्ये संयोजी ऊतक व केशवाहिन्यांचा थर असतो. तिन्ही मिळून ‘आंतरवायुकोश पटल’ बनते. या पटलाला अतिसूक्ष्म छिद्रे असल्याचे आढळून आले आहे. या छिद्रांतून हवा शेजारच्या वायुकोशात आणि लगतच्या श्वसन श्वासनलिकेत जाऊ शकते. वायुकोशातील काही कोशिका कोशिकांच्या पृष्ठभागावर परिणाम करणारे स्राव स्रवतात. या स्रावांमुळे पृष्ठभागाचा ताण कमी होतो व त्यामुळे उच्छ्‌वासाच्या वेळी वायुकोश पूर्णपणे मिटण्याचे टळते. वायुकोश पोकळीत काही महाभक्षी कोशिकाही असतात व त्या अंतःश्वसनाद्वारे वायुकोशापर्यंत आलेल्या बाह्य सूक्ष्मकणांचे भक्षण करतात. काही तांबड्या कोशिका वायुकोशात आल्यास त्यांचेही भक्षण या कोशिका करतात. असे नको असलेल्या पदार्थाचे सूक्ष्मकण या कोशिकांद्वारे लसीकावाहिन्यांत नेले जातात. काही महाभक्षी कोशिका त्यजन प्रवाहाद्वारे थुंकीतून बाहेर टाकल्या जातात (श्वासनलिकांच्या आतील भित्तीवर पृष्ठभागी सकेशल कोशिकांचा थर असतो व प्रत्येक कोशिकेवर जवळजवळ २७० केसासारखे प्रवर्ध – वाढी – असतात. या केसांच्या हालचालीमुळे एकाच दिशेने म्हणजे श्वासनाल व घशाकडे बाह्यकण, सूक्ष्मजंतू व मृत कोशिका यांसारखे त्याज्य पदार्थ वाहून नेणारा प्रवाह उत्पन्न होतो आणि त्याला त्यजन प्रवाह म्हणतात). आजारपरत्वे बहुरूपकेंद्रकी (ज्यांच्या केंद्रकाचे – कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल पुंजाचे – अनेक केंद्रके असल्यासारखे खंड पडलेले आहेत अशा प्रकारच्या) पांढऱ्या कोशिका, लसीका कोशिका याही वायुकोशात व नंतर थुंकीतून बाहेर येतात. यामुळे रोगनिदानास थुंकी सूक्ष्मदर्शकाखाली तपासणे उपयुक्त असते.

फुप्फुसाचे भाग : फुप्फुसाच्या भागांचे थोडक्यात वर्णन खाली दिले आहे. फुप्फुसाचे अग्र अथवा वरचे टोक गोलाकार असून मानेच्या खालच्या भागात शिरलेले असते. त्याचा सर्वोच्च बिंदू जत्रू अस्थीच्या (एका बाजूस उरोस्थीला – छातीच्या मध्यभागी असलेल्या पुढील उभ्या हाडाला – व दुसऱ्या बाजूस स्कंधास्थीला – खांद्याच्या मागील बाजूतील चपट्या, त्रिकोणाकृती हाडाला – जोडलेल्या आडव्या हाडाच्या) मध्य तृतीयांशाच्यावर २·५ सेंमी. अंतरावर असतो. अग्रावर परिफुप्फुस आच्छादन असते व त्याच्याही वर अधिपरिफुप्फुस पटल (ग्रैव प्रावरणीचा म्हणजे मानेतील स्नायू, रक्तवाहिन्या व तंत्रिका यांना परिवेष्टित करणाऱ्या तंतुमय ऊतकपट्ट्याचा भाग) असते. फुप्फुस अग्राच्या आजूबाजूस मानेतील स्नाूयू, रक्तवाहिन्या व तंत्रिका संलग्न असतात. अग्राखालून सु. १·२७ सेंमी. अंतरावरून अधोजत्रू रोहिणी (बाहू व प्रबाहू सहित सर्व भागाला रक्त पुरवठा करणारी प्रमुख रोहिणी) काखेकडे वळते. सर्वोच्च बिंदूच्या खाली तिचे अंकन (खूण) झाल्याची खाच उमटते.

बूड अथवा तळभाग अंतर्गोल असून मध्यपटलाच्या बहिर्वक्र पृष्ठभागावर वक्षीय बाजूकडे टेकलेला असतो. उजव्या फुप्फुसाच्या तळभागाखालील मध्यपटलाखाली यकृताचा उजवा खंड असतो. डाव्या बाजूस मध्यपटलाखाली यकृताचा डावा खंड, जठरबुध्न (जठरागमी द्वारापासून डावीकडे वर असलेला जठराचा घुमटाकार भाग) व प्लीहा (पानथरी) हे अवयव असतात. तळभाग व पर्शुकीय पृष्ठभाग यांच्या दरम्यान असणारी अधःस्थ कडा पातळ व धारदार असते आणि ती बरगड्या व मध्यपटल यांमध्ये असणाऱ्या खाचेत शिरते. या ठिकाणी परिफुप्फुसाची खालची कडा फुप्फुसाच्या अधःस्थ कडेपेक्षा अधिक खोलवर गेलेली असते. म्हणजेच परिफुप्फुसाचा बराचसा भाग या ठिकाणी फुप्फुसविरहित असतो.  


पर्शुकीय पृष्ठभाग बहिर्गोल सफाईदार असून त्याचा आकार वक्षीय पोकळीच्या बाजूशी मिळता जुळता असतो. या भागाचा संपर्क बरगड्यांवर (आतून) असलेल्या परिफुप्फुसाशी असतो. या भागावर काही बरगड्यांचे ठसे उमटलेले दिसतात.

आ. ३. उजव्या फुप्फुसाचा अभिमध्य पृष्ठभाग : (१) अधःस्थ महानीला घळी, (२) फुप्फुस-बंध, (३) उजवी खालची फुप्फुस-नीला, (४) ग्रसिका अंकन, (५) उजवी प्रमुख श्वासनलिका, (६)उजवी फुप्फुस-रोहिणी, (७) तिरपी भेग, (८) अग्र अथवा वरचे टोक, (९) उजव्या अधोजत्रू रोहिणीची घळी, (१०) ऊर्ध्वस्थ महानीला घळी, (११) अग्रकडा, (१२) उजवी वरची फुप्फुस-नीला, (१३) आडवी भेग, (१४) हृद्अंकन (१५) तिरपी भेग, (१६) बूड अथवा तळभाग, (१७) प्राणेशा तंत्रिका, (१८) मध्यपटल तंत्रिका.अभिमध्य पृष्ठभाग मध्यावकाशाकडे असतो आणि त्याचे मागील व पुढील असे दोन भाग असतात. मागचा मेरुदंडाशी (पाठीच्या कण्याशी) संलग्न असतो आणि पुढचा मध्यावकाशाच्या संपर्कात असून त्यात मध्यावकाशातील परिहृद् पिशवी व तीमधील हृदय यांचे त्या त्या बाजूचे काही भाग संपर्कात असतात. म्हणून त्याला ‘हृद्अंकन’ म्हणतात. हृदयाचा अधिक भाग डावीकडे असल्यामुळे डाव्या फुप्फुसावरील हृद्अंकन अधिक खोल व मोठे असते. या अंकनाच्या वर त्रिकोणी दबलेला भाग असून त्यास ‘नाभिका’ म्हणतात. या ठिकाणी फुप्फुस-मुळातील फुप्फुसात शिरणारे व आतून बाहेर येणारे अवयव असतात. फुप्फुस-मुळाभोवती परिफुप्फुसाचे आवरण असते. आवरणाच्या मुळाखालील दुपदरी घडीला ‘फुप्फुस-बंध’ म्हणतात. नाभिकेच्या वर हृद्अंकनाच्यावर उजव्या बाजूस घळीसारखे अंकन असते त्यात ऊर्ध्व महानीला संलग्न असते. फुप्फुस –मुळाच्या मागे वरून खाली येणाऱ्या घळीत ग्रसिका (घशापासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणारी मांसल नलिका) संलग्न असल्यामुळे तिला ‘ग्रसिका अंकन’ म्हणतात. याच पृष्ठभागाच्या खालच्या बाजूस फुप्फुस-बंधाच्या पुढे अधःस्थ महानीलेचे अंकन असते.

डाव्या फुप्फुसावरील नाभिकेच्या वर महारोहिणीची कमान व तिचा अवरोही भाग यांचे खोलसर घळीसारखे अंकन असते. दोन्ही बाजूंच्या मध्यपटल तंत्रिका मानेतून खाली वक्षात उतरून मध्यपटलाच्या    उजव्या व डाव्या भागास पुरवठा करावयास जाताना, फुप्फुस-मुळांच्या पुढून, मध्यावकाशीय परिफुप्फुस व परिहृद यांच्यामधून जातात.

आ. ४. उजव्या फुप्फुसाचा अभिमध्य पृष्ठभाग : (१) हृद खोबण, (२) हृद्अंकन, (३) डाव्या फुप्फुस-नीला, (४) डावी प्रमुख श्वासनलिका, (५) फुप्फुस-रोहिणी, (६) डाव्या अधोजत्रू रोहिणीची घळी, (७) अग्र अथवा वरचे टोक, (८) महारोहिणीची घळी, (९) पश्चकडा, (१०) फुप्फुस-बंध, (११) अधःस्थ कडा, (१२) प्राणेशा तंत्रिका, (१३) मध्यपटल तंत्रिका.अग्रकडा अधःस्थ कडेप्रमाणे धारदार व पातळ असते. दोन्ही फुप्फुसांच्या अग्रकडा परिहृदयावर पुढे येतात. उजव्या अग्रकडा जवळजवळ सरळ असते. डाव्या फुप्फुसाच्या अग्रकडेवर चौथ्या डाव्या बरगडीच्या कूर्चेपासून खाली जी खोबण असते तिला ‘हृद् खोबण’ म्हणतात. या ठिकाणी हृदयावर परिहृदाचे आणि त्याही पुढे फक्त परिफुप्फुसाचे आच्छादन असते.

अधःस्थ कडा बूड आणि पर्शुकीय पृष्ठभाग यांच्या दरम्यान असून धारदार व पातळ असते. तिचा मध्यावकाशाकडील भाग बोथट व गोलसर असतो.

पश्चकडा पर्शुकीय पृष्ठभाग आणि अभिमध्य पृष्ठभागाच्या मागील भागाच्या (केशरुक भागाच्या) दरम्यान असते. फुप्फुसाचा पश्च बाजूचा जाड गोलसर भाग म्हणजे पश्चकडा असल्यामुळे ती सहज व स्पष्ट दर्शविण्यासारखी नसते.    

आ. ५. फुप्फुस व हृदय यांतील रक्ताभिसरण : (१) डावे फुप्फुस, (२) अधःस्थ खंड, (३) ऊर्ध्वस्थ खंड, (४) उजवी व डावी फुप्फुस-नीला, (५) उजवी व डावी फुप्फुस-रोहिणी, (६) श्वासनाल, (७) उजवे फुप्फुस, तिरपी भेग, (८) ऊर्ध्वस्थ खंड, (९) मध्यस्थ खंड, (१०) अधःस्थ खंड, (११) हृदयाचे उजवे अलिंद, (१२) उजवे निलय, (१३) डावे अलिंद, (१४) डावे निलय, (१५) परिफुप्फुस.रक्त पुरवठा : हृदयाच्या उजव्या निलयात येणारे अशुद्ध रक्त (शरीर कोशिकांनी वापरल्यामुळे ऑक्सिजनाचे प्रमाण कमी झालेले रक्त) फुप्फुस-रोहिणीच्या शाखांद्वारे फुप्फुसाकडे नेले जाते. या शाखांना उजवी व डावी फुप्फुस-रोहिणी म्हणतात. प्रत्येक फुप्फुसात या रोहिणीच्या शाखा, खंडीय व खंडकीय श्वासनलिकांच्या सोबत फुप्फुस-ऊतकात विखुरल्या जातात. प्रत्येक खंडकीय रोहिणीचे विभाजन होऊन शेवटी ती वायुकोशाच्या सभोवती असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळ्यात विलीन होते. प्रत्येक खंडाची रोहिणी-शाखा स्वतंत्र असते. वायुकोशावरील दाट केशवाहिन्यांच्या जाळ्यातून छोट्या छोट्या नीलांची सुरुवात होते व त्यांपासून प्रत्येक फुप्फुसातून हृदयाकडे रक्त वाहून नेणार्यात दोन मोठ्या नीला बनतात. फुप्फुसातून जाताना या नीलांच्या शाखा फुप्फुस-रोहिणी व श्वासनलिका यांच्या सोबत न जाता स्वतंत्रपणे जातात. या चारही फुप्फुस-नीला हृदयाच्या डाव्या अलिंदात व तेथून डाव्या निलयात ऑक्सिजनाचे योग्य प्रमाण असलेले रक्त आणून सोडतात.


तंत्रिका पुरवठा : फुप्फुसाला परानुकंपी व अनुकंपी तंत्रिका तंत्रांकडून पुरवठा होतो [→ तंत्रिका तंत्र]. परानुकंपी भाग प्राणेशा तंत्रिका (दहावी मस्तिष्क तंत्रिका) जेव्हा फुप्फुस-मुळाच्या मागून उतरते तेव्हा तिच्या काही तंतूंपासून बनतो. अनुकंपी भाग त्या त्या बाजूच्या अनुकंपी शृंखलेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वक्षीय गुच्छिकांकडून येणाऱ्या तंतूंचा बनतो. फुप्फुस-मुळाजवळ या सर्व तंतूंची (परानुकंपी व अनुकंपी) अग्र व पश्च अशी दोन तंत्रिका जाळी बनतात. या जाळ्यांमधून निघणारे अभिवाही (फुप्फुसाकडून संवेदना वाहून नेणारे) तंत्रिका तंतू आणि अपवाही (फुप्फुसाकडे प्रेरक संदेश वाहून नेणारे) तंत्रिका तंतू श्वासनलिकांच्या शाखांप्रमाणेच विभाजित होतात व फुप्फुस-रोहिणींच्या शाखेतील स्नांयू व श्वासनलिका शाखांतील स्नायू यांना पुरवठा करतात. अनुकंपी तंत्रिका फुप्फुस-रोहिणी शाखांचे विस्फारण करतात. श्वासनलिकांतील स्नायूंना अनुकंपी व परानुकंपी या दोन्ही भागांचा पुरवठा होतो आणि त्यांची उद्दीपने अनुक्रमे श्वासनलिकांचे विस्फारण व आकुंचन घडवून आणतात.

फुप्फुसांकडून संवेदना वाहून नेणाऱ्या तंत्रिका वायुकोशांच्या भित्तीवर व श्वासनलिकांच्या आतील बाजूच्या अधिस्तरावर विखुरलेल्या असतात. श्लेष्मा (दाट चिकट पदार्थ) किंवा अंतःश्वसनाबरोबर आत शिरलेले प्रक्षोभक कण जेव्हा या तंतूंना उद्दीपित करतात तेव्हा ⇨ प्रतिक्षेपी क्रियाजन्य ⇨ खोकला उत्पन्न होतो आणि असे बाह्य पदार्थ कफाच्या रूपाने उत्सारित होतात (बाहेर फेकले जातात). वायुकोश भित्तीमधील तंत्रिका तंतू ठराविक फुगवटीचा विस्फारजन्य ताण पडताच उत्तेजित होतात व तेथून निघणारे संदेश लंबमज्जेतील [मेरुरज्जूच्या वरच्या टोकाशी संलग्न असलेल्या शंक्वाकृती भागातील → तंत्रिका तंत्र] श्वसन केंद्रकापर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे या संदेशामार्फत श्वसनक्रियेच्या नियंत्रणात महत्त्वाचा भाग घेतला जातो [→ श्वसन तंत्र].

आ. ६. फुप्फुसांचे लसीकावहन : (१) डावे फुप्फुस, (२) विभाजनाजवळील मोठ्या रक्तवाहिन्या, (३) श्वासनाल, (४) उजवी प्रमुख श्वासनलिका, (५) उजवे फुप्फुस, (६) डावी प्रमुख श्वासनलिका, (७) लसीकावाहिन्या, (८) लसीकाग्रंथी.लसीका वहन : छोट्या छोट्या लसीकावाहिन्यांचे जाळे परिफुप्फुसाखालील संयोजी ऊतकात विखुरलेले असते. फुप्फुसातील लसीकावाहिन्या श्वासनलिकांच्या मोठ्या शाखांजवळ असणाऱ्या फुप्फुस-लसीका ग्रंथीत लसीका वाहून नेतात. या ग्रंथीतून लसीका श्वासनाल विभाजनाच्या जवळपास असलेल्या ग्रंथींत वाहून नेली जाते. उजव्या फुप्फुसातील लसीका उजवीकडील ग्रंथीत आणि डाव्यातील डावीकडील ग्रंथीतच वाहून नेली जात नाही. डाव्या फुप्फुसाच्या तळभागाकडच्या काही भागाच्या लसीकावाहिन्या उजवीकडील ग्रंथींत लसीका वाहून नेतात. मध्यावकाशातील इतर अवयवांकडील लसीका वाहून नेणाऱ्या लसीकावाहिन्यांपासून डावी आणि उजवी अशा दोन मोठ्या लसीकावाहिन्या बनतात. त्यांच्यामार्फत फुप्फुसातील लसीका लसीका-महावाहिनीत वाहून नेली जाते. ही महावाहिनी वक्षीय पोकळीतून वर मानेत जाते व तेथे डाव्या अधोजत्रू नीलेस मिळते. श्वासनालाच्या उजव्या बाजूस लसीका ग्रंथी डाव्या बाजूकडील ग्रंथींपेक्षा मोठ्या असतात. क्ष-किरण चित्रणात फुप्फुस-मुळाजवळील ग्रंथींची वाढ अथवा त्यांचे कॅल्सीभवन (कॅल्शियमाची लवणे साचून कठीण होण्याची क्रिया) स्पष्ट दिसते. डब्ल्यू. एस्. मिलर यांच्या मताप्रमाणे यकृत व मूत्रपिंड यांसारख्या अवयवांपेक्षा फुप्फुसातील लसीकावाहिन्यांचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.

 भ्रूणविज्ञान : भ्रूण (तीन महिने वयाखालील गर्भ) ३ मिमी. लांबीचा असताना अग्रांत्राच्या (ज्यापासून नंतर घसा, ग्रसिका, जठर व ग्रहणी – लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग – हे भाग बनतात अशा भ्रूणातील अवयवाच्या) अभ्युदरीय (उदराकडील) भित्तीवर एक अंधवर्ध (टोकाला बंद असलेला पिशवीसारखा भाग) दिसू लागतो. हा अंधवर्ध खालच्या व पुढच्या बाजूकडे वाढू लागतो व भ्रूण ५ मिमी.

लांबीचा असताना त्याचे उजव्या आणि डाव्या फुप्फुस कलिकांत विभाजन होते. उजव्या फुप्फुस कलिकेच्या पुढील विभाजनापासून तीन खंड आणि डाव्या फुप्फुस कलिकेच्या विभाजनाने दोन खंड बनतात. पूर्ण वाढलेल्या फुप्फुसातही हीच विभागणी कायम असते.

आ. ७ फुप्फुसांचे भ्रणविज्ञान : (अ) ११.८ मिमी. लांबीच्या भ्रूणातील फुप्फुस कलिका : खंड पडण्याची सुरूवात (आ) १४.२ मिमी. लांबीच्या भ्रूणातील फुप्फुसांची वृद्धी.

आठ मिमी. लांबीच्या भ्रूणात उजव्या कलिकेत तीन श्वासनलिकांची आद्यांगे दिसू लागतात. डाव्या कलिकेत अशी दोनच आद्यांगे दिसतात. या आद्यांगांच्या सतत होणाऱ्या वृद्धी व विभाजनातून श्वासनलिकांचे वृक्षरूप जाळे तयार होते. फुप्फुस कलिकेच्या अगदी शेवटच्या सूक्ष्म विभाजनजन्य भागाला ‘इन्फंडिब्युलम’ म्हणतात. सहाव्या महिन्यानंतर या भागावर वायुकोश दिसू लागतात.

फुप्फुस विभेदनाच्या तीन अवस्था वर्णितात : (१) ग्रंथिल अवस्था, (२) सूक्ष्मनलिका अवस्था आणि (३) वायुकोशावस्था. ग्रंथिल अवस्थेत श्वासनलिका विभाजन होते. सूक्ष्मनलिका अवस्थेत फुप्फुसाच्या श्वसनमार्गाचे सूक्ष्म भेद दिसू लागतात आणि सतत वृद्धिंगत होणाऱ्या रक्ताभिसरण तंत्राशी अधिक संलग्नता प्रस्थापित होते. वायुकोशावस्था सहाव्या महिन्यानंतर सुरू होत असली, तरी नवीन श्वासनलिका व वायुकोश तयार होण्याचे कार्य जन्मानंतरही चालू असते. 


अग्रांत्राच्या पुढच्या टोकापासून निघणाऱ्या अंधवर्धापासून फुप्फुसे तयार होत असल्यामुळे या ठिकाणी तयार होणाऱ्या घसा या शरीरभागाशी ती श्वासनालाद्वारे नेहमी जोडलेली राहतात.

प्रौढावस्थेत फुप्फुस-ऊतकाची वाढ होत नाही पण शस्त्रक्रियेच्या वेळी एखादा फुप्फुस खंड काढून टाकण्यात आल्यास उरलेले फुप्फुस-ऊतक आकारमानाने वाढते. हा कोशिकावृद्धीचा प्रकार नसून उरलेल्या वायुकोशांची धारणक्षमता केवळ ताणाने फुगून वाढते.

कार्य : फुप्फुसाचे कार्य रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर टाकणे व ऑक्सिजन आत घेणे आणि अशा प्रकारे रक्त शुद्ध करणे हे आहे. वायुकोशात ही वायूंची देवघेव होते. याखेरीज काही मर्यादित प्रमाणात शरीरातील बाष्प बाहेर टाकणे, कार्बन डाय-ऑक्साइडाचा संचय अथवा उत्सर्जन याद्वारे शरीराच्या रासायनिक संघटनाचे सातत्य राखणे या कार्यात फुप्फुस भाग घेते. श्वासनलिकेतील सकेशल कोशिका, श्लेष्मल स्राव, खोकल्याची प्रतिक्षेपी क्रिया, महाभक्षी कोशिका इत्यादींच्या द्वारा फुप्फुस शरीराच्या संरक्षण व्यवस्थेतही भाग घेते.

विकार : श्वसन तंत्राचा फुप्फुसे हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्यांच्या काही विशेष महत्त्वाच्या व नेहमी आढळणाऱ्या रोगांविषयी येथे थोडक्यात माहिती दिली आहे. फुप्फुस व श्वासनलिका बाह्य वातावरणाच्या सतत संपर्कात असल्यामुळे, विविध सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या संसर्गामुळे, शुष्कनामुळे (योग्य आर्द्रतेच्या अभावी ऊतककोशिका कोरड्या पडण्यामुळे), अंतःश्वसनाबरोबर आत शिरलेल्या बाह्य कणाच्या भौतिक व रासायनिक परिणामांमुळे त्यांमध्ये रोग उद्‌भवण्याचा सतत धोका असतो. रोगापासून संरक्षणात्मक अशा काही योजना नैसर्गिकरीत्या केलेल्या असतात उदा., श्वासनलिकांच्या अंतःस्तरावरील सकेशल कोशिकांच्या केसांच्या हालचाली त्यजन प्रवाह निर्माण करून श्लेष्मात अडकलेले बाह्यकण ढकलण्याचे कार्य करतात. तरीदेखील फुप्फुसे व श्वासनलिका यांच्या शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे) उद्‌भवणारे आजार नेहमी आढळतात. फुप्फुस-कोशिकानाश, त्या मागोमाग होणारी संयोजी ऊतक वाढ (व्रण तयार होणे) व त्याबरोबर रक्ताभिसरणात उत्पन्न होणारी अक्षमता या गोष्टीही फुप्फुस विकृतीस कारणीभूत असतात. संपूर्ण शरीरातील नीलांद्वारे परत येणारे रक्त फुप्फुसात अक्षरशः गाळले जाते व म्हणून रक्तनिर्मित रोगांचा प्रादुर्भाव फुप्फुसांत होतो. शरीरात इतरस्र उद्‌भवणाऱ्या कर्कार्बुदांपासून (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या मारक गाठींपासून) प्रतिक्षेपजन्य कर्कार्बुदे [⟶ प्रतिक्षेप] फुप्फुसांत नेहमी तयार होतात. मूळ फुप्फुसातच निर्माण होणाऱ्या कर्करोगाचे म्हणजे प्राथमिक फुप्फुस कर्करोगाचे प्रमाणही निश्चितपणे वाढत आहे.

फुप्फुसासंबंधीच्या पुढील महत्त्वाच्या विकारांविषयी स्वतंत्र नोंदी आहेत : (१) ऑक्सिजन-न्यूनता, (२) दमा, (३) परिफुप्फुसशोथ, (४) न्यूमोनिया, (५) खोकला, (६) श्वसनस्थगिती, (७) शुकरोग, (८) क्षयरोग.

प्रस्तुत नोंदीत पुढील विकारांविषयी थोडक्यात माहिती दिली आहे : (१) फुप्फुसशोफ, (२) फुप्फुसपात, (३) अंतर्कीलन व अभिकोथ, (४) वातस्फीती अथवा वायुकोश विस्तार, (५) तंत्वात्मकता, (६) व्यवसायजन्य विकृती, (७) रक्तवाहिनी काठिण्य आणि (८) कर्करोग.

फुप्फुसशोफ : अतिजलद पारस्रवणामुळे (पटलामधून द्रव पलीकडे जाण्यामुळे) फुप्फुसातील केशवाहिन्यांमधील द्रव वायुकोश, श्वासनलिका आणि आंतरकोशिकीय स्थाने या ठिकाणी गोळा झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकृतीला ‘फुप्फुसशोफ’ म्हणतात. चिरकारी (दीर्घकालीन) फुप्फुस रक्ताधिक्याचा परिणाम म्हणून किंवा स्वतंत्रपणे ही विकृती एकाएकीच उद्‌भवते. एकाएकी उद्‌भवणारी विकृती डाव्या निलयाची निष्फलता किंवा द्विदल संकोच (द्विदल कपाट-झडप-असलेले डावे अलिंद व डावे निलय यांमधील द्वार अरुंद बनणे) यासारख्या हृदयविकारात उद्‌भवते. या विकृतीच्या इतर कारणांमध्ये उपचारार्थ केलेल्या आंतरनीला अंतःक्षेपणांचा (इंजेक्शनांचा) अतिरेक, इन्फ्ल्यूएंझासारख्या रोगातील अतितीव्र फुप्फुस-संक्रामण, अंतःश्वसनाद्वारे क्लोरीन किंवा फॉस्जीन यासारखा विषारी वायू किंवा उलटीतील पदार्थ फुप्फुसात शिरणे, पॅराफीन तेलासारखा क्षोभक पदार्थ फुप्फुसात प्रविष्ट होणे, फुप्फुसोच्छेदन शस्त्रक्रियेचा परिणाम इत्यादींचा समावेश होतो. प्रारण उद्‌भासनजन्य विकृती [⟶ प्रारण जीवविज्ञान], मूत्रविषरक्तता (मूत्रातील घटकद्रव्यांच्या रक्तातील उपस्थितीमुळे निर्माण होणारी विषारी अवस्था) व प्रौढ कष्टश्वसन लक्षणसमूह अथवा फुप्फुस अवसाद (रक्तप्रवाहांत एकदम बिघाड झाल्यामुळे होणारा शक्तिपात) या विकृतींमध्येही फुप्फुसशोफ उत्पन्न होतो. ३,००० मी. उंचीपेक्षा जास्त उंचीवर अतिजलद गतीने गिर्यारोहण केल्यास फुप्फुसशोफ उत्पन्न होऊन विशिष्ट लक्षणे उद्‌भवतात.

या विकृतीत तीव्र कष्टश्वसन आणि नीलविवर्णता (रक्ताला ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे त्वचा निळसर होणे) ही लक्षणे उद्‌भवतात. खोकल्याबरोबर रक्तमिश्रित कफ उत्सर्जित होतो. श्रवणयंत्रातून (स्टेथॉस्कोपमधून) ऐकल्यास बुडबुड्यासारखा विशिष्ट ध्वनी छातीच्या दोन्ही बाजूंस ऐकू येतो. या विकृतीचे तीव्र, अल्पतीव्र आणि चिरकारी प्रकार आढळतात.

उपचारामध्ये मूळ रोगावर इलाज करणे महत्त्वाचे असते. मुखवट्यातून ऑक्सिजन पुरवठा उपयुक्त असतो. उंचीवरील रोग्यास खालच्या पातळीवर ताबडतोब हलवणे, तसेच हळूहळू क्रमाक्रमाने गिर्यारोहण करणे, अतिश्रम न करणे, प्रतिकूल हवामानाचा परिणाम  टाळण्याची काळजी घेणे इ. उपाययोजना करता येतात.


फुप्फुसपात:फुप्फुसाची किंवा त्याच्या काही भागाची हवारहित अवस्था होऊन वायुकोश भित्ती एकमेकींजवळ येणे, नेहमीची फुगवटी नाहीशी होऊन आकारमान लहान बनणे याला ‘फुप्फुसपात’ म्हणतात. एखादा खंडच विकृत झाला असेल, तर त्याला ‘फुप्फुसखंडपात’ म्हणतात. फुप्फुसपाताचे (अ) जन्मजात व (आ) उपार्जित असे दोन प्रकार आढळतात.

(अ) जन्मजात प्रकारात फुप्फुसात हवा न शिरल्यामुळे ती पूर्णपणे किंवा अंशतः हवारहित असतात. अकाल अर्भकात तसेच मृतजात अर्भकात आणि जिवंत राहूनही श्वसनक्रिया व्यवस्थित होण्यापूर्वीच मृत झालेल्या अर्भकात फुप्फुसे गडद रंगाची, घट्ट व हवारहित असतात. नवजात अर्भकांतील ‘काचाभ कला विकृती’ (अंतिम श्वासनलिका व वायुकोश नलिका यांच्या पोकळ्यांतून अरुणकर्षी-इओसीन या रंजकद्रव्याने सुलभपणे रंगविता येणाऱ्या-रक्तातील कोशिकांचे आधिक्य असलेला पातळ थर पसरलेला असणारा रोग) या रोगात वायुकोशांचा विस्फार होत नाही. या थराचा व विस्फारण न होण्याचा निश्चित संबंध प्रस्थापित झालेला नाही. या रोगाची ५० टक्क्यांपेक्षा अधिक अर्भके मरण पावतात.

(आ) उपार्जित फुप्फुसपात दोन प्रकारचा आढळतो : (१) शिथिलन फुप्फुसपात आणि (२) अवशोषण फुप्फुसपात.

(१) शिथिलन फुप्फुसपातामध्ये काही कारणांमुळे परिफुप्फुस अवकाश वाढून परिफुप्फुस गुहेत द्रव, रक्त किंवा पू संचय झाल्यास फुप्फुस नेहमीप्रमाणे विस्फारित राहू शकत नाही. असा संचय वाढत गेल्यास त्याचा दाब पडून फुप्फुसपात वाढतो. म्हणून अशा फुप्फुसपाताला ‘दाबजन्य फुप्फुसपात’ असे म्हणतात.

(२) अवशोषण फुप्फुसपातास श्वासनलिका रोध बहुधा कारणीभूत असतो. याला  ‘रोधजन फुप्फुसपात असेही म्हणतात. यामध्ये श्वासनलिकेची अवकोशिका (आतील पोकळी) बाहेरून दाबल्यामुळे किंवा आतून उद्‌भवलेल्या अर्बुदामुळे बंद होते. ज्या ठिकाणी रोध असतो तेथून दूरस्थ फुप्फुसातील अडकलेली हवा काही तासांतच अवशोषिली जाते व फुप्फुसपात होतो. प्रमुख श्वासनलिकेच्या पूर्ण रोधामुळेच त्या बाजूच्या संपूर्ण फुप्फुसाचा पात होतो. याला ‘संपुंजित’ अथवा ‘पूर्ण’ फुप्फुसपात म्हणतात. अशा प्रकारचा फुप्फुसपात शस्त्रक्रियेकरिता भूल देताना किंवा फुप्फुसावरील शस्त्रक्रियेमुळे उद्‍भवतो व तो बहुधा एकाएकी उद्‌भवतो. लहान मुलांत शेंगदाणा, वाटाणा, खेळण्याचा प्लॅस्टिकचा किंवा रबराचा तुकडा अंतःश्वसनातून श्वासनलिकेत अडकून ही विकृती उद्‌भवते. मध्यावकाशातील अवयवांवर डाव्या फुप्फुसाच्या संपुंजित फुप्फुसपाताचे होणारे परिणाम आ. ८ मध्ये दर्शविले आहेत.

फुप्फुसाचे क्ष-किरण चित्रण निदानास उपयुक्त असते. उपचारामध्ये शस्त्रक्रियेपूर्वी श्वसनक्रियेच्या कार्यक्षमतेची पूर्ण परीक्षा करणे प्रतिबंधात्मक ठरू शकते. श्वासनलिकादर्शन परीक्षक यंत्राने बघून बाह्य पदार्थ कधीकधी काढून टाकता येतात. रोधास अर्बुद कारणीभूत असल्यास प्रथम त्याची ⇨ जीवोतक परीक्षा करून त्याचे स्वरूप ठरवावे लागते.

आ. ८. डाव्या फुप्फुसाच्या संपुंजित फुप्फुसपाताचे मध्यावकाशातील अवयवांवर होणारे परिणाम : (१) डावे मध्यपटल वर उचलले जाते, (२) हृदय डाव्या बाजूस सरकते, (३) प्रमुख श्वासनलिकेच्या अवकाशिकेतील अर्बुद, (४) श्वासनाल डाव्या बाजूस सरकतो, (५) डाव्या फुप्फुसाचा संपुंजित फुप्फुसपात, (६) उजव्या फुप्फुसाची प्रतिपूरक वातस्फीती, (७) मध्यरेषा.

अंतर्कीलन व अभिकोथ: सार्वदेहिक नीला किंवा हृदयाची उजवी बाजू यांमधील एखाद्या रक्तक्लथाचा (रक्ताच्या गुठळीचा) तुकडा निसटून रक्तप्रवाहाद्वारे फुप्फुसातील एखाद्या रोहिणीत अडकून बसण्याला ‘फुप्फुस अंतर्कीलन’ व त्या तुकड्याला ‘अंतर्कील’ म्हणतात. अंतर्कीलनामुळे फुप्फुस ऊतकात जे विकृतिवैज्ञानिक बदल घडून येतात त्यांना ‘फुप्फुस अभिकोथ’ (रक्तपुरवठ्यातील अडथळ्यामुळे विशिष्ट भागात होणारा ऊतकमृत्यू, शोथ इ. प्रक्रिया) म्हणतात. अंतर्कील लहान, मोठा, एक किंवा अनेक असू शकतात. ही विकृती प्राकृतिक हृदय असलेल्यात किंवा हृद्रोग असलेल्यात संभवते. मोठ्या प्रमाणावरील फुप्फुस अंतर्कीलन आकस्मिक मृत्यूचे कारण असू शकते. फुप्फुस अंतर्कीलनास प्रामुख्याने पायातील खोल नीलांमधील रक्तक्लथन कारणीभूत असते. शस्त्रक्रियेनंतर खूप दिवस अंथरूणात पडून राहणे अशा रक्तक्लथनास मदत करते. गर्भारपणात किंवा श्रोणिगुहेतील (धडाच्या तळाशी हाडांच्या संयोगामुळे तयार झालेल्या हाडांनी वेष्टित असलेल्या पोकळीतील) अवयवावरील शस्त्रक्रियेनंतर श्रोणिगुहेतीलच एखाद्या मोठ्या नीलेत रक्तक्लथन होण्याचा संभव असतो. रक्तक्लथन-अंतर्कीलन या विकृतीचा व संततिप्रतिबंधक औषधांचा संबंध असल्याचा काही पुरावा उपलब्ध आहे. कारण ही औषधे सेवन करणाऱ्या स्त्रियांत तिचे प्रमाण अधिक आढळले आहे.

प्रमुख फुप्फुस-रोहिणीत अडकलेल्या मोठ्या अंतर्कीलनामुळे रोगी काही मिनिटांतच मृत्यू पावू शकतो. अशा अंतर्कीलाचे फुप्फुस-ऊतकातील विकृतिवैज्ञानिक बदल अत्यल्प असतात. लहान अंतर्कील रोहिणीच्या छोट्या शाखेत अडकू शकतो. अशा वेळी ज्यांना रक्ताभिसरणासंबंधीची विकृती नाही अशा रोग्यांमध्ये संबंधित फुप्फुस-ऊतकास श्वासनलिका रोहिणीमार्फत रक्तपुरवठा होऊ शकतो. यामुळे वायुकोशात अल्पसा रक्तस्राव झाला, तरी रक्तन्यूनत्व किंवा अभिकोथ उत्पन्न होत नाही. मात्र रक्ताभिसरण विकृती असलेल्या रोग्यांत अभिकोथ उत्पन्न होतो. 


रक्तक्लथाच्या तुकड्याशिवाय वसा (स्निग्ध पदार्थ) व अस्थिमज्जा कोशिकापुंज (हाडांच्या पोकळीतील संयोजी ऊतकातील कोशिकांचा पुंज), हवा, उल्बद्रव (भ्रूणाभोवतील पातळ कोशिकामय पिशवीतील द्रव) आणि अर्बुदकोशिका फुप्फुस रक्ताभिसरणात प्रविष्ट होऊन अंतर्कीलन करू शकतात मोठ्या लांब हाडांच्या अस्थिभंगात वसा अंतर्कीलन, आंतरनीला अंतःक्षेपणाच्या वेळी वायु-अंतर्कीलन, अकाल गर्भमृत्यूत वार लवकर सुटल्यामुळे उल्बद्रव अंतर्कीलन, वृक्क (मूत्रपिंड) कर्कार्बुद किंवा जठर कर्कार्बुद या विकृतीत कर्ककोशिका रक्ताभिसरणात शिरून अर्बुदकोशिका अंतर्कीलन संभवते. 

फुप्फुस अंतर्कीलन व फुप्फुस अभिकोथ पुष्कळ वेळा वृद्ध, अशक्त, अंथरुणास खिळलेल्या रोग्यांत अन्य आजारातील उपद्रव म्हणूनच निर्माण होतात.

उपचारामध्ये उदरगुहेतील शस्त्रक्रियेनंतर रुग्णास शक्य तितक्या लवकर शारीरिक हालचाल करावयास लावणे किंवा इतर रोगाकरिता अंथरुणावर पडून राहिलेल्या रुग्णास शक्य तितक्या लवकर पायावर उभा करून थोडेफार फिरावयास लावणे प्रतिबंधात्मक असते. स्थितिस्थापक (ताण काढून घेतल्यावर मूळ स्थितीत परत येणारे) पायमोजे आणि पोटरीच्या स्नायूंचे विद्युत्‌ उद्दीपन नीलांतील रक्त वाहून नेण्यास मदत करतात. हृद्रोगावरील उपचारात क्लथनरोधक औषधाचा काळजीपूर्वक उपयोग प्रतिबंधात्मक असतो. गंभीर अंतर्कीलनापूर्वी एक-दोन अल्पतीव्र अंतर्कीलनाचे आघात त्याच रुग्णात नेहमी आढळतात. अशा वेळी हेपारिनासारख्या क्लथनरोधाचा उपयोग करतात. गंभीर अंतर्कीलनात क्लथाच्या विलयनाकरिता (विरघळविण्याकरिता) तंत्वीविलयक (रक्ताच्या गुठळीतील प्रधान भाग असलेले फिब्रिन हे प्रथिन विरघळविण्याची) चिकित्सा उपयुक्त असते. त्याकरिता स्ट्रेप्टोकिनेझ नावाचे औषध वापरतात. [⟶ अंतर्कीलन अभिकोथ].

वातस्फीती अथवा वायुकोश-विस्तार : अंतिम श्वासनलिकेपासून दूरस्थ फुप्फुस भागात (फुप्फुस एककात) नेहमीच्या प्राकृतिक हवा-अवकाशात वाढ होण्याला फुप्फुस वातस्फीती अथवा वायुकोश-विस्तार म्हणतात. वायुकोशांचे नेहमीपेक्षा अधिक विस्फारण होण्यास त्यांची विस्तारवाढ किंवा त्यांच्या भित्तींचा नाश कारणीभूत असतो. बाल्यावस्थेत वायुकोशांची योग्य वृद्धी न होणे, अपपुष्टी, अतिविस्फारण आणि वायुकोश भित्तींचा नाश या गोष्टी ही विकृती उद्‌भवण्यास मदत करीत असाव्यात. तरीदेखील या विकृतीचे निश्चित कारण अजून अज्ञात आहे.

वृद्धावस्थेत फुप्फुसांचे आकारमान प्राकृत असूनही वायुकोशांचे आकारमान तारुण्यावस्थेपेक्षा मोठे असते व त्यांवरील केशवाहिन्यांचे जाळे विरळ असते. पूर्ण फुप्फुसधारणक्षमता प्राकृतिक असते आणि क्ष-किरण चित्रणात कोणतीही विकृती दिसत नाही. याला वार्धक्यजन्य फुप्फुस वातस्फीती म्हणतात. फुप्फुसाच्या काही भागाचा पात झाल्यास किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास उरलेल्या फुप्फुसात होणाऱ्या वातस्फीतीला ‘प्रतिपूरक वातस्फीती’ म्हणतात. रोधाच्या ठिकाणी गोलक झडप उत्पन्न झाल्यास रोधापलीकडील फुप्फुस भागात होणाऱ्या वातस्फीतीला ‘गोलक झडपजन्य वातस्फीती’ म्हणतात. प्रतिपूरक प्रकारात क्ष-किरण विसर्जनक्षमतेत (क्ष-किरण पृष्ठभागातून बाहेर पडण्याच्या प्रमाणात) बदल आढळत नाही परंतु गोलक झडपजन्य प्रकारात ही क्षमता वाढल्याचे आढळते, तसेच हृदय विरुद्ध बाजूकडे सरकते.

हवामार्ग रोध आणि हवा कोंडून राहणे (प्रत्येक उच्छ्‌वासाच्या वेळी संपूर्ण हवा परत न येता आत राहून उर्वरित हवेत वाढ होणे) या गोष्टी बहुतकरून विस्तार विकृतीत आढळतात. चिरकारी श्वासनलिकाशोथ आणि फुप्फुस वातस्फीती या विकृती बहुधा एकाच वेळी बरोबर आढळतात. दोन्ही कधीकधी निरनिराळ्या व स्वतंत्रपणेही आढळतात. या दोन्ही विकृती फुप्फुसांचा गंभीर नाश करू शकतात परंतु त्यांचे परिणाम निरनिराळे असतात. चिरकारी श्वासनलिकाशोथामध्ये फुप्फुस वायुविजन (फुप्फुसाद्वारे ऑक्सिजनाचा सतत पुरवठा होण्याची क्रिया) प्राकृतिक असते, तर वातस्फीतीमध्ये त्यात गंभीर बिघाड होतो. फुप्फुस वातस्फीतीमध्ये वायुविजन बिघाड आणि गंभीर श्रमजन्य कष्टश्वसन हे हृद्‌निष्फलता उत्पन्न होण्यापूर्वी काही वर्षे अगोदरच उत्पन्न झालेले असतात.

अलीकडील काही वर्षांत पाश्चिमात्य देशांतून या विकृतीमुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे. भारतात संपूर्ण देशासंबंधीचे आकडे उपलब्ध नाहीत. दिल्ली येथील व्ही. पी. चेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये १९५६-५९ या काळात तपासलेल्या एकूण २,४८८ रोग्यांमध्ये फुप्फुस वातस्फीतीचे प्रमाण १४·८ टक्के होते. देशाच्या इतर भागांपेक्षा उत्तर भारतात या विकृतीचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळले आहे. 


फुप्फुस वातस्फीतीचे बहुसंख्य रोगी श्रमजन्य कष्टश्वसनाची तक्रार करतात. वर सांगितल्याप्रमाणे श्वासनलिकाशोथ आणि कधीकधी ⇨ दमा या विकृती जोडीला असल्यामुळे केवळ वातस्फीतीजन्यच हे लक्षण असते, असे सांगणे कठीण असते. इतर लक्षणांमध्ये श्वसनक्रियेतील छातीची हालचाल कमी होणे, प्रत्येक अंतःश्वसनाबरोबर श्वासनाल खाली सरकणे, श्वासनालाची मानेतील लांबी कमी होणे इत्यादींचा समावेश होतो. क्ष-किरण चित्रणावरून या विकृतीचे निश्चित निदान करता येत नाही. त्याकरिता काही फुप्फुस क्रियाशीलता परीक्षा उपयुक्त असतात. उपचारामध्ये कोणताही विशिष्ट इलाज उपलब्ध नाही. श्वासनलिकेला क्षोभक असणारे धूलिकण टाळणे, धूम्रपान पूर्ण वर्ज्य करणे, सूक्ष्मजंतूंचे संक्रामण होऊ न देणे व झाल्यास योग्य प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा लगेच उपयोग करणे इ. गोष्टी रोगप्रतिबंधक असतात. प्राथमिक फुप्फुस वातस्फीती अव्युत्क्रमी असते (म्हणजे ऊतकात झालेले बदल कायम स्वरूपाचे असतात).

तंत्वात्मकता : या रोगात फुप्फुसातील वायुकोशांच्या भित्तीबाहेरील ऊतकात सर्वत्र तंतुमय ऊतकाची वाढ होते व अंतःपटले जाड बनतात. पुष्कळ फुप्फुसरोगांमध्ये तंत्वात्मकता हा प्रामुख्याने आढळणारा विकृतिवैज्ञानिक परिणाम असतो. बहुतेक व्यवसायजन्य फुप्फुसरोगांमध्ये फुप्फुसांचा ऊतकनाश तंतुमय ऊतक वाढीने (व्रण तयार होऊन) भरून काढला जातो. कोशिकांचे प्रगुणन आणि संयोजी ऊतकाची तंतुमय वाढ अंतःपटलाची जाडी वाढवतात. त्यामुळे केशवाहिन्या व वायुकोश यांच्या दरम्यानच्या वायूंच्या देवघेवीत अडथळा उत्पन्न होतो. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते व कष्टश्वसन, खोकला, कफोत्सर्जन ही लक्षणे उद्‌भवतात. कधीकधी नीलविवर्णता आणि हृद्‌निष्फलता उत्पन्न होतात. निदानाकरिता क्ष-किरण चित्रणाची थोडीफार मदत होते. एकाच बाजूस विकृती असल्यास ती बाजू दुसरीपेक्षा लहान दिसते. श्वासनाल आणि इतर मध्यावकाशीय अवयव रोगट बाजूकडे सरकल्याचे दिसते. रोगट बाजूकडील मध्यपटल वर उचलले जाते.

फुप्फुस तंत्वात्मकता पुढील रोगांत उत्पन्न होऊ शकते : (१) संक्रमणजन्य रोग : क्षयरोग, चिरकारी श्वासनलिकाशोथ, फुप्फुसाचे ⇨कवकसंसर्ग रोग वगैरे. (२) व्यवसायजन्य कणीय फुप्फुस विकार उदा., सिकतामयता (दगडांची घडाई, धातूंचे ओतकाम, धातूंवरील घर्षणक्रिया यांसारख्या व्यवसायांत काम करणाऱ्या कामगारांच्या फुप्फुसात सिलिकेचे कण जाऊन उद्‌भवणारी विकृती). (३) हृदयाच्या डाव्या भागाची चिरकारी प्रकारची निष्फलता. (४) प्रारणजन्य तंत्वात्मकता : स्तनकर्क, मध्यावकाशातील कर्कार्बुद, ग्रसिका कर्क किंवा प्रत्यक्ष फुप्फुस कर्कावर ⇨प्रारण चिकित्सा केल्यामुळे प्रारणामुळे होणारी फुप्फुसाची तंत्वात्मकता. (५) कोलॅजेन रोग : ज्या रोगांमध्ये विशिष्ट स्थानी संयोजी ऊतकाची तंत्वात्मकता वाढते अशा रोगांचा गट उदा., चर्मकाठिण्य [⟶ कोलॅजेन रोग]. (६) ग्रंथिक रोग : त्वचा, फुप्फुस, अस्थी इ. ठिकाणी क्षय-पीटिकांशी सदृश अशा छोट्या छोट्या गाठी तयार होणारा रोग. (७) अज्ञान हेतुक : ज्यांचे कारण समजलेले नाही अशा काही विकृती उदा., चिरकारी प्रसृत आंतरकोशिकीय फुप्फुस तंत्वात्मकता.

फुप्फुस तंत्वात्मकतेवर लक्षणानुसार उपचार करतात. ज्या रोगामुळे तंत्वात्मकता उद्‌भवली असेल त्या मूळ रोगावरील इलाजाकडे लक्ष पुरवावे लागते. स्थानिक स्वरूपाच्या फुप्फुस तंत्वात्मकतेवर फुप्फुस क्रियाशीलतेस बाधा येणार नसल्यास शस्त्रक्रिया करून रोगट भाग काढून टाकता येतात.

  व्यवसायजन्य विकृती: व्यवसायजन्य फुप्फुस विकृतींची माहिती कामगार नुकसान भरपाई अधिनियमांप्रमाणे, निरनिराळ्या उद्योगांत गुंतलेल्या कामगारांच्या शारीरिक हानीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. श्वसन मार्गातून निरनिराळे बाह्य पदार्थ, कणीय किंवा बाष्परूपाने फुप्फुसात शिरून रोग उत्पन्न करतात. खनिज व कार्बनी (जैव) धूलिकण फुप्फुसात शिरून उत्पन्न होणाऱ्या विकृतींच्या गटाला ‘कणीय फुप्फुस विकार’ म्हणतात. कणांच्या प्रकारावरून त्यांना विशिष्ट नावे देण्यात आली आहेत. व्यवसायजन्य फुप्फुस रोगांची माहिती पुढील कोष्टकात दिली आहे. याखेरीज ‘व्यवसायजन्य रोग’ ही नोंदही पहावी.


व्यवसायजन्य फुप्फुस विकृती

कारण 

व्यवसाय 

रोग 

फुप्फुसातील विकृती 

(अ)खनिज धूलिकण 

१. सिलिका 

सोने खाणकाम, लोह व पोलाद उद्योग, धातूंवरील घर्षणक्रिया, दगडांची घडाई, मृत्पात्री उद्योग 

सिकतामयता 

स्थानिक आणि आंतरकोशिकीय तंत्वात्मकता, फुप्फुस वातस्फीती, प्रगामी विस्तृत तंत्वात्मकता. 

२. दगडी कोळशाचे          धूलिकण 

कोळसा खाणकाम 

कोळसा धूलिकणमयता 

,, 

३. ॲस्बेस्टस

अग्निरोधी व निरोधक वस्तूंचे उत्पादन 

ॲस्बेस्टस कणमयता 

ॲस्बेस्टस पिंड, आंतरकोशिकीय तंत्वात्मकता, श्वासनलिका कर्करोग, परिफुप्फुस मध्यस्तरार्बुद. 

४. लोह ऑक्साइड

विद्युत्‌ प्रज्योत वितळ जोडकाम 

लोहमयता 

फुप्फुसात फक्त कणसंचय होतो. 

५.कथिल डाय-ऑक्साइड 

कथिल खाणकाम 

कथिल कणमयता 

,, 

६. बेरिलियम 

विमान उत्पादन आणि अणुऊर्जानिर्मिती 

बेरिलियम कणमयता 

कणार्बुदे, आंतरकोशिकीय तंत्वात्मकता. 

(आ) कार्बनी धूलिकण 

१. कापूस, फ्लॅक्स, ताग 

कापड उद्योग 

फुप्फुस कापसिता 

तीव्र श्वासनलिकाशोथ, श्वासनलिका संकोच. 

२.बुरशीयुक्त गवतापासून वा धान्यापासून निघणारी कवकबीजुके, भूछत्रयुक्त कंपोस्ट, ऊसाची चिपाडे, पराग वगैरे 

शेती व तत्संबंधी उद्योग 

शेतकरी फुप्फुस, माल्ट कामगाराचे फुप्फुस इ. 

बाह्य अधिहृषताजन्य वायुकोशशोथ 

(इ) वायू व वाफारे 

१. क्षोभक वायू : अमोनिया, क्लोरीन, फॉस्जीन, सल्फर डाय-ऑक्साइड व ट्राय-ऑक्साइड

निरनिराळे उद्योग  

(बहुधा अपघातजन्य) 

—– 

तीव्र फुप्फुसशोथ 

२. टोल्यूइन डाय-आयसोसायनेट 

प्लॅस्टिक व रबर उद्योग 

—– 

दमा 

३. कॅडमियम 

वितळ जोडकाम, विद्युत्‌ विलेपन 

—– 

चिरकारी श्वासनलिकाशोथ आणि वातस्फीती 

[ॲस्बेस्टस पिंड-ॲस्बेस्टसाच्या सूक्ष्म तंतूंवर प्रथिनाचे आच्छादन होऊन तयार होणारा पदार्थ कणार्बुद-शोथयुक्त ऊतकात तयार होणारी कणयुक्त गाठ कवकबिजुक-बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचे प्रजोत्पादक घटक अधिहृषता-काही असात्म्य वा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया,ॲलर्जी].  

रक्तवाहिनी काठिण्य: या विकृतीत फुप्फुसातील रोहिणीच्या लहान शाखा व उपशाखा हळूहळू जाड व अरुंद होतात. रोहिण्यांच्या मध्यस्तरातील अरेखित स्नायूंची अतिवृद्धी होते व अंतःस्तराची तंत्वात्मकता वाढते. यामुळे त्यांची अवकाशिका अतिशय लहान होते व कधीकधी बंदही होते. परिणामी रक्तदाब वाढतो. या विकृतीला ‘प्राथमिक फुप्फुसांतर्गत रक्तदाबाधिक्य’ असेही म्हणतात. प्राथमिक स्वरूपाच्या या विकृतीचे कारण अजून समजलेले नाही. पुष्कळ वेळा ही विकृती फुप्फुस अंतर्कीलन, फुप्फुस तंत्वात्मकता, हृदयाच्या डाव्या बाजूची अकार्यक्षमता अशा विकृतींचा परिणाम म्हणून उत्पन्न होते म्हणजे ती दुय्यम असते. कोणत्याही कारणाने ही विकृती एकदा प्रस्थापित झाली म्हणजे फुप्फुस रोहिणिकांत वर उल्लेखिलेले बदल हळूहळू वाढत जातात, रक्तदाबाधिक्य वाढत जाऊन गंभीर फुप्फुसांतर्गत रक्तदाबाधिक्य तयार होते. रोहिणिका काठिण्य जेव्हा फुप्फुसभर पसरते तेव्हा त्यातील रक्ताभिसरणाचे प्रमाण कमी होते. रक्ताच्या ऑक्सिडीकरणाचे (ऑक्सिजनशी संयोग होण्याचे) प्रमाण कमी होते आणि कष्टश्वसन उद्‌भवते. फुप्फुसांतर्गत रक्तदाबाधिक्यामुळे हृदयाचे उजवे निलय अतिवृद्धीमुळे जाड होते. याला ‘फुप्फुसजन्य हृद्रोग’ म्हणतात.

फुप्फुसांतर्गत रक्तदाबाधिक्य टिकाऊ रूपात कमी करू शकेल असे औषध अजून सापडलेले नाही. रोगलक्षणे सुरू झाल्यापासून तीन ते चार वर्षांच्या काळात तीव्र अवसाद किंवा असाध्य उजवी हृद्‌निष्फलता यामुळे रोगी मरण पावतो. एखादाच रोगी बारा वर्षेपर्यंत जिवंत राहू शकतो परंतु वाढती विकलांगावस्था आणणारे कष्टश्वसन, उरःशूल (हृद्‌ स्नायूंना ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे छातीत तीव्र वेदना होणे), श्रमजन्य मूर्च्छा येणे यांसारखी लक्षणे सतत पाठपुरावा करतात.


कर्करोग: फुप्फुस कर्करोग दोन प्रकारचा असतो : (अ) प्राथमिक अथवा मूळातच फुप्फुस- ऊतकात सुरू होणारा आणि (आ) दुय्यम अथवा प्रतिक्षेपजन्य म्हणजे मूळ रोग अन्य ठिकाणी सुरू होऊन लसीकावाहिन्यांद्वारे फुप्फुस-ऊतकात फैलावणारा. [⟶ कर्करोग प्रतिक्षेप].

 (अ)प्राथमिक: या विकृतीचा उल्लेख श्वासनलिका कर्करोग असाही करतात. कारण त्याची सुरूवात श्वासनलिकेच्या अधिस्तर कोशिकांत होते.

प्राथमिक फुप्फुस कर्करोग ही विकृती १९२० सालापूर्वी क्वचित आढळणाऱ्या विकृतीत गणली जात होती. त्यानंतरच्या अर्ध्या शतकात तिच्या प्रमाणात सतत वाढ होत असल्याचे आढळले आहे. इंग्लंडमध्ये १९१६ मध्ये या विकृतीमुळे मृत झालेल्यांची संख्या केवळ १४६ होती. तीच १९५९ मध्ये ९,१०८ झाली व १९६२ मध्ये २६,००० पर्यंत वाढली. १९७४ मध्ये इंग्लंड आणि वेल्स मिळून ३३,०५७ व्यक्ती या रोगामुळे मरण पावल्या. ही सतत वाढती मृत्युसंख्या १९८० च्या पुढे प्रतिवर्षी ३५,००० ते ४०,००० पर्यंत जाईल, असे अनुमान आहे. या फरकाला निदानाच्या सुधारलेल्या पद्धती थोड्याफार कारणीभूत असाव्यात. परिस्थितीजन्य कारणे व जननिक बदल वाढत्या मृत्युसंख्येस कारणीभूत असावीत. परिस्थितिजन्य कारणे निश्चितपणे कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे परंतु जननिक कारणांबद्दल अजून अनिश्चिती आहे. भारतातही या रोगाचे प्रमाण सतत वाढत आहे. निदानाच्या कमी प्रगत सुविधा, मरणोत्तर शवपरीक्षांचा अभाव इ. कारणांमुळे भारतातील निश्चित मृत्युसंख्या देता येत नाही. निरनिराळ्या देशांतून फुप्फुस कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १९५१-५३ या काळात पुढीलप्रमाणे होते (आकडे दर हजारी) : इंग्लंड व वेल्स ०·६१७, फिनलंड ०·४१९. अमेरिकेची संयुक्त संस्थाने ०·२६३, ऑस्ट्रेलिया ०·२०४. 

पुरूषांतील फुप्फुस कर्करोगाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पाच पटींनी अधिक असते व सर्वसाधारणपणे ५० ते ७५ या वयोगटातील व्यक्तींत हा रोग आढळतो. याशिवाय मृत्युप्रमाण समाजातील कनिष्ठ (गरीब) वर्गात वरिष्ठ (श्रीमंत) वर्गांपेक्षा अधिक असते. शहरे व औद्योगिक क्षेत्रे यांमधील मृत्युप्रमाण ग्रामीण भागापेक्षा अधिक आढळले आहे.

रोगकारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (१) व्यवसायजन्य कारणे. कमीतकमी पुढील पाच उद्योगधंदे असे आहेत की, ज्यांमधील कामगारांत फुप्फुस कर्काचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक आढळते. (i) किरणोत्सर्गी धातुकांचे (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या कच्च्या रूपातील धातूंचे) खाणकाम : उदा., युरेनियम उत्पादन, जर्मनीतील श्नेबेर्क प्रांतात अशा खाणकामगारांतील फुप्फुस कर्करोगाला ‘श्नेबेर्क कर्करोग’ असेच नाव प्राप्त झाले आहे. (ii)ॲस्बेस्टस उद्योग :ॲस्बेस्टस कण व फुप्फुस कर्करोगाचा संबंध निश्चितपणे सिद्ध झालेला आहे. (iii) क्रोमेट उत्पादन. (iv) दगडी कोळशाचे ऊर्ध्वपातन : इंधनोपयोगी वायूच्या उत्पादनाकरिता दगडी कोळसा हवारहित अवस्थेत तापवून करण्यात येणारी ही कृती कर्कोत्पादक वाफारा फुप्फुसात शिरण्यास कारणीभूत होते. (v) आर्सेनिक उद्योग : आर्सेनिक कर्कोत्पादक असल्याचे मान्य झाले आहे.

(२) प्रारण उद्‌भासन : प्रारण चिकित्सा करताना रोग्यामध्ये फुप्फुस कर्करोग उत्पन्न होण्याचा धोका असतो. ज्या जपानी लोकांना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ९० रॅड [⟶ प्रारण जीवविज्ञान] आणवीय प्रारण उद्‌भासनाचा परिणाम भोगावा लागला होता, त्यांच्यामध्ये श्वासनलिका कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे आढळले आहे.

(३) वातावरणीय प्रदूषण :फुप्फुस कर्करोगामुळे ओढवणाऱ्या मोठमोठ्या शहरांतील मृत्युप्रमाणात निश्चित वाढ झाल्याचे आढळते. यावरून वायुप्रवाहगामी कर्कोत्पादक कण यास कारणीभूत असावेत. 


(४) धूम्रपान : सिगारेट  धूम्रपानाचा व फुप्फुस कर्करोगाचा निकटचा संबंध अनेक उपरुग्ण अभ्यासांवरून सिद्ध झालेला आहे. सिगारेट धूम्रपान करणाऱ्यांमध्ये या विकृतीचा धोका धूम्रपान न करणाऱ्यापेक्षा पन्नास पटींनी अधिक असतो. अनेक अभ्यासांच्या समीक्षणावरून तयार केलेल्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सच्या एका वृत्तांतानुसार ‘सिगारेट धूम्रपान हे अलीकडील फुप्फुस कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्युप्रमाणातील वाढीचे अधिक संभवनीय कारण आहे’. [⟶ धूम्रपान].

(५) इतर कारणे : पूर्वनिर्मित रोगजन्य फुप्फुस व्रण व तंत्वात्मकता कर्कोत्पादनास मदत करीत असावीत. याच कारणांमुळे पुष्कळ वेळा क्षयरोग बरा झालेल्या रोग्यास फुप्फुस कर्करोग उद्‌भवल्याचे आढळते. चिरकारी श्वासनलिकाशोथ, सिगारेट धूम्रपान व वातावरणीय प्रदूषण या सर्वांचा या विकृतीशी जवळचा संबंध आहे.

फुप्फुस कर्करोग सुरू झाल्याची अनेक कारणे असू शकतात. याकरिता वैद्याने या रोगाबद्दल विशेष जागरूक राहणे व लवकर निदान होणे फार महत्त्वाचे असते. खोकला, रक्तमिश्रित कफ, फुप्फुसशोथ (विशेषेकरून वारंवार उद्‌भवणारा फुप्फुसशोथ), छातीत दुखणे, वाढते कष्टश्वसन, मध्यावकाशीय अवयवासंबंधीची लक्षणे (उदा., स्वरयंत्र तंत्रिका विकृतीमुळे आवाज घोगरा बनणे किंवा मध्यपटल तंत्रिका विकृतीमुळे मध्यपटल वर उचललेले राहणे) यांपैकी कोणतेही लक्षण रोगाच्या सुरूवातीस असू शकते. हळूहळू या लक्षणांचे मिश्रण त्याच रोग्यात आढळते. फुप्फुस कर्करोगाची शंका येताच निदानाचे सर्व मार्ग अवलंबणे आवश्यक असते व रोग्यास त्याकरिता रूग्णालयात ठेवणे जरूर असते. किती लवकर निदान झाले त्यावर फलानुमान (रोगाच्या परिणामासंबंधीचे अनुमान) अवलंबून असते. भारतात बहुसंख्य रोगी रोग बराच वाढल्यानंतर म्हणजे उशीर झाल्यानंतर रूग्णालयात दाखल होतात.

उपचारामध्ये शक्य तेथे फुप्फुस खंडोच्छेदन किंवा फुप्फुसोच्छेदन शस्त्रक्रिया करतात. कधीकधी प्रारण चिकित्सा उपयुक्त ठरते.

(आ)दुय्यम अथवा प्रतिक्षेपजन्य: स्तन, जठरांत्र मार्ग (जठर, लहान आतडे व मोठे आतडे मिळून बनणारा अन्नमार्ग), अग्निपिंड (उदराच्या वरच्या भागात असलेली ग्रंथी), ग्रंथिल कर्कार्बुद अथवा ग्राव्हिट्‌झ अर्बुद (पॉल ग्राव्हिट्‌झ या विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारे वृक्काचे-मूत्रपिंडाचे-एक मारक अर्बुद), ⇨अष्टीला ग्रंथी, अस्थी, ⇨अवटू ग्रंथी, श्वासनलिका या ठिकाणी उद्‌भवणारी प्राथमिक कर्कार्बुदे फुप्फुसात प्रतिक्षेप उत्पन्न करतात. असे प्रतिक्षेप बहुधा मूळ रोगाच्या अंतिम अवस्थेत उत्पन्न होतात. यामुळे त्यांच्यावरील उपचार केवळ लक्षणानुरूप केल्याशिवाय गत्यंतर नसते.

पहा : श्वसन तंत्र.

संदर्भ : 1. Beeson P. B. McDermott, W., Ed., Textbook of Medicine, Tokyo, 1975.

          2. Datey, K. K. Shah, S. J. A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1971.

          3. Davidson, S. Macleod, J., Ed., The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

          4. Scott, R. B., Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, यं. त्र्यं.