मोरांगी घार

मोरांगी घार : फॅल्कॉनिडी कुलातील या पक्ष्याचे शास्त्रीय नाव हॅलिऑस्टर इंडस असून याला इंग्रजीत ब्राह्मणी काइट व हिंदीत ब्राह्मणी चील असे म्हणतात. भारतात सगळीकडे आणि हिमालयात १,८०० मी. उंचीपर्यत हा पक्षी आढळतो. याशिवाय पाकिस्तानचा काही भाग, बांगला देश, श्रीलंका, ब्रह्मदेश, चीन, मलाया आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशांतही याचे नित्य किंवा स्थलांतरित असे वास्तव्य असते. नद्या, ओढे, भातखाचरे, समुद्रकिनाऱ्यावरील मच्छिमारीची ठिकाणे यांच्या सान्निध्यात हे आढळतात. ओसाड प्रदेश व दाट जंगले यांत हा सहसा आढळत नाही. पावसाळ्यात हा देशांतर्गत जातो आणि जमिनीवर आढळणारे खेकडे व बेडूक पकडतो.

मोरांगी घार ही साधारणपणे साध्या घारीच्या आकाराची म्हणजे जवळपास ६० सेमी. लांब असते. हा ठळकपणे नजरेत भरणारा हिंस्त्र पक्षी आहे. डोक्याचा, मानेचा व छातीपासून पोटापर्यत पाढरा रंग व पाठ आणि शरीराचा इतर भाग भडक काळपट तांबड्या रंगाचा असतो. पूर्ण वाढ न झालेल्या पिलाचा रंग तपकिरी असतो. शेपटीचे टोक गोलसर व पांढुरके असते. चोच मोठी आणि निळसर असून तिच्या टोकावर आकडी असते. मेदूर (वरच्या जबड्यावर जेथे नाकपुड्या असतात तो मांसल भाग) पिवळट व पाय हिरवट पिवळे असतात. पायांवर तीक्ष्ण अशी नखे असतात. त्याचा उपयोग मासे, साप किंवा लहान प्राणी पकडण्यासाठी होतो. नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात. हे पक्षी एकएकटे हिंडणारे आहेत. मासे, खेकडे, बेडूक, लहान साप, टोळ हे यांचे खाद्य होय. ज्या ठिकाणी मासेमारी चालते व मोठ्या जहाजांतून उच्छिष्ठ अन्न फेकले जाते तेथेही हे आढळतात.

यांचा विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल हा आहे.यांचे घरटे काटक्यांचे बनविलेले असते व आत मऊ पानांचे अस्तर असते. ही घरटी पाण्यानजीक असलेल्या वड, पिंपळ यांसारख्या मोठ्या झाडांवर बांधली जातात. मादी भुरकट पांढऱ्या रंगाची दोन अंडी घालते. घरटे बांधण्यापासून अंडी उबविणे व पिलांचे संगोपन करणे ही कामे नर व मादी मिळून करतात.

कर्वे, ज. नी.