फुलटोच्या: सगळ्या फुलटोच्यांचा समावेश डायसीडी पक्षिकुलात होतो. भारतात याच्या पाच-सहा जाती आढळतात. यांपैकी टिकलचा फुलटोच्या ही सामान्य जाती भारतात सगळीकडे (पंजाब व राजस्थानातील रुक्ष प्रदेश सोडून) आढळते. हिचे शास्त्रीय नाव डायसीयम एरिथ्रोऱ्हिंकॉस असे आहे. 

टिकलचा फुलटोच्याचिमणीपेक्षाही लहान असणाऱ्या या पक्ष्याची लांबी सु. ८ सेंमी. असते वरची बाजू तपकिरी हिरव्या आणि खालची बाजू करड्या-पांढऱ्या रंगाची असते शेपटी गर्द तपकिरी चोच आखूड, सडपातळ, किंचित वाकडी आणि टोकदार असते. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. फळबागा, बागाईती, राई-विशेषतःआंबराई वगैरे ठिकाणी हा राहतो. हा पक्षी पूर्णपणे वृक्षवासी असून एकलकोंडा आहे.

फुलटोच्या दिसायला जरी क्षुद्र असला, तरी एका दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. याचे भक्ष्य बांडगुळांची फळे हे असल्यामुळे तो मोठ्या झाडावर वाढणाऱ्या लोरँथस, व्हिस्कम वगैरे वंशांतील बांडगुळांच्या झुडपांवर नेहमी असतो. बांडगुळांची पिकलेली फळे हा खातो. लागोपाठ चारपाच फळे खाल्ल्यावर तो उडून झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. फळांचे पचन अतिशय जलद होते. फळे खाल्ल्यापासून सु. दहा मिनिटांच्या आतच फळांच्या बिया विष्ठेतून बाहेर पडतात व झाडाच्या एखाद्या फांदीला चिकटतात. कालांतराने त्या जेथे चिकटल्या असतील तेथे रुजून झाडावर नवी बांडगुळे तयार होतात. अशा प्रकारे एकाच झाडाच्या निरनिराळ्या शाखांवरच नव्हे, तर वेगवेगळ्या झाडांवर या बांडगुळांचा प्रसार होतो.

फुलटोच्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून जूनपर्यंत असतो. घरटे ⇨ सूर्यपक्ष्याच्या घरट्यासारखेच पण लहान असून जमिनीपासून ३-१२ मी. उंचीवर झाडाच्या फांदीला टांगलेले असते. वनस्पतींच्या तंतूंपासून ते तयार केलेले असून बाहेरून कोळिष्टकाने आणि आतून मऊ पिसांनी मढविलेले असते. त्यात मादी दोन पांढरी अंडी घालते. घरटे तयार करणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे इ. कामे नर आणि मादी दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.