गंध : (वास). गंध व रुची हे रासायनिक उद्दीपनाने (उत्तेजित होण्यामुळे) ज्ञानेंद्रियास संवेदित करणारे ज्ञान-प्रकार होत. गंध आणि रुची या दोन्ही संज्ञा एकमेकींस साहाय्यक व पूरक असून त्यांच्यापासून ‘स्वाद’ हे ज्ञान उत्पन्न होऊ शकते [→ रुचि]. विशिष्ट कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) उत्पन्न होणाऱ्या संवेदनेमुळे पदार्थाचा ‘वास’ आल्याची संज्ञा होते, तिला ‘गंध’ म्हणतात. गंध हा प्रामुख्याने वायू अथवा बाष्प ह्याद्वारे गंधकोशिकेस उद्दीपित करतो. त्याचे प्रमाण अत्यल्प असले किंवा गंध निर्माण करणारा पदार्थ दूरवर असला, तरी गंधज्ञान होऊ शकते. अर्थात, जेव्हा अखेरीस तो गंधमय वायू बाष्पात वा श्लेष्म्यात (अस्तर त्वचेवर स्रवणाऱ्या चिकट पदार्थात) विरघळतो तेव्हाच गंधकोशिकेवरील लोम (केस) गंध ग्रहण करू शकतात व ही संवेदना लोमातून कोशिकेत आणि कोशिकेतून गंध तंत्रिकेद्वारे (गंधाची संवेदना वाहून नेणाऱ्या मज्जतंतूद्वारे) मेंदूस गेली म्हणजेच गंधज्ञान होऊ शकते. वर उल्लेखिलेल्या विशिष्ट कोशिका प्रगत प्राण्यांत नाकात असतात, म्हणूनच नाक हे ज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय आहे.

गंधसंज्ञेचा उपयोग भक्ष्यशोधन, शत्रूपासून संरक्षण, प्रियाराधन वगैरे कामांसाठी केला जातो. मुंग्या, मधमाश्यांत सामाजिक जीवनासाठी, तसेच लैंगिक वर्तनासाठी तिचा उपयोग होतो. उदा., काही कीटकांच्या नरमाद्या १ ते २ किमी. अंतरावरून गंधसंज्ञेच्या आधारे प्रियाराधनासाठी एकमेकांकडे आकर्षिल्या जातात. तसेच कुत्र्याने एकदा वास घेतला असता त्या वासाच्या अनुरोधाने तो बऱ्याच अंतरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून गुन्हेगाराच्या तपासात कुत्र्यांचा वापर केला जातो.

जलजीवी प्राण्यांत रुची व गंध हे भेद फारसे करता येत नाहीत. पण भूचर प्राण्यांत हे प्रकार स्पष्टपणे वेगळे असे आढळून येऊ शकतात. तसेच अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांतील पॅरामिशियम, समुद्रपुष्प इ. खालच्या स्तरावरील प्राण्यांत रुची व गंधाचे ज्ञान अलग अलग व फारसे प्रगत असे आढळत नाही. कीटकांत मात्र गंधज्ञान चांगले असून (उदा., पतंग) त्यात प्रामुख्याने शृंगिका (सांधे असलेले लांब स्पर्शेंद्रिय) व सर्वसाधारणपणे मुखांगे (तोंडाचे भाग) गंधग्राही असतात. मधमाश्यांत छिद्रपट्टिका असतात तर भुंगेरे, ड्रॉसोफिला माशी, घरमाशीचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील असणारी पूर्व अवस्था) किंवा अन्य कीटकांत बोथट टोके असलेले केस, लहान खुंटीसारखे केस किंवा त्यांच्यापासून तयार झालेले अनुजात भाग व चपट्या पट्टिका गंधग्राही असतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यात गंधग्राही कोशिकांच्या कार्यात बरीच प्रगती झालेली आढळते. तसेच त्यांत गंधांगांचा व तसतसा मेंदूच्या संबंधित भागांचाही क्रमविकास (उत्क्रांती) झालेला आढळतो. अँफिऑक्सस ह्या प्राण्यात गंधवाही खात (खाच) असते, तर पेट्रोमायझॉनामध्ये कोष असतो. माशांत दोन कोष असतात व काहींत त्यांखेरीज स्पृशाही (एका जबड्यापासून निघालेली बोटाच्या आकाराची स्पर्शेंद्रियेही) असतात. विशेषतः उपास्थिमिनांत (ज्यांचा सांगाडा उपास्थींचा म्हणजे कूर्चेचा बनलेला असतो अशा माशांत) गंधज्ञान खूपत प्रगत असते. उभयचरांत (पाण्यात व जमिनीवर राहू शकणाऱ्या प्राण्यांत) व सरीसृपांत (सरपटणाऱ्या प्राण्यांत) गंधकोष्ठ असून त्यांखेरीज अन्नाचा स्वाद घेण्यासाठी याकॉपसन अंग म्हणून मुखात उघडणारी दोन धानीसारखी (पिशवीसारखी) अंगे कमीजास्त प्रमाणात वाढलेली असतात. पक्ष्यांतील गंधेंद्रियांची वाढ एवढी चांगली झालेली नसते. सस्तन प्राण्यांतील गंधेंद्रिये चांगलीच कार्यक्षम असतात. कुत्रा, मांजर, हरीण, डुक्कर इत्यांदीत माणसाच्या मानाने गंधज्ञान अधिक प्रखर असते.

आ. १. नाकाच्या मधल्या पडद्यातील उजव्या बाजूच्या गंध तंत्रिका शाखा व गंधवाही क्षेत्र.

माणसाचे गंधेंद्रिय : नाकाच्या आतल्या श्लेष्मकलेच्या (बुळबुळीत अस्तर त्वचेच्या) सर्वांत ऊर्ध्व भागातील अगदी लहान अशा क्षेत्रातील विशिष्ट कोशिकांचे उद्दीपन झाले म्हणजे तेथे संवेदना उत्नन्न होते. या क्षेत्राला ‘गंधवाही क्षेत्र’ असे नाव असून दोन्ही नाकपुड्यांमध्ये मिळून हे गंधवाही क्षेत्र अवघे ५०० चौ.मिमी. एवढेच असते. काही प्राण्यांत (उदा., कुत्रा, मांजर) नाकाच्या मधल्या पडद्यावर अग्रभागी आणखी एक साहाय्यक गंधवाही क्षेत्र असते. या क्षेत्राचा रंग पिवळट असून त्या क्षेत्रात गंधामुळे उद्दीपित होणाऱ्या ‘गंधकोशिका’ असतात. या कोशिकांच्या श्लेष्मकलेवरील टोकाशी अगदी सूक्ष्म असे लोम असतात. हे लोम श्लेष्मकलेच्या पृष्ठभागाच्या बाहेर आल्यासारखे असतात. 

गंधोत्पादक पदार्थाचा सूक्ष्म प्रमाणात व रेणुस्वरूपात या लोमाशी संपर्क झाला म्हणजे गंधकोशिका उद्दीपित होतात आणि त्या कोशिकांमध्ये संवेदना उत्पन्न होऊन गंधकोशिकांच्या अक्षदंडाच्या (मधल्या संवेदनावाहक भागाच्या) मार्गाने त्या संवेदना गंध तंत्रिकेच्या शाखांत प्रवेश करतात. अशा एकूण १५ ते २० शाखा असून त्या तितवास्थीच्या (नाकाच्या मधल्या पडद्याच्या वरच्या टोकास असलेल्या हाडाच्या) सुषिरयुक्त (स्पंजासारख्या) पट्टीतील सूक्ष्मछिद्रांतून कवटीत प्रवेश करतात. तेथे गंधकंदातील (गंधकोशिकांच्या कंदासारख्या विस्तारातील) दुसऱ्या कोशिकांभोवती गंधकोशिकांच्या अक्षदंडाचे संधिस्थान होते. या दुसऱ्या कोशिकांच्या अक्षदंडातून गंधसंवेदना मेंदूमधील गंधकेंद्रात पोहोचते व तेथे त्या संवेदनेचे पृथक्करण होऊन गंधाची जाणीव होते.

नाकातील गंधवाही क्षेत्रात तीन प्रकारच्या कोशिका असतात.

आ.२. डाव्या बाजूचे चित्र, गंध उपकला आणि गंध तंत्रिका तंतूंचे संबंध दाखविणारि रेखाकृती : (१) गंधमार्ग, (२) किरीट-कोशिका, (३) संधिस्थान, (४) सुषिरयुक्त पट्टी, (५) गंध तंत्रिका, (६) गंध उपकला, (७) गंध उपकलेतील कोशिका. उजव्या बाजूचे चित्र, यात कोशिका. उजव्या बाजूचे चित्र. यात कोशिका मोठया दाखविल्या आहेत (अ) आधार-कोशिका, (आ) गंधग्राही कोशिका, (इ) आधार-कोशिका.

(१) गंधकोशिका : या कोशिका लांब, तर्कूच्या (विटीच्या) आकाराच्या, द्विध्रुवी असून त्यांच्या मध्यभागी लंबगोलाकार केंद्रक (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल पुंज) असते. त्याच्या मोकळ्या टोकापाशी कोशिकाद्रव्यात ५–७ कण असून त्या प्रत्येक कणापासून एक सूक्ष्म लोम निघून श्लेष्मकलेच्या पृष्ठभागाबाहेर आलेला असतो. हे लोम म्हणजे गंधवाही तंत्रिकेची ग्राहक (संवेदनाक्षम केंद्रे) होत.

(२) आधार-कोशिका : या कोशिका उंच स्तंभाकार असून त्यांच्या कोशिकाद्रव्यात सोनेरी रंगाचे कण असतात त्या कणांमुळेच गंधवाही क्षेत्र पिंगट दिसते. आधार-कोशिकांच्या मध्यभागी लंबगोलाकार केंद्रक असून या कोशिकांमुळे गंधकोशिकांना आधार मिळतो. 

(३) किरीट-कोशिका : श्लेष्मकलेच्या तळापाशी बैठ्या त्रिकोणाकृती कोशिका असून त्यांच्यापासून आधार-कोशिकांची उत्पत्ती होते त्यांना ‘किरीट-कोशिका’ म्हणतात.

यांशिवाय अधःश्लेष्मकलेमध्ये बोमन ग्रंथी (बोमन यांनी शोधून काढलेल्या ग्रंथी) या नावाच्या स्रावी असून त्यांच्यात उत्पन्न होणारा पातळ स्राव सर्व गंधवाही क्षेत्रावर पसरलेला असतो. या स्रावात विरघळलेल्या पदार्थामुळेच गंधकोशिकांच्या लोमांचे उद्दीपन होते. पाण्यात आणि वसेत (स्निग्ध पदार्थात) विद्राव्य (विरघळणाऱ्या) पदार्थाचा गंध अधिक लवकर जाणवतो कारण बोमन ग्रंथीच्या स्रावात ते पदार्थ सुलभतेने विद्राव्य असतात.


गंधोत्पादक पदार्थ अतिशय सूक्ष्म प्रमाणात हवेमध्ये असले, तरी गंधकोशिका त्यांच्यामुळे उद्दीपित होतात. रुचिकोशिकांपेक्षा गंधकोशिका अनेकपटींनी उद्दीपनक्षम असतात. एक लिटर हवेमध्ये एक अब्जांश मिग्रॅ. इतक्या सूक्ष्म प्रमाणात असलेल्या पदार्थाच्या गंधाची जाणीव होऊ शकते.

एकाच पदार्थाचा वास सारखाच येत राहिला, तर काही काळाने त्या वासाची जाणीव कमी होत जाते. गंधसंज्ञेचे मूलभूत प्रकार अजून निश्चितपणे सांगता आलेले नाहीत. निरनिराळ्या लोकांनी त्यांचे निरनिराळे वर्गीकरण केलेले आहे. साधारणपणे खालील प्रकार मानण्यात येतात. 

(१) फलीय : फळे, ईथर. (२) पुष्पीय : फुले व फुलांचा अर्क, कृत्रिम सुगंधी द्रव्ये. (३) परिमली : कापूर, लवंग, कडू बदाम. (४) कस्तुरीय : अंबर, कस्तुरी. (५) लशुनीय : लसूण, कांदा, गंधक. (६) प्राणिशरीरोद्‌भव : घाम. (७) दुर्गंधी : ढेकूण. (८) किळसोत्पादक : मैला, कुजलेले मांस, कचरा वगैरे. (९) ज्वलनोद्‌भव : पिसे, तंबाखू, कापूस वगैरे जळताना.

निरनिराळ्या प्रकारच्या गंधांमधील फरक कसा ओळखला जातो, यासंबंधीची क्रिया अद्याप निश्चित समजलेली नाही. तसेच निरनिराळ्या व्यक्तींमध्ये काही प्रकारचे ओळखण्याचे प्रमाणही निरनिराळे आढळते.

जन्मतः वास न येणाऱ्या व्यक्ती क्वचितच असतात. पडसे, कर्णशोथ वगैरे रोगांत किंवा कवटीच्या तळाचा अस्थिभंग होऊन गंध तंत्रिका तुटल्यावर वास येणे बंद होते. अपस्मारात झटका येण्यापूर्वी विशिष्ट वास येतो, तर उन्मादात विकृत वास येतो.

संदर्भ : 1. Gorman, W. Flavour, Taste and the psychology of Smell, Springfield, 1964.

           2. Wright, R. H. The Science of Smell, New York, 1964.

ढमढेरे, वा. रा. परांजपे, स. य.