राजा राममोहन रॉयरॉय, राजा राममोहन : (२२ मे १७७२−२७ सप्टेंबर १८३३). आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. कृष्णचंद्र बंदोपाध्याय हे त्यांचे प्रतितामह बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने ‘राय’ ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली. त्यांचे पितामह ब्रजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली. रामकांत रॉय यांच्या कुळात वैष्णव संप्रदात होते. राममोहनांची माता तारिणीदेवी यांचे माहेर राममोहन रॉय याचे पिता आणि पितामह हे परमधार्मिक होते. घरात देवपूजा आणि भागवताचे पठण नित्य चालत होते. राममोहन यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले. कुराणाचाही त्यांनी अभ्यास केला. मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी, फार्सी पांडित्याने विस्मित होत. इस्लाम धर्मातील आणि सूफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून मातापित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांची वाराणसीला रवाना केले. श्रुतिस्मृती-पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास त्यांनी केला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले. त्या वेळी तुलमात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे. कारण एकच अद्वितीय परमेश्वर आहे. त्यांनी आपले मूर्तिपूजाविरोधी विचार आपल्या पित्याला व मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माता पिता आणि राममोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला. त्यांची मातापित्यावर श्रद्धा होती आणि विलक्षण भक्तीही होती. मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. हिंदू समाज रचनेतील उच्चनीच जातिभेदही त्यांना अमान्य होता. त्यांनी भारतभर प्रवास केला. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला त्यासाठी तिबेटात गेले. तिबेटात प्रतिमापूजन, धर्मगुरुपूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा त्यांना दिसला. त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले. तेथील बौद्ध लोक चिडले. राममोहनांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. या वेळी सुदैवाने दयाळू स्त्रियांनी त्यांना प्राणसंकटातून वाचविले आणि स्वदेशी सुरक्षितपणे पोहोचविले. १९७० मध्ये स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता परंतु मातापित्यांची त्यांनी निराशा केली. त्यांची मूर्तिपूजाविरोधी व बहुदेवतावादविरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती. भोवतालच्या सामाज सनातनी व रूढिनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. पिताजींनी त्यांना घराबाहेर काढले.

तत्कालीन रीतीला अनुसरुन राममोहनांचे बालपणीच पहिले लग्न झाले होते. प्रथम पत्नीच लवकरच निवर्तल्यामुळे वडिलांनी १७८१ व १७८२ साली त्यांची दोन लग्ने लावून दिली. १८०० साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नाव राधाप्रसाद असे ठेवले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही त्यांना सरकारी नोकरी पतकारावी लागली. १८०३ मध्ये डाक्का येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ड याचे दिवाणपद स्वीकारले. त्याच वेळी रामकांत रॉय निवर्तले. याच सुमारास राममोहनांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली. फार्सी भाषेत त्यांनी ‘ईश्वरभक्तांस देणगी’ (तुहफास-उल्-मुवहिद्दीन) या अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध प्रसिद्ध केला. त्याचे सार असे-सृष्टिकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्वर आहे. हा सिद्धांत सर्व धर्माचा पाया होय. निरनिराळ्या धर्माच्या लोकांनी या धर्मतत्त्वावर भलभलत्या कल्पनांचा डोलारा चढवला त्यामुळे भिन्नभिन्न धर्मसंप्रदाय अस्तित्वात आले. धर्माचे खरे मूलभूत तत्त्व ठरविण्याकरिता खऱ्याखोट्याचा ऊहापोह केला पाहिजे.

               

रामगड जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार डिग्बी यांच्याशी १८०५ साली त्यांची मैत्री जमली. त्या वेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक हांजीहांजी करीत, गुलामासारखे वागत. राममोहन अनेक वरिष्ठ पदस्थ इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नोकरीत राहिले परंतु स्वतःच्या अंगच्या गुणांच्या बळावरच ते चढत गेले. डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. इंग्रजीत भाषण, लेखन ते उत्कृष्टपणे करू लागले. बायबलचा व अनेक विषयांतील ग्रंथांचा व्यासंग त्यांनी सुरू ठेवला.

               

राममोहनांनी १८१० साली सरकार नोकरी सोडली व रंगपूरच्या जवळ माहीगंज येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले. तेथे लोकांना पाण्याची सोय व्हावी स्वखर्चाने एक तळेही बांधले. तेथे सुशिक्षित मंडळीबरोबर धर्मचर्चा सत्र सुरू केले. या मंडळींमध्ये विविध धर्मपंथांचे लोक भाग घेत. मूर्तिपूजेचा ऊहापोह विशेष होऊ लागला कारण हिंदू धर्मात अगणित धर्मसंप्रदाय असले, तरी मूर्तीपूजा सर्वमान्य आहे. त्यामुळे मूर्तिपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक होते. मूर्तिपूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी ज्ञानचंद्रिका हे पुस्तक लिहिले. ही सनातनी मंडली मतभेदांमुळे राममोहनांना विविध प्रकारे छळू लागली. पत्नी व मुले यांच्यासह गावात राहणे कठीण होऊ लागले. राममोहन यांनी राधानगराजवळ रघुनाथापूर येथे नवे घर बांधले. या घरासमोर त्यांनी ईश्वरोपासनेकरता एक वेदी उभारली. या घरातच त्यांच्या रामप्रसादनामक दुसऱ्या पत्राचा जन्म झाला. धार्मिक-मौलिक मतभेदांमुळे त्यांच्या मातेशी त्यांचे वितुष्ट आले. धाकटी दोन भावंडे मृत्यू पावली, म्हणून मातेच्या सांत्वनासाठी तिच्या भेटीला ते गेले. तशाही स्थितीत मातेने भेट घेण्याचे नाकारले. या घटनेने त्यांना फार दुःख झाले. तिच्या हट्टाकरिता कुलदेव राधागोविंद याच्या मूर्तीपुढे साष्टांग नमस्कार घातला व म्हटले, की ‘मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार करतो’.

               

राममोहन १८१४ साली कलकत्त्याला स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आरंभी ‘आत्मीय सभा’ सुरू करून तीत भिन्नभिन्न विषयांवर चर्चा सुरू झाल्या. वेदान्तसूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रसृत केली. सतीप्रथेकरता धर्मशास्त्राचे आलोडन केले. जेथेजेथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदुधर्मविरोधी मानू लागला. १८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले, की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला.

               

ख्रिस्ती धर्मप्रसारक व पाद्री हे हिंदू धर्मावर जबरदस्त टीका करीत. त्यांच्याशी साधार चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन राममोहनांनी केले. कारण मूळ बायबल हिब्रू व ग्रीक भाषांत लिहिले आहे. हिंदू पंडितांना वाटले, की राममोहन ख्रिस्ती होणार परंतु लवकरच हिंदूंचा भ्रमनिरास झाला. १८२० साली राममोहनांनी द प्रिसेप्टस ऑफ जीझस, द गाइड टू पीस अँड हॅपिनेस (येशूच्या आज्ञा, शांती व सुखाचा मार्ग) या नावाने ७० पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. १८८१ साली नव्या करारातील चारही शुभवर्तमानांचे बंगालीत भाषांतर केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारावर व उपद्रव्यापांवर जोराचा हल्ला केला. ४ डिसेंबर १८२१ रोजी संवादकौमुदी नामक एक साप्ताहिक बंगालीत सुरू केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयक प्रश्नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा ऊहापोह करणारे भारतीयाने सुरू केलेले हे पहिले नियतकालिक होय. भारतीय वृत्तपत्रव्यवसायाचा हा शुभारंभ होय. १८२२ साली मिरात-उल्-अखबार हे फार्सी साप्ताहिकही सुरू केले. यामधील भाषा आणि व्चार अतिशय प्रखर होते. याचवेळी सरकारने हुकूम काढला, की गव्हर्नर जनरलच्या परवान्याशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये. हा हुकूम म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरील पहिले गंडांतर होय. राममोहनांना विस्मय वाटला व रागही आला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी सरकारदरबारी त्यांनी बराच काळ झगडा चालू ठेवला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी झगडत असताना त्यांनी शिक्षणषयक प्रश्नाला हात घातला.

               


याच वर्षी सरकारी शिक्षणखाते स्थापन झाले व कलकत्ता येथे शिक्षणखात्यातील मंडळींनी ही गोष्ट अमान्य झाली. भारताचा भाग्येदय होण्यास व पुढारलेल्या अन्य राष्ट्रांबरोबरीचा दर्जा भारतास प्राप्त होण्यास भारतीयांना आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. नुसत्या परंपरागत संस्कृत शिक्षणाने आजच्या नवीन ज्ञानाचा जो महान विस्तार झाला आहे., त्यापासून भारतीय लोक वंचित राहणार हे पाहून त्यांनी निक्षून सांगितले, की भौतिकी, रसायन, तंत्रज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र इ. विद्यांचे शिक्षण भारतीयांना देणारी विद्यालयेच स्थापन करणे आवश्यक आहे. त्यांनी संस्कृत महाविद्यालयाला विरोध केला, तरी स्वखर्चाने वेदान्त महाविद्यालयाची स्थापना केली (१८२५). १८२४ मध्ये बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इ. अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांच्या वेदान्त ग्रंथ (१८१५) ह्या स्वतंत्र ग्रंथामुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. बंगाली गद्याचे ते जनक मानले जातात. बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून गौडीय व्याकरण (१८३३) हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले.

               

आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्म समाजाची (ब्राह्मो समाजाची) स्थापना केली. कलकत्ता येथे राममोहनांनी रामचंद्रविद्यावागीष, उत्सवानंदविद्यावागीष, ताराचंद्र चक्रवर्ती इ. सहकाऱ्यांबरोबर ब्राह्मसमाजाची पद्धतीने उपासनेला प्रारंभ केला. या नवविचारप्रणालीची यथोचित कल्पना देणारे सार्वत्रिक धर्मनामक पुस्तक लिहिले. त्यात मूळ सिद्धांत असा सांगितला, की ईश्वर पूजा म्हणजे ईश्वराच्या गुणांचे चिंतन. तो अतर्क्य व अवर्णनीय आहे. सृष्टिक्रमावरून त्याचे आकलन होते. ज्या वेळी मन शांत असेल, त्या वेळी चांगल्या जागी, चांगल्या वेळी त्याची पूजा करावी.

               

दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्याकरता, त्याचप्रमाणे संतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून १९ नोव्हेंबर १८३० या दिवशी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खुष होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटला. त्यांच्या सभासमारंभातील भाषणांनी व चर्चा संवादांनी भारताचा प्रतिमा त्यांनी उजळून टाकली. याच वेळी ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर व इतर सहकार्यांयनी कार्नोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली.

               

ब्राह्म समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्याहत्या, बालविवाह, बाला-वृद्धविवाह इ. अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरूषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. सुंदर, भव्य, विद्वान, त्यागी व तपस्वी असा हा पुरूष इंग्रजी राज्याच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आला.

पहा : ब्राह्मो समाज.

संदर्भ : 1. Ball. U. N. Rommohan Roy: A Study of His Life, Works and Thoughts, Calcutta, 1933.

            2. Chakravarti, S. C. Ed. Rammohan Roy: The Father of Modern India, Calcutta, 1935.

            3. Karunakaran, K. P. Religion and Political Awaking In India, Delhi, 1965.

            4. Majumdar. J. K. Raja Rammohan Roy and Progressive Movements, Calcutta, 1941.

            5. Tagore, Saumyendranath, Raja Rammohan Roy, New Delhi, 1966.

            ६. ब्रह्म समाज,पटना, राजा राममोहन रॉय, पटना, १९७२.

                                                                                जोशी, लक्ष्मणशास्त्री