ॲड्रियन, एडगर डग्‍लस : (३० नोव्हेंबर १८८९– ). इंग्रज शरीरक्रियावैज्ञानिक. १९३२ सालच्या शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक या विषयांच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे शिक्षण वेस्टमिन्स्टर शाळा व केंब्रिजचे ट्रिनिटी कॉलेज येथे होऊन १९१५ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांचे सर्व कार्य केंब्रिज येथेच झाले. ते १९२९–३७ या काळात रॉयल सोसायटीमध्ये फाउलरटन संशोधक प्राध्यापक व १९३७–५१ या काळात केंब्रिजमध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९५१ मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजचे प्रमुख झाले. १९४२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ ही उच्च पदवी त्यांना देण्यात आली व १९५० मध्ये ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले. १९५५ मध्ये त्यांना ‘बॅरन’ (सरदार) करण्यात आले.

त्यांचे मुख्य संशोधन तंत्रिका (मज्जातंतू) संवेदना व तंत्रिकाकार्याची यंत्रणा या विषयांवर झाले. संवेदना तंत्रिकामार्गाने जात असता तिच्या विद्युत् वर्चसात (विद्युत् स्थितीत) फरक पडतो व त्यावरून तंत्रिकामार्गे जाणाऱ्या संवेदना व प्रेरणा यांचा विशेष अभ्यास करता येतो, हे त्यांनी सिद्ध केले. या संशोधनाबद्दल त्यांना १९३२ चे नोबेल पारितोषिक सर चार्लस शेरिंग्टन यांच्याबरोबर विभागून मिळाले.

त्यांनी १९३४ पासून मेंदूमधील विजेच्या वहनाबद्दल संशोधन केले. त्यामुळे ⇨अपस्मारासारख्या रोगांसंबंधी अधिक संशोधन शक्य झाले.

कानिटकर, वा. मो.