कलिकर, रुडोल्फ आलबेर्ट फोन : (६ जुलै १८१७ — २ नोव्हेंबर १९०५). स्विस भ्रूणवैज्ञानिक आणि ऊतकवैज्ञानिक. यांचा जन्म झुरिक येथे झाला. त्यांचे शिक्षण झुरिक, बॉन आणि बर्लिन येथे झाले. १८४३ मध्ये ते झुरिक येथे शरीरक्रियाविज्ञान (शरीरातील क्रिया व कार्य कसे चालते यांच्या अभ्यासाचे शास्त्र) आणि तुलनात्मक शारीर (शरीररचनाशास्त्र) या विषयांचे प्राध्यापक झाले. १८४७ मध्ये त्याच विषयांचे प्राध्यापक म्हणून वुर्झबेर्ग येथे त्यांची नेमणूक झाली.

प्राण्यांच्या ऊतकांवरील (समान रचना व कार्य असणार्‍या पेशींच्या समूहांवरील) त्यांच्या संशोधनाने भ्रूणविज्ञान व ऊतकविज्ञान या दोन्ही विज्ञानांच्या प्रगतीला महत्त्वाची मदत झाली. सेफॅलोपॉडांचा विकास, अरेखित स्नायूंची (अनैच्छिक स्नायूंची) संरचना, रक्तातील तांबड्या कोशिकांचा (पेशींचा) विकास व विभेदन, विकासात जनन-स्तराचे (सुरुवातीचा भ्रूण ज्या कोशिकांचा झालेला असतो अशा कोशिकांच्या तीन थरांपैकी एका थराचे) महत्त्व इ. विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. १८४१ मध्ये त्यांनी शुक्राणूंचे खरे स्वरूप सप्रमाण विशद करून ते परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे) आहेत या जुन्या मताचे खंडन केले. तंत्रिका (मज्जातंतू) कोशिका सिद्धांताला पुष्टी देणारा महत्त्वाचा पुरावा त्यांनी पुढे मांडला. Handbuch der Gewebelehre des Menschen (१८५२) हा त्यांचा ग्रंथ ऊतकविज्ञानासंबंधी प्रसिद्ध झालेले पहिलेच पाठ्यपुस्तक होय. Entwicklungsgeschichte der Cephalopoden (१८४४) आणि Entwicklungsgeschichte des Menschen und der hoheren Tiere (१८६१) हे महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले.

कलिकर यांना क्रमविकासाची (उत्क्रांतीची) कल्पना मान्य होती पण चार्ल‌्स डार्विन यांच्या ⇨नैसर्गिक निवडीच्या उपपत्तीविषयी त्यांचा दृष्टिकोन अतिशय चिकित्सक असा होता. १९०० साली Erinnerungen हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. ते वुर्झबेर्ग येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.