प्राणिसममिति: प्राण्यांच्या अभ्यासात विशेषतः त्यांच्या आकारांचा (आकृतीचा) विचार करताना त्यामध्ये शरीररचनात्मक दृष्ट्या अनेक प्रकार आढळतात. अशा प्रकारांचे जरा सखोल परीक्षण केल्यास प्राण्यांत काही भूमितीय आकृतिबंधांवर आधारलेली संरचना असल्याचे दिसून येते. प्राण्यातील अशा तत्त्वावर आधारलेल्या भूमितीय संरचनेस प्राणिसममिती म्हणतात. अर्थात, ही सममिती कधीही आदर्श भूमितीय संरचना अशी नसते पण आदर्शाशी बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती असते. प्राणिसममितीच्या प्रचलित संकल्पनेचा उगम मुख्यत्वे ई. एच्. हेकेल (१८३४– १९१९) यांच्या विचारातून झाला, तर सममितीच्या आधारे काही प्राणिसंघांचे वर्गीकरण ही झॉर्झ क्यूव्ह्ये (१७६९–१८३२) ह्या फ्रेंच शास्त्रज्ञांनी फार पूर्वी मांडलेली कल्पना आजही वापरली जाते (उदा., रेडिॲटा, बायलॅटेरिया).

 

सममितीचा संबंध मूलतः जीवद्रव्याच्या (ज्यामुळे जीवनाचा आविष्कार अनुभवास येतो त्या मूलभूत सजीव द्रव्याच्या) अनेक जैव गुणधर्मांपैकी संगठन (संघटन) ह्या गुणधर्माशी आहे. संगठनाचे निश्चित स्वरूप काय आहे, ते कसे होते ह्यांविषयी आजही जरी पूर्ण अशी कल्पना नसली, तरी त्यामध्ये त्रिमितीय रचना किंवा संरचनेचा अंतर्भाव असतो व प्रभेदन (कार्यविभागणीनुसार निरनिराळे भेद किंवा फरक होणे) ह्या दृश्य परिणामामुळे त्यामधून शेवटी कार्यानुसार रचना असलेली इंद्रिये (अवयव, भाग) तयार होतात आणि अशा भागांमध्ये सममिती आढळते.

 

सममितीची उत्पत्ती कशी झाली ह्यासंबंधी निश्चित असे स्पष्टीकरण नाही. तथापि ती अनुकूलनाशी [बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शरीरात होणाऱ्या फरकाशी ⟶ अनुकूलन] संबंधित असावी किंबहुना अनुकूलनाचा सममिती हा एक प्रकार असावा, असे आढळून येते. कारण हवा व पाणी ह्या माध्यमांत हालचालीस कमीत कमी प्रतिरोध होऊन तिची कार्यक्षमता वाढावी, अन्न मिळविण्यासाठी हालचाल करता यावी, प्राण्याची आकृती सुसंघटित असावी व अशा आकृतीमुळे त्याचा किमान पृष्ठभाग माध्यमाच्या सान्निध्यात यावा, अशा अनेक दृष्टींनी प्राण्यांची संरचना विकसित झालेली असते व पर्यायाने तसतशी सममितीही आढळते. तात्पर्य, सममिती जशी प्राण्याच्या अनुकूलनाचा एक प्रकार आहे, तशीच ती प्राण्याच्या वास्तुशिल्पात्मक संरचनेचाही एक भाग आहे.

 

प्रकार: प्राणिसममितीचे चार प्रमुख प्रकार पडतात : गोलीय, अरीय (त्रिज्यीय), द्विपार्श्व आणि असममित.

 

आ. १. गोलीय सममितीगोलीयसममिती: या सममितीत एक सममित केंद्र (मध्य) असून त्यास भेदून जाणारे प्रत्येक प्रतल शरीराचे सममित भाग करते. शरीर गोल असून त्याच्या भागांची रचना समकेंद्री असते किंवा ते भाग (उदा., सिलिकामय कंटिका) केंद्रापासून विकिरण होणारे असतात [आ. १ (अ)]. प्रोटोझोआंपैकी (आदिजीव संघ) सार्कोडिना वर्गाच्या हीलिओझोआ [आ. १ (आ)] व रेडिओलॅरिया [आ. १ (इ)] या गणांतील प्राण्यांत गोलीय सममिती आढळते.

 

अरीयसममिती : ही मुख्यत्वे सीलेंटेरेटा (आंतरगुही संघ) व एकायनोडर्माटा या संघांतील प्राण्यांत आढळते. प्राणी सर्वसाधारणपणे लांब किंवा आखूड दंडगोलाप्रमाणे असतो. त्यातील मुख्य अक्ष (आस) मुख-अपमुख प्रकारचा म्हणजेच अग्रपश्च अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) किंवा लंबाक्ष प्रकारचा असून त्यास छेदणारे प्रत्येक प्रतल शरीराचे समान भागांत विभाजन करते [आ. २ (अ)]. अशा अनेक प्रतलांमुळे एकाच वेळी शरीराचे अनेक समान भाग पडतात व त्यांना अँटिमीअर्स म्हणतात [उदा., तारामिनातील पाच बाहू आ. २ (आ)]. काही अरीय सममित प्राण्यांत (उदा., जेलीफिश) सर्व त्रिज्या मध्यबिंदूपासून परिधीपर्यंत जातात [आ. २ (इ)]. त्यातील सममित त्रिज्या आणि अशा त्रिज्यांमधील भागास निरनिराळ्या संज्ञा वापरल्या जातात व त्यांच्या अनुषंगाने विशिष्ट इंद्रिये किंवा भाग असतात.

 

आ. २. अरीय सममिती : (अ) सममिती अक्ष : (१) मुख, (२) अपमुख, (३) मुख-अपमुख अक्ष, (४) अरीय प्रतल (आ) पंचभागी अरीय सममिती : तारामिनातील सममिती पाच बाहू (इ) चतुर्भागी अरीय सममिती : परस्परांना लंब असलेल्या कोणत्याही दोन व्यासांवर छेद घेतल्यास मिळणारे अर्धभाग समरूप असतात (ई) द्वि-अर सममिती : (१) मध्य अक्ष, (२) अनुप्रस्थ अक्ष.द्वि-अर सममिती : अरीय सममितीपासून थोड्याफार फरकाने निर्माण झालेला एक सममितीचा प्रकार असून त्यास द्वि-अर सममिती म्हणतात. यात अनुदैर्घ्य, मध्य (मध्य-अग्रपश्च) व अनुप्रस्थ (आडवा) असे सममितीचे तीन अक्ष असतात. पैकी मध्य अक्ष इतरांहून भिन्न असतो. तसेच अनुप्रस्थ अक्ष (मध्य अक्षाशी काटकोन करणारा व्यास) हा इतरांप्रमाणे किंवा भिन्न असू शकतो. ह्या प्रकारात सममितीची दोन प्रतले असून एक अनुदैर्घ्य व मध्य अक्षास छेदणारे असते, तर दुसरे अनुदैर्घ्य व अनुप्रस्थ अक्षांतून जाते. तसेच मध्य व अनुप्रस्थ अक्षांस छेदून निर्माण होणारे भाग समरूप (समसमान) नसतात [आ. २ (ई)]. थोडक्यात, द्वि-अर प्रकारात सममितीची दोन प्रतले असून ती एकमेकांशी काटकोन करतात. हा सममितीचा प्रकार टिनोफोरा संघातील प्राण्यांत व अँथोझोआ (समुद्रपुष्प, पोवळे इत्यादींचा वर्ग) वर्गातील बहुतेक सर्व प्राण्यांत आढळतो.

 


 

द्विपार्श्वसममिती : या सममितीत द्वि-अर प्रकाराप्रमाणेच सममितीचे तीन अक्ष असतात पण फरक असा असतो की, सममिती प्रतल एकच असून ते मध्य अक्षातूनच जाते व त्यामुळे शरीराचे उजवा व डावा असे दोन सममित (समान) भाग पडतात. ते भाग दर्पण प्रतिबिंबासारखे (आरशात पाहिले असता उजवा हात किंवा पाय डाव्याप्रमाणे दिसणे) दिसतात. अशा मुळात असममित असलेल्या इंद्रियांच्या किंवा भागांच्या जोड्या (उदा., दोन हात, पाय, कान, शरीराचा उजवा-डावा हे भाग इ. ह्यातील नुसता हात, कान इ. एकट्या इंद्रियाचा विचार करता ते असममित असते) दर्पण प्रतिबिंबरूप असतात. या गुणधर्मास प्रतिबिंबरूपता म्हणतात आणि ह्याची कल्पना द्विपार्श्व सममितीत येते (आ. ३).

 

काही प्राण्यांत (उदा., कीटक) अंड्याच्या आकारावरूनच द्विपार्श्व सममिती असल्याची कल्पना येऊ शकते. काही प्राण्यांत (उदा., बेडूक) अंड्याचे फलन होताना शुक्राणू (पुं-जनन पेशी) अंड्यात शिरून जो मार्ग अवलंबितो तो भ्रूणाच्या द्विपार्श्व सममितीचे प्रतल व द्विपार्श्व अक्ष ठरवितो, तर कोंबडीच्या भ्रूणातील हे प्रतल सामान्यतः अंड्याच्या लंबाक्षाशी काटकोन करते. भ्रूणाच्या वाढीत वरील अक्षास फार महत्त्व असते कारण इंद्रियांची विशिष्ट मांडणीच त्याच्याशी निगडित असते.

 

असममिती : काही प्राणी असममितच असतात [उदा., अमीबा, स्पंज (आ. ४)] म्हणजे शरीराचे सममित भाग होतील असे कोणतेच प्रतल अशा प्राण्यांत नसते.

 

आ.३. द्विपार्श्व सममिती : (अ) सममिती अक्ष व प्रतले : (१) अग्र, (२) पश्च, (३) पृष्ठीन, (४) अधर, (५) अनुदैर्घ्य पक्ष, (६) मध्य प्रतल, (७) ललाटीय प्रतल, (८) अनुप्रस्थ प्रतल (आ) बेडकातील द्विपार्श्व सममिती : (१) मध्य प्रतल (इ) पृष्ठीन व अधर भागांचे प्रभेदन करणारी द्विपार्श्व सममिती : (१) मध्य अक्ष.

आद्यवदुय्यमसममिती : प्राण्याची वाढ होत असताना सामान्यतः एकच एक प्रकारची सममिती कायम राहते. तथापि काही प्राण्यांत ह्यात बदल होतो (उदा., समुद्रपुष्पाची वरवरची द्विपार्श्व सममिती, तारामिनाची अरीय सममिती). असे बदल प्रामुख्याने अनुकूलनासाठी झालेले असतात. अशा वेळी भ्रूणात वा डिंभात (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असलेल्या पूर्व अवस्थेत) आढळणाऱ्या सममितीस आद्य (प्राथमिक, मूळची) सममिती म्हणतात, तर प्राण्याच्या प्रौढावस्थेत आढळणाऱ्या सममितीस दुय्यम (गौण, अनुषंगी किंवा नंतरची) सममिती म्हणतात (आ. ५).

आ. ४. असममिती : अनियमित आकाराचा शाखायुक्त स्पंज.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  आ. ५. आद्य व दुय्यम सममिती आणि वर्गीकरणसारांश, सममिती व अनुकूलन ह्यांचा परस्परसंबंध जवळचा आहे, असे म्हणता येईल. उदा., चलनशील प्राण्यात सामान्यतः द्विपार्श्व, तर सुस्त किंवा स्थानबद्ध प्राण्यात सामान्यतः अरीय सममिती आढळते. अर्थात् अपवादही आढळतात (उदा., अरीय सममिती असलेला जेलीफिश चलनशील असतो). स्त्री-पुं-रूपतेतील असममितीचे कारण जननिक नियमनाशी निगडित असते. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यात सममित इंद्रिये (अवयव) असतात, तशी काही असममितही असतात [उदा., हृदय, आतडे, अग्निपिंड, यकृत, प्लीहा (पानथरी) इ.]. अशी इंद्रिय-असममिती सामान्यतः बदलत नाही (उदा., माणसात हृदय डावीकडे असते). अगदी क्कचित त्यात बदल होतो (उदा., हृदयाचे स्थित्यंतरण होऊन ते उजवीकडे असते ह्यास दक्षिणहृदयता म्हणतात). अशा बदलात आढळणाऱ्या असममितीस पर्यस्त असममिती म्हणतात.

 

 

 

 

 

 संदर्भ : 1. Abuladze, K. S. Functioning of Paired Organs, New York, 1963.

             2. Hyman, L. H. The Invertebrates, Vol.I, New York, 1940.

             3. Weisz, P. B. The Science of Biology, New York, 1963.

 

परांजपे, स. य.