नॉटिलस: (भौक्तिक नॉटिलस). ⇨ नॉटिलॉइडिया गणातील प्राण्यांच्या एका वंशाचे नाव. नॉटिलॉइडियांच्या पुष्कळ वंशांच्या शेकडो जातींचे प्राणी प्राचीन समुद्रात राहत असत. त्यांपैकी नॉटिलस हा एकच वंश व त्याच्या चार-पाचच जाती आता उरलेल्या आहेत आणि त्या हिंदी व पश्चिम पॅसिफिक महासागरांच्या सुमात्रा ते फिजीपर्यंत पसरलेल्या द्वीपसमूहांच्या आणि फिलिपीन्स बेटे, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्या लगतच्या भागांत आढळतात. फिलिपीन्समध्ये खाण्यासाठी त्यांचा उपयोग करतात.

नॉटिलसाला कॅल्शियम कार्बोनेटाचे बाह्य कवच असते. त्याच्या पृष्ठाचा पिवळा व तपकिरी पट्टे असलेला पातळसा भाग काढून टाकला म्हणजे उरणारे सर्व कवच मोत्यासारख्या पदार्थाचे असते. त्यामुळे सजावटीची सुंदर वस्तू म्हणून त्याला चांगली किंमत येते. शंख-शिंपाचा संग्रह करण्याचा छंद असणाऱ्यांच्या ते परिचयाचे असते. कवच व्दिपार्श्वसममित (दोन अगदी सारखे भाग होतील असे) असते व त्याच्या दोन्ही बाजूंच्या मध्याजवळ एकेक अरुंद खळगा असतो, या खळग्याला नाभी म्हणतात. कवचाच्या तोंडाला द्वारक म्हणतात.

नॉटिलसाचे शारीर आरेखी छेद : (१) आदिकवच, (२) पश्च प्रावर पाली, (३) संस्पर्शक, (४) चोच, (५) रेत्रिका, (६) नसराळ्याचे तोंड, (७) क्लोमकक्ष, (८) क्लोम, (९) शरीरकोष्ठ, (१०) वायुप्रकोष्ठ, (११) पटग्रीवा, (१२) निनालिका, (१३) प्रकोष्ठ, (१४) पट.छेद घेऊन पाहिल्यावर कवचाची घडण व अंतररचना कळून येतात. एका टोकास निमुळती व बंद तोंड असलेली नळी बंद टोक आत ठेवून कडबोळ्याप्रमाणे गुंडाळावी तसे कवच असते. प्रौढ कवचात सु. अडीच वेढे असतात. द्वारकाकडून मागे जाताना काही अंतरावर एकामागून एक, उत्तरोत्तर लहान होत गेलेले व मागे म्हणजे द्वारकाच्या विरुद्ध दिशेस वाकलेले अनेक अनुप्रस्थ पट (आडवे पडदे) असतात. त्यांच्यामुळे कवचाच्या पोकळीचे अनेक प्रकोष्ठ (कप्पे) झालेले असतात. द्वारकालगतच्या कप्प्यात प्राण्याचे शरीर असते म्हणून त्याला शरीरप्रकोष्ठ म्हणतात. उरलेले सर्व प्रकोष्ठ वायूने भरलेले असतात, त्यांना वायुप्रकोष्ठ म्हणतात. वायुप्रकोष्ठांमुळे कवच हलके होते व त्याला उत्प्लावकता (तरंगण्याची क्षमता) येते. प्राण्याची वाढ होत असताना द्वारकाजवळच्या भागात भर पडून नळीची लांबी वाढते. काही काळ वाढ झाल्यावर शरीर पुढे सरकते व त्याच्या मागे एक नवा पट निर्मिला जातो.

शरीराच्या पश्च (मागील) भागाचा एक दोरीसारखा जिवंत फाटा सर्व वायूप्रकोष्ठांतून जातो, त्याला निनालिका म्हणतात. निनालिका पार जाण्यासाठी पटांच्या मध्याजवळ एक भोक असते व त्या भोकालगतचा पटाचा भाग नसराळ्यासारखा झालेला असतो, त्याला पटग्रीवा म्हणतात. पटग्रीवा मागे वाढलेल्या असतात. शरीरप्रकोष्ठात सामावलेल्या नॉटिलसाच्या मऊ भागांचे शारीर (शरीररचना) साधारण मानाने स्क्विडांसारखे [→लोलिगो] असते. पण नॉटिलसाला शाईची पिशवी नसते. क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) व अलिंदांच्या (हृदयाच्या अग्र कप्प्यांच्या) दोनदोन जोड्या असतात. शीर्षाच्या खंडांना शाखा फुटलेल्या असतात व त्या शाखा म्हणजे त्याचे बाहू होत. बाहूंवर चूषक (शोषक करणारे अवयव) नसतात पण आखडून आत घेता येतील असे संस्पर्शक (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) असतात. डोळे साधे आणि पार्श्वीय (बाजूंना) असतात. आत्मरक्षणासाठी नॉटिलस आपले शरीर कवचात आखडून घेऊ शकतो. शरीर कवचात गेल्यावर पायाच्या एका फुगीर झालेल्या खंडाने द्वारक बंद होते, त्या खंडाला ‘हूड’ म्हणतात.

पटांच्या कडा कवचाच्या आतील पृष्ठास जेथे चिकटलेल्या असतात त्या सांध्याच्या रेषेला सेवनी म्हणतात. बाहेरचे कवच काढून टाकल्याशिवाय सेवन्या दिसत नाहीत पण नॉटिलसांचे कित्येक जीवाश्म (शिळारूप अवशेष) आतील साच्याच्या स्वरूपात असतात आणि त्यांच्यातील सेवन्या स्पष्ट दिसतात [ → नॉटिलॉइडिया] नॉटिलसाच्या सेवन्या किंचित तरंगाकार असतात. नॉटिलसाच्या कवचाच्या द्वारकाचा बाहेरच्या अंगाचा जो काठ असतो तो अगदी सरळ नसून पुढे म्हणजे द्वारकाच्या दिशेस अवतल (अंतर्गोल) असतो व या आखाताप्रमाणे मागे गेलेल्या भागात नॉटिलसाचे मांसल नसराळे असते. काठाच्या या अवतल भागाला अधोनाली खात म्हणतात.

सुमारे ७०० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यात नॉटिलस आढळतात. ते सामान्यत: तळाशीच असतात. संस्पर्शकाच्या साहाय्याने ते तळावर रांगत, अन्न शोधीत जातात. त्यांच्या नसराळ्याच्या वाटे प्रावारगुहेतील (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीच्या पोकळीतील) पाण्याची चिळकांडी बाहेर सोडून ते पोहूही शकतात. खेकड्याच्या मांसाचे आमिष असलेले कामट्यांचे सापळे सु. ३०० मी. पेक्षा कमी खोलीच्या समुद्राच्या तळावर ठेवून त्यांना पकडण्यात येते. अगदी उथळ पाण्यात नॉटिलस आढळत नाहीत व ते समुद्राच्या पृष्ठांशी बहुधा येत नसावेत. मरताना किंवा मेल्यावर त्यांची शरीरे पृष्ठभागी येतात व तरंगत दूरवर नेली जाणे शक्य असते. नॉटिलसांच्या जीवनक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळालेली नाही. नॉटिलस वंशाचा अवतार ट्रायासिक कल्पात (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) झाला. जुरासिक व क्रिटेशस कल्पात (सु. १८·५ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ते विपुल व विस्तीर्ण सागरी क्षेत्रात पसरलेले होते आणि तृतीय कल्पात (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) कमी झाले. आजच्या नॉटिलसांपासून मिळणाऱ्या माहितीमुळे ⇨ सेफॅलोपोडा वर्गातील शेकडो जीवाश्म जातींचे अध्ययन करणे शक्य झालेले आहे म्हणून पुराजीवविज्ञानाच्या (अतिप्राचीन काळी होऊन गेलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरतात. कागदी नॉटिलसासाठी‘आर्गोनॉट’ही नोंद पहावी).

 

पहा : ऑमोनॉइडिया मॉलस्का लोलिगो.

केळकर, क. वा.