ब्लेक्सली, ॲल्बर्ट फ्रान्सिस : (९ नोव्हेंबर १८७४ – १६ नोव्हेंबर १९५४). अमेरिकन वनस्पतिवैज्ञानिक व आनुवंशिकीविज्ञ. धोतरा, बुरशी, घोळ तसेच रुडबेकिया वंशातील वनस्पतींचे प्रजोत्पादन व आनुवंशिकता यांसंबंधी महत्त्वपूर्ण संशोधन करून त्यांनी ⇨ आनुवंशिकी या विज्ञानशाखेच्या प्रगतीस मोठी चालना दिली. त्यांचा जन्म जेनासीओ (न्यूयॉर्क) येथे झाला. त्यांनी वेस्लेयन महाविद्यालयातून ए. बी. (१८९६) आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून ए. एम्. (१९००) व पी. एच्. डी. (१९०४) या पदव्या संपादन केल्या १९०४ – ०६ या काळात ते जर्मनीतील कार्नेगी संस्थेत संशोधक व १९०७ – १५ दरम्यान कनेक्टिकट कृषी महाविद्यालयात वनस्पतिज्ञानाचे प्राध्यापक होते. १९१५ साली ते न्यूयॉर्कमधील कार्नेगी इन्स्टिट्यूशनमध्ये वनस्पति-आनुवंशिकीविज्ञ म्हणून दाखल झाले व तेथेच १९२३ साली उपसंचालक व १९३५ साली संचालक झाले. १९४१ साली तेथून सेवानिवृत्त झाल्यावर ते नॉर्दॅम्प्टन (मॅसॅचू-सेट्स) येथील स्मिथ महाविद्यालयात संशोधक प्राध्यापक होते (१९४२-४३). नंतर तेथेच त्यांनी एक आनुवंशिकीविषयक संस्था स्थापन केली व सु. अकरा वर्षे ते त्या संस्थेचे संचालक होते.

म्यूकर वंशाच्या बुरशीच्या [→ कवक]संशोधनाद्वारे त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली होती. पांढर्‍या धोतर्‍यावरील (दत्तुरास्ट्रामोनियम) त्यांचे संशोधन महत्त्वाचे असून त्यामुळे आनुवंशिकतेच्या गुणसूत्र (जीवनासाठी आवश्यक असणार्‍या पेशीतील जटिल गोलसर पुंजातील म्हणजे केंद्रकातील रंजद्रव्य दाट होऊन बनलेल्या सुतासारख्या पिंडाविषयीच्या) सिद्धांताला पुष्टी देणारी माहिती उपलब्ध झालीतसेच त्रिसमसूत्री (गुणसूत्रांच्या नेहमीच्या १२ जोड्यापैकी एका जोडीत तिसर्‍या जादा गुणसूत्राची भर पडलेल्या) कोशिकांचा शोध लागला [→ गुणसूत्र]. पुष्कळ उत्परिवर्तने (आनुवंशिक लक्षणांमध्ये एकाएकी होणारे बदल) ही अशा जादा गुणसूत्राची भर पडून झाल्याचे दिसून आले. त्यांच्या या संशोधनामुळे जीन [ आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणारे गुणसूत्रांचे घटक→जीन],⇨ बहुगुणन, संकरण,

⇨ क्रमविकास (उत्क्रांती) इत्यादींविषयी बरीच मौलिक माहिती मिळाली. मानवी आनुवंशिकतेविषयीही त्यांनी थोडे संशोधन केले. भिन्न भिन्न व्यक्तींमधील रुची व गंध यांच्याशी संबंधिक असलेल्या संवेदनांचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला होता. १९३७ साली त्यांनी ⇨  कॉल्चिसीन या अल्कलॉइडामुळे वनस्पतीच्या कोशिकेतील (पेशीतील) गुणसूत्रांची संख्या बदलू शकते, हा शोध लावला. त्यामुळे वनस्पतींचे नवीन प्रकार बनविता येऊ लागलेशिवाय जननिक यंत्रणेत रसायनांमुळे अडथळे येऊ शकतात, हे स्पष्ट झाले. त्यांनी ट्रीज इन विंटर हे पुस्तक लिहिले होते. नॉर्‌दॅम्प्टन  येथे ते मृत्यू पावले.

 परांडेकर, श. आ.