बॉइड-ऑर,जॉन : (२३ सप्टेंबर १८८० – २५ जून १९७१). स्कॉटिश आहारशास्त्रविषयक तज्ञ आणि शांततेच्या जागतिक नोबेल पारितोषिकाचा मानकरी. स्कॉटलंडमधील सधन घराण्यात किलमॉर्झ (एअरशर) येथे जन्म. त्याने एम्.ए. एम्.डी. डी.एस्‌सी. इ. मानवी वैद्यकातील उच्च पदव्या मिळविल्या. सुरुवातीला काही दिवस त्याने वैद्यकीय व्यवसाय केला पण प्राण्यांच्या आहाराविषयी विशेष अभ्यास करण्यासाठी तो ॲबर्डीन विद्यापीठातील रौइट रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत दाखल झाला. या सुमारास एलिझाबेथ पीअर्सन या युवतीबरोबर त्याचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. पुढे त्याची रौइट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी नियुक्ती झाली (१९१४). येथे तो निवृत्त होईपर्यंत त्याच पदावर होता. (१९४५). तेथे त्याने जनावरांच्या आहारविषयक मूलभूत प्रश्नांवर संशोधन करण्यासाठी इम्पीरीअल ब्यूरो ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन ही स्वतंत्र संस्था स्थापन केली (१९२९). पहिल्या महायुद्धाच्या वेळी (१९१४ – १८) त्याने ग्रेट ब्रिटनच्या भूसैनिकी पथकात जखमींना औषधोपचार व शुश्रुषेचे काम केले.

प्राण्यांच्या आहाराविषयीचे आपले विचार त्याने मिनरल्स इन पास्चर अँड देअर रिलेशन ॲनिमल न्यूट्रिशन (१९२८), द नॅशनल फूड सप्लाय अँड इट्स इन्फ्ल्युअन्स ऑन पब्लिक हेल्थ (१९३४) व फूड, हेल्थ अँड इनकम (१९३६) या पुस्तकांद्वारे प्रसिद्ध केले. फूड, हेल्थ अँड इनकम या पुस्तकाने त्यास मान्यता व लोकप्रियता मिळाली. या पुस्तकातील दोन निष्कर्ष उल्लेखनीय आहेत : एक, ग्रेट ब्रिटनमध्ये १० टक्के जनता ही अवपोषित आहे आणि दोन, मूलभूत पोषणद्रव्ये असलेल्या आहाराचा खर्च देशातील निम्म्या लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. हे पुस्तक १९३५ मधील आहारयोजनाशास्त्राच्या अहवालावर आधारित होते. त्याचा उपयोग दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी शिधावाटपाच्या विशेषतः रेशन देण्याच्या योजनेस पायाभूत ठरला.

बॉइड-ऑरने ग्रेट ब्रिटनमधील कोनाकोपऱ्यात प्रवास करून व्याख्याने, वृत्तपत्रे आणि नभोवाणी या माध्यमांद्वारे आपले सकस आहारविषयक विचार प्रसृत केले आणि अन्नोत्पादनातील ब्रिटीश शासनाने केलेल्या कपातीवर कडाडून टीका केली. त्याच्या या टीका मोहिमेमुळे प्रशासकीय वर्तुळातील अनेक लोकांचा रोष त्याला पतकरावा लागला तथापि त्याच्या या कार्यामुळे ब्रिटनला दुसऱ्या महायुद्धातील अन्नविषयक धोरण व रेशनिंगची पद्धत निश्चित करण्यास अमूल्य साह्य झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शासनाच्या अन्नधान्य धोरणविषयक शास्त्रीय समितीचा तो सल्लागार-सभासद होता. त्याच सुमारास कृषि-शास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची ॲबर्डीन विद्यापीठात नियुक्ती झाली (१९४२ – ४५). यांशिवाय त्याने ग्लॅसगो विद्यापीठाचा कुलमंत्री, कुलपती, ब्रिटिश संसदेचा सदस्य इ. विविध उच्च पदांवर काम केले. संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेमधील फाओ या संस्थेच्या पहिल्या महानिदेशकपदावर त्याची नियुक्ती करण्यात आली (१९४५-४८). फाओद्वारा अन्नविषयक विविध संशोधनाची कार्यवाही केल्यास तिचा जागतिक शांततेस कसा उपयोग होईल, हे विचार त्याने मांडले. अन्न हा जागतिक एकात्मतेचा मूळ पाया आहे, हा विचार मांडून (१९४८) त्याने आंतरराष्ट्रीय सहकार्यास उत्तेजन दिले. त्याबद्दल जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्याचा उचित गौरव करण्यात आला (१९४९). फाओमधील महानिदेशकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याने वर्ल्ड गव्हर्नमेंट या चळवळीस वाहून घेतले. त्याला नाइट (१९३५) आणि बॅरोनेट (१९४९) हे बहुमान मिळाले.

न्यूट्रिशन अब्स्ट्रॅक्ट्स अँड रिव्ह्यू या मासिकाचा तो सहसंपादक होता (१९३९). बॉइड-ऑरने पोषक आहारासंबंधीचे आपले मौलिक विचार स्फुटलेखन आणि ग्रंथलेखन यांद्वारे मांडले. द नॅशनल फूड सप्लाय अँड इट्स इन्फ्ल्युअन्स ऑन पब्लिक हेल्थ (१९३४), फूड, हेल्थ अँड इनकम (१९३६), न्यूट्रिशन इन वॉर (१९४०), फूड अँड द पीपल (१९४३), फूड : द फाउंडेशन ऑफ वर्ल्ड यूनिटी (१९४८), द व्हाईट मॅन्‌स डिलेम्मा (१९५३) व फीस्ट अँड फॅमिन (१९६०) हे त्याचे महत्त्वपूर्ण ग्रंथ होत. ॲज आय रिकॉल (१९६६) या मथळ्याखाली त्याने आपले आत्मवृत्त प्रसिद्ध केले. तो अँगस परगण्यातील एड्झल येथे मरण पावला.

शेख, रुक्साना