बॅलॅनोग्लॉसस

बॅलॅनोग्लॉसस : हेमिकॉर्डेटा उपसंघाच्या एंटरोन्यूस्टा गणातील प्राण्यांच्या एक वंश. हे कृमीसारखे सागरी प्राणी सर्व समुद्रांच्या तळावर आढळतात. फक्त अंटार्क्टिक महासागरात ते आढळत नाहीत. या प्राण्याचे शरीर लांब, सडपातळ, दंडगोलाकार असून जातीपरत्वे त्याची लांबी २.५४ मिमी. ते २ मी. असते. शरीर मऊ, मांसल असते व त्याचे सोंड, कॉलर (गळपट्टी किंवा कडे) व धड असे विभाजन झालेले असते. प्रत्येक विभागात देहगुहा (शरीरातील पोकळी) असते. सोंड पुढच्या बाजूला निमुळती होते व तिचे टोके बोथट असते. ती तळाकडे फुगीर होत जाते व तेथे ती कॉलरला अरूंद मानेने जोडलेले असते. कॉलर दंडगोलाकार असून जेवढी लांब असते तेवढीच रुंद असते. तिचा व्यास सोंड व धड या दोहोंपेक्षा जास्त मोठा असतो. धड लांब, दंडगोलाकार असते व ते कॉलरपासून मागे निमुळते होत जाते. तोंड कॉलरमध्ये खालच्या बाजूस असून सोंडेच्या तळाला असते. धडाच्या पुढच्या भागाच्या वरच्या बाजूवर कल्ल्यांच्या फटींच्या दुहेरी रांगा असतात. कॉलरच्या मागे बऱ्याच अंतरापर्यंत जनन कंगोऱ्याची एक जोडी असते. कधीकधी त्यांच्या पंखासारख्या घड्या पडतात. धडाच्या मध्य भागावर प्रतुंगकाच्या (उठावदार भागाच्या) दोन ओळींत आंत्रकोष्ठ (आतड्याची पोकळी) असते.

बिळे करीत असताना कायम उघड्या असणाऱ्या त्याच्या तोंडातून बरीच वाळू व चिखल आत जात असतो. त्यातील लहान जीवाणू व अन्य कार्बनी (सेंद्रिय) पदार्थाचे पचन होते व उरलेली वाळू गुदद्वारावाटे बाहेर टाकली जाते. लिंगे भिन्न असतात व प्रजोत्पादन लैंगिक असते. त्याचा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) टॉर्नारिया डिंभ म्हणून ओळखला जातो. बॅलॅनोग्लॉसस प्रॉलिफेरन्स ही जाती प्रजोत्पादनाच्या बाबतीत अपवाद आहे. तीमध्ये अलैंगिक अवस्था असून जनन ग्रंथी अविकसित असतात. या अवस्थेत अनुप्रस्थ (आडव्या) विभाजनाने प्रजोत्पादन होते व ही अवस्था नेहमीच्या लैंगिक अवस्थेशी एकांतरित (आलटून पालटून) असते.

काही कारणांनी याचे अवयव तुटले, तर ते पुन्हा पूर्ववत वाढतात. शरीराच्या मागच्या भागाची वाढ जलद होते. तसेच सोंड, कॉलर व श्वसन विभागांचे पुनर्जनन लहानशा तुकड्यापासूनही होते. जातिविकासाच्या दृष्टीने हेमिकॉर्डेट प्राणी महत्त्वाचे समजले जातात. त्यांचे कॉर्डेट व एकायनोडर्म प्राण्यांशी नाते असल्याचे दिसते. पूर्वी हे प्राणी कॉर्डेटा संघाच्या प्रोटोकॉर्डेटा या उपसंघात समाविष्ट केले जात असत. तथापि डिंभाच्या सखोल अभ्यासावरून. तसेच जीवरसायनविषयक परीक्षणातून आता असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, हे प्राणी वेगळ्या संघात समाविष्ट केले जावेत आणि त्यांचे स्थान अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या एकायनोडर्माटा संघानंतर व कॉर्डेटा संघाच्या आधी स्वतंत्र असे असावे. या नव्या दृष्टिकोनास अधिकाधिक प्राणिशास्त्रज्ञांकडून मान्यता मिळत आहे.

पहा : हेमिकॉर्डेटा.

जमदाडे, ज. वि.