भरतनाट्यम् नर्तकी (१९५६) - चावडा

चावडा, श्यावक्ष धनजीभाय : (११ डिसेंबर १९१४–   ). आधुनिकभारतीय चित्रकार. गुजरातमधील नवसारी येथे जन्म. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही पदविका (१९३५), स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्टस्‌, लंडन येथील ललित कलेतील पदविका (१९३८) तसेच Academie de la Grande Chaumiere पॅरिस येथे उच्च कलाभ्यास (१९३९). त्यांनी यूरोपात (१९३८ व १९५५), अतिपूर्वेकडील देशांत तसेच भारतभर भरपूर प्रवास केला.(१९५१-५२) १९४५ सालापासून त्यांनी स्वतंत्र चित्रकार म्हणून व्यवसाय केला. भारतात तसेच इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इ. देशांत स्वत:च्या चित्रांची अनेक प्रदर्शने भरविली. त्याचप्रमाणे पॅरिस येथील युनेस्को प्रदर्शनातून तसेच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी इ. देशातील भारतीय कला प्रदर्शनांतून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. त्यांनी एअर इंडिया (मुंबई व वॉशिग्टन), बर्मा शेल, संसदभवन, गांधी दर्शन (दिल्ली) या ठिकाणी उत्कृष्ट भित्तिचित्रे काढली आहेत. मिशमी गर्ल्स (आसाम ), रिक्षा बॉइज (जावा ), कुंडलिनी माला इ. त्यांची चित्रे प्रख्यात आहेत. त्याचप्रमाणे कथ्थक, कथकळी, भरतनाट्यम्‌ ह्या प्रसिद्ध नृत्यशैलींवर आधारलेली त्यांची कथ्थक, कथकळी, भरतनाट्यम्‌ ह्या प्रसिद्ध नृत्यशैलींवर आधारलेली त्यांची रेखाचित्रेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्या कलाकृतींतून तंत्र व आकार ह्यांच्याविषयीच्या विविध आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांचे दर्शन घडते. कलाविषयाचे गूढ जाणून घेण्याची संवेदनक्षमता व कमीत कमी साधनांद्वारा जास्तीत जास्त आशय प्रकट करण्याची हातोटी, ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये. मात्र त्यांच्या चित्रांचे खरे सामर्थ्य त्यांच्या रेषांतून जाणवते. लयबद्ध, ठसठशीत चैतन्यमय रेखांतून त्यांनी चित्रविषयाचे आकार व गुण फारच प्रभावीपणे व कौशल्याने दर्शविले आहेत. ह्या वैशिष्ट्यांमुळे आधुनिक भारतीय कलावंतात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.  

संदर्भ : Lalit Kala Akademi, Chavda, New Delhi.               

करंजकर, वा. व्यं.