ऑक : ॲल्सिडी कुलातला हा पक्षी आहे. ऑक या नावाने खऱ्या ऑक पक्ष्यांखेरीज पफिन, गिलमॉट वगैरे बऱ्याच पक्ष्यांचा उल्लेख केला जातो. खऱ्या ऑक पक्ष्यांच्या हल्ली ज्या जाती आढळतात. त्यांत ॲल्का टॉर्डा ही जाती सामन्य आहे. तिचे लौकिक नाव रेझरबिल आहे. अटलांटिक महासागराच्या उत्तर भागात तो प्रामुख्याने राहतो. हिवाळ्यात या जातीचे पक्षी स्कॉटलंडच्या उत्तर किनाऱ्यावर आढळतात.

याची लांबी सु. ४०४१ सेंमी. असून अंगावर दाट पिसे असतात शरीराचा वरचा भाग काळा आणि खालचा पांढरा गळा हिवाळ्यात पांढरा

आ. १ रेझरबिल

 आणि उन्हाळ्यात तपकिरी किंवा काळा चोच जाडजूड दोन्ही बाजूंनी चपटी पाय आखूड पहिले बोट नसते किंवा त्याचा अवशेष असतो बाकीची तीन जालयुक्त (पातळ त्वचेने जोडलेली) असतात पंख आखूड व कमी अधिक प्रमाणात टोकदार शेपूट आखूड असते. विणीच्या हंगामांत काही जातींचे डोके आणि मान यांवरील पिसे गळून पडून विशेष प्रकारची नवी पिसे येतात.

हे मुख्यत्वेकरून समुद्रवासी पक्षी आहेत. मासे आणि समुद्रातले झिंगे वगैरे प्राणी यांचे भक्ष्य होय. पाण्यात बुडी मारून ते भक्ष्याचा मोठ्या वेगाने पाठलाग करतात. पोहण्याकरिता आपल्या आखूड पंखांचा आणि पाहिजे त्या दिशेला शरीर वळविण्याकरिता पायांचा ते उपयोग करतात. ऑक वेगाने आणि सरळ उडतो. विणीच्या हंगामात या पक्ष्यांचा एकसारखा कलकलाट सुरू असतो एरव्ही ते स्तब्ध असतात.

आ. २. बृहत् ऑक

हे पक्षी समाजप्रिय (जमाव करून राहणारे) आहेतया पक्ष्यांची वीण देखील वसाहतींमध्येच होते. मादी एक किंवा दोन अंडी खडकाच्या कपारीत,दगडांखाली किंवा जमिनीवर देखील घालते. नर आणि मादी दोघेही अंडी उबविण्याचे आणि पिल्लांना भरविण्याचे काम करतात.

बृहत् ऑक हा सगळ्यात मोठा ऑक होता त्याचे शास्त्रीय नाव पेंग्विनस इंपेनिस आहे. हा पेंग्विनसारखा होता. याला उडता येत नव्हते. उंची सु. ७६ सेंमी. असून डोळ्यापुढे एक मोठा पांढरा ठिपका होता. मांस, तेल आणि पिसांकरिता माणसाने याचा अत्यंत निर्दयपणे संहार केल्यामुळे हा पक्षी १८४४ च्या सुमाराम निर्वंश झाला.

कर्वे,जनी.