सर मॉर्टिमर व्हीलरव्हीलर, सर (रॉबर्ट एरिक) मॉर्टिमर : (१० सप्टेंबर १८९०–२२ जुलै १९७६). प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक होते. जन्म ग्लासगो येथे. ब्रॅडफर्ड येथे शालेय शिक्षण. रॉयल कमिशन ऑन हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्‌स या संस्थेत नोकरी. पहिल्या महायुद्धकाळातील लष्करी सेवेनंतर त्यांची युनिव्हर्सिटी कॉलेजात (कार्डिक) पुरातत्त्वशास्त्राचा व्याख्याता म्हणून नियुक्ती. लंडनमधील संग्रहालयाचे काही काळ ते अभिरक्षक होते (१९२६ –३७). १९३७मध्ये ते इन्स्टिटयूट ऑफ आर्किऑलॉजी या संस्थेचे संचालक झाले. इंग्लंडमधील लिडने (वेल्स), व्हेरूलेमियन (सेंट ॲल्बन्स) आणि ⇨ मेडन कॅसल (डॉर्सेट) येथील शास्त्रशुद्ध उत्खननांमुळे रोमन पुरातत्त्वाचे तज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक झाला. दुसऱ्या महायुद्धकाळात ब्रिगेडियर म्हणून त्यांनी तोफखान्यात काम केले. त्यानंतर त्यांची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या महानिदेशक पदावर नियुक्ती झाली (१९४४ – ४८).

आधुनिक भारतातील पुरातत्त्व संशोधनाला शास्त्रीय बैठक घालून देण्याचे श्रेय या महान पुरातत्त्वज्ञास देण्यात येते. स्वतंत्र भारताचे पहिले पुरातत्त्व महानिदेशक या नात्याने त्यांनी सर्वेक्षण, उत्खनन, इतिवृत्तलेखन, प्रकाशन या प्रत्येक शाखेला विशेष शिस्त प्राप्त करून दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील पुरातत्त्व संशोधनातील प्रगतीचे श्रेय व्हीलर यांच्या शिकवणुकीला देता येते. उत्खननतंत्रात स्तरशास्त्राचा वापर करून त्यानुसार प्राचीन मृत्पात्रांचा काल निश्चित करणे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उत्खननात सहभागी करून घेणे, उत्खननांचे वृत्तान्त तत्काळ आणि शास्त्रीय माहितीने परिपूर्ण करून ते प्रसिद्ध करणे, वस्तुसंग्रहालयांची आणि पुरातत्त्वीय रसायनशास्त्राची प्रयोगशाळा स्थापणे इ. गोष्टी त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने व आत्मीयतेने पार पाडल्या. दिल्लीचे राष्ट्रीय संग्राहलय स्थापन करण्यात त्यांचे प्रयत्न कारणीभूत झाले. उत्खननांत आढळलेल्या अवशेषांची, तसेच प्राचीन वास्तूंची सामान्य लोकांना माहिती व्हावी, म्हणून त्यांनी एन्शंट इंडिया हे नियतकालिक १९४६ साली सुरू केले. तक्षशिला (१९४५), अरिकामेडू (१९४५), हडप्पा (१९४६), बह्मगिरी (१९४७) येथील त्यांची शास्त्रशुद्ध उत्खनने आदर्श ठरली. भारतातील महानिदेशक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची पाकिस्तान शासनाने तेथील पुरातत्त्व खात्याचे महानिदेशक म्हणून नियुक्ती केली (१९४८). पाकिस्तानातील चारसद्द (प्राचीन पुष्कलावती) या पेशावरजवळील स्थळाचे त्यांनी उत्खनन केले. याशिवाय त्यांनी पूर्व आफ्रिकेतही एकदोन उत्खनने केली. तेथील किल्वा किसिवानी येथे उत्खनन करून ईस्ट आफ्रिकन इन्स्टिट्यूट या संस्थेची नैरोबी येथे १९६१ साली स्थापना केली.

पुरातत्त्वीय उत्खननांचे तपशीलवार अहवाल त्यांनी तयार केले. या अहवाल लेखनाव्यतिरिक्त व्हीलर यांनी विपुल ग्रंथलेखन केले. त्यांपैकी रोम बियॉन्ड द इंपीअरिअल फ्राँटिअर (१९५४), आर्किऑलॉजी फ्रॉम द अर्थ (१९५४), अर्ली इंडिया अँड पाकिस्तान (१९५९), फाइव्ह थाउजन्ड यिअर्स ऑफ पाकिस्तान (१९५०), इंडस सिव्हिलिझेशन (१९६८), चारसद्द (१९६२), माय आर्किऑलॉजिकल मिशन टू इंडिया अँड पाकिस्तान (१९७६) इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सिव्हिलिझेशन ऑफ द इंडस व्हॅली अँड बियॉन्ड (१९६५) या त्यांच्या बृहद्‌ग्रंथात सिंधू संस्कृतीविषयी मौलिक संशोधनपर माहिती मिळते. स्टिल डिगिंग (१९५५) या शीर्षकाने त्यांनी आत्मवृत्त प्रसिद्ध केले.

मॉर्टिमर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले होते. पुरातत्त्वविषयक कार्याबद्दल १९५० साली विल्यम पेट्री मेडल त्यांना देण्यात आले. रोमन पुरातत्त्व, स्तरशास्त्र, शिस्तबद्ध उत्खनन या क्षेत्रांत आणि भारतीय पुरातत्त्वाला प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणून व्हीलर चिरकाल स्मरणात राहतील. लंडन येथे ते मरण पावले.

संदर्भ : Jaquetta, Hawkes, Mortimer Wheeler : Adventurer in Archaeology, London, 1982.

देव, शां. भा.