झां बातीस्त लामार्कलामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वान द मॉने : (१ ऑगस्ट १७४४ – १८ डिसेंबर १८२९). फ्रेंच जीववैज्ञानिक. जीवविज्ञान नावारूपास येण्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी त्यामध्ये पायाभूत कार्य केले. सर्व प्राणी साध्या जीवापासून क्रमाक्रमाने सुधारणा होऊन उत्क्रांत झाले ह्या त्यांच्या धाडसी परिकल्पनेबद्दल ते विशेष स्मरणात राहतात. क्रमविकासामध्ये (उत्क्रांतीमध्ये) नवी लक्षणे उद्‌भवतात, अशी त्यांची कल्पना होती. अशी लक्षणे ही पर्यावरणाशी आंतरक्रिया होऊन उपार्जित केली (मिळविली) जातात आणि ती पुढच्या पिढ्यांमध्ये उतरतात, हे डार्विन यांच्या क्रमविकासाच्या तत्त्वाशी सुसंगत आहे. हे तत्त्व म्हणजे जीवनकलहात निवडलेले व आनुवंशिकीने निश्चित झालेले बदल असून हे आता क्रमविकासीय जीवविज्ञानात सर्वमान्य तत्त्व झाले आहे.

मतभिन्नतेतून उद्‌भवलेल्या वादामुळे लामार्क यांनी केलेल्या तुलनात्मक शारीर व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या वर्गीकरणाची तत्त्वे व नामकरण या बहुमोल कार्याकडे दुर्लक्ष झाले. लामार्क यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये पिकार्डी येथे झाला. पाद्री होण्यासाठी ते आर्म्येच्या जेझुइट शाळेत दाखल झाले परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर पायदळ रिसाल्यात भरती झाले व १७६१-६८ दरम्यान पायदळाच्या सेवेत होते. रिव्हिएरा येथे नेमणूक झाली होती तेव्हापासून त्यांना वनस्पतींच्या अभ्यासाची गोडी लागली. सैन्यातून राजीनामा दिल्यावर त्यांनी प्रथम वैद्यक व नंतर वनस्पतीविज्ञान यांच्या अध्ययनाला प्रारंभ केला व लवकरच पॅरिसमधील शाही वनस्पतिउद्यानामध्ये फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिक बेर्नार द झ्युस्यू यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागले. नऊ वर्षे वनस्पतींचे क्षेत्रीय अध्ययन व नमुने गोळा करून झाल्यावर १७७८ मध्ये त्यांनी फ्रान्सच्या वनश्रीवरील त्रिखंडीय ग्रंथ प्रसिद्ध केला. वनस्पतिविज्ञान सर्वत्र लोकप्रिय झालेले होते, त्यामुळे जनतेमध्ये त्यांचा Florefrancoise हा ग्रंथ वनस्पतींची ओळख पटविण्यासाठी खूप उपयुक्त ठरला. या ग्रंथामुळे लामार्क यांची ॲकॅडेमी देस सायन्सेसमध्ये नेमणूक झाली. प्रसिद्ध निसर्गवेत्ते काँत झॉर्झ दे ब्यूफाँ यांनी आपल्या मुलाबरोबर मध्य यूरोपच्या दोन वर्षाच्या सफरीवर जाऊन तेथील वनस्पती उद्याने व इतर नामवंत संस्थांना भेटी देण्यासाठी लामार्क यांची ट्यूटर म्हणून नेमणूक केली. दोन वर्षे भरपूर काम केल्यावर लामार्क यांनी Encyclopedie Methodique या विश्वकोशासाठी वनस्पतिविज्ञानाचे प्रचंड लेखन केले. त्यानंतर ते शाही वनस्पती संग्रहाचे अभिरक्षक झाले. 

इ. स. १७८९ च्या फ्रेंच क्रांतीमुळे राजकीय संस्थांबरोबरच विद्‌वत संस्थांचेही पुनर्गठन करण्यात आले व त्यामुळे निसर्गेतिहासाचा शाही संग्रह बंद करण्यात आला. लामार्क यांनी नॅशनल असेंब्लीला एक पत्र लिहीले आणि त्यात त्यांनी हौशी लोकांनी मोठ्या कष्टाने जमविलेले कुतूहलजनक नमुने ठेवण्यासाठी नुसती कपाटे पुरविण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आणि निसर्गेतिहासाचे मोठे संग्रहालय उभारून त्यातील नमुन्यांचा उपयोग विज्ञानाच्या प्रगतीसाठी व्हावा, असा आग्रह धरला. अशा संग्रहालयात नमुन्यांचे नुसते प्रदर्शन न करता ते योग्य पद्धतीने लावणे किंवा योग्य अशा वर्गीकरणात्मक श्रेणीत मांडले पाहीजेत, असाही त्यांचा आग्रह होता. निसर्गातील प्रत्येक विभागाची (प्राणी, वनस्पती आणि खनिज) उपविभागणी वर्ग, गण (श्रेणी) ते प्रजातीपर्यंत केली जावी आणि त्या प्रत्येकाची माहिती पुस्तिका असावी. त्यायोगे तो वर्गीकरणात्मक ज्ञानाचा पाया ठरेल. संग्रहालयासाठी नमुने जमविणे या आधुनिक कल्पनेच्या प्रवर्तकांपैकी लामार्क हे एक होत. १७९३ मध्ये Museum National d’ Historie Naturelle या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली, तेव्हा लामार्क यांनी अपृष्ठवंशी विभागाचे प्रमुख नेमण्यात आले. यापूर्वी त्यांनी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या नमुन्यांचा महत्त्वाचा संग्रह केला होता. जीवाश्मांचा (शिळारूप अवशेषांचा) जिवंत जीवांशी संबंध जोडणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होत.  


अठराव्या शतकाच्या अखेरीस रसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान यांमध्ये बरेच नवे संशोधन झाले होते. त्यामुळे अगदी सूक्ष्म अशा शंकांचेही निरसन झाले व मुलभूत संबंधाचा सुगावा लागून ते समजण्यास मदत झाली. त्याने लामार्क यांचे समाधान झाले पण अठराव्या शतकातील लेखकांनी जोपासलेल्या नैसर्गिक लयाच्या भोंगळ व वरवरच्या कल्पनांनी ते उद्दीपित झाले होते. आंत्वान लव्हॉयझर यांच्या नवरसायनशास्त्रामुळे आपण वस्तुस्थितीपासून दूर जात असून सविस्तरपणाच्या चक्रव्यूहात अडकत आहोत, विज्ञान हे सुसंगत अशी एक पद्धती आहे व त्यायोगे सर्वेजनांना जगाची पूर्ण माहिती मिळते आणि त्यामध्ये आपले स्थान कोठे आहे हे समजेल पण असे न होता विज्ञान काही मूठभर विशेषज्ञांची मक्तेदारी होईल, अशी भीती त्यांना वाटत होती.  त्यासाठी त्यांनी भौतिक प्रक्रिया आणि रसायनशास्त्र, भूविज्ञान, वातावरण व जीव यांवर परिश्रमपूर्वक एकीकृत दृष्टीकोन मांडणाऱ्या ग्रंथमाला प्रसिद्ध करण्याच्या योजनेवर विचार केला. त्यांपैकी पहिला ग्रंथ दोन खंडांत लिहिलेला द्रव्य व ऊर्जा यांवरील Researches sur des causes des principaux faits physiques et particulie’ rement sur celles de la combustion (१७९४) हा होय. यानंतर १७९६ मध्ये Refutation de la theorie pneumatique ou de la nouvelle doctrine des chemistes modernes हा होय. त्यामध्ये त्यांनी स्वतःच्याच ज्वलन सिद्धांताला विरोध केलेला असून लव्हॉयझर व फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ काँत आंत्वान द फूरक्रवा यांच्या विचाराला साथ दिली आहे. Hydrogeologie (१८०२) हा त्यांचा ग्रंथ पृथ्वीचा इतिहास देतो. पृथ्वीवर समुद्रांनी अनेकदा आक्रमण करून जैव निक्षेपण (गाळ साचण्याची क्रिया) झाले व त्याचबरोबर खंडे निर्माण झाली, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. निक्षेपामध्ये आढळणाऱ्या जीवाश्मांच्या प्रकारांवरून ते निक्षेप खोल सागरी गाळात किंवा सागरतीरावरील गाळात साचत गेले आहेत, हे लामार्क यांनी मान्य केले होते. या ग्रंथाने भूवैज्ञानिक काळाच्या विशालतेचे असामान्य ज्ञान प्रकट केले आहे. त्यांचा हा ग्रंथही दुर्लक्षिला गेला त्यामुळे लामार्क दुःखी झाले. सर्वसाधारण सिद्धांतरूप देण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तुस्थितीला विस्तृत प्रमाणावर मान्यता मिळविण्यासाठी पुरावा व आकडेवारी यांचा उपयोग केला जात होता व परस्परांवर टीका करून विज्ञानाची प्रगती करण्याची प्रवृत्ती वाढली होती. या प्रवृत्तीचा उपहास केल्यामुळे लामार्क हे वैज्ञानिक जगातून बहिष्कृत झाले व हळूहळू एकाकी पडत गेले. 

कार्ल लिनीअस यांनी विस्कळीत स्थितीत सोडलेल्या खालच्या दर्जाच्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या कामात सुधारणा करण्याचे लामार्क यांनी १८०० मध्ये जाहीर केले. विशिष्ट कृमी व मृदुकाय प्राणी यांच्यातील वरकरणी दिसणारे साम्य त्यांच्या लक्षात आले होते. यासाठी त्यांना अत्यावश्यक अवयवांची जटिलता व कार्ये यांच्यातील बारीकसारीक भेदांच्या विश्लेषणाची मदत झाली. ह्या कार्याची त्यांनी अनुभवसिद्ध पायावर स्थापना केली होती. त्यामध्ये सुमारे तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जमविलेल्या इतर खूप समृद्ध व म्युझियममधील भव्य अशा संग्रहाचा उपयोग झाला. १८०१ मध्ये लामार्क यांचा अपृष्ठवंशी प्राण्यांवरील पहिला प्रमुख लेख प्रसिद्ध झाला. त्यांमध्ये त्यांनी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गीकरणाचा मूलभूत पाया घातला आहे. एकोणिसाव्या शतकाभरात संशोधनामध्ये वरील प्राण्यांची मार्गदर्शक अशी मदत झाली आणि ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे. १८१५-२२ या काळात Historie naturelle des animaux sans verte’bres ह्या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण लेखनामुळे अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या अध्ययनामध्ये परमोच्च बिंदू गाठला गेला तसेच वर्गीकरणात्मक जीवविज्ञानामध्ये सुधारणा करण्याच्या कामी संग्रहालये उभारावीत ह्या त्यांच्या प्रस्तावाचे पूर्ण समर्थन झाले. 

जीवरूपाचा विस्तृत क्रम हा अगदी साध्यापासून ते अती जटिलापर्यंत विस्तारत जातो, अशी लामार्क यांची कल्पना होती. ‘उद्दीपने आणि गूढ व सतत चल असलेले द्रव ’ यांनी प्रवृत्त केल्यामुळे प्राण्यांचे अवयव अधिक जटिल होतात व क्रमशः उच्चतर पातळीवरची जागा घेतात. भौतिक ऊर्जा आणि जीवाचे एकूण संघटन यांच्यातील संबंधाचा संक्षिप्त दृष्टिकोन त्यांनी Reshearches sur L’Organisation des corps Vivans (१८०२) व Phillosophie Zoologique (१८०९) यांमध्ये मांडला आहे. यानंतरच्या कार्यात त्यांनी जीवाच्या उच्च कोटीत जाण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण करणाऱ्या दोन नियमांचे प्रतिपादन केले : (१) पुनःपुन्हा वापरामुळे अवयवांत सुधारणा होते व न वापरल्यास ते कमकुवत होतात आणि (२) अशी पर्यावरणाने ठरविलेली उपार्जित लक्षणे किंवा अवयव नष्ट होणे ही प्रजोत्पादनाद्वारे नंतरच्या पिढीत जन्माला येणाऱ्या व्यक्तीमध्ये टिकवून धरली जातात. याचे सुप्रसिद्ध उत्तम उदाहरण म्हणजे झाडपाला खाण्याच्या सवयीमुळे जिराफाचे पुढचे पाय उंच व मान लांब झाली आहे. ५० वर्षांनंतर चार्ल्स डार्विन यांच्या Origin of Species या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे लामार्क यांचे वरील विचार चर्चेचा तसेच वादाचा विषय ठरला. एका शतकानंतर किंवा त्याहीपेक्षा उशिरा डार्विनीय सिद्धांत लावून आत्यंतिक काटेकोर बनविलेल्या समस्येला सर्वसामान्य सिद्धांतरूप दिलेल्या माहितीचा अल्पसा भाग काढून लावणे म्हणजे लामार्क यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाचा खेळखंडोबा करण्यातलाच प्रकार आहे. विशेषतः ही बाब आनुवांशिकीच्या क्षेत्रातील आहे व या विषयाचा लामार्क यांना गंधही नव्हता. वनस्पती व प्राणी यांच्या आयुष्यभरच्या सहवासाने लामार्क यांना जीवाच्या चरत्वाचे व ज्यावर आधुनिक जीवविज्ञान उभारले गेले आहे त्या भौतिक व जीवनावश्यक प्रक्रियांमधील निकट परस्परावलंबित्वाचे ज्ञान अंतःप्रज्ञेने प्राप्त झाले होते. १८०२ मध्ये लामार्क यांनी प्रथमतः बायॉलॉजी हा शब्द उपयोगात आणला तथापि जीवविज्ञानाच्या इतिहासात ते संस्थापकांपेक्षा एक अग्रदूत म्हणून अधिक ओळखले जातात. याला अपवाद म्हणजे अपृष्ठवंशी प्राण्यांचे वर्गीकरण हा होय. त्यासाठी ते फक्त संशोधनाचे मार्ग दाखवून थांबले नाहीत, तर संशोधनाचा सतत पाठपुरावा करत असलेल्या संस्थाही त्यांनी स्थापन केल्या. 

वृद्धापकाळी त्यांना अंधत्व आले. पॅरीस येथे त्यांचे निधन झाले. 

पहा : क्रमविकास डार्विन, चार्ल्स नैसर्गिक निवड.  

 जमदाडे, ज. वि.