लेनेक, रने तेऑफील यासँत : (१७ फेब्रुवारी १७८१-१३ ऑगस्ट १८२६). फ्रेंच वैद्य. वैद्यकीय तपासणीत रोगनिदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ⇨ स्टेथॉस्कोप या महत्त्वाच्या उपकरणाचा त्यांनी शोध लावला. ते छातीसंबंधीच्या वैद्यकाचे जनक मानले जातात.

लेनेक यांचा जन्म ब्रिटनीतील कॅंपेर येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना नॅंट्‌स विद्यापीठाचे कुलमंत्री असलेल्या त्यांच्या चुलत्यांकडे शिक्षणासाठी पाठविण्यात आले. तेथून ते वयाच्या विसाव्या वर्षी पॅरिसला वैद्यकीय शिक्षणासाठी गेले. त्या काळी पॅरिस हे विकृत शारीराच्या (रोगामुळे शरीरात होणाऱ्या व शवपरीक्षेत नंतर आढळून येणाऱ्या बदलांच्या) अभ्यासाचे केंद्र होते. १८०४ मध्ये वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी विकृतिवैज्ञानिक शारीराचे अध्यापन करण्यास सुरुवात केली. १८१४ मध्ये ते Journal-de medicine या नियतकालिकाचे संपादक झाले. १८१६ साली ते नेकर रुग्णालयाचे वैद्य झाले. १८२२ मध्ये त्यांची कॉलेज द फ्रान्समध्ये प्राध्यापकपदावर  नियुक्ती झाली व पुढे १८२३ मध्ये ते शारीते रुग्णालयात नेपोलिअन यांचे व्यक्तिगत वैद्य जे. एन्‌. कॉर्व्हिसार्त यांच्या जागी वैद्य झाले.

जिवंत शरीरातील व मृत शरीरातील रोग यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी निरोगी व रोगग्रस्त छातीतील ध्वनींचा अभ्यास केला. हे ध्वनी ऐकण्यासाठी १८१७ मध्ये त्यांनी प्रथम कागदाच्या दंडगोलाचा व नंतर सु. ०.३ मी. लांबीच्या लाकडी पोकळ दंडगोलाचा वापर केला. रुग्णाच्या छातीवर या दंडगोलाचे एक टोक टेकवून फुप्फुसे व हृदय यांच्यामुळे निर्माण होणारे विविध ध्वनी ऐकणे त्यांना शक्य झाले. अशा प्रकारे तीन वर्षे जिवंत रुग्णांच्या छातीतील ध्वनींचा अभ्यास करून त्यांच्या शवपरीक्षेत आढळणाऱ्या रोगांशी त्यांचा सहसंबंध लेनेक यांनी जोडला. त्यांनी आपल्या पद्धतींचे व निरीक्षणांचे De l’auscculation mediate (२ खंड, १८१९) या आपल्या ग्रंथात वर्णन केले. हा ग्रंथ वैद्यकातील एक महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो व त्यातील बरीचशी तत्त्वे दैनंदिन वैद्यकीय व्यवसायाचा भाग बनली आहेत. या शोधाखेरीज लेनेक यांनी श्वासनलिकादाह, न्यूमोनिया, क्षयरोग, परिफुप्फुस शोथ म्हणजे फुप्फुसावरणाची दाहयुक्त सूज, रोहिणीविस्फार वगैरे कित्येक विविध श्वसन व हृदय विकारांची सुस्पष्ट रुग्ण वर्णने लिहिली.

लेनेक ॲकॅडेमी ऑफ मेडिसीनचे १८२३ मध्ये पूर्ण सदस्य झाले व १८२४ मध्ये त्यांना लिजन ऑफ ऑनरचे शेव्हालिए हा सन्मान मिळाला. छातीच्या गंभीर विकाराने आजारी असतानाही त्यांनी आपल्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती १८२६ च्या उन्हाळ्यात तयार केली. पॅरिस सोडून ते ब्रिटनीतील केरलॉनेक येथे प्रकृती सुधारण्यासाठी गेले व तेथेच मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.