विकलांग चिकित्सा : आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक विशेष शाखा. अस्थी, सांधे, त्यांच्यात हालचाल घडवून आणणारे स्नायू व कंडरा [हाडे व स्नायू जोडणारे पांढरे, चमकदार, तंतुमय रज्जू ⟶ कंडरा] आणि या हालचालींवर नियंत्रण ठेवणारे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांचे रोग व विकार, त्यांच्यामुळे होणारी व्यंगे व अपंगत्व, त्याचप्रमाणे अपघातजन्य इजा तसेच पुनर्वसन या सर्वांचा या शाखेत विचार (कारणमीमांसा, निदान व उपचार) केला जातो.

विकलांग चिकित्सा म्हणजे ऑर्थोपेडिक्स हा शब्द ऑर्थोस म्हणजे सरळ आणि पेडॉस म्हणजे मूल या ग्रीक शब्दांवरून आला आहे. इ. स. १७४१ मध्ये निकोलस आंद्रे या पॅरिसमधील वैद्यांनी ल ऑर्थोपेडी या ग्रंथात लहान मुलांच्या व्यंगांवर उपाय करण्यासंबंधी विवेचन केले. त्यावरून शारीरिक व्यंगांसंबंधी विवेचन करणारे शास्त्र म्हणून ऑर्थोपेडिक्स हा शब्द प्रचारात आला आणि इंग्रजीत तो तसाच रूढ झाला.

इतिहास : आदिमानवाला बंधफलकाचा (शरीराच्या भागाचे-तुटलेल्या हाडाचे-संरक्षण करण्यासाठी व तो हलू नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या फळीसारख्या साधनाचा) तसेच इतर साधनांचा उपयोग माहीत होता. उत्खननात सापडलेल्या मृतांच्या शरीरावर अशी साधने वापरल्याचे आढळले आहे. बंधनफलकाचा उपयोग ५,००० वर्षापूर्वी ईजिप्तमध्ये केल्याचे आढळले आहे. अस्थी, त्यांचे विकार, अपघाती अस्थिभंग, संधि-स्खलन (सांध्यातून हाड निखळणे) आणि हाडांचा क्षय यासंबंधी पाश्चात्त्य वैद्यकात हिपॉक्रॉटीझ (इ. स. पू. सु. ४६०-सु. ३७७) यांच्या काळापासून व भारतात २,५०० ते ३,००० वर्षापूर्वी सुश्रुताच्या काळापासून माहिती होती. त्याचे वर्णन त्यांच्या ग्रंथांतून आढळते आणि त्यांपैकी पुष्कळसे सिद्धांत व उपाययोजना अजूनही लागू पडतात. गेलेन यांनी (इ. स. १३०-२००) पृष्ठवंश (पाठीच्या कण्याची) विद्रूपता (व्यंग) नीट करण्याचा प्रथम प्रयत्न केला होता.

पाश्चात्त्य वैद्यकात इ. स. सु. १५०० नंतर शरीरशास्त्राच्या अभ्यासामुळे आणि इतर विज्ञान शाखांतील ज्ञानवाढीमुळे ‘विकलांग चिकित्सा’ या शाखेतही खूप प्रगती झाली आहे. सांध्यांच्या संबंधातील माहितीत विल्यम हंटर (१७१८-८३) यांनी) आणि स्नायू, स्नायूंची कार्ये व हाडांची वाढ यांच्या संबंधातील माहितीत जॉन हंटर (१७२८-९३) यांनी भर घातली. ऑर्ब (स्वित्झर्लंड) येथे झां आंद्रे व्हेनेल यांनी कंकालाच्या (सांगाड्याच्या) विद्रूपतेवर उपचार करणारी पहिली संस्था स्थापन केली. विकलांग चिकित्साविषयक शस्त्रक्रिया तंत्रावर जॉन हिल्टन (१८०४-७८) यांच्या ऑन रेस्ट अँड पेन या पुस्तकाचा खूप प्रभाव पडला होता. आंतॉन्यो स्कार्पा (१७५२-१८३२) ह्या इटालियन वैद्यांनी वक्रपाद विद्रूपतेचे [पिळवटले जाऊन पावलाच्या स्थानात किंवा आकारात निर्माण झालेल्या जन्मजात विद्रूपतेचे ⟶ पाऊल] प्रथम तपशीलवार वर्णन लिहिले. झाक डेलपेक (१७७७-१८३२) आणि जॉर्ज एफ्. एल्. श्ट्रोमायर (१८०४-७६) या दोन शस्त्रक्रियाविशारदांनी वक्रपाद विद्रूपतेवर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. श्ट्रोमायर जर्मन असल्याने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही चिकित्सा जर्मनीतच उपलब्ध होती. लंडन येथील शस्त्रक्रियाविशारद विल्यम जे. लिट्ल (१८१०-९४) यांनी स्वतःच्या वक्रपाद विद्रूपतेवर १८३६ मध्ये श्ट्रोमायर यांच्याकडून शस्त्रक्रिया करवून घेतली होती. त्यांनी लंडनमध्ये १८३८ मध्ये रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल काढले. त्यांना इंग्लंडमधील या चिकित्सेचे जनक मानतात. ऑन्टोनिस मातीआसन ह्या बेल्जियन शस्त्रक्रियाविशारदांनी १८५४ मध्ये विद्रूपतेच्या उपचारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रथम उपयोग केला. आल्बेर्ट होफ्फा (१८५९-१९०८) या जर्मन शस्त्रक्रियाविशारदांनी १८९० मध्ये जन्मजात श्रोणि-संधी स्थानभ्रंशावर (ऊर्वस्थी व श्रोण्यस्थी म्हणजे मांडी व कमरेच्या हाडांमधील  खुब्याच्या सांध्यातील हाड निखळल्यावर) पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. ह्यू ओएन टॉमस (१८३४-९१) स्वतः शस्त्रक्रियाविशारद नसतानाही अस्थिभंगासंबंधी त्यांनी बरेच लिहिले. पायाच्या अस्थिभंगांवरील इलाजात उपयोगी असे बंधफलक साधन त्यांनी शोधले. ते आजही उपयुक्त असून ते टॉमस बंधफलक (बाहू व पाय यांच्या अस्थिभंगासाठी वापरण्यात येणारा धातूचा बंधफलक वरच्या बाहूला वा पायाला घट्ट बसणारे कडे एका टोकाला व त्यापासून निघणारे व खाली जाणारे दोन गज त्याला असतात) म्हणून ओळखले जाते. सर रॉबर्ट जोन्स (१८५८-१९३३) यांच्या कार्यापासून इंग्लंडमध्ये आधुनिक विकलांग चिकित्सेस सुरुवात झाली. तसेच आधुनिक विकलांग चिकित्सेच्या विकासास हातभार लावणारांमध्ये अमेरिकेतील एल्. ए. सेअर, हेन्ऱी. जी. डेव्हिस, सी. एफ्. टेलर, ई. एच्. ब्रॅडफर्ड, जे. बी. ब्राउन यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. आर्. डब्ल्यू. लोव्हेट (१८५९-१९२४) यांनी बॉस्टनमध्ये बालपक्षाघात व पाठीच्या कण्याच्या वक्रतेसंबंधी लिहिले. शरीरातील हाडे कापण्याची विजेवर चालणारी करवत एफ्.एच्. आल्बी (१८७६-१९४५) यांनी १९०९ साली शोधून काढली. तीमुळे शस्त्रक्रियेतील प्रगतीत भर पडली तसेच त्यांनी अस्थिभंगाच्या इलाजासाठी खुली शस्त्रक्रिया केली व अस्थिरोपणाचा (हाड एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी वा दुसऱ्या शरीरात बसविण्याचा) प्रथम प्रयोग केला. आर्. ए. हिब्ज (१८६९-१९३२) आणि आल्बी यांची नावे पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी घेतली जातात. मायकेल होक (१८७४-१९४४) यांचे नाव व्यंगे व लुळ्या पडलेल्या सांध्यावरील शस्त्रक्रिया यांच्याशी व रॉयल व्हिटमन (१८५७-१९४६) यांचे नाव ऊर्वस्थिभंगाच्या उपचारांशी निगडित आहे. विलिस कॅम्बेल (१८६९-१९३२) या शस्त्रक्रियाविशारदांनी विकलांग चिकित्सेतील आधुनिक पद्धती व तंत्रे विकसित करण्याची महत्त्वाची कामगिरी केली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विकलांग चिकित्सा ही वैद्यकाची विशेष शाखा म्हणून गणली जाऊ लागली. तसेच इतर शास्त्रांत जी प्रगती झाली तीमुळे या शाखेतील रोगांचे अचूक निदान आणि वैद्यकीय व शस्त्रक्रियेचे उपचार यांमध्येही या शतकात खूप प्रगती झाली आहे. इतर शास्त्रांतील शोधांत क्ष-किरणांचा शोध (व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन, १८९५), संमोहनविद्या (ब्रेड, १८४२) आणि निर्जंतुक शल्यतंत्र (जोसेफ लिस्टर, १८४२) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. तसेच पेनिसिलीन (अलेक्झांडर फ्लेमिंग, १९२९) व इतर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचे शोध, धातुविज्ञान व प्लॅस्टिकनिर्मितीतील प्रगती यांचाही उल्लेख करावा लागेल. शिवाय पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांतील अनुभवांमुळे या शाखेत खूप प्रगती होऊन ती वैद्यकाची पूर्णपणे विशेष शाखा म्हणून ओळखली जाऊ लागली.


विकारांचे वर्गीकरण

विकलांग चि‍कित्सेमध्ये समाविष्ट असलेल्या विकारांचे पुढील प्रकारांनी वर्गीकरण करता येईल:(१) जन्मजात व्यंगे व (२) जन्मानंतर येणारी व्यंगे किंवा दुसऱ्या प्रकारे ग्रस्त अवयवानुसार (१)डोक्याची व्यंगे व रोग, (२) पृष्ठवंशाची व्यंगे, (३) हातांची व्यंगे व (४) पायांची व्यंगे याप्रमाणेही वर्गीकरण करता येईल. रोगांच्या व व्यंगांच्या कारणाप्रमाणे केलेले पुढील वर्गीकरण वर्णनाच्या दृष्टीने सोयीचे व जवळजवळ सर्वसमावेशक आहे.:(१) जन्मजात विकार व व्यंगे, (२) शरीराच्या वाढीतील व्यत्यय वा प्रक्षोभ, (३) अस्थींना ग्रासणारे सर्वसाधारण कायिक रोग, (४) अस्थी व सांध्यातील संक्रामणे, (५) अर्बुदे (कोशिकांच्या अत्यधिक वाढीने बनलेल्या व शरीराला निरुपयोगी अशा गाठी), (६) संधिवात, (७) स्नायू, कंडरा व अस्यपट्ट (शरीरातील संरचना आच्छादणारा किंवा त्यांना एकत्र बांधून ठेवणारा संयोजी ऊतकाचा-समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या जोडणाऱ्या समूहाचा-थर वा पट्ट) यांचे विकार, (८) स्नायू व अस्थी तंत्रांवर परिणाम करणारे तंत्रिका रोग आणि (९) डोके, पृष्ठवंश, हातापायांच्या व सांध्यांच्या आघातजन्य इजा.

जन्मजात विकार व व्यंगे : काही जन्मजात विकार आनुवंशिक असतात तर काही गर्भाशयातील गर्भाभोवतालच्या परिसरातील अस्वास्थ्यामुळे किंवा अप्राकृत परिस्थितीमुळे होत असावेत परंतु बहुतेक सर्व विकारांचे कारण माहीत नाही. या विकारांस दोन प्रकार आढळतात:(अ) विकासातील असंगती (प्राकृत म्हणजे सर्वसाधारण स्थितीपासून दूर जाणे) आणि (आ) विरूपण (अप्राकृत वाढ).

(अ) विकासातील असंगती : हे विकार अस्थी व सांधे दोन्हीनाही ग्रासतात आणि वाढीतील किंवा विकासातील मुख्य दोष गर्भावस्थेतच उद्‌भवून जन्माच्या वेळी स्थिर होतो. त्यानंतर वाढीबरोबर फक्त दुय्यम बदल होतात. यातील मुख्य दोष पुढीलप्रमाणे आहेत.

जन्मजात स्थानभ्रष्ट श्रोणिसंधी : यात श्रोणिसंधी (खुब्याचा सांधा) जन्मतः स्थानभ्रष्ट (निखळलेला) किंवा सहज स्थानभ्रष्ट होण्याजोगा असतो. श्रोणीच्या व मांडीच्या अस्थींत मोठा दोष नसतो परंतु सांध्याचे बंध सैल असतात. हा दोष एकाच किंवा दोन्ही बाजूंना व मुलींत जास्त प्रमाणात आढळतो. काही वेळा ही आनुवंशिक प्रवृत्ती आढळते. तसेच पायाळू जन्मलेल्या मुलांत ही विकृती आढळण्याची जास्त शक्यता असते. जन्मानंतर काही महिन्यांतच सांध्याचे बंध घट्ट होत असल्याने त्याच्या आत म्हणजे काही दिवसांतच निदान व उपचार करणे आवश्यक असते. सर्वसाधारण तपासणी व क्ष-किरण छायाचित्रात काहीही दोष आढळत नाही. त्यामुळे सांध्याची सहज निखळण्याची प्रवृत्ती विशेष तपासणी करून निश्चित करणे आवश्यक असते. सांधा व्यवस्थित बसवणे व आधारांच्या साहाय्याने तो हलणार नाही अशी अचलीकरण व्यवस्था करणे असे उपचार करतात. काही महिन्यांनी कंडरा घट्ट झाल्यावर आधारांची जरूर लागत नाही व पुढील प्रगती प्राकृत होते. उशीरा उपचार करणे अवघड होते.

वक्रपाद : पावलांच्या अनेक प्रकारच्या व्यंगांना हे नाव दिले जाते. पाऊल खालच्या बाजूस अंतर्नत किंवा बहिर्नत राहणे व सरळ न करता येणे असे दोष अलग वा एकत्रितपणे आढळतात. सहसा खाली व अंतर्नत पाऊल जास्त प्रमाणात आढळते. या व्यंगाचे निदानही जन्मतः केल्यास उपचार सुलभ व कायम स्वरूपी होतात. सौम्य प्रकारात पाऊल योग्य दिशेने वळवून स्थिर राहण्यासाठी आधार देतात. तीव्र स्वरूपाच्या व्यंगात शस्त्रक्रियेने इलाज करतात. [⟶ पाऊल].

हातापायांची अर्धवट वाढ : यामध्ये हातांचा व पायांचा अभाव असतो किंवा त्यांची वाढ अर्धवट झालेली आढळते. भ्रूणविकासाच्या (गर्भनिर्मिती व गर्भ वाढीच्या) काळात घेतलेल्या काही औषधांचा गर्भावर दुष्परिणाम होऊन या प्रकारच्या विकृती संभवतात. अर्धवट वाढलेल्या अवयवांवरच कृत्रिम अवयव बसवला जातो व मूळ अवयवाच्या हालचालीच्या साहाय्याने कृत्रिम अवयवात हालचाल घडवून आणता येते.

यांशिवाय हात, पाय व पृष्ठवंशाच्या अनेक प्रकारच्या परंतु क्वचितच आढळणाऱ्या अनेक विकृती आढळतात.

(आ) विरूपण: हे विकार फक्त अस्थींना ग्रासतात. गर्भाशयात व जन्मानंतरही वाढीच्या वयात अस्थींची अप्राकृत वाढ हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हे बहुतेक वेळा जन्मतः आढळू शकतात. यांतील काही आनुवंशिक असून बहुतेकांचे कारण माहीत नाही. मात्र आहारातील त्रुटी वा कमतरता हे यांचे कारण नसते. ठिसूळ अस्थी (यामध्ये अस्थी अप्राकृतपणे ठिसूळ असल्याने, वारंवार व सौम्य आघातांमुळे अस्थिभंग व वाढत जाणारी व्यंगे आढळतात), बाह्य अस्थिभवन (हाडापासून वाढलेले अस्थिमय उत्थित-वाढ) वा बहुविध उपास्थि (कूर्चा) अर्बुदीभवन इ. विकलांग चिकित्सेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि उपास्थि-अविकसन (उपास्थींचा प्राकृत विकास न होणे) व इतर अनेक विकलांग चिकित्सेच्या दृष्टीने बिनमहत्त्वाचे असे अनेक विकार आढळतात. या बहुतेक विकारांत अस्थींच्या पूर्ण वाढीबरोबर विकारप्रक्रिया थांबते.

आ. १. पृष्ठवंशाची पार्श्वीय वक्रता.शरीराच्या वाढीतील व्यत्यय : अग्रप्रवर्ध किंवा अग्रप्रवर्धपट्ट (प्रथम स्वतंत्रपणे अस्थिभूत होऊन मग हाडाच्या मुख्य भागाशी संधिग्रह-सांधला जाण्याची वा ताठर होण्याची क्रिया-होऊन बनलेला हाडाचा भाग किंवा प्रवर्ध-उपास्थी) यांच्यावर परिणाम करणारे विकार अस्थींच्या सांगाड्याच्या वाढीवर परिणाम करणारे असल्याने फक्त वाढीच्या वयात आढळतात परंतु त्यामुळे निर्माण झालेले व्यंग पुढे कायम राहते. अग्रप्रवर्धपट्टाच्या वाढीतील व्यत्यय या स्वरूपातील विकार, अग्रप्रवर्धाचा भ्रंश आणि अग्रप्रवर्धामधील अस्थी व उपास्थीवर परिणाम करणारे अस्थि-उपास्थी शोथ या प्रकारचे विकार असे अग्रप्रवर्धपट्टाच्या विकारांचे वर्गीकरण करता येते.

वाढीतील व्यत्यय : शरीराच्या किंवा अवयवाच्या दोन्ही बाजूंनी वाढ असमान असल्यास त्या भागातील अस्थी वक्र होऊन व्यंग निर्माण होते. बहिर्वक्र व अंतर्वक्र पाय (गुडघ्यापाशी व खाली बाहेरच्या वा आतल्या बाजूला बाकदार होणे) व पायातील अस्थींच्या पिळवटण्याने अंतर्वलित किंवा बहिर्वलित पावले [⟶पाऊल] या प्रकारची व्यंगे पायात आढळतात. पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूंच्या वाढीत फरक (उदा., मणके अर्धवट वाढणे) असल्यास पृष्ठवंशाची पार्श्वीय (बाजूची) वक्रता हे व्यंग आढळते. उभे राहण्याची किंवा बसण्याची चुकीची पद्धत, पक्षाघात, जन्मजात दोष व फुप्फुसांचे काही रोग यांमुळेही हे व्यंग होत असले, तरी बहुतेक वेळा याचे कारण सापडत नाही. शरीर सरळ राखण्यासाठी मळ व्यंगाच्या प्राथमिक वक्रतेच्या विरुद्ध दिशेला दुय्यम वक्रता आढळतात. त्याचप्रमाणे उंची कमी होणे, एका बाजूस फासळ्यांचा उंचवटा होणे व मणके पिळवटणे ही दुय्यम व्यंगेही आढळतात. हे व्यंग वाढणारे असल्याने निदान व शस्त्रक्रिया लवकरण होणे आवश्यक असते.


अग्रप्रवर्धाचा भ्रंश : वाढत्या अस्थीतील अग्रप्रवर्ध हा सर्वांत कमकुवत भाग असल्याने तो नेहमीच्या भारामुळे किंवा अवाजवी व अयोग्य दिशेतील प्ररेणेने सरकू शकतो. यांचे तीव्र व चिरकारी प्रकार संभवतात. वेदना, मर्यादित हालचाल व कालांतराने व्यंग ही याची लक्षणे असू शकतात. ऊर्वस्थीच्या विशिष्ट आकार व रचनेमुळे, तसेच या अस्थीवर नेहमीच जास्त भार पडत असल्यामुळे बहुधा या अस्थीच्या समीपस्थ (लगतच्या) अग्रप्रवर्धाचा भ्रंश आढळतो. मोठ्या धक्क्यामुळे इतरत्रही अग्रप्रवर्धांचा भ्रंश होऊ शकतो. हा एक प्रकारे अस्थिभंगच म्हणता येईल. त्यांचे उपचार त्या त्या ठिकाणच्या अस्थिभंगाप्रमाणेच असतात [⟶ अस्थिभंग].

अस्थि उपास्थिशोथ : अग्रप्रवर्धामधील अस्थी व उपास्थी या दोन्ही भागांना ग्रासणाऱ्या भिन्न प्रकारच्या विकृतिवैज्ञानिक प्रक्रियांना एकत्रितपणे हे नाव दिले जाते. त्यामध्ये अग्रप्रवर्धांचा अभिकोथ [रोहिणीत आकस्मिक रोध निर्माण होऊन रक्तपुरवठा थांबल्यामुळे तेथील ऊतकाचा मृत्यू होणे ⟶ अभिकोथ], अग्रप्रवर्धाच्या ताणजन्य इजा आणि अग्रप्रवर्धानजीकच्या अस्थी व उपास्थी या दोहोंमधून जाणारे भंग या प्रकारच्या रोगांचा समावेश होतो. विश्रांती, व्यंग कमी करण्याचे व ते वाढू न देण्याचे प्रयत्न या दिशेने उपचार केले जातात.

अस्थींना ग्रासणारे सर्वसाधारण कायिक रोग : यांमध्ये अन्नातील विशिष्ट घटकाच्या कमतरतेमुळे होणारे अस्थींचे रोग, अस्थींना ग्रासणारे अंतःस्त्रावी ग्रंथीचे रोग व निश्चित कारणे माहीत नसलेले अस्थींचे काही रोग यांचा समावेश होतो.

ड जीवनसत्त्वाची अन्नातील कमतरता किंवा त्याच्या शोषणातील दोषांमुळे शैशव ते बाल्यावस्थेपर्यंत ⇨मुडदूस आणि प्रौढ वयात ⇨ अस्थिमार्दव हे रोग होतात.

क जीवनसत्त्वाच्या अभावीही [⟶ स्कर्व्ही] अस्थींच्या वाढीत अग्रप्रवर्धपट्टाच्या ठिकाणी व्यत्य येऊन अस्थिभंग व रक्तस्त्राव होऊ शकतो.

अधिवृक्क बाह्यकाचे [अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरच्या भागाचे ⟶ अधिवृक्क ग्रंथि] अर्बुद, पोष ग्रंथीकडून अति-उद्दीपन किंवा संधिवाताम संधिशोथ [वेदना, ताठरपणा, दाह, सूज इ. लक्षणे दर्शविणारा सांध्यांचा जुनाट रोग ⟶ संधिशोथ] इ. रोगांसाठी औषध म्हणून दिले गेल्याने अधिवृक्क बाह्यकजन्य अंतःस्त्राव रक्तात जास्त प्रमाणात असल्यास त्यामुळे अस्थि-सुषिरता (हाडाचे वस्तुमान कमी होऊन त्याची घनता घटणे व हाडाती मोकळी जागा विस्तृत होऊन त्याची सच्छिद्रता व भंगुरता वाढण्याची स्थिती) हा रोग होतो. पोष ग्रंथिजन्य वृद्धी हॉर्मोनाच्या कमतरतेमुळे वामनता (बुटकेपणा) आणि जास्त प्रमाणामुळे वयानुसार बृहत्‍-कायिता (लांब अस्थींच्या जादा वाढीने शरीराचे आकारमान असाधारणपणे मोठे होणे) किंवा विशालांगता (खालच्या जबड्याच्या हाडासारखी हाडे, हाता-पायांची हाडे, नाक, ओठ, जीभ इत्यादींची सावकाश व कायमची झालेली वृद्धी) हे अस्थिसांगाड्याच्या एकूण वाढीवर परिणाम करणारे रोग होतात. परावटू अधिक्यामध्ये [⟶परावटु ग्रंथि] अस्थिनाश व अस्थीच्या पुनर्शोषित भागात तंतुमय ऊतकनिर्मिती निरनिराळ्या ठिकाणी ठिगळांच्या स्वरूपात होते व त्या ठिकाणी विकृतिवैज्ञानिक अस्थिभंग होऊ शकतात. या सर्व रोगांत मूळ अंतःस्त्रावी ग्रंथींच्या रोगावरील उपचार महत्त्वाचे असतात. [⟶ अंतःस्त्रावी ग्रंथि].

पॅजेट रोगाचे (सर जेम्स पॅजेट यांच्या नावावरून ओळखल्या जाणाऱ्या रोगाचे) नक्की कारण माहीत नाही. चाळीस वर्षापुढील वयाच्या, विशेषतः पुरुषांत, हा रोग आढळतो. शरीरातील कोणत्याही आणि अनक अस्थींना (विशेषतः पृष्ठवंश, कवटी, श्रोणी, ऊर्वस्थी आणि अंतर्जघास्थी या अस्थींना) हा रोग ग्रासतो. त्यामध्ये अस्थिभंजक पुनर्शोषण आणि नंतर प्राथमिक अवस्थेतील नव-अस्थीची पुननिर्मिती (अस्थिजनन) अशी प्रक्रिया सुरू राहून संकलित संरचना (असमान जननिक घटना असणाऱ्या ऊतकांचे पट्टे असणारी रचना) असलेले अस्थिऊतकाचे थर निर्माण होतात. सुरुवातीस सहसा लक्षणे आढळत नाहीत. काही वेळा ग्रस्त अस्थीवर सलग जाणवणारी सौम्य वेदना आढळते. कालांतराने नव-अस्थी भाराने वाकून विशिष्ट व्यंगे निर्माण होतात. ग्रस्त अस्थीची वाढलेली जाडी सजह आढळू शकते. क्ष-किरण छायाचित्रात अस्थीत झालेले विशिष्ट बदल (वाढलेली जाडी, काठिण्य, बाह्यक व अस्थिमज्जेतील पुरसट सीमारेषा इ.) सहज दिसतात. या रोगावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. वेदनेकरिता वेदनाशामक औषधे दिली जातात.

अस्थि-सुषिरता हा रोग स्थानिक व सार्वत्रिक (शरीरातील सर्व अस्थींना ग्रासणारा) स्वरूपांत आढळतो. शोथ किंवा अवयवांचे दीर्घकाल अचलीकरण (हालचाल न होणे) यामुळे स्थानिक अस्थिसुषिरता होते. सार्वत्रिक रोगाचे प्राथमिक व दुय्यम असे दोन प्रकार आहेत. प्राथमिक अस्थि-सुषिरता हे वृद्धत्वाचे लक्षण असून स्त्रियांमध्ये ते पुरुषांपेक्षा लवकर (ऋतुसमाप्तीनंतरच्या काळात) आढळते. शरीरातील एकूण अस्थिऊतकाची घट हे या रोगाचे प्रमुख लक्षण होय. शरीरातील लांब अस्थींच्या बाह्यकांची जाडी कमी होत जाते व सुषिर अस्थींचे विरलीभवन (अस्थिऊतकांची घट) होते. प्रत्यक्ष रोगाची काही लक्षणे दिसत नाहीत परंतु अस्थी ठिसूळ झाल्याने किरकोळ आघाताने त्या भंग पावतात. क्ष-किरण छायाचित्रात अस्थीतील बदल दिसण्यासाठी अस्थिऊतकात किमान ४०% घट व्हावी लागते. काही जणांच्या मते हा विशिष्ट रोग नसून सर्वसाधारण वार्धक्य प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. अस्थिभंगांवर नेहमीप्रमाणे उपचार करतात. दुय्यम अस्थि-सुषिरता काही अंतःस्त्रावी ग्रंथीच्या रोगाचे (आधिवृक्क बाह्यक अंतःस्त्रावाचे जास्त प्रमाण) लक्षण आहे.


अस्थी व सांध्यांतील संक्रामणे: तीव्र अस्थिमज्जोशोथ : प्रतिजैव औषधे व मुलांचे सर्वसाधारणपणे सुधारलेले आरोग्य यामुळे सध्या या रोगाचे प्रमाण कमी झालेले दिसत असले, तरी हा लहान मुलांमध्ये आढळणारा एक गंभीर रोग आहे. मुख्यतः पुंजगोलाणू (स्टॅफिलोकॉकस ऑरियस) या सूक्ष्मजंतूंच्या इतरत्र झालेल्या (उदा., टॉन्सिल) प्रादुर्भावानंतर रक्तातून हे सूक्ष्मजंतू अस्थीपर्यंत पोहोचतात व तेथे हॅवर्झियन नालांमधून (हाडात ज्या सूक्ष्म नालांमधून रक्तवाहिन्यांचे फाटे फुटलेले असतात त्यांमधून क्लॉप्टन हॅवर्झ या ब्रिटिश अस्थितज्ञांवरून हे नाव पडले आहे) संक्रामण (संसर्ग) पसरते. संक्रामण व अस्थीच्या रक्तपुरवठ्यातील व्यत्ययामुळे अस्थीचा नाश होत जातो. अभिकोथ होऊन नाश पावलेल्या अस्थीतील सूक्ष्मजंतूंपर्यंत औषधे पोहोचू शकत नसल्याने हा रोग रेंगाळत राहतो किंवा पुनःपुन्हा उद्‌भवतो. अस्थीवर जाणवणारी व हळूहळू वाढत जाणारी वेदना ही याची प्रमुख लक्षणे आहेत. ४८ तासांच्या आत रोगी उपचारासाठी आलेला असल्यास प्रतिजैव औषधांनी रोग पूर्ण बरा होऊ शकतो. त्यानंतर अस्थीत पू झाला असल्यास शस्त्रक्रियेने त्याला वाट करून देणे आवश्यक असते. रोगग्रस्त भाग इतर शरीरापेक्षा उंच पातळीवर ठेवणे व त्याला प्लॅस्टरने आधार देणे या गोष्टीही आवश्यक असतात.

चिरकारी अस्थिमज्जाशोथ : वरीलप्रमाणे योग्य व पुरेसे उपचार न केल्यास तीव्र अस्थिमज्जाशोथाचे या रोगात रूपांतर होते किंवा पूतिरक्ततेनंतर (संक्रामणातील तीव्र सूक्ष्मजीव रक्तप्रवाहात आल्यानंतर) ब्रोडी गळू (सर बेंजामिन कॉलिन्स ब्रोडी या इंग्रज शल्यविशारदांच्या नावावरून पडलेले नाव) या स्वरूपात हा रोग दिसू शकतो. रोगग्रस्त भागाला आधार देऊन त्याची हालचाल बंद करणे, प्रतिजैव औषधे व शस्त्रक्रियेने खराब भाग काढणे याप्रमाणे उपचार करावे लागतात.

तीव्र पूयकारक संधिशोथ : सांध्याला झालेल्या जखमेत जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने, अथिमज्जाशोथ किंवा इतर जंतुजन्य रोग सांध्यापर्यंत पोहोचल्याने किंवा इतरत्र असलेले संक्रामण रक्तातून सांध्यापर्यंत पसरल्याने हा रोग होतो. या रोगात सहसा पुंजगोलाणू, मालागोलाणू, फुप्फुसगोलाणू किंवा प्रमेहगोलाणू या जंतूंचा प्रादुर्भाव आढळतो. अनेक कारणांमुळे सहसा गुडघ्याचा सांधा ग्रासलेला आढळतो. वाढत जाणारी वेदना, ताप, सांध्याला सूज येणे व सांध्याची हालचाल कमी कमी होत बंद होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. सुरुवातीच्या काळात प्रतिजैव औषधे व सांध्याची हालचाल बंद करून सांध्याला आराम देणे हे उपचार उपयुक्त ठरतात. त्यानंतर सांध्यातील द्रव काढून घेणे, सांध्यात प्रतिजैव औषध टोचणे किंवा सांधा उघडून पुवाला वाट करून देणे इ. शस्त्रक्रियेचे उपचार करावे लागतात. या रोगाचे प्रमाणही कमी होताना दिसते आहे.

अस्थी व सांध्याचा क्षय:फुप्फुसे किंवा आतड्यात प्रथम सुरू झालेला क्षय रक्तावाटे इतरत्र पसरतो [⟶ क्षयरोग]. अस्थी व सांध्यांच्या क्षयात तो प्रथम संधिकला (पारदर्शक व वंगणासारखा द्रव स्त्रवणारे व सांध्याच्या संपुटाच्या व बंधाच्या पृष्ठभागी अस्तराप्रमणे असलेले दाट पटल) किंवा सांध्यात समाविष्ट अस्थीच्या भागाला ग्रासतो व पुढे अस्थीत पसरतो. कोणत्याही सांध्यात तो आढळू शकत असला, तरी मुख्यत: श्रोणिसंधी, गुडघ्याचा सांधा व मणक्यांचे सांधे (पॉट रोग- पर्सिव्हल पॉट या ब्रिटिश शल्यविशारदांच्या नावावरून पडलेले नाव) येथे तो जास्त प्रमाणात आढळतो.

आ. २. कण्याच्या क्षयरोगाने आलेले कुबड संधिकलेत क्षयाच्या विशिष्ट गाठी तयार होतात संधिकलेला सूज येते व सांध्यात द्रव साचून सांधा सुजतो. या अवस्थेत निदान व उपचार झाल्यास सांध्याचे कार्य पूर्ववत होऊ शकते. अन्यथा सांध्याची उपास्थी व लगतच्या अस्थीत रोग पसरून त्यांचा नाश होत जातो. अशा वेळी उपचारांनतरही सांध्याचे कार्य पूर्ववत होऊ शकत नाही. सांध्यात समाविष्ट अस्थीत रोग सुरू झाल्यासही लवकरच सांधाही रोगग्रस्त होतो. पृष्ठवंशात शेजारील दोन मणक्यांत रोग आढळतो. पुढे मणक्यांचा आणि मधील चकतीचा नाश, तंतुमय ऊतकनिर्मिती, क्षयजन्य गळवाची निर्मिती व पू शेजारील इतर ऊतकांतील थरांतून पसरत इतरत्र बाहेर येणे, मणके खचून पुढील बाजूस कलणे व पृष्ठवंशाची मागील बाजूस असणारी असाधारण वक्रता हे व्यंग वा कुबड निर्माण होणे, मज्जारज्जूस इजा होणे, पक्षाघात इ. गोष्टी संभवतात.

रोगाच्या प्राथमिक स्थानाच्या ठिकाणी (फुप्फुसे किंवा आतडी), सांधे व अस्थींच्या ठिकाणी व एकूण शरीरावर होणाऱ्या रोगाच्या परिणामांच्या स्वरूपात रोगाची लक्षणे आढळतात [⟶ क्षयरोग]. सांध्याची सूज, वेदना, सांध्याची हालचाल उत्तरोत्तर मर्यादित व जास्त वेदनादायक होत जाणे, सांधा निखळणे, अस्थींचा नाश, व्यंग इ. लक्षणे अस्थी व सांध्याच्या ठिकाणी आढळतात. रक्ततपासण्या, मांतू परीक्षा (क्षयाच्या जंतूचे होऊन गेलेले वा झालेले संक्रामण ओळखण्यासाठी करण्यात येणारी अंतस्त्वचीय परीक्षा शार्ल मांतू या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून या परीक्षेचे नाव आले आहे) व छातीची, तसेच रोगग्रस्त सांधा व अस्थीची क्ष-किरण छायाचित्रे यांच्या साहाय्याने निदान होते.

क्षयासाठी विशिष्ट प्रतिजैव औषधे व गळू झालेले असल्यास पुवाला वाट करून देणे व नष्ट झालेला भाग काढून टाकणे असे उपचार करावे लागतात. या उपचारांनंतर कायमस्वरूपी व्यंग राहिल्यास वंगाच्या स्वरूपाप्रमाणे विशिष्ट शस्त्रक्रिया केल्या जातात. सर्वसाधारण सुधारलेले आरोग्य, लसीकरण, त्वरित व प्रथमावस्थेतील रोगाचे निदान व विशिष्ट प्रतिजैव औषधांची उपलब्धता यांमुळे अस्थी आणि सांध्यांच्या क्षयाचे एकूण प्रमाण व या रोगामुळे मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी व्यंगे व दोष निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळते.


अस्थी व सांध्याची अर्बुदे : प्राथमिक अस्थि-अर्बुदे क्वचित आढळतात आणि बालवयात जास्त  प्रमाणात आढळतात. निरुपद्रवी (मारक नसलेली) आणि मारक अशी दोन्ही प्रकारची अर्बुदे आढळतात व त्यांत प्रामुख्याने आढळणाऱ्या ऊतकाच्या प्रकारावरून त्यांना नावे दिली जातात. (उदा., अस्थि-अर्बुद व अस्थिमांसकर्क ही अस्थिऊतक निर्मिणारी अनुक्रमे निरुपद्रवी व मारक अर्बुदे होत. याचप्रमाणे उपास्थी, संधिकला, कंडरेतील तंतुमय ऊतक व अस्थिमज्जेतील निरनिराळ्या ऊतकांपासून अर्बुदे होऊ शकतात). काही प्रकारच्या (विशेषत: मारक) अर्बुदातील कोशिका (पेशी) विशिष्ट ऊतकाच्या आहेत, हे ओळखणे अशक्य असते.

निरुपद्रवी अर्बुदे : ही बहुधा बाल व तरुण वयात आढळतात आणि सहसा अस्थींच्या वाढीबरोबर त्यांचीही वाढत थांबते (काही अर्बुदे स्थानिक दृष्ट्या मारक असून त्यांची वाढ मात्र पुढेही सुरू राहते). गाठ, शेजारील स्नायू व कंडरेच्या हालचालीस अडथळा, वेदना, व्यंग, काही प्रकारात अर्बुदाच्या ठिकाणी अस्थी कमकुवत झाल्याने विकृतिवैज्ञानिक अस्थिभंग इ. लक्षणे आढळतात. अर्बुदाचा प्रकार व निरुपद्रवीपणा सहसा क्ष-किरण छायाचित्रावरून ठरवता येतो परंतु निश्चित निदानासाठी जीवोतक परीक्षा (प्रत्यक्ष ऊतक काढून घेऊन त्याची परीक्षा करणे) आवश्यक असते. लक्षणे दर्शविणारी, प्राकृत कार्यात व्यत्यय आणणारी व अस्थिभंगास निमित्त होणारी अर्बुदे काढून आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी त्याच व्यक्तीच्या प्राकृत अस्थीचे रोपण करून उपचार केले जातात. अन्यथा काही प्रकारच्या अर्बुदांना उपचारांची जरूर नसते.

मारक-अर्बुदे : यांपैकी जवळजवळ 2/3 अर्बुदे दुय्यम किंवा प्रक्षेपित (इतरत्र-विशेषत: स्तन व अष्ठीला ग्रंथीमधील-मारक अर्बुदांचा रक्ताद्वारे अस्थींत प्रक्षेप झाल्यामुळे झालेली) असतात [⟶ अर्बुदविज्ञान कर्करोग]. प्राथमिक अर्बुदांचे त्यांत आढळणाऱ्या ऊतकांवरून प्रकार केले जातात परंतु काहींत ऊतकनिश्चिती करणे अशक्य ठरते. वयोगट, मारकता, प्रगती व फलानुमान (रोगाचे संभाव्य मार्गक्रमण व फलित यांविषयी अनुमान) यांतही निरनिराळ्या प्रकारांत फरक आढळतो. सर्वसाधारणपणे वेदना, गाठ व विकृतिवैज्ञानिक अस्थिभंग ही लक्षणे सर्व मारक अर्बुदांत कमी अधिक प्रमाणात आढळतात. वैद्यकीय तपासणी, क्ष‍-किरण छायाचित्रे व जीवोतक परीक्षा यांवरून बहुधा निदाननिश्चिती होते. अर्बुदाच्या प्रकाराप्रमाणे शस्त्रक्रिया (अवयवच्छेदन म्हणजे संपूर्ण भाग कापून काढणे) किंवा प्रारणाचा उपयोग [⟶ प्रारण चिकित्सा] या प्रकारांनी उपचार करावे लागतात. उपास्थि-मांसकर्काचा अपवाद वगळता बहुतेक सर्व अर्बुदे तीव्र मारक असतात व फलानुमान आशादायक नसते.

संधिवात : मुख्य तीन प्रकारच्या रोगांचा यांत समावेश होतो.

अस्थिसंधिवात : सांध्यातील उपास्थीचे यांत्रिक गुणधर्म व या उपास्थीवर (सांध्याचे कार्य चालू असता) पडणारे यांत्रिक ताण यांमध्ये प्राकृत संधिकलायुक्त सांध्यांत संतुलन राखलेले असते. जर सांध्यावरील ताण प्रमाणाबाहेर वाढले किंवा उपास्थीच्या गुणधर्मांचा दर्जा कमी झाला, तर हे संतुलन बिघडून हा रोग होतो. संतुलन बिघडण्याचे कारण अज्ञात असल्यास त्याला प्राथमिक अस्थिसंधिवात असे म्हणतात व या प्रकारचे रोगी जास्त प्रमाणात आढळतात. सांध्यातील उपास्थीचा गुळगुळीतपणा व आकार बिघडवणाऱ्या, रक्तपुरवठ्यात व्यत्य आणणाऱ्या व लगतच्या अस्थीला होणाऱ्या इजा व पूयजनक, क्षयजन्य किंवा संधिशोथ इ. विशिष्ट कारणांनी उपास्थीचा नाश होऊन परिणामी अस्थिसंधिवात झाल्यास त्यास दुय्यम अस्थिसंधिवात असे म्हणतात.

वरील कारणांमुळे सांध्यातील उपास्थी मऊ, खरखरीत व व्रणयुक्त बनते. तिचे बारीक तुकडे सुटे होऊन सांध्यात अडकतात व ते इतरत्र चिकटून त्यात अस्थिजनन (नव-अस्थिनिर्मिती) सुरू होते. सांध्यात सौम्य शोथ सुरू होऊन तंत्वात्मकता (अवयवात नैसर्गिक प्रमाणापेक्षा जादा प्रमाणात तंतुमय संयोजी उतकाची वाढ झालेली असणे) निर्माण होते. अस्थि-उद्वर्ध (विकृतिवैज्ञानिक अस्थिमय वाढीची प्रक्रिया), उपास्थी लगतच्या अस्थीतील वाढलेला रक्तपुरवठा व या अस्थीच्या भागाचे काठिण्य (कठीणपणा) हे या रोगाचे पुढील टप्पे व वैशिष्ट्ये होत. या सर्व प्रक्रियांमुळे सांध्यात अधिकाधिक दोष उत्पन्न होतात व वाढत्या दोषांबरोबर ही प्रक्रिया अधिक जोराने सुरू होते.

शरीराचे वजन सहन करावे लागणाऱ्या सांध्यांची (मुख्यतः श्रोणिसंधी व गुडघे यांची) हालचाल करताना वेदना जाणवणे व हालचाल कमी होत जाणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे जाणवणे व हालचाल कमी होत जाणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. नंतर हळूहळू सांधा आखडत जाऊन अकार्यक्षम स्थितीत अचल होतो व व्यंग निर्माण होते. एकापेक्षा अधिक सांधे यांप्राणे अकार्यक्षम बनल्यास रोगी कायमचा अपंग होत जातो. विचित्र अवस्थेत आखडलेले व सुजलेले सांधे, मर्यादित हालचाल, हालचाल होताना खरखरण्याचे आवाज व स्पर्शासह्यत्व ही चिन्हे तपासणी करताना आढळतात. क्ष-किरण छायाचित्रात सांध्यात व लगतच्या अस्थीत विशिष्ट बदल झालेले दिसतात.

या रोगावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. सुरुवातीच्या काळात सांध्यावरील ताण कमी करणे, ताणरहित अवस्थेत सांधा जास्तीत जास्त हालता ठेवणे व वेदनाशामक औषधांचा उपयोग होतो. वजन कमी करणे व भौतिकी चिकित्सा [भौतिकी-यांत्रिक उपायांनी उपचार करणे ⟶ भौतिकी चिकित्सा] उपयुक्त ठरते. त्यानंतर परिस्थितीनुसार शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो.

आ. ३. संधिवाताभ संधिशोथामुळे विद्रूप झालेला हाताचा पंजा. संधिवाताम संधिशोथ : या विकारांची कारणे संपूर्ण माहीत नसली, तरी रोगप्रतिकारक्षमतेचा या रोगाशी संबंध आहे. या विकारात प्रामुख्याने संधिकला सुजते व सांध्यात प्रमाणाबाहेर जास्त द्रव झिरपून साचतो. त्यामुळे सांधा ताणला जाऊन जास्त जास्त अस्थिर बनत जातो. सुजलेली संधिकला सांध्यातील उपास्थीवर वाढते आणि हळूहळू तिच्याखालील उपास्थी, उपास्थीखालील अस्थी आणि सांध्याच्या इतर बंधांचा नाश होत जातो. हा रोग लहान वयापासून प्रौढ वयापर्यंत कधीही होऊ शकतो व अनेक, मुख्यतः लहान, सांध्यांत एकाच वेळी दिसून येतो.

हालचाल कमी झालेले, सुजलेले व दुखणारे सांधे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. बऱ्याच वेळा रोग्याला ताप व आजारीपणाची भावनाही असते.रोगाची तीव्रता कमीजास्त होत राहते. सांध्याची हालचाल वेदनादायक असते व सांध्याची अस्थिरता दृष्टोत्पतीस येते. कालांतराने विशिष्ट प्रकारची व्यंगे निर्माण होतात. नंतर रोगाची तीव्रता नाहीशी झाली, तरी सांध्यातील घटकांचा कमीअधिक प्रमाणात कायमचा नाश झाल्याने नाश झाल्याने त्या सांध्यात अस्थिसंधिवाताची प्रक्रिया सुरू होते.

क्ष-किरण परीक्षेने या रोगाचे निदान निश्चित होते. तसेच रक्ततपासणीतही काही विशिष्ट दोष आढळतात. सांध्याची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी, विश्रांतीसाठी व व्यंग टाळण्यासाठी सांध्याला आधार देणे, व्यायाम व हालचाल, शोथ व रोगप्रतिकारक्षमता प्रतिबंधक विशिष्ट औषधे व परिस्थितीनुसार शस्त्रक्रिया हे या रोगावरील उपचार आहेत.

संधिग्रही कशेरुशोथ : संधिवाताभ संधिशोथापेक्षा भिन्न, विशिष्ट लक्षणे या रोगात दिसत असली, तरी बऱ्याच बाबतींत त्याच्याशी या रोगाचे साम्य आहे व अनेकजण या रोगास त्याचाच एक प्रकार मानतात. या सांध्याचे बंध व संपुट (आच्छादणारे पटल वा पिशवी सारखी संरचना) यांचे कॅल्सीभवन व अस्थीभवन होऊन प्रामुख्याने शरीरमध्यातील (पृष्ठवंशातील) सांध्यांचा संधिग्रह होतो (याउलट संधिवाताभ संधिशोथामध्ये प्रामुख्याने हातापायांतील लहान सांधे ग्रासले जातात). हा रोग प्रौढ वयात आणि मुख्यतः पुरुषांत जास्त आढळतो. रक्ततपासणी व क्ष-किरण तपासणीने निदाननिश्चिती होते. या रोगास विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत परंतु बऱ्याच वेळा रोगप्रक्रिया अचानक बंद होते. वेदनाशामक औषधे आणि अंगस्थिती सुधारणारे व्यायाम यांचा उपयोग होतो. परिस्थितीनुसार शस्त्रक्रियेने उपचार केले जातात.


स्नायू, कंडरा व अस्यपट्ट यांचे रोग : अस्थींना जोडणाऱ्या स्नायूंच्या कंडराकला (व्यवस्थित मांडलेल्या संयोजी ऊतकांचे बनलेले पटल) बंधांच्या ठिकाणी होणारी वेदना या स्वरूपात नेहमी आढळणाऱ्या रोगांना सर्वसाधारणपणे संधीतर वात असे नाव दिले जाते. या रोगांची विकृतिवैज्ञानिक कारणे पूर्णपणे माहीत नाहीत. कंडरेतील व कंडराकलेतील काही तंतूंचे सतत पडणाऱ्या ताणामुळे नीट भरून न येणारे भंग किंवा यां तंतूंचा ऱ्हास यामुळे हे रोग होत असावेत. यांमध्ये टेनिस वा गोल्फ खेळणाऱ्याचा कोपर व निरनिराळ्या कंडरा शोथांचा समावेश होतो. या रोगांसाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत व बहुधा ते कालांतराने आपोआप बरे होतात. विशिष्ट स्नायूंना विश्रांती व त्या स्नायूंची फार ताण न पडता हालचाल या उपचारांचा उपयोग होतो. वोदनाशामक औषधे किंवा जास्त त्रास होत असल्यास काही औषधांची स्थानिक अंतःक्षेपणे (त्या जागी इंजेक्शने) यांचाही उपयोग होतो. क्वचितच शस्त्रक्रियेची जरूरी पडते.

काही वेळा कंडरांचे अचानक विकृतिवैज्ञानिक भंग होतात. भंगाच्या ठिकाणी तात्काळ वेदना जाणवते व त्या स्नायूमुळे होणारे कार्य थांबते. याची सर्व कारणे ज्ञात नाहीत परंतु बहुधा रक्तपुरवठ्यातील व्यत्ययांमुळे कंडरा आधीच कमजोर झालेली असणे हे कारण संभवते. भंगामुळे झालेला कार्यनाश सहसा किरकोळ असतो व उपचारांची जरूर नसते. शस्त्रक्रियेने कंडरा जोडता येतात परंतु हा उपचार समाधानकारक नसतो.

कंडरा आवरणांच्या शोथामध्ये साधे शोथ, पूयजन्य शोथ व संकोची (मार्गाचा किंवा द्वाराचा व्यास कमी झाल्याने होणारा) शोथ यांचा समावेश होतो. साधे शोथ मुख्यतः विस्तारण कंडरा आवरणांना ग्रासतात व नेहमीपेक्षा जास्त कार्य हे त्यांचे कारण असते. आधारपट्टीच्या साहाय्याने पूर्ण विश्रांतीचा उपयोग होतो. पूयजन्य शोथ मुख्यतः पंजाच्या अभिवर्तन (हातवा पाय वर उचलण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या) कंडरा आवरणांना ग्रासतात कारण त्या ठिकाणी इजा होण्याची जास्त शक्यता असते.

संकोची शोथांचे कारण माहीत नाही परंतु वेदना व हळूहळू कमी होत जाणारी हालचाल ही त्याची लक्षणे आहेत. शस्त्रक्रियेने यावर उपचार करावे लागतात. मनगटाच्या अस्थींनी निर्माण झालेल्या पन्हळीतून (मणिबंध मार्गांतून) जाणाऱ्या अनेक कंडरा व कंडराआवरणांच्या सुजेमुळे तंत्रिकांवर दाब पडल्याने हाताच्या पंजात प्रथम वेदना, बधिरता, अपसंवेदना (टोचणे, झिणझिण्या येणे किंवा कापणे यांसारखी भासमान संवेदना), सुसंगत नसलेल्या हालचाली व शेवटी विकलांगता यांसारखी लक्षणे आढळतात. मनगटाच्या पन्हळीवरील तंत्वात्मक आवरणाला उभा (लांबीच्या दिशेने) छेद देऊन या पन्हाळीतील दाब कमी करणे या प्रकारे उपचार करावे लागतात.

आ. ४. मनगटाच्या अस्थींनी निर्माण झालेली पन्हळ:(१) मणिबंध मार्ग (२) पन्हळीवरील तंत्वात्मक आवरण.तळहात किंवा तळपायावरील तंत्वात्मक अस्यपट्ट जाड होऊन आकसणे व त्यामुळे हाताची किंवा पायाची बोटे आत वळणे वा आखडणे ही लक्षणे असणाऱ्या रोगाची कारणे माहीत नाहीत. सुरुवातीस विश्रांती व सौम्य तानन (ताणणे वा ओढ देणे) यांचा उपयोग होतो. नंतर अस्यपट्ट छेदण्याचे शस्त्रक्रियेचे उपचार केले जातात.

काही कंडरांच्या ठिकाणी द्रवार्बुदे (सुस्पष्ट पटल असलेली आणि शरीराच्या पोकळीत किंवा संरचनेत अप्राकृत रीतीने तयार होणारी द्रव भरलेली पिशवीसारखी बंदिस्त संरचना) आढळतात. ती काही वेळा संधिसंपुटाला किंवा कंडरा आवरणाला जोडलेली असू शकतात. काही वेळा ती आपोआप नाहीशी होतात किंवा शस्त्रक्रियेने काढावी लागतात.

आघातजन्य इजेमुळे किंवा वारंवार होणाऱ्या किरकोळ इजांमुळे पुटींचा (हाड व कंडरा यांच्यामधील छोट्या लस्य-लसयुक्त-कोशांचा) शोथ होऊ शकतो. तसेच त्यात पाणी साचून त्यात पाणी साचून द्रवार्बुदे (गाठी) तयार होतात. काही वेळा त्यांतील द्रव शोषून घ्यावा लागतो पण बहुधा ती आपोआप नाहीशी होतात.

अस्थी व स्नायू तंत्रांवर परिणाम करणारे तंत्रिका तंत्राचे रोग : यांमध्ये विशिष्ट परिसरीय तंत्रिकांच्या [केंद्रिय तंत्रिका तंत्राबाहेरील मज्जांच्या ⟶ तंत्रिका तंत्र] इजांमुळे होणारे विशिष्ट भागाचे किंवा स्नायूंच्या गटाचे पक्षाघात, परिमस्तिष्क-मेरुवर्ध्मामुळे (पृष्ठवंशातील दोषाद्वारे उद्‌भवलेल्या परिमस्तिष्क व मेरुरज्जूच्या बाहेर आलेल्या भागामुळे) होणारा शरीराच्या खालच्या भागाचा पक्षाघात, मस्तिष्क पक्षाघात (जन्माआधी व जन्म होताना मेंदूला इजा पोहोचून आलेली विकलांगता, स्नायूंची असंगती व असंबद्ध हालचाल, बोलण्याचा त्रास ही बाह्य लक्षणे यात दिसतात), ⇨बालपक्षाघात, पर्याप्त तंत्वीभवनामुळे (संयोजी तंतुमय ऊतकाची तंत्रिका तंत्रात जादा वाढ होऊन विस्तृत प्रमाणात व अनेक ठिकाणी ऊतक कठीण झाल्याने) होणारा पक्षाघात इ. रोगांचा समावेश होतो. तंत्रिका तंत्राच्या इजा (डोक्याच्या व पृष्ठवंशाच्या इजा) वा रोग अनेक प्रकारचे असेल, तरी त्यामुळे एकूण अस्थि-स्नायुतंत्रावर होणारे परिणाम एकाच स्वरूपाचे व एकाच मार्गाने जाणारे असतात व उपचारांची तत्त्वेही सारखीच असतात. चालक शक्तीचा नाश व संवेदनेचा नाश, दोन्हीही कमीजास्त प्रमाणात एकत्र आढळतात.

चालक शक्तीचा नाश किंवा पक्षाघाताचे परिणाम मुख्यतः दोन प्रकारे होतात. ग्रस्त स्नायूंचा कार्यनाश व तेथील संधीच्या स्थैर्याचा नाश हा एक परिणाम व अनेक कारणांमुळे, विशेषतः वाढत्या वयाच्या मुलांत, व्यंग निर्माण होण्याची शक्यता हा दुसरा परिणाम होय. यामुळे मूळ कार्यक्षमता जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करणे, संधीचे स्थैर्य पुनःप्रस्थापित करणे, व्यंग नाहीसे करण्याचा प्रयत्न करणे व पुढे व्यंग वाढू नये व वारंवार नवीन निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करणे ही तत्त्वे उपचारांमध्ये पाळावी लागतात.

संवेदनेच्या नाशाचे परिणाम मुख्यतः त्वचेवर होतात. संरक्षक संवेदनेअभावी त्वचेवर, मुख्यतः सतत दाब पडणाऱ्या किंवा घर्षण होणाऱ्या भागांवर भरून न येणारे व्रण तयार होतात. बोटांमध्ये संवेदनेचा नाश झाल्यास त्याचे जास्त गंभीर परिणाम दिसतात.


आघातजन्य इजा : डोक्याच्या इजा : डोक्याला धक्का बसल्यावर धक्क्याच्या स्वरूपाप्रमाणे कवटी, मेंदू आणि मस्तिष्क रक्तिवाहिन्या यांना अलग किंवा एकत्रित स्वरूपात अनेक प्रकारच्या इजा होऊ शकतात. त्यामुळे या सर्व इजांना ‘डोक्याच्या इजा’ म्हणतात. डोक्याला धक्का बसताच काही प्रमाणात मेंदूला इजा पोहोचते. या इजेनुसार लगेचच आढळणारी रोग्याची परिस्थिती बदलते आणि बहुधा उपचारानंतर टिकून राहणारे परिणाम व फलानुमानही ठरते. कवटीचे भंग, नंतर येणारी सूज व रक्तस्त्राव यांमुळे ही मूळ परिस्थिती बिघडते. डोक्याच्या इजांमध्ये इजा घडवणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणाइतकेच प्रेरणेची दिशा, पातळी व वेग यांनाही महत्त्व असते. डोक्याच्या इजांमध्ये कवटीचे अस्थिभंग कमी महत्त्वाचे असून इतर इजा व मुख्यतः मेंदूच्या इजा जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळे ‘डोक्याच्या इजांचा’ समावेश मुख्यतः ‘तंत्रिका शस्त्रक्रिया तंत्र’ या वैद्यकाच्या विशेष शाखेत केला जातो. [⟶ तंत्रिका तंत्र शस्त्रक्रिया तंत्र].

मेंदूच्या इजा : मेंदूतील ऊतके धक्क्याच्या क्षणी एकमेकांपासून सरकल्याने वा स्थानभ्रष्ट झाल्याने व पिळवटल्याने या इजा होतात. कवटीमध्ये मेंदू मस्तिष्क-मेरुद्रवात (मुख्यतः मेंदू व मेरुरज्जू यांच्यातील दाब एकसारखा टिकवून ठेवणाऱ्या द्रायूत) तरंगत्या अवस्थेत सैलसर बसवलेला, नीला व मध्यपटलाच्या आधारे टांगलेला व लंबमज्जेच्या [मेरुरज्जूच्या वरच्या टोकाच्या मेंदूशी संलग्न असलेल्या शंकूच्या आकाराच्या भागाच्या ⟶ तंत्रिका तंत्र] ठिकाणी स्थिरावलेला असतो. त्यामुळे कवटीच्या आत त्याची सौम्य हालचाल होऊ शकते आणि धक्क्याचा जोर खूप प्रमाणात जोर खूप प्रमाणात कमी करण्यासाठीच या रचनेचा उपयोग होतो परंतु विशिष्ट दिशेने बसलेल्या मोठ्या धक्क्याच्या क्षणी मेंदूच्या निरनिराळ्या भागांची कमीअधिक हालचाल झाल्याने निर्माण होणाऱ्या ताणामुळे त्यातील तुलनात्मक स्थिर भागांवरून हालणारे भाग सरकतात किंवा पिळवटले जातात. मेंदूची हालचाल पुढे-मागे जास्त मोकळेपणाने होत असल्याने कवटीच्या पुढील व मागील भागांवर झालेले आघात बाजूला झालेल्या आघातांपेक्षा तुलनेने जास्त धोकादायक ठरतात. शिवाय या आघातांत मेंदूची हालचाल होताना तिसरे विवर, अधोथॅलॅमस आणि मस्तिष्कस्तंभ येथे जास्त ताण पडून तात्काळ बेशुद्धी येते. इजेच्या स्थानाप्रमाणे इतर परिणाम दिसतात. [⟶ मेंदू].

मेंदूच्या सर्व इजा वरील एकाच प्रकाराने होत असल्या, तरी तीव्रतेनुसार त्यांना संक्षोम, मुका मार व विदारण असे म्हटले जाते. संक्षोभामध्ये तंत्रिकांवर पडलेला ताण सौम्य असतो आणि प्रत्यक्ष कायिक इजा नसल्याने तात्पुरत्या शरीरक्रियात्मक नाशामुळे तात्पुरती बेशुद्धी व पक्षाघात होतो परंतु नंतर संपूर्ण सुधारणा होते. मुक्या मारामध्ये ताण तीव्र असल्याने काही तंत्रिका तुटतात (प्रत्यक्ष कायिक इजा होतात). त्यामुळे बेशुद्धी जास्त काळ टिकते व इजा झालेल्या भागाच्या कार्याचा कायमचा नाश झाल्याने सुधारणा अपूर्ण असते. या प्रत्यक्ष इजेच्या स्थानाप्रमाणे परिणामस्वरूप टिकून राहणारा कायमचा दोष ठरतो. ही प्रत्यक्ष इजा लंबमज्जेतील महत्त्वाच्या केंद्रांना झाल्यास मृत्यूही येतो. तंत्रिका कोशिकांना इजा पोहोचल्यास त्यांचा ऱ्हास झाल्याने नंतर स्मृतिभ्रंश व व्यक्तिमत्त्वातील बदल संभवतात. विदारणामध्ये मेंदूचा पृष्ठभागही फाटतो व रक्तस्त्रावही होतो. त्यामुळे या इजा सर्वांत जास्त तीव्र वा गंभीर स्वरूपाच्या असतात. सहसा धक्क्याच्या विरुद्ध बाजूच्या मेंदूच्या भागाला अशी इजा होते.

या प्राथमिक इजांनंतर इजेच्या जागी सूज येणे, मस्तिष्क-मेरुद्रवाच्या अभिसरणात अडथळे आल्याने सूज वाढणे व रक्तस्त्राव यांसारखे दुय्यम बदल होतात. त्यामुळे मस्तिष्कातील दाब वाढून नवीन गंभीर लक्षणे दिसू लागतात. फक्त सूज वाढणे व रक्तस्त्राव यांसारखे दुय्यम बदल होतात. त्यामुळे मस्तिष्कातील दाब वाढून नवीन गंभीर लक्षणे दिसू लागतात. फक्त सूज आल्यास व त्यामुळे मस्तिष्कातील दाब वाढल्यास लक्षणांची व्याप्ती वाढते पण सहसा लक्षणे निर्माण होत नाहीत. अशा रोग्यांमध्ये सूज कमी होण्यासाठी निर्जलीकरण घडवून आणणारे (द्रायू कमी करणारे) उपाय केले जातात. याउलट मस्तिष्कात रक्तस्त्राव झाल्याने मस्तिष्कातील दाब वाढल्यास त्वरित शस्त्रक्रियेने उपचार करावे लागतात. त्यामुळे उपचारांची दिशा ठरविण्यासाठी मस्तिष्कातील दाब वाढण्याचे कारण लवकरात लवकर शोधून काढणे आवश्यक असते.

मस्तिष्क रक्तवाहिन्यांच्या इजा : या इजांमुळे होणाऱ्या मस्तिष्कातील रक्तस्त्रावाचे तीन प्रकार आढळतात: (१) बाह्यकांतर्गत रक्तस्त्राव:प्रमस्तिष्क विदारणामुळे किंवा मध्य रोहिणी फुटून या प्रकारचा रक्तस्त्राव होतो. त्याची मस्तिष्क बाह्यकाखाली लहान गुठळी बनते. त्यामुळे मस्तिष्कातील दाब वाढण्याबरोबरच ⇨अपस्मराचे झटकेही येतात. मोठ्या प्रमाणात व मस्तिष्क विवरांत रक्तस्त्राव झाल्यास मृत्यू येऊ शकतो. त्वरित निदान करून विवरांमधून रक्त शोषून घेणे किंवा रक्ताची गुठळी व मेंदूचा मृत भाग काढून टाकणे या प्रकारचे शस्त्रक्रियेचे उपचार करावे लागतात. (२) दृढावरणांतर्गत रक्तस्त्राव : मेंदूपासून (नीलांच्या) कोटरांकडे जाणाऱ्या नीला फुटून या प्रकारचा रक्तस्त्राव मेंदूचा पृष्ठभाग व दृढावरण यांमध्ये होतो. डोक्याला धक्का बसताच आ. ५ दृढावरण बाह्य रक्तस्त्राव:(१) रक्तस्त्राव, (२) मस्तिष्क बाह्यक, (३) मस्तिष्क शंख खंडाच्या आतील कडेचा लंबमज्जेवर पडणारा दाब.मेंदूच्या हालचालीमुळे बहुधा ऊर्ध्व प्रमस्तिष्क नीला तुटते. डोक्याच्या पुढील किंवा मागील भागांवर होणारे त्या मानाने सौम्य (तात्काळ बेशुद्धीसुद्धा न आणणारे) आघात किंवा डोक्याला बसलेल्या हिसक्यामुळेही असा रक्तस्त्राव होऊ शकतो. बऱ्याच वेळा सुरुवातीची बेशुद्धी येत नाही. तीव्र प्रकारांमध्ये बाकी सर्व स्थिती दृढावरण बाह्य रक्तस्त्रावाप्रमाणेच असते परंतु बहुधा अस्थिभंग आढळत नाही. अल्पतीव्र प्रकारांत डोकेदुखी, उदासीनता, मंद प्रतिक्रिया, ग्लानी व बेशुद्धी अशा प्रकारे सावकाश परिस्थिती बदलत जाते. कवटीला व दृढावरणाला भोक पाडून आतील रक्त शोषून घेणे या प्रकारे उपचार केला जातो व लवकर केलेल्या उपचारानंतर परिणाम चांगला दिसतो. (३) दृढावरण बाह्य रक्तस्त्राव : ⇨ कवटीच्या अस्थिभंगाबरोबर अस्थींमधील मार्गातून मेंदूत शिरणाऱ्या रोहिण्या (विशेषतः शंखास्थी जवळील भंगामुळे मध्य परिमस्तिष्क रोहिणी) तुटून या प्रकारचा रक्तस्त्राव कवटी व दृढावरण यांच्या मधल्या जागेत होतो. अनेक वेळा शंखास्थिस्नायूखालीही रक्तस्त्राव आढळतो. काही वेळा प्रत्यक्ष इजा सौम्य भासते आणि इजेबरोबर आलेल्या तात्कालिक बेशुद्धीतून रोगी बाहेर येतो परंतु काही कालानंतर हळूहळू पुन्हा ग्लानी व बेशुद्धीत जातो. नाडी आणि श्वासोच्छवास मंद होत जातो व रक्ताची गाठ चालक बाह्यकावर वाढत जाईल तसतशी क्रमाने विरुद्ध बाजूच्या (चेहरा, हात व पायाच्या) स्नायूंची थरथर व नंतर पक्षाघात होणे आणि त्याच बाजूची डोळ्याची बाहुली विस्तारणे असे चित्र दिसते. नंतर दाब आणखी वाढून लंब मज्जेवर पडल्यास त्याच बाजूचाही पक्षाघात होतो. पूर्ण ताठरपणा व दोन्ही बाहुल्या विस्तारित झाल्यावर उपचारांचा उपयोग होत नाही. यां प्रकारच्या रक्तस्त्रावाचे त्याची नक्की जागा व व्याप्ती यांचे आणि रोग्याच्या परिस्थितीचे पूर्ण निदान त्वरित करून तात्काळ शस्त्रक्रिया (रक्तस्त्रावाच्या ठिकाणी कवटी उघडून रक्ताची गाठ काढून टाकणे) केल्यास या उपचारांचा उपयोग होतो.


आ. ६ कवटीतील खड्डा पाडणारे अस्थिभंग:(अ) मोठ्या गोलसर वस्तूने झालेला (आ) लहान गोलसर वस्तूने झालेला सखंड.कवटीचे अस्थिभंग : कवटी दाबली वा चेचली गेल्याने एका ठिकाणी खड्डा पाडणारा आघात झाल्याने किंवा चाटून जाणाऱ्या धक्क्यांमुळे हे अस्थिभंग होतात. अस्थिभंगाचे स्वरूप व मेंदूच्या इजेची शक्यता व स्वरूप समजण्यासाठी कशा प्रकारे धक्का बसला, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कवटीच्या गोलाचे व तळाचे या दोन प्रकारांत हे अस्थिभंग विभागले जातात.

(१) कवटीच्या गोलाचे अस्थिभंग:हे जास्त प्रमाणात आढळणारे असून कवटी चेपली गेल्याने किंवा कठीण पृष्ठावर कवटी आपटून ते होतात. ते सहसा आवृत व रेषीय (नारळाला एका रेषेत चीर गेल्याप्रमाणे) असतात व त्यामुळे अस्थिभंग म्हणून फारसे गंभीर नसतात परंतु धक्क्याच्या स्वरूपामुळे मेंदूला मोठी व गंभीर स्वरूपाची इजा होण्याची शक्यता जास्त असते आणि कवटीवरील चीर कवटीच्या तळावरही पसरत गेलेली आढळू शकते. कठीण व गोलसर वस्तूने कवटीवर आघात झाल्यास आवृत किंवा सव्रण व खड्डा पाडणारे अस्थिभंग होतात. आघाताच्या जोरानुसार दृढावरण व मेंदूच्या पृष्ठभागाला धक्का पोहोचतो आणि अपस्माराचे झटके येऊ शकतात. सव्रणभंगांत मस्तिष्कमज्जाशोथाची शक्यता असते. कवटीला चाटून जाणाऱ्या आघातांमुळे कवटीचा मोठा तुकडा तुटून उचलला जातो (परंतु सहसा दृढावरण अभंग राहते). बाह्य इजाही मोठ्या स्वरूपात दिसते. एकूण इजा भयंकर दिसत असली, तरी सहसा मेंदूला धक्का न बसल्याने गंभीर नसते. या सर्व अस्थिभंगावर शस्त्रक्रियेने उपचार करावे लागतात परंतु त्याआधी प्रामुख्याने मेंदूच्या इजेकडे लक्ष दिले जाते.

(२) कवटीच्या तळाचे अस्थिभंग: हे सहसा कवटी दाबली वा चेचली गेल्याने व कवटीच्या गोलाची चीर तळापर्यंत वाढल्याने होतात. तळाच्या अस्थींची रचना गुंतागुंतीची असल्याने, त्यांत अनेक पोकळ्या असल्याने, त्यांतील छिद्रांतून महत्त्वाच्या मस्तिष्क तंत्रिका कवटीबाहेर पडत असल्याने व मेंदूच्या तळाचे महत्त्वाचे भाग या अस्थींवर बसवलेले असल्याने या अस्थींचे भंग गुंतागुंतीचे व मेंदूच्या तळातील महत्त्वाचे भाग व मस्तिष्त तंत्रिकांना इजा पोहोचवणारे असतात. तसेच या अस्थिमंगांत मस्तिष्कातील पदार्थ (रक्त, मस्तिष्कमेरुद्रव किंवा प्रत्यक्ष मेंदूची ऊतके) कवटीच्या बाहेर येऊ वा पाझरु शकतात. या भंगांचे पुढील, मधील व मागील भागांतील भंग असे वर्गीकरण केले जाते. उपचार मुख्यतः मेंदूच्या भागांच्या इजांसाठी केले जातात.

डोक्याच्या बंदिस्त इजांचे उपचार : सर्वसाधारणपणे हे उपचार पुढीलप्रमाणे केले जातात. वैद्यकीय व इतर तपासण्या तातडीने करून इजेच्या स्वरूपाचे, व्याप्तीचे व आनुषंगिक तंत्रिका तंत्राच्या इजेचे तात्कालिक निदान केले जाते आणि सर्व लक्षणे, चिन्हे व तपासण्यांचे निष्कर्ष काळजीपूर्वक नोंदवले जातात. त्यामुळे पुढील तपासणीच्या वेळी त्यात झालेले बदल लगेच समजू शकतात. त्यानंतर जरूर असल्यास तातडीने शस्त्रक्रिया केली जाते. अन्यथा शुश्रूषेचे उपचार सुरू केले जातात व रोगी सतत निरीक्षणाखाली व गजबजाटापासून दूर ठेवला जातो. खोल बेशुद्धीत श्वासनालभेद (हवेला वाट करून देण्यासाठी श्वासनाला छिद्र पाडण्याची शस्त्रक्रिया) करून श्वासनलिकेत नळी घातली जाते व जरूरीप्रमाणे ऑक्सिजन व कृत्रिम श्वसन सुरू ठेवले जाते. रोग्याच्या अवस्थेप्रमाणे नीलेत किंवा पोटात नळी घालून द्रवरूप अन्नपदार्थ, द्रव व औषधे सुरू ठेवली जातात. आवश्यकतेनुसार मूत्राशयातही नळी घातली जाते. रोग्याला कुशीवर झोपवले जाते. त्यामुळे बेशुद्धीच्या अवस्थेत लाळ तोंडाबाहेर गळते व जीभ मागे पडून श्वसनाला अडथळा येत नाही. त्वचेची काळजी घेतली जाते व शय्याव्रण होऊ नयेत म्हणून रोग्याला वारंवार ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळवले जाते. हात, पाय इ. अवयवांच्या परकृत हालचाली व मर्दन सुरू ठेवले जाते. रोग्याच्या निरीक्षणात बेशुद्धीच्या पातळीतील बदल किंवा नवीन स्थाननिश्चितिदर्शक चिन्हे आढळून मस्तिष्कातील रक्तस्त्रावाचे निदान झाल्यास त्याप्रमाणे शस्त्रक्रियेचे उपचार केले जातात. मस्तिष्कातील वाढलेला दाब कमी करण्यासाठी निर्जलीकरण उपचारांचा उपयोग केला जातो. अपस्माराचे झटके बंद करणारी, प्रतिजैव व काही वेळा वेदनाशामक औषधे दिली जातात. अशा काही औषधांचा अपवाद वगळता कमी औषधे दिली जातात. याप्रमाणे मेंदूच्या व तंत्रिका तंत्राच्या इजेकडे पुरेसे लक्ष पुरवल्यानंतर कवटीचे अस्थिभंग, इतर अस्थिभंग व इतर इजा यांवर उपचार केले जातात. मूळ इजेतून रोगी बरा झाल्यावर पुढे अनेक दिवस पुनर्वसन उपचार, व्यायाम, मर्दन इ. उपचार सुरू ठेवतात.

पृष्ठवंशाच्या इजा : जोराच्या हिसक्यामुळे मणक्यांमधील सांध्यांच्या बंधांना इजा होण्यामुळे किंवा एकदम जड वजन उचलण्यामुळे मणक्यांना जोडलेल्या स्नायूंना इजा होण्यामुळे पाठ लचकणे वा उसण भरणे हा नेहमी आढळणारा विकार होतो. इजेच्या ठिकाणी जाणवणारी व हालचालींबरोबर वाढणारी तीव्र वेदना, हालचाल आखडणे व काही वेळा सूज येणे अशी त्याची लक्षणे असतात. इजा झालेल्या भागाला विश्रांती, थंड ठेवणे व वेदनाशामक औषधे यांप्रमाणे उपचार प्रथम उपचार प्रथम केले जातात. नंतर शेकणे, मर्दन व हळूहळू वाढवत नेलेली हालचाल उपयुक्त असते.

मणक्यांमधील सांध्यांची स्थानभ्रष्टता वा सांधे निखळणे : फक्त सांधे निखळण्याची वा सरकण्याची इजा मानेच्या भागातच शक्य आहे. पाठ व कंबरेच्या भागांत मणक्यांच्या अनुप्रस्थ प्रवर्धांच्या (आडव्या दिशेत वाढलेल्या भागांच्या) विशिष्ट दिशांमुळे त्यांच्या भंगाशिवाय सांधा निखळू शकत नाही. मानेच्या पहिल्या व दुसऱ्या मणक्यांतील सांधा फासावर लटकल्यास निखळतो व लंबमज्जेस इजा पोहोचल्याने तात्काळ मृत्यू येतो. डोक्यावर पडल्यामुळे जास्त हालचाल असणारे चवथ्या व पाचव्या आणि पाचव्या व सहाव्या मणक्यांतील सांधे निखळू शकतात व मेरुरज्जूस इजा होण्याची शक्यता असते.[⟶ मेरुरज्जु].


मणक्यांचे भंग : मणक्यांच्या निरनिराळ्या भागांचे अर्धवट भंग प्रत्यक्ष आघाताने होतात व त्यामुळे पृष्टवंशाच्या सलगपणाला बाधा न आल्याने सहसा गंभीर नसतात. कमरेच्या भागात मणक्यांच्या अनुप्रस्थ प्रवर्धांचे भंग होण्याची शक्यता जास्त असते व त्यामुळे त्या बाजूच्या वृक्काला (मूत्रपिंडाला) इजा होऊ शकते. कशेरूक-वृंतांच्या [कशेरुक कायाच्या पार्श्व व पश्च कोपऱ्यांपासून मागे जाण्याऱ्या अस्थिविभागांच्या ⟶ कणा व मणका] आत दाबल्या गेलेल्या म्हणजे अवनत भंगामुळे मेरुरज्जूस इजा होऊ शकते. तसेच या अस्थिभंगांबरोबर मेरुरज्जूमध्ये वा मेरुरज्जूभोवती रक्तस्त्राव झाल्यास तंत्रिकांच्या मुळांचा क्षोभ होतो किंवा मेरुरज्जूवर दाब पडतो. यांमुळे शरीराच्या खालच्या भागाचा पक्षाघात होऊ शकतो.

मणक्यांचे संपूर्ण भंग हे जास्त प्रमाणात पुढे वाकावयास लावणाऱ्या जोरदार आघातांमुळे होतात व ते अस्थिभंग व सांधा निखळणे या स्वरूपात असल्याने पृष्ठवंशाचा सलगपणा नष्ट होतो. पृष्ठवंशाचा जास्त हालत्या (मान व कंबर) भागांत किंवा स्थिर व हालत्या भागांतील सांध्यात प्रकारचे भंग होतात. मेरुरज्जू किंवा तंत्रिकांच्या मुळांना कोणत्या भागात व किती प्रमाणात इजा झाली आहे त्याप्रमाणे फलानुमान ठरते.

मेरुरज्जू एकदम ताणली जाणे, अस्थिभंगाच्या ठिकाणी चिमटणे किंवा दाबला जाणे या प्रकारांनी मेरुरज्जूस इजा होऊ शकते व त्याचे परिणाम इजेच्या स्थानाप्रमाणे दिसतात. सर्व प्रकारच्या इजांत मेरुरज्जूस बसलेल्या धक्क्याने (मेरुरज्जू क्षोभामुळे) तंत्रिका जालातील संदेशवहनात (एका तंत्रिका एककाकडून दुसऱ्याकडे तंत्रिका आवेग पोचविला जाण्याच्या क्रियेत) तात्कालिक अडथळा येऊन त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व क्रिया तात्काळ बंद पडतात. त्यामुळे त्या पातळीखालील सर्व ऐच्छिक क्रिया, स्नायूंचा तान (ज्या स्थितीत स्नायूंची कार्ये आरोग्याला हितकारक रीतीने योग्य जोमाने चालू असतात ती स्थिती) व ⇨प्रतिक्षेपी क्रिया कमी वा बंद होऊन शिथिल पक्षाघात होतो आणि मूत्राशयात मूत्र साचत राहते. या आघाताबरोबर मेरुरज्जूस प्रत्यक्ष इजा झालेली नसल्यास साधारण चोवीस तासांत ही कार्ये हळूहळू पूर्ववत सुरू होतात. प्रत्यक्ष इजा असल्यास ही कार्ये पूर्ववत होण्यास जास्त वेळ लागतो. प्रत्यक्ष इजेच्या जागी कमी-अधिक रक्तस्त्राव होतो व सूज चढते व त्यामुळे काही वेळा इजेच्या वरच्या पातळीपासूनही पक्षाघात व संवेदना जाणे ही लक्षणे आढळतात. प्रत्यक्ष इजा झालेल्या भागाचे कायमचे व उपाय करता न येण्याजोगे नुकसान होते. संक्षोभाची लक्षणे कालांतराने कमी होत गेल्यावर एक प्रतिक्षेपी क्रिया पुन्हा सुरू होण्याची अवस्था येते व बहुधा यावेळीच प्रत्यक्ष इजा असल्याचे व तिच्या व्यप्तीचे निदान करता येते.

उपचार : मेरुरज्जू संक्षोभाच्या प्राथमिक अवस्थेत रोग्याच्या सर्व अनावश्यक हालचाली व तपासण्या टाळणे आणि रोग्याला पालथे व पाठीला मागे बाक आलेल्या अवस्थेत सुसज्ज रुग्णाल्यात नेणे आवश्यक असते. तज्ञ वैद्याकडून तपासणी व इतर आवश्यक तपासण्यांनंतर निदाननिश्चिती झाल्यावर आवश्यक अवस्थेत (बहुधा अतिविस्तारित आणि बाक दिलेल्या स्थितीत) अचलीकरण करणे (हालणार नाही अशी अवस्था करणे, उदा., प्लॅस्टर ऑफ पॅरिसने घट्ट बांधून ठेवणे), आहार, पाणी व लवण संतुलन, जरूरीप्रमाणे प्रतिजैव व वेदनाशामक औषझे आणि विशेष शुश्रूषा (उदा., शय्याव्रण प्रतिबंधक त्वचेची काळजी, मलमूत्र विसर्जन संबंधातील काळजी, स्वच्छता, हात व पायांच्या परकृत हालचाली, मूत्राचे व फुप्फुसांचे संक्रामण होऊ नये याची काळजी इ.) याप्रमाणे प्राथमिक उपचार सुरू केले जातात.नंतरचे उपचार प्रत्यक्ष इजेच्या स्वरूपाप्रमाणे ठरतात. काही वेळा शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. प्रत्यक्ष इजेच्या जागी तंत्रिका ऊतकाचा कायमचा नाश झाल्याने त्याचे परिणाम कायम राहातात. त्यामुळे नंतर पुनर्वसन उपचारांची आवश्यकता मोठी असते.

आ. ७. आंतर-कशेरुक चकतीचा भ्रंश आंतर-कशेरूक चकतीचा भ्रंश : अचानक व जोरदार पुढे वाकण्याच्या क्रियेत पृष्ठवंशाच्या जास्त हालचाल असलेल्या भागातील, दोन मणक्यांमधील सांध्यातील चकती पाठीमागे किंवा एका बाजूला सरकू शकते. काही वेळा चकतीचा ऱ्हास हेही कारण असू शकते. चकती मागे किंवा बाजूला सरकल्यास अनुक्रमे मेरुरज्जू किंवा तंत्रिकांच्या मुळांवर दाब पडून त्यानुसार लक्षणे निर्माण होतात. तानन किंवा काही वेळा चकती काढून टाकल्यासारख्या शस्त्रक्रिया हे उपचार केले जातात.

(१) ग्रीवा कशेरुभ्रंश (मानेतील मणके सरकणे) याचे वर्णन याच नोंदीत इतरत्र आलेल आहे. (२) कशेरुभ्रंश यामध्ये शेवटचा कटिकशेरुक त्रिकास्थीच्या [पाच मणके एकरूप होऊन बनलेल्या त्रिकोणी हाडाच्या ⟶ कणा व मणका] पहिल्या कशेरुकावरून मधील चकतीच्या पातळीत पुढे घसरतो व त्याबरोबर वरील सर्व पृष्ठवंश पुढे सरकतो. यामुळे क्वचित तंत्रिकांच्या मुळांवर दाब पडून वेदनेसारखी लक्षणे उद्भवतात परंतु मुख्यतः ही इजा खालच्या पाठदुखीचे (अध:पृष्ठशूलाचे) कारण होते. त्याशिवाय पृष्ठाग्रण (कण्याची पुढील बाजूची अप्राकृत वक्रता) व्यंग निर्माण होते व उंची थोडी कमी होते. वेदनाशात्मक औषधांशिवाय बहुधा जास्त उपचारांची जरूर पडत नाही.

 आ. ८. कशेरूभ्रंश:(१) शेवटचा कटिकशेरूक, (२) आंतर-कशेरूक चकती, (३)त्रिकास्थीचा पहिला कशेरूक, (४) पृष्ठग्रण व्यंग.हाताच्या इजा : बोटे चेचणे, प्रत्यक्ष आघात आणि बोटे वेडीवाकडी पिरगाळली जाणे किंवा वाकणे यांसारख्या इजांमुळे अंगुलास्थिभंग (बोटांतील अस्थिभंग) होतात. इजेच्या स्वरूपाप्रमाणे अस्थिभंग साधा किंवा सव्रण, अनेक तुकड्यांच्या स्वरूपात किंवा तिरकस किंवा सर्पिल असतो. बाजूच्या मऊ ऊतकांनाही इजा असण्याची शक्यता असते. हे अस्थिभंग किरकोळ भासत असले, तरी योग्य प्रकारे इलाज न केल्यास बोटांसारख्या महत्त्वाच्या अवयवांची हालचाल वेदनादायक होते किंवा इजाग्रस्त बोटांत व्यंग निर्माण होते किंवा ती आखडतात व त्यांची कार्यक्षमता कायमची कमी होते. सरलीकरण (शरीराच्या भागाची प्राकृत स्थितीत पुनःस्थापना करणे) व बोटाच्या अभिवर्तित (आत वळलेल्या) अवस्थेत त्यांना आधार देणे असे उपचार साधारण एक महिना द्यावे लागतात परंतु अस्थिभंगाची स्थिती प्राकृत रचनेनुसार करून संपूर्ण बोट अचल ठेवणे अवघड असते. बोटांतील सांधे निखळण्याचे प्रमाण खूप कमी असते. बोट ताणून सांधा बसवणे व बोट (आत वाकवून) अचल ठेवणे हे उपचार करावे लागतात.

बुक्की मारताना झालेली इजा किंवा पंजाच्या पाठीमागील भागावरील प्रत्यक्ष आघातामुळे पंजातील अस्थिभंग होतात. एक किंवा दोन अस्थींत भंग असल्यास शेजारील अस्थींच्या आधारामुळे सहसा वाकडेपणा येत नाही व बाह्य आधारही द्यावा लागत नाही. मनगट, व बाहू (खांदा व मनगट यांमधील भाग) यांचे अस्थिभंग आणि मनगट, कोपर व खांद्याचे सांधे निखळणे या प्रकारच्या इजा बहुधा शरीर पडताना आधारासाठी पुढे केलेल्या हातावर अवाजवी भार पडल्याने होतात. आघाताच्या क्षणी पंजा, प्रबाहू (मनगट व कोपर यांमधील भाग), दंड, खांदा व शरीराच्या अवस्थेप्रमाणे आणि आघाताच्या दिशेप्रमाणे अस्थिभंगाचे किंवा सांधा निखळण्याचे स्थान ठरते. यांमध्ये मनगटातील लहान अस्थींचे भंग, मनगटातील सांधे निखळणे, प्रबाहूतील दोन्ही अस्थींच्या मनगटाजवळच्या टोकांशी भंग होऊन कोलेस अस्थिभंग (अब्राहम कोलेस या शल्यविशारदांच्या नावावरून) हा विशिष्ट व्यंग निर्माण करणारा अस्थिभंग, कोपराचा सांधा निखळून प्रबाहू अंतरास्थीचा (प्रबाहूतील करंगळीकडील हाडाचे) माथा सांध्यातून मागे सरकणे, भुजास्थी कोपरापासून थोडी वर भंग पावून पाठीमागच्या बाजूस वळणे व काही वेळा खांद्याचा सांधा निखळणे या प्रकारांचा समावेश होतो. यांशिवाय प्रत्यक्ष आघात किंवा हात पिरगाळला जाईल अशा इजांमुळेही इतरत्र अस्थिभंग होतात. या प्रकारच्या इजा विशिष्ट प्रकाराने होत असल्याने विशिष्ट वयोगटात प्रामुख्याने आढळतात. विशिष्ट अस्तिभंगासाठी किंवा सांधा निखळण्यासाठी विशिष्ट तंत्रांचा उपयोग करून सरलीकरण (अस्थिरचना प्राकृत अवस्थेत आणणे) किंवा सांधा पूर्ववत बसवणे आणि विशिष्ट कालावधीपर्यंत (अस्थिभंग जुळेपर्यंत) अचसीकरण करणे हे उपचार तज्ञ वैद्याकडून केले जातात.


पायाच्या इजा : सपाट पाऊल, जास्त खोलगट पाऊल, अंगठा इतर बोटांकडे वळणे, ताठ व न वाकणारा अंगठा, हातोड्याप्रमाणे व नख्यांप्रमाणे वळलेली पायाची बोटे इ. दोष पावलात प्रौढ वयात आढळतात. जन्मतः असलेला दोष किंवा ठेवण पुढे कायम राहाणे, चालण्याच्या चुकीच्या सवयी, पादत्राणांतील दोष, बोटातील विशिष्ट स्नायू किंवा तंत्रिकांतील दोष इ. यांची कारणे असू शकतात परंतु बऱ्याच वेळा कारण सापडत नाही. वेदनेसारख्या तक्रारी असल्यास व त्यांचा रचनात्मक विकृतीशी संबंध असल्यासच उपचारांची (व्यायाम, मर्दन, योग्य पादत्राणे व चालण्यातील दोष सुधारणे इ.) जरूर असते. काही वेळा शस्त्रक्रिया आवश्यक ठरते.

पावलातील अस्थिभंग चेचणाऱ्या इजांमुळे होतात तेव्हा बहुतेक वेळा अस्थिभंगापेक्षा इतर मऊ भागांच्या इजा जास्त महत्त्वाच्या ठरतात. काही अस्थिभंग अतिश्रमाचे परिणाम म्हणून होतात [उदा., वारंवार ताण पडून पावलांच्या हाडांमध्ये खालील टोकाशी होणारा संचलन (मार्च) अस्तिभंग]. रुंद पट्टी गुंडाळण्याखेरीज इतर उपचारांची यावर सहसा जरूर पडत नाही. उंचावरून पावलावर पडल्याने गुल्फास्थी (घोट्याचे हाड) किंवा टाचेवर पडल्यास पार्ष्ण्यास्थी (टाचेचे हाड) भंगते. या इजांत (मुख्यतः पहिल्या प्रकारात) घोट्याच्या सांध्याचा बहुधा समावेश असल्याने सांधा अचल होणे, वेदना व कालांतराने सांध्यात अस्थिसंधिवाताचे बदल या गोष्टी संभवतात.तसेच अस्थिभंगानंतर भंगलेल्या तुकड्यांच्या रक्तपुरवठ्यात व्यत्यय आल्याने (मुख्यतः गुल्फास्थी) तेथे अमिकोथ होणे व भंग भरून न येणे या गोष्टी संभवतात.

घोट्याच्या सांध्याला अनेक प्रकारच्या इजा संभवतात. पावलाचे अंतर्वलन व बहिर्वलन (पाऊल आत किंवा बाहेर वळणे), आत किंवा बाहेर अक्षीय परिवलन (फिरणे) किंवा उंचावरून पावालावर पडणे यांमुळे या इजा होतात. चालत किंवा पळत असताना पाऊल अडकल्यास स्थिर होते परंतु वरील शरीराची हालचाल सुरू राहिल्याने घोट्यावर पडणाऱ्या ताणामुळे या इजा होतात. त्यातही पावलाचे बाहेर वळल्याने (पॉट अस्थिभंग) किंवा आत वळल्याने होणाऱ्या इजांचे प्रमाण जास्त असते. बहुतेक इजांत सांध्यात समाविष्ट अस्थी, उपास्थी, सांध्याचे संपुट व बंध , बाजूचे स्नायू व त्याच्या कंडरा इ. अनेक घटकांना इजा झालेली असण्याची शक्यता असते. इजेच्या संपूर्ण स्वरूपाचे योग्य निदान करून त्याप्रमाणे उपचार करावे लागतात.

पायात अस्थींचे भंग अपघातात पाय सापडल्याने बहुधा सव्रण व गुंतागुंतीच्या भंगाच्या स्वरूपात होतात. काही वेळा ते पिरगळणाऱ्या इजांमुळेही होऊ शकतात. इजेच्या स्वरूपामुळे अंतःस्थ किंवा बाह्य आधार किंवा तानन या रीतीने उपचार केले जातात. 

गुडघ्याच्या सांध्याला अनेक प्रकारच्या इजा होऊ शकतात. कारण शरीराचे वजन सहन करणाऱ्या महत्त्वाच्या सांध्यातील एक आणि पायांच्या हालचालीत महत्त्वाचा सहभाग असलेला हा सांधा आहे. शिवाय स्थैर्यासाठी हा मुख्यत्वे स्नायू व बंधांवर अवलंबून असून हे बंध सांध्याबाहेर व सांध्याच्या पोकळीत असे दोन्ही ठिकाणी असतात व शरीरातील या एकाच मोठ्या सांध्यात तंतुमय उपास्थींच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आ. ९. अचलीकरणासाठी तानन पद्धती:(अ) तानन (१) व प्रतिताननाचा (२) उपयोग (आ) टॉमस बंधफलकाचा वापर.पटलांचा समावेश असतो. त्यामुळे या सांध्यांच्या इजांमध्ये बंधांच्या इजा, या पटलांच्या इजा, पाय ताठ करणाऱ्या स्नायु-कंडरा-अस्थिसमूहाच्या इजा आणि ऊर्वस्थी व अंतर्जघास्थींच्या (मांडी व पायाच्या आतील अस्थीच्या) सांध्यात समाविष्ट भागाच्या इजा यांचा समावेश होतो. गुडघ्यावर शरीराचे वजन असताना किंवा नसताना गुडघा ताठ (सरळ) किंवा वाकलेला असताना आणि ते हालचाल करत असताना किंवा नसताना मांडीवर किंवा पायावर आघात होणे किंवा पाय अडकून मांडी पुढे ढकलली जाणे किंवा पायावर वळणे (फिरणे) अशा प्रकारच्या निरनिराळ्या क्रिया एकाच वेळी होणे शक्य असते व त्यामुळे वरील इजा होतात. यातील उपास्थींच्या चंद्रकोरीच्या पटलांच्या इजा भरून न येता वाढतच जातात कारण त्यांना रक्तपुरवठा नसतो. परिणामी कालांतराने गुडघ्याच्या प्राकृत हालचालींतील ‘मोकळे होणे’ व ‘अडकणे’ (सुटका व अटक) या महत्त्वाच्या कार्यात अडथळे येतात. चतुःशिरस्त्र (वरील दिशेत चार भागांत विभागलेल्या मांडीच्या पुढील भागातील मोठा प्रसारक) स्नायू, कंडरा व कंडरेत समाविष्ट अस्थी (गुडघ्याची वाटी) यांच्या इजा प्रत्यक्ष आघाताने किंवा या सर्वांचे (संचाचे) कार्य (पाय ताठ करण्याचे) सुरू असताना पाय वाकल्याने होतात. अनेक प्रकारच्या व गुंतागुंतीच्या इजा असल्याने आणि शरीराचे वजन पेलणे व हालचाल या दोन्ही दृष्टींनी हा सांधा महत्त्वाचा असल्याने या इजांचे निदान व उपचार तज्ञ अस्थिवैद्याने करण्याची आवश्यकता असते.

आ. १०. सळई व धातूच्या पट्टीने अचलीकरण. मांडीवरील प्रत्यक्ष आघातांमुळे ऊर्वस्थीचे भंग होतात व हे प्रामुख्याने तरुण वयात आढळतात. निदान सहसा उघड असते. उपचार करताना सरलीकरण व अचलीकरण याबरोबर पायाची लांबी कायम ठेवणे व गुडघ्याचा सांधा आखूड न देणे यांकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. त्याकरिता ताननाच्या अनेक पद्धती वापरतात (उदा., टॉमस बंधफलक) किंवा धातूची पट्टी व स्क्रू यांच्या साहाय्याने किंवा सळईच्या साहाय्याने अंतर्गत अचलीकरण करतात.

श्रोणिसंधीच्या इजांत ऊर्वस्थिग्रीवेच्या सांध्यांतर्गत व बाह्य इजा आणि श्रोणिसंधी निखळणे यांचा समावेश होतो. सांध्यांतर्गत अस्थिभंग गुंतागुंतीचे आणि उपचारास अवघड असतात. तुटलेल्या अस्थीच्या तुकड्यांच्या रक्तपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने तेथे ऊतकमृत्यू (अभिकोथ) होतो व अचलता कायम ठेवणेही अवघड असल्यामुळे भंग जुळून न येण्याची गुंतागुंतही होऊ शकते. (त्यामानाने सांध्याबाहेरील अस्थिभंग कमी गुंतागुंतीचे असतात). इजेच्या स्वरूपाप्रमाणे उपचार केले जातात. बहुधा शस्त्रक्रिया व अचलता राखण्यासाठी स्क्रू, सळई, धातूची पट्टी इत्यादींचा उपयोग करावा लागतो. मांडीच्या अस्थीच्या शीर्षात (माथ्यात) अभिकोथ झाल्यास तो भाग काढून कृत्रिम शीर्ष बसवावे लागते.


श्रोणिसंधी किंवा खुब्याचा सांधा मागे, पुढे किंवा मधे [ऊर्ध्वस्थिशीर्ष श्रोणिअस्थीच्या उलूखलात (खळग्यात)] निखळू शकतो व त्याबरोबर त्या ठिकाणच्या श्रोणिअस्थींचे भंग होऊ शकतात. अस्थिभंग न होता सांधा मागे निखळला असल्यास तो पूर्ववत बसविणे व पाय ताणणे हे उपचार पुरेसे असतात. अन्यथा उपचार शस्त्रक्रियेचे व गुंतागुंतीचे असतात.

श्रोणिअस्थींच्या काही ठिकाणच्या भंगांत (श्रोणिफलकाची वरची जाड वक्र कडा) अस्थींना स्नायूंचा आधार असल्याने अस्थींचे तुकडे एकमेकांपासून सरकलेले नसतात व लक्षणे कमी होईपर्यंत (दोन ते तीन आठवडे) विश्रांती पुरेशी असते. श्रोणिअस्थी व बंधाचे मिळून जे दृढ कडे बनलेले असते, त्यांचे भंग चिरडणारे प्रत्यक्ष आघात किंवा ऊर्वस्थीमार्फत होणारे अप्रत्यक्ष आघात यांमुळे होतात. भंग एकाच ठिकाणी असल्यास अस्थी एकमेकींपासून सरकलेल्या नसतात व अस्थी जुळून येईपर्यंत (सहा आठवडे) विश्रांती पुरेशी असते. भंग दोन किंवा जास्त ठिकाणी असेल, तर अस्थींचे तुकडे एकमेकांपासून सरकलेले असतात आणि ते पुन्हा जुळवणे जवळजवळ अशक्य असते. श्रोणिअस्थीच्या उलूखलातील भंगांच्या उपचाराचे परिणाम समाधानकारक नसतात. त्रिकास्थि-श्रोणिसंधी स्थानभ्रष्ट झाल्यास बहुधा कायमची पाठदुखी सुरू होते. अंतर्गत गुप्त (झाकल्या गेलेल्या) रक्तस्त्रावाची व आतील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा पोहोचलेली असण्याची शक्यता ही श्रोणिअस्थींच्या भंगातील महत्त्वाची गोष्ट आहे. ही शक्यता गृहीत धरून त्यांचे निदान व त्यांवरील उपचार प्रथम महत्त्वाचे असतात. त्यानंतर अस्थिभंगावर शक्य असल्यास उपचार केले जातात.

अस्थिभंग भरून येण्याची प्राकृत प्रक्रिया : अस्थिभंग होताना अस्थीतील आधारद्रव्य, पर्यास्थी, अंतरास्थी, अस्थिमज्जा, बाह्यक व परिअस्थीमधील रक्तवाहिन्या आणि बाजूची मऊ ऊतके यांनाही इजा होते [⟶ अस्थि]. यांतील रक्तवाहिन्या, पर्यास्थी, अंतरास्थी आणि काही प्रमाणात अस्थिकोशिका अस्थी जुळून येण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात. लांब व पोकळ अस्थींमध्ये भंग होताच झालेल्या रक्तस्त्रावामुळे तुटलेल्या टोकांभोवती रक्ताची गाठ तयार होते आणि त्यात इजा झालेल्या रक्तवाहिन्या, पर्यास्थी व अंतरास्थीतील उत्तेजित कोशिका प्रथम कणोतकाची (जखमेत नष्ट झालेल्या ऊतकाची जागा तात्पुरती घेणाऱ्या कणमय भासणाऱ्या ऊतकाची) व नंतर नवीन अस्थि-ऊतकाची भर टाकतात. याच क्रियेत महाभक्षी कोशिका (अपायकारक पदार्थ भक्षण करून त्यांच्यापासून शरीराचे रक्षण करणाऱ्या कोशिका) आणि अस्थिकोशिकाही सहभागी होत असण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अंदाजे दोन ते तीन आठवडे चालते. त्यानंतर याच कोशिकांकडून या ऊतकाचे हळूहळू कॅल्सीभवन व अस्थिभवन केले जाते आणि अस्थी जुळून येते. प्रथम तयार झालेल्या रक्ताच्या गाठीच्या ठिकाणी याप्रमाणे हळूहळू चार ते पाच आठवड्यांत तुटलेली टोके जोडणाऱ्या अस्ताव्यस्त स्वरूपातील अस्थीची-किणोतकाची-निर्मिती होते. पुढे त्यात नवीन केशवाहिन्याची वाढ व त्यांभोवती नवीन अस्थि-ऊतकनिर्मिती होऊन हॅवर्झियन तंत्रे निर्माण होतात. त्याचबरोबर अतिरिक्त अस्थि-ऊतकाचे अस्थिभंजक कोशिकांकडून शोषण होते. याप्रमाणे पुढे सु. एक वर्षाच्या काळात अस्थिभंगाची सीमा रेषा पुसट होत जाऊन अस्थी मुळाबरहुकूम जुळून येते. छिद्रयुक्त वा सुषिर अस्थींमध्ये जुळून येण्याची प्रक्रिया वरीलप्रमाणेच परंतु असंख्य लहान लहान भंगांभोवती घडते आणि कालांतराने अस्थिनिर्मिती व अनावश्यक अस्थीचे शोषण या प्रक्रियेने एकसंध किणोतकाचे पुन्हा मुळाबरहुकूम सुषिर अस्थीत रूपांतर होते.

उपास्थी कोशिका विभाजनाने पुन्हा निर्माण होऊ शकत नसल्याने (त्यांचे विभाजन होऊ शकत नसल्याने) सांध्यातील उपास्थीच्या बाबतीत प्रत्यक्ष भरून येण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही परंतु इजाग्रस्त भाग उपास्थिसदृश्य तंतुमय उतकाच्या व्रणाने भरून येतो. मात्र काही वेळा या प्रक्रियेत अनावश्यक तंतुमय बंध निर्माण होऊन सांधा कायमचा जखडला जाऊ शकतो. कालांतराने अशा इजाग्रस्त सांध्यात अस्थिसंधिशोध प्रक्रिया सुरू होऊन सांध्याचे जास्तच नुकसान होत जाते.

सांध्याचे बंध व स्नायुकंडरा तुटल्यावर तेथे निर्माण झालेल्या रक्ताच्या गाठीत नवीन तंतुमय ऊतकनिर्मिती होऊन हे भंग जुळून येतात परंतु बहुधा स्नायुबंध तुटल्यावर स्नायूच्या आकुंचनमुळे तुटलेली टोके एकमेकांपासून दूर गेल्याने इजा भरून येऊन एकसंधात कायम राहणे अशक्य होते. ही टोके शस्त्रक्रियेने जोडल्यावरही स्नायूच्या आकुंचनामुळे इजेच्या जागी सतत पडणारा ताण, हालचाल आणि मुळातच स्नायुबंधाचा कमी रक्तपुरवठा यांमुळे भंग भरून येणे अवघड होते.

अस्थिभंग भरून येण्याच्या प्राकृत प्रकियेमधील अडथळे : शरीराच्या निरनिराळ्या भागांतील भंग प्राकृतपणे जुळून येण्यास निरनिराळे कालावधी लागतात. तसेच हे कालावधी रुग्णाचे वय, भंगाचा प्रकार, इतर गुंतागुंत व उपचार यांवरही अवलंबून असतात. या गोष्टींच्या विचारानंतरही भंग जुळून येण्यास जास्त कालावधी लागला, तर त्यास विलंबित जुळणी असे म्हणतात. असे भंगही कालांतराने भरत जातात पण अस्थीची पूर्ण जुळणी होण्याच्या आत ते भरून येण्याची प्रक्रिया बंद झाल्यास त्याला न-जुळणी असे म्हणतात. एकसंध जुळणी न झालेला भाग वस्तुतः तंतुमय ऊतकाने जोडलेला असतो. काही वेळा हा भाग जास्त लांब व आत पोकळी असलेला झाल्यास तेथे छद्म संधीही (खोटा सांधाही) तयार होऊ शकतो. भरून येण्याच्या कालावधीत अनावश्यक व जास्त हालचाल, शोथ प्रक्रिया, अपुरा रक्तपुरवठा किंवा रक्तपुरवठ्यात व्यत्यय, भंगाच्या भोवताची मऊ ऊतके भंगाच्या फटीत अडकणे आणि मोठा शारीरिक रोग ही विलंबित जुळणीची कारणे असतात.

अस्थिभंगाचे उपचार : येथे अस्थिभंगावरील सर्वसाधारण उपचारांचे विवेचन केले आहे. निरनिराळ्या ठिकाणच्या अस्थिभंगांचे विशिष्ट उपचार त्या त्या ठिकाणी थोडक्यात सांगितले आहेत.

अस्थिभंगाच्या रोग्यावरील सर्वसाधारण उपचार व अस्थिभंगाच्या ठिकाणी केले जाणारे उपचार अशा दोन प्रकारे उपचार करावे लागतात.

सर्वसाधारण उपचार : सर्व अस्थिभंगांमध्ये तीव्र व हालचालीबरोबर वाढणारी वेदना हे महत्त्वाचे लक्षण असल्याने वेदनाशामक औषधे दिली जातात व अस्थिभंगाच्या ठिकाणी आधार देऊन तेथील हालचाल बंद करण्याचा प्रयत्न करून वेदना कमी करण्याकडे प्रथम लक्ष दिले जाते. रोग्याची सर्वसाधारण परिस्थिती व त्यात रक्तस्त्रावामुळे होणारे बदल यांकडे बारकाईने लक्ष ठेवून रक्तस्त्रावाच्या प्रमाणानुसार द्रव किंवा रक्त देऊन रक्तस्त्रावाची भरपाई केली जाते. तसेच अस्थिभंगाबरोबर झालेल्या इतर इजांचे त्वरित निदान व त्यांवरील उपचार यांकडेही लक्ष पुरवावे लागते. कित्येक वेळा (उदा., डोके, पृष्ठवंश, छातीचा पिंजरा व श्रेणीतील अस्थिभंग) अस्थिभंगाच्याही आधी या इजांमध्ये लक्ष देणे अधिक गरजेचे असते.


अस्थिभंगाच्या ठिकाणचे उपचार : अवयवाची व अस्थींची भंगामुळे बिघडलेली रचना पूर्ववत प्राकृत करणे म्हणजे सरलीकरण व ती तशीच कायम ठेवण्यासाठी, भंग भरून येण्याच्या कालावधीपर्यंत, अस्थिभंगाच्या जागेची हालचाल बंद करणे म्हणजे अचलीकरण या दोन मुख्य तत्त्वांनुसार कोणत्याही अस्थिभंगावर उपचार केले जातात.

गुंतागुंतीच्या नसलेल्या व बंदिस्त (सामान्य) अस्थिभंगांसाठी रोग्याला पूर्ण भूल देऊन अवयव ताणून भंगाची टोके एकमेकांसमोर आणली जातात व हे करतानाच भंगाच्या ठिकाणी झालेले कोनात्मक व काही वेळा पिळवटण्याचे व्यंग काढून रचना पूर्ववत प्राकृत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर बाह्य आधाराने अचलीकरण केले जाते. गुंतागुंतीच्या, म्हणजे भंगामध्ये मऊ ऊतके चिमटलेली असण्याची शक्यता असलेल्या, अस्थिभंगाजवळील इतर अवयवांना इजा झाली असण्याची शक्यता असलेल्या, सांध्याजवळच्या, अनेक लहान तुकडे असलेल्या बंदिस्तपणे रचना पूर्ववत प्राकृत करणे अशक्य असलेल्या किंवा बाह्य आधाराने ती अवस्था तशीच कायम ठेवणे अशक्य असलेल्या आणि सव्रण अस्थिभंगांत शस्त्रक्रियेने अस्थिभंगाची जागा उघडून अस्थिभंगांची व इतर मऊ ऊतकांची रचना पूर्ववत प्राकृत करावी लागते व इतर अवयवांच्या इजांकडेही लक्ष द्यावे लागते. त्यानंतर शक्य असल्यास बाहेरून अन्यथा आतून आधार देऊन अस्थिभंगाची जागा अचल करावी लागते.

अस्थिभंगाची जागा अचल करण्यासाठी बाह्यतः आधारपट्टी व तानन हे उपाय योजतात (आ. ९) व त्याबरोबर अस्थिभंगाच्या जागेवरील भार कमी करण्यासाठी अवयव उचलला जातो वा अधांतरी तरंगता ठेवला जातो. आधारपट्टीसाठी सहसा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आधार फलक व बंधपट्टी यांचा उपयोग केला जातो. ही आधारपट्टी अस्थिभंगाच्या जागेच्या वरच्या व खालच्या सांध्यांच्या पलीकडे पोहचेल अशी असते. या पद्धतीच्या आधारपट्टीत काही दोष असल्याने, काही ठिकाणी ती व बंधपट्टी वापरणे अशक्य किंवा गैरसोयीचे असल्याने व काही वेळा भंगाची जागा अचल करण्याच्या दृष्टीने ती निरुपयोगी ठरत असल्याने अशा वेळी शक्य असलेल्या ठिकाणी तानन पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत भंगलेल्या अस्थीच्या लांबीच्या दिशेने आवश्यकतेप्रमाणे त्वचातानन किंवा अस्थितानन केले जाते. अस्थिताननासाठी अस्थींच्या विरुद्ध बाजूंच्या दोन टोकांतून (भंगलेल्या टोकांतून नव्हे) तारा किंवा लहान सळ्या घालून त्या एकमेकींपासून दूर खेचल्या जातात किंवा त्यांना वजने लावली जातात. रोग्याच्या स्वतःच्या किंवा अवयवाच्या वजनाचाही प्रतिपातनासाठी (विरुद्ध दिशेने जोर लावण्यासाठी) उपयोग करून घेता येतो. काही ठिकाणच्या अस्थिभंगांना (उदा., हाताच्या तळव्यातील, पावलातील व श्रोणीतील) काही वेळा बाह्य उपचारांना अचल करण्याची जरूर नसते कारण शेजारची मऊ ऊतके व इतर अस्थींमुळे आपोआपच अचलता प्राप्त होते.

आतून आधार देऊन अस्थिभंग अचल करण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूर असते. यामध्ये तुटलेले अनेक तुकडे बांधणे किंवा स्क्रूचा उपयोग करून जोडणे, धातूची पट्टी स्क्रूच्या साहाय्याने भंगाच्या जागी जोडून प्रत्यक्ष आधार देणे किंवा अस्थीचे दोन्ही समोरासमोर आणून अस्थिमज्जानालातून (त्यांमधील पोकळीतून) आरपार सळई घालणे इ. उपाय केले जातात. जिवंत राहू न शकणारे अस्थींचे तुकडे व इतर मृत मऊ ऊतकांचे भाग काढून टाकतात. काही वेळा जरूरीप्रमाणे अस्थिरोपण केले जाते किंवा काढलेल्या अस्थीच्या जागी कृत्रिम भाग बसवला जातो.

स्त्रवण अस्थिभंगातून जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने शस्त्रक्रियेने उपचार करताना जखम व इजा झालेला भाग जंतुनाशक द्रव्यांनी स्वच्छ करणे, जिवंत राहू न शकणारी ऊतके काढून टाकणे, अस्थिभंग व इतर ऊतकांचा शक्यतो प्राकृत पुनर्रचना व दुरुस्ती करणे, अस्थिभंगाला आधार देणे, जखमेचा भाग पूर्णपणे त्वचेने आच्छादिला जाईल हे पहाणे व प्रतिजैव औषधांचा योग्य वापर करणे ही तत्त्वे पाळली जातात.

या सर्व उपचारांबरोबरच अस्थिभंगाच्या भोवतालची मऊ ऊतके (मुख्यतः स्नायू) व सांधे कार्यक्षम राहण्यासाठी अचल न केलेल्या सांध्यांची हालचाल व अचल केलेल्या भागाभोवतालच्या स्नायूंची हालचाल घडवून आणण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार विशेष व्यायामांची व भौतिकी चिकित्सेची जरूर असते.

तपासण्या : अस्थी व संधिविकारांच्या निदानास उपयुक्त तपासण्यांचे सर्वसाधारण तपासण्या आणि विशेष तपासण्या असे दोन भाग पडतात. [⟶ रोगनिदान].

सर्वसाधारण तपासण्या : रक्त, मल, मूत्र इत्यादींच्या प्राथमिक तपासण्या व रक्तातील काही घटकांचे (उदा., शर्करा, यूरिया, कोलेस्टेरॉल, प्रथिने, लवणे इ.) प्रमाण ठरविणाऱ्या तपासण्या यांचा या तपासण्यांत समावेश होतो. या तपासण्यांवरून रोग्याच्या सर्वसाधारण परिस्थितीची कल्पना येण्यास मदत होते.

विशेष तपासण्या : अस्थी, संधी व स्नायू तंत्राच्या विशिष्ट रोग्यांच्या निदानासाठी या तपासण्या उपयुक्त ठरतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत. अस्थी व संधींच्या रोगनिदानात क्ष-किरण छायाचित्राचे महत्त्व मोठे आहे. बहुधा या तपासणीशिवाय अस्थि-संधी तंत्राची वैद्यकीय तपासणी पूर्ण होत नाही. बहुतेक इजा, विकार व रोगांचे क्ष-किरण छायाचित्र वैशिष्ट्यपूर्ण व बहुधा निदाननिश्चिती करणारे असते. तसेच उपचारांची दिशा व स्वरूप या छायाचित्रांवरून ठरविता येते. उपचारानंतर त्यांची अचूकता व उपयुक्तता अजमावण्यासाठी आणि रोग्याची प्रगती पाहण्यासाठीही तात्काळ व नंतर ठराविक कालावधी नंतर काढलेली क्ष-किरण छायाचित्रे उपयुक्त ठरतात.

काही संक्रामणे, विशिष्ट रोग व सर्व अर्बुदांच्या निदाननिश्चितीसाठी त्या ठिकाणच्या अस्थीची व काही वेळा अस्थिमज्जेची जीवोतक परीक्षा आवश्यक असते.

काही संक्रमणांत कारणीभूत रोगजंतू शोधणे व त्यावर जास्तीत जास्त उपयुक्त प्रतिजैव औषधे शोधणे यासाठी पुवाची संवर्धन आणि संवेदनक्षमता तपासणी आवश्यक असते.

संधीच्या अनेक विकारांत आता प्रत्यक्ष संधी न उघडता लहान दुर्बिणीच्या साहाय्याने आतीव पोकळी व पृष्ठभागाचे निरीक्षण करून, म्हणजे संधी गुहांत दर्शनाने संधिपुटांतर्गत विकृतीचे विश्लेषण करता येते व व पुढील उपचारांची दिशा ठरविता येते. तसेच काही वेळा तपासणीबरोबरच त्याच मार्गाने शस्त्रक्रियेचे उपचारही करता येऊ शकतात. या प्रकारे दुर्बिणीच्या वापरामुळे सांध्यांसाठीच्या शस्त्रक्रियांच्या दृष्टीने मोठाच फायदा झाला आहे.

श्राव्यातील ध्वनि-प्रतिमादर्शन (मर्यादित प्रमाणात), संगणकीय अक्षीय छेदप्रतिमादर्शन, अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन [⟶ वैद्यकीय प्रतिमादर्शने] इ. नवीन तंत्राच्या विकासामुळे क्ष-किरण छायाचित्रांच्या मर्यादेपलीकडे कित्येक भागांचे यथार्थ प्रतिमादर्शन व त्यायोगे निदाननिश्चिती आता शक्य झाली आहे. तसेच अचूक, कमीत कमी इजा करणाऱ्या व उपयुक्त उपचारांचे संयोजन (योजना) करणेही आता शक्य झाले आहे. याचे महत्त्व विशेषतः डोक्याच्या (कवटीच्या), पृष्ठवंशाच्या व श्रोणीच्या इजा व रोगांमध्ये मोठे आहे.


उपचार : विकलांग चिकित्सेमध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा समावेश होत असला, तरी या सर्व रोगांत शारीरिक हालचाली व स्थैर्याशी निगडित यंत्रणेतील अस्थी, संधी व स्नायू या सर्व घटकांमध्ये कमीअधिक प्रमाणात बिघाड होतो. त्यामुळे उपचार करताना मूळ रोगावर उपचार करणे, रोग्याचा त्रास कमी करणे, शारीरिक स्थैर्य व कार्यक्षमता कायम राखण्याचा प्रयत्न करणे, व्यंग टाळणे किंवा कमीत कमी होईल हे पाहणे व झाल्यास पुढे ते वाढू नये यासाठी प्रयत्न करणे आणि रोग बरा झाल्यावर उरलेल्या अकार्यक्षमतेवर उपाय म्हणून पुनर्वसनाचे प्रयत्न करणे हे हेतू डोळ्यासमोर ठेवावे लागतात.

रोगनिदान व उपचारांमध्ये सध्याच्या काळात खूप प्रगती झालेली असली व तांत्रिक दृष्ट्या आधुनिक उपचार जास्त परिपूर्ण, परिणामकारक व उपयुक्त असले, तरी पूर्वीपासून सांगितलेली उपचारांची आयुर्वेदातील आणि पाश्चात्त्य वैद्यकीय मूलतत्त्वे आजही लागू आहेत.

विशिष्ट उपचार : विशिष्ट रोगांसाठी उपलब्ध असलेले विशिष्ट उपचार त्या त्या रोगांचे वर्णन करताना सांगितले आहेत. काही रोगांत पूर्णतः वैद्यकीय (औषधीय) तर काहीत पूर्णतः शस्त्रक्रियेने उपचार जरूर असतात परंतु बहुतेक रोगांत मिश्र स्वरूपाचे उपचार करावे लागतात. कर्करोगांमध्ये या दोन्हीबरोबरच खोलवर पोहोचणारे क्ष-किरण व इतर प्रारणांचा उपयोगही आवश्यक ठरतो.

सूक्ष्मजंतुजन्य विकार प्रभावी प्रतिजैव औषधांच्या उपयोगाने परिणामकारक रीतीने आटोक्यात आणता आल्याने मृत्यू, ऊतकनाश व व्यंगाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. त्यामुळे खराब झालेला भाग काढून टाकणे व व्यंग दुरुस्त करणे यासाठी कराव्या लागणाऱ्या काही शस्त्रक्रियांचे प्रमाणही कमी झाले आहे. तसेच कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर भरून येण्याच्या क्रियेत जंतूंच्या प्रादुर्भावाचा व्यत्यय न आल्याने व भूल देण्याच्या अधिक सुरक्षित पद्धतींमुळे सर्वसाधारणपणे अनेक शस्त्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत जास्त सुरक्षित झाल्या आहेत. नवीन वेदनाशामक व शोथ प्रक्रिया प्रतिबंधक औषधांमुळेही उपाययोजना अधिक परिणामकारक होऊ लागली आहे.

रोग्याचा त्रास कमी करणारे उपचार : यांमध्ये मुख्यतः रोगग्रस्त भागाला विश्रांती देणे व वेदनाशामक औषधे यांचा समावेश होतो. रोगग्रस्त भाग भरून येण्यास मदत करणे, तुटलेले भाग एकमेकांसन्निध अचल ठेवणे व वेदना कमी करण्यासाठी विश्रांतीचा उपयोग होतो. विश्रांती दोन प्रकारांनी दिली जाते. एक म्हणजे तानन व प्रतितानन, ज्यामध्ये दुखावलेले भाग एकमेकांपासून योग्य अंतरावर, योग्य सरलीभूत अवस्थेत व अचल ठेवले जातात. अस्थिभंगानंतर स्नायूंच्या आकुंचनामुळे अस्थीचे तुकडे एकमेकांवर चढतात व त्यांमध्ये कोनात्मक व्यंग निर्माण होते. तसेच संधिविकारांतही संधीभोवतालचे स्नायू आकुंचन पावून सांध्याचा आकार बिघडतो व व्यंग निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी तानन आवश्यक असते. ते अनेक प्रकारांनी देता येते. [⟶ अस्थिभंग].

विश्रांती देण्याचा दुसरा उपाय म्हणजे अचलीकरण होय. त्यामुळे जुळून येणारे भाग सरलीकरणानंतर एकमेकांसमोर स्थिर राहू शकतात वेदना हालचालबरोबर वाढत असल्याने ती तात्काल कमी होते व व्यंग निर्माण होत नाही. बाह्य व अंतर्गत, दोन्ही प्रकारांनी अचलीकरण करता येते [⟶ अस्थिभंग]. बाह्य अचलीकरणासाठी अजूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यांचा उपयोग केला जातो. अंतर्गत अचलीकरणासाठी मात्र अनेक प्रकारच्या धातूंच्या पट्ट्या, स्क्रू, खिळे, शलाका व इतर अनेक नवीन प्रकारची साधने वापरली जातात. शरीराच्या इतर भागांस इजा व त्यांचा क्षोभ होणार नाही व कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया होणार नाही अशा प्रकारचे नवीन मिश्रधातू व प्लॅस्टिकसारखे पदार्थ या प्रकारच्या साधनांच्या निर्मितीसाठी वापरले जातात. या प्रकारच्या साधनांमुळे, आधुनिक निर्जंतुकीकरण तंत्रामुळे व प्रतिजैव औषधांच्या उपयोगामुळे या प्रकारच्या अंतर्गत अचलीकरण शस्त्रक्रिया तंत्रात खूपच प्रगती झाली आहे आणि या शस्त्रक्रियांची सुरक्षितता व उपयुक्तताही वाढली आहे.

नवीन वेदनाशामक औषधांचा दोन प्रकारे उपयोग होतो : एक म्हणजे प्रभावी वेदनाशमन व दुसरे म्हणजे शोथ प्रक्रियेला प्रतिबंध करणे. यामुळे भरून येण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

अस्थिरोपण : अस्थींच्या कित्येक रोगांत व काही अस्थिभंगांत अस्थीचा खराब किंवा (रक्तपुरवठ्याअभावी) जिवंत राहू न शकणारा भाग काढून टाकावा लागतो. अशा वेळी भरून येण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी, मधील पोकळी भरून काढण्यासाठी व व्यंग किंवा अवयवाच्या लांबीतील फरक टाळण्यासाठी अस्थिरोपणाची आवश्यकता असते. सहसा स्व-अस्थिरोपण केले जाते. त्यामध्ये रोग्याच्याच शरीरातील विशिष्ट ठिकाणांतून निरोगी, सुषिर अस्थी काढून तिचा चुरा किंवा लहान तुकडे अस्थिरोपण ठिकाणी बसविले जातात. तेथे अनेक सूक्ष्म अस्थिभंगांच्या भरून येण्याची क्रिया होऊन कालांतराने मुळाबरहुकूम अस्थी तयार होते. तसेच रोपणासाठी अस्थि-ऊतक काढलेल्या ठिकाणी अस्थिनिर्मिती होऊन तो भागही मुळाबरहुकूम भरून येतो.

कृत्रिम सांधे व अवयव : शरीरांतर्गत सांधे दुरुस्त करता न येण्याइतके खराब झाले असल्यास विशिष्ट परिस्थितीत कृत्रिम सांधे बसविण्याची शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी रोग्याच्या सांध्यांच्या मापाशी जुळणारे व त्या विशिष्ट सांध्याच्या प्राकृत रचनेप्रमाणे यांत्रिक रचना असलेले कृत्रिम सांधे वापरले जातात. तेही कृत्रिम साधनांप्रमाणेच मिश्रधातू किंवा प्लॅस्टिकसारख्या पदार्थाचे बनलेले असून या पदार्थात कमीत कमी झीज होणे, प्रदीर्घ काळापर्यंत गुळगुळीतपणा कायम राहणे इ. गुणधर्म असणे आवश्यक असते. शिवाय विशिष्ट सांध्यांच्या विशिष्ट आवश्यकतेप्रमाणे चिवटपणा, कठीणपणा, लवचिकपणा, भार सहन क्षमता इ. गुणधर्मही या पदार्थात असणे आवश्यक ठरते. त्यामुळे मिश्रधातू व इतर पदार्थाच्या निर्मिती तंत्रात होत असलेल्या सुधारणांबरोबर कृत्रिम सांध्यांच्या उपयोगाच्या क्षेत्रातही प्रगती होत आहे.

तुटलेल्या किंवा काढून टाकलेल्या अवयवाच्या ठिकाणी इतर पदार्थांनी बनलेला व अत्यावश्यक कार्यक्षमता असलेला कृत्रिम अवयव बसवता येतो. शरीराचा बाह्य आकार कायम राखण्याचा प्रयत्न करणे, व्यंग झाकून टाकल्यास मदत करणे व नसलेल्या अवयवाची कार्य क्षमता काही प्रमाणात पुन्हा मिळवून देणे हे कृत्रिम अवयव बसवण्याचे हेतू असतात. पुनर्वसनासाठीही त्यांची मोठी मदत होती. यांत्रिक कृत्रिम अवयवांना कार्यक्षम करण्यासाठी मूलतः तुटलेल्या अवयवातील उरलेल्या स्नायूंच्या कार्यक्षम हालचालींचा उपयोग करून घेतला जातो. कृत्रिम अवयव हा यांत्रिक भाग असल्याने शस्त्राच्या इतर शाखांतील (उदा., विद्युत्, इलेक्ट्रॉनिकी, संगणक तंत्रज्ञान, रोबॉट तंत्रज्ञान इ.) प्रगतीबरोबरच कृत्रिम अवयवनिर्मिती तंत्रज्ञानातही वेगाने प्रगती होत आहे.


बाह्योपचार : निरनिराळ्या प्रकारांच्या अस्थी व संधी रोगांत अवयवाचे अचलीकरण केल्याने किंवा प्रत्यक्ष इजेमुळे बहुतेक वेळा स्नायूंना शिथिलता किंवा ताठपणा येतो. स्नायु-अस्थिबंधांचा लवचिकपणाही कमी होतो. त्यामुळे या रोगांवर उपचार करण्याच्या व उपचारांनंतरच्या कालावधीत इजाग्रस्त नसलेल्या स्नायूंना कार्यक्षम ठेवणे आवश्यक असते. तसेच सूज, सांध्याचा ताठपणा, वेदना इ. गोष्टी कमी करण्यासाठी, व्यंग होऊ नये किंवा वाढू नये यासाठी व पुनर्वसनाच्या कालावधीत कार्यक्षमता वाढविण्यासाठी बाह्योपचार हे विकलांग चिकित्सेतील एक महत्त्वाचे अंग झाले आहे.

स्वेदन, मर्दन, स्नेहन, शेक (थंड व गरम), लेप वगैरे बाह्योपचार आयुर्वेदातही संगितले आहेत. आधुनिक वैद्यकातही वेगवेगळ्या मार्गांनी ते अवलंबिले जातात. त्यांशिवाय अवयवाच्या परकृत हालचाली व नंतर हळूहळू भार वाढवत स्वतः केलेल्या हालचाली, विशिष्ट अवयव किंवा स्नायूंसाठी विशिष्ट व्यायाम, वेगवेगळ्या विद्युत् उपकरणांच्या साहाय्याने स्नायूंना चेतना देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे प्रयत्न व कार्यक्षमतेचे आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने मोजमाप असे उपचारही उपलब्ध आहेत.

पुनर्वसन : कोणत्याही प्रकारची विकलांग चिकित्सा पुनर्वसनाच्या उपचारांशिवाय व प्रयत्नांशिवाय पूर्ण होत नाही. [अपंग : कल्याण व शिक्षण].

आधुनिक प्रगती : नवीन तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली नवीन निदानीय उपकरणे व त्यांमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेपाशिवाय त्वरित व अचूक निदान करता येण्याची शक्यता, नवीन शस्त्रक्रिया साधने, हत्यारे, उपकरणे व कृत्रिम अवयव या सर्वांच्या वापराबरोबर विकसित होणाऱ्या नवीन शस्त्रक्रिया पद्धती, नवीन व सुरक्षित संमोहक द्रव्ये व अधिक उपयुक्त शोथप्रतिबंधक, प्रतिजैव व इतर प्रकारची औषधे यांमुळे विकलांग चिकित्सा उपचारांत १९६० नंतर खूपच सुधारणा झाली आहे.

विकलांग चिकित्सा उपकरणे : व्यंगांवर उपचार म्हणून किंवा ती होऊ नयेत म्हणून, तसेच अचलीकरणाचे साधन म्हणून विकलांग चिकित्सेत निरनिराळ्या उपकरणांचा उपयोग करतात. आंब्रवाझ पारे (१५१०−९०) या फ्रेंच शस्त्रक्रियाविशारदांनी अशी साधने स्वतः बनविली. पहिला धातूचा कॉर्सेट त्यांनीच तयार केला. चामड्याचे बंधफलक, श्रोणिसंधिलविकारांत वापरता येणारे साधन आणि वक्रपादाकरिता खास बृट त्यांनीच तयार केले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या उपयोगामुळे उपकरणांत क्रांती घडली. अमेरिकन शस्त्रक्रियाविशारद एल्. ए. सेअर यांनी प्लॅस्टरचा उपयोग पूर्ण अचलीकरणासाठी प्रथम केला. विकलांग चिकित्सेमध्ये शस्त्रक्रियेचा उपयोग वाढल्यानंतर अशी साधने बनविणारांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला. त्यांना ‘ऑर्थोटिस्ट’ म्हणजे विकलांग साधन निर्माते असे म्हणतात. मानपट्टी, हवाई जहाज बंधफलक, पृष्ठवंशाला आधार देणारी साहाय्यक साधने, टॉमस बंधफलक, कुबड्या, वक्रपाद बंधफलक, पाय व पावलांच्या व्यंगासाठी मुद्दाम बनविलेली निरनिराळ्या प्रकारची पादत्राणे अशी अनेक प्रकारची साधने वापरात आहेत.

आ. ११. पायाच्या व्यंगासाठी मुद्दाम बनविलेला एक प्रकारचा बूट.यांशिवाय निरनिराळ्या प्रकारांच्या अस्थिभंगांच्या अंतर्गत अचलीकरणासाठी अनेक प्रकारच्या, स्क्रूच्या साहाय्याने बसविता येणाऱ्या पट्ट्या, स्क्रू, खिळे, सळ्या, तारा इत्यादींचा उपयोग केला जातो.

कृत्रिम अवयव : अनेक प्रकारांच्या अस्थि-संधिविकारांत उपचार म्हणून शरीराचा काही भाग (उदा. एखादा संपूर्ण अवयव किंवा त्याचा भाग, लांब अस्थीचा तुकडा, सांध्यातील काही भाग) काढून टाकावा लागतो. मूळ अवयवाप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी व कार्यक्षमता टिकविण्यासाठी त्या बदली अनेक वेळा कृत्रिम साधने बसविता येतात. विशिष्ट उपोगासाठी मुद्दाम रचना व निर्मिती केलेल्या व जिवंत शरीरात किंवा शरीराबाहेर बसविण्यात येणाऱ्या अशा साधनांना कृत्रिम अवयव असे म्हणतात.

असे अनेक प्रकारांचे कृत्रिम अवयव वा त्यांचे भाग उपयोगात असून त्यांच्या प्रकारांत व उपयोग करण्याच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत आहे. उपयुक्तता सिद्ध झालेल्या अशा कृत्रिम अवयवांचे प्रमाणित मापांत व ठराविक पल्ल्यात उत्पादन केले जाते किंवा विशिष्ट गरजेनुसार वेगळ्या मापांतही ती बनली जाऊ शकतात.

विशिष्ट गरजा भागवणारा आणि जीवानुरूप पदार्थ निवडणे हा कृत्रिम अवयव बनवण्यातील मुख्य प्रश्न असतो. अनेक प्रकारांनी व सखोल परीक्षणानंतर असे पदार्थ निवडले जातात. शोथ प्रक्रिया, कोशिका किंवा ऊतक मृत्यू, ॲलर्जी, कर्करोग किंवा इतर कोणतेही दुष्परिणाम होऊ न देता जिवंत ऊतकांना सुसह्य व स्वीकार्य असणारे व जीवनुरूप असे अनेक मिश्रधातू, बहुवारिक प्लॅस्टिकचे काही प्रकार व मृत्तिकेच्या काही वस्तू सध्या वापरात आहेत.

बाह्य कृत्रिम अवयव : तोडाव्या लागलेल्या हात किंवा पायासारख्या अवयवाच्या जागी कृत्रिम अवयव बसवले जाऊ शकतात. त्यांना बाह्य कृत्रिम अवयव असे म्हणतात. मूळ अवयवासारखे दिसण्यासाठी व त्या अवयवाचे कार्य काही प्रमाणात टिकवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ऊर्जेच्या साहाय्याने कृत्रिम अवयवात (विशेषतः हाताच्या कृत्रिम पंजासाठी) हालचाल घडवून कार्यक्षमता वाढवता येते. तुटलेल्या अवयवातील उरलेल्या स्नायूंच्या जोरावर आणि नियंत्रणाखाली हालचाल करू शकणारा कृत्रिम अवयव बनविणे हे कृत्रिम अवयवनिर्मितीतील अंतिम उद्दिष्ट आहे.

अंतर्गत कृत्रिम अवयव : अस्थिसांगाड्यातील विकृतीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे कृत्रिम भाग या प्रकारात मोडतात. त्यांचा उपयोग मुख्यतः इजा किंवा शोथ प्रकियेमुळे निकामी झालेला सांधा संपूर्ण बदलण्यासाठी केला जातो. या प्रकारे श्रोणीसंधी बदलण्याची शस्त्रक्रिया सर्वाधिक प्रमाणात व गुडघ्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया त्या खालोखाल केली जाते. घोटा, खांदा, बोटे, मनगट, कोपर इ. सांध्यांसाठीही विशिष्ट रचनेचे कृत्रिम सांधे आणि ते बसविण्याच्या शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत परंतु त्यांचा वापर मर्यादित आहे. पायातील अस्थी व संधीवर सतत शरीराचा भार पडत असल्याने श्रोणी व गुडघ्याच्या कृत्रिम सांध्यांसाठी विशिष्ट पदार्थच वापरले जातात. त्यांतही वारंवार पडणाऱ्या भारामुळे कालांतराने तडे न जाणारे पदार्थ निवडण्याची विशेष काळजी घेतली जाते. कारण कृत्रिम सांधा बसविण्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने वारंवार करता येत नाही. बहुतेक ठिकाणी मुख्य रचना मिश्रधातूची व सांध्यातील समोरासमोरील पृष्ठभाग घर्षणाने गुळगुळीतपणा नष्ट न होणाऱ्या बहुवारिकाचा अशी रचना असते. कृत्रिम अवयव व मूळ अस्थीतील जोड भार सहन करण्याच्या दृष्टीने भक्कम राहील, याचीही विशेष काळजी घेतली जाते.

पहा : अपंग : कल्याण व शिक्षण अस्थि अस्थिचिकित्सा पद्धति अस्थिभंग कणा व मणका जखमा आणि इजा संधिवात संधिशोथ सांधे स्नायु तंत्र.

संदर्भ : 1. Bick, E. M. Source Book of Orthopadics, London, 1937.

           2. Schwartz, S. I. Ed. Principlesof Surgery, Singapure, 1984.

           3. Vonable, C. S. Stock. W. G. The Internal Fixation of Fractures, London, 1947.

          4. Young, H. H. Ed. The Year Book of Orthopedics and Traumatic Surgery, Chicago, 1969.

प्रभुणे, रा. प. भालेराव, य. त्र्यं.