ऱ्होडस गवत : (लॅ. क्लोरिस गयाना कुल-ग्रॅमिनी). या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) चाऱ्याच्या गवताची द. आफ्रिकेतून १९१५ मध्ये भारतात आयात करण्यात आली. द. आफ्रिकेतील मुत्सद्दी सेसिल जॉन ऱ्होड्‌स यांनी केपटाऊन शहरानजीक आपल्या शेतीवाडीत हे गवत मोठ्या प्रमाणावर लावले म्हणून त्यांच्याच नावाने हे ओळखण्यात येऊ लागले. भारतातही ते पुष्कळ लोकप्रिय झाले आहे. ऱ्होडस गवताचे संधिक्षोड [⟶ खोड] तारेसारखे असून ९० ते १२० सेंमी. उंच वाढते. तिरश्चर (खोडाचे जमिनीत आडवे वाढणारे प्ररोह) लांब, मजबूत, पर्णयुक्त असतात. पाने ३-५ मिमी. रुंद व टोकाकडे निमुळती असतात. फुलोऱ्यातील कणिशांची [⟶ पुष्पबंध] संख्या १०-१५ असून ती ५ -१० सेंमी. लांब व बोटाच्या आकाराची पसरणारी असतात. कणिशके एकमेकांशी भिडलेली व पक्व अवस्थेत गवताच्या रंगाची असतात. कणिशांत बीज मोठ्या संख्येने धरते.

भारतात उष्ण आणि उपोष्ण भागांत बागायती अथवा जिरायती अशा दोन्ही स्वरूपांत याची लागवड करता येते. हे अवर्षण विरोधक असून थंडीही सहन करू शकते. उबदार व दमट हवामानात व खोलगट भागात याची वाढ चांगली होते. भारी चिकण माती आणि दलदल या गवताला मानवत नाहीत. हलक्या प्रकारच्या दुमट जमिनीत याची उत्तम वाढ होते. जमिनीतील पुष्कळ लवणता सहन करू शकणाऱ्या गवतांच्या जातींमध्ये याचा समावेश होतो.

ऱ्होड्स गवत : (१) संधिक्षोड, (२) पान, (३) तिरश्चर, (४) फुलोरा.ऱ्होड्स गवताची लागवड बियांपासून अथवा मुळे फुटलेल्या कांड्यांपासून करतात. जिरायती पिकासाठी हेक्टरी ४.५ ते ८ किग्रॅ. व बागायती पिकासाठी ११ ते १३ किग्रॅ. बी लागते. मुळे फुटलेली कांडी एका हेक्टरला सु. २५,००० लागतात. पेरणीपूर्वी हेक्टरी १२ ते २० टन शेणखत व पहिल्या कापणीनंतर हेक्टरी २२० किग्रॅ. अमोनियम सल्फेट दिल्याने चांगले उत्पादन मिळते.

बी पेरून तयार केलेल्या पिकाची तीन महिन्यांनंतर व कांडी लावून केलेल्या पिकाची दोन महिन्यांनंतर पहिली कापणी करतात. पुढील कापण्या एक महिन्याच्या अंतराने करतात. उत्तर भारतात दरवर्षी ७-८ कापण्या व दक्षिण भारताच्या उबदार हवामानात १२ कापण्या मिळतात.

पेरणीनंतर अथवा लागणीनंतर कोळपणी करणे आवश्यक असते. आवश्यकतेप्रमाणे विरळणी करून दोन झाडांतील अंतर ४५ ते ६० सेंमी. ठेवतात. हंगामाप्रमाणे पिकाला २-३ आठवड्यांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देतात.

बागायती पिकाचे ओल्या चाऱ्याचे वार्षिक हेक्टरी उत्पादन सु. ३७ टन आणि जिरायती पिकाचे सु. १७.५ टन असते. मैला पाण्यावर वाढलेल्या पिकाचे हेक्टरी १७५.६ टन उत्पादन मिळाल्याची नोंद आहे. हे पीक फार झपाट्याने वाढत असल्याने ते शेतात फार दाट होते. यासाठी वर्षातून एकदा नांगरणी करून झाडांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक असते. योग्य रीतीने पिकाची निगा ठेवल्यास ते पुष्कळ वर्षे चांगले उत्पादन देते. सर्वसाधारणपणे हे पीक एका जागी तीन वर्षे चांगले उत्पन्न देते. जनावरे चरण्यासाठी ओला चारा म्हणून व वाळलेले गवत करण्यासाठी हे गवत उपयुक्त आहे परंतु भारतात हे गवत मुख्यतः ओल्या चाऱ्यासाठी वापरतात.

लसूण घासाबरोबर हे पीक घेतल्यास चाऱ्याची उपयुक्तता वाढते आणि चाऱ्याचा वर्षभर पुरवठा होतो. उन्हाळ्यात ऱ्होड्स गवतापासून व हिवाळ्यात लसूण घासापासून चारा मिळतो. ऱ्होड्स गवत पालेदार असल्याने जनावरे आवडीने खातात. ते पुरेशा प्रमाणात पौष्टिक असते. हिरव्या चाऱ्यात सु. ३% व फुलावर येण्यापूर्वी कापणी करून वाळविलेल्या गवतात ६.४% प्रथिने असतात. तसेच या पिकात कॅल्शियम (०.५%) व फॉस्फरस (०.४%) समतोल प्रमाणात असतात. घोड्यासाठी हे गवत योग्य समजत नाहीत.

कुरणात पावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत या गवतात गुरे चारून व त्यानंतर गुरे चारण्याचे बंद करून त्याची फुलावर येण्यापूर्वी कापणी केल्यास त्यापासून वाळलेले गवत तयार करता येते. गुरे चरताना ते त्यांच्या पायाखाली तुडविले गेले तरी त्यापासून अपाय होत नाही.

पहा : वैरण.

संदर्भ : 1. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.

           2. Narayanan. T. R. Dabadghac, P. M. Forage Crops of India, New Delhi. 1972.

चव्हाण. ई. गो. गोखले, वा. पु.