मेसियर, चार्ल्स (मेस्ये, शार्ल) : (२६ जून १७३०–११ एप्रिल १८१७). ताऱ्यांच्या सापेक्ष स्थिर भासणाऱ्या ⇨ अभ्रिका व तारकागुच्छ यांची पहिली पद्धतशीर यादी तयार करणारे फ्रेंच ज्योतिर्विद. त्यांचा जन्म बादोंव्हीलॅर (फ्रान्स) येथे झाला. मेसियर यांचे बाळबोध व वळणदार अक्षर आणि चित्रे काढण्याचा छंद पाहून जे. एन्. दलील यांनी त्यांना कारकुनी कामासाठी आपल्याकडे ठेऊन घेतले आणि १७५५ साली हॉतेल द क्ल्यूनी येथील सागरी वेधशाळेत लिपिकाची नोकरी मिळवून दिली. मंद खस्थ पदार्थाच्या निरीक्षणांच्या अभ्यासाद्वारे त्यांना प्रसिद्धी मिळून दलील यांच्या निवृत्तीनंतर मेसियर या वेधशाळेचे प्रमुख ज्योतिर्विद झाले.

मेसियर यांना प्रथमपासूनच धूमकेतूंचे निरीक्षण करावयाचा छंद होता. हॅली यांनी १६८२ साली पाहिलेला धूमकेतूच त्यापूर्वी १५३१ व १६०७ मध्येही दिसला होता, असा निष्कर्ष काढला होता व तो पुन्हा १७५९ साली सूर्याजवळ येईल, असे त्यांनी भाकीत केले होते. त्याचा आधार घेऊन मेसियर यांनी तो शोधण्याचे प्रयत्न केले व २१ जानेवारी १७५९ रोजी त्यांना तो आढळला. १७५९–९८ या काळात त्यांनी सु. ४१ धूमकेतूंचा शोध घेतला व त्यांपैकी १३ धूमकेतू प्रथम शोधण्याचा मान त्यांच्याकडे जातो. त्यामुळे राजे पंधरावे लुई यांनी त्यांना ‘धूमकेतू हुडकणारा’ हे टोपन नाव दिले.

या काळात कोणत्याही धूसर खस्थ पदार्थाला अभ्रिका म्हणत. ताऱ्याच्या संदर्भात अशा न हलणाऱ्या अभ्रिका व त्यांच्या जवळपासचे धूमकेतू छोट्या दुर्बिणातून पहाताना बऱ्याचदा आकारमान व तेज या दृष्टींनी दोन्ही एकसारखे भासत. त्यामुळे धूमकेतू शोधताना या अभ्रिकांमुळे वारंवार घोटाळे होऊ नयेत म्हणून त्यांनी अशा अभ्रिकांच्या नोंदी स्वतः बनविलेल्या नकाशावर केल्या व त्यांची एक स्वतंत्र यादी करण्यास १७५९ साली सुरुवात करून १७८४ साली १०३ अभ्रिकांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. या यादीत नंतर प्येअर मेशॅं यांनी सहा, तर १८०० सालापर्यंत विल्यम हर्शेल यांनी सु.२,००० अभ्रिकांची भर घातली. या ‘मेसियर यादी’ तील अभ्रिकांचा निर्देश त्यांच्या स्वतःच्या नावाच्या एम या आद्याक्षरापुढे यादीतील अभ्रिकेचा अनुक्रमांक देऊन केला जातो. उदा., देवयानी तारकासमूहातील अभ्रिकेला एम ३१ संबोधितात म्हणजे मेसियर यादीतील हा ३१ क्रमांकाचा खस्थ पदार्थ होय.

कालान्तराने प्रभावी दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणात असे दिसून आले की, मेसियर यादीतील १/३ खस्थ पदार्थ दीर्घिका व निम्म्याहून अधिक तारकगुच्छ आहेत. तेरा ⇨आंतरतारकीय द्रव्याचे प्रकाशमान ढग आहेत. तसेच चार खस्थ पदार्थ ब्रिंबाभ्रिका आणि एक परावर्तनी अभ्रिका असून सात आयनीभूत (विद्युत् भारित अणू वा रेणू असलेली) क्षेत्रे, एक अतिदीप्त नवताऱ्याचा (ज्याची दीप्ती अचानक कोट्यावधी पट वाढते अशा ताऱ्याचा) अवशिष्ट भाग आणि एक पूर्वीच्या निरीक्षणाची केवळ पुनरावृत्ती आहे.

यांशिवाय त्यांनी ग्रहणे, पिधाने, सौर डाग, त्या काळातील नवा ग्रह प्रजापती, बुध-शुक्राची अधिक्रमणे वगैरेंचीही निरीक्षणे केली. रेखावृत्त निश्चित करणाऱ्या उपकरणाचे कार्य पडताळून पहाण्यासाठी त्यांनी १७६७ साली सागरावरील मोहिमेत भाग घेतला होता.

लंडनची रॉयल सोसायटी (१७६४), तसेच पॅरिस (१७७०), बर्लिन, सेंट पीटर्झबर्ग इ. ठिकाणच्या ॲकॅडेमींचे सदस्यत्व त्यांना देण्यात आले होते. चंद्रावरच्या सु.१५ किमी. व्यासाच्या एका खोल विवराला त्यांचे नाव दिले गेले आहे. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

पहा : अभ्रिका.

ठाकूर, अ. ना.