त्साव स्युए–च्यीन : (सु. १७१५–१२ फेब्रुवारी १७६३). चिनी कादंबरीकार. नानकिंग येथे जन्म. त्याचे आजोबा त्साव यींग (१६५८–१७१२) हे खांग स्यी या सम्राटाचे निष्ठावंत सेवक असून, ते श्रीमंत व खानदानी घराण्यातील होते. खांग स्यीनंतरचा सम्राट युंग जंग याने असूयेपोटी त्साव घराण्याची संपत्ती व प्रतिष्ठा हिरावून घेतली (सु. १७२८). या घटनेचा त्साव स्युए–च्यीनच्या बालमनावर फार मोठा आघात झाला. त्याने आपल्या षृ–थोव् जि (इं. शी. द स्टोरी ऑफ द स्टोन) या कादंबरीत घराण्याचे पूर्वकालीन वैभव, नियतीची शोकपूर्ण कलाटणी व सामाजिक अन्यायाची भावना या सर्व गोष्टींचे प्रभावी चित्रण केले. या कादंबरीची ऐंशी प्रकरणे त्याने लिहिली पण ती त्याच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही. पेकिंग येथे त्यास मृत्यू आला. पुढे गाव अ या लेखकाने आणखी चाळीस प्रकरणे लिहून ही कादंबरी पूर्ण केली आणि ती हूंग लौ मंग (इं. शी. ड्रीम ऑफ द रेड चेंबर) या नावाने १७९१ मध्ये प्रकाशित झाली. चिनी साहित्यातील ती एक श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. ही कादंबरी म्हणजे त्साव स्युए–च्यीनचे अंशात्मक आत्मचरित्रच आहे. या कादंबरीचा नायक बाव् यू व त्याची मामेबहीण लीन् दाय्–यू यांच्यातील प्रेमाची विफल कहाणी व त्याचबरोबर एका श्रीमंत प्रतिष्ठित घराण्याचा उत्तरोत्तर होत गेलेला ऱ्हास, हा या कादंबरीचा आशय. तीत उच्चभ्रू वर्गाच्या सर्व अंगोपांगांचे तपशीलवार चित्रण असून समाजाच्या निरनिराळ्या थरांतील सु. ४०० पात्रांचे मनोज्ञ दर्शन घडते. व्यक्तिगत जीवनातील लैंगिक चित्रणाबरोबरच सतराव्या–अठराव्या शतकांतील चीनच्या सामाजिक–राजकीय व आर्थिक जीवनाचे प्रतिबिंबही या कादंबरीत प्रकर्षाने उमटले आहे. हूंग लौ मंगला एखाद्या ज्ञानकोशाची महत्ता लाभली आहे याची साक्ष चिनी इतिहासकार आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ या कादंबरीतील अवतरणे देतात, त्यावरून पटते. या कादंबरीचे अध्ययन ही चिनी साहित्यसमीक्षेची एक खास शाखा बनली आहे.

 ह्‌वांग ई शू (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)