रॉबिन्सन, सर रॉबर्ट : (१३ सप्टेंबर १८८६−८ फेब्रुवारी १९७५). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. १९४७ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबल पारितोषिकाचे मानकरी. ⇨अँथोसायनिने व अँथोझँथिने, ⇨फ्लॅव्होने आणि ⇨अल्कलॉइडे यांविषयीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध.रॉबिन्सन यांचा जन्म इंग्लंडमधील डर्बिशर मधील रूफर्ड या खेड्यात आणि शालेय शिक्षण चेस्टरफील्ड येथे झाले. १९०६ मध्ये मँचेस्टर विद्यापीठाची त्यांनी बी. एस्सी. पदवी व १९१० मध्ये डी. एस्सी. पदवी संपादन केली. त्याच वर्षी त्यांनी डब्ल्यू. एच्. पर्किन यांच्याबरोबर संशोधनास सुरुवात केली.

इ.स. १९१२ मध्ये त्यांची सिडनी विद्यापीठात कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९१५ मध्ये इंग्लंडला परतल्यावर त्यांनी लिव्हरपूल (१९१५−२०), सेंट अँड्रूझ (१९२१−२२) व मँचेस्टर (१९२२−२८) ही विद्यापीठे, तसेच लंडन येथील विद्यापीठ महाविद्यालय (१९२८−३०) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील मॅग्डालीन महाविद्यालय (१९३०−५५) या ठिकाणी कार्बनी रसायनशास्त्राची अध्यासने भूषविली. १९५५ साली ते निवृत्त झाले.

रॉबिन्सन यांनी कार्बनी रसायनशास्त्रामधील निरनिराळ्या शाखांत विपुल संशोधन केले. प्रामुख्याने वनस्पतीतील रंगद्रव्ये, अल्कलॉइडे व फेनँथ्रीन व वर्गातील पदार्थ यांविषयीचे त्यांचे संशोधन विशेष प्रसिद्ध आहे.

वनस्पतींची मुळे, खोडे, साली व फुले यांमध्ये निरनिराळी रंगद्रव्ये असतात. लाल, जांभळा, निळा इ. रंग वनस्पतींपासून उपलब्ध होतात. हे रंग अँथोसायनिडीन वर्गात मोडतात. रॉबिन्सन यांनी प्रथमतः ब्राझिलीन व हीमॅटॉक्सिलीन या दोन रंगद्रव्यांविषयी संशोधन करून त्यांची संरचना ठरविली. ही दोन्हीही रंगद्रव्ये काही विशिष्ट प्रकारची लाकडे पाण्यात उकळवून मिळविली जातात. रासायनिक दृष्ट्या अँथोसायनिनासारख्या असणाऱ्या फ्लॅव्होनांवरही त्यांनी संशोधन केले. अँथोसायनिने व फ्लँव्होने यांच्या अभ्यासातून त्यांचे लक्ष वनस्पतिज अल्कलॉइडांकडे वळले, काळ्या धोतर्यातपासून मिळाणाऱ्यान ट्रॉपिनोन व ⇨ॲट्रोपीन या संयुगांची संरचना त्यांनी त्यांचे विश्लेषण व संश्लेषण करून ठरविली. यानंतर त्यांचे लक्ष अफूच्या बोंडापासून मिळाणाऱ्या अल्कलॉइडांकडे वेधले गेले. त्यांनी अफूच्या बोंडातील पॅपॅव्हरीन, नार्कोटीन आणि ⇨मॉर्फीन, ब्रूसीन व ⇨स्ट्रिक्नीन यांवर संशोधन करून त्यांची संरचना निश्चित केली. पेनिसिलिनाचा औषधी उपयोग सर्रास होऊ लागला, तरी त्याची संरचना सिद्ध झाली नव्हती. ती अमेरिकन शास्त्रज्ञ व रॉबिन्सन आणि त्यांचे सहकारी यांनी एकत्रित काम करून शोधून काढली. इंग्लंड व अमेरिका या दोन्ही देशांत चाललेले हे संशोधन रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

इ.स. १९१७ मध्ये त्यांनी वनस्पतींमध्ये मिळणारी निरनिराळी द्रव्ये कशी बनत असावीत, याविषयी एक उपपत्ती मांडली. १९२१−३० या काळात त्यांनी बऱ्याचशा रासायनिक प्रक्रियांचे स्पष्टीकरण इलेक्ट्रॉनांच्या देवाणघेवाण व समाईकत्व या कल्पनांच्या आधारे केले. याआधी इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन यांचा विचार कार्बनी रसायनशास्त्रात केला जात नव्हता. रॉबिन्सन यांच्या विद्युत् संयुजी व सहसंयुजी [⟶ संयुजा] या कल्पना सुरुवातीला शास्त्रज्ञांना मान्य झाल्या नव्हत्या. १९५० साली पुणे येथे भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या अधिवेशनास ते भारत सरकारच्या खास निमंत्रणावरून हजर राहिले होते.

रॉबिन्सन यांच्या कामाचा गौरव म्हणून १९३९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना नाइट हा किताब दिला. त्यानंतर तीन वर्षांनी ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो व नंतर अध्यक्ष (१९४५−५०) झाले. त्यांना ब्रिटिश व परदेशी विद्यापीठांनी जवळजवळ वीस सन्मानयीय डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या. केमिकल सोसायटीने लाँगस्टाफ, फॅराडे आणि फ्लिंटॉफ ही तर रॉयल सोसायटीने डेव्ही, रॉयल व कॉप्ली ही पदके त्यांना दिली. स्वीस, अमेरिकन, फ्रेंच आणि जर्मन रासयनिक संस्थांनीही त्यांचा बहुमान केला. फिलाडेल्फियामधील फ्रँकलिन इन्स्टिट्यूटने त्यांना फ्रँकलिन पदक दिले. सन्मानयीन फेलो, परदेशी सदस्य म्हणून जवळजवळ पन्नास देशी व परदेशी नामवंत संस्थांशी त्यांचा संबंध आला होता. ते ब्रिटिश चेस (बुद्धिबळ) फेडरेशनचे अध्यक्षही होते (१९५०−५३). बुद्धिबळाशिवाय त्यांना गिर्यारोहण, छायाचित्रण व संगीत यांतही रस होता. ते ग्रेट मिसनडन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि. घाटे, रा. वि.