डेव्हिड लॉइड-जॉर्जलॉइड-जॉर्ज, डेव्हिड : (१७ जानेवारी १८६३-२६ मार्च १९४५). पहिल्या महायुद्ध-काळातील ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान (कार. १९१६-२२) आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म सामान्य वेल्श कुटुंबात मँचेस्टर (लंकाशर) येथे विल्यम जॉर्ज व एलिझाबेथ या दांपत्याच्या पोटी झाला. वडील प्राथमिक शिक्षक  होते. वडिलांच्या मृत्यूनंतर (१८६४) आजोळी कसेबसे शिक्षण घेऊन त्याने पोर्टमॅडक येथील कायदाविषयक सल्ला देणाऱ्या संस्थेत उमेदवारी केली आणि त्याला वकिलीची सनद मिळाली (१८८४). त्याने क्रिक्स येथे सल्ला कार्यालय उघडले. त्याचवेळी तो लिबरल पक्षाकडे आकृष्ट झाला. त्याने शेतकऱ्यांची संघटना बांधण्यास मदत केली आणि शेतकऱ्यांच्या चळवळीस उत्तेजन दिले. अनेक प्रेम प्रकरणांनंतर मार्गरेट ओअन या सधन शेतकरी घराण्यातील मुलीबरोबर तो विवाहबद्ध झाला (२४ जानेवारी १८८८). त्यांना पाच मुले झाली. त्याचे खाजगी जीवन स्वैर व स्वच्छंदी होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर (१९४१) त्याने आपली तीस वर्षांची मैत्रीण व स्वीय साहाय्यक फ्राँसिस स्टिव्हन्सन या महिलेबरोबर दुसरे लग्न केले (१९४३). तिने डेव्हिड लॉईड-जॉर्जची दैनंदिनी प्रसिद्ध केली आहे (१९४३).

त्याने वेल्स परगण्यासाठी व्यापक शेतीसुधारणेचा व सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम सुचविला. कार्नारव्हनशरमधून एका पोट निवडणुकीद्वारे तो संसदेवर निवडून आला (एप्रिल १८९०). या मतदारसंघातून त्याने १९४५ पर्यंत संसदेचे सलग खासदारपद भूषविले. संसदेत सुरुवातीपासून एक कुशल संसदपटू म्हणून त्याने नाव मिळविले. त्याने लिबरल पक्षांतर्गत लॉर्ड रोजबरीच्या नेतृत्वाविरुद्ध उठाव केला (१८९४-९५). वेल्स येथील अँग्लिकन चर्च हलविण्याची त्याची मोहीम काँझर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेवर आल्यामुळे अयशस्वी झाली. लिबरल पक्षाच्या सर हेन्री कॅम्बल-बॅनरमॅन सत्तेवर येताच (१९०५) त्याची व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याने काही कल्याणकारी योजना राबविल्या आणि मर्चन्ट शिपिंग ॲक्ट (१९०६), पेटेन्ट्‌स अँड डिझाईन्स ॲक्ट (१९०७), द पोर्ट ऑफ लंडन ॲक्ट (१९०८) इ. प्रागतिक कायदे करून गोदी कामगारांचे जीवनमान सुधारले व्यापारी जहाजे, त्यांचे मक्ते यांवर नियंत्रण आणले आणि लंडन बंदर प्राधिकरणाची स्थापना केली रेल्वेतील मजुरांच्या वादात तोडगा काढला. हर्बर्ट हेन्री ऑस्क्विथ (कार. १९०८ -१६) पंतप्रधान झाल्यानंतर त्याच्याकडे अर्थखाते सुपूर्त करण्यात आले (१९०८). त्याने १९०९ मध्ये क्रांतिकारक लोकाभिमुख अर्थसंकल्प संसदेत सादर केला. नाविक दलाची वाढ आणि कल्याणकारी योजना यांमुळे आर्थिक चणचण जाणवू लागली होती. त्यात वृद्धांचे निवृत्ती वेतन, असामान्य व्यक्तींना उत्तेजन इ. सुविधांच्या खर्चाची भर पडली होती. बिअर, तंबाखू, गॅस, स्पिरिट इ. वस्तूंवरील शुल्क आकारणी, अबकारी कराशिवाय वारसा हक्काने आलेले उत्पन्न, मृत्युशुल्क आणि जमीनविषयक व्यवहार यांवर त्याने आयकर लादला. यांमुळे सरदार-सरंजामदार आणि उच्चभ्रू नाराज झाले हुजूर पक्षीय मताधिक्यावर हाउस ऑफ लॉर्डसने हा अर्थसंकल्प असंमत करुन संविधानात्मक पेच निर्माण केला. अखेर १९११ मध्ये पार्लमेंट ॲक्ट संमत होऊन वरिष्ठ सभागृहाचा आर्थिक विधेयकांच्या संदर्भातील रोधाधिकाराचा हक्क काढून घेण्यात आला. याच साली त्याने राष्ट्रीय बेरोजगार विमा योजना कायदा (१९११) संमत करून बेकारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या खासगी जीवनांत १९१३ मध्ये एक संघर्षात्मक प्रसंग उद्‌भवला. रुफस इझॅक्सबरोबर त्याने मार्कोनी कंपनीचे रोखे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात खरिदले. त्याची चौकशी होऊन लॉइडवर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा कमी झाली पण उदार पक्षात त्याचे स्थान मजबूत होते. 

पहिल्या महायुद्धात लॉइडने आक्रमक पवित्रा घेऊन जर्मनीविरुद्ध भूमिकेस पाठिंबा दिला. प्रारंभी युद्धसाहित्याचा मंत्री (१९१५) असताना त्याने नवीन कारखाने उघडून कामगारांचे प्रश्न मिटविले आण दारूगोळ्याचा तुटवडा भरून काढला, तसेच सक्तीची लष्करी सेवा जाहीर करून सैन्यदलाचे संयोजन केले. किचेनरच्या मृत्यूनंतर तो युद्धमंत्री झाला (१९१६). ७ डिसेंबर १९१६ रोजी हर्बर्ट ॲस्क्विथला पक्षांतर्गत उठावामुळे राजीनामा देणे भाग पडले. त्याच्या जागी लॉइड-जॉर्जला पंतप्रधान निवडण्यात आले. त्याने युद्धकाळात कणखर भूमिका बजाविली. त्याच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांचे मनोधैर्य वाढले. त्याने मार्शल फेर्दीनां फॉशच्या हुकमतीखाली सर्व लष्करी दलांचे एकीकरण केले. दोस्त राष्ट्रांना जय मिळाला आणि इंग्लंड या आपत्तीमधून बाहेर पडले. १९१८ च्या निवडणुकात त्याची फेरनिवड झाली. व्हर्साय शांतता तहाच्या (१९१९) मसुद्यात त्याचा वाटा मोठा आहे. या तहात वुड्रो विल्सनचा आदर्शवाद आमि झॉर्झ क्लेमांसोचा हटवादीपणा यांत त्याने समन्वय साधून व्यवहार्य तोडगा काढला.

महायुद्धकालात त्याने सामाजिक सुधारणांवर जोर दिला. अंतर्गत धोरणात आयर्लंडचा प्रश्न महत्त्वाचा होता. इंग्लंड यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर होते (१९१९-२१). लॉइडने कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या सहकार्याने आयर्लंडमधील दडपशाही बंद केली आणि आयर्लंडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली पण पुढे त्याचा कामगारांमधील पाठिंबा कमी झाला. तेव्हा त्याने ग्रीक धार्जिणे धोरण स्वीकारून संसदेचा रोष ओढवून घेतला आणि आर्थिक संरचनेसाठी दिलेली आश्वासने तो पाळू शकला नाही, म्हणून त्याला राजीनामा देणे भाग पडले. लिबरल पक्षाचे अस्तित्व नाममात्र राहिले. त्याने काही कृषी व समाजाभिमुख योजना संसदेत मांडल्या पण बहुमताच्या अभावी त्याचा हा लढा एकाकीच ठरला. मरणापूर्वी काही महिने अगोदर त्यास सरदारकी मिळाली. लॅनस्टम्‌डवीजवळ त्याचे निधन झाले.

त्याने वॉर मेम्वार्स (सहा खंड : १९३३-३६) आणि मेम्वार्स ऑफ पीस कॉन्फरन्सिस (१९३९) हे युद्धविषयक दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले.

ब्रिटनच्या अलिकडील इतिहासात एक तडफदार आणि धोरणी प्रधानमंत्री म्हणून लॉइड-जॉर्जचे नाव झाले कारण शेती व कामगार या क्षेत्रांत त्याने अनेक सुधारणा घडवून आणल्या व उदारमतवादास प्रागतिक रूप दिले. व्हर्सायच्या तहात त्याचा मोठा वाटा होता. युद्धकाळात त्याने देशास कणखर नेतृत्व दिले. तो आपले निर्णय बिनदिक्कत राबवीत असे. त्यामुळे त्यास राष्ट्राध्यक्षासारखी सत्ता राबविणारा प्रधानमंत्री असे म्हटले जाई. आपत्काळात त्याचे नेतृत्वगुण उठून दिसत. लॉइड- जॉर्जने केलेल्या सुधारणा ब्रिटनच्या जडणघडणीत पुढे महत्त्वाच्या ठरल्या.

 संदर्भ : 1. Gibert, Martin, Ed. Lloyd-George, Englewood Clifis, 1969. 

            2. Morgan K. O. British prime Ministers : Lloyd-George, London, 1979. 

            3. Morgan K. O. The Age of Lloyd-George, London 1972. 

            4. Stevenson Frances Louise, Lloyd-George : A. Diary, London 1971. 

            5. Turner, J. Lloyd-George’s Secretariat, Cambridge, 1979.

 देशपांडे, सु. र.