वैद्यकीय प्रतिमादर्शन : (मेडिकल इमेजिंग). ही वैद्यकाची विशेषीकृत शाखा आहे. शरीरातील अवयव व इतर अंतर्गत संरचना यांच्या प्रतिमा मिळविण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी या शाखेत क्ष-किरण, गॅमा किरण, उच्च कंप्रतेचे ध्वनितरंग अथवा चुंबकीय क्षेत्रे यांचा उपयोग करतात. रोगाचे निदान व उपचार यांसाठी प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) उपयोग करणारी प्रारणविज्ञान (रेडिओलॉजी) ही वैद्यकाची शाखा स्थूलपणे वैद्यकीय प्रतिमादर्शनाशी तुल्य आहे. निदानीय प्रारणविज्ञानात अशा मिळविलेल्या प्रतिमांच्या मदतीने रोग ओळखून त्याचे अचूकपणे निदान केले जाते तर हस्तक्षेपी प्रारणविज्ञानात विशिष्ट रोग व विकृती यांच्यावरील उपचारांसाठी प्रतिमादर्शन पद्धतींमधील क्रियांचा इतर तंत्रांबरोबर उपयोग करतात. हस्तक्षेपी प्रारणविज्ञानात मध्येच हस्तक्षेप करून प्रक्रियेची दिशा बदलली जाऊन पद्धतीत सुधारणा होते.

क्ष-किरण छायाचित्रे : शरीरांतर्गत भागांची प्रतिमा सर्वप्रथम क्ष-किरणांद्वारे मिळविण्यात आली असून त्यांचा वापर १८९६ सालापासून होत आहे. ही प्रारण वैज्ञानिक पद्धतींमधील सर्वांत सामान्य पद्धती असून हिच्यात शरीरातील विविध अवयव व ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचे – पेशींचे – समूह) यांची स्थिर चित्रे अभ्यासतात. या पद्धतीत शरीरातून क्ष-किरण पार जातात व त्यांच्याद्वारे शरीराच्या विरुद्ध बाजूला ठेवलेल्या छायाचित्रीय पटलाचे (फिल्मचे) उद्‌भासन होते. शरीरातून जाताना क्ष-किरणांचे भिन्न ऊतकांकडून भिन्न प्रमाणात (मात्रेत) शोषण होते. उदा., हाडांसारख्या दाट किंवा अधिक घनतेच्या ऊतकांमुळे क्ष-किरण मोठ्या प्रमाणात शोषले जातात अथवा अडविले जातता. त्यामुळे ज्या छायाचित्रीय पटलावर ते पडतात ते पटल अधिक पांढरट वा फिकट दिसते. वसात्मक ऊतक अथवा फुफ्फुसांसारख्या हवायुक्त संरचना यांच्याकहून क्ष-किरणांचे किमान शोषण होते व त्यामुळे उद्‌भासित पटल अधिक गडद वा काळे दिसते. रक्त, मऊ ऊतक, स्नायू इ. इतर ऊतकांमुळे क्ष-किरण छायाचित्रांत या छटांच्या दरम्यानच्या करड्या रंगाच्या विविध छटांच्या प्रतिमा मिळतात. छायाचित्रीय पटलाचे उद्‌भासन झाल्यामुळे त्याच्यावरील छटेच्या घनतेत झालेल्या बदलांवरून प्रारणवैज्ञानिकाला प्राकृत (निरोगी) व अप्राकृत ऊतकांमधील भेद ओळखता येतो आणि त्यावरून त्याला विविध प्रकारच्या भिन्न रोगांचे वा विकृतींचे निदान करता येते.

प्रारणविज्ञानात छातीचे क्ष-किरण छायाचित्र सर्वाधिक वेळा काढतात असे दिसते. याशिवाय उदर, पाठीचा कणा, कवटी, वृक्क (मूत्रपिंड), अंत्यावयव (उपांगे), कोटरे (नैसर्गिक पोकळ भाग) यांच्या परीक्षणासाठी क्ष-किरण छायाचित्रे सामान्यपणे काढतात. स्तनांच्या क्ष-किरणांच्या मदतीने केलेल्या परीक्षणाला स्तनग्रंथिदर्शन (किंवा आलेखन) म्हणतात. स्तनग्रंथींच्या प्रत्यक्ष तपासणीच्या जोडीने स्तनग्रंथिदर्शनाचा उपयोग करणेही स्तनाचा कर्करोग लवकरात लवकर म्हणजे प्राथमिक अवस्थेत असताना ओळखण्याची सर्वांत प्रभावी पद्धती आहे. खास प्रकारचा अभिकल्प असलेल्या सामग्रीमुळे स्तनग्रंथीच्या ऊतकांच्या उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा मिळतात. तसेच यासाठी क्ष-किरणांची अल्प मात्रा वापरावी लागत असल्याने त्यांच्या संभाव्य दुष्परिणामांची जोखीम किमान असते. जास्तीत जास्त तपशीलवार चित्रण होण्यासाठी व त्यांचे प्रारणाला (क्ष-किरणांना) होणारे उद्‌भासन किमान होण्यासाठी स्तनग्रंथी जोमाने संपीडित होणे आवश्यक असते. बाजूने व समोरून (वरून) अशी प्रत्येक स्तनाची दोन क्ष-किरण छायाचित्रे घेण्याची पद्धत आहे.

भेददर्शक माध्यमे : स्थूलपणे एकसारखी घनता (छटा) असलेल्या एकमेकांलगतच्या मऊ ऊतकांमधील भेद केवळ क्ष-किरणांद्वारे ओळखता येत नाही, ही क्ष-किरणांची मर्यादा आहे. यामुळे अशा क्ष-किरण उद्‌भासित छायाचित्रांत परस्परविरोधी भेददर्शक छटा निर्माण होत नाहीत. हा भेद निर्माण करण्यासाठी भेददर्शक माध्यमे वापरतात. ही माध्यमे क्ष-किरणांना तुलनात्मक दृष्टीने अपारदर्शक (रेडिओ-अपारदर्शक) किंवा काहीशी पारदर्शक असतात. अशा प्रकारे क्ष-किरण अडविणाऱ्या औषधांना किंवा संयुगांना भेददर्शक (किंवा अवरोधी) माध्यमे म्हणतात. यांच्या वापरामुळे शरीरांतर्गत संरचनांची बाह्य रूपरेखा निश्चित करणे व त्यांच्या सभोवती असणाऱ्या त्यांच्यासारख्याच घनतेच्या या संरचना वेगळ्या ओळखणे शक्य होते. बेरियमाची संयुगे व आयोडीनयुक्त विद्राव हे भेददर्शक माध्यमांचे दोन प्रमुख गट आहेत.⇨जठरांत्र मार्गातील भिन्न भागांचे वैद्यकीय दृष्टीने मूल्यमापन करण्यासाठी बेरियमाची संयुगे तोंडाने देतात अथवा पचनमार्ग अभ्यासण्यासाठी त्यांचा बस्ती देतात. आयोडीनयुक्त विद्राव बहुधा एखाद्या नीलेत, रोहिणीत, मेरुनालात [→ मेरुरज्जु], नैसर्गिक पोकळ्यांत (कोटरांत) किंवा लसीका वाहिन्यांत [→ लसीका तंत्र] अंत:क्षेपित करतात अथवा अवयवांच्या बाह्य रूपरेखा दर्शविण्यासाठी त्यांच्याभोवती अंत:क्षेपित करतात. भिन्न भेददर्शक माध्यमांद्वारे पुढील गोष्टी साध्य होऊ शकतात. वाहिनीदर्शनात नीला व रोहिण्या, तर मेरुरज्जुदर्शनात पाठीचा कणा, मेरुरज्जू व मेरुरज्जु – तंत्रिका यांच्या प्रतिमादर्शनासाठी ही माध्यमे सुयोग्य तंत्राद्वारे वापरतात. वृक्कांचे आकार व कार्य अभ्यासण्यासाठी छेददर्शनामध्ये ऊतकांच्या छटांमधील परस्परभेद वाढविण्यासाठी आयोडीनयुक्त संयुगे (विद्राव) वापरतात. वाहिनीदर्शनात नीला व रोहिण्यांसारख्या मऊ अंतर्गत संरचनांचे क्ष-किरण प्रतिमादर्शन करता येते. वाहिनी हृल्लेखनात हृदयातून वाहणाऱ्या रक्ताचा प्रवाह तर पित्ताशयलेखनात पित्ताशय व पित्तनलिका आणि मूत्रमार्गदर्शनात मूत्रमार्ग यांचे क्ष-किरण प्रतिमादर्शन शक्य होते. क्ष-किरण विश्लेषणाद्वारे शरीराच्या बहुतेक कोणत्याही प्राकृत भागांतील क्षेत्रांचे शरीरक्रियावैज्ञानिक परीक्षण करणे शक्य होते. क्ष-किरण चलच्चित्रण पटलांमुळे भेददर्शक माध्यमे शरीरभागांत प्रवेश करतानाच्या व बाहेर पडतानाच्या वेळी होणाऱ्या शरीरक्रियांची नोंद होते. [→ क्ष-किरण क्ष-किरण वैद्यक].

अनुस्फुरणदर्शन : (उत्सर्जन करणाऱ्या पदार्थावर विशिष्ट रूपांतील ऊर्जा पडून ह्यातून विद्युत्‌ चुंबकीय प्रारण -विशेषत: प्रकाश – उत्सर्जित होण्याच्या क्रियेला अनुस्फुरण म्हणतात. असे उत्तेजन थांबताच अनुस्फुरण एकदम थांबते).⇨व्हिल्हेल्म कोनराट रॉंटगेन यांनी १८९६ साली अनुस्फुरणदर्शक सामग्री विकसित करून आधुनिक अनुस्फुरणदर्शकाचा पाया घातला. आधुनिक अनुस्फुरणदर्शकात एक क्ष-किरण नलिका व अनुस्फुरक पडदा असतो. तथापि हा पडदा एका प्रतिमा प्रकाशतीव्रताकारकाचा भाग असतो. प्रकाशतीव्रताकारक या इलेक्ट्रॉनीय उपकरणाने अनुस्फुरणदर्शकातील प्रतिमा हजारोपट तेजस्वी व प्रखर होते. या प्रक्रियेमुळे प्रारणाचे उद्‌भासन लक्षणीय रीत्या कमी होऊन प्रतिमेची गुणवत्ता खूप सुधारते. अनुस्फुरणदर्शन हे क्ष-किरण प्रतिमादर्शनाचे गतिमान तंत्र आहे व त्यामुळे कालौघात हलती प्रतिमा निर्माण होते. हृदयाचे स्पंदन किंवा मध्यपटलाची हालचाल यांसारख्या अवयवांच्या हालचालींचे परीक्षण व मूल्यमापन करण्यासाठी हे उपकरण गरजेचे आहे.

जठरांत्राचे क्रमवार परीक्षण व बेरियम बस्ती हे अनुस्फुरणदर्शनाद्वारे केल्या जाणाऱ्या अध्ययनाचे (तपासणीचे) सर्वांत सामान्य प्रकार आहेत. या पद्धतीत रुग्णाला सुरुवातीला अंत:क्षेपणाने अथवा बस्तीद्वारे बेरियम मिश्रण देतात. या मिश्रणाने जठर किंवा मोठे आतडे भरले जाते. दाट ऊतकांप्रमाणे बेरियम मिश्रणाने क्ष-किरण शलाका अडविली जाते. मग जठर किंवा मोठे आतडे यांच्या बेरियमाने लेपित झालेल्या अस्तराचे नेमके स्थान अनुस्फुरणदर्शनाद्वारे कळते आणि आकुंचन – प्रसरणाने जठर व मोठे आतडे यांच्या आकारमानात होणाऱ्या बदलांचे प्रारणवैज्ञानिकाला निरीक्षण करता येते. व्रण, आतड्याची अर्बुदे (कोशिकांच्या अत्याधिक वाढीने निर्माण होणाऱ्या व शरीरास निरुपयोगी असलेल्या गाठी) व इतर पुष्कळ विकृतींचे परीक्षण या पद्धतीने करता येते. वाहिनीदर्शन व हस्तक्षेपी प्रारणवैज्ञानिक पद्धतींमध्येही अनुस्फुरणदर्शनाचा उपयोग करतात.


वाहिनीदर्शन : वाहिनीदर्शन हा रक्तवाहिन्यांचा प्रारणवैज्ञानिक अभ्यास आहे. परंपरागत क्ष-किरण अध्ययनात सर्वसाधारणपणे नीला व रोहिण्या दिसत नाहीत. म्हणून क्ष-किरणांना अपारदर्शक असलेली आयोडीनयुक्त संयुगे रक्तप्रवाहात अंत:क्षेपित करतात. रोहिणीलेख हा रोहिण्यांचा, तर नीलालेख हा नीलांचा क्ष-किरणांद्वारे केलेला अभ्यास होय. कर्कशीभवनाने (सूत्रल – तंतुमय – ऊतकाच्या जादा वाढीमुळे व इतर बदलांनी ऊतक कठीण होण्याच्या क्रियेने) रोहिणी चोंदली किंवा अरुंद झाली आहे का व झाली असल्यास किती प्रमाणात ती चोंदली व अरुंद झाली आहे, हे दर्शविण्यासाठी बहुतकरून रोहिणीलेख वापरतात. असे घडलेले असेल तर हृदयविकाराचा झटका किंवा आघात होण्याची शक्यता असते. अंतर्गत रक्तस्रावाची किंवा अर्बुदाची जागा निश्चित करण्यासाठी, तसेच शरीरातील ऊतकांकडे होणाऱ्यास प्राकृत रक्तप्रवाहात अडथळा आणू शकणाऱ्या इतर पुष्कळ परिस्थितींच्या निदानासाठीही रोहिणीलेख काढतात.

सुईने छिद्र पाडून त्यातून लांब, बारीक, लवचिक नलिका म्हणजे सुषिरी रोहिणीमध्ये आत घालतात. उदराचा खालील भाग व मांडीच्या आतला जंघा हा भाग यांच्या सांध्याजवळ असलेली वळी किंवा खळगा म्हणजे जंघाकोन असून येथे हे छिद्र पाडतात. शरीरातील शाखायुक्त रोहिण्यांमधून परीक्षण करावयाच्या जागेपर्यंत सुषिरी अनुस्फुरणदर्शनाच्या मार्गदर्शनाने काळजीपूर्वक रीतीने पुढे सरकवीत नेतात. नंतर सुषिरीमधून भेददर्शक विद्राव रक्तवाहिनीत अंत:क्षेपित करतात. अशा रीतीने अपारदर्शक केलेल्या रोहिण्यांचे दृश्य हे जलदपणे म्हणजे सेकंदाला २ ते ६ चित्रे या गतीने उद्‌भासित होणाऱ्या प्रतिमांच्या मालिकेच्या रूपात नोंदले जाते. अशा हलत्या क्ष-किरण चित्रांना चलच्चित्र रेडिओलेख (सिने-रेडिओग्राफ) किंवा दृश्यफीत चित्रण म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या हृद्‌-रोहिणींचा अभ्यास करण्यासाठी चलच्चित्र रेडिओलेखन बऱ्याचदा वापरले जाते.

क्ष-किरण प्रतिमा चित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणकीकृत तंत्राला अंकीय वजावट वाहिनीदर्शन (डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी डीएसए) म्हणतात. यात एकाच अवयवाच्या दोन प्रतिमा घेतात. यापैकी एक प्रतिमा रक्तवाहिनीत भेददर्शक माध्यम अंत:क्षेपित करण्याआधी व दुसरी त्यानंतर घेतात. मग संगणक दुसऱ्या प्रतिमेतून पहिली प्रतिमा वजा करून तिसरी प्रतिमा निर्माण करतो. ही तिसरी प्रतिमा न चोंदलेल्या किंवा अडथळा नसणाऱ्या रक्तवाहिन्यांची निदर्शक असते. अंकीय वजावट वाहिनीदर्शनामुळे रुग्णांची सुरक्षितता व अशा परीक्षणामधील रुग्णांची सुखकारकता यांत वाढ होण्यास मदत होते. कारण या पद्धतीत परंपरागत वाहिनीदर्शनापेक्षा भेददर्शक विद्राव (माध्यम) कमी प्रमाणात लागतो. मेंदू व फुफ्फुसे यांमधील रक्ताभिसरण, तसेच वृक्क, श्रोणी इत्यादींमधील रोहिण्या आणि महारोहिणी चाप यांतील दोष अभ्यासण्यासाठी हे तंत्र वापरतात.

झेरोप्रारण लेखन : (झेरोरेडिओग्राफी). सी. एफ्‌. कार्लसन यांनी छायाप्रती तयार करण्यासाठी झेरोग्राफी हे तंत्र १९३७ साली शोधून काढले. या प्रक्रियेत विद्युत्‌ भारित प्रकाश संवाहक विद्युत्‌ निरोधक पृष्ठावर प्रकाशाची क्रिया केली जाते व यातील अप्रकट प्रतिमा एका रेझीनयुक्त चूर्णाने विकसित होते. नंतर लवकरच ही पद्धती प्रारण लेखनातील पटलाऐवजी वापरण्यात आली. म्हणजे झेरोग्राफीत ज्याप्रमाणे प्रकाशाने प्रतिमा निर्माण होते, त्याप्रमाणे झेरोप्रारण लेखनात क्ष-किरण वापरून कागदावर प्रतिमा तयार केली जाते.

धन विद्युत्‌ भारित सिलिनियमाचा लेप दिलेल्या भूयोजित [→ भूयोजन] ॲल्युमिनियम पट्टीवर निर्गत क्ष-किरण शलाका पडते. या शलाकेतील फोटॉनांमुळे सिलिनियमाच्या विविध क्षेत्रांचे विद्युत्‌ विसर्जन होते. धन विद्युत्‌ भाराचे होणारे असे क्षरण हे क्ष -किरणाच्या उद्‌भासनावर अवलंबून असते. चूर्ण पद्धतीने ही पट्टी विकाशित केली जाते. यासाठी ऋण विद्युत्‌ भारित निळे सूक्ष्मकणी रेझीनयुक्त (प्लॅस्टिकचे) चूर्ण वापरतात व या चूर्णाला छटादायी चूर्ण म्हणतात. प्लॅस्टिकचा लेप दिलेल्या विशिष्ट कागदावर ही प्रतिमा उतरविली जाते. नंतर ४५ सेकंद उष्णता संस्करण केल्यावर ही पट्टी धुऊन परत वापरता येते. मऊ ऊतके व विशेषकरून स्तनग्रंथी यांचे परीक्षण या तंत्राने करतात. मात्र हे तंत्र मोठ्या भागांच्या परीक्षणासाठी वापरता येत नाही. तसेच योग्य प्रकारे कार्य चालावे म्हणून या साधनाची देखभाल वरचेवर करणे गरजेचे असते. तपशीलवार सुस्पष्टता, विवर्धनक्षमता व रुग्णावर पडणाऱ्या क्ष-किरणाचे कमी प्रमाण हे या पद्धतीचे प्रमुख फायदे आहेत. तसेच ही प्रक्रिया जलदपणे करता येते ही शुष्क प्रक्रिया आहे आणि ही दिवसा उजेडी करता येते. शिवाय इष्ट विद्युत्‌ भारांची निवड करून धन वा ऋण (व्यस्त) प्रतिमा मिळविता येतात.

संगणकी छेददर्शन : (कॉम्प्युटेड टोमोग्राफी सीटी). यालाच संगणकी अक्षीय (ॲक्सियल) छेददर्शन (सीएटी) असेही म्हणतात. क्रमवार निरीक्षण करणाऱ्या या क्रमवीक्षण तंत्रात (सीटी स्कॅन) संगणक व क्ष-किरण तंत्रविद्या यांचा एकत्रित उपयोग केला जातो. या तंत्रात शरीरातील एका विशिष्ट प्रतलावर क्ष-किरण केंद्रित करून खोलवर असलेल्या शरीरांतर्गत संरचनांच्या क्ष-किरण प्रतिमा मिळविता येतात. १९६१ साली विल्यम एच्‌. ओल्डेनडॉर्फ यांनी अशी पद्धती सुचविली व १९७१ साली गॉडफ्री हॉन्सफील्ड यांनी संगणकी छेददर्शन उपकरण लंडनच्या रुग्णालयात बसविले. क्रमवीक्षणासाठी रुग्णाला अरुंद टेबलावर (गॅंट्रीवर) योग्य स्थितीत झोपवितात आणि मग हे टेबल नलिकेसारख्या क्रमवीक्षक साधनाच्या आत सरकत पुढे जाते. क्रमवीक्षकात बसविलेली क्ष-किरण नलिका रुग्णाच्या शरीराभोवती फिरते व असे करताना तिच्यातून क्ष-किरणांची अतिशय बारीक शलाका उत्सर्जित होते. या क्ष-किरण नलिकेच्या विरुद्ध बाजूस अभिज्ञातक असून त्याच्यामार्फत शरीरातून पलीकडे जाणाऱ्या प्रारणाची नोंद होते. प्रत्येक अभिज्ञातक त्याला मिळणाऱ्या प्रारणाच्या प्रमाणात प्रकाशाच्या छोट्या चमका उत्सर्जित करतो. शरीराच्या ऊतकांमार्फत क्ष-किरण भिन्नभिन्न प्रमाणात शोषले जात असल्याने प्रकाशाच्या तेजस्वितेद्वारे ऊतकाची घनता मोजता येते. संगणक प्रकाशाच्या या चमकांचे मापन व हजारपट विवर्धन करतो आणि मग त्यांचे स्थान व तेजस्वीपणा संगणकाच्या स्मृतीमध्ये साठविली जातात. या माहितीवरून संगणक शरीररचनेची द्विमितीय प्रतिमा तयार करतो व ही प्रतिमा शरीराचा काटछेदीय काप (छेद) दर्शविते.

संगणकी छेददर्शनाद्वारे वक्ष, यकृत व वृक्क यांसारख्या अवयवांच्या अंतर्गत छेदांच्या प्रतिमा मिळविता येतात. या प्रतिमा क्ष -किरण छायाचित्रांपेक्षा अधिक अचूक असतात.⇨अभिघाताने झालेली हानी अथवा काही अर्बुदांचे आकारमान व ठिकाण ओळखून काढण्यासाठी पृष्ठवंश, मेंदू व उदर यांचे परीक्षण करण्यासाठीही हे क्रमवीक्षण तंत्र उपयुक्त आहे. तोंडाने अथवा अंत:क्षेपणाने देण्यात येणाऱ्या भेददर्शक माध्यमांमुळे सीटी प्रतिमा आणखी सुस्पष्ट येऊ शकतात. विशिष्ट प्रकारचे संगणकीय सॉफ्टवेअर (कार्यक्रमण) वापरून त्रिमितीय प्रतिमा मिळविता येतात. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेत (प्लॅस्टिक सर्जरीमध्ये) किंवा पुनर्रचना विकृतिवैज्ञानिक शस्त्रक्रियेत पूर्वनियोजन करण्याच्या दृष्टीने त्रिमितीय प्रतिमा अत्यंत उपयुक्त असतात. [→ संगणक आलेखिकी].


श्राव्यातीत प्रतिमादर्शन : (सोनाग्राफी). ही निदानीय प्रतिमादर्शन पद्धती आहे. यात शरीरांतर्गत अवयवांमधील विकृती ओळखून काढण्यासाठी प्रारणांऐवजी उच्च कंप्रतांचे ध्वनितरंग वापरतात. या परीक्षणात ज्या शरीरभागाचे परीक्षण करावयाचे असते त्या भागातील त्वचेवर वजनाला हलका असा एक ⇨ऊर्जापरिवर्तक ठेवतात. हा ऊर्जापरिवर्तक प्रेषक व ग्राही अशी दोन्ही कामे करतो व तो ध्वनितरंग निर्माण करतो. हे तरंग त्वचेतून इष्ट ऊतकांपर्यंत व अवयवांपर्यंत जातात. जेव्हा हे तरंग विशिष्ट ऊतकाच्या पृष्ठभागावर आदळतात तेव्हा ते परावर्तित होऊन प्रतिध्वनी निर्माण होतात. हे प्रतिध्वनी ऊर्जापरिवर्तक टिपतो. मग इलेक्ट्रॉनीय रीतीने या प्रतिध्वनींचे शरीरभागाच्या प्रतिमेत रूपांतर होते व ती व्हिडिओच्या पडद्यावर दिसते. छायाचित्रीय पटलावर अथवा व्हिडिओ फितीवर ही प्रतिमा चित्रितही करता येते. शारीरिक हालचाल होत असतानाच ती दर्शविण्याचे काम काही श्राव्यातीत पद्धतींत केले जाते.

प्रसूतिविज्ञानात गर्भाची स्थिती व वाढ यांचे अनुश्रवण करण्यासाठी (जाणून घेण्यासाठी) सामान्यपणे श्राव्यातीत प्रतिमादर्शन वापरतात. गर्भातील घातक विकृती अथवा गर्भारपणातील अडचणी याद्वारे समजतात. पित्ताशय, वृक्क किंवा हृदय (झडपा, कप्पे) यांसारख्या अंतर्गत अवयवांमधील दोष जाणून घेण्यासाठीही श्राव्यातीत प्रतिमादर्शन वापरतात. नीला व रोहिण्या यांच्यामधील रक्तप्रवाहाचे अनुश्रवण डॉप्लर श्राव्यातीत तंत्राने करता येते. वृक्क प्रतिरोपणाचे व मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे अध्ययन करण्यासाठी, तसेच चोंदलेल्या रोहिण्यांचे निदान करण्यासाठीही श्राव्यातीत प्रतिमादर्शनाचा सामान्यपणे उपयोग करतात. [→ डॉप्लर परिणाम श्राव्यातीत ध्वनिकी].

चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन : (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग एमआरआय). हिलाच अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन (न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स एनएमआर) प्रतिमादर्शन असेही म्हणतात. फीलिक्स ब्लॉक व एडवर्ड मिल्स पर्सेल यानं १९४६ साली घन पदार्थातील अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदनाचा शोध लावला व या तंत्राचे वर्णन केले. याबद्दल त्या दोघांना १९५२ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिकही मिळाले. शरीरांतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल, हे डॅमाडियन (१९७२) व लॉटेरबुर (१९७३) यांनी दाखवून दिले. ही रोगनिदानाची एक पद्धती आहे. हिच्यात मोठा, उच्च तीव्रतेचा (बलाचा) चुंबक, रेडिओ कंप्रता संकेत व प्रतिमानिर्मिती करणारा संगणक यांचा वापर करतात. परीक्षणाच्या वेळी रुग्णाला एमआरआय क्रमवीक्षकात ठेवतात. तेथे शरीराभोवती एक चुंबकीय क्षेत्र असते. हे क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या ३० हजार पटींपर्यंत अधिक तीव्र असते. शरीराच्या ऊतकांमधील अणूंची केंद्रे ही चुंबकासारखी असतात व त्या प्रत्येकाला उत्तर व दक्षिण चुंबकीय ध्रुव असतात. या अणुकेंद्राचे बहुधा अनेक भिन्न दिशांनी व भिन्न कोनांमधून परिवलन होत असते परंतु क्रमवीक्षकाने निर्माण केलेले अधिक तीव्र असे बाह्य चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असताना अणुकेंद्रांचे उत्तर व दक्षिण चुंबकीय ध्रुव हे बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत येतात. या अणुकेंद्रांचे भिन्न दिशांमध्ये होणारे परिवलन (विसंगत परिवलन) चालूच राहते. चुंबकामुळे ही अणुकेंद्रे एका विशिष्ट कंप्रतेला आंदोलित होतात. त्यामुळे ती रेडिओप्रमाणे रेडिओ कंप्रता संकेतांचे ग्रहण व प्रेषण करीत असतात. परीक्षण होत असलेल्या शरीराच्या भागाकडे क्रमवीक्षकाकडून एक बाह्य रेडिओ कंप्रता संकेत प्रेषित होतो, तेव्हा त्याच्यामुळे अणुकेंद्रांच्या चुंबकीय ध्रुवांचे संरेखन (स्तरबद्धता) बदलते. त्यामुळे ती अणुकेंद्रे बाह्य चुंबकाच्या संरेखनात राहत नाहीत व ती एकाच दिशेत परिवलित (सुसंगत परिवलन) होतात. जेव्हा संकेताचे प्रेषण थांबते तेव्हा अणुकेंद्रांचे ध्रुव स्वत: चुंबकाच्या दिशेत संरेखित होतात आणि त्याच वेळी त्यांचे स्वत:चे क्षीण रेडिओ संकेत सोडतात. क्रमवीक्षक या संकेतांचे ग्रहण करून त्यांच्या तीव्रतेवरून व कालावधीवरून शरीराच्या भिन्न ऊतकांची लक्षणे निश्चित करतो. मग या माहितीची पुनर्मांडणी करून संगणक त्या शरीरभागाची एक द्विमितीय प्रतिमा तयार करतो.

मेंदू व मेरुरज्जू यांच्या विकारांचे परीक्षण व मूल्यमापन करण्यासाठी हे तंत्र अतिशय उपयुक्त आहे. काही बाबतींत या तंत्रामुळे मेंदूचे रोहिणीदर्शन अथवा पृष्ठवंशाचे (पाठीच्या कण्याचे) मेरुरज्जुदर्शन यांची गरज उरत नाही. अस्थी, सांधे व मऊ ऊतक, तसेच छाती, उदर व श्रोणी यांच्या विकृतींच्या मूल्यमापनासाठीही हे तंत्र वापरतात.

चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शनाद्वारे केलेल्या परीक्षणात तीव्र अशा चुंबकीय क्षेत्राशी संबंध येतो व त्यामुळे काही रुग्णांचे असे परीक्षण करता येत नाही. ज्या रुग्णांच्या मेंदूमध्ये लोहयुक्त धातूचा चाप (क्लिप) किंवा डोळ्यात लोहयुक्त कण असतात, अशा रुग्णांचे चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शनाद्वारे परीक्षण करता येत नाही. कारण चुंबकीय क्षेत्रामुळे हे चाप वा कण हालून हानी पोहोचण्याची शक्यता असते. कृत्रिम सांधे, शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारे चाप, गतिकारक (पेसमेकर) हे बसविलेल्या रुग्णांच्या बाबतीत पण असा धोका संभवतो.

अणुकेंद्रीय वैद्यक : वैद्यकाच्या या खास शाखेत रोगाचे निदान व उपचार यांसाठी किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) द्रव्यांचा वापर करतात. ऊतकांत अंत:क्षेपित केलेल्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच, पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) क्रमवीक्षण यात करतात. मेंदू क्रमवीक्षणात समस्थानिक क्रमवीक्षण व क्ष-किरण छायाचित्रण या दोन्हींचा उपयोग करतात. १९५८ साली हॉल अँगर यांनी विकसित केलेल्या गॅमा कॅमेऱ्या मुळे या शाखेचा प्रारंभ झाला.

अणुकेंद्रीय वैद्यकीय प्रतिमादर्शन अध्ययनात किरणोत्सर्गी संयुगे वापरतात. त्यांना किरणोत्सर्गी औषधींची किरणोत्सर्गी न्यूक्लाइडे (केंद्राभ) म्हणतात (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या, न्यूट्रॉनांची संख्या व ऊर्जा ही वैशिष्ट्ये सूचित करणाऱ्या अणुजातीला न्यूक्लाइड म्हणतात). ही संयुगे गॅमा किरण किंवा बीटा कण उत्सर्जित करतात. शरीराच्या ज्या भागांचा अभ्यास वा परीक्षण करावयाचे असते, त्या भागांत ही संयुगे तात्पुरती गोळा व्हावीत अशा रीतीने ती बनविलेली (सूत्रबद्ध केलेली) असतात. अशा बहुतेक परीक्षणांत ही संयुगे रुग्णात अंत:क्षेपित करतात अथवा ती हुंगायला किंवा गिळायला देतात. प्रारणवैज्ञानिक अशा संयुगांची निवड करतो. प्रारणाची किमान मात्रा वापरून परीक्षण करावयाच्या अवयवाची किंवा शरीरभागाची सर्वोत्कृष्ट प्रतिमा मिळेल अशा रीतीने ही निवड केली जाते. परीक्षणाच्या प्रकारानुसार प्रतिमा लगेचच, काही तासांनी अथवा अनेक दिवसांनी मिळविता येते. निदानाकरिता किरणोत्सर्गी न्यूक्लाइडे देण्यामध्ये जोखीम जवळजवळ नसते परंतु गरोदर स्त्रियांसाठी ही पद्धती वापरण्या योग्य नाही. कारण प्रौढांच्या तुलनेत गर्भ या संयुगांना अधिक संवेदनशील आहे, असे दिसते.

या परीक्षणात रुग्णाला टेबलावर झोपवितात व वर टांगलेल्या गॅमा कॅमेऱ्याने प्रतिमा घेतात. रुग्णाच्या शरीरातील किरणोत्सर्गी न्यूक्लाइडाने बाहेर टाकलेले गॅमा किरण हा कॅमेरा टिपतो व या माहितीचा प्रतिमानिर्मितीसाठी उपयोग होतो. रुग्णाच्या शरीरात किरणोत्सर्गी न्यूक्लाइडाचे झालेले वितरण या प्रतिमेत दिसते. ही प्रतिमा पटलावर चित्रित होते व तिला चमचमलेख किंवा क्रमवीक्षलेख म्हणतात.

हृदय व अस्थी यांचे क्रमवीक्षलेख हे अशी सर्वांत सामान्य परीक्षणे आहेत. हृदयाचा क्रमवीक्षलेख हा हृदयाचे कार्य व हृदयाच्या स्नायूला होणारा रक्तपुरवठा यांचे मूल्यमापन करण्यासाठी वापरतात. अस्थीचा क्रमवीक्षलेख हा अस्थीचा कर्करोग, संसर्ग किंवा आघात ओळखण्यासाठी वापरतात. सामान्यपणे केल्या जाणाऱ्या इतर किरणोत्सर्गी न्यूक्लाइड परीक्षणांमध्ये फुफ्फुसे, यकृत, पित्ताशय, वृक्क, अवटू ग्रंथी व मेंदू यांचे क्रमवीक्षलेख येतात.


एक – फोटॉन उत्सर्जन संगणकी छेददर्शन : (सिंगल – फोटॉन एमिशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी एसपीईसीटी). द्विमितीय प्रतिमा मिळविण्यासाठी या परीक्षणात संगणकाचा उपयोग होतो. या प्रतिमा म्हणजे हृदय, मेंदू व यकृत यांसारख्या अंतर्गत अवयवांचे पातळ छेद असतात. परंपरागत क्रमवीक्षलेखांपेक्षा या पद्धतीने मिळणाऱ्या प्रतिमांमध्ये अवयवांचे अधिक तपशीलवारपणे परीक्षण करता येते. याद्वारे त्रिमितीय अवयवदर्शने व चलच्चित्रदर्शने मिळविता येतात. चलच्चित्रदर्शने ही हलत्या चित्रांसारखी असतात आणि ती हृदयाच्या स्नायूच्या आकुंचनांचे मूल्यमापन करण्यासाठी वापरतात.

पॉझिट्रॉन उत्सर्जन छेददर्शन : (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी पीईटी). हे समस्थानिक क्रमवीक्षणाशी संबंधित असलेले प्रतिमादर्शन तंत्र आहे. एखाद्या अवयवातील चयापचयाची (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिकी व रासायनिक घडामोडींची) क्रियाशीलता अभ्यासण्यासाठी हे अधिक परिशुद्ध प्रारणवैज्ञानिक तंत्र वापरतात. उदा., मेंदू व हृदय यांतील ग्लुकोजाचा चयापचय तसेच हृदय, मेंदू, स्नायू यांतील रक्तप्रवाहाचा वेग, अवटू ग्रंथीतील आयोडिनाचा चयापचय इ. मापनासाठी हे तंत्र वापरतात. अपस्मार व अल्झहाईमर रोग यांसारख्या मेंदूशी निगडित असलेल्या विकृती व हृदयाच्या ऊतकाची जीवनक्षमता (चेतना) यांच्या अभ्यासासाठी हे तंत्र उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

हस्तक्षेपी पद्धती : हस्तक्षेपी प्रारणविज्ञानामध्ये विविध अंत:क्षेपण व सुषिरी तंत्रांबरोबर प्रतिमादर्शन पद्धती वापरतात. याद्वारे अर्बुदे, अवरोध, स्रवणाऱ्या (रक्तस्राव होत असलेल्या) रक्तवाहिन्या व इतर विकृतींवर मोठ्या शस्त्रक्रियेविना उपचार करण्यासाठी ही तंत्रे वापरतात. वाहिनीप्रतिसंस्करण (शस्त्रक्रियेने वाहिनी ठाकठीक वा दुरुस्त करण्याची क्रिया) ही अधिक सामान्य अशी हस्तक्षेपी पद्धत आहे आणि अवरुद्ध (चोंदलेल्या) किंवा अरुंद झालेल्या रोहिण्यांवर उपचार करण्यासाठी ही पद्धती वापरतात. या पद्धतीत एक सुषिरी रोहिणीत अरुंद झालेल्या भागापर्यंत घुसवितात, मग सुषिरीला जोडलेला फुगा तेथे फुगवितात व यामुळे अरुंद झालेला भाग विस्तारला जातो. नंतर फुग्यातील हवा काढून घेतात व मग सुषिरी काढून घेतात. अवरुद्ध रोहिणीवरील उपचारासाठी लेसर – सुषिरी ही संयुक्त पद्धतही वापरतात. वसात्मक द्रव्ये रोहिणीच्या आत साचून आणि तिचा आतील थर तंत्वात्मक (तंतुमय) होऊन रोहिणीकर्कशीभवन झालेले असते. यातून बनलेल्या रोहिणी विलेपीविकार सूचक पापुद्र्याची लेसरने वाफ होते. नंतर रोहिणीचा अरुंदपणा घालवून ती विस्तारण्यासाठी (रुंद करण्यासाठी) वरीलप्रमाणे फुगा वापरतात. [→ रक्ताभिसरण तंत्र].

काही वृक्काश्मरी व पित्ताश्मरी [→ अश्मरी] काढून टाकण्यासाठी हस्तक्षेपी प्रारणवैज्ञानिक एक खास प्रकारची सुषिरी वापरतात. येथे या सुषिरीचा पुनर्प्रापक प्रयुक्ती (वस्तु परत मिळविणारे साधन) म्हणून उपयोगी करतात. कोटरिकांत (लहान पोकळ जागांमध्ये) साचलेल्या द्रायूंचा (द्रवांचा किंवा वायूंचा) निचरा करण्यासाठीही सुषिरीचा शोषित्र (शोषून घेणारे साधन) म्हणून उपयोग होऊ शकतो.

ताप-आलेखन : मानवी शरीराच्या विविध भागांकडून (त्वचेकडून) प्रारणाच्या रूपात उष्णता सतत उत्सर्जित होत असते. या उष्णतेत होणारे फेरबदल ओळखण्यासाठी व मोजण्यासाठी त्वचेच्या पृष्ठभागाचे क्रमवीक्षण करतात. या अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणाचे रूपांतर दृश्य संकेतात करून त्यांची छायाचित्रीय नोंद केली जाते. या तंत्राला ताप-आलेखन म्हणतात. असाधारण तापमान किंवा त्यामागील रोगकारक स्थिती यांच्या निदानासाठी हे तंत्र वापरतात. त्वचीय रक्तपुरवठ्याचे निदर्शक असणाऱ्या त्वचा-तापमानाची नोंद या साध्या व निरुपद्रवी तंत्राद्वारे करता येते. स्तनांमधील विकारस्थले आणि रक्तवाहिन्यांविषयीच्या समस्या ओळखून काढण्यासाठी हे तंत्र वापरतात. त्वचा-तापमानातील बदल हे एखाद्या विशिष्ट विकाराचेच लक्षण नसल्याने या तंत्राचा विस्तृत प्रमाणावर वापर करीत नाहीत.

वरील तंत्राशिवाय निदानासाठी उपयुक्त एक नवीन प्रतिमादर्शन तंत्र पुढे येत असून ते अजून प्रयोगावस्थेत आहे. डायाफॅनोग्राफी नावाच्या या तंत्रात स्तनांच्या विकारस्थलांचा अभ्यास करण्यासाठी पारप्रकाशन हे तंत्र वापरतात. पारप्रकाशनात वैद्यकीय परीक्षणासाठी प्रकाश शरीरभागातून पाठविण्यात येतो. तीव्र प्रकाश कोटराच्या भित्तींतून पलीकडे गेल्याने त्याची बाह्य रूपरेषा निरीक्षकाला दिसू शकते आणि प्रकाश छटेतील (घनतेतील) असाधारण स्थिती लक्षात येते आणि याची विकाराचे निदान करण्यास मदत होते.

पहा : प्रारण चिकित्सा वैद्यकीय उपकरणे श्राव्यातीत ध्वनिकी संगणक आलेखिकी क्ष-किरण क्ष -किरण वैद्यक.

संदर्भ : 1. Avedon, D. Electronic Imaging Systems : Design Applications and Management, 1993.

           2. Avedon, D. Introduction to Medical Imaging, 1993.

           3. Sturman, M. F. Effective Medical Imaging : A Signs and Symptoms Approach, 1993.

मासोदकर, दया

शोधग्रस्त ग्रासिकेच्या खालील भागाची अंतर्दर्शकाच्या साहाय्याने घेतलेली रंगीत छायाचित्रे : (अ) रेषिय व्रण , (आ) व्यापक परिघीय व्रण नऊ आठवडयांच्या गर्भाची प्राकृत भ्रूणीय मस्तिष्क शारीर संरचना आणि आंतरमस्तिष्क व मस्तिष्कबाह्य रक्तपुरवठा दर्शविणारी डॉप्लर परिणामावर आधारित श्राव्यातील-ध्वनि-रंगप्रतिमा (चौथे मस्तिष्क-विवर वाणाने दर्शविले आहे)
क्रमवीक्षकामार्फात घेतलेले संगणकीय छेददर्शन : हृदय व फुफुस (उजव्या फुफुसात मोठे अर्बुद) उजव्या वृक्काचे डॉप्लर परिणामावर आधारित श्राव्यातील-ध्वनि-रंगप्रतिमा : यामध्ये अधोमहानीला, मुख्य वृक्क आणि वृक्कांतर्गत वाहिन्या यांतील रक्तप्रवाह दिसत आहे
मेंदूतील कार्यक्षेत्रांचे 'स्थान संगणकीय छेददर्शन' : हक्-उद्दीपनाने प्रभावित होणारा मेंदूचा भाग वाणांनी दर्शविलेला आहे.(डावीकडे-डोळे मिटलेले असताना मध्ये व उजवीकडे - डोळे उधडल्यावर मानसिक क्रिया वाढताना) थॅलियमभरित हृदूरनायुंचे प्राकृत छेददर्शन : डावीकडे-उभ्या दीर्घ-अक्ष प्रतलातील प्रतिमा मधे-आडव्या दीर्घ-अक्ष प्रतलातील प्रतिमाउजवीकडे-लघु-अक्ष प्रतलातील प्रतिमा. वरची ओळ-दाव प्रतिमाखालची ओळ-पुनर्वाटप प्रतिमा
उधर्व आंत्रबंधिय रोहिणीचे वाहिनीदर्शन: रोहिणी व तिच्या सर्व प्रमुख शाखा यांची प्राकृत रचना.शेषांत्राचा अग्रस्थ भाग व बृहदांत्राचा सुरुवातीचा भाग यांना रक्तपुरवठा करणारी ऊर्ध्व आंत्रबंधीय रोहिणीची शाखा बाणाने दर्शविली आहे कवटीमधून घेतलेल्या उभ्या मध्यछेदाची चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमा
उदरातून घेतलेला आडवा छेद दाखविणारी संगणकिय छेदप्रतिमा डाव्या व उजव्या स्तनांची पार्श्वदृश्ये दर्शविणारी स्तनग्रंथीदर्शक प्रतिमा
क्रमवीक्षकामर्फत मिळविलेली संपूर्ण शरीरातील हाडांची अणुकेंद्रिय चुंबकिय अनुस्पंदन प्रतिमा : कर्करोगाच्या शरीरातील प्रसाराचे निदान करण्यासाठी ही उपयुक्त असते प्राकृत अवस्थेतील छातीचा पिंजरा (बरगड्या),फुफ्फुसे व हृदय यांचे क्ष-किरण छायाचित्र
श्रोणीची संगणकिय त्रिमितीय छेदप्रतिमा : शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने मिळालेली प्रतिमा