तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). बाह्य परिसरात व शरीराच्या विविध भागांत होणाऱ्या बदलांमुळे ज्या संवेदना उत्पन्न होतात त्यांचा समन्वय करून योग्य त्या शारीरिक क्रिया घडवून आणणे व अशा क्रियांवर नियंत्रण ठेवणे, हे कार्य करणाऱ्या शरीरातील यंत्रणेला तंत्रिका तंत्र म्हणतात. शरीराचे अखंडत्व, स्वास्थ्य आणि मूळ स्थिती टिकविण्याचा त्यामागे हेतू असतो. तंत्रिका तंत्रातील कोशिका (पेशी) विशिष्ट कार्यास योग्य अशाच असतात.

सर्व सजीवांमध्ये परिसरातील बदलाला योग्य अशी शारीरिक प्रतिक्रिया घडवून आणण्याची तरतूद असते. उदा., अती उष्णता टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक प्राणी करतो, कारण तीमुळे शरीराची हानी होण्याचा संभव असतो. या सर्व प्रतिक्रियांचा हेतू स्वतःचे आणि त्या योगे प्रजातीचे अस्तित्व टिकविण्याचा असतो. ⇨ अमीबा किंवा ⇨ पॅरामिशियम  यासारख्या एक कोशिकीय (एकाच कोशिकेच्या बनलेल्या) प्राण्यांत परिसरानुवर्ती बदल घडवून आणणारी स्वतंत्र यंत्रणा नसते. परंतु या प्राण्यांच्या जीवद्रव्यातच (कोशिकेतील जीवनावश्यक जटिल द्रव्यातच) संवेदनक्षमता हा गुणधर्म असतो. बहुकोशिकीय वजटिल प्राणिशरीराकरिता निरनिराळ्या शरीरभागांचे सहकार्य अशा प्रतिक्रियांकरिता जरूर असल्यामुळे उद्दीपक आणि अनुक्रिया यांमध्ये नियंत्रक असणे जरूर झाले. बहुकोशिकीय प्राण्यामध्ये या नियंत्रणाकरिता दोन स्वतंत्र यंत्रणा असतात : (१) अंतःस्रावी ग्रंथी  व (२) तंत्रिकाजन्य यंत्रणा. प्राणिसृष्टीमध्ये जसजसा क्रमविकास (उत्क्रांती) होत गेली तसतशी तंत्रिकाजन्य यंत्रणेच्या रचनेतही वाढ होत गेली. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) व सस्तन प्राण्यांत तिचे प्रगत व स्वतंत्र स्वरूपच बनले. ज्या प्राण्यांमध्ये स्वतंत्र तंत्रिका तंत्र असते त्या प्राण्यांचे असे तंत्र नसलेल्या प्राण्यांपेक्षा अधिक जटिल वर्तन होऊ शकते. अगदी कनिष्ठ प्राण्यात अत्यंत साधी रचना असलेल्या या तंत्राची क्रमविकासाबरोबर गुंतागुंत वाढत जाऊन ते अत्यंत क्लिष्ट व घोटाळ्याचे बनले. अनेक पिढ्यांमध्ये लाखो वर्षे होत गेलेला क्रमविकास या रचना बदलास कारणीभूत असल्यामुळे तंत्रिका तंत्र समजण्याकरिता या क्रमविकासाची थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे.

क्रमविकास : प्राणिशरीरात तंत्रिका कोशिका कशी उत्पन्न झाली, याविषयी अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. सुरुवातीच्या एका सिद्धांतानुसार अगदी साध्या तंत्रिका चापाचे (ज्यातून तंत्रिका संवेदना वाहून नेली जाते त्या मार्गाचे) अनुक्रमे ग्राहक, संवाहक आणि प्रभावकारक (ज्याच्या द्वारे संवेदनेचे वितरण होऊन स्नायूचे आकुंचन व ग्रंथींचे स्रवण या क्रिया घडवून आणल्या जातात तो तंत्रिकेचा टोकाचा भाग) हे तीनही विभाग एकाच कोशिकेत समाविष्ट झालेले असावेत. या कोशिकेला ‘तंत्रिका-स्नायू’ कोशिका असे संबोधण्यात आले परंतु अशी कोशिका असलेला एकही प्राणी आढळत नसल्यामुळे हा सिद्धांत मान्य झाला नाही. या सिद्धांतापेक्षा अधिक समंत सिद्धांतानुसार प्रभावकारक प्रथम उत्पन्न झाले असावेत. स्पंजामध्ये फक्त प्रभावकारकच आढळतात. त्यांच्या छिद्रांतून पाणी आत शिरते व बाहेर पडते. या छिद्रांभोवती स्नायू असून त्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे ती लहान मोठी होतात. या स्नायूंची हालचाल कोणतेही ग्राहक व संवाहक नसताना होते म्हणजे फक्त प्रभावकारकच (स्नायू) असतात. त्यापुढची पायरी म्हणजे ग्राहक व प्रभावकारक दोन्ही असणे. त्यानंतर चापाचा मधला दुवा म्हणजे संवाहक तयार झाला असावा. सर्व अपृष्ठवंशी व पृष्ठवंशी प्राण्यांच्या तंत्रिका तंत्राचा ‘तंत्रिका चाप’ हा पायाच असतो, असे म्हणता येईल.

तंत्रिका कोशिकांची उत्पत्ती बाह्यत्वचा किंवा शरीराच्छादनातून झाली असावी. कारण काही कनिष्ठ अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये त्या याच ठिकाणी आढळतात. याशिवाय तंत्रिका ऊतकाची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाची) उत्पत्ती भ्रूणातही बाह्यस्तरापासूनच झालेली आढळते. ज्या मूळ कोशिकेपासून तंत्रिका कोशिका बनते ती कोशिका प्रोटोझोआप्रमाणेच उद्दीपनक्षम आणि संवाहक गुणधर्मयुक्तच असावी. ही पूर्वगामी तंत्रिका कोशिका स्रावोत्पादकही असावी व तिच्यामध्ये असलेले गुणधर्म मूळ तंत्रिका कोशिकेत उतरले असावेत. विशिष्ट गुणधर्म असलेली तंत्रिका कोशिका प्रथम अगदी कनिष्ठ बहुकोशिकीय प्राण्यात तयार झाली असावी.

तंत्रिका कोशिकेविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहेच. येथे आवश्यक तेवढीच माहिती दिली आहे. तंत्रिका कोशिकेपासून दोन प्रकारचे प्रवर्ध (वाढी) निघतात : (१) आखूड व शाखायुक्त आणि (२) लांब. आखूड व शाखायुक्त प्रवर्ध कोशिका पिंडाकडे संवेदना वाहून नेतात म्हणून त्यांना अभिवाही प्रवर्ध म्हणतात. लांब प्रवर्ध संवेदना दूर वाहून नेतात म्हणून त्यांना अपवाही प्रवर्ध म्हणतात. अगदी कनिष्ठ प्राण्यामध्ये अभिवहन आणि अपवहन एकाच कोशिकेच्या प्रवर्धाद्वारे न होता त्याकरिता स्वतंत्र कोशिकाच तयार झाल्या. उदा., आंतरगुही (सीलेंटरेट प्राणी). पोरिफेरा या प्राण्यामध्ये अभिवाहक कोशिका परीसरीय बदलामुळे उत्पन्न होणाऱ्या संवेदना मिळताच त्या अपवाहक कोशिकेद्वारे स्नायूंना पोहोचवून योग्य हालचाल घडवून आणतात.

आ. १. अपृष्ठवंशी प्राण्यांतील तंत्रिका तंत्रे : (अ) हायड्रामधील तंत्रिका तंत्र : (१) तंत्रिका जाल; (आ) चापट कृमीतल तंत्रिका तंत्र : (१) प्रमस्तिष्क गुच्छिका, (२) अनुदैर्घ्य तंत्रिका रज्जू; (इ) संधिपाद प्राण्यातील तंत्रिका तंत्र : (१) पुढचा मेंदू, (२) मधला मेंदू, (३) मागचा मेंदू, (४) तंत्रिका गुच्छिका; (ई) ॲनेलिडामधील तंत्रिका तंत्र : (१) प्रमस्तिष्क गुच्छिका, (२) तोंड, (३) ग्रासिकावेष्टित तंत्रिका दुवा, (४) ग्रसिकेखालील गुच्छिका, (५) अभ्युदरीय तंत्रिका रज्जू. (ग्रसिका म्हणजे घसा; अभ्युदरीय म्हणजे पोटाकडील).

अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये दोन प्रकारची तंत्रिका तंत्रे आढळतात : (१) प्रसृत (पसरलेली) व (२) केंद्रीकृत. यांपैकी प्रसृत प्रकार प्रारंभिक व आदिम (आद्य) स्वरूपाचा आहे. क्रमविकासाबरोबरच केंद्रीकृत प्रकार तयार झाला.

प्रसृत पद्धती आंतरगृही प्राण्यात उदा., हायड्रात आढळते (आ. १ अ). या प्रकारात तंत्रिका कोशिका प्राण्याच्या सर्व शरीरावर बहुतकरून शरीरकवचालगत विखुरलेल्या असतात. तंत्रिका कोशिकांचे मोठे समूह, ज्यांना मेंदू म्हणता येईल, असे या प्राण्यात नसतात. फारच थोडे छोटे छोटे पुंज असतात व त्यांना तंत्रिका गुच्छिका म्हणतात. कोशिका व त्यांचे प्रवर्ध मिळून एक जाळेच बनलेले असते. कोशिकांमध्येही काही प्रकार उदा., स्रावोत्पादक, संवेदनाग्राही वगैरे असतात.

तंत्रिका तंत्राचा यापुढील क्रमविकास एकायनोडर्माटामध्ये आढळतो. या प्राण्यांच्या तोंडाजवळ ‘तंत्रिका वलय’ असते. बाहूकडे जाणाऱ्या तंत्रिका व कवचाखाली तंत्रिका जाल असते. तंत्रिका वलय आणि त्यापासून विकीर्णित झालेल्या (अरीय रीतीने विभागलेल्या) तंत्रिकांना मिळून केंद्रीय तंत्रिका तंत्र म्हणतात. क्रमविकासाची पुढील पायरी चापट कृमीमध्ये आढळते. या प्राण्यामध्ये द्विपार्श्चिक (मध्यरेषेच्या दोन्ही बांजूस) व सम प्रमाणित तंत्रिका तंत्र असून मेंदूही असतो (आ. १ आ).

पर्णचिपट (प्लॅनेरिया) संघाच्या चापट कृमीमध्ये मेंदू, अनुदैर्ध्य (लांबीच्या देशातील) तंत्रिका रज्जू व परिसरीय तंत्रिका तंत्र असते. या प्राण्यामध्ये संवेदनाग्राहक शरीरभर विखुरलेले असतात. त्यांना डोळे असून ते तंत्रिकांद्वारे मेंदूशी जोडलेले असतात. गोलकृमी, मृदुकाय (मॉलस्क) व संधिपाद (आर्थ्रोपॉड) प्राण्यांची तंत्रिका तंत्रे अधिक प्रगत असतात. त्यांच्यामध्ये केंद्रीकरणावर तसेच मेंदूवर अवलंबून असलेले तंत्रिका तंत्र विकसित झालेले आढळते.

अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये सर्वांत अधिक प्रगत झालेले तंत्रिका तंत्र शीर्षपाद (सेफॅलोपॉड) प्राण्यात आढळते. स्क्किड, कटलफिश, ऑक्टोपस, कीटक व कोळी या प्राण्यांचा समावेश या वर्गात होतो. या प्राण्यांमध्ये निरनिराळ्या शारीरिक क्रियांवर मेंदूचे नियंत्रण असते. याशिवाय त्यांच्या मेंदूमध्ये साहचर्य नियंत्रक उच्च केंद्रे असतात. या केंद्रांमुळे दोन पदार्थांच्या वेगळेपणाचे ज्ञान आणि स्मृती यांविषयी त्यांना माहिती मिळते. शीर्षपाद प्राण्यांचे डोळे पुष्कळ प्रगत झालेले असून त्यांचे पृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांशी पुष्कळ साम्य असते.

संधिपाद प्राण्यामध्ये मेंदूचे तीन भाग पडलेले दिसतात : (१) पुढचा मेंदू, (२) मधला मेंदू आणि (३) मागचा मेंदू (आ. १ इ). प्रत्येक भागाकडे विशिष्ट शारीरिक कार्ये नियंत्रित करण्याचे काम असते. उदा., शरीराच्या डोळे व इतर संवेदनाग्राहकांकडून येणाऱ्या संवेदनांचे एकत्रीकरण करणे आणि हालचाल ही कार्ये पुढच्या मेंदूमुळे होतात, तर मागच्या मेंदूकडे अन्नग्रहण क्रिया व पचन क्रिया यांवरील नियंत्रणाचे कार्य असते. संधिपाद प्राण्यांच्या अंगावरील केस हे प्रमुख संवेदनाग्राहक असतात. स्पर्श, कंप, जलप्रवाह, ध्वनितरंग इत्यादींमुळे या केसांना संवेदना मिळतात. काही केस रयायनग्राही असतात. त्यामुळे पाण्यातील रसायने व त्यांचा गंध यांविषयी संवेदना मिळतात. नाकतोडा व रातकिडा या प्राण्यांमध्ये ध्वनितरंग संवेदना ग्रहण करणारे इंद्रिय अतिशय संवेदनाशील असते. त्वचा ऊतकापासून बनलेल्या या इंद्रियांच्या कंपनापासून निघणाऱ्या संवेदना मेंदूतील तंत्रिका कोशिकांपर्यंत पोहोचतात.

आ. २. मधमाशीचे तंत्रिका तंत्र

बहुतेक सर्व अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये स्रावोत्पादक तंत्रिका कोशिका असतात. कवचधारी प्राणी व संधिपाद प्राणी यांमध्ये अशा प्रकारच्या कोशिका अधिक प्रगत स्वरूपात आढळतात. या विशिष्ट कोशिका हॉर्मोनांच्या [→ हॉर्मोने] उत्पादनाचे कार्य करतात. अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये तंत्रिका कोशिकांचे पुंज तयार होतात. प्रथम हे पुंज स्वतंत्र असले, तरी पुढे त्यांपासून तयार झालेल्या दोन साखळ्या उदरभागापर्यंत गेलेल्या आढळतात. या साखळ्यांमधील कोशिका पुंजांचा संपर्क साधणारे बारीक तंतूही असतात. कीटकांच्या शरीरांत तंत्रिका तंत्र अशी संज्ञा वापरता येण्याजोगी रचना आढळते.

विंचू, कोळी व मधमाशी या प्राण्यांमध्ये शिरोभागी दोन भाग असलेला तंत्रिका पुंज असतो. त्याला द्विखंडात्मक मेंदू म्हणता येईल. या मेंदूपासून डोळे, तोंडाच्या भोवतालचे ताठ केस, ओठ येथपर्यंत तंत्रिका तंतू गेलेले असतात व ते या भागाकडून येणाऱ्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवितात. मेंदूमुळे या प्राण्यातील श्वसनक्रिया, रक्तप्रवाह व पचन तंत्र यांवर नियंत्रण ठेवले जाते. मधमाशीमध्ये स्वतंत्र अभिवाही तंत्रिका असतात व त्यांच्या साहाय्याने तिला प्रकाश, गंध, रस, ध्वनी व स्पर्श या संवेदनांची जाणीव होते.

पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये तंत्रिका तंत्र पुष्कळच प्रगत झालेले आढळते. या प्राण्यांमध्ये शरीराच्या मध्यरेषेवर पाठीकडच्या बाजूस तंत्रिका ऊतकाचा अक्षच तयार झालेला असतो. या अक्षामध्ये कोशिकायुक्त करड्या रंगाचा भाग बाहेरून व पांढरा तंतुमय भाग आतील बाजूस असतो. हा अक्ष दंडगोलाकार असून आत मध्यभागी जी पोकळी असते तिला मध्य नलिका म्हणतात.

पृष्ठवंशी प्राण्यांची भ्रूणातील वाढ होत असताना पाठीकडील भागात मध्यभागी पृष्ठरज्जू असतो. या पृष्ठरज्जूच्या दोन्ही बाजूंस ज्या कमानी असतात त्यांपासून अंतस्त्यांची (हृदय, मूत्रपिंड, आतडी वगैरे अवयवांची) उत्पत्ती होते. पचन अंतस्त्यांच्या मागे तंत्रिका रज्जू (पुढे जो मेरुरज्जू बनतो) तयार होतो. पृष्ठवंशी प्राण्यातील अगदी कनिष्ठ वर्गातील प्राणी चूषमुखी प्राणी (सिस्टोस्टोमा) असूनही माशापासून मानवापर्यंतच्या तंत्रिका तंत्रातील सर्व भागांची रचना त्यांच्यामध्ये आढळते.

आ. ३. लँप्रीचा मेंदू : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध, (२) मधला भाग, (३) मध्य मस्तिष्क, (४) निमस्तिष्क, (५) लंबमज्जा, (६) मेरुरज्जू.

लँप्री या प्राण्यामध्ये तंत्रिका नलिका शरीराच्या लांबीएवढी लांब असते. तीपासून मेरुरज्जू व त्यापासून निघणाऱ्या पृष्ठीय (पाठीकडच्या) व अभ्युदरीय (पोटाकडच्या) तंत्रिका असतात. पुढच्या टोकाकडे नलिकेची भित्ती जाड असून हा भाग नाक, कान, डोळे आणि इतर संवेदनाग्राहकांशी जोडलेला असतो, हाच मेंदू होय. अगदी पुढच्या टोकावर दोन पिशवीसारखे फुगवटे असतात. ते पुढचा मेंदू किंवा प्रमस्तिष्क गोलार्धच होत. या गोलार्धात गंध तंत्रिका येऊन मिळतात. माशामध्ये हा भाग फक्त गंध संवेदना ग्रहणाचेच कार्य करीत असावा. गोलार्ध जोडीच्या मागे जो एकसंध भाग असतो, त्याला मध्यमेंदू म्हणतात. त्याच्या तळभागाशी ⇨ पोष ग्रंथी संलग्न  असते व पृष्ठभागावर ⇨ तृतीय नेत्रपिंड  जोडलेला असतो. मध्यमेंदूच्या मागे पुन्हा दोन फुगवटे असतात, त्यांना दृष्टिखंड म्हणतात. माशांच्या मेंदूतील हा भाग अतिप्रगत असतो. कारण त्यांच्यामध्ये इतर संवेदनांपेक्षा दृष्टि-संवेदना फार महत्त्वाची असते. दृष्टिखंडाच्या मागे पश्चमेंदू असतो. त्यात ‘निमस्तिष्क’ आणि ‘लंबमज्जा’ यांचा समावेश होतो. शरीर संतुलनाचे कार्य निमस्तिष्काकडे असते व तो कानाशी जोडलेला असतो. मेंदूचा जो भाग मेरुरज्जूशी समरस झाल्यासारखा असतो त्याला लंबमज्जा म्हणतात. या भागापासून मस्तिष्क तंत्रिका निघतात. या ठिकाणी विशिष्ट संवेदनांचे ग्रहण होते. त्यांपैकी रुचि-संवेदना महत्त्वाची असते. बहुतेक सर्व माशांमध्ये ही संवेदना फार उपयुक्त असते. मासा फक्त मुखानेच रुचि-संवेदना घेत नसून त्याच्या सबंध शरीरावर पसरलेल्या मस्तिष्क तंत्रिकांच्या द्वारे तो रुचि–संवेदना घेत असतो. लंबमज्जा भागातच श्वसन केंद्र असून श्वसनक्रिया नियंत्रणाचे कार्य माशापासून मानवापर्यंत सर्वच पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये मेंदूचा हाच भाग करतो.

कुत्रामासा (डॉगफिश) या शार्क जातीच्या माशाचा मेंदू चूषमुखी प्राण्यांच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. त्यामध्ये दोन्ही बाजूंस गंधवाही खंड, दोन मस्तिष्क गोलार्ध, दोन दृष्टिखंड, लंबमज्जा आणि खालच्या बाजूस निमस्तिष्क असे वेगवेगळे भाग दिसतात. यांशिवाय दहा मस्तिष्क तंत्रिका असून पृष्ठवंशात (कशेरुक दंडात) चपट्या आकाराचे मेरुपृष्ठ (पुढे मेरुरज्जू नाव मिळालेले) असते. यावरून या प्राण्यात केंद्रीय तंत्रिका तंत्राचे सर्व भाग प्राथमिक स्वरूपात दिसतात.

बेडूक या उभयचर (पाण्यात व जमिनीवरही राहणाऱ्या) प्राण्यातील मेंदूच्या दोन गंधग्राही खंडांचा एकच कंद बनलेला असतो. या प्राण्यात दोन मोठे प्रमस्तिष्क गोलार्ध, दृष्टिखंड, मस्तिष्कसेतू, निमस्तिष्क, मध्यमस्तिष्क हे भाग स्पष्ट दिसतात.

क्रमविकासातील उभयचर प्राण्यांच्या वरचा टप्पा म्हणजे सर्पादि सरीसृप (सरपटणारे) प्राणी होत. या प्राण्यांच्या मेंदूची रचना जवळजवळ मानवी मेंदूसारखी असते. त्यांच्या मेंदूतील निमस्तिष्क बराच वाढलेला असल्यामुळे स्नायूंचा समन्वय आणि ध्वनिसंवेदनेचे ग्रहण अधिक प्रगत स्वरूपात असतात.

पक्ष्यांमध्ये निमस्तिष्क अधिक प्रगत असतो व म्हणून शरीर संतुलन आणि दृष्टिसंवेदना उत्तम असतात. मेंदूचा पुढचा भाग बराच वाढलेला असून जाड तंत्रिका ऊतकाचा गोळाच बनलेला असतो. त्यामध्ये अनेक लहान लहान तंत्रिका कोशिका विखुरलेल्या असतात. हा भाग केवळ गंधग्राही भाग न राहता काही कार्ये केंद्रित झाल्यामुळे मेंदूचा तो सर्वांत प्रभावी भाग बनतो. पक्ष्यांच्या सहजप्रेरित वर्तनरीती याच मेंदूभागावर अवलंबून असतात व त्या सस्तन प्राण्यांच्या परिवर्तनशील बुद्धिजन्य हालचालींपेक्षा फार निराळ्या असतात.

सस्तन प्राण्यांमध्ये पुढच्या मेंदूच्या छताचा भाग बराच प्रगत झालेला असतो. त्यावर बराच जाड करड्या रंगाचा थर असतो. या थराला प्रमस्तिष्क बाह्यक म्हणतात. तंत्रिका कोशिकांपासून बनलेल्या या थराद्वारे तंत्रिका तंत्राच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवले जाते. सशाच्या मेंदूची वाढ बरीच प्रगत झाल्यामुळे त्यावर मानवी मेंदूप्रमाणेच पुष्कळ संवेलके व सीता (वळ्या व खळगे) दिसतात. निमस्तिष्काचे मधला एक व बाजूचे दोन असे तीन खंडही दिसतात.

आ. ४. काही पृष्ठवंशी प्राण्यांचे मेंदू : (अ) कॉड माशाचा मेंदू; (आ) बेडकाचा मेंदू; (इ) हंसाचा मेंदू; (ई) ओरँगउटानचा मेंदू : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध, (२) मधला भाग, (३) मध्य मस्तिष्क, (४) निमस्तिष्क, (५) लंबमज्जा.

कनिष्ठ प्राण्यांमध्ये संवेदना ग्रहणाचे कार्य निरनिराळ्या केंद्रांमध्ये विभागलेले असते. सस्तन प्राण्यांमध्ये ही केंद्रे प्रमस्तिष्क बाह्यकातच एकत्रित असतात. शरीराच्या डोळे, कान, त्वचा इ. संवेदना ग्राहकांकडून येणाऱ्या संवेदना बाह्यकापर्यंत पोहोचल्यानंतरच तिथे त्यांचे विवेचन आणि एकत्रीकरण होते. त्यानंतरच त्या प्राण्याच्या शरीराची एकूण प्रतिक्रिया घडते. वाघाची आरोळी कानी पडणे, वाघाचा विशिष्ट दर्प जाणवणे व वाघ दृष्टीस पडणे यानंतरच हरणाची त्यापासून लांब पळण्याची प्रतिक्रिया होते. या प्रतिक्रियेचे प्रेरक क्षेत्रही बाह्यकाच्या विशिष्ट भागातच असते व त्याला प्रेरक क्षेत्र म्हणतात.

सस्तन प्राण्यांतील सर्वोच्च प्राणी नरवानर (प्रायमेट्स) गणातील असून त्याचा मेंदू सर्वांत अधिक प्रगत असतो. या प्राण्यांमध्ये प्रेरक क्षेत्राच्या पुढेच पूर्व-प्रेरक क्षेत्र असते. या क्षेत्राचा संवेदनाग्राही किंवा प्रेरक क्रियांशी संबंध नसतो, परंतु हा भाग त्या प्राण्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रचोदना (कोणतीही कृती करण्याची प्रेरणा) ठरवितो. मानवात हा भाग अतिशय प्रगत असल्यामुळे त्याचे कपाळ भरदार दिसते.

अतिप्राचीन काळातील रानटी मानवाच्या उपलब्ध कवट्यांवरून त्याच्या मेंदूविषयी काही अनुमान करण्यात आले आहे. त्याच्या मेंदूच्या विशिष्ट भागाची विशिष्ट प्रकारे वाढ होत गेली असावी त्यामुळे मानवात वाचेची उत्पत्ती झाली. मेंदूतील पुढच्या भागाच्या विशिष्ट रचनेमुळे वाक् स्नायूंचे नियंत्रण करणे शक्य झाले असावे. ध्वनी, प्रकाश व वाचा यांचा समन्वय करण्याकरिता मानवी मेंदूमध्ये संयोजक कोशिकांची उत्पत्ती या रानटी मानवात झालेली असावी.

आ. ५. निरनिराळ्या प्राण्यांतील तंत्रिका कोशिका : (अ) प्रेरक तंत्रिका कोशिका : (१) आंतरगुही प्राणी, (२) गांडूळ, (३) पृष्ठवंशी प्राणी; (आ) संवेदी तंत्रिका कोशिका : (१) आंतरगुही प्राणी, (२) मृदुकाय प्राणी, (३) पृष्ठवंशी प्राणी.

मनुष्याचा मेंदू वानराच्या मेंदूपेक्षा दुप्पट आकारमानाचा आणि वजनाचा असतो. त्यामध्ये इतर कोणत्याही प्राण्याच्या मेंदूपेक्षा संयोजी व समन्वयी तंत्रिका कोशिकांची फार मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असते. या कोशिका आणि त्यांचे प्रवर्ध मिळून तंत्रिका तंत्रातील सर्व कोशिकांचा एकमेकींशी संबंध प्रस्थापित झालेला असतो त्यामुळे शरीराचे अनेकविध व्यापार आणि विचारशक्ती यांची उत्पत्ती होते. मानवी मेंदूच्या पृष्ठभागावर अनेक वळ्या पडलेल्या असतात व दोन वळ्यांच्या दरम्यान खोलगट खाच असते. त्यांना अनुक्रमे संवेलक आणि सीता म्हणतात. मेंदूतील तंत्रिका कोशिकांची संख्या भरमसाट वाढली व त्या मानाने कवटीचा आकार फारसा वाढला नाही. या कारणामुळे जादा तंत्रिका कोशिका सामावून घेण्याकरिता संवेलकाशिवाय गत्यंतरच नव्हते. मेंदूच्या प्रमस्तिष्क गोलार्धातच संवेलके व सीता असून या भागातच स्मृती, विचार, कृती प्रेरणा यांची उत्पत्ती होते.

शरीरातील वेगवेगळ्या भागांकडून कोशिका येणाऱ्या संवेदनाग्रहण करणे, योग्य कृती प्रेरणा देणे आणि तीवर नियंत्रण ठेवणे यांकरिता मेंदूमध्ये निरनिराळी केंद्रे आहेत. ही केंद्रे मानवी मेंदूत सर्वांत जास्त प्रगत झालेली आहेत. मानवी मेंदूच्या कोणत्या भागात कोणते कार्य चालते याविषयी बरेच संशोधन झाले असूनही काही भागांबद्दल निश्चित माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही.

क्रमविकासाबरोबर स्थूल रचनेत जसे बदल होत गेले तसेच बदल तंत्रिका तंत्राचा पाया असलेल्या तंत्रिका कोशिकेतही होत गेले. हे बदल आ. ५. मध्ये दाखविले आहेत.

आ. ६. भ्रूणातील तंत्रिका तंत्राची वाढ : (१) तंत्रिका पट्टीका, (२) तंत्रिका खाच, (३) तंत्रिका दुमड, (४) तंत्रिका शिखा, (५) तंत्रिका नलिका, (६) आदिम गुच्छिका.

कोशिकारचना, कोशिकासंख्या यांमध्ये क्रमविकासाबरोबर जशी वाढ होत गेली तशीच ती तंत्रिकांचा आवेग (तंत्रिका उद्दीपित झाल्यावर तिच्या मार्गे वाहून नेला जाणारा विक्षोभ) वाहून नेण्याच्या वेगातही होत गेली. हा वेग दर सेकंदास खेकड्याच्या तंत्रिकेत १·५ ते ५ मी., बेडकाच्या तंत्रिकेत ३० मी., डॉगफिशच्या तंत्रिकेतच ३५ मी. आणि सस्तन प्राण्यातील वसावरणयुक्त (स्निग्ध पदार्थाचे आवरण असलेल्या) तंत्रिकेत १०० ते १२५ मी. असतो.

भ्रूणविज्ञान : (भ्रूणाची निर्मिती व त्याचा विकास यांचा अभ्यास करणारे शास्त्र). मानवी भ्रूणातील तंत्रिका तंत्राच्या विभेदनास (कार्य विभागणीनुसार होणाऱ्या रूपांतरास) तसेच त्याच्या विशिष्ट कार्यनिदर्शक खुणा दिसू लागण्यास भ्रूण काही दिवसांचा असल्यापासूनच सुरुवात होते. अंडकोशाच्या निषेचनानंतर (गर्भधारणेनंतर) केवळ अठराव्या दिवशीच भावी पाठीकडील बाजूच्या बाह्यस्तराची वाढ होऊन अनुदैर्घ्य जाड तंत्रिका पट्टिका तयार होते. या पट्टिकेची लांबी वाढते व तिच्या दोन्ही बांजूंच्या कडा आजूबाजूच्या बाह्यस्तरांपेक्षा उंच होतात. भ्रूणाच्या चौथ्या आठवड्यात या कडांपासून तंत्रिका दुमडी बनतात. या दुमडी मध्यरेषेकडे वाढून एकमेकींस भिडतात. या मीलनामुळे जो नळीसारखा भाग बनतो त्याला तंत्रिका नलिका म्हणतात.

तंत्रिका पट्टिकेच्या डोक्याकडील भागात भावी डोळे, कान व नाक यांच्या खुणा दिसू लागतात आणि त्यांना ‘आदिम’ डोळे, कान व नाक म्हणतात किंवा ‘दृष्टी स्तरपट’, ‘श्रक्ण स्तरपट’ आणि ‘घ्राण स्तरपट’ असेही संबोधितात.

तंत्रिका पट्टिकेपासून मानवाचे केंद्रीय तंत्रिका तंत्र तयार होते. तंत्रिका नलिकेतील पोकळी म्हणजेच भावी मेंदूतील मस्तिष्क विवरे आणि मेरुरज्जूतील मध्यवर्ती नाल होत.

वर वर्णिलेल्या क्रमानुसार होणारी वाढ सर्वच पृष्ठवंशी प्राण्यांच्या पाठीकडील बाजूस पोकळी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रिका तंत्राच्या उत्पत्तीस कारणीभूत होते. तंत्रिका नलिकेची वाढ होत जाऊन ती बाह्यस्तराच्या त्वचा विभागातून अलग होते व पृष्ठभागापासून खोल जाते. याच सुमारास काही कोशिकांची स्तंभाकार वाढ होऊन ‘तंत्रिका शिखा’ तयार होतात. यांपासून भावी मेरुरज्जू तंत्रिकांचे काही भाग बनतात. तंत्रिका नलिकेचा डोक्याकडचा भाग विकसित होऊन तीन ‘प्राथमिक मस्तिष्क पुटिका’ तयार होतात. त्यांना पुढून मागे अनुक्रमे मेंदू, मधला मेंदू आणि मागचा मेंदू म्हणतात. ही अवस्था गर्भधारणेच्या पहिल्या महिन्याच्या शेवटास तयार झालेली असते. नलिकेच्या अरुंद राहिलेल्या पुच्छभागापासून मेरुरज्जू बनतो.

आ. ७. तीन प्राथमिक मस्तिष्क पुटिका व त्यांपासून बनणारे मेंदूचे भाग : पुढचा मेंदू : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध, (२) पार्श्वमस्तिष्क विवर, (३) आंतरविवर छिद्र, (४) तिसरे मस्तिष्क विवर, (५) थॅलॅमस; मधला मेंदू : (६) ऊर्ध्वस्थ उन्नतांग, (७) मध्ये मस्तिष्क नाल, (८) अध:स्थ उन्नतांग; मागचा मेंदू : (९) निमस्तिष्क, (१०) चौथे मस्तिष्क विवर, (११) लंबमज्जा, (१२) मेरुरज्जू व त्यातील मध्यनाल.

केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या कोशिकांची उत्पत्ती तंत्रिका नलिकेच्या वसनस्तरातून होते. या कोशिका थर नलिकेच्या पोकळीमधील भित्तीचे आच्छादन असतो. या कोशिकांची वाढ होऊन त्यांपासून दोन प्रकारच्या कोशिका बनतात : (१) आदिम तंत्रिका कोशिका आणि (२) आदिम तंत्रिका श्लेष्म कोशिका. या पूर्वगामी कोशिकांपासून अनुक्रमे तंत्रिका कोशिका व तंत्रिका श्लेष्म कोशिका बनतात. अगदी थोडे अपवाद सोडल्यास वसनस्तरातून अलग होऊन तंत्रिका तंत्राचा भाग बनल्यानंतर या आदिम कोशिकांचे इतर ऊतक कोशिकांप्रमाणे विभाजन होत नाही आणि त्यांच्या संख्येतही वाढ होत नाही.

भ्रूणावस्थेतील तंत्रिका नलिकेच्या टोकावरील बारीकशा आदिम मेंदूपासून गर्भधारणेच्या मध्यापर्यंत (सु. साडेचार महिने) गोल आकाराचा मेंदू तयार होतो. याच काळात मेंदूची विभागदर्शक वाढही होत असते आणि तो तीन जागी वक्र होतो. गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्याच्या शेवटास मेंदूच्या आकाराची रूपरेषा स्पष्ट दिसू लागते परंतु मानवी मेंदूचा विशिष्ट आकार आणि विस्तार तारुण्यावस्थेच्या सुरुवातीसच परिपूर्ण होतात.

तंत्रिका नलिकेपासून संवेलके असलेला मेंदूचा जो भाग बनतो त्याला तीन जागी बाक असतात. याशिवाय प्रमस्तिष्क आणि निमस्तिष्क विभाग दर्शविणारी वाढ झालेली असते. मध्यमेंदू आणि निमस्तिष्क यांच्या बाजूस व वर प्रमस्तिष्क गोलार्ध वाढलेले असतात. मेंदूच्या पृष्ठभागावरील संवेलके आणि सीता स्पष्ट दिसतात.

पुढच्या भागापासून प्रमस्तिष्क बाह्यक, तंतुपट्ट (दोन प्रमस्तिष्क गोलार्धांना जोडणाऱ्या तंत्रिका जुडग्यांपैकी सर्वांत मोठे जुडगे) अधोमस्तिष्क गुच्छिका (प्रमस्तिष्क गोलार्धाच्या गाभ्यात तंत्रिका कोशिकांचे पुंज असलेले विशिष्ट भाग), पार्श्वमस्तिष्क विवर (प्रत्येक गोलार्धात असलेली पोकळ जागा जी मध्ये मस्तिष्क मेरुद्रव नावाचा स्वच्छ रंगहीन द्रव पदार्थ असतो) आणि तिसरे मस्तिष्क विवर, थॅलॅमस व अधोथॅलॅमस (अभिवाही मस्तिष्क केंद्र आणि त्याखालील केंद्रकांचा गट) तयार होतात.

मध्यभागापासून प्रमस्तिष्क वृंतक (मस्तिष्क सेतूकडे जाणारे पांढऱ्या रंगाचे तंत्रिका तंतूंचे जुडगे), ऊर्ध्व उन्नतांग (मध्यमेंदूच्या पृष्ठीय भागावरील वरचे दोन उंचवटे), अधःस्थ उन्नतांग (वरील उंचवट्याच्या खालील दोन उंचवटे) व मस्तिष्कनाल (सु. १५ मिमी. लांबीची तिसऱ्या आणि चौथ्या मस्तिष्क विवरांना जोडणारी नळी) हे भाग बनतात.

मागच्या भागापासून निमस्तिष्क (लहान मेंदू–प्रमस्तिष्क गोलार्धाच्या खाली असलेला मेंदूचा भाग), मस्तिष्क सेतू (बर्हिगोलाकार मेंदूच्या तळाशी असलेला, पांढरे तंत्रिका तंतू व काही कोशिका पुंज असलेला भाग), लंबमज्जा (मस्तिष्क सेतू व मेरुरज्जू यांमधील काही महत्त्वाची केंद्रे असलेला भाग) आणि चौथे मस्तिष्क विवर हे भाग तयार होतात.

बऱ्याच खोल जाणाऱ्या काही सीता (उदा., मध्यवर्ती सीता– प्रत्येक मस्तिष्क गोलार्धाच्या वरच्या व मध्यवर्ती ठिकाणी दिसणारी सीता शूक सीता– प्रत्येक मस्तिष्क गोलार्धाच्या अभिमध्य भागावर दिसणारी खोल सीता) गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यापासून दिसू लागतात. बहुतेक सर्व संवेलके व सीता सातव्या महिन्यात तयार झालेल्या असतात. प्रौढावस्थेत दिसणाऱ्या मेंदूच्या स्वरूपाचा मेंदू वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत तयार होतो.

आ. ८. सस्तन प्राण्यातील प्रारंभिक मेंदू व त्याचे ‍विभाग : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध, (२) थॅलॅमस, (३) तृतीय नेत्र पिंड, (४) प्रमस्तिष्क वृंतक, (५) ऊर्ध्वस्थ उन्नतांग, (७) निमस्तिष्क, (८) कप्पी तंत्रिका, (९) मस्तिष्क सेतू, (१०) लंबमज्जा, (११) अधोजिव्ह तंत्रिका, (१२) साहाय्यक तंत्रिका, (१३) प्राणेशा तंत्रिका, (१४) जिव्हा-ग्रसनी तंत्रिका, (१५) श्रवण तंत्रिका, (१६) आनन तंत्रिका, (१७) अपवर्तनी तंत्रिका, (१८) त्रिमूल तंत्रिका, (१९) नेत्रप्रेरक तंत्रिका, (२०) पोष ग्रंथी, (२१) अधोथॅलॅमस, (२२) दृक् तंत्रिका, (२३) डोळा, (२४) गंध तंत्रिका.

गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यापासूनच तंत्रिका तंत्र क्रियाशील झाल्याचे आढळते. गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यानंतर गर्भाच्या वरच्या ओठाची जागा उद्दीपित केल्यास गर्भाचे डोके मागे जाते. तिसऱ्या महिन्यात डोके, शरीर, हात व पाय यांमधील पुष्कळ प्रतिक्षेपी क्रिया (अनैच्छिक निश्चल, अनुकूलनीय अशी शरीराची संवेदनाजन्य प्रतिक्रिया) घडवून आणता येतात.

मेरुरज्जू व मेरुरज्जू तंत्रिका यांची भ्रूणातील वाढ : तंत्रिका नलिकेचा अरुंद भाग व तंत्रिका शिखा यांपासून मेरुरज्जू व मेरुरज्जू तंत्रिकांचा काही भाग बनतो. तंत्रिका नलिकेतील आधार ऊतकापासून अलग झालेल्या आदिम तंत्रिका कोशिकांपासून मेरुरज्जू तंत्रिका कोशिका बनतात. या कोशिकांचे काही भाग-कोशिका पिंड व अभिवाही प्रवर्ध-मेरुरज्जूच्या करड्या भागातच राहतात परंतु त्यांचे अक्षदंड अलग वाढून मेंदूतील वा मेरुरज्जूतीलच निरनिराळ्या केंद्रापर्यंत जातात. काही अक्षदंड मेरुरज्जूतून बाहेर पडतात आणि त्यांच्या जुडग्यापासून मेरुरज्जू तंत्रिका बनतात. जुडग्यातील अक्षदंड शरीरातील ऐच्छिक स्नायूपर्यंत जातात.

तंत्रिका नलिकेच्या याच भागातील काही आदिम तंत्रिका कोशिकांपासून अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या (स्वायत्त तंत्रिका तंत्रापैकी एका भागाच्या) तंत्रिका कोशिका बनतात. आदिम तंत्रिका श्लेष्मकोशिकांपासून तंत्रिका ऊतकातील तारका कोशिका, ऑलिगोडेंड्रोग्लिया वगैरे प्रकारच्या कोशिका बनतात. या कोशिका तंत्रिका तंत्राच्या दोन्ही (करड्या व पांढऱ्या) भागांत आढळतात.

तंत्रिका शिखांमधील आदिम तंत्रिका कोशिकांपासून मेरुरज्जू तंत्रिकांच्या संवेदनाग्राही तंत्रिका गुच्छिका तयार होतात. या गुच्छिकेतील प्रत्येक तंत्रिका कोशिकेपासून लांब वाढलेला परिसरीय अक्षदंड निघून तो एखाद्या संवेदना ग्राहकापर्यंत गेलेला असतो. त्याच कोशिकेपासून निघालेला मध्यवर्ती अक्षदंड मेरुरज्जूच्या करड्या भागापर्यंत जातो. तंत्रिका शिखांमधील काही कोशिकांपासून विशिष्ट गुणधर्म असलेल्या ‘तंत्रिकाच्छद कोशिका’ बनतात व त्यांपासून तंत्रिकांचे आवरण तयार होते. हे आवरण वसायुक्त असल्यास त्यात वसावरण म्हणतात. भ्रूणाच्या मध्यस्तरीय कोशिकांपासून तंत्रिका तंत्रातील संयोजी आधात्री ऊतक व रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या तयार होतात.

प्रेरक तंत्रिका कोशिकांचे अक्षदंड मेरुरज्जूच्या अभ्युदरीय भागातून बाहेर पडून आदिम स्नायुजन कोशिकांशी (ज्यांच्यापासून स्नायुतंतू विकसित होतात अशा भ्रूण कोशिकांशी) अनुबंधित संबंध प्रस्थापित करतात. स्नायुजन कोशिकांच्या वाढीबरोबरच हा अनुबंधित संबंध टिकून राहण्याकरिता अक्षदंडही वाढतो. वाढत्या अक्षदंडाबरोबर तंत्रिकाच्छद कोशिकांचे वसायुक्त आवरण असते. हे अक्षदंड मिळूनच परिसरीय तंत्रिका (प्रेरक) बनतात व त्यांनाही वसावरण असते. भ्रूणातील सर्व आदिम स्नायुजनांना तंत्रिका पुरवठा होईलच अशी खास व वैशिष्ट्यपूर्ण योजना असते. एखाद्या स्नायुजनाकडे जरूरीपेक्षा जादा अक्षदंड जाऊ लागल्यास त्यांचा स्वीकार होत नाही. याउलट ज्यांना अक्षदंड मिळाले नाहीत त्या स्नायुजन कोशिका त्यांना आपल्याकडे आकर्षित करतात. संगणक शास्त्राच्या (गणितकृत्ये करणाऱ्या यंत्रांसंबंधीच्या शास्त्राच्या) भाषेत सांगावयाचे झाल्यास तंत्रिका तंत्राच्या वाढीचा कार्यक्रम स्नायुजन ठरवितात.

आ. ९. त्रेचाळीस दिवसांच्या (१६ मिमी.) मानवी भ्रूणातील स्वायत्त तंत्रिका तंत्र : (१) कर्ण गुच्छिका, (२) लोमशकाय गुच्छिका, (३) जतुकतालू गुच्छिका, (४) अधोहनू गुच्छिका, (५) प्राणेशा तंत्रिका, (६) अनुकंपी गुच्छिका साखळी.

केंद्रीय तंत्रिका तंत्रातील सर्व पोकळ जागा (दोन पार्श्व विवरे, तिसरे विवर व चौथे विवर आणि मध्यवर्ती नाल) आदिम तंत्रिका नालापासून बनतात. मस्तिष्क तंत्रिकांच्या एकूण १२ जोड्या असून त्या मेंदूच्या अंत्यमस्तिष्क, पारमस्तिष्क, मध्यमस्तिष्क, पश्चमस्तिष्क आणि लंबमज्जा अशा पाचही भागांतून निघतात. मेरुरज्जू तंत्रिकांच्या एकूण ३१ जोड्या त्या शरीराच्या निरनिराळ्या खंडांना पुरवठा करतात. प्रत्येक तंत्रिका आपल्या खंडातील स्नायू व त्वचेस पुरवठा करते.

तंत्रिका नलिकेतील काही कोशिका आणि तंत्रिका शिखांमधील काही कोशिका यांपासून स्वायत्त तंत्रिका गुच्छिकांमधील कोशिका तयार होतात. त्यांच्यापासूनच ⇨ अधिवृक्क ग्रंथीच्या मध्यकातील कोशिका आणि रंजकाकर्षी (क्रोमियम लवणांचे आकर्षण असलेल्या व त्यांच्यामुळे अभिरंजित होऊन म्हणजे रंगविल्या जाऊन तपकिरी पिवळ्या दिसणाऱ्या) कोशिकाही बनतात. भ्रूणीय अवस्थेपासूनच अधिवृक्क ग्रंथी आणि स्वायत्त तंत्रिका तंत्र यांचा संबंध प्रस्थापित झालेला असतो. स्वायत्त तंत्रिका गुच्छिका ज्या कोशिकांपासून बनतात, त्यांपैकी काही भटकत कशेरुकाजवळ (मणक्याजवळ) जाऊन त्यांपासून अनुकंपी तंत्रिका गुच्छिकांची साखळी बनते. याच भटकत्या कोशिकांपैकी भ्रूणाच्या मस्तिष्क स्तंभभागातून आणि त्रिकास्थीय (पाठीच्या कण्यातील कंबरेच्या भागातील पाच मणक्यांच्या जोडण्यामुळे बनलेल्या त्रिकोणी हाडापासूनच्या) भागातून निघणाऱ्या कोशिकांपासून परानुकंपी तंत्रिका तंत्राच्या गुच्छिका बनतात.

अनुकंपी तंत्रिका तंत्राची वाढ एखाद्या वृद्धि-घटकावर अवलंबून असावी असे काही प्राण्यांवरील प्रयोगांवरून आढळते आहे. मानवी भ्रूणामध्ये अशा वृद्धि-घटकाच्या अस्तित्वाबद्दल अजून अनिश्चितता आहे परंतु भ्रूणातील स्वायत्त तंत्रिका गुच्छिकांचा वाढीवर परिणाम करणारा एखादा घटक असावा, असे मानण्याइतपत पुरावा उपलब्ध झालेला आहे.

जन्मानंतर होणारी मानवी मेंदूची वाढ : जन्मानंतरच्या पहिल्या दोन वर्षांत मेंदूची जलद व भरीव वाढ होते. पूर्ण गर्भकालानंतर जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या मेंदूचे वजन ३५० ग्रॅ. असते. एका वर्षानंतर ते १,००० ग्रॅ. व तारूण्यावस्थेच्या सुमारास १,३०० ग्रॅ. भरते. ही वाढ अस्तित्वात असलेल्या तंत्रिका कोशिकांची आकारवाढ, नव्या तंत्रिका श्लेष्म कोशिकांचे उत्पादन आणि तंत्रिका तंतूंचे वसावरणभवन या कारणांमुळे होते. ही विशिष्ट तिहेरी वाढ मानव प्रजातीचे वैशिष्ट्य असून तीवरच तिचे मोठा मेंदू असलेली प्रजाती हे अस्तित्व अवलंबून आहे. अर्भकाचा जन्म होतो त्या वेळी जीवन जगण्यास पुरेल एवढी मेंदूची वाढ झालेली असते तरीही तो मातेच्या अस्थिवेष्टित प्रसवमार्गातून कवटीच्या संरक्षणात्मक आच्छादनासहित सहज बाहेर पडण्याएवढा लहान असतो. गर्भावस्थेतच मेंदूची यापेक्षा अधिक वाढ झाली असती, तर प्रसूती नेहमीप्रमाणे सहज झालीच नसती.

तंत्रिका कोशिका आणि तंत्रिका श्लेष्म कोशिकांची वाढ गर्भकालात निरनिराळ्या वेळी होत असते. जन्मापूर्वी सर्व तंत्रिका कोशिका आधार ऊतकापेक्षा अलग बनलेल्या असतात. जन्माच्या वेळीच आयुष्यभर पुरतील एवढ्या तंत्रिका कोशिका तयार असतात. एकट्या प्रमस्तिष्क बाह्यकातच जवळजवळ १०१० कोशिका असतात. त्यांपैकी काहींची क्रियाशीलता वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. एका अंदाजाप्रमाणे वयाच्या विशीपासून सत्तरीपर्यंत दररोज जवळजवळ ५०,००० कोशिकांचा ऱ्हास होत असावा. या पन्नास वर्षांच्या काळात १० टक्के तंत्रिका कोशिका निरुपयोगी बनतात. ७५ वर्षे वयापर्यंत मेंदूचे वजन /१० ने कमी होते व मेंदूच्या रक्त प्रवाहात / घट होते.

शिशुवयातील पहिली एक–दोन वर्षे ज्या वेळी तंत्रिका कोशिका पक्व होत असतात ती प्रौढावस्थेतील बुद्धिमत्ता तयार होण्याकरिता अतिशय महत्त्वाची असतात. या वयात या कोशिकांची वाढ नीट न झाल्यास अव्युत्क्रामक (बदल न होऊ शकणारी) विकृती उत्पन्न होते. फिनिल कीटोन्यूरिया (पीकेयू = फिनिल ॲलॅनीन या ॲमिनो अम्लाचे टायरोसिनात रूपांतर न झाल्यामुळे फिनिल कीटोन मूत्रातून बाहेर टाकला जाणारा रोग) या आनुवंशिक रोगात तंत्रिका ऊतकाला आवश्यक ती ॲमिनो अम्ले न मिळाल्यामुळे मेंदूची वाढ नीट होत नाही. ज्या मुलांना अन्नातून ॲमिनो अम्ले नीट मिळत नाहीत, त्यांच्या मेंदूची वाढही नीट होत नाही अशी मुले मंदबुद्धी असतात.

मानवी तंत्रिका तंत्र

आ. १०. मानवी तंत्रिका तंत्र : (१) मेंदू, (२) कवटी, (३) तृतीय नेत्र पिंड, (४) परानुकंपी (मस्तिष्कीय विभाग) तंत्रिका तंत्र जेथून निघते तो भाग, (५) अनुकंपी तंत्रिका तंत्र जेथून निघते तो भाग, (६) परानुकंप (त्रिक विभाग), (७) अनुत्रिक तंत्रिकामूल, (८) त्रिकास्थी (पुढची बाजू), (९) पाचवा कटीय कशेरुक (पुढची बाजू), (१०) बारावा वक्षीय कशेरुक (पुढची बाजू), (११) सातवा ग्रैव (मानेतील) कशेरुक (पुढील बाजू), (१२) पोष ग्रंथी, (१३) ललाटास्थी.

वर्णनाच्या सुलभतेकरिता मानवी तंत्रिका तंत्राचे पुढील विभाग पडतात. (१) केंद्रीय तंत्रिका तंत्र : (अ) मेंदू (मस्तिष्क), (आ) मेरुरज्जू. (२) परिसरीय तंत्रिका तंत्र :(अ) मस्तिष्क तंत्रिका, (आ) मेरुरज्जू तंत्रिका.(३) स्वायत्त तंत्रिका तंत्र : (अ) अनुकंपी तंत्रिका तंत्र, (आ) परानुकंपी तंत्रिका तंत्र.

केंद्रीय तंत्रिका तंत्र : तंत्रिका तंत्रातील सर्वांत अधिक तंत्रिका कोशिका व तंतू ज्या भागात एकत्रित रचलेल्या आहेत, त्याला केंद्रीय तंत्रिका तंत्र म्हणतात. मेंदू व मेरुरज्जू यांमध्ये तंत्रिका कोशिका व तंत्रिका तंतू यांचे प्रमाण एवढे अधिक आहे की, विशिष्ट कोशिकांच्या संयोजी ऊतक आधारावर त्यांचा गोळाच बनलेला असतो. ज्या ठिकाणी तंत्रिका कोशिकांचे प्रमाण अधिक असते, त्या भागाला ‘करडा’ भाग आणि जेथे तंतूंचे प्रमाण अधिक असते त्याला ‘पांढरा’ भाग म्हणतात. तंतूवरील वसावरणामुळे हा रंग शरीराबाहेर काढल्यानंतरच्या ताज्या अवस्थेत पांढरा दिसतो. केंद्रीय तंत्रिका तंत्र हे नाव फक्त रचनात्मक फरक दर्शविण्यापुरतेच उपयुक्त आहे. कारण तंत्रिका तंत्राचा परिसरीय भाग व केंद्रीय भाग यांचा शरीरक्रियाविज्ञान दृष्ट्या घनिष्ट संबंध असतो. याशिवाय ज्या कोशिकांपासून निघणाऱ्या तंतूंचे मिळून परिसरीय तंत्रिका तंत्र बनते त्यांपैकी अनेक प्रत्यक्ष केंद्रीय भागातच विखुरलेल्या असतात. केंद्रीय तंत्रिका तंत्राकडून येणारे संदेश ग्रंथी, स्नायू आदींपर्यंत पोहोचविण्याच्या कार्याकरिता परिसरीय तंत्रिका तंत्राची आवश्यकता असते. तसेच परिसरीय तंत्रिका तंत्राच्या अपवाही व अभिवाही भागांचा एकमेंकाशी संबंध प्रस्थापित होण्याकरिता केंद्रीय तंत्रिका तंत्राची गरज असते.

(अ) मेंदू : माणसाचा मेंदू डोक्याच्या कवटीच्या आत सुरक्षित असलेला तंत्रिका तंत्राचा एक आवश्यक आणि महत्त्वाचा भाग आहे. दोन वृक्कांपैकी (मूत्रपिडांपैकी) एक वृक्क वा संपूर्ण जठर गमविल्यास किंवा हृदयाच्या जागी दुसरे हृदय बसविले, तरी माणसाच्या व्यक्तित्वात बदल होत नाही परंतु मेंदूचे प्रतिरोपण यदाकदाचित शक्य झाल्यास माणसाचे व्यक्तित्व अजिबातच बदलून जाईल.

वर्णनाकरिता मेंदूचे पाच विभाग करतात : (१) अंत्यमस्तिष्क, (२) पारमस्तिष्क, (३) मध्यमस्तिष्क, (४) पश्चमस्तिष्क, (५) लंबमज्जा.

आ. ११. कवटीतील मेंदू : (अ) पुढून : (१) अनुदैर्घ्य विदर (आ) उजव्या बाजूने : (१) ललाट खंड, (२) शंखक खंड, (३) पार्श्वललाट खंड, (४) पश्चकपाल खंड.

अंत्यमस्तिष्क, पारमस्तिष्क व मध्यमस्तिष्क मिळून जो भाग होतो त्यास प्रमस्तिष्क म्हणतात. पश्चमस्तिष्कामध्ये मस्तिष्क सेतू व निमस्तिष्क यांचा समावेश असतो. मध्यमस्तिष्क, मस्तिष्क सेतू व लंबमज्जा मिळून बनलेल्या भागाला मस्तिष्क स्तंभ म्हणतात. थॅलॅमस आणि अधोथॅलॅमस या पारमस्तिष्कात असलेल्या भागांचाही समावेश मस्तिष्क स्तंभातच करतात.

अंत्यमस्तिष्क द्विपार्श्विक असून प्रत्येक अर्ध्या भागास प्रमस्तिष्क गोलार्ध म्हणतात. प्रत्येक गोलार्धाचे वर्णनाकरिता चार खंड कल्पून प्रत्येक खंडाला त्याच्या लगतच्या कवटीच्या हाडाचे नाव दिले आहे: ललाटास्थीजवळचा खंड ललाट खंड, शंखास्थीजवळचा (कानशीलाकडचा) शंखक खंड, पार्श्वास्थीजवळचा पार्श्वललाट खंड आणि सर्वांत मागे पश्चकपालास्थीजवळचा पश्चकपाल खंड. दोन प्रमस्तिष्क गोलार्धांच्या मध्ये जी खोल अनुदैर्घ्य फट असते, तिला अनुदैर्घ्य विदर म्हणतात.

प्रमस्तिष्काच्या बाह्य पृष्ठभागावर अनेक वळ्या दिसतात. दोन वळ्यांच्या मधील खाचांना सीता व प्रत्येक वळीला संवेलक म्हणतात. प्रमस्तिष्काचा उभा व आडवा छेद तपासल्यास खालील रचना दिसते.

सर्वांत बाहेरच्या बाजूस करड्या रंगाचा एक पट्टा दिसतो. त्याला प्रमस्तिष्क बाह्यक म्हणतात. या भागात महत्त्वाच्या तंत्रिका कोशिका असतात. या करड्या पट्ट्याखाली जो शुभ्र रंगाचा भाग असतो तो वसावरण असलेल्या तंत्रिका तंतूंचा (कोशिका प्रवर्धांचा) बनलेला असून त्याला श्वेतद्रव्य म्हणतात. गोलार्धांच्या गाभ्यात व प्रमस्तिष्क विवरांच्या तळाशी करड्या रंगाचे काही पुंज असतात. प्रत्येक गोलार्धात असे पाच पुंज असून त्यांना (१) थॅलॅमस, (२) अधोथॅलॅमस, (३) पुच्छाभ केंद्रक, (४) गोलाकृती पांडुर केंद्रक आणि (५) कवच केंद्रक अशी नावे आहेत. (४) व (५) मिळून मसुराकार केंद्रक बनते. गोलार्धाच्या गाभ्यात जी पोकळ जागा असते, तिला पार्श्वमस्तिष्क विवर म्हणतात. या विवरात मस्तिष्क–मेरुद्रव असतो.

आ. १२. प्रमस्तिष्क गोलार्धातील (डाव्या) महत्त्वाची क्षेत्रे : (१) प्रेरक क्षेत्र, (२) संवेदनाग्राही क्षेत्र, (३) पूर्व-प्रेरक क्षेत्र, (४) श्रवण क्षेत्र, (५) दृष्टिक्षेत्राचा काही भाग, (६) पार्श्वसीता, (७) ललाट खंड, (८) मध्यसीता, (९) पार्श्वललाट खंड, (१०) पश्चकपाल खंड, (११) शंखक खंड.

प्रमस्तिष्क गोलार्धाच्या बाह्यकावर मध्यभागी वरून खाली जाणारी खोल सीता असते, तिला मध्यसीता म्हणतात. मध्यसीतेच्या पुढच्या भागातील तीन-चार संवेलके मिळून जे क्षेत्र बनते, त्याला प्रेरक क्षेत्र म्हणतात. या क्षेत्रातील कोशिका प्रेरक कोशिका असून त्या स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतात. मध्यसीतेच्या मागील भागात संवेदनाग्राही क्षेत्र असते. या ठिकाणी शरीराच्या सर्व भागांतून येणाऱ्या संवेदनांचे ग्रहण होते. दृष्टिसंवेदना व श्रवण संवेदना यांकरिता खास क्षेत्रे आहेत. बाह्यकाच्या इतर भागात स्मृती, विचार व विवेकबुद्धी यांची केंद्रे असावीत असे मानतात. उजवा हात नेहमी वापरणाऱ्यामध्ये डाव्या प्रमस्तिष्क गोलार्धाच्या प्रेरक क्षेत्राच्या पुढेच वाचा क्षेत्र असते, याच क्षेत्राला ब्रॉका क्षेत्र (पी. पी. ब्रॉका या फ्रेंच शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून) असेही म्हणतात. डावखोऱ्या व्यक्तींमध्ये हे क्षेत्र उजव्या प्रमस्तिष्क गोलार्धात असते.

प्रमस्तिष्क गोलार्धाच्या तळभागाशी वर वर्णन केलेली जी पाच केंद्रके आहेत त्यांना अधोमस्तिष्क गुच्छिका असेही म्हणतात. त्यांमध्ये काही महत्त्वाची नियंत्रण केंद्रे असतात.

आ. १३. मस्तिष्क विवरे : (१) तिसरे मस्तिष्क विवर, (२) पार्श्वमस्तिष्कविवर, (३) मन्रो रंध्र, (४) मस्तिष्क सेतू कुंड, (५) लुश्का रंध्रे, (६) बृहत् कुंड, (७) माझँडी रंध्र, (८) चौथे मस्तिष्क विवर, (९) सिल्व्हिअस नाल किंवा मस्तिष्क नाल, (१०) प्रमस्तिष्क गोलार्ध, (११) निमस्तिष्क.

गोलार्धाचा जो भाग शुभ्रवर्णी दिसतो, त्यातील तंत्रिका तंतू प्रमस्तिष्कातील (एकाच बाजूच्या) केंद्रकांचा तसेच दोन्ही गोलार्धांचा एकमेकांशी संबंध जुळवितात. तळभागी दोन्ही गोलार्ध जोडणारा जो जाड भाग असतो, खंड त्याला तंतुपट्ट म्हणतात. याशिवाय पांढऱ्या भागात अनेक तंतू विखुरलेले असून ते इतर भागांशी संबंध प्रस्थापित करतात.

प्रत्येक गोलार्धातील पोकळीला पार्श्वमस्तिष्क विवर म्हणतात. केंद्रीय तंत्रिका तंत्रात एकूण चार मस्तिष्क विवरे असून उजवे व डावे पार्श्वमस्तिष्क विवर तिसऱ्याशी, तिसरे चौथ्याशी व चौथे अवजालतानिका अवकाशाशी (याच्या स्पष्टीकरणार्थ ‘मस्तिष्कावरणे’ हा परिच्छेद पहावा) छिद्राद्वारे जोडलेली असतात (आ. १३).

आ. १४. निमस्तिष्क : (ऊर्ध्वदर्शन). (१) मध्यखंड, (२) व (३) निमस्तिष्क गोलार्ध.

निमस्तिष्क : प्रमस्तिष्क गोलार्धांच्या मागे आणि खाली असलेल्या, मस्तिष्क स्तंभाला तीन वृंतक जोड्यांनी जोडलेल्या, पृष्ठभागावर पुष्कळ लहान लहान घड्या असलेल्या मेंदूच्या भागास निमस्तिष्क म्हणतात यालाच लहान मेंदू म्हणतात. प्रमस्तिष्क गोलार्धाप्रमाणेच त्याचे बाह्यक करड्या रंगाचे असून आतील गाभ्यात पांढरे व करडे पुंज आढळतात. त्याचे मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंस दोन खंड असून मध्यभागी एक खंड असतो. मधल्या भागाला मध्यखंड म्हणतात. प्रत्येक खंडाला निमस्तिष्क गोलार्ध म्हणतात. गाभ्यामध्ये तीन करडे पुंज असतात त्यांना निमस्तिष्क केंद्रके म्हणतात. यांपैकी सर्वांत मोठ्या केंद्रकाला दंतुर केंद्रक म्हणतात. गोलार्धाच्या बाह्यकात विशिष्ट प्रकारच्या तंत्रिका कोशिका असतात आणि त्या फक्त निमस्तिष्कातच आढळतात. त्यांना पुर्‌किन्येकोशिका (जे. ई. पुर्‌किन्ये या जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. या कोशिकांचा काय (शरीर) चंबूच्या आकाराचा असून अनेक अभिवाही प्रवर्ध असून त्यांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणारे जाळेच बनलेले असते. पांढरा भाग बाह्यकातून बाहेर जाणाऱ्या, बाह्यकाकडे येणाऱ्या व केंद्रकातून निघणाऱ्या पांढऱ्या तंत्रिका तंतूंचा बनलेला असतो. प्रमस्तिष्क गोलार्ध बाह्यक, थॅलॅमस, लाल केंद्रक (मध्यमस्तिष्कातील ०·५ सेंमी. व्यास असलेला तंत्रिका कोशिकांचा समुच्चय या ठिकाणी कापलेला भाग ताज्या अवस्थेत लाल दिसतो त्यावरून हे नाव), मस्तिष्क सेतू, मध्यमस्तिष्क, लंबमज्जा आणि मेरुरज्जू यांच्याशी निमस्तिष्क जोडलेले असते. दंतुर केंद्रकाशिवाय उरलेल्या दोन केंद्रकांना एंबोलीफॉर्म (पाचरीच्या आकारचे) केंद्रक आणि फॅस्टिजियल केंद्रक (अणकुचीदार आकाराचे केंद्रक किंवा छत केंद्रक) म्हणतात. दंतुर केंद्रक व छत केंद्रक यांच्यामध्ये एंबोलीफॉर्म केंद्रक पाचरीसारखे असते, पैकी फॅस्टिजियल केंद्रक अंतर्कर्णातील शरीर संतुलनविषयक भागाशी संबंधित असते [→ कान]. निमस्तिष्काचा ऐच्छिक हालचालींशी संबंध असावा. हालचालींच्या वेळी निरनिराळ्या स्नायूंमधील सहकार्य घडवून आणण्याचे कार्य ते करते. हे कार्य अबोध (म्हणजे जाणीव न होता) चालू असते.

आ. १५. निमस्तिष्काच्या वृंतक जोड्या : (१) कायचतुष्क, (२) निमस्तिष्क, डाव्या गोलार्धाचा काही भाग, (३) चौथे मस्तिष्क विवर, (४) अधःस्थ वृंतक, (५) ऊर्ध्वस्थ वृंतक, (६) मध्यवृंतक, (७) मेरुरज्जू.

मस्तिष्क स्तंभ : मध्यमस्तिष्क, मस्तिष्क सेतू व लंबमज्जा मिळून बनलेल्या भागास मस्तिष्क स्तंभ म्हणतात. या भागातच चौथे मस्तिष्क विवर आणि त्याला तिसऱ्या विवरास जोडणारा मार्ग असतो. मध्यमस्तिष्कात करडे पुंज असतात. त्यांपैकी ‘लाल केंद्रक’ अंडाकृती व मोठे असून तिसऱ्या मस्तिष्क तंत्रिकेचे (नेत्रचालक तंत्रिकेचे) आणि चौथ्या मस्तिष्क तंत्रिकेचे (कप्पी तंत्रिकेचे) केंद्रकही त्यात असतात आणि ते लहान असतात. विवरांना जोडणाऱ्या मार्गाच्या पश्चभागी जो भाग असतो, त्याला छतपट्टी म्हणतात. ही छतपट्टी चार उंचवट्यांची बनलेली असून त्यांना कायचतुष्क म्हणतात. यांपैकी वरच्या जोडीला ऊर्ध्वस्थ उन्नतांग व खालचीला अधःस्थ उन्नतांग म्हणतात. लाल केंद्रक प्रमस्तिष्क गोलार्ध बाह्यक, रेखित पिंड (पुच्छाभ केंद्रक, कवच केंद्रक आणि गोलाकृती केंद्रक मिळून होणारा अधोमस्तिष्क गुच्छिकांचा भाग), थॅलॅमस निमस्तिष्क आणि मेरुरज्जू यांच्याशी जोडलेले असते.

आ. १६. थॅलॅमस आणि मस्तिष्क स्तंभ : (पश्चदर्शन). (१) तंतुपट्ट, (२) तृतीय नेत्र पिंड, (३) थॅलॅमस, (४) कायचतुष्क, (५) ऊर्ध्वस्थ निमस्तिष्कीय वृंतक (छेदलेला), (६) मध्य निमस्तिष्कीय वृंतक (छेदलेला), (७) लंबमज्जा (८) चौथ्या मस्तिष्क विवराचा तळभाग.

मस्तिष्क सेतूचा पुष्कळ भाग तंत्रिका तंतूंचा बनलेला असून त्यामधून काही तंत्रिका मार्ग जातात. त्यांशिवाय पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेच्या (त्रिमूल तंत्रिकेच्या) संवेदी भागाचे केंद्रक, सातव्या मस्तिष्क तंत्रिकेचे (आनन तंत्रिकेचे) केंद्रक व सहाव्या मस्तिष्क तंत्रिकेचे (अपवर्तनी तंत्रिकेचे) केंद्रकही त्यात असतात. प्रमस्तिष्क गोलार्ध व निमस्तिष्काशी हा भाग संबंधित असून त्याच्या गाभ्यातील काही करड्या पुंजांना मस्तिष्क सेतू केंद्रके म्हणतात.

लंबमज्जा हा भाग मेरुरज्जूच्या वरच्या टोकाशी संलग्न असतो. शंक्काकृती असा हा भाग वरून खाली निमुळता होत जातो. त्याच्या खालच्या अर्ध्या भागाच्या पोकळीत असून नाल तो मेरुरज्जूच्या मध्यनालाशी जोडलेला असतो. वरच्या अर्ध्या भागात याच नालाचे आकारमान मोठे होऊन चौथे मस्तिष्क विवर बनते. लंबमज्जेच्या अग्रभागी दोन उभे तंत्रिका तंतूंचे जुडगे असतात. त्यांना प्रसूच्या (पिरॅमिडे) म्हणतात. त्यांमधून प्रमस्तिष्क–मेरुरज्जू तंत्रिका मार्ग (प्रसूचीय तंत्रिका मार्ग) जातात. या मार्गातील काही तंतू विरुद्ध बाजूकडे जातात व काही त्याच बाजूने खाली मेरुरज्जूत उतरतात. विरुद्ध बाजूकडे जाणाऱ्या तंतूंमुळे ‘प्रेरक व्यत्यास’ (प्रसूच्या एकमेकींना ओलांडतात ती जागा) तयार होतो. प्रेरक व्यत्यासाच्या वर संवेदी तंत्रिका तंतूंचे जे व्यत्यसन होते, त्याला संवेदी व्यत्यास म्हणतात. लंबमज्जेमध्येच काही करडे पुंज असतात. तनू केंद्रक, शंक्काकृती केंद्रक, यांशिवाय आठव्या, नवव्या, दहाव्या, अकराव्या व बाराव्या मस्तिष्क तंत्रिकांची (श्रवण तंत्रिका, जिव्हा–ग्रसनी तंत्रिका, प्राणेशा तंत्रिका, साहाय्यक तंत्रिका आणि अधोजिव्ह तंत्रिका यांची) केंद्रकेही असतात. तंत्रिका तंत्रातील काही जीवनावश्यक केंद्रकेही लंबमज्जेत असतात. हृदयासंबंधीचे केंद्रक, श्वसनासंबंधीचे केंद्रक आणि रक्तवाहिनी प्रेरक (रक्तवाहिन्यांच्या भित्तीचे प्रसरण व आकुंचन यांवर नियंत्रण ठेवणारे) केंद्रक यांचा त्यांत समावेश होतो.

आ. १७. मेरुरज्जूचे आडवे छेद : (अ) ग्रैव (मानेतील) विवर्धन : (१) मध्य नाल, (२) करडा भाग, (३) पांढरा भाग (आ) छातीचा भाग (इ) कटी भागातील विवर्धन (ई) मेरुअंत्य (खालच्या टोकाजवळील) शंकू.

(आ) मेरुरज्जू : लंबमज्जेनंतर खाली असलेल्या, कशेरुक नालाचा वरचा दोन तृतीयांश भाग व्यापणाऱ्या केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या दंडगोलाकार, दोरीसारख्या भागास मेरुरज्जू म्हणतात. मेरुरज्जूचा बाह्यभाग तंत्रिका तंतूंच्या जुडग्यांचा बनलेला असून गाभा करड्या द्रव्याचा बनलेला असतो. मध्यभागी असलेल्या पोकळीस मेरुनाल म्हणतात. मेरुरज्जूची ही रचना प्रमस्तिष्क गोलार्धाच्या अगदी विरुद्ध असून ती मेरुरज्जूच्या आडव्या छेदात स्पष्ट दिसते. हे छेद निरनिराळ्या पातळ्यांवर घेतल्यास त्यांची जाडी व रचनेतील फरक तसेच करड्या व पांढऱ्या भागांच्या प्रमाणातील फरक दिसतात (आ. १७).

आ. १८. मेरुरज्जूचा तुकडा : (१) अग्र स्तंभ, (२) पश्च स्तंभ, (३) पश्च तंत्रिका मूल, (४) पार्श्व स्तंभ, (५) अग्र तंत्रिका मूल, (६) करडा भाग, (७) पांढरा भाग.

छेदामध्ये करडा भाग इंग्रजी H अक्षरासारखा किंवा पंख पसरलेल्या फुलपाखरासारखा दिसतो. H च्या पुढील दोन भागांना अग्र शृंगे आणि मागील दोन भागांना पश्च शृंगे म्हणतात. सभोवतालच्या पांढऱ्या भागाचे तीन भाग वर्णितात : (१) अग्र स्तंभ (दोन अग्र शृंगांमधील), (२) पश्च स्तंभ (दोन पश्च शृंगांमधील) आणि (३) पार्श्व स्तंभ (करड्या भागाच्या बाजूस असलेला). सबंध मेरुरज्जू दोन पार्श्व भागांत अपूर्ण विभागलेला असतो. ही विभागणी अग्रभागी असलेल्या अग्र खाचेमुळे व पश्चभागी पश्च पडद्यामुळे होते आणि ती मध्यरेषेवर असते. करड्या भागाच्या दोन्ही शृंगांमध्ये प्रत्येक बाजूस वक्षीय (छातीचा भाग) आणि कटीय भाग या ठिकाणच्या मेरुरज्जू भागात जो करडा भाग असतो, त्याला पार्श्व शृंग म्हणतात आणि त्यात अनुकंपी तंत्रिका कोशिका असतात. अग्र शृंगामध्ये मोठ्या बहुकोणीय कोशिका असतात. प्रमस्तिष्क बाह्यकाच्या प्रेरक क्षेत्राकडून, शरीराच्या परिसरीय भागातून संवेदी तंत्रिकातून मस्तिष्क स्तंभ व मेंदूच्या इतर भागाकडून आणि निमस्तिष्काकडून येणारे आवेग या कोशिकांभोवती गोळा होतात. या मोठ्या कोशिकांचे अक्षदंड सर्व प्रकारचे आवेग वाहून नेणारे अंतिम समाईक तंत्रिका तंत्र असतात. या कोशिका ऐच्छिक हालचाली सुरू करणारे आवेग स्नायूकडे पुनर्निवेशित करतात व मेरुरज्जू प्रतिक्षेपी क्रियांमध्ये प्रेरक आवेग वाहून नेण्याचेही कार्य करतात. पश्च शृंगातील कोशिकांना संयोगी तंत्रिका कोशिका म्हणतात व त्या निरनिराळे संबंध प्रस्थापित करतात. शरीर भागातून येणारे अभिवाही आवेग या कोशिकांद्वारे अग्र शृंगातील कोशिकांकडे तसेच तंत्रिका तंत्राच्या ऊर्ध्वस्थ भागाकडे पोहोचविले जातात.

केंद्रीय तंत्रिका तंत्रावरील आवरणे : मेंदू व मेरुरज्जू यांवर एकाखाली एक अशी जी तीन आवरणे असतात, त्यांना एकत्रित मस्तिष्कावरणे म्हणतात. वरून खाली किंवा बाहेरून आत त्यांना अनुक्रमे (१) दृढतानिका, (२) जालतानिका आणि (३) मृदुतानिका म्हणतात.

आ. १९. मस्तिष्कावरणे : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध, (२) निमस्तिष्क, (३) दृढतानिका, (४) जालतानिका, (५) अवजालतानिका अवकाश, (६) मृदुतानिका, (७) मेरुरज्जू, (८) मस्तिष्क स्तंभ.
आ. २०. मेंदूवरील मस्तिष्कावरणांची रचना : (१) कवटीचे हाड, (२) दृढतानिका, (३) जालतानिका, (४) अवजालतानिका अवकाश, (५) अवदृढतानिका अवकाश, (६) जालतानिका कणांकुर, (७) नीला कोटर, (८) प्रमस्तिष्क गोलार्ध बाह्यक, (९) मृदुतानिका, (१०) प्रमस्तिष्क दात्र, (११) प्रमस्तिष्क गोलार्धाचा पांढरा भाग, (१२) प्रमस्तिष्क गोलार्धाचा करडा भाग.

दृढतानिका : सर्वांत बाहेरचे आवरण बरेचसे जाड, घट्ट आणि तंतुमय ऊतकाचे असते. ते कवटीच्या आतील पृष्ठभागाशी संलग्न असते. त्यामधील रक्तवाहिन्या कवटीच्या हाडांचे पोषण करतात. कवटीस आघात झाल्यास हे आवरण फाटून रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव दृढतानिका व अस्थी यांच्या दरम्यान साचून मेंदूतील भागांवर दाब पडतो. ज्या ठिकाणी असा दाब पडतो त्याच्या विरुद्ध बाजूच्या शरीरास अंगघात होतो, स्नायूंची चलनवलन शक्ती बंद पडते. दृढतानिकेचा मेंदूकडील पृष्ठभाग गुळगुळीत आणि ओलसर असतो. तिचा काही भाग मध्यरेषेत दोन प्रमस्तिष्क गोलार्धांच्या मधील अनुदैर्घ्य विदरात शिरतो, त्याला प्रमस्तिष्क दात्र म्हणतात. दोन्ही प्रमस्तिष्क गोलार्ध आणि निमस्तिष्क यांच्या दरम्यानही आडवा पडदेवजा भाग गेलेला असतो, त्याला निमस्तिष्क पटवेश्म म्हणतात. दृढतानिका दोन थरांची मिळून बनलेली असते. या थरांमध्ये काही पोकळ्या असून त्यांमध्ये अशुद्ध रक्त असते. त्यांना दृढतानिका कोटरे म्हणतात. या कोटरांद्वारे अशुद्ध रक्त आणि प्रमाणापेक्षा जादा मस्तिष्क–मेरुद्रव मानेतील मोठ्या नीलांकडे वाहून नेले जातात.

पोष ग्रंथींचा स्रावही छोट्या नीलांद्वारे कुहरी कोटरामार्गे (अशुद्ध रक्त असलेल्या मेंदूच्या तळातील पोकळीमार्गे) रक्तप्रवाहात मिसळतो. दृढतानिका व जालतानिका यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीला (प्रत्यक्षात पोकळी नसते) अवदृढतानिता अवकाश म्हणतात.

जालतानिका : हे आवरण दृढतानिकेच्या आत असते. ते पातळ असूनही त्यामधून द्रवांचे पारगमन होत नाही. जालतानिका व मृदुतानिका यांच्यामधील पोकळीस अवजालतानिका अवकाश म्हणतात. या पोकळीत नाजूक तंतूंचे जाळेच पसरलेले असते व तीत मस्तिष्क-मेरुद्रव असतो. पातळ भित्ती असलेल्या मेंदूच्या नीला व रोहिण्या या जाळ्यात असतात. अवजालतानिका अवकाश व चौथे मस्तिष्क विवर यांना जोडणाऱ्या तीन छिद्रांना नावे दिली आहेत. मध्यभागी असलेले ते माझँडी रंध्र (फ्रांस्वा माझँडी या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) व दोन बाजूंची ती लुश्का रंध्रे (ह्युबर्ट फोन लुश्का या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून) होत. या रंध्रांतून सर्व मस्तिष्क विवरांतील मस्तिष्क-मेरुद्रव आणि अवजालतानिकेच्या अवकाशातील मेरुद्रव एकमेकांत मिसळले जातात. जालतानिका दोन संवलेकांतील खाचांमध्ये (म्हणजेच सीतांमध्ये) खोल शिरत नाही. एका संवेलकावरून सरळ दुसऱ्यावर पसरलेले हे आवरण असते.

मृदुतानिका : अतिनाजुक संयोजी ऊतकाचे हे आवरण मेंदूच्या पृष्ठभागाशी संलग्न असून सर्व सीतांमध्येही पसरलेले असते. त्यामध्ये बारीक रोहिण्या व नीला असतात आणि त्या जवळच्या तंत्रिका ऊतकाला रक्तपुरवठा करतात. वरच्या बाजूस तंतुपट्ट (प्रमस्तिष्क गोलार्धांना जोडणाऱ्या तंत्रिका जुडग्यांपैकी सर्वांत मोठे जुडगे) व मस्तिष्क कमान (पांढऱ्या तंत्रिका तंतूचे वक्राकार तंतुपट्टाच्या खाली असणारे दोन जुडगे) आणि खालच्या बाजूस तिसऱ्या मस्तिष्क विवराचे छत यांच्या मधे मृदुतानिकेची प्रसूचीच्या आकाराची दुमड असते, तिला मध्यस्थ छदन म्हणतात. या दुमडीमध्ये दोन मोठ्या नीला असतात व त्यांना गेलेन नीला (गेलेन या ग्रीक शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात आणि त्या मेंदूच्या आतील भागातील अशुद्ध रक्त वाहून नेतात. याच दुमडीचे काही रक्तवाहिन्यायुक्त भाग दोन्ही

आ. २१. मस्तिष्क-मेरुद्रवाच्रा तपासणीसाठी कटि-सूचिवेध (X अशा खुणेच्या जागी तिसऱ्या व चौथ्या कशेरुकामध्ये कटि-सूचि खुपसून द्रव काढतात).

पार्श्वमस्तिष्क विवरात व तिसऱ्या मस्तिष्क विवरात शिरतात, त्यांना ‘झल्लरी जालिका ’ म्हणतात. चौथ्या मस्तिष्क विवराच्या छतातही अशीच झल्लरी जालिका असते. या सर्व जालिका मस्तिष्क-मेरुद्रव स्रवणात त्याच्या घटकांच्या नियंत्रणात भाग घेतात.

आ. २२. मेंदूचा तळभाग व त्यातून निघालेल्या मस्तिष्क तंत्रिका : (१) गंध तंत्रिका, (२) दृक्‌तंत्रिका, (३) नेत्र प्रेरक तंत्रिका, (४) कप्पी तंत्रिका, (५) त्रिमूल तंत्रिका (नेत्र शाखा, उत्तरहून शाखा व अधोहनू शाखा), (६) अपवर्तनी तंत्रिका, (७) आनन तंत्रिका, (८) श्रवण तंत्रिका, (९) जिव्हा ग्रसनी तंत्रिका, (१०) प्राणेशा तंत्रिका, (११) साहाय्यक किंवा मेरुरज्जू साहाय्यक तंत्रिका, (१२) अधोजिव्ह तंत्रिका, (१३)लंबमज्जा, (१४) निमस्तिष्क, (१५) प्रमस्तिष्क गोलार्ध.

मस्तिष्क विवरे : (आ. १३). मेंदूच्या गाभ्यात असणाऱ्या या पोकळ्यांमध्ये मस्तिष्क–मेरुद्रव असतो. त्यांच्या आतल्या पृष्ठभागावर जे पातळ आवरण असते, त्याला वसनस्तर म्हणतात. उजवे व डावे पार्श्वमस्तिष्क विवर, तिसरे व चौथे मिळून एकूण चार विवरे आहेत. प्रमस्तिष्क गोलार्ध, पारमस्तिष्क, मस्तिष्क सेतू आणि लंबमज्जा या भागांत ही विवरे असतात. प्रत्येक पार्श्वविवर तिसऱ्याशी ज्या छोट्या रंध्राने जोडलेले असते, त्याला मन्रो रंध्र (ए. ए. मन्रो या इंग्रज शस्त्रवैद्यांच्या नावावरून) म्हणतात.तिसरे आणि चौथे एकमेकांशी ज्या अरुंद नालाने जोडलेले असतात, तिला सिल्व्हिअस नाल (सिल्व्हिअस या फ्रेंच शरीरविज्ञांच्या नावावरून) वा मस्तिष्क नाल म्हणतात. सर्व विवरे चौथ्या विवरामार्फत अवजालतानिका अवकाशाशी जोडलेली असतात. या विवरातील झल्लरी जालिका जो प्रथिनविरहित द्रव तयार करतात, तोच मस्तिष्क–मेरुद्रव होय. मस्तिष्क–मेरुद्रव मेंदू आणि मेरुरज्जूस यांत्रिक आधार म्हणून उपयोगी असतो. सबंध केंद्रीय तंत्रिका तंत्रच त्यामध्ये तरंगत असल्यासारखे असते. याशिवाय शरीरातील इतरत्र असलेल्या ऊतक द्रव आणि लसीका द्रव (ऊतकांतून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेला द्रव) या द्रवांची कार्येही तो करतो. पार्श्वमस्तिष्क विवरातून तिसऱ्यात, त्यातून चौथ्यात व त्यातून अवजालतानिका अवकाशात असे त्याचे अभिसरण सतत चालू असते. हाच अवकाश मेरुरज्जूभोवतीही असतो आणि म्हणून कटिस्थानातील या अवकाशातील मस्तिष्क–मेरुद्रव विशिष्ट सुईद्वारे तपासणीकरिता काढून घेतात. या छोट्या शस्त्रक्रियेला कटि–सूचिवेध म्हणतात. ही तपासणी केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या विकारांच्या निदानाकरिता फार उपयुक्त असते.

आ. २३. मेरुरज्जू तंत्रिका मूले : (१) मेरुरज्जू तुकड्याचा वरचा भाग, (२) मृदुतानिका (३) जालतानिका, (४) दृढतानिका, (५)दोन्ही मूलांवरील दृढतानिका वेष्टन, (६) पश्चमूल व त्यावरील पश्चमूल गुच्छिका, (७) अग्रमूल, (८) फासळी, (९) कशेरुकाचा भाग.

परिसरीय तंत्रिका तंत्र :  (अ) मस्तिष्क तंत्रिका :मस्तिष्क तंत्रिकांच्या एकूण १२ जोड्या आहेत. त्यांना रोमन I ते XII अशा क्रमांकांनी ओळखतात. यांपैकी फक्त पहिली (I) तंत्रिका सोडून इतर सर्व मस्तिष्क स्तंभापासून निघतात. पहिली गंधवाही क्षेत्रापासून निघते. कोष्टकात क्र.१ मध्ये त्यांची माहिती दिली आहे.

(आ) मेरूरज्जू तंत्रिका : मानवामध्ये मेरुरज्जूपासून निघणाऱ्या एकूण ३१ जोड्या असतात. ८ ग्रैव (मानेतील), १२ वक्षीय (छातीतील), ५ कटीय (कमरेतील), ५ त्रिक तंत्रिका (त्रिकास्थीसंबंधी) व एक अनुत्रिक तंत्रिका (अनुत्रिकास्थीसंबंधी) अशा मिळून त्या बनतात. प्रत्येक तंत्रिका मेरुरज्जूपासून निघणाऱ्या दोन तंत्रिका जुडग्यांची मिळून तयार होते. या जुडग्यांना अग्रमूल किंवा अभ्युदरीय मूल आणि पश्चमूल किंवा पृष्ठीय मूल म्हणतात. अग्रमूलातील बहुसंख्य तंत्रिका तंतू अग्र शृंगातील कोशिकांचे अपवाही प्रेरक प्रवर्ध असतात. त्यांशिवाय काही सूक्ष्म तंतू पार्श्वशृंगातील कोशिकांचे अपवाही प्रवर्ध असतात. पश्चमूलातील सर्व तंतू अभिवाही असतात व त्यांमधून त्वचा, स्नायू, अंतस्त्ये इत्यादींकडून येणाऱ्या संवेदना तसेच काही असंवेदी आवेग (म्हणजे जे अबोध राहतात किंवा ज्यांची जाणीव होत नाही ते) येतात. पश्चमूलातील हे तंतू ज्या कोशितांचे प्रवर्ध असतात त्या मूलावरील एका छोट्या फुगवटीतच असतात. या फुगवटीला पश्चमूल गुच्छिका म्हणतात. दोन्ही मूले आंतराकशेरू छिद्रामध्ये (दोन कशेरुकांमधील भोकासारख्या जागेमध्ये) एकत्र येतात परंतु या जाड मेरुरज्जू तंत्रिकेच्या लगेचच दोन शाखा बनतात. त्यांना अनुक्रमे अग्र प्राथमिक शाखा आणि पश्च प्राथमिक शाखा म्हणतात. या प्रत्येक शाखेत प्रेरक आणि संवेदी तंत्रिका तंतू असतात. अग्र प्राथमिक शाखेच्या उपशाखा एकमेकींत मिसळतात व पुन्हा शाखित होतात. या विभाजन प्रकारामुळे तीन तंत्रिका जालिका (जाळ्या) तयार होतात. त्यांना अनुक्रमे (१) ग्रैव, (२) भुज आणि (३) कटि–त्रिक जालिका म्हणतात. या जालिकांपासून हात, पाय व मान या शरीर भागांतील स्नायू आणि त्वचा यांकडे जाणाऱ्या परिसरीय तंत्रिका बनतात. या तंत्रिकांमध्ये दोन्ही प्रकारचे म्हणजे प्रेरक आणि संवेदी तंत्रिका तंतू असतात. पश्च प्राथमिक शाखेच्या उपशाखा पाठीकडील स्नायू व त्वचा यांना पुरवठा करतात.

कोष्टक क्र. १. मस्तिष्क तंत्रिका
क्रमांक  नाव  कोठून निघते  क्रियात्मक रचना  शेवट व कार्य 
I गंध तंत्रिका प्रमस्तिष्कातील

गंधग्राही क्षेत्र

संपूर्ण संवेदी नाकातील गंधग्राहक श्लेष्मकलेत गंधज्ञान.
II दृक्‌तंत्रिका नेत्रगोलाच्या जालपटलातून संपूर्ण संवेदी मेंदूच्या दृष्टिक्षेत्रात दृष्टिज्ञान.
III नेत्रप्रेरक तंत्रिका मस्तिष्क स्तंभातील केंद्रकापासून संपूर्ण प्रेरक नेत्रगोलाचे स्नायू नेत्रगालोची हालचाल.
IV कप्पी तंत्रिका मस्तिष्क स्तंभातील

केंद्रकापासून

संपूर्ण प्रेरक नेत्रगोलाचा ऊर्ध्वस्थ तिरपा स्नायू फक्त याच स्नायूची हालचाल.
V त्रिमूल तंत्रिका मस्तिष्क सेतूतील केंद्रकापासून प्रेरक आणि संवेदी (मिश्र) चर्वणाचे स्नायू, चेहऱ्यावरील त्वचेचा भाग, शिरोवल्काचा भाग, तोंडातील व नाकातील श्लेष्मकला.
VI अपवर्तनी तंत्रिका मस्तिष्क सेतूतील केंद्रकापासून संपूर्ण प्रेरक नेत्रगोलाचा अधःस्थ तिरपा स्नायू फक्त याच स्नायूची हालचाल.
VII आनन तंत्रिका मस्तिष्क सेतूमधील

केंद्रकापासून

प्रेरक व संवेदी (मिश्र) चेहऱ्याचे भावनादर्शी स्नायू, लाला ग्रंथी, जिभेवरील श्लेष्मकला.
VIII श्रवण तंत्रिका लंबमज्जा संपूर्ण संवेदी अंतर्कर्ण, श्रवण व शरीर संतुलन.
IX जिव्हा ग्रसनी तंत्रिका लंबमज्जा प्रेरक आणि

संवेदी (मिश्र)

जिव्हा आणि ग्रसनीचे स्नायू, जिव्हेतील रुचिकलिका अनुकर्ण ग्रंथी (कानापुढील लाला ग्रंथी).
X प्राणेशा तंत्रिका लंबमज्जा प्रेरक आणि संवेदी (मिश्र) ग्रसनी व स्वरयंत्र स्नायू, छातीतील सर्व अंतस्त्ये उदर गुहेतील सर्व अंतस्त्ये.
XI साहाय्यक किंवा मेरुरज्जू साहाय्यक

तंत्रिका

लंबमज्जा प्रेरक आणि संवेदी (मिश्र) स्वरयंत्राचे स्नायू, मानेतील उरोजत्रुक कर्णमूलिका स्नायू पाठीतील चतुष्कोणी स्नायू.
XII अधोजिव्ह तंत्रिका लंबमज्जा संपूर्ण प्रेरक जिभेचे स्नायू.

 

आ. २४. भुज तंत्रिका जालिका व तिच्या शाखा-उपशाखा : (१) वक्ष, (२) मान, (३) भुज, (४) मानेतील मेरुरज्जूकडून येणाऱ्या तंत्रिका, (५) भुज जालिकेच्या तीन प्रमुख शाखा, (६) भुज जालिकेच्या उपशाखा.

स्वायत्त तंत्रिका तंत्र : तंत्रिका तंत्राचा जो विभाग शरीरातील अनैच्छिक आणि अबोध अशा क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो त्याला स्वायत्त तंत्रिका तंत्र म्हणतात. उदा., हृदयक्रिया आणि पचनक्रिया सतत चालू असूनही अनैच्छिक व अबोध असतात. काही मस्तिष्क तंत्रिका व काही मेरुरज्जू तंत्रिका यांच्या शाखा छाती, उदरगुहा व श्रोणिगुहा (धडाच्या तळाशी हाडांच्या संयोगामुळे तयार झालेली, हाडांनी वेष्टित असलेली पोकळी) यांमधील अंतस्त्यांना तंत्रिका पुरवठा करतात. या सर्वांचा समावेश स्वायत्त तंत्रिका तंत्रात होतो. शरीररचनात्मक दृष्टीने या तंत्राचे दोन विभाग पाडले असून त्यांना (अ) अनुकंपी आणि (आ) परानुकंपी तंत्रिका तंत्र म्हणतात. दोन्ही विभाग संपूर्ण अपवाही किंवा प्रेरकच असतात.

आ. २५. अनुकंपी तंत्रिका तंत्र : (डावा भाग). मेंदूचा तळभाग व मेरुरज्जूचा अभ्युदरीय भाग आणि गुच्छिकांपासून विविध अतंस्त्यांना जाणारे तंतू : (१) मेरुरज्जूचा वक्षीय भाग, (२) मेरुरज्जूचा कटीय भाग, (३) ऊर्ध्वस्थ ग्रैव गुच्छिका, (४) मध्य ग्रैव गुच्छिका, (५) अधःस्थ ग्रैव गुच्छिका, (६) पहिली वक्षीय गुच्छिका, (७) डोळ्यातील बाहुली विस्फारक, (८) डोक्यातील रक्तवाहिन्या व स्वेद ग्रंथी, (९) बाहूतील रक्तवाहिन्या व स्वेद ग्रंथी, (१०) हृदय, (११) श्वासनलिका व फुप्फुसे, (१२) ग्रसिका व महारोहिणी, (१३) उदरगुहीय गुच्छिका, (१४) ऊर्ध्वस्थ आंत्रबंध गुच्छिका, (१५) अधःस्थ आंत्रबंध गुच्छिका, (१६) जठर, पित्ताशय व पित्त नलिका, (१७) अधिवृक्क ग्रंथी, (१८) आंत्र, (१९) बृहदांत्राचा शेवटचा भाग व गुदाशय, (२०) मूत्राशय व गुदाशय, (२१) बाह्य जननेंद्रिये, (२२) पायातील रक्तवाहिन्या आणि स्वेद ग्रंथी.

(अ) अनुकंपी तंत्रिका तंत्र : (आ. २५). हे तंत्र कशेरुक दंडाच्या दोन्ही बाजूंस काही अंतरावर असलेल्या गुच्छिकांच्या साखळ्यांचे बनलेल असते. प्रत्येक साखळी वरून खाली ३ ग्रैव, १० ते १२ वक्षीय, ४ कटीय आणि १ अनुत्रिक गुच्छिकांची बनलेली असते. या गुच्छिकांपासून निघणारे तंत्रिका तंतू सर्व ३१ मेरुरज्जू तंत्रिकांना येऊन मिळतात. या तंतूंना करड्या संदेशवाही शाखा म्हणतात. हे तंतू निरनिराळ्या प्रेरक भागांपर्यत जातात. याशिवाय या साखळीतील गुच्छिकांना १२ वक्षीय मेरुरज्जू तंत्रिका आणि पहिल्या ३ कटिय मेरुरज्जू तंत्रिकांकडून शाखा येऊन मिळतात. या शाखांना श्वेत संदेशवाही शाखा म्हणतात व त्या केंद्रीय तंत्रिकांतून आलेल्या असतात.

(आ) परानुकंपी तंत्रिका तंत्र : या तंत्रिका तंत्राचे (१) मस्तिष्क विभाग व (२) त्रिक विभाग असे दोन विभाग पाडले आहेत. 

स्वायत्त तंत्रिका तंत्र द्वि-कोशिका व द्वि-तंत्रिका तंतू या रचनेवर आधारित तंतू या रचनेवर आधारित असते. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोनच कोशिका व दोनच तंत्रिका तंतू अंतस्त्यांना पुरवठा करतात. आवेग उत्पादक कोशिका मेंदू किंवा मेरुरज्जूच्या करड्या भागात असतात. त्यांच्यापासून निघणाऱ्या तंतूंचा गुच्छिकांत शेवट होतो. त्यांना गुच्छिकापूर्व तंतू म्हणतात. दुसऱ्या कोशिका गुच्छिकांत असतात आणि त्यांच्यापासून निघणारे तंतू थेट अंतस्त्यांपर्यंत जातात त्यांना गुच्छिकापश्च तंतू म्हणतात.

आ. २६. परानुकंपी तंत्रिका तंत्र व अंतस्त्यांना होणारा तंत्रिका पुरवठा : मस्तिष्क विभाग : (१) मस्तिष्क तंत्रिका, (२) लोमशकाय गुच्छिका, (३) डोळ्यातील बाहुली आकुंचक, (४) जतुकतालू गुच्छिका, (५) अश्रू ग्रंथी, (६) निम्न अधोहनू गुच्छिका, (७) निम्न अधोहनू लाला ग्रंथी व अधोजिव्ह लाला ग्रंथी, (८) कर्ण गुच्छिका, (९) अनुकर्ण लाला ग्रंथी, (१०) श्वासनलिका व फुप्फुसे, (११) आहार नाल (अन्नमार्ग), (१२) यकृत, (१३) पित्ताशय, (१४) अग्निपिंड, (१५) वृक्क (मूत्रपिंड) त्रिक विभाग : (१६) मूत्राशय, (१७) बृहदांत्राचा शेवटचा भाग व गुदाशय, (१८) बाह्य जननेंद्रिये.

स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या दोन्ही विभागांत काही फरक आहेत. अनुकंपी तंत्रिका तंत्राला ॲड्रिनोत्पादक म्हणतात. कारण त्याच्या अनुबंधनांमध्ये आवेग वहनाच्या वेळी ॲसिटीलकोलीन व सिपॅथीन (एपिनेफ्रिन) उत्पन्न होते. परानुकंपी तंत्रिका तंत्रातील अनुबंधनांमध्ये फक्त ॲसिटीलकोलीनच उत्पन्न होते आणि म्हणून त्याला कोलिनोत्पादक म्हणतात.

त्यांच्या कार्यातील फरक कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहेत. अनुकंपी तंत्रिका तंत्र प्राण्यांच्या बाह्य परिसरीय परिस्थितीस तोंड देण्याच्या शक्तीत भर घालते, अन्न मिळविण्यास मदत करते आणि स्वसंरक्षणक्षम बनविते. परानुकंपी तंत्रिका तंत्र खर्च झालेली ऊर्जा परत मिळविण्यास व ऊर्जाव्यय नियंत्रित करण्यास मदत करते.

स्वायत्त तंत्रिका तंत्राचे कार्य : शरीरांतर्गत परिस्थिती जीवनास योग्य अवस्थेत टिकवून ठेवण्याचे कार्य स्वायत्त तंत्रिका तंत्र करते. म्हणजेच शरीराचे तापमान, जलसंतुलन आणि रक्ताची आयनीय (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणूगट यांच्या संबंधातील) घटना कायम ठेवते. यालाच समस्थिति (होमिओस्टॅसिस) म्हणतात. याकरिता या तंत्राचा पचनक्रिया, अन्नचयापचय (अन्नात होणारे भौतिक व रासायनिक बदल) आणि उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणे) यांच्याशी संबंध येतो. रक्तदाब आणि श्वसनक्रिया यांच्याशीही ते संबंधित असते. कोणत्याही आपत्तीस वा परिस्थितीतील बदलांना तोंड देण्याकरिता शरीरास सिद्ध करण्याचे कार्य हे तंत्र करते. वर्तनासंबंधीच्या आणि भावनात्मक प्रतिक्रियांमध्ये या तंत्राचा महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक सर्व अंतस्त्यांना संवेदी तंत्रिका असतात. त्यांपैकी काही वेदना-संवेदनेशी संबंधित असतात पण पुष्कळशा प्रतिक्षेपी क्रियांशी निगडित असतात. या तंत्रिकांना अंतस्त्य अभिवाही प्रवर्ध म्हणतात आणि ते मेंदू व मेरुरज्जूपर्यंत जातात. पुष्कळ वेळा स्वायत्त तंत्रिका तंतूही त्यांच्या बरोबर असतात.

 

 

 

कोष्टक क्र. २. अनुकंपी व परानुकंपी तंत्रिका तंत्रांच्या कार्यातील फरक

अंतस्त्य अनुकंपी परानुकंपी
डोळ्यातील बाहुली विस्फारण आकुंचन
डोळ्यातील लोमशकाय स्नायू शिथिल करणे ताठ करणे
लाला ग्रंथी स्रावरोधन स्रावोत्पादनास चेतना
श्वासनलिका विस्फारण आकुंचन
स्वेद ग्रंथी स्रावोत्पादनास चेतना निष्परिणामी
रक्तवाहिन्या बहुतकरून आकुंचन बहुतकरून विस्फारण
अधिवृक्क ग्रंथी स्रावोत्पादनास चेतना निष्परिणामी
आहारनाल कार्यरोधन कार्यचेतना
हृदय चेतना (गतीत वाढ) रोधन (गती मंद होणे)
मूत्राशय रोधन चेतना
शरीरावरील केसांचे स्नायू निष्परिणामी आकुंचन(केस ताठ होणे)
अग्निपिंड महत्त्वाचा परिणाम नाही कोशिकांना चेतना

 

आ. २७. निरनिराळ्या प्रकारच्या तंत्रिका कोशिका व तंत्रिका श्लेष्म कोशिका : (१) मेरुरज्जूच्या अग्र शृंगातील प्रेरक तंत्रिका कोशिका, (२) एक प्रवर्धी कोशिका, (३) प्रमस्तिष्क बाह्यकाच्या प्रेरक क्षेत्रातील मोठी प्रसूचीय कोशिका, (४) निमस्तिष्क बाह्यकातील पुर्किन्ये कोशिका, (५) ऑलिगोडेंड्रोग्लिया, (६) मायक्रोग्लिया, (७) ॲस्ट्रोसाइट.

तंत्रिका तंत्राची वैशिष्ट्ये : एकूण तंत्रिका तंत्राचे कार्य समजण्याकरिता आवश्यक अशा काही विशिष्ट गोष्टींची नोंद येथे केली आहे.

(१) तंत्रिका कोशिका : तंत्रिका तंत्राच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एककाला तंत्रिका कोशिका म्हणतात. या तंत्रात यांशिवाय ज्या आधारभूत व इतर कार्य करण्याऱ्या कोशिका असतात, त्यांना तंत्रिका श्लेष्म कोशिका म्हणतात. या कोशिकांचे तीन प्रकार असतात : (१) ऑलिगोडेंड्रोग्लिया, (२) ॲस्ट्रोसाइट आणि (३) मायक्रोग्लिया.

ऑलिगोडेंड्रोग्लिया : तंत्रिका श्लेष्म कोशिकांच्या या प्रकारच्या कोशिका भ्रूणाच्या बाह्यस्तरापासून बनलेल्या असतात. त्या केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या पांढऱ्या व करड्या भागांत आढळतात. छोट्या गोलाकार आकाराच्या या कोशिकांचे प्रवर्ध अतिशय सूक्ष्म असतात. त्या तंत्रिका तंतूंशी निगडीत असून तंतूंच्या दिशेने रांगेत रचलेल्या असतात.

 

ॲस्ट्रोसाइट : या प्रकारात कोशिका ताराकृती असून त्यांना अनेक प्रवर्ध असतात. त्याही बाह्यस्तरापासून बनतात. त्यांचे प्रवर्ध छोट्या रक्तवाहिन्या व केशवाहिन्यांच्या भित्तींवर टेकलेले असून त्याठिकाणी प्रवर्धांची टोके चपटी आणि काहीशी रुंद असून त्यांना परिवाहिक पद म्हणतात.

मायक्रोग्लिया : या छोट्या कोशिका केंद्रीय तंत्रिका तंत्रात सर्वत्र विखुरलेल्या असून त्यांचे प्रमाण करड्या भागात अधिक असते. या कोशिका भ्रूण मध्यस्तरापासून बनतात. त्या अमीबासदृश हालचाली करणाऱ्या आणि भक्षिकोशिकांसारखे कार्य करणाऱ्या छोट्या कोशिका असून त्यांचे ⇨ जालिकाअंतःस्तरीय तंत्रातील कोशिकांशी बरेच साम्य असते आणि त्या तंत्रातील कोशिकांसारखेच या कार्य करतात.

आ. २८. मेरुरज्जूच्या अग्र शृंगातील प्रेरक तंत्रिका कोशिकेचे सूक्ष्मदर्शन : (१) अभिवाही प्रवर्ध, (२) केंद्रक, (३) निस्ल पिंड, (४) शंक्वाकार उंचवटा, (५) अक्षदंड व त्यातील तंत्रिका तंतुक, (६) अक्षदंड शाखा, (७) वसावरण, (८) वसावरणावरील श्वान आवरण, (९) तंत्रिका पर्व संकोच, (१०) श्वान कोशिकेचा केंद्रक, (११) श्वान आवरणाचा शेवट, (१२) वसावरणाचा शेवट, (१३) अंत्य प्रवर्ध.

प्रत्येक तंत्रिका कोशिका ही कोशिका-काय आणि एक किंवा अनेक प्रवर्धांची मिळून बनलेली असते. तंत्रिका कोशिका विविध आकारांच्या व घाटांच्या (लहान, मोठ्या, त्रिकोणी, बहुकोणीय, गोल, तर्कुरूप वगैरे) असतात. बहुतेकांच्या रचनेत मात्र साम्य असते. कोशिका पिंडात मध्यभागी ‘केंद्रक’ असतो. केंद्रक सोडून इतर भागात अतिसूक्ष्म तंतू विखुरलेले असतात. हे तंतू प्रवर्धातही गेलेले असतात. विशिष्ट अभिरंजक (रंगविण्याच्या) क्रियेनंतर सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास कोशिका-कायात असमान आकारमानाचे पिंड विखुरलेले दिसतात, त्यांना निस्ल पिंड (फ्रांट्स निस्ल या जर्मन तंत्रिकावैज्ञांनिकाच्या नावावरून) म्हणतात. त्यांची रचना वाघाच्या अंगावरील पट्ट्यांसारखी दिसते म्हणून त्यांना व्याघ्रपिंड असेही म्हणतात. प्रत्येक कोशिकेला विविध लांबीचे किंवा जाडीचे प्रवर्ध असतात. या प्रवर्धांचे दोन प्रकार आहेत : (१) अभिवाही प्रवर्ध व (२) अक्षदंड. अभिवाही प्रवर्ध बहुधा एकापेक्षा जास्त असतात. मात्र कधी कधी त्यांचा संपूर्ण अभावही असतो. हे प्रवर्ध कोशिका-कायाकडे तंत्रिका आवेग वाहून नेतात, तर अक्षदंड कोशिका-कायापासून आवेग दूर वाहून नेतो. अभिवाही प्रवर्धांना अनेक शाखा व उपशाखा असतात (ग्रीक भाषेत ‘वृक्ष’ या अर्थाचा शब्द या प्रवर्धांना वापरला आहे). अक्षदंड लांब पातळ धाग्यासारखा असून कोशिका-कायाजवळ त्याला शाखा नसतात परंतु काही अंतरावर त्यालाही शाखा फुटतात व या काटकोनात असतात. एका कोशिकेला नेहमी एकच अक्षदंड असतो. अक्षदंडामध्ये निस्ल पिंड नसतात. त्याची सुरुवात कोशिका-कायातील शंक्वाकार उंचवट्यापासून होते व त्याच्या सुरुवातीच्या भागाला प्रारंभिक खंड म्हणतात. हा भाग महत्त्वाचे कार्य करतो. तंत्रिका कोशिकेचे आवेग संपूर्ण जाऊ देणे किंवा अजिबात जाऊ न देणे हे या प्रारंभिक खंडांवर अवलंबून असते. प्रत्येक तंत्रिका कोशिका जरूर तेवढा विद्युत् आवेग उत्पन्न करू शकते किंवा अक्रियही असू शकते. अक्षदंडाच्या टोकावर ज्या शाखा असतात त्यांच्या शेंड्यावर गुठळ्या असतात व इतर भागांशी अनुबंधन (एका तंत्रिका कोशिकेतील आवेग ज्या ठिकाणी दुसरीत पोहोचविला जातो ते ठिकाण किंवा एका कोशिकेचा अक्षदंड दुसरीच्या कायावरील पातळ पडद्यावर टेकतो ती जागा) प्रस्थापित करतात. तंत्रिकांची रचना या कोशिका प्रवर्धांची बनलेली असते. मेंदू व मेरुरज्जूतील पांढरा भाग त्यांचाच बनलेला असतो. काही प्रवर्ध उदा., मेरुरज्जूच्या खालच्या भागातील कोशिकांपासून पायांच्या बोटांपर्यंत म्हणजे ९० ते १२० सेंमी. लांब असतात. बहुसंख्य परिसरीय तंत्रिका तंतू वसावरणयुक्त असतात व हे आवरण खंडित असते. या आवरणाभोवती अतिशय पातळ असे श्वान आवरण (टेओडोर श्वान या जर्मनी शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारे) असते. हे आवरण ज्या कोशिकांचे बनते त्यांना श्वान कोशिका म्हणतात. या कोशिकांचे भाग वसावरणात शिरून त्यांचे खंड पाडतात. त्या ठिकाणी वसावरण नसते आणि त्याला तंत्रिका पर्व संकोच किंवा रांव्ह्ये संकोच (एल्. ए. रांव्ह्ये या फ्रेंच विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. तंत्रिका तंत्रातील थोड्या कोशिका पुष्कळ कोशिकांशी अनुबंधित संबंध प्रस्थापित करू शकतात.

आ. २९. परिसरीय तंत्रिकेचा आडवा छेद (चतुर्थांश भाग दाखविला आहे) : (१) बाह्य तंत्रिकावरण, (२) परितंत्रिकावरण, (३) अंतःस्थ तंत्रिकावरण, (४) तंत्रिका तंतू (अगदी छोटी वर्तुळे).

(२) तंत्रिका आणि तंत्रिका आवेग : केंद्रीय तंत्रिका तंत्रातील मेरुरज्जू तंत्रिकेच्या पश्चमूलावरील गुच्छिकेतील किंवा स्वायत्त तंत्रिका तंत्रातील गुच्छिकांतील कोशिकांच्या लांब प्रवर्धांपासून तंत्रिका बनतात. काही तंत्रिका स्पर्श, वेदना, ध्वनी, प्रकाश इ. संवेदना पोहोचवतात, त्यांना संवेदी तंत्रिका म्हणतात. काही तंत्रिका स्नायू किंवा इतर अंतस्त्यांकडे कार्यास प्रवृत्त करणारे संदेश घेऊन जातात, त्यांना प्रेरक तंत्रिका म्हणतात. काही तंत्रिका संपूर्ण संवेदी, तर काही संपूर्ण प्रेरक असतात. काहींमध्ये दोन्ही प्रकारचे तंतू असतात व त्यांना मिश्र तंत्रिका म्हणतात. परिसरीय तंत्रिका म्हणजे शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे गेलेल्या तंत्रिका अनेक तंतूंपासून तयार होणाऱ्या छोट्या छोट्या जुडग्यांच्या बनलेल्या असतात. प्रत्येक जुडग्याभोवती संयोजी ऊतकाचे वेष्टन असते, त्याला परितंत्रिकावरण म्हणतात. जुडग्यातील प्रत्येक तंतूवर याच ऊतकाचे अतिशय पातळ आवरण असते. त्याला अंतःस्थ तंत्रिकावरण म्हणतात. संपूर्ण तंत्रिका इतर भागापासून अलग रहावी म्हणून तिच्यावरही संयोजी ऊतकाचे जाड वेष्टन असते, त्याला बाह्य तंत्रिकावरण म्हणतात.

प्रत्येक तंतूवरील वसावरण निरोधकाचे कार्य करते म्हणजे हे वसावरण एका तंतूमधील आवेग शेजारच्या तंतूत शिरू देत नाही. काहींच्या मते हे आवरण फक्त चयापचयात्मक कार्य करते. वसावरणामुळे तंतूमधून जाणाऱ्या आवेगाचा वेग वाढतो. सर्वच तंत्रिका तंतूंवर वसावरण असतेच असे नव्हे काही तंतू वसावरणविरहित असतात. स्वायत्त तंत्रिका तंत्रातील सर्व गुच्छिकापश्च तंतू वसावरणविरहित असतात.

तंतूंचे वसावरण टप्प्या-टप्प्यांनी तयार होते आणि ते जन्मानंतरही चालूच असते. जसजशी कार्यनिश्चिती होते तसतसे वसावरण तयार होत जाते. अर्भकामध्ये पायांच्या ऐच्छिक स्नायूंकडे आवेग नेणारे मेरुरज्जू तंत्रिका मार्गातील तंतू जवळजवळ दोन वर्षे किंवा ते चालू लागेपर्यंत वसावरणविरहित असतात. मेंदूमधील निरनिराळी क्षेत्रे एकमेकांशी जोडणाऱ्या तंत्रिका मार्गातील तंतूही फार उशीरा वसावरणयुक्त बनतात. याउलट मेरुरज्जूमधील संवेदी तंत्रिका मार्गातील तंतू गर्भावस्थेतील चौथ्या महिन्यातच वसावरणयुक्त असतात.

आ. ३०. तंत्रिका अपकर्ष : (अ) प्राकृत (सर्वसाधारण) तंत्रिका तंतू (आ) चोवीस तासांनंतर : X-आघात स्थळ, (१) वसा, (२) श्वान आवरण (इ) दोन आठवड्यांनंतर (ई) पंचवीस दिवसांनंतर.

तंत्रिका अपकर्ष व पुनर्जनन : प्रत्येक तंत्रिका तंतू हा कोशिका प्रवर्ध असल्यामुळे त्याचे पोषण कोशिका-संबंधावरच अवलंबून असते. जेव्हा हा तंतू तुटतो किंवा चिरडला जातो तेव्हा ज्या भागाचा कोशिका संबंध तुटतो किंवा बिघडतो, त्या भागात अपकर्ष (ऱ्हास) व्हावयास ताबडतोब सुरुवात होते. पहिल्या चोवीस तासांतच अक्षदंडातील तंत्रिका तंतुक वाकडेतिकडे बनून त्याचे तुकडे होतात. त्यानंतर वसावरण फुगते व वसेचे छोटे मोठे गोळे बनतात. वसेचे विघटन होऊन वसाम्ले वगैरे घटक तयार होतात. आघातानंतर दोन ते तीन आठवड्यांच्या आत अपकर्षजन्य टाकाऊ पदार्थ नाहीसे होऊन तंत्रिका तंतूच्या जागी फक्त एक रिकामी नलिका उरते. ही नलिका श्वान आवरणाची असते कारण तिच्यावर अपकर्षाचा परिणाम होत नाही. अक्षदंडाच्या कोशिकेकडील पहिल्या तंत्रिकापर्व संकोचापर्यंतचा बहुधा अपकर्ष दिसतो. कधी तो कोशिकेकडील भागात व प्रत्यक्ष कोशिका-कायातही आढळतो. अशा अपकर्षाला परागामी अपकर्ष म्हणतात. तंत्रिका तंतूमधील अपकर्षजन्य बदल ए. व्ही. वालर या इंग्रज शरीरक्रियावैज्ञानिकांनी वर्णिल्यावरून त्याला वालेरीय अपकर्ष असे नाव देण्यात येते.

तंत्रिका अपकर्ष आघाताशिवाय विषबाधा (उदा.,शिसे, आर्सेनिक, अल्कोहॉल वगैरे) आणि काही रोगांतही (उदा., बालपक्षाघात) उद्‌भवतो.

तंत्रिका पुनर्जनन कधीकधी शक्य असते. त्याकरिता तुटलेली टोके एकमेंकापासून फार दूर गेलेली नसावीत. कोशिकेच्या बाजूकडील टोकातील तंत्रिका तंतुक रिकाम्या श्वान आवरणात शिरतात व हळूहळू वाढतात. श्वान कोशिकांतील केंद्रक वाढतात. वाढलेले तंत्रिका तंतुक जीवद्रव्यामध्ये धरले जातात. कालांतराने वसावरणही तयार होऊन पुनर्जनन पूर्ण होते. मानवात पुनर्जनन दर चोवीस तासांत फक्त दोन मिमी. एवढेच होते.

तंत्रिका कोशिकांचे पुनर्जनन कधीही होत नाही. त्यांची जागा फक्त तंत्रिका श्लेष्म कोशिका भरून काढतात.

तंत्रिका आवेग : उत्तेज्यता (उत्तेजित होण्याची क्षमता) आणि संवाहकता (वाहून नेण्याची क्षमता) हे इतर जिवंत ऊतकांतील गुणधर्म तंत्रिका तंतूतही असतात; परंतु फक्त तंत्रिका ऊतकातच ते पराकोटीस पोहोचलेले आढळतात. एखाद्या तंत्रिका तंतूस विद्युत, यांत्रिक (उदा., चिमटा घेणे), उष्णताजन्य (उदा., तापवलेली काचेची कांडी लावणे) किंवा रसायनजन्य (उदा., मिठाचा खडा लावणे) चेतना दिल्यास, ज्या जागी चेतना दिली असेल तिथे जी घडामोड (विक्षोभ) सुरू होते तिला स्थानीय उत्तेजितावस्था म्हणतात. उत्तेजक जरूर तेवढा शक्तिशाली असेल, तर सुरू झालेला विक्षोभ अतिवेगाने तंत्रिका तंतूतून पुढे जातो; म्हणजेच विक्षोभ तरंग वाहून नेले जातात. या क्रियेला तंत्रिका आवेग म्हणतात.

तंत्रिका तंतूंचा आणखी एक गुणधर्म महत्त्वाचा असतो. त्याला सर्व-वा-शून्य (ऑल-ऑर-नन) आविष्कार म्हणतात. म्हणजे तंत्रिका आवेगाच्या उत्पादनाकरिता लागणारा उत्तेजक कितीही जोरदार असला, तरी तंत्रिका आवेगाच्या वेगावर किंवा परिणामावर त्याचा परिणाम होत नाही. उत्तेजक फक्त विक्षोभ उत्पन्न करण्यास समर्थ असला पाहिजे, म्हणजेच तो सर्वाधिक आणि संपूर्ण प्रतिक्रियाच घडवून आणू शकतो. याशिवाय सतत उत्तेजनाने विक्षोभांचे गुणन नाही. प्रत्येक तंत्रिका आवेग स्वतंत्रच राहतो.

तंत्रिका आवेगाचा वेगही निरनिराळा असतो. दोन संवेदी तंत्रिकांतही फरक असतो. उदा., पायाच्या नडगीवर जोराचा टोला बसल्यानंतर क्षणातच अल्पकालीन अशा झणझणीत वेदना जाणवतात आणि पाय मागे घेतला जातो; परंतु त्यानंतर मंद वेदना सतत जाणवतात. वेदनांची पहिली जाणीव ज्या तंत्रिकांद्वारे होते त्यांमधून जाणाऱ्या आवेगांचा वेग, मंद वेदनांची जाणीव करून देणाऱ्या आवेगांच्या वेगापेक्षा कितीतरी जलद असतो. सस्तन प्राण्यातील तंत्रिका तंतू दर सेकंदास १,००० आवेग वाहून नेऊ शकतात.

आ. ३१. अनुबंधन प्रकार : (अ) टोपलीसारखे अनुबंधन : (१) अक्षदंड; (आ) अक्षदंडाचे अंत्य प्रवर्ध मिळून झालेले अनुबंधन (अक्षदंड-कोशिका अनुबंधन) : (१) अक्षदंड, (२) अक्षदंडाचे अंत्य प्रवर्ध; (इ) आंतरगुफित अनुबंधन (अक्षदंड-अक्षदंड अनुबंधन) : (१) अक्षदंड.

तंत्रिका आवेग म्हणजे विद्युत प्रवाह नव्हे. तंत्रिका तंतूतील रचनात्मक आणि रासायनिक विक्षोभाचा तो तरंग असतो. हा तरंग वाहून नेण्याची क्रिया मात्र विद्युतीय असते. तंतू ज्या ठिकाणी संपतो तेथे आवेगाचे परिवहन (दुसऱ्या तंत्रिका तंतूत किंवा कोशिकेत वाहून नेले जाणे) मात्र रासायनिक यंत्रणेवर अवलंबून असते.

(३) अनुबंधन : तंत्रिका कोशिका एकमेकींशी अक्षदंडांच्या अंत्य प्रवर्धांनी किंवा अभिवाही प्रवर्धांनी जोडलेल्या असतात. एका कोशिकेचा अक्षदंड ज्या ठिकाणी दुसऱ्या कोशिकेच्या अभिवाही प्रवर्धांना किंवा कोशिका-कायाला मिळतो, त्या ठिकाणाला अनुबंधन म्हणतात. एक अक्षदंड थोडी किंवा पुष्कळ अनुबंधने (सरासरी एक हजार) प्रस्थापित करू शकतो. एकच तंत्रिका कोशिका-काय इतर वीस हजार कोशिकांशी अनुबंधित संबंध प्रस्थापित करतो. प्रत्यक्ष संधिस्थानी तीन भाग दिसतात. (१) पूर्व अनुबंधन भाग, (२) अनुबंधन खंड आणि (३) पश्च अनुबंधन भाग. पूर्वभागात असलेल्या गुठळ्यांत सूक्ष्म पुटिका असतात. त्यांमध्ये जे पूर्वगामी रासायनिक पदार्थ असतात त्यांच्यापासून ॲसिटीलकोलीन, नॉरएपिनेफ्रिन यांसारखे आवेगवाहक पदार्थ उत्पन्न होतात. हे पदार्थ अनुबंधन खंडातून (अडीच अब्जांश मिमी.) अनुबंधोत्तर भागात शिरताच पुढील कोशिकेच्या अथवा कोशिकांच्या प्रतिक्रियेस सुरुवात होते.

काही अनुबंधनांत आवेगांचे अभिसारण (एकत्रीकरण) तर काहींत अपसारण होते. काही अनुबंधने आवेगांना प्रतिरोध करू शकतात. अनुबंधनांची रचनाही निरनिराळी असते.

आ. ३२. अनुबंधन प्रतिरोध : (१) संवेदनाग्राहक, (२) अभिवाही तंत्रिका तंतू, (३) मध्यस्थ तंत्रिका कोशिका, (४) अनुबंधन अ, (५) अनुबंधन आ, (६) स्नायू अ, (७) स्नायू आ.

(४) प्रतिक्षेपी क्रिया : संवेदी ग्राहकांच्या उद्दीपनामुळे होणाऱ्या त्वरित आणि अनैच्छिक अशा प्रतिक्रियेला ⇨ प्रतिक्षेपी क्रिया म्हणतात. तंत्रिका तंत्राचे रचनात्मक एकक जशी तंत्रिका कोशिका असते तसेच तंत्रिका तंत्राचे कार्यात्मक एकक प्रतिक्षेपी क्रिया असते. प्रतिक्षेपी क्रियेचा रचनात्मक एकक ‘प्रतिक्षेपी चाप’ असतो. या चापाचे कमीत कमी पाच प्रमुख विभाग असतात. (१) ग्राहक : संवेदी तंत्रिकेची वैशिष्ट्यपूर्ण टोके, (२) संवेदना वाहक : तंत्रिका आवेग मेरुरज्जूपर्यंत वाहून नेणारी तंत्रिका कोशिका, (३) प्रेरक वाहक : प्रेरक संदेश मेरुरज्जूपासून ग्रंथी, स्नायू इ. प्रभावकांपर्यंत वाहून नेणारी तंत्रिका कोशिका, (४) तंत्रिका-प्रभावक संधी : प्रेरक तंत्रिका तंतूंची प्रभावकांशी जोडलेली वैशिष्ट्यपूर्ण टोके आणि (५) प्रभावक : स्नायू किंवा ग्रंथी ज्यामध्ये प्रत्यक्ष प्रतिक्रिया घडते. प्रेरक आणि संवेदी कोशिकांच्या मध्ये मेरुरज्जूच्या करड्या भागात आणखी एक तंत्रिका कोशिका चाप पूर्ण करण्यास जेव्हा मदत करते तेव्हा त्या तंत्रिका कोशिकेला मध्यस्थित तंत्रिका कोशिका म्हणतात.

प्रतिक्षेपी चाप फक्त मेरुरज्जूशीच संबंधित नसून काहींचा मस्तिष्क स्तंभाशी संबंध असतो. पहिल्या प्रकाराला मेरुरज्जू प्रतिक्षेप म्हणतात व दुसऱ्याला मस्तिष्क प्रतिक्षेप म्हणतात व ते सर्व केंद्रीय तंत्रिका तंत्रातील वरिष्ठ केंद्रकांच्या नियंत्रणाखाली नसतात.

प्रतिक्षेपी क्रिया व प्रवृत्तीचा जवळचा संबंध असतो. काही प्रतिक्षेपी क्रिया जन्मापासूनच असतात. उदा., चूषण, रडणे, वस्तूभोवती बोटे आवळणे वगैरे. वाढत्या वयाबरोबर तंत्रिका तंत्राची वाढ होत जाते व प्रतिक्षेपी क्रियांच्या संख्येतही वाढ होते. शिंकणे आणि उचकी यांसारख्या प्रतिक्षेपी क्रिया काही दिवसांनंतर सुरू होतात व पापणी लवण्याची प्रतिक्षेपी क्रिया काही महिन्यांनंतर सुरू होते. ज्या प्रतिक्षेपी क्रिया प्राणिशरीरात जन्मजात असतात, त्यांना अनावलंबी प्रतिक्षेप म्हणतात. ज्या प्रतिक्षेपी क्रियांकरिता अनुभव, शिक्षण व प्रशिक्षण यांची गरज असते आणि ज्यांमध्ये प्रमस्तिष्क बाह्यकाचा महत्त्वाचा वाटा असतो, त्यांना अवलंबी प्रतिक्षेप म्हणतात. शरीरांतर्गत अंतस्त्यांच्या स्वयंचलित क्रिया उदा., हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण, जठरातील पचनक्रिया, श्वसनक्रिया हे अनावलंबी प्रतिक्षेपच असतात.

आ. ३३. आवेगांचे अभिसारण व अपसारण : (अ) अभिसारण : तीन अक्षदंडातून येणारे आवेग एकाचे कोशिकेस पोहोचतात, (आ) अपसारण : एकाच अक्षदंडातून येणारे आवेग तीन निरनिराळ्या कोशिकांप्रत पोहोचून पुढे त्यांच्या अक्षदंडांतून नेले जातात.

(५) संवेदनाग्राहके : अभिवाही तंत्रिका तंतूच्या टोकाशी जी विशिष्ट रचना असते, ‍ तिला संवेदनाग्राहक म्हणतात.

प्रत्येक प्राणी परिसरातील विविध प्रकारच्या उत्तेजकांच्या माऱ्याला सतत तोंड देत असतो. ही उत्तेजके भौतिक आणि रासायनिक बदल घडवून आणतात व त्यांच्याद्वारे शरीरक्रियात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होतात. या प्रतिक्रियांमुळे प्राण्यांना त्यांच्या परिसराबद्दल सतत माहिती मिळत असते. तापमान, दाब, प्रकाश तसेच कंपने यांतील बदल हे जसे बाह्य परिसराचे उत्तेजक तसेच शरीरांतर्गत परिस्थितीतील बदलही उत्तेजकही असतात. या उत्तेजकांमुळे अभिवाही तंत्रिका तंतूच्या टोकाशी असलेली संवेदनाग्राहे उद्दीपित होतात आणि उत्पन्न झालेले तंत्रिका आवेग अभिवाही तंत्रिकाद्वारे मेंदूकडे पोहोचविले जातात. सर्व संवेदनांचे प्रमुख केंद्र प्रमस्तिष्क बाह्यकातच असते. बाह्य किंवा अंतर्गत परिसरीय बदल संवेदनाग्राहके ग्रहण करतात. प्रमस्तिष्क बाह्यकातील संवेदी क्षेत्र आलेल्या माहितीची सांगड घालते व तेथेच संवेदनांची जाणीव होते.

संवेदनाग्राहकांचे वर्गीकरण ते ज्या शरीरभागात असतील त्यावरून करतात. शरीराच्या पृष्ठभागात (उदा., त्वचा) असलेल्या ग्राहकांना बाह्य ग्राहके म्हणतात. शरीरातील सांधे, कंडरा व स्नायू यांमधील ग्राहकांना अंतर्गत ग्राहके आणि अंतस्त्यांशी संबंधित असलेल्या ग्राहकांना अंतस्त्य ग्राहके म्हणतात.

आ. ३४. तीन तंत्रिकांनी बनलेला तंत्रिका चाप : (१) त्वचेतील संवेदनाग्राहक, (२) टाचणी, (३) संवेदनावाहक, (४) पश्चमूल गुच्छिका, (५) मध्यस्थित तंत्रिका कोशिका, (६) मेरुरज्जू, (७) प्रेरक वाहक, (८) तंत्रिका-प्रभावक संधी, (९) प्रभावक (स्नायू).

बाह्य ग्राहकांची संवेदना प्रकारानुसार विभागणी करतात. (अ) त्वचेतील ग्राहके : (१) स्पर्श ग्राहके, (२) दाब ग्राहके, (३) वेदना ग्राहके, (४) उष्णतादर्शी ग्राहके; (आ) विशिष्ट ग्राहके : (५) श्रवण ग्राहके, (६) प्रकाशसंवेदी ग्राहके, (७) स्वाद ग्राहके, (८) गंध ग्राहके.

या ग्राहकांची रचना विशिष्ट प्रकारची असून ते विशिष्ट व फक्त एकाच प्रकारच्या संवेदनेने उत्तेजित होतात. उदा., डोळ्यातील प्रकाशसंवेदी ग्राहके प्रकाशानेच, तोंडातील रुचिकणिका फक्त काही रासायनिक द्रावांमुळेच आणि नाकातील गंध ग्राहके फक्त रासायनिक वायूंमुळेच उत्तेजित होतात.

आ. ३५. संवेदी तंत्रिका मार्ग : (१) मध्य पश्च संवेलक, (२) थॅलॅमसातील केंद्रक, (३) अंत:प्रावर, (४) अभिमध्य तंतुबंध, (५) मध्यमस्तिष्क, (६) शंक्वाकृती केंद्रक, (७) लंबमज्जा, (८) ग्रैव मेरुरज्जू, (९) स्नायूतील स्नायुतर्कू, (१०) तंत्रिका तंतूची मोकळी टोके, (११) माईसनर संवेदनग्राहक, (१२) जाड वसावरण असलेला तंत्रिका तंतू, (१३) वसावरणरहित तंत्रिका तंतू, (१४) वसावरणयुक्त तंत्रिका तंतू.

सर्व प्रकारच्या संवेदना मेंदूच्या थॅलॅमसात स्वीकारल्या जातात. हा भाग सर्व प्रकारच्या जाणिवांचे (बोधांचे) तसेच प्राथमिक भावनांचे केंद्र आहे. थॅलॅमस आणि प्रमस्तिष्क बाह्यकातील मध्यसीतेच्या मागील संवेदी क्षेत्र हे दोन्ही मिळून संवेदनांचा समन्वय घालतात. संवेदी क्षेत्राचा मेंदूतील इतर क्षेत्रांशी संबंध असतो. या संबंधाद्वारे जुन्या अनुभवावर आधारित असलेल्या साहचर्यामुळे प्रत्येक संवेदनेची छाननी होऊन बोध होतो.

विशिष्ट ग्राहकांच्या माहितीकरिता कान, डोळा, जीभ आणि नाक या नोंदी पहाव्यात.

तंत्रिका तंत्राच्या कार्याचा आढावा : स्वायत्त तंत्रिका तंत्राचे कार्य मागे दिलेच आहे. सर्व प्राणिसृष्टीमध्ये शरीरांतर्गत क्रिया आणि बाह्य परिसरास अनुकूलनीय अशी संपूर्ण शरीराची प्रतिक्रिया घडवून आणण्याकरिता तंत्रिका तंत्राची योजना असते. प्राणिशास्त्रीय क्रमविकास दृष्ट्या जसजसे कनिष्ठ वर्गाकडून वरिष्ठ वर्गाकडे बघावे तसतसे त्याची परिसरीय अनुकूलनक्षमात वाढत गेलेली आढळते. याचे कारण त्याच्यामधील वाढती चलनक्षमता हेच असावे. एका दृष्टीने प्राण्याची चलनक्षमता हाच क्रमविकासाचा निदर्शक मानता येईल. तंत्रिका तंत्राच्या क्रमविकासाचा अभ्यास केल्यास ते चलनक्षमतेबरोबरच वाढत गेल्याचे दिसते.

जेलीफिशसारखा कनिष्ठ प्राणी एका जागेवरून दुसरीकडे फारसा हालचाल करीत नाही. त्याचे तंत्रिका तंत्र फक्त संरक्षणास पुरेल एवढेच असते. त्याच्यामध्ये अतिशय साधे प्रतिक्षेपी चाप बनविण्यास पुरेशी-अभिवाही तंत्रिका तंतू, मध्यस्थ कोशिका आणि अपवाही तंतू-अशीच योजना असते.

आ. ३६. प्रमस्तिष्क बाह्यकातील संवेदी क्षेत्रे : (१) मध्य सीता, (२) मध्य पश्च संवेलक, (३) दृष्टिक्षेत्र, (४) श्रवणक्षेत्र. [ वरच्या उजव्या कोपऱ्यात बाणांनी दाखविलेला भाग मोठा करून दाखविलेला आहे. त्यात संवेदी क्षेत्र सीतेमध्ये खोलवर गेल्याचे दिसत आहे ].
त्याहून वरच्या प्राण्यांत (उदा., कृमी) जे थोडी अधिक हालचाल करतात त्यांच्यामध्ये केंद्रित झालेली तंत्रिका गुच्छिकांची मालिका असते. प्रत्येक गुच्छिका आपापल्या खंडाकडे तर बघतेच पण शिवाय जेव्हा सबंध शरीराचा प्रश्न येतो तेव्हा (उदा., संरक्षणात्मक हालचाल) या गुच्छिका एकमेकींशी सहकार्य करतात. सर्व सस्तन प्राण्यांतील मेरुरज्जू आणि मस्तिष्क स्तंभ यांच्या कार्याचा मूलभूत पाया नेमका हाच असतो.

प्राणी जसजसा अधिक चलनशील बनतो तसतशी त्याची ऑक्सिजनाची आणि अन्नाची गरजही वाढते. त्याकरिता मस्तिष्क सेतू आणि लंबमज्जा हे भाग तयार होऊन त्यांच्यामध्ये श्वसनक्रिया आणि रुधिराभिसरणावर नियंत्रण ठेवणारी केंद्रे तयार होतात. याशिवाय गिळण्याची क्रिया, पाचक रसांचे स्रवण व आंत्राच्या हालचाली यांवरील प्राणेशा तंत्रिकेच्या नियंत्रणामुळे पचनक्रियेची क्रियाशीलता वाढते. या पचन तंत्राच्या वाढीबरोबर संरक्षणात्मक अशा उलटीच्या (ओकारीच्या) क्रियेचीही तरतूद केली जाते. तीमुळे हानिकारक पदार्थ गिळल्यास ताबडतोब शरीराबाहेर टाकण्याची व्यवस्था होते.

पायाबरोबरच चलनशीलता अधिक वाढली, त्याबरोबरच अंगस्थितीशी संबंधित प्रतिक्षेप तयार झाले. या प्रतिक्षेपांचे नियंत्रण लंबमज्जा ते मध्यमस्तिष्क या भागातील केंद्रे करू लागली. त्याशिवाय निमस्तिष्काची वाढ अधिक सहकार्यास उपयुक्त अशीच झाली. जे प्राणी तिन्ही प्रतलांत हालचाल करू शकतात, त्यांचा निमस्तिष्क सर्वांत अधिक प्रगत झालेला असतो.

तापमानातील बदलाकरिता लागणारे अनुकूलन तसेच जलद रासायनिक प्रक्रियेकरिता अधोथॅलॅमसात केंद्रे तयार झाली. या केंद्रांची नियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान कायम, सामान्यत: परिसराच्या तापमानापेक्षा जास्त, राखले जाते अशा) प्राण्यांना गरज असते. तंत्रिका तंत्राच्या आदिम योजनेतील हा भाग अतिशय महत्त्वाचा असावा. कारण स्वरक्षण आणि स्वजातिरक्षण याच भागावर अवलंबून असतात. याच भागाशी संलग्न अशा पोष ग्रंथीवर वाढ अवलंबून असते. शिवाय प्रजननावरही येथूनच नियंत्रण केले जात असावे. अधोथॅलॅमसातच परिसरजन्य स्फोटक प्रतिक्रियांचे उगमस्थान असावे.

प्रमस्तिष्क हा भाग मागील अनुभव आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची सांगड घालून अधिक जटिल अशा परिसरीय बदलांना तोड देण्यास समर्थ असे पूर्वसंकल्पित अनुकूलन तयार करतो. आधुनिक यांत्रिक परिवहन (दळणवळण) आणि संदेशवहन यांमुळे मानव अधिक चलनशील बनला असून त्याची विचारशक्तीही वाढली आहे, यामुळे उत्पन्न झालेल्या जटिल परिसरीय बदलांना तो प्रमस्तिष्कामुळेच तोंड देऊ शकतो.

वाचा व बुद्धी ही मानवाच्या प्रगत प्रमस्तिष्काचीच देणगी आहे. वाचेकरिता श्रवण आणि दृष्टी उत्तम असावी लागतात. मुकी मुले बहुधा बहिरी असतात. मानवाची मनोविषयक आणि वर्तनासंबंधीची वैशिष्ट्ये प्रमस्तिष्क बाह्यकापासून प्राप्त झाली आहेत. त्याच्या भावनात्मक वर्तणुकीची उत्पत्ती कशी होते, हे मात्र अजून समजलेले नाही.

मानवी तंत्रिका तंत्राचे विकार

मानवी तंत्रिका तंत्राच्या विकारांमध्ये व्यक्तिमत्त्वातील बारीकसारीक बदलांपासून ते थेट हातपाय लुळे पडणे, अंधत्व इत्यादींसारख्या लक्षणांचे दर्शन होते. अनेक वेळा या विकारांमुळे तंत्रिकाजन्य हृद्निष्फलतेमुळे (हृदयक्रिया अकस्मात बंद पडल्यामुळे) अकाली मृत्यूही ओढवतो. तंत्रिका तंत्र व त्याच्या विकारांचा अभ्यास ज्या वैद्यकाच्या उपशाखेत केला जातो त्यास तंत्रिका तंत्रविज्ञान (न्यूरॉलॉजी) म्हणतात. प्रस्तुत नोंदीत मानसिक विकारांचा समावेश केलेला नाही. हा एक स्वतंत्र विषयच बनला असून त्याचा समावेश ⇨ मनोविकृतिविज्ञान  या शाखेत केला जातो.

तंत्रिका तंत्राच्या विकारांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी करतात. विभागीय लक्षणात्मक वा कारणात्मक या दृष्टींनी ते करता येते. संप्राप्तिशास्त्राच्या (विकाराच्या कारणांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) दृष्ट्या शोथ (दाहयुक्त सूज), अपकर्ष, नाश इत्यादींवर आधारित असेही वर्गीकरण करता येते. ढोबळ मानाने तंत्रिका तंत्र विकारात दोन प्रकारचे विकार आढळतात. एका प्रकारात तंत्रामध्ये रचनात्मक बदल कोठे ना कोठे तरी आढळतोच. दुसऱ्यात रचनेतील बिघाडाशिवाय कार्यातही बदल आढळतो. पहिल्यास ‘अंगभूत’ व दुसऱ्यास ‘कार्यात्मक’ विकार म्हणतात. हे दोन प्रकार स्वतंत्र कल्पिले असले, तरी ते परस्परांशी निगडित असून दोहोंमधील सीमारेषा अगदी सूक्ष्मच आहे. या नोंदीत वरीलपैकी कोणत्याही एका वर्गीकरणाचा आधार घेतलेला नसून सर्वसाधारणपणे नेहमी आढळणाऱ्या विकारांविषयी थोडी माहिती दिली आहे. ही माहिती पुढील तीन विभागांत लिहिली आहे : (१) तंत्रिका तंत्राची तपासणी व निदानात्मक विचार, (२) काही विकार आणि (३) प्रतिबंधात्मक उपाय.

तंत्रिका तंत्राची तपासणी : प्रत्यक्ष तंत्रिका तंत्राच्या तपासणीपूर्वी सर्वसाधारणपणे संपूर्ण शरीराची तपासणी करणे म्हणजेच शरीराचे तापमान, नाडी, रक्तदाब यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करणे. हृदय, फुप्फुसे, उदरस्थ आणि इतर अवयवांची तपासणी आवश्यक असते. रोगाबद्दलच्या तक्रारींची माहिती रोग्याकडून तसेच त्याच्या नातलगांकडून बारकाईने मिळविणे जरूर असून रोगी अशी माहिती देत असताना आणि सर्वसाधारण तपासणी करताना त्याच्या संवेदी क्रिया, स्नायूंच्या हालचाली व मानसिक स्थितीची कल्पना करता येते. त्याचा पोषाख, स्वरातील चढ-उतार, वैयक्तिक स्वच्छतेबद्दलची आस्था, उभे राहण्याची किंवा बसण्याची पद्धत, हाताच्या, पायाच्या किंवा चेहऱ्यावरील स्नायूंच्या अपसामान्य हालचाली इत्यादींचे अवलोकन करता येते. त्याच्या चालण्यावरून त्याच्या स्नायू तंत्राची कल्पना करता येते. चिडखोरपणा, शंकेखोरपणा, विरोधी वृत्ती, मूकस्तंभता, अतिशय बडबड, वल्गना वगैरेंवरून मानसिक स्थितीची कल्पना येते. कष्टध्वनीवरून मेंदूच्या पुष्कळ भागांची तसेच तत्संबंधी तंत्रिकांची स्थिती अजमावता येते. बोललेले शब्द न समजणे किंवा लिहिलेले न समजणे यावरून प्रमस्तिष्क बाह्यकाचा कोणता भाग बिघडला असावा याविषयी अंदाज करता येतो. वाग्विकृती (जीमध्ये बोलण्यातील किंवा श्रवणातील बिघाडाचा समावेश नसून विचार प्रकट करण्याकरिता भाषेचा योग्य उपयोग करण्याची असमर्थता फक्त दर्शविलेली असते) बहुधा वाचनाच्या क्षमतेच्या ऱ्हासासहित आढळते. या विकाराचे कारण ९५ टक्के रोग्यांमध्ये डाव्या प्रमस्तिष्क गोलार्धातील बिघाड हे असते.

ऐच्छिक, हेतुपुरस्सर हालचाल करण्याच्या असमर्थतेला क्रियाप्रेरक अक्षमता (अप्रॅक्सिया) म्हणतात. उदा., जीभ बाहेर काढ म्हणून सांगूनही ती बाहेर न काढता येणे. परंतु तीच जीभ ओठांना लागलेला पदार्थ चाटू शकते म्हणजेच तिचा अंगघात झालेला नसतो. क्रियाप्रेरक अक्षमता व वाग्विकृती बहुधा एकाच वेळी आढळतात आणि ही लक्षणे मेंदूतील प्रमस्तिष्क बाह्यकातील विशिष्ट संवेलकातील बिघाड दर्शवितात.

डोक्याचे निरीक्षण फार महत्त्वाचे असते. शिरोवल्कावरील त्वचा, उंचवटे, स्पर्शासह्यता, वाजवीपेक्षा मोठे किंवा लहान आकारमान, मानेतील रक्तवाहिन्यांची तपासणी आणि मानेच्या सर्व हालचालींचे निरीक्षण महत्त्वाचे असते. या हालचालींमध्ये ऐच्छिक तसेच परकृत (तपासणाऱ्याने मुद्दाम केलेल्या) हालचालींचा समावेश असावा लागतो. मस्तिष्क तंत्रिकांच्या बारा जोड्या असून त्यांच्या तपासणीकरिता विशिष्ट चाचण्या वापरतात.

स्नायू तंत्राची तपासणी प्रत्यक्ष चाचपडून बघून तसेच मोजमापावरून करतात. स्नायूची अपपुष्टी किंवा अतिपुष्टी यावरून समजते. अपपुष्टी असल्यास तंतुक आकुंचने मिळतात किंवा नाही, हे बघावे लागते. स्नायूच्या विश्रामी अवस्थेतील अंगग्रहता किंवा शैथिल्य हातापायांच्या सांध्यांच्या हालचाली करून तपासतात. स्नायूंचे सहसंयोजन तपासण्याकरिता दोन्ही बाहू शरीरापासून लांब आडवे नेऊन प्रथम एका हाताच्या आंगठ्याजवळच्या बोटाने नाकाच्या शेंड्यास स्पर्श करावयास लावून नंतर तीच कृती दुसऱ्या हाताने करावयास लावतात. एक टाच दुसऱ्या गुडघ्यावर टेकवून ती नडगीवरून हळूहळू खाली नेण्यास सांगतात. या परीक्षेवरून या कृतीकरिता लागणाऱ्या स्नायूंमधील सहसंयोजन व्यवस्थित आहे किंवा नाही हे समजते.

काही प्रतिक्षेपांच्या तपासणीवरून (उदा., जानू प्रतिक्षेप, पदतल प्रतिक्षेप) तंत्रिका तंत्रातील विकारस्थानांचा अंदाज करता येतो. पदतल प्रतिक्षेपामध्ये बॅबिन्स्कीची खूण (जे. एफ्. एफ्. बॅबिस्की या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारी खूण) मिळणे म्हणजे तंत्रिका तंत्र विकाराचे हमखास लक्षण समजतात. कारण मनोतंत्रिका विकृतीत ही खूण कधीही मिळत नाही. अगदी लहान मुलांत ही खूण मिळते, परंतु ती विकारदर्शक नसते. त्यांच्या मेरुरज्जूतील बाह्यक-मेरुरज्जू तंत्रिकामार्गाचे संपूर्ण वसावरण तोपर्यंत तयार न झाल्यामुळे ही खूण मिळते [⟶ प्रतिक्षेपी क्रिया].‍

यांशिवाय काही संवेदी चाचण्या घेतात. स्पर्श, वेदना, उष्णता या संवेदना विशिष्ट पद्धतींनी तपासतात. उदा., दोन काचनलिकांपैकी एकीत ऊन पाणी व एकीत थंड पाणी घालून त्या आळीपाळीने त्वचेच्या निरनिराळ्या जागी ठेवून तपासतात. त्यावरून उष्णता संवेदनेसंबंधी माहिती मिळते.

वैद्याने स्वत: करावयाच्या वरील तपासण्यांशिवाय तंत्रिका तंत्राच्या विकारांच्या  निदानाकरिता काही प्रयोगशाळेतील व इतर उपकरणांच्या मदतीने करावयाच्या खास तपासण्यांची गरज असते. रक्त, मूत्र मस्तिष्क मेरुद्रव यांची तपासणी, क्ष-किरण चिकित्सा आणि विद्युत् मस्तिष्कालेखन (मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहांची आलेखरूपाने नोंदणी करण्याचे तंत्र) यांचा समावेश यात होतो.

क्ष-किरण चिकित्सेत कवटी आणि कशेरुक दंडाची साधी तपासणी कधीकधी महत्त्वाची ठरते. या साध्या तपासणीतही अर्बुद (गाठ) दिसण्याचा संभव असतो. याशिवाय काही विरोध उत्पादक पदार्थ (उदा., लिपिडॉल) वापरून क्ष-किरण तपासणी करता येते. मेंदू किंवा मेरुरज्जूतील रक्तवाहिन्यांच्या विकाराकरता रक्तवाहिनी दर्शन परीक्षा (रक्तवाहिन्यांत बिनविषारी आणि क्ष-किरणांना अपारदर्शी असणारा पदार्थ प्रथम अंत:क्षेपणाने — इंजेक्शनाने —देऊन मग ठराविक वेळात घेतलेल्या क्ष-किरण चित्राद्वारे करण्यात येणारी परीक्षा) महत्त्वाची असते.

वरील तपासण्यांपेक्षा किरणोत्सर्गी क्रमवीक्षण (किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणाऱ्या भेदक कणांचे वा किरणांचे योग्य उपकरणाच्या साहाय्याने क्रमवार निरीक्षण करण्याची पद्धत) अधिक उपयुक्त ठरले आहे. या पद्धतीत आर्सेनिक, पारा, आयोडीन वगैरेंची किरणोत्सर्गी संयुगे नीलेतून अंत:क्षेपणाने देतात. क्रमवीक्षणाकरिता गायगर गणित्रासारखी [→ कण अभिज्ञातक] उपकरणे वापरतात. वरील तपासण्यांपेक्षा ही तपासणी कमी धोकादायक आणि कमी त्रासदायक असते. स्रोत-मस्तिष्कालेखनामध्ये कवटीतील ऊतकांमधील विद्युत् संवहनासंबंधीच्या फरकांचा अभ्यास करतात. त्यावरून कवटी व मेंदूमधील रुधिराभिसरणाची कल्पना येते. प्रतिध्वनि-मस्तिष्कालेखनावरून मेंदूतील अर्बुद किंवा रक्तक्लथन झालेली (रक्ताची गुठळी तयार झालेली) जागा निश्चित करता येते.

विद्युत् मस्तिष्कालेखन ही धोकारहित व सोपी परीक्षा फार उपयुक्त असते. मस्तिष्काघात अर्बुदे, संसर्गजन्य विकार, मस्तिष्क-रक्तवाहिन्यांतील बिघाड, तंत्रिका तंत्राचे अपकर्षजन्य विकार आणि ⇨ अपस्मार  यांसारख्या झटके येणाऱ्या विकारांमध्ये विद्युत् मस्तिष्कालेख फार उपयुक्त ठरला आहे [→ विद्युत् मस्तिष्कालेखन].

वरील सर्व विशिष्ट तपासण्यांशिवाय स्नायूंची विद्युत् क्रियाशीलता तपासणी आणि तंत्रिका ऊतकाची ⇨ जीवोतक परीक्षा  उपयुक्त असतात.

काही विकार : (अ) जन्मजात विकार : भ्रूणावस्थेत तंत्रिका तंत्राच्या वाढीत दोष उत्पन्न झाल्यामुळे जे विकार उद्भवतात त्यांना जन्मजात विकार म्हणतात. मेंदू, मेरुरज्जू, कवटी किंवा कशेरुक दंडातील हाडे यांमध्ये जन्मजात विकार आढळतात. तंत्रिका ऊतकाच्या वाढीतील दोष हे प्रमस्तिष्क गोलार्धाच्या अभावापासून (अमस्तिष्कता) तो थेट निमस्तिष्क, मस्तिष्क स्तंभ आणि मेरुरज्जू यांमधील दोषांपर्यंत आढळतात. डोक्याचे आकारमान प्रमाणापेक्षा मोठे असणे अथवा प्रमाणापेक्षा लहान असणे (महाशीर्ष किंवा लघुशीर्ष), द्विखंडित कवटी (कवटीची हाडे न वाढून राहिलेल्या फटीमधून मेंदू बाहेर डोकावणे) व द्विखंडित पृष्ठवंश (पृष्ठवंशाच्या कशेरुकांच्या पश्चभागी असलेल्या हाडांच्या कमानी तयार न झाल्यामुळे जी पोकळी उरते तीमधून मस्तिष्कावरणे किंवा त्यांच्यासह मेरुरज्जूचा भाग पाठीच्या त्वचेखाली फुगवटी उत्पन्न करतो) या विकृतींचा समावेश जन्मजात विकारांत होतो.

आ. ३७. जलशीर्ष : (अ) जलशीर्ष असलेले लहान मूल, (आ) जलशीर्षामुळे एकमेकांपासून दूर गेलेली हाडे दाखविणारे कवटीचे चित्र.

महाशीर्षाच्या एका प्रकारास जलशीर्ष म्हणतात. या विकारात मस्तिष्क विवरांत प्रमाणापेक्षा जादा मस्तिष्क-मेरुद्रवाचा संचय झाल्यामुळे ती मोठी होतात. मेंदूचा थर पातळ बनतो व कवटीच्या हाडांवर दाब पडून ती एकमेकांपासून लांब होतात. जलशीर्षामध्ये मस्तिष्कमेरुद्रवाचा दाब वाढला म्हणजेच रोगलक्षणे उद्भवतात. जलशीर्षाचे दोन प्रकार आहेत. एकामध्ये चौथ्या मस्तिष्क विवरातील मेरुद्रव बाहेर पडण्याची छिद्रे बंद होतात. या प्रकाराला अवरोधी जलशीर्ष म्हणतात. दुसऱ्यामध्ये मस्तिष्क-मेरुद्रवाच्या अभिसरणात कोणताही अडथळा नसूनही दाब वाढलेला असतो. या प्रकाराला संचरित जलशीर्ष म्हणतात. जन्मजात विकार असलेली मुले बहुधा मंदबुद्धीची असून त्यांच्या दृग्बिंबाची अपपुष्टी झालेली असते. उपार्जित जलशीर्ष प्रौढावस्थेतही आढळते. मात्र अशा वेळी हाडांची वाढ अगोदरच पूर्ण झालेली असल्यामुळे डोक्याच्या आकारमानात फारसा बदल होत नाही. जलशीर्षावर विशिष्ट शस्त्रक्रिया उपयुक्त ठरल्या आहेत.

(आ) डोकेदुखी : हा स्वतंत्र रोग नसूनही ते एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण असण्याची शक्यता असल्यामुळे त्यासंबंधी येथे थोडी माहिती दिली आहे. सर्वसाधारण माणूस डोकेदुखीचा व मेंदूचा संबंध जोडीत असल्यामुळे डोकेदुखी नेहमीच काळजीचा विषय बनते. प्रत्यक्ष मेंदूला संवेदना नसतात. कवटीतील काही भाग, प्रमुख नीला कोटरे, मेंदूच्या तळभागाशी असलेल्या रक्तवाहिन्या आणि कवटीच्या तळातील अग्र व पश्च खाचांतील दृढतानिका संवेदनाक्षम असतात. मध्य खाचेतील दृढतानिका संवेदनारहित असते. कवटीबाहेरील सर्व ऊतके संवेदनाक्षम असतात म्हणजेच त्यांना वेदना ही संवेदना असते.

डोळ्यांचे रोग, नासाकोटरांचे रोग, मध्यकर्ण आणि दातांचे रोग, कशेरुक दंडाचे संधिवातादि रोग, मेंदूचे आणि त्याच्या आवरणाचे शोथजन्य किंवा अर्बुदजन्य रोग, कवटीची हाडे आणि शिरोवल्काचे याच कारणामुळे होणारे रोग या सर्वांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असू शकते. वरील सर्व रोग देहोद्भव असल्यामुळे या डोकेदुखीला देहोद्भव रोगजन्य डोकेदुखी म्हणता येईल. परंतु कोणत्याही देहभागात रोग नसतानाही डोकेदुखीचे काही प्रकार आढळतात. त्यांना रक्तवाहिनीजन्य डोकेदुखी (उदा., अर्धशिशी), मनोजात डोकेदुखी (उदा., भावनाक्षोभ, अतिचिंता वगैरे) म्हणतात.

डोकेदुखीचे कारण शोधून काढून इलाज करणे योग्य असते. अनेक वेळा अॅस्पिरीन (३००-६०० मिग्रॅ.) सारखे साधे औषध डोकेदुखी थांबवण्यास पुरते. डोकेदुखीच्या निदानाकरिता संपूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी करणे जरूरीचे असते. डोळ्यांची नेत्रपरीक्षकाद्वारे तपासणी, रक्तदाब व मूत्रपरीक्षा, क्ष-किरण चिकित्सा (डोके व नासाकोटरे), मस्तिष्क-मेरुद्रवाची व रक्तरसाची उपदंशाकरिता तपासणी यांचा निदानास उपयोग होतो [→ डोकेदुखी; अर्धशिशी ].

(इ) डोके आणि मेंदू यांचे आघातजन्य विकार : डोक्याला मार लागून मृत्यू येण्याचे प्रमाण आधुनिक वेगवान वाहनांच्या वापरामुळे तरुणांमध्ये सतत वाढत आहे. डोक्याला मार बसून उद्भवणाऱ्या लक्षणांचे गांभीर्य प्रत्यक्ष मेंदूला किती इजा पोहोचलेली आहे, त्यावर अवलंबून असते. कवटीचे हाड फुटूनही मेंदूला अत्यल्प इजा होण्याची शक्यता असते. डोके व मेंदू यांना मार बसून नंतर बऱ्या झालेल्या रोग्यामध्ये कधीकधी झटके, डोकेदुखी अथवा चित्तविकृती  रोग उद्भवण्याचा संभव असतो. मेंदूला मार बसलेल्या रोग्यांपैकी ४० टक्के रोग्यांत अपस्मार होण्याची शक्यता असते. बऱ्या झालेल्यांपैकी रोग्यांत डोकेदुखी, चक्कर येणे, चिडखोरपणा, अस्थिरता, अतिशय घाम येणे आणि व्यक्तिमत्त्वातील बदल यांपैकी काही लक्षणे उद्भवतात. त्यांना आघातजन्य लक्षणसमूह म्हणतात. ही लक्षणे मेंदूच्या गंभीर इजेपासून उद्भवत नसून हळूहळू बरी होतील असा रोग्यामध्ये विश्वास उत्पन्न केल्यास पुष्कळांना बरे वाटू लागते.

डोक्यास मार बसल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि रोगप्रगती मेंदूला पोहोचलेल्या इजेशी संबंधित असतात. मारानंतर फक्त संक्षोभ (अल्पकाल टिकणारी बेशुद्धी, कमजोर नाडी, अंग गार पडणे, फिक्कटपणा वगैरे लक्षणे असलेली शरीरावस्था) झाला असेल, तर रोगी लवकर शुद्धीवर येतो. मार लागण्यापूर्वीच्या तसेच शुद्धीवर आल्याबरोबर नंतरच्या घटनांची विस्मृती होते. याला आघातपूर्व स्मृतिलोप आणि आघातपश्च स्मृतिलोप म्हणतात. अधिक गंभीर स्वरूपाची इजा झाली असल्यास बेशुद्धी टिकून राहते. शुद्ध आल्यास ती येण्यापूर्वी संभ्रमावस्था आणि मानसिक गोंधळ झालेला आढळतो. आघातजन्य विकारांचे निदान करणे फारसे कठीण नसते. बाह्य जखमा, कान व नाक यांची रक्तस्रावाकरिता तपासणी, क्ष-किरण चिकित्सा, प्रतिध्वनिमस्तिष्कालेख इ. तपासण्या करतात. कटि-सूचिवेध करून मिळविलेल्या मस्तिष्क-मेरुद्रवाची तपासणी आघाताचे गांभीर्य अजमावण्यास फार उपयुक्त असते. गंभीर आघातामध्ये हा द्रव नेहमी रक्तमिश्रित मिळतो. कधीकधी रक्तवाहिनी दर्शन परीक्षा किंवा वात-मस्तिष्कालेख (मस्तिष्क विवरात विशिष्ट उपकरणांच्या मदतीने हवा घातल्यानंतर केलेले क्ष-किरण छायाचित्रण) याची मदत घ्यावी लागते. डोके व मेंदू यांना इजा पोहोचलेल्या सर्व रोग्यांना कमीतकमी चोवीस तास रुग्णालयात ठेवून घेणे हितावह असते.

(ई) शोथजन्य विकार : मेंदू आणि त्यावरील आवरणे यांच्या शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे) उद्भवणाऱ्या तीन विकारांविषयी येथे माहिती दिली आहे.

मस्तिष्कावरणशोथ : (मेनिंजायटिस). मेंदू आणि मेरुरज्जूवरील आवरणांच्या शोथामुळे होणाऱ्या ज्वरयुक्त विकारास मस्तिष्कावरणशोथ म्हणतात. ज्या वेळी ही सूज फक्त दृढतानिकेपुरतीच मर्यादित असते त्या वेळी स्थलावरणशोथ आणि जालतानिका व मृदुतानिका यांच्या शोथास  विरलतानिकाशोध अशा संज्ञा वापरतात. या शोथास नायसेरिया मेनिनजिटीडीस, डिप्लोकॉकस न्यूमोनी, हीमोफायलस इन्फ्ल्यूएंझी, स्ट्रेप्टोकॉकस, स्टॅफिलोकोकस, मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॅसीस इ.सूक्ष्मजंतू आणि काही व्हायरस कारणीभूत असतात. या रोगाचे तीव्र व चिरकारी (दीर्घकालीन) असे दोन प्रकार ओळखले जातात.

तीव्र प्रकारची सुरुवात गंभीर व स्फोटक लक्षणांनी किंवा नकळत होते. वाढती डोकेदुखी हे बहुधा पहिले लक्षण असते. ज्वर नेहमी असतोच. नाडी सुरुवातीस मंद असली, तरी नंतर जलद होते. डोकेदुखी बहुधा स्फोटक प्रकारची असते. पाठीचा कणा दुखू लागून वेदना दोन्ही पायांतही होऊ लागतात. अगदी सुरुवातीस कधीकधी उलट्या होतात. लहान मुलामध्ये झटके येऊ लागतात. हातपाय पोटात घेऊन मान छातीकडे वाकवून पडून राहण्याची रोग्याची प्रवृत्ती असते. प्रकाशाची भीती किंवा असह्यता आढळते. याशिवाय मस्तिष्कावरणशोथ दर्शविणाऱ्या विशिष्ट खुणा म्हणजे मान ताठ असणे, कधीकधी मान पाठीकडे सारखी वळलेलीच राहणे, मुग्धभ्रांती (एक प्रकारचा मानसिक क्षोभ, डेलिरियम) व बेशुद्धी आढळतात. निदानाकरिता तसेच इलाजाकरिता मस्तिष्क-मेरुद्रवाची तपासणी फार उपयुक्त असते. द्रवाचा दाब जास्त असल्याने कटि-सूचिवेध करतानाच समजते. कोणते सूक्ष्मजंतू कारणीभूत आहेत हे शोधून नंतरच योग्य त्या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोग करतात [⟶ मस्तिष्कावरणशोथ].

बालपक्षाघात : (पोलिओ). फक्त मानवात आढळणारा तीव्र स्वरूपाचा, व्हायरसजन्य आणि बालकांत अधिक प्रमाणात होणारा हा विकार आहे. मेरुरज्जूच्या अग्र शृंगातील तंत्रिका कोशिकांवर हे विशिष्ट व्हायरस परिणाम करतात व त्यांचा नाश होतो. कधीकधी लंबमज्जेतील कोशिकांवरही परिणाम होतो. रोगाची सुरुवात घशाला दाहयुक्त सृज येणे, ज्वर, उलट्या आणि पुष्कळ वेळा मान व पाठ ताठणे इ. बहुधा अल्प काळ टिकणाऱ्या लक्षणांनी होते [→ बालपक्षाघात].

मस्तिष्कशोथ : कोणत्याही कारणामुळे मेंदूस येणाऱ्या दाहयुक्त सुजेला मस्तिष्कशोथ म्हणतात. ज्या वेळी विषारी पदार्थामुळे (उदा., शिसे, आर्सेनिक वगैरे) मेंदूवर परिणाम होतो व दाहयुक्त सूज नसते त्या वेळी ‘मस्तिष्कविकार’ (एनसेफॅलोपॅथी) म्हणतात. शरीरातील इतर भागांप्रमाणेच तंत्रिका तंत्रावर सूक्ष्मजंतू संक्रामण करू शकतात. क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू किंवा उपदंशाचे सूक्ष्मजंतू मस्तिष्कशोथ उत्पन्न करण्यास कारणीभूत होऊ शकतात; पण हा शोथ बहुधा चिरकारी प्रकारचा असतो. व्हायरसामुळे होणाऱ्या मस्तिष्कशोथास व्हायरसजन्य मस्तिष्कशोथ म्हणतात. काही सूक्ष्मजंतू किंवा व्हायरस तंत्रिका तंत्रावर प्रत्यक्ष परिणाम करू शकतात, तर काही अप्रत्यक्ष रीत्या म्हणजे शरीराच्या इतर भागांवर प्रथम परिणाम करून नंतर मेंदूवर परिणाम करतात. मस्तिष्कशोथ अनेक कारणांमुळे उद्भवू शकतो. सूक्ष्मजंतूच्या आकारावर आधारित असे या कारणांचे वर्गीकरण पुढे दिले आहे.

(१) व्हायरसजन्य : (अ) संधिपाद प्राण्यांपैकी डास व गोचिड या रोगवाहकांमुळे होणारा मस्तिष्कशोथ; (आ) अलर्क रोग (लांडगा, मांजर, कुत्रा इ. प्राण्यांना होणारा रोग); (इ) नागीण (तंत्रिका मार्गावरील त्वचेमध्ये लहान लहान फोड येणे. दोन बरगड्यांमधील अंतरापर्शुक तंत्रिकेच्या मार्गावर बहुधा आढळणारा रोग); (ई) बालपक्षाघात; (ए) शुकरोग.

(२) व्हायरसजन्य गृहीत : (अ) तंद्रोत्पादक मस्तिष्कशोथ (झोप येणे हे एक लक्षण असलेला); (आ) ज्यांमध्ये कोणताही व्हायरस निश्चित सापडलेला नाही असे इतर काही प्रकार.

(३) ज्ञात व्हायरसामुळे परंतु अप्रत्यक्ष रीत्या होणारा मस्तिष्कशोथ : गालगुंड.

(४) व्हायरसजन्य गृहीत परंतु अप्रत्यक्ष रीत्या होणारा.

(५) रिकेट्सियाजन्य : : (व्हायरसापेक्षा मोठे परंतु इतर सूक्ष्मजंतूंपेक्षा लहान असे गोचिड, उवा इ. संधिपाद प्राण्यांवर आढळणारे सूक्ष्मजीव). (अ) ‘क्यू’ ज्वर (रिकेट्सिया बर्नेटी  नावाच्या रिकेट्सियामुळे होणारा रोग ज्यामध्ये डोकेदुखी, थंडी वाजून येणे व फुफुसशोथ ही लक्षणे असतात ); (आ) प्रलापक सन्निपात ज्वर (९-१५ दिवस टिकणारा मध्यम तीव्र स्फोटक ज्वर).

(६) सूक्ष्मजंतुजन्य : (अ) दंडाणुज आमांश, (आ) विषमज्वर, (इ) पटकी, (ई) महामारी (प्लेग), (ए) डांग्या खोकला.

(७) सर्पिल सूक्ष्मजंतू (स्पायरोकीटा ) : (अ) उपदंश, (आ) मूषकदंश ज्वर.

(८) प्रोटोझोआ (आदिजीव). (अ) हिवताप, (आ) निद्रारोग (आफ्रिकन व अमेरिकन).

(९) हेल्मिंथ कृमी : (अ) गोलकृमी, (आ) अंकुशकृमी, (इ) हत्तीरोग, (ई) ऊतकक्रामी संसर्ग रोग (ट्रिकिनेला स्पायरॅलिंस  नावाच्या सूक्ष्मजंतूंनी दूषित झालेले डुकराचे मांस खाल्ल्यामुळे होणारा रोग).

मस्तिष्कशोथाची वरील अनेक कारणे असल्यामुळे प्रादुर्भावही अनेक प्रकारांनी होण्याची शक्यता असते. काही वेळा कोणतेही कारण नसलेला मस्तिष्कशोथही आढळतो. अशा प्रकारचा शोथ अजूनही सापडलेल्या न सापडलेल्या व्हायरसामुळे होत असण्याची शक्यता आहे.

बहुतेक सर्व प्रकारच्या मस्तिष्कशोथामध्ये ज्वर, झापड, निद्रा, बेशुद्धी, कंप, मान व पाठ ताठ होणे ही लक्षणे आढळतात. कटि-सूचिवेधद्वारे मस्तिष्क-मेरुद्रवाची तपासणी तसेच कारणीभूत असलेल्या ज्ञात व्हायरस, सूक्ष्मजंतू, रिकेट्सिया आदींच्या शोधाकरिता प्रयोगशाळेतील विशिष्ट तपासण्या उपयुक्त असतात. साथीमुळे होणारा रोग आढळल्यास प्रतिबंधक उपाय ताबडतोब अंमलात आणता येतात. निश्चित कारण सापडल्यास योग्य उपचार करतात. शुकरोगावर (पोपटादी पक्ष्यांपासून मानवात होणाऱ्या व्हायरसजन्य तीव्र रोगावर) टेट्रासायक्लीन व क्लोरोमायसेटीन ही प्रतिजैव औषधे उपयुक्त ठरली आहेत. इतर कारणांमुळे होणाऱ्या मस्तिष्कशोथात रुग्णपरिचर्या, योग्य आहार, आरामदायी यांत्रिक उपकरणे इत्यादींचा उपयोग होतो. रोगी बरा झाल्यानंतरही काही अनुप्रभाव टिकून राहण्याची शक्यता असते. एक वर्षाखालील वयाच्या लहान मुलातील मस्तिष्कशोथाचे दुष्परिणाम ५० प्रतिशत रोग्यांमध्ये टिकून राहतात. बौद्धिक वाढ न होणे, झटके, वाचाविकार, अनियंत्रित कंप इत्यादींचा त्यात समावेश होतो.

(उ) परिसरीय तंत्रिकांचे विकार : केंद्रीय तंत्रिका तंत्राबाहेर सर्व तंत्रिकांना परिसरीय तंत्रिका म्हणतात.

(१) तंत्रिकाशोथ : (न्यूरिटिस). कोणत्याही कारणाने तंत्रिकेला दाहयुक्त सूज आल्यास तंत्रिकाशोथ झाला असे म्हणतात. बहुधा सूक्ष्मजंतूंचे संक्रामण हे कारण नसलेल्या या विकारास नुसते तंत्रिका विकार (न्यूरोपॅथी) संबोधणे अधिक योग्य आहे. येथे हीच संज्ञा वापरलेली आहे. तंत्रिका विकारांचे एकतंत्रिका विकार (मोनोन्यूरोपॅथी) आणि बहुतंत्रिका विकार असे दोन प्रकार आढळतात.

(क) एकतंत्रिका विकार : एकाच तंत्रिकेला होणाऱ्या या विकाराचे सर्वसाधारण कारण आघात असते. अरीय तंत्रिका (भुज तंत्रिका जालिकेची प्रबाहूतील म्हणजे बाहूच्या पुढच्या भागातील दोन हाडांपैकी बाहेरच्या हाडाकडील भागाच्या स्नायू, त्वचा आदींना पुरवठा करणारी तंत्रिका शाखा), प्रबाहु-अंतरास्थी तंत्रिका (भुज तंत्रिका जालिकेची प्रबाहूतील दोन हाडांपैकी आतल्या हाडाशी संबंधित स्नायू, त्वचा आदींना पुरवठा करणारी शाखा) व बाह्य जंघास्थीच्या वरच्या टोकाजवळील तंत्रिका या तंत्रिकांना हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. अध:स्थ प्रेरक तंत्रिका अंशाघात (त्या तंत्रिकेने पुरवठा केलेल्या स्नायूंचा अपूर्ण पक्षाघात) व संवेदनानाश ही लक्षणे दिसतात. हा विकार चार ते सहा आठवड्यांत पूर्ण बरा होतो.

काही तंत्रिका उदा., मध्यतंत्रिका (भुज तंत्रिका जालिकेची एक शाखा) शरीररचनेमुळेच दाबल्या जाण्याची शक्यता असते. ही तंत्रिका मनगटावरील तंतुमय ऊतक व हाडे मिळून बनलेल्या छोट्या बोगद्यातून जाताना दाबली जाण्याची शक्यता असते. मध्यमवयीन स्त्रियांमध्ये असा विकार आढळतो. कधीकधी गर्भारपण, श्लेष्मशोफ (अवटू ग्रंथिस्राव विकारामुळे येणारी विशिष्ट प्रकारची सूज), विशालांगता (पोष ग्रंथीच्या स्राव विकारामुळे शरीरभागांची अवास्तव वाढ होणारा विकार) इत्यादींमध्ये मध्यतंत्रिका विकार उद्भवण्याचा संभव असतो. वेदना, बधिरपणा, मुंग्या येणे, अधूनमधून आंगठा व बोटांत विजेचा झटका बसल्यासारखे जाणवणे वगैरे लक्षणे उद्भवतात. कारण शोधून इलाज करतात (हाडांच्या बोगद्यातून जाताना जखडल्यामुळे या विकारास मदत होते म्हणून त्याला पाशित तंत्रिका विकार म्हणतात).

आघाताशिवाय एकतंत्रिका विकार जंतू अथवा जंतुविषे (उदा., घटसर्प), कुष्ठरोग, अर्बुदे व काही अज्ञात कारणांमुळेही उद्भवतो.

(ख) बहुतंत्रिका विकार : या विकारात एकापेक्षा अधिक तंत्रिकांवर परिणाम घडून येत असल्यामुळे त्याला सार्वदेहिक बहुतंत्रिका विकार म्हणतात. या विकाराच्या कारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे. (१) आनुवंशिकता : उदा., तळपायातील छोट्या स्नायूंचा अपकर्ष, (२) चयापचयात्मक : उदा., मधुमेह; (३) जीवनसत्त्वन्यूनता : बेरीबेरी;  (४) विषजन्य : उदा., शिसे, आर्सेनिक वगैरे; (५) संक्रामणजन्य विषे किंवा अधिहृषता : उदा., कुष्ठरोग, तीव्र संसर्गी बहुतंत्रिका शोथ किंवा लांद्री (जे. बी. ओ. लांद्री या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारा) पक्षाघात; (६) संयोजी ऊतक व रक्तवाहिन्या विकारजन्य : उदा., पर्विल बहुरोहिणी शोथ (मध्यम आणि लहान रोहिण्यांच्या भित्तींचा मर्यादित स्वरूपाचा शोथ, यामध्ये गाठी तयार होतात); (७) कर्करोग : उदा., श्वासनलिकेच्या कर्करोगाचे प्रथम लक्षण बहुतंत्रिका विकार असू शकते.

हातापायात अपसंवेदना (बधिरता, मुंग्या येणे, टाचण्या किंवा सुया टोचल्यासारखे वाटणे) जाणवतात. सुरुवात पायाच्या बोटांपासून होते. विकार हळूहळू वाढत जातो. हातापायाच्या बोटांना अशक्तपणा येऊन जवळच्या भागाकडे वाढत जातो. सर्व प्रकारच्या संवेदनांत (स्पर्श, दाब, उष्णता, वेदना यांत) बिघाड झालेला आढळतो. स्नायू हातांनी दाबून पाहिल्यास दुखतात व हे एक प्रमुख लक्षण असते. याशिवाय निरनिराळ्या कारणांमुळे उद्भवलेल्या बहुतंत्रिका विकारांची विशिष्ट लक्षणेही आढळतात. उदा., मधुमेहजन्य विकारामध्ये प्रेरक, संवेदी आणि स्वायत्त तंत्रिका या तिन्हींवर परिणाम होतात. विकाराचे कारण शोधून त्यावर इलाज करतात.

(२) तंत्रिका शूल : तंत्रिकाजन्य वेदनांना तंत्रिका शूल म्हणतात. तंत्रिका विकारांचे ते एक प्रमुख लक्षण असून तीव्र वेदना आणि आगयुक्त अपसंवेदना ही लक्षणे काही तंत्रिकाच्या आघातजन्य विकारांत प्रामुख्याने आढळतात. अर्धवट तुटलेल्या संवेदी किंवा मिश्र तंत्रिकांमुळे आगयुक्त वेदना आणि त्वचेतील अपपोषणज विकार बरोबरच होतात.

कोणत्याही कारणाने अशक्तपणा आल्यास तंत्रिका शूलाची प्रवृत्ती वाढते. पांडुरोग (अॅनिमिया), क्षय, हिवताप, उपदंश (गरमी) या रोगांत अशी प्रवृत्ती आढळते. तंत्रिकेवर किंवा तंत्रिका मूलावर दाब पडून होणाऱ्या तंत्रिका विकारांमध्ये तंत्रिका शूल होतो. कधीकधी एका ठिकाणच्या विकारामुळे वेदना दुसरीकडेच जाणवतात, याला अन्यत्र वेदना म्हणतात. उदा., किडक्या दंतमूलामुळे चेहऱ्याच्या बाजूस अतितीव्र वेदना होतात.

आ. ३८. डोके आणि चेहऱ्याच्या त्वचेला तंत्रिकेच्या तीन शाखांची क्षेत्रे.

स्थानपरत्वे तंत्रिका शूलाच्या प्रकारांना नावे देतात : जसे त्रिमूल तंत्रिका शूल (पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेचा शूल), नितंबशूल (श्रोणी तंत्रिका शूल), आंतरापर्शुकीय शूल (छातीच्या दोन बरगड्यांमधील जागेतून गेलेल्या आंतरापर्शुक तंत्रिकेचा शूल) वगैरे.

त्रिमूल तंत्रिका शूल इतर प्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. मध्यमवयीन किंवा त्याहून प्रौढ वयात होणाऱ्या या विकारामध्ये त्रिमूल तंत्रिकेच्या शाखा पसरलेल्या भागात टोचल्यासारख्या आगयुक्त वेदनांचे झटके येतात. या शाखांपैकी वरच्या व खालच्या जबड्याकडे जाणाऱ्या अनुक्रमे उत्तर हन्वस्थी शाखा आणि अधोहन्वस्थी शाखा यांचा शूल बहुधा आढळतो. हे झटके उद्भवण्यास चेहऱ्यावरील ठराविक ठिकाणांचा स्पर्श किंवा विशिष्ट स्नायूंची हालचाल पुरेशी असते. या ठिकाणांना आदेश बिंदू म्हणतात. वेदना अतितीव्र असून झटके वारंवार येतात. कधीकधी काही महिने किंवा वर्षे रोग अजिबात जाणवत नाही. मात्र तो पुन्हा उद्भवण्याची नेहमीच शक्यता असते. कार्बामाझेपाइन व डायफिनिल हायडँटोन यांसारखी औषधे वापरतात. ती निरुपयोगी ठरल्यास शस्त्रक्रिया करून तंत्रिका मूल कापून टाकावे लागते.

आ. ३९. बेल पक्षाघात (उजवी बाजू).

(ऊ) मस्तिष्क तंत्रिकांचे काही विकार : पहिल्या किंवा गंधतंत्रिकेच्या विकारांमध्ये अघ्राणता हे प्रमुख लक्षण असते. दुसऱ्या वा दृक्तंत्रिकेच्या विकारामध्ये निरनिराळे दृष्टिदोष उत्पन्न होतात. सर्व मस्तिष्क तंत्रिकांपैकी ही तंत्रिका फार महत्त्वाची आहे. तंत्रिका तंत्राच्या अनेक विकारांशी तिचा संबंध येत असल्यामुळे तिची काळजीपूर्वक तपासणी करणे तंत्रिका तंत्र तज्ञांना अपरिहार्यच असते. तिसरी (नेत्रप्रेरक तंत्रिका), चौथी (कप्पी तंत्रिका) आणि सहावी (अपवर्तनी तंत्रिका) या मस्तिष्क तंत्रिका डोळ्याच्या स्नायूंच्या प्रेरक तंत्रिका असल्यामुळे त्यांच्या विकारांत नेत्रगोलांच्या हालचालींवर परिणाम होतात. पाचव्या (त्रिमूल तंत्रिका) मस्तिष्क तंत्रिकेसंबंधी वर उल्लेख आलेलाच आहे. सातव्या (आनन तंत्रिका) मस्तिष्क तंत्रिकेचा नेहमी आढळणारा विकार म्हणजे आनन पक्षाघात (चेहऱ्याचे स्नायू कार्यान्वित न झाल्यामुळे  शिथिल पडणे) होय. हा पक्षाघात ऊर्ध्व आणि अध:स्थ या दोन्ही प्रेरक तंत्रिका भागांच्या विकारांत आढळतो. ऊर्ध्व भागाच्या विकारात पक्षाघात ऊर्ध्व आणि अध:स्थ या दोन्ही प्रेरक तंत्रिका भागांच्या विकारांत आढळतो. ऊर्ध्व भागाच्या विकारात चेहऱ्याच्या खालच्या भागाच्या स्नायूंचाच पक्षाघात झाल्यामुळे मुखकोण खाली पडतो व प्रत्येक उच्छ्वासाच्या वेळी गाल उंच उचलला जाऊन बाहेर पडणाऱ्या हवेमुळे फुगवटी येते, ही लक्षणे अर्थातच बाजूचा तंत्रिका विकार असेल त्या बाजूसच म्हणजे चेहऱ्याच्या अर्ध्या भागातच दिसतात. या विकारात कपाळास आठ्या पाडावयास सांगितल्यास त्या पूर्ण पडतात. तसेच डोळे मिटावयास सांगितल्यास पूर्ण मिटतात. अध:स्थ प्रेरक तंत्रिका विभागाच्या विकाराला बेल पक्षाघात (चार्ल्स बेल या स्कॉटिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. यामध्ये चेहऱ्याच्या संपूर्ण अर्ध्या भागाचा पक्षाघात होतो. मुखकोण खाली पडून लाळ तेथून सारखी बाहेर पडते. डोळा नीट मिटत नाही. कपाळास आठ्या पाडता येत नाहीत. तोंड घट्ट मिटून फक्त ओठ वर उचलून दात दाखवावयास सांगितल्यास विकृत बाजूचा वरचा ओठ न हलविता आल्यामुळे सगळे दात दिसत नाहीत (आ. ३९). कधीकधी रुची व श्रवणातही बिघाड उत्पन्न होतो. विकृत बाजूकडील नेहमी दिसणारी नासा-ओष्ठ खातिका (वरचा ओठ व नाक यांच्यामधील भागातील छोटी उभी घळ) दिसेनाशी होते.

आ. ४०. अनेक दिवसांच्या बेल पक्षाघातानंतर आलेली कायम स्वरूपाची विद्रुपता.

रोगाची सुरुवात झाल्यापासून पाच दिवसांच्या आत तो बरा होण्याची लक्षणे न दिसल्यास ताबडतोब इलाज करणे जरूर असते. अशा वेळी आनन तंत्रिकेच्या कवटीतील हाडाच्या नालातील भागास सूज आलेली असते व ती कमी करण्याकरिता ॲड्रीनोकॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोनाची (एसीटीएचची) अंत:क्षेपणे उपयुक्त ठर तात. कधीकधी रोग बरा न होता चेहरा कायमचा विद्रूप होतो.

आठव्या मस्तिष्क तंत्रिकेचे (श्रवण तंत्रिकेचे) दोन भाग असतात. कर्णशंबुकाला (अंतर्कर्णातील कॉर्टी इंद्रिय हा श्रवणासंबंधीचा अंतिम भाग असलेल भाग) जाणाऱ्या तंत्रिकाभागाला कर्णशंबुकीय भाग म्हणतात आणि त्याचे कार्य फक्त श्रवणापुरतेच मर्यादित असते. दुसऱ्या भागा श्रोतृकुहरीय भाग म्हणतात. हा भाग अर्धवर्तुळाकृती नलिका, गोणिका व लघुकोश [→ कान] या शरीर संतुलनात भाग घेणाऱ्या इंद्रियांना पुरवठा करतो. या दोन वेगवेगळी कार्ये असणाऱ्या तंत्रिकेचा उल्लेख ‘श्रोतृ-कुहरीय-कर्णशंबुकीय तंत्रिका’ असाही करतात. अर्थातच श्रवण आणि शरीर संतुलन यांचे बिघाड या तंत्रिकेच्या विकारात आढळतात. बहिरेपणा, कर्णक्ष्वेड (श्रवण तंत्रातील विकारांमुळे कानात होणारे निरनिराळे आवाज), घेरी किंवा भोवळ, नेत्रदोल (इतरांच्या लक्षात येण्याजोगी नेत्रगोलांची लयबद्ध आंदोलने) इ. लक्षणे या तंत्रिकेचा विकार दर्शवितात.

मेन्येअर (पी. मेन्येअर या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारा) लक्षणसमृह हा विकार अंतर्कर्णातील अंतिम संवेदी भागांच्या अपकर्षामुळे होतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये आढळणारा हा रोग सु. १/३ रोग्यांमध्ये वयाच्या साठीच्या सुमारास आढळतो. अनेक वर्षे पीडा देणारा हा रोग पूर्ण बहिरेपणा येताच कमी होतो.

आ. ४१. (अ) डाव्या उरोजत्रुक कणमूलिका स्नायूचा पक्षाघात; (आ) विकार नसताना दिसणारा तोच स्नायू.

नवव्या (जिव्हा-ग्रसनी) मस्तिष्क तंत्रिकेला पाचव्या (त्रिमूल) तंत्रिकेप्रमाणेच तीव्र वेदना होणारा शूल उद्भवतो. या वेदना अल्पकाल टिकणाऱ्या झटक्यांच्या स्वरूपात सून गळा, मान, कानाच्या पुढचा गालाचा भाग, खालच्या जबड्याची मागची बाजू येथपर्यंत तीव्र वेदना जाणवतात. गिळताना किंवा जीभ बाहेर काढल्यास झटके येतात. बाह्यकर्णाच्या स्पर्शसंवेदना अतितीव्र होतात. शस्त्रक्रिया करून मानेतील तंत्रिकेच्या काही भागाचा नाश करतात, याला तंत्रिका अपदारण म्हणतात.

आ. ४२. जिभेच्या उजव्या भागाचा पक्षाघात (जीभ बाहेर काढताच ती उजवीकडेच वळते).

दहाव्या (प्राणेशा) मस्तिष्क तंत्रिकेच्या विकारात प्रेरक व संवेदी दोन्ही प्रकारचे बिघाड आढळतात. मृदूतालू पक्षाघात, ग्रसनी पक्षाघात व स्वरयंत्र पक्षाघात होतात. अकरावी (साहाय्यक) मस्तिष्क तंत्रिका संपूर्ण प्रेरक असल्यामुळे मानेतील उरोजत्रुक कर्णमूलिका स्नायूचा पक्षाघात हे तिच्या विकाराचे लक्षण असते.

बाराव्या (अधोजिव्ह तंत्रिका) मस्तिष्क तंत्रिकेचा विकार जिभेच्या पक्षाघातास व अपकर्षास कारणीभूत होतो. ही तंत्रिका संपूर्ण प्रेरक असल्यामुळे जिभेच्या हालचालीवर परिणाम होतो.

(ए) मस्तिष्क रक्तवाहिन्या विकारजन्य रोग : केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या रोगांमध्ये रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण बरेच असते. पाश्चिमात्य देशांत मृत्यूच्या कारणांमध्ये या रोगाचा क्रमांक तिसरा लागतो. आयुर्मर्यादा जशी वाढत जाईल तसे या रोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणही वाढत जाईल.

या रोगांची थोडी माहिती येथे दिली आहे. ती समजण्याकरिता मेंदूच्या रक्तपुरवठ्याविषयी ढोबळ माहिती असणे आवश्यक आहे.

मेंदूला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या एकूण चार प्रमुख रोहिण्या आहेत : (१) उजवी आंतरिक ग्रीवा रोहिणी, (२) डावी आंतरिक ग्रीवा रोहिणी, (३) उजवी कशेरुक रोहिणी व (४) डावी कशेरुक रोहिणी. मेंदूच्या तळभागाशी या सर्व रोहिण्यांच्या शाखा एकमेकींस जुळून जे रोहिणी वलय बनते त्याला विलिस रोहिणी वलय (टॉमस विलिस या इंग्रज शरीरविज्ञांच्या नावावरून) म्हणतात. या रचनेमुळे कोणतीही एक रोहिणी काही कारणामुळे पुरवठा करू शकली नाही, तरी इतर रोहिण्यांतील रक्त ती पुरवठा करीत असलेल्या भागापर्यंत पोहोचू शकते.

मेंदूच्या तळभागाशी असलेल्या या रक्तवाहिनी मीलनाशिवाय मेंदूच्या वरच्या भागामध्येही तीन प्रमुख रोहिणीशाखांचे मीलन झालेले असते. कोणतीही मस्तिष्क रोहिणी प्रत्यक्ष मेंदूच्या गाभ्यात शिरेपर्यंत अंत्यरोहिणी बनतच नाही. एकदा गाभ्यात शिरल्यानंतर मात्र एकाही शाखेचे दुसरीशी मीलन होत नाही म्हणजेच अगदी शेवटच्या शाखा अंत्यरोहिण्याच असतात.

आ. ४३. विलिस रोहिणी वलय : (१) डावी कशेरुक रोहिणी, (२ ) तल रोहिणी, (३) डावी (तल रोहिणी शाखा) पश्च मस्तिष्क रोहिणी, (४) डावी पश्च संयोजी रोहिणी, (५) डावी आंतरिक ग्रीवा रोहिणी, (६) डावी अग्र मस्तिष्क रोहिणी (डाव्या आंतरिक ग्रीवा रोहिणीची शाखा), (७) अग्र संयोजी रोहिणी, (८) उजवी अग्र मस्तिष्क रोहिणी ( उजव्या आंतरिक ग्रीवा रोहिणीची शाखा), (९) उजवी आंतरिक ग्रीवा रोहिणी, (१०) उजवी संयोजी रोहिणी, (११) उजवी पश्च मस्तिष्क रोहिणी, (१२) उजवी कशेरुक रोहिणी.

मेंदूतील रक्तप्रवाहावर आणि त्यामुळे होणाऱ्या ऑक्सिजनाच्या पुरवठ्यावर स्वयंनियंत्रणाचा गुणधर्म असणे, हे मेंदूचे खास वैशिष्ट्य आहे. सार्वदेहिक रक्तदाबातील चढउतार या पुरवठ्यावर परिणाम करू शकत नाही. मेंदूतील सृक्ष्मरोहिण्यांच्या भित्तींवर त्यांमधील रक्तदाबामुळे परिणाम होऊ शकतात. तसेच रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड व इतर जैव रसायनांचाही परिणाम होतो. मेंदूच्या १०० ग्रॅम भागातून दर मिनिटास ५० ते ६० मिलि. रक्त वाहत असते. स्वयंनियंत्रणाने ही पातळी नेहमी एकसारखी ठेवली जाते. या स्वयंनियंत्रणाच्या गुणधर्मामुळे मेंदूच्या कोणत्याही भागात स्थानिक अरक्तता उत्पन्न झाल्यास जवळच्या रोहिण्यांचे विस्फारण होऊन शक्य तेवढे रक्त पुरविले जाते.

मस्तिष्क रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळे उद्भवणाऱ्या काही रोगांची माहिती खाली दिली आहे.

मस्तिष्क रोहिणी विलेपी विकार : या विकारामध्ये रोहिणीभित्तीवर परिणाम होऊन त्या कठीण बनतात. रोहिणीभित्तीच्या आतील पृष्ठभागाचे बदल तिच्या  अवकाशिकेवर (पोकळीवर) परिणाम करून रक्तपुरवठ्यात व्यत्यय उत्पन्न होतो. अशा रोहिण्या मेंदूच्या ज्या भागांना, विशेषेकरून करड्या भागांना, रक्तपुरवठा करतात त्याला रक्त न मिळाल्यामुळे अपपुष्टी होते. पन्नाशीनंतर व वृद्धावस्थेत हा रोग स्त्री व पुरुषांत सारख्याच प्रमाणात आढळतो. मेंदूच्या ज्या भागाचा अपकर्ष झाला असेल, त्याच्या कार्यावर रोगलक्षणे अवलंबून असतात. पक्षाघात, वाग्विकृती (शब्दांचा योग्य तो क्रम लावून बोलण्याची असमर्थता), बौद्धिक अकार्यक्षमता, मनोभ्रंश, भावना अस्थैर्य, विस्मरण इ. लक्षणे आढळतात. अपकर्ष उत्पादक रोहिणी विकार-जन्य रोग हळूहळू वाढत जाणारा असतो. रोग्याचा रक्तदाब कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते व म्हणून रक्तदाब कमी करणारी औषधे काळजीपूर्वकच वापरावी लागतात. इतर कारणांमुळे उद्भवणारा मनोभ्रंश तसेच मस्तिष्क अर्बुद यांपासून निदानात्मक परीक्षा करणे जरूर असते. विशिष्ट औषधयोजना उपलब्ध नाही. अचूक निर्णय घ्याव्या लागणाऱ्या सर्व व्यवहारांपासून लांब राहण्याकरिता अशा रोग्यांनी निवृत्त होणे चांगले.

मस्तिष्क रोहिणी अंतर्क्लथन : लहान मुलामध्ये तीव्र ज्वर, तरुणामध्ये उपदंश आणि वयस्कर व्यक्तीमध्ये रोहिणीभित्तीतील बदल या कारणांमुळे मेंदूतील रोहिणीमधील अंतर्क्लथनामुळे (रोहिणीतच रक्ताची गुठळी तयार होण्यामुळे) या रोगात रक्तप्रवाहात अडथळा येतो. अर्धांगवात (पक्षाघात), अर्धबधिरता, अर्धदृष्टिता (एका किंवा दोन्ही डोळ्यांच्या दृष्टिक्षेत्राच्या अर्ध्या भागातील वस्तू न दिसणे) ही लक्षणे जर मध्य मस्तिष्क रोहिणीचा विकार असेल तरच आढळतात. डाव्या बाजूच्या रोहिणीचा विकार असल्यास उजव्या शरीरभागात ही लक्षणे आढळतात. सर्वसाधारणपणे ज्या रोहिणीत अंतर्क्लथन होते, ती पुरवठा करणाऱ्या भागाच्या कार्यावर लक्षणे अवलंबून असतात. आंतरिक ग्रीवा रोहिणी किंवा कशेरुक आणि तल रोहिण्यांमध्येही हा विकार होण्याचा संभव असतो. ज्या मेंदूच्या भागास रक्तपुरवठा होत नाही, त्यामध्ये अभिकोथ (रक्त न मिळाल्यामुळे होणारा ऊतक मृत्यू) होतो, रोगाची सुरुवात बेशुद्धीसारख्या गंभीर लक्षणांनी झाली, तरी तो एक-दोन दिवसांत बरा होत असल्याची लक्षणे दिसतात; मात्र तो संपूर्ण बरा न होता काही दोष उरतातच. अंतर्क्लथन वारंवार होण्याचा धोका असतो म्हणून क्लथनविरोधी औषधे सुरू करतात.

मस्तिष्क अंतर्कीलन : रोहिणीच्या अवकाशिकेमध्ये क्लथित रक्ताची गुठळी (अंतर्कील) अकस्मात अडकल्यामुळे हा विकार होतो [→अंतर्कीलन]. रोहिणी अविकृत असूनही इतर भागातून आलेल्या अंतर्किलामुळे हा विकार होऊ शकतो. हृदयाच्या स्नायूंचे विकार, झडपांचे  विकार यांमुळे असे अंतर्कील रुधिराभिसरणात मिसळून मेंदूतील रोहिणीत अडकतात. या रोगाची सुरुवात नेहमी अचानक व एकाएकी होते. व तदनंतरची लक्षणे ज्या रोहिणीत अंतर्कील अडकेल तिच्या पुरवठ्याच्या भागावर अवलंबून असतात. रक्ताच्या गुठळीऐवजी हवा किंवा वसाही अंतर्कीलनास कारणीभूत होऊ शकतात. हा विकार सहसा कारणीभूत होत नाही. अंतर्कील कोठून येतात याचा शोध तेथे पुन्हा रक्तक्लथन होऊ नये म्हणून इलाज सुरू करतात.

अंत:मस्तिष्क रक्तस्राव : ज्या व्यक्तीचा रक्तदाब वाढलेला असून रोहिणी विलेपी विकारही असतो, त्यांना होणाऱ्या मस्तिष्काघात या  विकाराचे प्रमुख कारण अंत:मस्तिष्क रक्तस्राव हेच असते. शारीरिक अथवा मानसिक श्रमामुळे अचानक वाढणाऱ्या रक्तदाबामुळे रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होण्याचा धोका असतो. रोहिणीवरील छोटासा विस्फारही फुटण्याचा संभव असतो. रोगाची सुरुवात अचानक एकाएकी होते. जी रक्तवाहिनी फुटली असेल तिच्या पुरवठाभागावर लक्षणे अवलंबून असतात. मस्तिष्क सेतूतील रक्तस्राव बहुधा प्राणघातक ठरतो. त्यामध्ये शारीरिक तापमान ४० से.पेक्षा अधिक असून डोळ्यातील बाहुल्यांचे अतिशय आकुंचन झालेले आढळते. बेशुद्धी, विरुद्ध बाजूचा अर्धांगवात, अर्धदृष्टिता, विरुद्ध बाजूच्या शरीरभागातील संवेदना बिघाड इ. लक्षणे आढळतात. बेशुद्धी ४८ तासांपेक्षा अधिक काळ टिकून राहिल्यास रोगी बरा न होता मरण पावण्याची शक्यता असते. तो बचावलाच तर अर्धांगवातामुळे बरेच आणि कायम टिकणारे दोष शिल्लक राहतात. कोणत्याही कारणामुळे मस्तिष्काघात झाल्यास रोग्यास रुग्णालयात ताबडतोब हलविणे जरूर असते. कारण बेशुद्धीतील रुग्णपरिचर्या महत्त्वाची असते.

(ऐ) वसावरण नाशजन्य विकार : काही रक्तवाहिनीजन्य विकार, संक्रामक रोग, पोषणज न्यूनताजन्य विकार इ. रोगांत अनेक वेळा तंत्रिका तंतूवरील वसावरण नाश पावते. या रोगांचा या ठिकाणी समावेश केलेला नसून फक्त ज्या रोगांत वसावरण नाश हे प्रमुख अंग असून त्यांचे कारण अजून समजलेले नाही अशाच रोगांचा समावेश केला आहे. पुढे दोनच रोगांची माहिती दिली आहे.

पर्यास तंत्वीभवन : बहुविध तंत्वीभवन हे दुसरे नाव असलेल्या या चिरकारी रोगात मेंदू व मेरुरज्जूमधील तंतूंवरील वसावरण जागजागी नाश पावते. त्या त्या ठिकाणी अक्षदंड वेडेवाकडे फुगतात, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात प्रामुख्याने आढळणारा हा रोग विशी ते पन्नाशीच्या वयातील व्यक्तींत आढळतो. केंद्रीय तंत्रिका तंत्रात विकार जागजागी विखुरलेला असल्यामुळे या जागांच्या पुरवठ्यावर अवलंबून अशी निरनिराळी लक्षणे उद्भवतात. रोगाची सुरुवात बहुधा दृष्टिदोष व नेत्रगोलांच्या हालचालींमुळे होणाऱ्या वेदनांनी होते. हातापायांचा अशक्तपणा व जडत्व जाणवते. दुहेरी दृष्टी (एकच वस्तू दुहेरी दिसणे), भोवळ येणे व उलट्या ही लक्षणे होतात. रोगाच्या पहिल्या झटक्यानंतर दुसरा झटका कदाचित काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतरही येण्याची शक्यता असते. रोगाच्या सुरुवातीनंतर रोग चिरकारी असल्यामुळे रोगी वीस वर्षांपर्यंतही जगण्याची शक्यता असते. या रोगावर कोणताही विशिष्ट इलाज नसून एसीटीएचची अंत:क्षेपणे, भौतिकी चिकित्सा, व्यवसायप्रधान चिकित्सा इ. उपाय रोग्यास मदत करतात.

तीव्र पर्याप्त मस्तिष्क-मेरुरज्जू शोथ : १९२० च्या सुमारास देवी-प्रतिबंधक लस टोचल्यानंतर उद्भवणाऱ्या या तीव्र रोगाकडे प्रथम लक्ष गेले. लस टोचल्यानंतर दहाव्या ते बाराव्या दिवशी डोकेदुखी, उलट्या, ताप आणि मनोभ्रांती ही लक्षणे आढळतात. मेंदू व मेरुरज्जूतील नीलांजवळील तंत्रिका तंतूंमध्ये वसावरणाचा नाश प्रामुख्याने आढळतो. गोवरानंतर चौथ्या ते सहाव्या दिवशी, कांजिण्यानंतर पाचव्या ते सातव्या दिवशी व प्रत्यक्ष देवी रोगातही हा रोग उद्भवतो. हातापायांना झटके येणे व बेशुद्धी येण्याचा संभव असतो. १० ते ३०% रोगी दगावतात. एसीटीएचची (८०-१२० एकके) अंत:क्षेपणे देतात. रोगी तोंडाने औषध घेत असल्यास प्रेडनिसोन सुरुवातीस मोठ्या मात्रेत देऊन नंतर काही आठवडे ठराविक मात्रेत देतात.

(ओ) त्रुटिजन्य विकार : उपासमार आणि अपपोषण यांमुळे तंत्रिका तंत्रावर दुष्परिणाम होऊन काही विकार उद्भवतात. हे दुष्परिणाम तंत्रिका तंत्रातील परिसरीय तंत्रिका कोशिकांमध्ये अधिक आढळतात. यांशिवाय कोशिकांवर प्रत्यक्ष परिणाम होण्यापूर्वी त्यांच्या प्रवर्धांवर ते अगोदर होतात. प्रवर्ध जेवढा लांब असेल तेवढी त्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. जीवनसत्त्वांखेरीज खनिजांची विशेषेकरून कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम व लोह यांची त्रुटीही कारणीभूत असू शकते. त्याप्रमाणेच ग्लुकोज त्रुटीही दुष्परिणाम करू शकते. आहारजन्य त्रुटी आणि तंत्रिका तंत्रावर दुष्परिणाम करणारी काही विषे यांचा परस्परांशी संबंध असावा. उदा., अन्नातून सायनाइडाचे जादा सेवन झाल्यास किंवा धूम्रपानामुळे होणारे दृष्टिमांद्य (ज्यास तंबाखूजन्य दृष्टिमांद्य म्हणतात) याच प्रकारात मोडते. ब१२ जीवनसत्त्व तंत्रिका विकार या त्रुटिजन्य विकारामधील काही लक्षणे सायनाइड विषबाधेपासून होण्याचीही शक्यता आहे. काही औषधेही त्रुटीच्या उत्पादनास कारणीभूत होतात. उदा., आयसोनियाझीड हे क्षयरोगात उपयोगी असणारे औषधी ब जीवनसत्त्वाची (पिरिडॉक्सिनाची) त्रुटी उत्पन्न करू शकते, तर झटके कमी करण्याकरिता देण्यात येणारी झटकाविरोधी औषधे ब१२ जीवनसत्त्व आणि फॉलेट (फॉलिक अम्लाच्या फॉलेट या संयुगामुळे) त्रुटी उत्पन्न करतात.

जीवनसत्त्वांच्या ब गटापैकी पुष्कळ पदार्थांचा व तंत्रिका तंत्राचा संबंध अनेक प्रयोगान्ती सिद्ध झाला आहे. कार्बोहायड्रेट चयापचयात या गटापैकी ब जीवनसत्त्व (ॲन्युरीन किंवा थायामीन) महत्त्वाचे कार्य करते. या जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे रक्तात पायरूव्हेट साचून ⇨ बेरीबेरी  व अन्य तंत्रिका तंत्र विकार उद्भवतात. निकोटिनिक अम्लाची त्रुटी ⇨ वल्कचर्म (पेलाग्रा) या विकारास कारणीभूत होते. ब१२ जीवनसत्त्वाच्या (सायानोकोबालामिनाच्या) त्रुटीमुळे मध्यम जोराचा मिश्र मेरुरज्जू अपकर्ष नावाचा रोग उद्भवतो. या रोगास अलिकडे ब१२ जीवनसत्त्व तंत्रिका विकार असेच म्हणतात.

१२ जीवनसत्त्व तंत्रिका विकार या रोगात परिसरीय तंत्रिका आणि मेरुरज्जूतील पश्च आणि पार्श्व स्तंभांचा अपकर्ष होतो. मेरुरज्जूच्या ग्रैव व छातीच्या भागात तो विशेषेकरून आढळतो. रोगाची सुरुवात पायाच्या बोटांना मुंग्या येणे, हात व पाय थंड व बधिर वाटणे इ. लक्षणांनी होते. गतिविभ्रम (स्नायूच्या  क्रियेतील सहकार्याचा नाश होणे) होतो. पाय जवळ ठेवून डोळे मिटून उभे राहण्यास सांगितल्यास तोल जातो. यालाच रोमबेर्ख खूण (एम. एच. रोमबेर्ख या जर्मन वैद्यांच्या नावावरून) म्हणतात. या विकाराच्या बरोबरच बहुधा ⇨ टॉमस अॅडिसन  यांचा मारक पांडुरोगही [→ अॅडिसन रोग] असतो. रक्त तपासणीत विशिष्ट फरक आढळतात. रक्तरसातील सायानोकोबालामिनाची पातळी नेहमीपेक्षा बरीच कमी झालेली आढळते. अलीकडील त्वरित निदान पद्धती व प्रभावी उपचारांमुळे १९४० सालापूर्वी नेहमी आढळणाऱ्या या रोगाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. पांडुरोगावर योग्य व पूर्ण उपचार केल्यास हा रोग आढळणार नाही. हायड्रॉक्सिकोबालामिनाची मोठी मात्रा देणे हा उत्तम उपाय आहे. दुर्लक्षित रोगी सर्वसाधारणपणे दोन वर्षे जगतो [→ त्रुटिजन्य रोग; जीवनसत्त्व ब१२; जीवनसत्त्वे].

(औ) अर्बुदे : तंत्रिका तंत्राच्या बाबतीत कर्परांतर्गत (कवटीतील) व मेरुरज्जूतील अर्बुदे महत्त्वाची आहेत.

आ. ४४. प्रमस्तिष्क गोलार्धातील तंत्रिकाबंधार्बुद : (१) रक्तस्राव, (२) मूळ जागेवरून सरकलेली मस्तिष्क विवरे.

कर्परांतर्गत अर्बुदे : मरणोत्तर तपासणीमध्ये जवळजवळ दोन टक्के अर्बुदे सापडतात. ती कवटीची हाडे, मस्तिष्कावरणे किंवा तंत्रिका ऊतकाच्या (आधात्री ऊतकासहित) कोणत्याही भागापासून तयार होऊ शकतात. शरीरात इतर ठिकाणी उद्भवलेल्या अर्बुदांचे कर्कक्षेप कवटीमध्ये उद्भवू शकतात. कवटीतील एकूण अर्बुदांपैकी ४५ टक्के अर्बुदे तंत्रिका श्लेष्म कोशिकांच्या कर्करोगापासून उद्भवलेली असतात, त्यांना तंत्रिकाबंधार्बुदे म्हणतात व ती मारक असतात. सर्वसाधारणपणे डोकेदुखी, मळमळणे व उलट्या, दुहेरी दृष्टी, बेशुद्धी, मानसिक विकृती आणि झटके येणे यांपैकी काही लक्षणे आढळतात.

तंत्रिकाबंधार्बुदामध्ये किंवा दुय्यम कर्कक्षेपजन्य अर्बुदामध्ये लक्षणांची सुरुवात हळूहळू न होता स्फोटक व तीव्र स्वरूपात होते. पूर्वी डोकेदुखीचा त्रास नसलेल्या व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी, मानसिक विकृती, झटके इ. लक्षणे आढळल्यास कर्परांतर्गत अर्बुदाची शक्यता असल्यामुळे वेळीच तपासणी करणे जरूर असते. निदानाकरिता क्ष-किरण चिकित्सा, विद्युत् मस्तिष्कालेख, प्रतिध्वनि-मस्तिष्कालेख, किरणोत्सर्गी समस्थानिकाद्वारे केलेली तपासणी (किरणोत्सर्गी मस्तिष्क क्रमवीक्षण), कटि-सूचिवेध करून मिळविलेल्या मस्तिष्क-मेरुद्रवाची तपासणी, वात-मस्तिष्क तपा-सणी इ. तपासण्या करतात. कर्परांतर्गत अर्बुदाचे दुष्परिणाम कवटीतील नेहमीचा दाब वाढल्यामुळे उद्भवतात; म्हणून तत्पूर्वी निदान होणे अगत्याचे असते. शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून अर्बुद काढून टाकतात.

मेरुरज्जूतील अर्बुदे : कवटीतील अर्बुदांपेक्षा मेरुरज्जू अर्बुदे अधिक प्रमाणात आढळतात. ती दृढावरणाच्या बाहेर, दृढावरण आणि मेरुरज्जू यांच्या दरम्यान किंवा मेरुरज्जूच्या गाभ्यात (दृढावरणबाह्य, दृढावरणांतर्गत आणि मेरुरज्जु-अंतर्गत) असू शकतात. कवटीतील अर्बुदांपैकी बहुसंख्य अर्बुदे मारक स्वरूपाची असून तंत्रिका ऊतकांशी संबंधित असतात. याउलट मेरुरज्जू अर्बुदे बहुसंख्य दृढावरणासंबंधी असून साधी असतात. लक्षणांमध्ये तंत्रिका मूलाचा शूल हे प्रमुख लक्षण असते. दृढावरणबाह्य अर्बुदामुळे अनेक वेळा मेरुरज्जू दाबला जाऊन अर्धांगवायू, अतिसंवेदनशीलता (स्पर्श, वेदना इ. संवेदनांची प्रमाणापेक्षा जादा जाणीव होणे), काही संवेदनांचा नाश होणे इ. लक्षणे उद्भवतात. या लक्षणसमूहांना ज्या वेळी ती मेरुरज्जूचा अर्धा भाग कार्यहीन झाल्यामुळे उद्भवतात, त्या वेळी ब्रून-सेकार लक्षणसमूह (सी. ई. ब्रून-सेकार या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. निदानाकरिता साधी किंवा अपारदर्शी पदार्थाची (उदा., मायोडिल) अंत:क्षेपणे. दिल्यानंतर करण्यात येणारी क्ष-किरण तपासणी उपयुक्त असते. दृढावरणबाह्य अर्बुदे शस्त्रक्रियेने काढून टाकतात. मेरुरज्जू-अंतर्गत अर्बुदांवर प्रारण चिकित्सा करतात.

आ. ४५. तंत्रिका तंतु-अर्बुदता.

तंत्रिका तंतु-अर्बुदता : या रोगाला फोन रेकलिंग हाउझेन रोग (एफ्. डी. फोन रेकलिंग हाउझेन या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून) असेही म्हणतात. या आनुवंशिक रोगामध्ये शरीरावर जागजागी छोटी मोठी अर्बुदे होतात. परिसरीय तंत्रिकांच्या मस्तिष्क तंत्रिकांपैकी विशेषेकरून पाचव्या किंवा आठव्या तंत्रिकेच्या श्वान आवरणातील कोशिकांपासून ही अर्बुदे तयार होतात. ती स्वतंत्र म्हणजे एकमेकांपासून अलग, हाताने सहज हलणारी व परिसरीय तंत्रिकांच्या मार्गावर वाढलेली असतात. दाबून पाहिल्यास दुखतात. रोग झाल्यानंतर आयुष्यभर नवीन अर्बुदे तयार होत असतात. कधीकधी कवटीमध्ये किंवा कशेरुदंडनालाच्या पोकळीतही असे अर्बुद तयार होते. अशा वेळी मस्तिष्क-मेरुद्रव तपासल्यास त्यामधील प्रथिनाचे प्रमाण अतिशय वाढलेले आढळते. या रोगावर कोणताही विशिष्ट इलाज नाही. अर्बुदामुळे काही उपद्रव त्रासदायक ठरल्यास आणि शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून ते काढून टाकतात.

प्रतिबंधात्मक उपाय : तंत्रिका तंत्र विकारांच्या प्रतिबंधात्मक उपायांसंबंधी विचार करताना संक्रामक आणि त्रुटिजन्य  विकारांचा प्रामुख्याने विचार केला जातो. अलीकडे काही आनुवंशिक जीवसायनिक विकारांमुळे होणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधाकरिता आहारविषयक व इतर इलाज योजता येतात. अकाल प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात अर्भकामध्ये कधीकधी अधोमस्तिष्क गुच्छिका (थॅलॅमस आणि रेखित पिंड) व श्रवण केंद्रक या मेंदूतील भागांमध्ये पित्तातील रंजकद्रव्ये पसरून तेथील तंत्रिका कोशिकांचा अपकर्ष होतो. या विकाराला केंद्रक-कामला (कावीळ) म्हणतात. या अर्भकांत प्रथम रक्तविलयन (रक्तातील लाल कोशिकांचा नाश) होते. सुरुवातीसच हे लक्षण ओळखले गेले, तर अर्भकाचे संपूर्ण रक्त काढून घेऊन नवे रक्ताधान करता येते, याला बदली रक्ताधान म्हणतात व हा इलाज वेळीच केल्यास केंद्रक-कामला रोगास प्रतिबंध घालता येतो. अपस्मार हा राग पुष्कळ वेळा प्रसूतीच्या वेळी झालेल्या आघातामुळे उद्भवण्याचा संभव असतो. प्रसूतीमध्ये असा आघात काळजीपूर्वक टाळल्यास अपस्मारही टाळता येईल.

मुष्टियोद्ध्याच्या डोक्यावर वारंवार आघात होऊन त्याच्यामध्ये काही कालावधीनंतर स्मरणशक्तीचा ऱ्हास, बुद्धिमांद्य, अर्धवट बेशुद्धी इ. लक्षणे उद्भवतात. या लक्षणसमूहांना मुष्टिप्रहारजन्य नशा म्हणतात. योग्य वेळी निवृत्त झाल्यास हा विकार टाळता येतो.

फिनिल कीटोन्यूरिया (पीकेयू) या नावाच्या चयापचयजन्य उपजत विकारामध्ये बालवयातच मूत्र परीक्षा केल्यास त्यामध्ये फिनिल कीटोने सापडतात. विशिष्ट आहार वेळीच सुरू केल्यास अशा मुलातील गंभीर बुद्धिमांद्य टाळता येते.

मस्तिष्कावरणशोथ आणि मस्तिष्क विद्रधी यांसारखे रोग, मध्यकर्णाचे संक्रामक रोग, कवटीच्या हाडांचा अस्थिभंग, नासाकोटरांचे रोग सूक्ष्मजंतू इ. मूळ रोगापासून उद्भवण्याचा संभव लक्षात ठेवून योग्य ती काळजी घेतल्यास ते उद्भवणार नाहीत. मेनिंगोकॉकस सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या मस्तिष्कावरणशोथासारख्या साथीच्या रोगांमध्ये रोग्यास अलग ठेवणे, संपर्क आलेल्यांना सल्फा औषधे देणे, भरपूर मोकळी हवा उपलब्ध करून देणे इ. उपाय रोगप्रतिबंधक असतात. क्षयरोग, उपदंश इ. मूळ रोगांवर संपूर्ण उपचार केल्यास तंत्रिका तंत्रावर त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळता येतात. बालपक्षाघातासारखा रोग आता वेळीच लस वापरून संपूर्ण प्रतिबंधित करता येतो. देवीप्रतिबंधक लस टोचल्यानंतर कधीकधी होणारा वसावरणनाशजन्य विकार वयाची दोन वर्षे उलटण्यापूर्वीच पहिली लस टोचून घेतल्यास टळतो. मारक पांडुरोगातील जीवनसत्व ब१२ च्या त्रुटीमुळे उद्भवणारे तंत्रिका विकार वेळीच योग्य उपायांनी थोपविता येतात. बहुतंत्रिका विकारास कारणीभूत असणारे विषारी पदार्थ औद्योगिक उपयोगाच्या वेळीच कार काळजीपूर्वक हाताळल्यास हे विकार टाळता येतात.

इतिहास : हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०-३७०), अॅरिटीअस (इ. स. पहिले शतक), गेलेन (इ. स. १३१-२०१) इ. शास्त्रज्ञांचे तंत्रिका तंत्राचे विकार व मनोविकृती यांकडे लक्ष गेले होते. ज्या काळात अपस्मार हा रोग एक दैवी आपत्ती समजला जात होता त्या काळात इतर रोगांप्रमाणे तोही एक रोगच असून त्याचा दैवी आपत्ती वगैरेंशी संबंध नसल्याचे हिपॉक्राटीझ यांनी प्रतिपादिले होते. टॉमस विलिस (१६२१–७५) या इंग्रज शास्त्रज्ञांनी १६६४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या Cerebri Anatome  या ग्रंथात तंत्रिका तंत्राचे संपूर्ण व अचूक वर्णन आढळते. अकराव्या मस्तिष्क तंत्रिकेचे पहिले वर्णन याच ग्रंथात असल्यामुळे काही काळपर्यंत तिला विलिस तंत्रिका असेच म्हणत. फ्रांट्स योझेफ गाल (१७५८-१८२८) या जर्मन शारीरविज्ञांनी मेंदूच्या रचनाविषयक माहितीत भर घातली. योहान कास्पर शपुर्टसहाइम (१७७६-१८३२) या दुसऱ्या जर्मन शास्त्रज्ञांच्या मदतीने मेंदूच्या कार्यविभागणीचा सिद्धांत गाल यांनी १८१०-१९ या काळातच मांडला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास तंत्रिका कोशिकेबददल बरेच वादंग माजले होते. ऑगस्टस व्हॉल्नी वॉलर  (१८१६-७०) या इंग्रज शास्त्रज्ञांनी जिव्हाग्रसनी तंत्रिका आणि अधोजिव्ह तंत्रिका यांचा छेद करण्याचा प्रयोग केला (१८५०). त्यावरून ज्या तंत्रिका कोशिकांचे अक्षदंड त्यांच्या कोशिका-कायापासून अलग होतात त्यांचा अपकर्ष होतो, हा सिद्धांत त्यांनी मांडला. आजही हा सिद्धांत मान्य असून तो ‘वॉलेरियन अपकर्ष’ म्हणूनच ओळखला जातो. तंत्रिका तंत्राच्या सूक्ष्म रचनाविषयक ज्ञानात कामील्लो गॉल्जी (इटालियन शास्त्रज्ञ, १८४३—१९२६) आणि स्पॅनिश शास्त्रज्ञ रीमॉन इ काहाल (१८५२—१९३४) यांनी तंत्रिका तंत्राच्या ऊतक विज्ञानात भर घालणाऱ्या अभिरंजन पद्धती (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास करण्यास सुलभ होण्यासाठी कृत्रिम रीत्या ऊतक रंगविण्याच्या पद्धती) शोधल्या. या दोघांना मिळून १९०६ चे नोबेल पारितोषिक मिळाले. काही तंत्रिका कोशिकांना गॉल्जी कोशिका म्हणतात. तंत्रिका ऊतके अभिरंजन पद्धतीस ‘काहाल-सिव्हर पद्धत’ म्हणतात. जर्मन याकोप याकोप फोन हाइने (१८००—७९) व स्वीडिश शास्त्रज्ञ कार्ल ऑस्कर मेडिन (१८४७—१९२७) यांचे नाव बालपक्षाघात या रोगास देण्यात आले आहे. हाइने यांनी या रोगात उद्भवणाऱ्या विद्रूपतेचे वली प्रथम वर्णन केले, तर मेडिन यांनी हा रोग साथीच्या रोगात मोडतो याकडे लक्ष वेधले. चार्ल्स बेल (१७७४—१८४२) या स्कॉटिश वैद्यांनी १८२१ च्या सुमारास पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेच्या मिश्र कार्याविषयी (प्रेरक आणि संवेदी) प्रथम शोध लावला, तसेच आनन पक्षाघाताचे वर्णन केले. या पक्षाघातास बेल पक्षाघात म्हणून आजही ओळखतात. क्लॉड बर्नार्ड (१८१३—७८) या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांनी क्युरारी हे औषध वापरून तंत्रिका अकार्यक्षम कशा बनतात, हे दाखविले. त्यांनी रोहिण्यांना पुरवठा करणाऱ्या आकुंचक व विस्फारक तंत्रिका प्रथम दाखविल्या. शार्ल एद्वार ब्रून-सेकार (१८१८—९४) या फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिकांनी १८५२—५४ या काळात अनुकंपी तंत्रिकांच्या कार्याबद्दल तसेच मेरुरज्जूतील तंत्रिका मार्गाबद्दल संशोधन करून त्यासंबंधीच्या ज्ञानात महत्त्वाची भर घातली. त्यांनी मेरुरज्जूच्या अर्धछेदानंतर होणाऱ्या पक्षाघाताचे उत्तम वर्णन केले असून त्या विकारास त्यांचे नाव देण्यात आले आहे. झां मार्टिन शार्को (१८२५—९३) या फ्रेंच तंत्रिका तंत्र वैज्ञानिकांनी फ्रान्समधील ला सालपेट्रिरे या ठिकाणी तंत्रिका विकारांकरिता आधुनिक काळातील एक सुप्रसिद्ध खास रुग्णालय प्रथम काढले होते. काही तंत्रिका विकारांशी त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे. उदा., उपदंशजन्य मेरुरज्जू विकारामुळे उद्भवणाऱ्या पक्षाघातास एर्प-शार्को विकार म्हणतात. या विकारास आणखी ज्यांचे नाव जोडले गेले आहे ते जर्मन तंत्रिका तंत्र वैज्ञानिक व्हिल्हेल्म हाइन्रिख एर्प (१८४०—१९२१) हे होत. प्रसूतीच्या वेळी मानेतील ही तंत्रिकांची मुळे दुखावली जाऊन होणारा भुजांतील स्नायूंचा पक्षाघात एर्प पक्षाघात म्हणून ओळखला जातो. इव्हान प्यिट्रोव्ह्यिच पाव्हलॉव्ह (१८४९—१९३६) या १९०४ च्या नोबेल पारितोषिक विजेत्या रशियन शास्त्रज्ञांनी अवलंबी प्रतिक्षेपी क्रियांवर फार महत्त्वाचे संशोधन केले आहे [→ प्रतिक्षेपी क्रिया]. फ्रांट्स निस्ल (१८६०—१९१९) या जर्मन तंत्रिका तंत्र वैज्ञानिकांनी तंत्रिका कोशिकांच्या अपकर्षाविषयी माहिती लिहून ठेवली. तंत्रिका कोशिका-कायामधील सूक्ष्म रंजकधारी कणांना निस्ल पिंड असे म्हणतात. फ्रांस्वा माझँडी (१७८३—१८५५) या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांनी १८२५ मध्ये मस्तिष्क-मेरुद्रवाचे पहिले उत्तम वर्णन केले. चौथ्या मस्तिष्क विवरातील एका रंध्रास आजही माझँडी रंध्र म्हणतात. चार्ल्स स्कॉट शेरिंग्टन (१८५७—१९५२) या १९३२ च्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी तंत्रिका तंत्राविषयीच्या ज्ञानात फार मौलिक भर घातली. दोन अक्षदंडांची टोके जेथे संबंध प्रस्थापित करतात, त्या जागेला किंवा संबंधाला synapse (म्हणजे अनुबंध) हे नाव त्यांनीच दिले. संवेदी ग्राहकांचे वर्गीकरणही त्यांनीच केले. वॉल्टर रूडॉल्फ हेस (१८८१—१९७३) या स्विस शरीरक्रियावैज्ञानिकांनी मध्यमस्तिष्काच्या कार्याचा शोध लावला. अधोथॅलॅमसाचे स्वायत्त तंत्रिका तंत्रावरील नियंत्रण यावरही त्यांनी संशोधन केले. या कार्याबद्दल त्यांना १९४९ चे नोबेल पारितोषिक मिळाले. जोसेफ एर्लांगर (१८७४—१९६५) व हर्बर्ट एस्. गॅसर (१८८८—१९६३) या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनीय विवर्धक उपकरणांचा वैद्यकीय संशोधनात प्रथम उपयोग केला. ऋण किरण दोलनदर्शक [→ इलेक्ट्रॉनीय मापन] व विवर्धक वापरून त्यांनी प्रत्येक तंत्रिका तंतूच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. त्या दोघांना मिळून १९४४ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. जॉन एफ्. एंडर्स (१८९७— ), टॉमस एच्. वेलर (१९१५— ) आणि फेड्रिक रॉबिन्स (१९१६— ) या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी बालपक्षाघाताच्या व्हायरसाची ऊतकसंवर्धनाद्वारे प्रथम वाढ करून दाखवली. त्याबद्दल त्यांना १९५४ चे नोबेल पारितोषिक मिळाले. जॉन सी. एक्लिस (१९०३— ), ॲलन लॉइड हॉजकिन (१९१४— ) आणि अँड्रू एफ्. हक्सली (१९१७— ) या शास्त्रज्ञांना तंत्रिका तंतूमधील तंत्रिका आवेग वहनाच्या संशोधनाबद्दल १९६३ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अशा प्रकारे अनेक शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे तंत्रिका तंत्रिका तंत्राच्या ज्ञानात सतत भर पडत गेली व त्यामधूनच तंत्रिका रसायनशास्त्र या नव्या शाखेचाही उदय झाला आहे.

वरील नामावळीत तंत्रिका तंत्रासंबंधी कार्य केलेल्या सर्वच शास्त्रज्ञांचा व त्यांच्या कार्याचा उल्लेख करणे अशक्य आहे. परंतु तंत्रिका तंत्रावरील शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतींचा पाया रचून त्यामुळे या तंत्राच्या ज्ञानात भर घालणाऱ्या विल्यम मॅकवेन (१८४८—१९२४), व्हिक्टर हॉर्सली (१८५७—१९१६), चार्ल्स बॅलन्स (१८५०—१९३८) आणि हार्व्ही कुशिंग (१८६९—१९३९) या शस्त्रक्रियाविज्ञांचा उल्लेख करणे जरूर आहे.

ढमढेरे, वा. रा.; भालेराव, य. त्र्यं.; सलगर, द. चि.; परांडेकर, आ. शं.

पाळीव पशूंमधील तंत्रिका तंत्राचे विकार : स्थूलमानाने पाळीव पशूंमध्ये तंत्रिका तंत्राची रचना व कार्य मनुष्यमात्रातील तंत्रिका तंत्राप्रमाणेच आहे. मेंदू व त्यापासून निघणाऱ्या १२ मस्तिष्क तंत्रिका व मेरुरज्जू यांचे मिळून असलेले केंद्रीय तंत्रिका तंत्र, तंत्रिका गुच्छिका व तंत्रिकांचे जटिल जाळे यांचे बनलेले अनुकंपी तंत्रिका तंत्र, अपवाही व अभिवाही तंत्रिका या सर्वांची संरचना व कार्य माणसातील या तंत्राच्या कार्याशी तंतोतंत मिळते-जुळते आहे.

निरनिराळ्या पाळीव जनावरांतील मेंदूचे आकारमान अर्थातच लहानमोठे आहे व मेंदूचे वजनही कमीअधिक आहे. काही पाळीव पशूंच्या मेंदूच्या वजनाचे एकंदर शरीराच्या वजनाशी असलेले प्रमाण खाली दिले आहे.

मांजर १ : ९९      डुक्कर १ : ३६९

कुत्रा १ : २३५      घोडा १: ५९३

मेंढी १ : ३१७      गाय-बैल १ : ६८२

शरीराच्या वजनाशी तुलना करता मांजराच्या मेंदूचे वजन सर्वांत अधिक आहे असे दिसून येते. मेंदूच्या वजनाचा बुद्धिमत्तेशी संबंध आहे, असे मानतात. तथापि मांजर हा प्राणी अधिक बुद्धिमान आहे, असे मात्र नव्हे. याचे कारण वजनाव्यतिरिक्त मेंदूतील पिवळ्या आणि पांढऱ्या द्रव्याच्या व प्रमस्तिष्कातील स्तूपाच्या आकाराच्या कोशिकांच्या प्रवर्धांवरही बुद्धिमत्ता अवलंबून असते.

तंत्रिका तंत्राची सुस्थिती शरीरातील इतर तंत्रांच्या (विशेषत: रुधिराभिसरण तंत्र) सुस्थितीवर सापेक्षाने अवलंबून आहे. मेंदूला रक्तावाटे होणारा ऑक्सिजनाचा पुरवठा हृदयाच्या काही विकारांमुळे कमी झाल्यास पक्षाघाताची लक्षणे दिसतात, परंतु प्राय: हा रुधिराभिसरणातील विकार दिसतो म्हणून तंत्रिका तंत्राचे प्रामुख्याने होणारे विकार व दूरान्वयाने होणारे विकार असा भेद अपरिहार्य आहे. पचंमधील तंत्रिका तंत्राचे बहुतेक विकार दुसऱ्या प्रकारात मोडतात.

कंकाल तंत्राशी (हाडांच्या सांगाड्याशी) संबंधित असलेल्या स्नायूंची शक्ती कमी होऊन जनावर पायावर उभे राहण्यास असमर्थ होणे, अंगस्थितीची अप्राकृत अवस्था, अनैसर्गिक हालचाल, जनावराची क्षुब्ध मन:स्थिती, संवेदनशीलतेचा अभाव ही पशूमधील तंत्रिका तंत्राच्या विकारांची सूचक लक्षणे आहेत. पशूंच्या मन:स्थितीची जाणीव त्यावर बारकाईने लक्ष ठेवणारा त्याचा मालकच जाणू शकतो. संवेदनशीलतेबाबत केलेली पशूंची तपासणी वस्तुनिष्ठ असते; माणसाप्रमाणे वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ असू शकत नाही. शिवाय अपवाही तंत्रिका आपले कार्य कार्यक्षमतेने करीत आहेत, असे गृहीत धरूनच ही तपासणी होते.

पशूंच्या तंत्रिका तंत्राच्या विकारांमध्ये आघातजन्य विकार, मस्तिष्क तंत्रिका विकार (पहिली तंत्रिका सोडून), मस्तिष्क रक्तवाहिन्यांचे विकार, कर्परातील अर्बुदे इ. विकार आणि त्यांची लक्षणे थोड्याफार फरकाने माणसातील या विकारांप्रमाणेच आहेत.

मानसिक विकृतीमध्ये उद्दीपनविकृती, एकसारखे चाटणे, बेसुमार खाणे, आवाजातील बदल व झिंगल्यासारखे चालणे ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे मेंदूच्या बाह्यकाच्या उद्दीपनामुळे दिसून येतात.

व्हायरसजन्य व सायनाइड, नायट्राइट, शिसे, सोमल यांच्या विषबाधेमुळे किंवा अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे आचके येणे, स्नायूंचे शीघ्र कंपन, डोके वाटोळे फिरविणे, ओठ लोंबणे, हेलकावे देत चालणे, (हालचालीच्या स्नायूंवरील ताबा अंशत: किंवा संपूर्ण नाहीसा झाल्यामुळे) अन्नपाणी पुढे असूनही तेथे पोहोचता न येणे, शरीराच्या काही भागाचा किंवा संपूर्ण शरीराचा पक्षाघात, संवेदनक्षमता कमी होणे इ. लक्षणे दिसून येतात. स्वायत्त तंत्रिका तंत्रातील बिघाडामुळे ओरडणे, लघवी बंद होणे, परिसंकोची स्नायूवरील अपवाही तंत्रिकांवरील ताबा सुटल्याने मलमूत्र विसर्जन कायम होत राहणे इ. लक्षणे दिसतात.

ऑक्सिजनन्यूनता : मेंदूतील रक्तवाहिन्यांतील दोषामुळे अथवा विषबाधा, हृनिष्फलता, रक्तस्राव इ. कारणांमुळे हा विकार उद्भवतो. तीव्र प्रकारात शुद्धिहरण, स्नायूंचा कंप, तर जुनाट विकारामध्ये असंबद्ध चाल, सुस्तपणा, अशक्तपणा, आचके ही लक्षणे दिसतात. श्वसन तंत्र उत्तेजक औषधे उपचार म्हणून थोडीफार उपयुक्त ठरतात.

जलशीर्ष : हा विकार जन्मजात असू शकतो. हळूहळू होणारा पक्षाघात घोड्यामध्ये अर्धवट डोळे मिटून उभे राहणे, अर्थशून्य नजर, खाद्य चर्वणाची क्रिया मंद किंवा अर्धवट होऊन खाद्य तोंडातून लोंबत राहणे इ. लक्षणे दिसतात.

मेंदूची द्रवयुक्त सूज : रवंथ करणाऱ्या प्राण्याचा मेंदू या विकारात मऊ होतो. डुकरात सोडियम क्लोराइडाच्या विषबाधेमुळे हा विकार झाल्याचे दिसून येते. सर्व प्राण्यांत मेंदूच्या जखमांमुळे हा रोग होऊ शकतो. धनुर्वाताप्रमाणे शरीराला बाक येणे, डोळे गरागरा फिरणे, स्नायूंचे कंपन, हेलकावे देत चालणे इ. लक्षणे दिसून येतात. उपचार म्हणून ग्लुकोज लवण विद्रावाची किंवा फ्रुक्टोज विद्रावाची अंत:क्षेपणे उपयुक्त असल्याचे दिसून आली आहेत.

मस्तिष्कशोथ : हा विकार व्हायरसामुळे होणाऱ्या बऱ्याच संसर्गजन्य रोगांमध्ये दिसून येतो. सर्व प्राण्यांतील ⇨ अलर्क रोगा मध्ये, डुकरांच्या सालमोनेलोसिस व धावरे या रोगांत, घोड्यातील एनसेफॅलोमायलिटीस या रोगात हा विकार झाल्याचे आढळून आले आहे. उद्दीपन झाल्यामुळे अकारण चाल करून जाणे, लहानसहान आवाजाने अगर स्पर्शाने दचकणे, ओरडणे, दिसेल त्यावर धडक देणे इ. लक्षणे दिसतात. रोग वाढत गेल्यावर गरागरा फिरणे, अंशत: अगर संपूर्ण पक्षाघात झाल्याचे दिसते. शामक औषधे आणि ज्या मूळ रोगामुळे हा विकार उद्भवला असेल त्या रोगावरील उपचार करतात.

मस्तिष्काघात : प्रामुख्याने मेंदूमध्ये होणाऱ्या रक्तस्रावाला मस्तिष्काघात म्हणतात. काळपुळी, हृद्रोग, वृक्काचे विकार, यकृताची सूज इ. रोगांमध्ये हा विकार झाल्याचे दिसते. घाम, हेलकावे देत चालणे, आचके येणे, श्वासोच्छ्वास करताना आवाज होणे इ. लक्षणे दिसतात. निवांत अंधाऱ्या जागी जनावराला ठेवणे व शामक औषधे देणे हा उपचार करतात.

मस्तिष्कावरणशोथ : सूक्ष्मजंतूंमुळे व काही व्हायरसांमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांमध्ये हा विकार झाल्याचे आढळून येते. घोड्यांचा कंठपीडन रोग, नवजात जनावरातील ⇨ जंतुरक्तता, डुकरातील धावरे, गायीगुरांतील पाश्चुरिलोसिस या सांसर्गिक रोगांमध्ये हा विकार दिसून आला आहे. उच्च ताप, विषरक्तता, स्नायुकंपन इ. लक्षणे दिसून येतात, प्रतिजैव व सल्फा औषधे उपयुक्त आहेत.

भोवळ रोग : कुत्र्यामध्ये आढळणाऱ्या टीनिया मल्टिसेप्स या फीतकृमीच्या जीवनातील द्रवार्बुदी अवस्था मेंढ्याच्या व गायीगुरांच्या मेंदूमध्ये शिरल्यामुळे हा विकार उद्भवतो. रोगी जनावर अडखळत चालते, गोल फिरते, एकसारखे डोके झटकते, दिसेल त्यावर डोके आपटते व दमल्यावर डोके टेकवून उभे राहते ही लक्षणे दिसून येतात. शस्त्रक्रिया करून द्रवार्बुद काढून टाकल्यावर विकार बरा होतो. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मेंढ्यांच्या वाडीवरील कुत्र्यांना जंतनाशक औषध देऊन कंपवात, अपस्मार, तंत्रिकोन्माद, भोवळ इ. तंत्रिका तंत्राचे विकार होतात. तसेच अलर्क रोग, धनुर्वात, कुत्र्यांचा डिस्टेंपर या सांसर्गिक रोगांमध्ये तंत्रिका तंत्राचे विकार होतात.

दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Allan, F.D. Essentials of Human Embryology, New York, 1960.

2. Bannister, R. Brain’s Clinical Neurology, London 1973.

3. Best, C. H.; Taylor, N. B. The Living Body, Bombay, 1961.

4. Best, C. H. Taylor, N. B., Eds. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.

5. Bykov, K. M. The Cerebral Cortex and the Internal Organs, Moscow, 1959.

6. Chamberlain, E. N.; Ogilvie, C. Symptoms and Signs in Clinical Medicine, Bristol, 1974.

7. Davidson, S.; Macleod, J, Eds. Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

8. Davies, D. V.; Davies, F., Eds. Gray’s Anatomy, 1962.

9. Fielding, H. G. An Introduction to the History of Medicine, Philadelphia, 1960.

10. Grollman, S. The Human body, Its Structure and Physiology, New York, 1964.

11. Harvey, A. M.; Johns, R. J.; Owens, A. H. (Jr.); Rose, R.S. The Principles and Practice of Medicine, New Delhi, 1974.

12. Medowall, R.J.S. Handbook of Physiology, London, 1960.

13. Purpura, D. P.; Schade, J. P., Eds. Progress in Brain Research, 4 Vols., Amsterdam, 1964.

14. Scott, R. B Eds. Price’s Textbook of the Practice of Medicine, Glasgow, 1973.

15. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.

16. Walter, H. E.; Sayles, L. P. Biology the Vertebrates, New York, 1957.