की नो त्सुरायुकी : (८७२–९४६). एक प्रसिद्ध जपानी कवी  व लेखक. त्याचे वडील की नो मोचियुकी हे कन्फ्यूशस पंथातील विख्यात पंडित होते. त्सुरायुकीने चिनी वाङ्‌मयाचाही अभ्यास केला होता. ९३० साली तोसा येथे राज्यपाल म्हणून त्याची नेमणूक झाली. ९३५ पर्यंत तो तेथे होता. ९४५ साली पुन्हा एकदा त्याची अशाच प्रकारची नेमणूक करण्यात आली होती.

सुरायुकीला ‘यामातो उता’ या खास जपानी काव्यप्रकारचे पुनरुज्जीवन करण्याची इच्छा होती. ही इच्छा त्याने कोकिन्शूचे (प्रातिनिधिक काव्यसंग्रह) संपादन करून पूर्ण केली. या संग्रहात त्याच्या १०२ कविता आहेत. या कार्यास की नो तोमोनोरी, योशिकोची नो मित्सुने आणि मिबु नो तादामिने या तीन कवींचे त्यास साहाय्य लाभले. संग्रहाची प्रस्तावना त्यावेळी नुकत्याच वापरात आलेल्या ‘काना’ या जपानी लिपीत असून ती बहुधा त्सुरायुकीनेच लिहिली  आहे. त्यापूर्वीचे सर्व लिखाण चिनी लिपीत असे. वन् स्युआन (जपानी शीर्षक Monzen) व षृ–फीन (जपानी शीर्षक Shin-P’in) या चिनी ग्रंथांच्या आशयाभिव्यक्तीचे तीत अनुकरण असले, तरी त्सुरायुकीची स्वतंत्र समीक्षापर मतेही तीत आढळतात. हितोमारो व अकाहितो या मानियोशू संग्रहामधील कवींवर व  ‘रोक्कासेन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अरिवारा, नो नारिहिरा, धर्मगुरू हेंजो, ओनो नो कोमाची इ. सहा कवींवर तीत टीका आढळते. एफ्. व्ही. डिकिन्झने प्रिमिटिव्ह अँड मेडीव्हल जॅपनीज टेक्स्ट (१९०६) या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्सुरायुकीच्या प्रस्तावनेचे इंग्रजी भाषांतर अंतर्भूत केले आहे.

त्सुरायुकीच्या कविता निरनिराळ्या ‘चिकूसेन शू’ (शाही आज्ञेवरून संपादिलेले प्रातिनिधिक काव्यसंग्रह) मध्ये आहेत. त्सुरायुकी शू या नावाचा त्याच्या ८९० कवितांचा एक संग्रह आहे. त्याच्या कवितांत सफाईदार रचना व अभिनव कल्पनाविचारांचे वैभव दिसून येते. काही कवितांत उत्कट व सखोल भावनाविष्कार आढळतो.

त्याची सुप्रसिद्ध तोसा निक्की (तोसा संस्थानाचे प्रवासवर्णन) त्याने तोसाहून परत येताना प्रवासात लिहिली (इ. स. ९३५). तोसा येथे मरण पावलेल्या त्याच्या मुलाबद्दलची शोकभावना तीत असली, तरी  या रोजनिशीत सर्वत्र विनोदाची पखरण आहे. ती ‘काना’ लिपीतील एक आरंभीचा ग्रंथ म्हणून व जपानी साहित्यातील पहिलेच प्रवासवर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. डब्ल्यू. एन्. पोर्टरने तोसा निक्कीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले आहे (१९०६).

काव्यसमीक्षा व प्रवासवर्णन लिहून त्सुरायुकीने जपानी ललित गद्याचा पाया घातला. सर्वसाधारणपणे कोकिन्शूबद्दल त्या त्या काळात समीक्षकांची जी मते असतील, त्यांप्रमाणे त्सुरायुकीची कीर्ती वाढत वा घटत गेली. सध्या त्सुरायुकीचे स्थान व महत्त्व सर्वमान्य आहे. 

हिसामात्सु, सेन् -इचि (इं.)  जाधव , रा. ग. (म.)