श्वसन स्थगिति : (श्वासावरोध श्वासस्थगन). श्वसनक्रियेमध्ये अडथळा आल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होऊन त्याचा विविध इंद्रियांवर, विशेषतः मेंदूवर, अनिष्ट परिणाम होण्याच्या स्थितीला श्वसनस्थगिती म्हणतात. वरवर पाहता ही श्वसनमार्गाची दुरवस्था वाटते परंतु व्यापक अर्थाने श्वसनाची म्हणजे ऊतकीय [समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या (पेशींच्या) समूहांच्या] पातळीवरील चयापचयी [⟶ चयापचय] प्रक्रियांची हानी या स्थितीत होत असते. सुरूवातीस केवळ विलंबित चेतनावस्था भासणारी ही स्थिती योग्य आणि त्वरित उपचाराअभावी व्यक्तीचा मृत्यू घडवून आणू शकते.

कारणे : श्वसनमार्गात घन पदार्थ (अन्न, खेळण्याची लहानशी वस्तू , धुरळा), द्रव (पेय, बुडल्यामुळे नाकातोंडात शिरलेले पाणी, उलटी झाल्यामुळे जठरातून वर आलेला पदार्थ) किंवा वायू (औदयोगिक परिसरातील मिथेन, कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रोजन यांचे वातावरणापेक्षा अधिक प्रमाणातील अस्तित्व आगीत अडकल्यामुळे तेथील धूर, खाणीमधील वायू) यांचा श्वसनमार्गात मोठया प्रमाणात प्रवेश झाल्यामुळे ताज्या हवेचा पुरवठा बंद होऊन श्वसनस्थगितीच्या बहुतेक घटना होत असतात. यांशिवाय मेंदूला किंवा मानेला दुखापत झाल्याने श्वसनाच्या स्नायूंची शिथिलता किंवा अंगघात होणे अंगावर ढिगारा कोसळल्यामुळे बरगड्यांना इजा होणे छातीस किंवा पोटास जखम होणे मादक पदार्थामुळे किंवा झोपेच्या औषधांच्या अतिरेकी मात्रेने श्वसनकेंद्राचे अवसादन होणे किंवा पोलिओसारख्या विकाराने अथवा क्युरारेसारख्या विषाने तंत्रिकाघात [मज्जाघात ⟶ अभिघात] होणे यांसारख्या कारणांनी श्वसनक्रियेत व वायुविनिमयात अडथळा येऊ शकतो.

कार्बन मोनॉक्साइड वायूच्या विषबाधेत श्वसनमार्गात अडथळा नसतो परंतु रक्तातील हीमोग्लोबिनाची ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी झाल्यामुळे श्वसनस्थगिती निर्माण होते. उदा., मोटार वाहनांचा निष्कास (बाहेर पडणारे वायू), बंद खोलीत अपुऱ्या वायुवीजनामध्ये जळणारी शेगडी, कोळशापासून केलेला इंधनाचा वायू इत्यादींत ०.१% कार्बन मोनॉक्साइड घातक ठरू शकतो. औदयोगिक क्षेत्रातील वातावरणात हायड्रोजन सल्फाइड, सायनाइड, आर्साइन, फॉस्फाइन, निकेल कार्बोनिल यांसारखे वायू अशाच पद्धतीने विषबाधा घडवितात.

नवजात अर्भकात श्वसन पूर्णपणे सुरू न झाल्यामुळे आणि प्रसूतिमार्गातील डोक्याच्या वा मानेच्या दुखापतीमुळे श्वसन तंत्रिकांचा घात झाल्याने श्वसनस्थगिती ओढवू शकते. [⟶ नवजात अर्भक].

लक्षणे : श्वसनमार्गातील अवरोधामुळे खोकला, धाप लागणे, श्वास नलिकांचे संकोचन होणे, बुळबुळीत स्राव (श्लेष्मल) निर्माण होणे यांसारखी लक्षणे प्रारंभी दिसून येतात. नंतर ऑक्सिजनाच्या अभावामुळे अस्वस्थ वाटणे, गोंधळणे, घेरी येणे, छातीची धडधड, निळसर त्वचा व ओठ यांमुळे परिस्थितीचे गांभीर्य जाणवते. थोड्याच वेळात असंवेदनातील (शुद्घिहरणातील) बदलांप्रमाणेच ⇨ प्रतिक्षेपी क्रियां चा लोप होणे, बेशुद्धावस्था, रक्तदाब कमी होणे, हातपाय गार पडणे व श्वसनकेंद्रासह सर्व महत्त्वाची नियंत्रक तंत्रिका केंद्रे सि तंत्रिका तंर्त्रें निष्क्रिय होणे यांसारखे बदल होऊन मृत्यू ओढवतो.

उपचार : बाधित व्यक्तीला मोकळ्या हवेत ठेवून उबदार आच्छादनांनी शरीराचे तापमान टिकवून ठेवणे आवश्यक असते. श्वसनमार्गातील अडथळे दूर करून कृत्रिम श्वसनास [⟶ श्वसन, कृत्रिम] प्रारंभ करणे आवश्यक ठरल्यास यंत्राचा वापर करून कृत्रिम उपायांनी श्वसनक्रिया चालू ठेवणे आणि विषबाधा असल्यास विशिष्ट प्रतिविषे देणे यांसारखे उपाय त्वरित अवलंबावे लागतात. श्वसनमार्गात नळी घालून किंवा मुखवटा वापरून ऑक्सिजन ९५% व कार्बन डाय-ऑक्साइड ५% असे वायुमिश्रण देऊन ⇨ ऑक्सिजन-न्यूनता दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. रक्तदाब वाढविणारी औषधे व ग्लुकोजासारखी पोषणद्रव्ये रक्तवाहिन्यांमध्ये थेट अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) किंवा द्रवामधून दिली जातात. त्यानंतर श्वसनमार्गाचे जंतुसंक्रामण टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिजैविकांचा (अँटिबायॉटिक पदार्थांचा) वापर केला जातो.

पहा : अभिघात ऑक्सिजन-न्यूनता मृत्यु.

संदर्भ : Waldron, H. A. Lecture Notes on Occupational Medicine, London, 1990.

श्रोत्री, दि. शं.