गॉल्जी, कामील्लो : [७ (९ ?) जुलै १८४३ (१८४४ ?)—२१ जानेवारी १९२६]. इटालियन वैद्य. तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) संरचनेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना स्पॅनिश ऊतकवैज्ञानिक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या म्हणजे ऊतकांच्या सूक्ष्म संरचनेसंबंधीच्या विज्ञानातील तज्ञ) रामॉन इ काहाल यांच्याबरोबर १९०६ सालचे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

त्यांचा जन्म कॉर्तोना येथे झाला. १८६५ मध्ये पाव्हिया विद्यापीठाची पदवी मिळविल्यानंतर आब्ब्यातीग्रासो नावाच्या खेड्यात असाध्य रोगांकरिता असलेल्या खास रुग्णालयात ते काम करू लागले. तेथे कोणतीही अद्ययावत साधने उपलब्ध नसताना गॉल्जी यांनी १८७३ मध्ये तंत्रिका कोशिकांना (पेशींना) सिल्व्हर नायट्रेटाने अभिरंजित करण्याच्या (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास करण्यासाठी कृत्रिम रीत्या रंगविण्याच्या) तंत्राचा शोध लावला व त्यामुळे तंत्रिका तंत्राच्या सूक्ष्म संरचनेचा अभ्यास करण्यास मूलभूत साधन शास्त्रज्ञांना उपलब्ध झाले. १८८३ साली त्यांनी केंद्रीय तंत्रिका तंत्रातील बहुध्रुवी (संपर्क साधण्याची दोनपेक्षा अधिक केंद्रस्थाने असलेल्या) व अनेक शाखित प्रवर्धयुक्त (विस्तार असलेल्या) कोशिकांचे अस्तित्व सिद्ध केले. या प्रवर्धांद्वारे या कोशिकांचा इतर तंत्रिका कोशिकांशी संबंध जोडला जातो. या कोशिका ‘गॉल्जी कोशिका’ या नावाने ओळखण्यात येतात. गॉल्जी यांच्या या शोधामुळे पुढे व्हाल्डियर-हार्ट्‌स या जर्मन शास्त्रज्ञांनी तंत्रिका तंत्राचा एकक म्हणजे तंत्रिका एकक (न्यूरॉन) ही संकल्पना मांडली व ती आधुनिक तंत्रिकाविज्ञानाच्या विकासातील एक मूलभूत संकल्पना ठरली.

गॉल्जी यांनी १८७५ पासून पाव्हिया विद्यापीठात शारीर (शरीररचनाशास्त्र) व ऊतकविज्ञान या विषयांचे, १८७९ – ८० मध्ये सिएना विद्यापीठात शारीर या विषयाचे व १८८० पासून परत पाव्हिया विद्यापीठात विकृतिविज्ञान (रोगोद्‌भवामुळे शरीरातील ऊतके व अवयव यांच्यात होणाऱ्या संरचनात्मक आणि कार्यात्मक बदलांचा अभ्यास करणारे विज्ञान) व ऊतकविज्ञान या विषयांचे अध्यापन केले.

गॉल्जी हे मलेरियावरील संशोधनाबद्दलही प्रसिद्ध आहेत. मलेरियास कारणीभूत असणाऱ्या तृतीयक (दर दोन दिवसांनी रोगलक्षणे निर्माण करणाऱ्या) व चतुर्थक (दर तीन दिवसांनी रोगलक्षणे निर्माण करणाऱ्या) परजीवींमधील (अन्य जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमधील) फरक त्यांनी दाखविला. मलेरियाचा प्रवेग (लक्षणांची तीव्रता) रक्तातील परजीवींच्या बीजाणुजननाशी (प्रजोत्पादक भाग निर्माण करण्याशी) संबंधित असतो, तसेच रोगाची तीव्रता परजीवींच्या संख्येवर अवलंबून असते, असे गॉल्जी यांनी दाखविले. वल्कचर्म (ब गट जीवनसत्त्वातील निॲसीन या घटकाच्या अभावामुळे होणारा रोग, पेलाग्रा) व मानसिक विकृतीची कारणे यांसंबंधी त्यांनी केलेली निरीक्षणे महत्त्वाची ठरली आहेत. पाव्हिया येथे ते मरण पावले.

कानिटकर, बा. मो.