आधुनिक युग : रवींद्रनाथ १९४१ साली निधन पावले. साहित्याच्या प्रवाहात कोणतीही सीमारेषा रेखाटणे हे पाण्यात काठी मारून ते दुभंगण्यासारखेच कृत्रिम कार्य आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी असे कालखंड उपयुक्त ठरतात एवढेच. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दशकांत दृष्टोत्पत्तीस आलेले नवे विचारच पाचव्या दशकातही प्रवाहमान होते. रवींद्रनाथांच्या निधनामुळे अर्ध शतकाहूनही अधिक काळ बंगाली साहित्यावर अधिराज्य गाजविणारे एक विराट व्यक्तिमत्त्व नजरेसमोर उरले नाही खरेच परंतु अन्यथा ह्यांच्या हयातीत उद्‌गामित झालेल्या साहित्यप्रवृत्तींची अतूट धाराच पुढेही वाहताना दिसते. आधीच्या नवयुगातील नवे तारे अजूनही तारांगणात चमकत होतेच. त्यांच्यापैकी काहींनी तर या आधुनिक कालखंडातही नेत्रदीपक कर्तबगारी दाखवली. मात्र रवींद्रोत्तर बंगाली साहित्यिकांपुढे ज्यांचा अगोदर आभासही नव्हता अशा अनेक नवीन समस्या आ वासून उभ्या होत्या.

दुसरे महायुद्ध उंबरठ्यापाठी येऊन ठेपले. दुष्काळाच्या भीषण खाईत लक्षावधी बंगाली जीवांची होळी झाली. बेचाळीसच्या क्रांतीने काही काळ बंगाल हालवून सोडला. राजकारणातील विषारी जातीयतावादाची झळ बंगालला फार सोसावी लागली. जातीय दंग्यांची दुर्दैवी धुमश्चक्री आणि बंगालची फाळणी हे धक्के तर फारच दारुण होते. स्वातंत्र्याचा अरुणोदय रक्तरंजित होता. निर्वासितांचे लोंढे येऊ लागले. महात्मा गांधींची हत्या झाली. स्वराज्य आले असले, तरी सुराज्याचा प्रत्यय दूर होता. भ्रष्टाचार वाढला होता. साहित्यनिर्मितीचा कणा असणारा मध्यमवर्ग नामशेष होऊ लागला. सत्ता आणि सत्तास्थानांभोवतीचे पक्षोपपक्षांचे ओंगळ राजकारण विचारवंतांना दिङ्‌मूढ करत होते. जगातील सत्तांध राष्ट्रगटांतील शीतयुद्धाच्या झळाही येथील प्रतिभावंतांना कासावीस करत होत्या. दुसऱ्या महायुद्धाने व त्यात अवतरलेल्या महासंहारक अणुशक्तीने जुन्या जगाचा एकूणच डोलाऱ्यास जबरदस्त हादरा बसला. जीवनमूल्ये उद्ध्वस्त झाली. नीतिमूल्ये निरर्थक भासू लागली. साहित्यातील वाद आणि विवाद एकाएकी नवीन संदर्भात नव्या पातळ्यांवर उचलले गेले. बंगाली साहित्याचा हा आधुनिक कालखंड या अभूतपूर्व मंथनाची साक्ष पटविणारा आहे. साहित्याची कोणतीही शाखा घ्या, या परिस्थितीचा प्रभाव तेथे जाणवतो. या कालखंडातील ताज्या दमाच्या साहित्यिकांनी वंगभूमीवर कोसळलेल्या कुऱ्हाडीचे घाव स्वतः सोसले असल्याने, त्यांच्या जिव्हारीच्या भळभळत्या जखमा त्यांनी साहित्यात प्रकट केल्या. स्वतःची ही अनुभूती त्यांनी सच्चपेणाने शब्दबद्ध केली. साहित्याचे, कलेचे स्वयंभू अस्तित्व शोधण्याची त्यांची धडपड होती. साहित्यातून निवेदन करण्याऐवजी निवेदनच साहित्यरूप कसे होईल याची त्यांना तळमळ होती. नव्या सौंदर्यबोधाचा उदय होऊन साहित्यात विशुद्ध कला कशी प्रकट होईल याचा ध्यास लागून त्या दिशेने वाटचाल झाली. विदेशी विचारांचा कानोसा अवश्य घेतला गेला परंतु त्यांचे अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती मागे पडून जगातील विचारप्रवाहांशी समांतर राहण्याची, जागरूक विश्वबंधुत्व वृत्ती उदयास आली. किर्केगॉर, सार्त्र किंवा काम्यू यांचे अस्तित्वादी विचार अथवा लेनिन, माओ-त्से-तुंग, हेर्बेट मार्क्‌स यांचे क्रांतिकारी राजकीय विचार समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या तीस वर्षांत बंगालच्या तरूण पिढीने केला. तहानभूक विसरून साहित्यावर प्रेम करणाऱ्या या पिढीतील साहित्यिकांच्या निर्मितीचे यथार्थ मूल्यमापन महाकालाच्या कसोटीवर व्हायचे तेव्हा होईलच. प्रस्तुत सर्वेक्षणाच्या सीमित चौकटीत केवळ एक धावता आढावा घेणेच शक्य आहे. त्यासाठीच पूर्वोक्त ठळक घडामोडींचे हे प्राक्कथन आवश्यक ठरते.

या काळातील कादंबरीचे अवलोकन प्रथम करू या. अगोदरच्या कालखंडातील काही आघाडीचे साहित्यिक याही काळात आपल्या लेखणीच्या लीला दाखविताना आढळतात. ताराशंकर बंदोपाध्याय, माणिक बंदोपाध्याय, नारायण गंगोपाध्याय, बलाइचाँच मुखोपाध्याय, अचिन्त्यकुमार सेनगुप्त, प्रेमेंद्र मित्र, अन्नदाशंकर रायप्रभृती कितीतरी साहित्यिक नवीनांच्या बरोबरीने आपली साहित्यनिर्मिती करीत होते. विशेषतः दुष्काळ, ऑगस्ट-क्रांती, राजकीय मतामतांचा गलबला, सशस्त्र क्रांती, जातीय दंगे, फाळणी इ. प्रासंगिक पार्श्वभूमीवर पुष्कळ कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. नारायण सान्याल यांची वल्मीक, शक्तिपद राजगुरू (१९२२-) यांची तबु विहंग यांसारख्या कादंबऱ्यांतून निर्वासितांच्या करुण कहाणीस अग्रस्थान लाभले. महायुद्धोत्तर विकल जीवनाचे, क्षयिष्णू मध्यम वर्गाचे, भग्न, भंगुर समाजरचनेचे चित्रण बिमल कर (१९२१–) यांच्या देवाल (१९५६), ज्योतिरिंद्र नंदी (१९१२–) यांच्या मीरार दुपूर (१९५३), बारोधर एक उठोन (१९५५), संतोषकुमार घोष (१९२०–) यांच्या किनु गोयालार गलि (१९५०), मोमेर पुतुल (१९५४), नरेंद्रनाथ मित्र (१९१७–७५) यांच्या दूरभाषिणी, चेनामहल (१९५३), देहमन, समरेश बसू (१९२१–) यांच्या गंगा (१९५७), त्रिधारा (१९५८) इ. कादंबऱ्यांत प्रभावीपणे आढळते. समाजाच्या उपेक्षित, अवहेलित अशा दलित वर्गाचे डोळस चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या हा या आधुनिक कालखंडाचा विशेष आहे. मनोज बसूंच्या जलजंगल, बन केटे बसत, अद्वैत मल्लबर्मन यांची तितास एकटी नदीर नाम (१९५६), गुणमय मान्ना (१९२५–) याच्या लखीन्दर दिगार (१९५१), जुनापूर स्टील (१९६०), समरेश बसूंची बी. टी. रोडेर धारे अशी काही उदाहरणे सांगता येतील. बंगालच्या अंतर्भागातील प्रादेशिक वैशिष्ट्यांचे नखदर्पणवत् चित्रण करणाऱ्या ‘आंचलिक’ कादंबऱ्या म्हणून नारायण गंगोपाध्यायांची उपनिबेश (१९४५), अमियभूषण मजुमदार यांची गड श्रीखंड (१९५७), प्रफुल्ल राय यांची पूर्वपार्वती (१९५७) किंवा नंतरची सिंधुपारेर पाखी (१९५९), रमापद चौधुरी (१९२२–) यांची बनपलाशीर पदावली (१९६२) इ. नावे चटकन आठवतात. असीम राय यांच्या एकालोर कथा, गोपालदेव, द्वितीय जनम इ. कादंबऱ्यांतील सूक्ष्म जीवनजिज्ञासा व चिंतनशीलता चोखंदळ वाचकांचे लक्ष वेधून घेते.

‘पिरीयड नॉव्हेल’ वा विगत कालखंडाचे यथातथ्य चित्रण करणारी कादंबरी या काळातच लोकप्रिय ठरली. ऐतिहासिक कादंबरीचाच हा एक प्रकारभेद. फक्त ऐतिहासिक कादंबरी ही अनेकदा भपकेबाज, भरजरी, ‘कॉस्ट्यूम’ चित्रपटासारखी केवळ अपरिचित, विचित्र, रम्य दुनियेच्या रंगीनसंगीन चित्रणात रमणारी असते. पिरीयड नॉव्हेल नजीकच्या भूतकाळातीलच एखादी परिचित परिवेशातील, परिचित घटना वा ओळखीची व्यक्ती निवडून तिच्याभोवती कल्पनाजाल विणून वाचकास गुंग करते. प्रमथनाथ बिशी यांची केरी साहेबेर मुन्शी (१९५६), बिमल मित्र (१९१२-) यांची साहेब बिबि गुलाम (१९५४), अमियभूषण मजुमदार यांची नील मुँईया (१९५५), गजेंद्रकुमार मित्र यांची कलकातार काछेइ (१९५७) इ. कादंबऱ्या अशा विशिष्ट वातावरण वा कालखंड साकारणाऱ्या आहेत. ऐतिहासिक कादंबऱ्यांनाही या काळात नव्याने उधाण आले. शरदिंदू बंदोपाध्याय यांची गोडमल्लार (१९५४), प्रमथनाथ बिशींची लाल केल्ला (१९६४), गजेंद्रकुमार मित्र यांची बन्हिबन्या (१९५९), नारायण गंगोपाध्याय यांची पदसंचार (१९५५), स्वराज बंदोपाध्याय (१९२१-६८) यांची चंदनडांगार हाट (१९५२), समरेश बसूंची उत्तरंग (१९५१) इ. कितीतरी कादंबऱ्यांत इतिहासाचे निमित्त करून सरधोपट रम्यकथाच लिहिलेल्या आढळतात. मात्र इतिहासाचे अंतर्दृष्टीपूर्वक आलोडन, त्याचे सखोल व अंतर्भेदी आकलन वा आधुनिक ज्ञानाने उन्नत झालेल्या दृष्टिकोनातून केलेले त्याचे विश्लेषण या तथाकथित ऐतिहासिक कादंबऱ्यांतून कमी आहे याची सुबुद्ध जाणीव नव्या तरुण कादंबरीकारांना होत असल्याचे जाणवते.


या काळात वाचकांची संख्या खूपच वाढली. बाजारात ‘चालू माल’ कोणता याचे अंदाज बांधून तेजीमंदीचे वायदे बोलणारे व्यावसायिक प्रकाशक वाढले. मागणी तसा पुरवठा न्यायाने ढोबळ युगाभिरुचीची तृप्तता करणारे, रंजनप्रधान कादंबऱ्यांचा रतीब घालणारे लेखक वाढले. विकाऊ साहित्याचे यशस्वी आडाखे तयार झाले. वैभवशाली बंगाली साहित्यातही सक्षम, सकस, समर्थ नवनिर्मिती होत असतानाच अशा गल्लाभरू कथाकादंबऱ्यांचाही सुळसुळाट झाला. साहित्याच्या इतिहासात याचा नाममात्र उल्लेख करूनच पुढे जावयास हवे. कारण बऱ्याचदा अशा अवक्षयाची, अवलक्षणांची कारणे साहित्यबाह्य आणि सामाजिक परिस्थितीत शोधावी लागतील अशी असतात.

रवींद्रनाथांनी बंगाली कादंबरीस एका सर्वंकष दर्शनाच्या उच्चस्तरावर नेले होते. अत्याधुनिक कादंबरीकारांनी जीवनाचे दर्शन शतखंड शकलांत घेतलेले दिसते. नास्तिकता, अस्तित्वाद, प्रतीकवादी (सिम्बलिस्ट) आणि तार्किक प्रत्यक्षार्थवादी (लॉजिकल पॉझिटिव्हिस्ट) मतांचा प्रभाव, व्यस्तता (ॲब्‌सर्डिटी), परात्मता (एलिएनेशन), संतप्त पिढी (हंगरी जनरेशन), ‘बीट म्युझिक’ अशा अनेक समकालीन पाश्चात्त्य मतप्रवाहांचा या आजकालच्या साहित्यात प्रादुर्भाव आढळतो. भाषेवर, शैलीवर, रचना आणि संकल्पनांवरसुद्धा या मतांचा प्रकर्षाने परिणाम होतो आहे. फार मोठा साहित्यिक होऊन गेल्यानंतर त्याच्या भाषेला, शैलीला लाभणारे गौरवाचे स्थान अल्पावधीतच पवित्र ठेव्यात परिणत होते. मागाहून येणाऱ्यांच्या अभिव्यक्तीसाठी कधी कधी ही भाषा अवजड शृंखला ठरते. नवे प्रयोग होतात. प्रादेशिक बोलीभाषांतून कस आणि कुमक शोधली जाते. नागर संस्कृतीत संपन्न झालेली प्रौढ, परिणत भाषा अपुरी वाटून रांगडी, रगेल भाषा वापरून मनातील उघड्यावाघड्या भावना व्यक्त होतात. भाषेला साचलेला तडाग पाट फोडून मोकळा होतो. अत्याधुनिक बंगाली साहित्यिकांच्या निर्मितीत ही प्रवृत्ती आढळते आहे. लोकभाषांतील जिवंत सळसळती लय पकडली जात आहे. छोटी छोटी वाक्ये व नवे नवे प्रवाही शब्द वापरात येत आहेत. कवितेतील प्रक्रियांचा अनेकदा कथा-कादंबऱ्यांतूनही आढळ होतो आहे. कलानिदर्शक संदर्भाची धक्कादायक उलथापालथ करून कलातीताचा आभास निर्माण करता येइल का, याचा अंदाज घेतला जात आहे. कमलकुमार मजुमदार (१९१५–७९) यांच्या अंतर्जतीर यात्रा (१९६२) व नीम अन्नपूर्णा (१९६३) या दोन कादंबऱ्या आपल्या प्रखर वेगळेपणाने ठळक जाणवणाऱ्या. त्या वाचकांत लोकप्रिय ठरल्या नाहीत वा त्यांच्या स्वतंत्र थाटाचे अनुकरणही झाले नाही. परंतु मुक्या माणसाने टाहो फोडण्याचा प्रयत्न करावा तसे त्यांनी अत्याधुनिक माणसाची ‘गोची’ (कोंडी) अभिनव धाटणीने अभिव्यक्त केली यात संशय नाही.

कामभावनेच्या प्रकटीकरणाचे पारंपारिक विधिनिषेध धुडकावून लावून, क्वचित त्याला अस्तित्ववादाचा गोंडस मुलामा देऊन कादंबरीलेखनाचे बरेच प्रयोग या काळात झाले आणि अजूनही होत आहेत. समरेश बसूंची विवर (१९७४) व बुद्धदेव बसूंची रात भोरे ब्रिष्टी या दोन कादंबऱ्या त्यातल्या त्यात लक्षणीय ठरतात. प्रतिभा बसू (१९१५–) यांचा पटकथेच्या (सिनेरीओ) तंत्राने कादंबरी लिहिण्याचा प्रयोगही नोंद घेण्यासारखा आहे. चित्रपटाचा कथा-कादंबरीवरील प्रभावही या काळात फार वाढला. पूजा विशेषांकासाठी कादंबऱ्या लिहून पुढे त्यांचीच नाटके वा चित्रपट होतील अशा आडाख्याने रचना करण्याचा हव्यास दिसून येतो आहे. कालिकानंद भट्टाचार्य ‘अवधूत’ (१९१५–७९) या कादंबरीकाराने तांत्रिक-मांत्रिक स्मशानसाधनांचा अद्‌भूत मालमसाला वापरून लिहिलेल्या मरूतीर्थ हिंग्लज (१९५५), उद्धारेणपूरर वाट (१९५६) इ. कादंबऱ्याही काही काळ त्यांच्या जगावेगळ्या गूढरम्य वातावरणामुळे बाजार गाजवून गेल्या. त्यांतील साचेबंद चौकटीचा बहर लवकरच ओसरला. महाश्वेतादेवी (१९२६–), बाणी राय (१९१९–), लीला मजुमदार (१९०८–), आशापूर्णादेवी (१९०९–) इ. लेखिकांनी कादंबरीक्षेत्रात महत्त्वाची भर घातली. आशापूर्णादेवी यांची प्रथम प्रतिश्रुति (१९६४) ही कादंबरी व नंतरच्या सुवर्णलता (१९६६) व बकुल कथा (१९६८) या दोन कादंबऱ्या मिळून साधलेली त्रयी या कालखंडातील एक महत्त्वाची सिद्धी ठरते. शालेय प्राथमिक शिक्षणदेखील न लाभलेल्या आशापूर्णादेवींनी केवळ अवांतर वाचनाच्या जोरावर स्वतःचे ‘शिक्षण’ करून कथा-कादंबरीच्या क्षेत्रांत स्वतःचा वेगळा शिक्का चालविला, ही कर्तबगारी खरोखरच अपूर्व म्हणावी लागेल. सुरुवातीची पंधरा वर्षे फक्त बालवाङ्‌मय लिहिणाऱ्या आशापूर्णादेवींनी १९४४ साली प्रेम ओ प्रयोजन ही कादंबरी लिहिली ती अंतरीच्या उमाळ्याने. माणसाने घडविलेल्या संस्कृतीत आज माणसाची दुर्दशा का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्यांचे मन गढून गेले. १९६४ मध्ये त्यांनी प्रथम प्रतिश्रुति कादंबरी लिहून १०० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गीय परिवाराची रामकहाणी शब्दांकित केली. समाजाची जडणघडण ज्या माजघरात होत असते त्यातील अवहेलित, स्तिमितप्राय स्त्रीजीवनाची ही कहाणी वाचकांच्या अंतःकरणांना भिडली. पुढील वर्षी या कादंबरीस ‘रवींद्र पुरस्कार’ लाभला. त्या यशातून प्रेरणा घेऊन मग त्यांनी पुढील दोन कादंबऱ्यांतून नंतरच्या दोन पिढ्यांतील स्त्रीजन्माची कहाणी चितारली. बंगालच्या मध्यमवर्गीय अंतःपुराचे प्रांजळ आणि अंतर्भेदी चित्रण त्यांच्या या तीन कादंबरी-कन्यांनी घडविले. ११० कृती नावावर रुजू असणारी ही लेखिका आजही अंतर्मुख होऊन समाजातील अंतःप्रवाहाचे दर्शन घडविण्यात निमग्न आहे. शरत्‌चंद्रांनी घडविलेल्या स्त्रीजीवनाच्या चित्रणाहून आशापूर्णादेवीचे चित्रण वेगळ्या पोताचे आहे. कारण त्यात स्वानुभूतींचा पोटउमाळा अधिक आहे. १९७७ साली त्यांना लाभलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्यांच्या या कर्तृत्वाचा यथोचित गौरव झाला आहे.

सभोवतीच्या नवनवीन वादांच्या आणि विचारांच्या महापुरात भोवंडून न जाता स्वतःच्या भूमिकेवर घट्ट उभे राहून स्वतःस प्रतीत होणाऱ्या मानवी जीवनसमस्यांचे प्रामाणिक दर्शन घडविणारा या काळातील दुसरा व्रती कथाशिल्पी म्हणजे नरेंद्रनाथ मित्र. ट्यूबलाईट्सचा नि रोषणाईचा झगमगाट डोळे दिपवून टाकीत असताना देवघरातील शांत, स्निग्ध समईने तेवत राहावे तशी त्यांची निरलस साहित्यसेवा होती. द्वीपपुंज (१९४७) या प्रथम यशस्वी कादंबरीनंतर त्यांनी एकामागून एक पत्राणि (१९५०), देहमन (१९५२), दूरभाषिणी (१९५२), चेनामहल (१९५३), असवर्ण (१९५४), उपनगर (१९६२), सेतुबंधन (१९६४), सूर्यसाक्षी (१९६५) इ. अनेक कादंबऱ्या लिहून चोखंदळ रसिकांच्या मनात घर केले.

अतिशय लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीकारांत बिमल मित्र आणि मणिशंकर मुखोपाध्याय ‘शंकर’ (१९३३–) हे अग्रगण्य ठरतात. बिमलबाबूंच्या कादंबऱ्या रंजक, कथाप्रधान आणि तंत्रसुंदर असतात. कडी दिये किनलाम (१९६२), बेगम मेरी विश्वास (१९६६), चलो कलकत्ता (१९६६), पति परम गुरू (१९७२) इ. अनेक रसाळ कादंबऱ्यांनी त्यांनी आपल्या विशिष्ट वाचकवर्गाची मने जिंकली व त्यांची जययात्रा आजही अव्याहत चालू आहे. नव्या दमाच्या कादंबरीकारांपैकी ‘शंकर’ यांना लाभलेली जनप्रियता केवळ अभूतपूर्व म्हणावी लागेल. कतो अजानारे (१९५५) या संस्मरणात्मक प्रथम कादंबरीने त्यांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या चौरंगी (९१६०) कादंबरीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या चौरंगी (१९६०) कादंबरीने विक्रीचे उच्चांक गाठले. त्यावरील नाटक व चित्रपटही गाजले. परभाषांतही तिचे अनेक अनुवाद झाले. निवेदिता रिसर्च लॅबोरेटरी (१९६५) सारख्या कादंबरीत त्यांनी व्यासंगपूर्ण कादंबरीचा ओनामा केला. या कादंबरीत एका जंतुशास्त्रज्ञाची जीवनकहाणी उलगडण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक विश्वाचे कसून आलोडन केले व आवश्यक तो नेमका तपशील कौशल्याने कादंबरीत गुंफला. चाकोरीबाहेरचे वातावरण घेऊन रंजक कथानकाचा पट विणण्यात ते सिद्धहस्त आहेत. खुसखुशीत संभाषणे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना खुलवितात. समकालीन बंगाली भाषाशैलीवरील प्रभुत्व, रंजक ज्ञानकण अधूनमधून पेरण्याची त्यांची हातोटी व मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण यांमुळे त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय ठरल्या, एवढेच नव्हे तर बांगला देशासारख्या परराष्ट्रातही त्यांची तस्करी छपाई होऊ लागली. त्यांच्या मुलायम शैलीमुळे अनेकदा फसगत होत असते. या गर्भरेशमी आवरणाखाली मनुष्यस्वभावाचे ताठर ताणेबाणे दडलेले असतात. समाजात मुखवटे धारण करून वावरणारी दांभिकता आणि दुष्टता ते खुबीने उघड करतात.


ज्योतिरिंद्र नंदी व सुनील गंगोपाध्याय (१९३३-) या तरुण कादंबरीकारांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्योतिरिंद्रांची रावणवध (१९६८) ही कादंबरी अनेकांनी बंगालीतील विकृत प्रतीकवादाचे प्रतीक मानली असली, तरी १९४० नंतर बंगाली साहित्यात आलेल्या कालाचे स्तंभन करणाऱ्या किमयेची ती प्रतिनिधी ठरते. जीवनोघातील एका बिंदूस थिजवून त्याची निरखपारख करण्याची ही प्रक्रिया त्यांच्या कादंबरीत प्रत्ययास येते. प्राचीन पुराणकथांचा प्रतीकात्मक उपयोग करून आशयाची आगळी दुनिया अलगद उलगडत नेण्याची, अवकाशाच्या कक्षेतील एक क्षण सजीव समाधिस्थ करून ठेवण्याची धडपड या समर्थ लेखकाने केली आहे. सुनील गंगोपाध्यायांची अर्जुन (१९७०) कादंबरी पूर्व बंगालमधील निर्वासितांच्या कलकत्त्यातील शिबिरवासाचे चित्रण करता करता अशीच आजकालच्या माणसामाणसांतील सनातन संगराचे सूचन करते. अरण्येर दिनरात्रि, प्रतिद्वंद्वी, जीवन जरकेम, एका एवं कयेकजन, आत्मप्रकाश (१९६६) इ. त्यांच्या कादंबऱ्यांतूनही, समकालीन जीवनातील हिंस्त्रता आणि क्रौर्य, पोकळपणा आणि दंभ, विफलता आणि वंचना समर्थपणे व्यक्त होतात. अन्य असंख्य कादंबरीकारांत देवेश राय (१९३६-), मती नंदी (१९३२-), श्यामल गंगोपाध्याय (१९३३-), शीर्षेदू मुखोपाध्याय (१९३५-), संदीपन चतर्जी (१९३३-), अतीन बंदोपाध्याय, सैय्यद मुस्तफा सिराज, दिव्येंद्रू पालित (१९३९-), गुलाम कुद्‌दुस (१९२०-), रमापद चौधुरी (१९२२-), आशुतोष मुखोपाध्याय (१९२०-), हरिनारायण चतर्जी (१९१६–), बिमल कर, संतोषकुमार घोष, अब्दुल जब्बार (१९३०-), गौरकिशोर घोष (१९२४-), मैत्रेयी देवी (१९१४-), शक्तिपद राजगुरू, सुबोध घोष (१९०९-) इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

कादंबरीकडून लघुकथेकडे वळले, की समांतर प्रवृत्तींचाच मागोवा मिळतो. आधीच्या कालखंडातील ताराशंकर, अन्नदाशंकर, बिभूतिभूषण, जगदीश गुप्त, प्रेमेंद्र मित्र, अचिन्त्यकुमार, गजेंद्रकुमार, सुमथनाथ घोष, माणिक बंदोपाध्याय, राजशेखर बसू, ‘बनफूल’, शरदिंदू, नारायण गांगुली, मनोज बसू, प्रबोध सान्याल, शिवराम-चक्रवर्ती, बिमल मित्र, बाणी राय, संतोषकुमार घोष, नरेंद्र मित्र, सैयद मुजतबा अली, शैलजानंद, बुद्धदेव, आशापूर्णादेवी आदी समर्थ कथाकार लघुकथांतून विराट विश्वरूपाचे खंडशः दर्शन घडवीत असतानाच कथेत नवीनतेची चाहूल लागली. मनोविश्लेषणाची चूष एव्हाना जुनी झाली होती. बुद्धदेव बसूंच्या ‘रजनी हलो उतला’ या कथेने प्रथम नीतिमूल्यांवर प्रचंड वादळ माजवले. सुबोध घोष यांनी माणसाच्या स्वभावाचे अगणित प्रच्छन्न पदर हळुवारपणे कथांतून उलगडले. रमापद चौधुरी यांनी आपल्या मननशील, अंतराश्रयी शैलीने माणूसनामक महाकूटाचा उलगडा करण्यासाठी आपल्या परीने कथाप्रपंच केला. समरेश बसू यांच्या कथांत आजच्या माणसाचे कलहजर्जर जग आणि जगण्याची धडपड जळजळीतपणे प्रकटली. माणिकबाबूंचे वारसदार म्हणता येईल ज्योतिरिंद्र नंदींना, माणिकबाबूंसारखीच निरासक्त, निर्मम विश्लेषण करणारी शैली त्यांच्यापाशी आहे. माणिक बंदोपाध्यायांची राजकीय बांधीलकी वजा केली तरी सामाजिक अंतर्दृष्टी त्यांच्यात प्रकर्षाने जाणवते. १९६० नंतर नवी कथा अवतरली. बिमल कर तिचे अध्वर्यू, छोटो गल्प नूतन रीती हे मासिकच त्यांनी काढले. त्यांना कथानिवेदनाच्या घाटातील आंगिक फेरबदलापेक्षासुद्धा कथाविषय जो माणूस, तो जाणून घ्यायच्या रीतीत कायापालट अभिप्रेत होता. त्यांच्या स्वतःच्या कथांत या नूतन रीतीच्या यथेष्ट खुणा आहेत. त्यांच्या शांत, स्निग्ध, प्रतीकात्म भाषेच्या पृष्ठभागाखाली व्याकुळ व्यथावेदना, अटळ मरण जाणीव, ईश्वराचा विकल्प शोधण्याची कासाविशी अशा भावनांचा डोह हेलावत असतो. सतीनाथ भादुडींनी १९४८-६४ या काळातील आपल्या सात कथासंग्रहांत स्वतःचे समाजदर्शन साकार केले. अनुभवाचा अनंत खजिना असणाऱ्या ‘बनफूल’ यांच्या पोतडीतून आजही नित्य नव्या चकित करणाऱ्या कथा निपजतात. तंत्रप्रधान कथांत वाकबगार असणाऱ्या बिमल मित्रांनी काही उत्कृष्ट कथा लिहिल्या. पूर्वसूरींची स्वप्नरम्यता अव्हेरून निखळ वास्तवतेला सामोऱ्या जाणाऱ्या नव्या लेखकांत संतोषकुमार घोष, गौरकिशोर घोष, सत्यप्रिय घोष (१९३४-), सुधीरंजन मुखोपाध्याय (१९१९-), प्रभात देवसरकार (१९१७-), शचींद्रनाथ बंदोपाध्याय (१९२९-), सुशील जाना (१९१८-), ननी भौमिक (१९२१-), बारींद्रनाथ दाश, अमल दासगुप्त (१९१९-), नवेंदू घोष (१९१७-), स्वराज बंदोपाध्याय, महाश्वेतादेवी, प्रतिभा बसू यांची नावे घ्यावी लागतील. समाजाभिमुखता आणि वैचारिक मंथन ही त्यांची बिरुदे होती. नंतरच्या पिढीतील लघुकथाकारांत शीर्षेदू मुखोपाध्याय, दिव्येंदू पालित, मती नंदी, सुनील गंगोपाध्याय, श्यामल गंगोपाध्याय, बरेन गंगोपाध्याय (१९३०-), अभियभूषण मजुमदार, अतीन बंदोपाध्याय, दीपेंद्रनाथ बंदोपाध्याय (१९३३-), संदीपन चतर्जी, शंकर चतर्जी (१९३३-), सैय्यद मुस्तफा सिराज, प्रफुल्ल राय, कविता सिंह (१९३२-), आनंद बगची (१९३३-), लोकनाथ भट्टाचार्य (१९२७-), ज्योतिर्मय गांगुली, समीर रक्षित, समरेश मजुमदार, फणीभूषण आचार्य (१९३१-), बलराम बसाक (१९३४-) अशी भली मोठी नामावली सांगता येईल. या तरुण कथाकारांनी स्वतःचे स्थान व्यासपीठावरील उच्चासन हे न मानता समोरचा अफाट, अनाम जनसंमर्द हे मानले. प्रत्येक माणूस हाच एकेक गाथा असतो. त्या गाथेतील अनंत कथांना शब्दरूप द्यायचे काम या नवकथाकारांनी केले. माणसाचे सखोल अंतरंग, त्याची असहायता, त्याचा स्वतःच्या जीवनाबाबतचा हळवेपणा, त्याचे विकारविश्व, त्यातील व्यामिश्रता आणि कल्लोळ या सर्वांचे तत्क्षणिक दर्शन या कथाकारांच्या कथांत घडत राहते. कथाकारागणिक बदलत असेल, तर फक्त शब्दशैलीचा आणि अभिव्यक्तीचा ज्याचा त्याचा स्वतःचा ठसा. प्रबोधन, उपदेश, तात्पर्य इ. तर दूरच, घटनानिवेदन वा रंजक कथनही या मंडळींनी प्रधान घटक मानले नाही. परिणामी लघुकथा हा वाङ्‌मयप्रकार अनेक अंगांनी फुलत राहिला, संपन्न झाला.

कथेकडून वळायचे कवितेकडे. नव्या मनूची नवी कविता लक्ष वेधून घेते ती तिच्या भावसंपन्नतेने. आधीच्या कवींचा उरलासुरला आदर्शवाद, नीतिवाद, आर्ष आणि अभिजात सौंदर्यबोध या नव्या कविजनांनी झुगारून दिला आणि केवल, विशुद्ध भावसौंदर्याचा ध्यास घेतला. सृष्टीतील स्वाभाविक सौंदर्याचा गोडवा शब्दांच्या माध्यमातून प्रकटणाऱ्या अभिव्यक्तीस कसा साधेल याची त्यांना तळमळ लागली. कोणत्याही बाह्य उद्देशाने प्रेरित नसलेली सौंदर्यभावना त्यांना अभिप्रेत आहे. निखळ, उद्दिष्टरहित, तत्त्वशून्य भावविश्व ते साकारतात. ‘कविता कथन करीत नसते. कविता नुसती असते’ या आर्चिबल्ड मक्‌लीशच्या शब्दांत हा अत्याधुनिक काव्यधर्म प्रकटतो. आधीच्या पिढीतील मातबर कवींनी स्वतःच्या रवींद्रभिन्न काव्यनिर्मितीने यांचा मार्ग प्रशस्त केला होता. सुनील गंगोपाध्याय यांनी १९५४ मध्ये प्रस्थापितांना विरोध करणारी कृत्तिवास हे मासिक काढले आणि कलावंतांना एका नव्या बांधीलकीची जाणीव करून दिली. महाविद्यालयात शिकणाऱ्या या तरुण कवीने आरंभी फणीभूषण आचार्य, मोहित चतर्जी (१९३५-), शिवशंभू पाल (१९३४-), दीपक मजुमदार, आनंद बागची व नंतरच्या काळात शंख घोष (१९३२-), अलोकरंजन दासगुप्त (१९३३-), अरविंद गुह (१९२८-), शरत्कुमार मुखोपाध्याय (१९३०-), उत्पलकुमार बसू (१९३६–) इ. तरुण कवींच्या संगतीत काव्यक्षेत्रात एक नवीन पताका फडकाविली. कवितेने भारावून घेलेले हे कवी जणू कवितेसाठीच जगत होते. त्या काळी गद्यलेखन करणारा आणखी एक युवक शक्ती चतर्जी (१९३३-) हा लवकरच त्यांना येऊन मिळाला आणि सर्वस्वानिशी त्याने कवितेच्या महासागरात स्वतःस झोकून दिले. समकालीन बंगाली कवितेच्या क्षेत्रात या कृत्तिवास-गटाची कामगिरी महत्त्वाची आहे. हे आणि त्यांच्याच वळणाने जाणारे अगणित नवीन कवी आदिम कवींच्या द्रष्टेपणाजवळ जाऊन भिडेल अशी केवल कविता लिहू पाहत आहेत. नीरेंद्र चक्रवर्ती (१९४४-), अरुण मित्र (१९०९-), अरुणकुमार सरकार (१९२१-८०), आलोक सरकार (१९३२), तारापद राय (१९१६-), शरत्‌कुमार मुखोपाध्याय, कविता सिंह, शंकर चतर्जी, कालीकृष्ण गुह, शमसुल हक, समशीर अन्वर, विजया मुखोपाध्याय, सुभाष घोषाल, सुब्रत रुद्र (१९४७-), नवनीता देव-सेन, देवारती मिश्र, देवाशीष बंदोपाध्याय, प्रदीपचंद्र बसू, तपन बंदोपाध्याय, दिलीप दाशगुप्त, लोकनाथ भट्टाचार्य, शुभरंजन दाशगुप्त, देवीप्रसाद बंदोपाध्याय, पवित्र मुखोपाध्याय (१९४०-), बीरेंद्र चतर्जी (१९२०-) अशी त्यांची गणती तरी किती करावी ? एकट्या कलकत्ता शहरातच किती हजार कवींची वसती असावी, याची शिरगणती करण्याचा खटाटोप एका कवीने आरंभला होता व अखेर हार मानून तो सोडून दिला. गेल्या पंचवीस वर्षांत लघुनियतकालिकांचे (लिट्ल मॅगेझिन्स) व अनियतकालिकांचे उदंड पीक बंगालमध्ये आले. कविता भातशेतीसारखी अमाप पिकली. कवितांची साप्ताहिकेच नव्हे, तर दैनिकेही निघाली. टूम म्हणून तासागणिक निघणारी ‘घंटिकी’ पत्रिकाही निघाली. अशा अनावर उत्साहाने काव्यप्रसुती घडवणारा बंगाल कदाचित एकमेव प्रांत असेल. या लघुनियतकालिकांनी खास करून साहित्यक्षेत्रातील मूर्तिभंजनाचे काम दरोबस्त पार पाडले आणि साहित्यातील शुद्ध काला रसिकांना आकळावी म्हणून डोळसपणे चळवळ चालविली.


कवितेच्या क्षेत्रातील आणखी एक उद्रेक म्हणजे साम्यवादी विचारांचा काव्यपंथ. बिष्णू दे, सुभाष मुखोपाध्याय (१९२०-), शंख घोष, अचलकुमार बसू (१९३८-), सुकांत भट्टाचार्य (१९२६-४७) अशा कितीतरी कवींच्या रचनेत मार्क्सवादाचा स्पष्ट प्रभाव आहे. सुकांत भट्टाचार्य यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी लिहिलेली कविता अनेक वयोज्येष्ठ कविश्रेष्ठांच्या कवितेहून अधिक सरस वाटते. छाडपत्र (१९४७), घूम नेई (१९५०), मिठेकडा (१९५१), अभियान (१९५७) ह. त्यांच्या काव्यग्रंथांत साम्यवादाचा लाल रंग ठळक असूनही तो त्यांची कविप्रतिभा लपवत नाही. पदातिककर्ते सुभाष मुखोपाध्याय हेही मार्क्स-लेनिनची शिकवण सतत मनात बाळगून कविता लिहिणारे एक श्रेष्ठ कवी. यत दुरेई जाई या त्यांच्या काव्यसंग्रहास १९६४ साली साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. सुकांत आणि सुभाष यांच्या कवितांतील कित्येक पंक्ती आज जनसामान्यांच्या जिभेवर खेळतात हे त्यांच्या कवियशाचे एक गमक मानता येईल. सुकांत यांची ‘रनर’ ही कविता एखाद्या लोकगीतासारखी जनमानसात मुरली आहे.

बंगाली कवितेत १९६० नंतर येऊन गेलेली एक लाट म्हणजे भुक्या वा संतप्त पिढीची लाट. पाश्चिमात्य राष्ट्रांतील संतप्त तरुणांनी हे बियाणे भारतात पोहोचविले. ॲलन गिन्झबर्ग (१९२६-) हा तरुण अमेरिकन ‘बीट’ कवी त्यांचा म्होरक्या होता. सर्वतंत्रस्वतंत्रतेचा उद्‌घोष करता करता या कवींपैकी कित्येकांनी विचित्र वर्तनाचे अतिरेक केले. बोथटलेल्या समाजमानसात धक्के देऊन जाग आणण्यासाठी नवतेचे पुरस्कर्ते सर्वत्र सर्वकाल काही जगावेगळे करीत असतात, हे मान्य करूनही या अतिनवकवींच्या वाङ्‌मयीन आविष्काराचे समर्थन करणे जड जाते. बीभत्सता, अश्लीलता, विद्रुपता ही साहित्याची शाश्वत लक्षणे बनू शकत नाहीत. बंडखोरी वा बेदरकारीची बिरुदेही काही काळ मिरवता येतात. प्रस्थापित मूल्यांचे मंथन करण्यापुरता अशा उद्रेकांचा लाभ होतो. परंतु अखेर हे उसने अवसान ओसरते. या चळवळीची परिणतीही अशीच झालेली आढळते.

बंगालच्या भावजीवनात कवितेचे स्थान सर्वोच्च आहे. १९५५ साली साहित्य अकादेमीने वार्षिक पुरस्कार चालू केले, तेव्हापासून १९७७ पावेतो ९ बंगाली काव्यग्रंथांना अकादेमी सन्मान लाभला, (मराठीत १९७७ साली कवी अनिलांच्या दशपदीस तो प्रथमच लाभला), हा दाखला याचाच निदर्शक आहे.

बंगाली रंगभूमीने गेल्या पंचवीस-तीस वर्षांत डोळे दिपवून टाकणारी प्रगती साधली असली, तरीही बंगाली नाट्यवाङ्‌मय पुरेसे समृद्ध नाही असेच म्हणावे लागेल. इब्सेन, बेकेट, यानेस्कू, आन्वीप्रभृती श्रेष्ठ विदेशी नाटककरांच्या गाजलेल्या कृतींचे चांगले अनुवाद बंगालीत उपलब्ध आहेत व त्यांचे प्रयोगही होतात. परंतु रवींद्रनाथांच्या नाटकांनंतर त्या अमृताच्या ताटात बसतील अशा श्रेष्ठ नाट्यकृती क्वचितच लिहिल्या गेल्या. स्वातंत्र्यआंदोलनातून उद्‌भवलेल्या कलापथकांनी भारतीय गणनाट्यसंघ (इंडियन पीपल्स थिएटर ॲसोसिएशन) या चळवळीस जन्म दिला. मनोरंजन भट्टाचार्य (१८८९-१९५४), शंभू मित्र, गंगापद बसू (१९१०-७१) इ. नाट्यवेड्या मंडळींच्या पुढाकाराने ‘बहुरूपी’सारखी नाट्यसंस्था अवतरली. बिजन भट्टाचार्य (१९१४-७८) यांचे नवान्न (१९४४) नाटक हे या मंथनातून बाहेर पडलेले एक रत्न. त्यात दुष्काळग्रस्त वंगभूमीच्या पार्श्वभूमीवर गरिबांची हलाखी आणि विटंबना प्रक्षोभक रूपात अवतरते. बिजनबाबूंनंतर तुलसीदास लाहिडी (१८९७-१९५९) यांची दुःखीर ईमान (१९४७) छेडा तार (१९५२) उलूखागडा पथिक (१९५१), बांगलार माटी (१९५४) इ. नाटके दिगिंद्र बंदोपाध्याय (१९१०-) यांची तरंग (१९४७), वास्तुमिटा (१९५०), मोकाबिला (१९५५), अंतराल (१९५६) इ. नाटके सलिल सेन यांची नूतन यहुदी (१९५५), मौचोर (१९५७), डाऊन ट्रेन (१९५९) इ. नाटके उल्लेखनीय आहेत. ‘धनंजय बैरागी’ या टोपणनावाने लिहिणारे तरुण राय (१९२७-), शंभू मित्र व उत्पल दत्त (१९२९-) या तिघांनी आधुनिक बंगाली रंगभूमीच्या इतिहासात नाटककार, नट, दिग्दर्शक, निर्माते व रंगभूमीचे विचारवंत म्हणून बहुमोल कामगिरी बजाविली आहे.

शॉन ओकेसी, एलियट, ओनील, टेनेसी विल्यम्स, झां पॉल सार्त्र, काम्यू, पीरांदेल्लो, गार्सीआ लॉर्काप्रभृती पाश्चिमात्य नाटककारांच्या कृतींच्या अनुवादांमुळे तरुण नाटककारांना नवे धडे मिळत आहेत. विशेषतः बर्टोल्ट ब्रेक्ट या साम्यवादी जर्मन नाटककाराच्या नाट्यकृतींनी व विचारांनी प्रभावित झालेली ‘एपिक थिएटर’ चळवळ आज बंगाली रंगभूमीस नवे बळ देत आहे. बादल सरकार (१९२५-) व मोहित चतर्जी हे आजच्या बंगाली नाटकांचे आशास्थान म्हणता येतील. दोघेही कवी म्हणून साहित्यसंसारात अवतीर्ण झाले. उभयतांच्या नाटकांत काव्यात्मता-लिरिसिझम-असतेच. बादलबाबूंची सारा रात्तिर, बडो पिशिमा (१९६१), रामश्याम जदु (१९६३), एवम् इंद्रजित (१९६८), बल्लमपुरेर रूपकथा, प्रलाप, बाकी इतिहास (१९६९), पगला घोडा, त्रिंशे शताब्दी इ. नाटके गाजली. त्यांच्या सर्वच नाटकांत समकालीन समाजाशी ससंदर्भ समतानता आढळते. माणसाच्या समस्यांशी प्रतिबद्धता-बांधिलकी-त्यांच्या नाटकांचा प्राणभूत विशेष आहे. निखळ विनोदी नाटकांतही त्यांचे हे भान सुटत नाही. यशस्वी नाटककार म्हणून मिळालेल्या कीर्तीवर संतुष्ट न राहता त्यांनी ‘शताब्दी’, ‘नक्षत्र’, ‘अंगणमंच’ इ. आपल्या समानशील सहकाऱ्यांच्या संघांद्वारा सतत नवनव्या कल्पना रंगभूमीवर खेळविल्या. परदेशातील वास्तव्यात आर्तो, ग्रॉटॉव्ह्‌स्की, शेकनर इ. ‘आवाँगार्द’-अग्रेसर-नाट्यनिपुणांच्या सहवासात गिरविलेले ‘पुअर थिएटर’, ‘एरीना थिएटर’, ‘इंटिमेंट थिएटर’, ‘नॉन-व्हर्बल थिएटर’ असे नवतेचे धडे प्रत्यक्षात उतरविण्याचे बहुमोल कर्तृत्व त्यांनी आत्मविश्वासाने गाजविले. स्पार्टांकुस, मिछिल, सगीना महतो, अबु हसन- भोमा सुखपाठ्य भारतेर इतिहास इ. त्यांची अलीकडील नाटके या नवमतानुसारी प्रायोगिक पठडीतील असून बंगाली नाटक वाङ्‌मयास सर्वस्वी नवी दिशा दाखविणारी ठरतात.

निबंधक्षेत्रात रवींद्रनाथ आणि प्रमथ चौधुरीनंतर नाव घ्यावे लागेल अतुलचंद्र गुप्त (१८८४–१९६१) यांचे. काव्यजिज्ञासा (१९२८) सारखे त्यांचे ग्रंथलेखन अल्प असले, तरी त्याचे मूल्य चिरस्थायी मानले जाते. सुधींद्रनाथ दत्त, बुद्धदेव बसू, विष्णू देप्रभृती कवींनी निबंध व समीक्षापर लेखन केले आहे. धूर्जटीप्रसाद मुखोपाध्याय व शिवनारायण राय यांचे वैचारिक निबंधही स्मरणीय ठरतील. अन्नदाशंकर राय हे तर आधुनिक निबंधकारांचे अग्रणी मानता येतील. सरळ, प्रांजळ भाषा निर्मळ प्रसन्न स्वभाव चिंतनशील आणि अभिनिवेशरहित विवेचनशक्ती यांमुळे त्यांचे दहा-बारा निबंधसंग्रह वाचनीय आणि अभ्यसनीय ठरतात. ⇨सुनीतिकुमार चतर्जी (१८९०–१९७७), सुकुमार सेन (१९००–), शशिभूषण दासगुप्त (१९१२–६४), नीहाररंजन राय (१९०४–), श्रीकुमार बंदोपाध्याय (१८९२–१९७०), देवीप्रसाद चतर्जी (१९१८–), प्रमथनाथ बिशी, बिनय घोष (१९१८–), असितकुमार बंदोपाध्याय (१९२०–), चित्तरंजन बंदोपाध्याय (१९१५–) इ. साहित्यिकांची वैचारिक निबंधनिर्मिती बंगाली साहित्याचे चिरभूषण आहे. प्रबंधसाहित्य, इतिहास, सारस्वत, समकालीन, चतुरंगसारखी कितीतरी दर्जेदार नियतकालिके या शाखेस आजही नित्य पुष्ट करीत आहेत.

बंगालीत निबंधास ‘प्रबंध’ म्हणतात. मराठीत ज्याला ‘लघुनिबंध’ म्हणतात त्याची व ललित लेखांची गणना बंगालीत ‘रसरचना’ वा ‘रम्यरचना’ या शाखेत करतात. बंकिमचंद्रांचे कमलाकांतेर दप्तर (१८७५) बंगालीतील प्रथम श्रेष्ठ ललित निंबंधरेखन म्हणता येईल. त्यानंतर रवींद्रनाथांचे विचित्र प्रबंध (१९०७) आठवतात. बलेंद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर, प्रमथ चौधुरी यांचा उल्लेख पूर्वी झालाच आहे. धूर्जटीप्रसाद, बुद्धदेव, बिनय घोष यांनीही या शाखेत रसपूर्ण रचना केली. बिमलाप्रसाद मुखोपाध्याय, ज्योतिर्मय राय, ज्योतिर्मय घोष ‘भास्कर’ (१९३१–) व आजकाल वृत्तपत्रीय स्तंभलेखनामुळे विशेष ख्याती पावलेले ‘नीललोहित’ (सुनील गांगुली), ‘रूपदर्शी’ (गौरकिशोर घोष), संतोषकुमार घोष (१९२०–), सागरमय घोष (१९१५–) यांची नावेही स्मरणीय ठरतात. राणी चंदा (१९११–) यांची रवींद्रनाथ (१९४२), पूर्णकुंभ (१९५२), जनाना फाटक (१९६८), आलापचारी इ. पुस्तके म्हणजे बंगाली गद्याची लेणीच आहेत. रम्यरचनेच्या क्षेत्रात सैयद मुजतबा अली (१९०४–७४) यांचे नाव अनामिकेवर गणावे लागेल. त्यांचा देशेविदेशे (१९४९) हा ग्रंथ म्हणजे ललित निबंध, इतिहास, प्रवासवर्णन, दैनंदिनी, कथाकथन, विनोद आणि उपरोध यांचे अपूर्व मिश्रण आहे. चारुचंद्र भट्टाचार्य ‘जरासंघ’ (१८८२–१९६१) यांचा लौहकपाट (१९५४) ग्रंथ, अन्नदाकिशोर मुनशी यांची डाक्तरेर डायरी (१९५७), धीरज भट्टाचार्य (१९०५–५९) यांचे जखन पुलिस छिलाम (१९५४) इ. पुस्तके याच क्षेत्रात गण्यमान्य ठरतात.


विनोद आणि उपहासमूलक साहित्यरचनेत बंगाली साहित्यिकांनी नजरेत भरण्यासारखी कामगिरी बजाविली आहे असे आढळत नाही. ‘विनोदासाठी विनोद’ न लिहिता बहुसंख्य साहित्यिकांनी ओघाने आलेला उत्स्फूर्त, नर्म विनोदच स्वीकार्य मानलेला दिसतो. विनोदाचे मध्ययुगीन साहित्यातील दाखलेही मिळतात परंतु एकूण आधुनिक साहित्यात इंग्रजीच्या परिचयानंतरच विनोदवाटिका फुलली. भवानीचरण बंदोपाध्याय, ईश्वरचंद्र गुप्त, हेमचंद्र बंदोपाध्याय यांच्या उपरोधिक किवता, नाटककार द्विजेंद्रलाल राय यांची हास्यगीते, रवींद्रनाथांच्या खापछाडा (१९३६) आणि उपहासिनीमधील कविता, सुकुमार राय चौधरी (१८८७–१९२३) यांचे –य–ब–र– (१९४५) किंवा आबोल ताबोल (१९५९) सारखे विशुद्ध विनोदाचे निर्झर, राजशेखर बसू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अवखळ लेखन जमेस धरूनही बंगाली साहित्यातील धारा क्षीणप्रायच भासते. आधुनिक काळात शिवराम चक्रवर्ती (१९०३–), अतिकृष्ण बसू (१९१२–), परिमल गोस्वामी (१८९७-१९७६), कुमारेश घोष (१९१४–) हिमानीश गोस्वामी इ. मोजकी नावेच विनोदी लेखकांची म्हणून सांगता येतील.

जोशी, श्री. बा.

बालवाङ्‌मयाच्या अभ्यासकांनी बंगाली बालवाङ्‌मयाची चार प्रमुख पर्वे मानली आहेत : (१) प्राचीन पर्व, (२) विद्यासागर पर्व, (३) रवींद्र पर्व व (४) आधुनिक पर्व. प्राचीने पर्वामध्ये प्रामुख्याने इसापच्या नीतिकथांची व पंचतंत्रादी इतर संस्कृत कहाण्यांची भाषांतरे येतात. १९१८ साली ‘कलकता स्कूल बुक सोसायटी’ची स्थापना झाली. पाठ्यपुस्तकांच्या रूपाने देशी-विदेशी कथांचे अनुवाद सुरू झाले. १८५१ मध्ये ‘भाषानुवादक समाज’ स्थापन झाला व त्यात सहसंपादक म्हणून काम करणारे मधुसूदन मुखोपाध्याय यांनी बालवाचकांसाठी अनुवादक या नात्याने फार परिश्रम केले. दुसऱ्या विद्यासागर पर्वात बंगालीतून सुलभ गद्यात इतिहास, विज्ञान, थोरांची चरित्रे वगैरे साहित्य निर्माण होऊ लागले. केशवचंद्र सेन बालकबंधु (१८७८) हे पाक्षिक बालवाङ्‌मयातील एक महत्त्वाचा टप्पा ठरते. १८८४ मध्ये ठाकुरवाडीतून बालक हे असामान्य नियतकालिक सुरू झाले आणि बालवाङ्‌मयाचा खरा सुवर्णकाळ सुरू झाला. याच पत्रकातून रविंद्रनाथांनी प्रथम बालवाचकांसाठी गोष्टी व नाटके लिहिण्यास सुरूवात केली आणि मनोरंजक बालवाङ्‌मयनिर्मिती करून बालवाङ्‌मयाला पाठशाळेच्या कुंपणातून बाहेर काढले. अवनींद्रनाथ टागोरांचीही शकुंतला (१८९५) व क्षीरेर पुतुल (१८९६) ही पुस्तके या बाबतीत उल्लेखनीय आहेत. यावेळीच भुवनमोहन राय यांचे सखा ओ साथी (१८९४) व आचार्य शिवनाथ शास्त्री यांचे मुकुल (१८९५) ही मुलांची मासिके सुरू झाली. हेमेंद्रप्रसाद घोष यांचे आषाढ गल्प (१९०१) व योगींद्रनाथ सरकारांचे छबीर बई (१९०२) ही अगदी लहान मुलांसाठी लिहिलेली सचित्र पुस्तके आकर्षक ठरली. मनोमोहन सेन यांचे बालचित्तहर्षक खोकार दप्तर (१९०२, दोन खंड) आणि उपेंद्रकिशोर रायचौधुरी यांचे जीवजंतुविषयक माहितीचे सचित्र निवेदन करणारे सेकालेर कथा (१९०३) ही पुस्तके चिरनूतन स्वरूपाची आहेत. डाक्याहून निघणारे अनुकूलचंद्र शास्त्री संपादित तोषिणी (१९१०) हे एक सुंदर नियतकालिक होते. यात कथा, कविता, कादंबरी, इतिहास, विज्ञान, इत्यादींचा मनोरंजकपणे परिचय देऊन मुलांच्या सर्वांगीण उन्नतीवर भर दिलेला आढळतो. प्राचीन लोकवाङ्‌मयातील रूपककथा व बालकथांचे संशोधन व संकलन करून दक्षिणारंजन मित्रमजुमदार यांनी ठाकुरमार झुली (१९०७) हा अद्वितीय ग्रंथ प्रकाशित केला. १९१४ मध्ये उपेंद्रकिशोर रायचौधुरी यांचे संदेश हे नियतकालिक सुरू झाले आणि बंगाली बालवाङ्‌मयास बहर आला. यात मुलांसाठी मजेदार व्यंगचित्रे, चित्रकथा इ. प्रथम प्रकाशित होऊ लागल्या. याअगोदरच विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आशुतोष मुखोपाध्याय यांनी रूढीग्रस्ततेविरुद्ध लेखणी उचलून किशोरवाचकांसाठी मूत-पेन्ती (१९०२) व राक्कसे-काक्कसे (१९०३) ही पुस्तके लिहिली. १९०२ मध्ये रवींद्रनाथांचा शिशु हा कवितासंग्रह व त्यानंतर पाच वर्षांनी मुकुट हे नाटक प्रसिद्ध झाले. बालक मासिकांच्या संपादिका ज्ञानदानंदिनीदेवी यांची टाकडुमाडुम (१९१०) व सात भाई चंपा (१९१०) ही पुस्तकेही उल्लेखनीय आहेत. उपेंद्रकिशोर रायचौधुरीचे संदेश या पार्श्वभूमीवर अवतरले. उपेंद्रकिशोरांनंतर १९१७ ते ३३ पर्यंत सुकुमार रायचौधुरी यांनी संदेशचे संपादन केले. या काळात बालवाङ्‌मयलेखकांची एक महत्त्वाची नामावली तयार झाली : उपेंद्रकिशोर रायचौधुरी, सुकुमार रायचौधुरी, सुविनय राय, कुलदारंजन राय, सुखलता राय, लीला मजुमदार, पुण्यलता चक्रवर्ती, देवव्रत रायचौधुरी इ. लेखक महत्त्वाचे. संदेशमध्ये प्रसिद्ध झालेल्या गोष्टी व कविता एकत्रित करूनच सुकुमार रायचौधुरी यांची आबोल ताबोलह-य-र-ब-ल ही पुस्तके त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली. मौचाक (१९२१), शिशुसाथी (१९२२) व खोकासुकु (१९२३ संपादक अनुक्रमे–सुधींद्रचंद्र सरकार, आशुतोष हर व निशिकांत सेन) ही नियतकालिके बालवाचकांसाठी सुरू झाली. मौचाकमधून क्रमशः प्रसिद्ध झालेल्या हेमेंद्रकुमार राय यांच्या जकेर धन (१९२३), मयना मतीर मायाकानन (१९२६) या कादंबऱ्या आणि सौरिंद्रमोहन मुखोपाध्याय यांचे लाल कुठी हे नाटक खूप गाजले. १९३० नंतर एकापाठोपाठ रामधनु, साजि, मास-पयला, रंग मशाल इ. अनेक नवनवीन नियतकालिके सुरू झाली व होत आहेत. यांतून लिहिणारे बालवाङ्‌मयाचे प्रमुख लेखक–मनोरंजन भट्टाचार्य, बिभूतिभूषण बंदोपाध्याय, प्रेमेंद्र मित्र, अचिन्त्यकुमार सेनगुप्त, शैलजानंद मुखोपाध्याय, सरोजकुमार रायचौधुरी, नृपेंद्रकृष्ण चतर्जी, बुद्धदेव बसू, शिवराम चक्रवर्ती, अखिल नियोगी, धीरेंद्रलाल धर, बिमलकुमार घोष ‘मौमाछी’, चारुचंद्र चक्रवर्ती, मोहनलाल गंगोपाध्याय, शैलबाला घोषजाया, क्षितींद्रनारायण भट्टाचार्य, लीला मजुमदार, मणींद्र दत्त, आशापूर्णादेवी, शशिभूषण दासगुप्त, खगेंद्रनाथ मित्र, बिशू मुखोपाध्याय इ. बंगाली बालवाङ्‌मयाचा पसारा जवळजवळ प्रौढ साहित्याइतकाच विशाल व बहुरंगी आहे आणि प्रौढांसाठी लिहिणाऱ्या लेखकांनी तितक्याच उत्साहाने बालवाङ्‌मय लिहिले आहे.

बंगालीत कोशनिर्मितीचे कार्य एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले. राजा राधाकांत देव (१७८४–१८६७) आणि कृष्णमोहन बंदोपाध्याय हे या बाबतीतील अग्रणी. राधाकांत देव यांचा संस्कृत शब्दकल्पद्रुम (१८२२–५८) म्हणजे शब्दकोश व ज्ञानकोश यांचा समन्वयच होय (एकूण आठ खंड). त्यानंतर सुप्रसिद्ध पंडित तारानाथ तर्कवाचस्पती (१८१२–८५) यांनी अठरा वर्षे परिश्रम करून वाचस्पत्य हा पाच खंडांचा शब्दकोश तयार केला. विल्यम कॅरी यांचे पुत्र फीलिक्स कॅरी (मृ. १८२२) यांनी १९१९ ते २१ या काळात एन्‌सायक्लोपिडीया ब्रिटानिकाच्या धर्तीवर विद्याहारावलीनामक कोशाची योजना आखली व ‘व्यवच्छेदविद्या’ शीर्षकाचा प्रथम खंड आणि ‘स्मृतिशास्त्र’ नामक द्वितीय खंडाचा काही अंश प्रकाशित केला. याच काळातील कालीकृष्ण देब बहादुर (१८०८–७८) संकलित संक्षिप्त सद्विद्यावलि (१८३३) हा ग्रंथही उल्लेखनीय आहे. त्यानंतर कृष्णमोहन बंदोपाध्याय यांचा एकूण सतरा खंडांत प्रकाशित झालेल्या विद्याकल्पद्रुम अथवा एन्‌सायक्लोपिडीया बेंगालेन्‌सिज (१८४६–५१) हा ग्रंथ बाहेर आला पण सर्वसामान्य बंगाली माणसास विदेशी ज्ञानशास्त्रांची माहिती देणे हाच या ग्रंथाचा प्रधान हेतू असल्यामुळे त्याला खऱ्या अर्थी ‘विश्वकोश’ म्हणावे की नाही याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. बंगाली विश्वकोशाच्या इतिहासात नगेंद्रनाथ बसू (१८६६–१९३८) संपादित विश्वकोश हाच आजपर्यंतचा एकमेव व सुसंपूर्ण ज्ञानकोश होय. याची मुहूर्तमेढ रंगलाल मुखोपाध्याय (१८४३– ? ) व त्रैलौक्यनाथ मुखोपाध्याय यांनी केली होती. प्रथम खंड १८८६ साली प्रसिद्ध झाला. एकूण बावीस विशाल खंडांमध्ये प्रकाशित झालेला हा विश्वकोश नगेंद्रनाथ बसू यांच्या हस्ते १९११ मध्ये पूर्ण झाला. या विश्वकोशाची परिष्कृत द्वितीयावृत्ती काढण्याचे काम नगेंद्रनाथांच्या मृत्यूमुळे अपुरे राहिले. १९३८ मध्ये नगेंद्रनाथ व अमूल्यचरण विद्याभूषण (१८७७–१९४०) यांनी बंगीय महाकोश ग्रंथाचे काम सुरू केले होते पण उभयतांच्या मृत्यूमूळे हे कार्य खंडित झाले. आतापर्यंत वर्णिलेले हे सर्व प्रयत्न वैयक्तिक स्वरूपाचे होते. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय सरकार व पश्चिम बंगाल सरकार यांच्या आर्थिक साहय्याने ‘बंगीय साहित्य परिषद’ या संस्थेने भारतकोश या ग्रंथाची योजना १९५९ साली आखली. या कोशाचे एकूण पाच खंड प्रकाशित झाले (अनुक्रमे १९६४, ६६, ६७, ७० व ७३). या कोशाच्या संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून सुशीलकुमार दे यांनी काम केले. शिवाय सुनीतिकुमार चतर्जी, निर्मलकुमार बसू, रामगोपाल चतर्जी, शशिभूषण दासगुप्त, रमेशचंद्र मजुमदार, चिंताहरण चक्रवर्ती, गोपालचंद्र भट्टाचार्य, सजनीकांत दास इ. मंडळी संपादक मंडळावर होती.


केंद्रीय सरकारच्या वतीने मिळणारा ‘साहित्य अकादेमी पुरस्कार’ १९५५ साली सुरू झाली. तेव्हापासून १९८० पर्यंत हा पुरस्कार सु. १६ बंगाली लेखकांना मिळाला आहे. ‘रवींद्र पुरस्कार’ हा प्रादेशिक स्वरूपाचा सन्मान पश्चिम बंगाल सरकारने १९५० पासून सुरू केला. अमृत बझार पत्रिका, यु (जु) गांतर या वृत्तपत्रांतर्फे दरवर्षीच्या उत्कृष्ट ललित साहित्यग्रंथास ‘मतिलाल पुरस्कार’ आणि दरवर्षीच्या उत्कृष्ट संशोधग्रंथास ‘शिशिरकुमार पुरस्कार’ हे दोन पुरस्कार दिले जातात. आनन्दबाजार, हिंदुस्थान स्टँडर्डदेश या तीन नियतकालिकांतर्फे प्रतिवर्षी दोन बंगाली ग्रंथांना अनुक्रमे ‘प्रफुल्लकुमार स्मृति-पुरस्कार’ आणि ‘सुरेशचंद्र स्मृति पुरस्कार’ हे पुरस्कार १९५८ सालापासून दिले जातात. मौचाक या नावाच्या एम्. सी. सरकार अँन्ड सन्स यांच्या मालकीच्या नियतकालिकातर्फे ‘मौचाक पुरस्कार’ हा सन्मान प्रतिवर्षी बालवाङ्‌मयातील उत्कृष्ट ग्रंथास १९५८ सालापासून देण्यात येतो. उल्टोरथ नावाच्या चित्रपटविषयक नियतकालिकातर्फे दरवर्षीच्या उत्कृष्ट कवितासंग्रहास ‘उल्टोरथ पुरस्कार’ हा सन्मान १९५७ पासून देण्यात येतो. श्रीनरसिंहदास अग्रवाल यांनी दिल्ली विद्यापीठातर्फे १९४८ सालापासून दरवर्षीच्या श्रेष्ठ बंगाली ग्रंथास ‘नरसिंहदास बांगला पुरस्कार’ देणे सुरू केले. ‘बेंगॉल पब्लिशर्स’ या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेतर्फे पश्चिम बंगालबाहेर राहणाऱ्या बंगाली लेखकांच्या उत्कृष्ट ग्रंथास ‘जय बांगला पुरस्कार’ हा वार्षिक पुरस्कार देण्यात येतो. याशिवाय ‘निखिल बंग शिशुसाहित्य संमेलना’तर्फे दरवर्षी उत्कृष्ट बालवाङ्‌मयकृतीस ‘भुवनेश्वरी पदक’ ‘प्राणतोष घटक स्मृति संस्करण समिती’तर्फे दरवर्षीच्या उत्कृष्ट संशोधनग्रंथास ‘प्राणतोष घटक स्मृतिपदक’ सरोजकुमार रायचौधुरी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एका नवलेखकाच्या उत्कृष्ट प्रथम ग्रंथास ‘सरोजकुमार स्मृतिपदक’ कवी जीवनानंद दास यांच्या पत्नी लावण्य दास यांनी दिवंगत पतीच्या नावे सुरू केलेला ‘जीवनानंद दास पुरस्कार’ (हा दरवर्षी बांगला देशातील दोन उत्कृष्ट कवितासंग्रहांना देण्यात येतो) सारवान नियतकालिकातर्फे दावर्षीच्या उत्कृष्ट काव्यग्रंथास ‘पान्नालाल शील, नक्षत्र पुरस्कार’ समकालव्रतती या नियतकालिकांतर्फे दरवर्षी एका श्रेष्ठ बंगाली साहित्यकृतीस ‘समकाल, व्रतती साहित्य पुरस्कार’ (हा त्रिपुरा विभागातील बंगाली साहित्यिकांसाठी आहे) कलकत्ता विद्यापीठातर्फे दरवर्षी एका लेखिकेच्या उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘लीला पुरस्कार’ इ. अनेक वार्षिक पुरस्कार देण्यात येतात. येथे दिलेली माहिती स्वातंत्र्योत्तर काळातील पुरस्कार व पारितोषिकांपुरतीच मर्यादित आहे.

आलासे, वीणा

उपसंहार : बंगाली साहित्याचा हा धावता आढावा आणखी अनेक अंगांनी सांगोपांग विस्तारता येईल. साहित्याच्या मुख्य प्रवाहाचा मागोवा घेताना अशा अनेक उपायांची दखल घेता येत नाही. उदा., बंगाली साहित्यातील इस्लाम धर्मीयांची कामगिरी किंवा महिला साहित्यिकांची अशा विशिष्ट दृष्टिकोनांतूनही काही क्षेत्रे तपासता येतील. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, अरविंदबाबू, महात्मा विजयकृष्ण गोस्वामी ठाकूर अनुकूलचंद्र, मा आनंदमयी प्रभृती पुण्यात्म्यांमुळे धर्मप्रवण साहित्याचा केवढा मोठा पसारा येथे आकारास आला आहे. साहित्याच्या इतिहासात त्याचे विवेचन येऊ शकत नाही. त्याखेरीज चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवासवर्णनादी साहित्यशाखा, दैनंदिन्या, पत्रसंग्रह, लोकसाहित्य इ. अनेक साहित्यप्रकारांचा समाचार अशा शब्दांत आढाव्यात अस्पर्शित राहतो. वाङ्‌मयीन नियतकालिकांची कामगिरी, स्वतः पडद्याआड राहून लेखकांना घडविणाऱ्या युगांधर संपादकांची कामगिरी, साहित्याचा उदीम उर्जितावस्थेतच यावा म्हणून झटणाऱ्या निरलस प्रकाशकांची कर्तबगारी यांचाही ऋणनिर्देश या आढाव्यात करता आला नाही. या मर्यादा ध्यानी घेऊनच बंगाली साहित्याचे प्रस्तुत सर्वेक्षण वाचावे लागेल. विशेषतः आधुनिक काळातील साहित्यिकांचा विचार करताना चाळणी लावणे अवघड होत जाते. त्यांच्यापैकी कालाच्या कसोटीवर टिकणारे, अक्षर साहित्य कोणाचे किंवा आजच्या कोणत्या प्रवृत्ती या काळच्या कसोटीशीलेवर सोनरेखेसारख्या उत्तीर्ण ठरतील हे सांगणे अवघड आहे.

जोशी, श्री. वा.

संदर्भ : 1. Ali, Asraf Saiyyad, Muslim Traditions in Bengali Literature, Karachi, 1960.

2. Bose, Budhadev, An Acre of Green Grass, Bombay, 1948.

3. Dasgupta, Shashibhushan, Obscure Religious Cults as Background of Bengali Literature, Calcutta, 1946.

4. De, Sushilkumar, Bengali Literature in the Nineteenth Century, Calcutta, 1962.

5. Dutt, Romesh Chunder, Cultural Heritage of Bengal, Calcutta, 1962.

6. Ghosh, J. C. Bengali Literature, London, 1948.

7. Ray, Annadasankar Ray. Lila, Bengali Literature, Bombay, 1942.

8. Rayl, Lila, A Challenging Decade : Bengali Literature in the Forties, Calcutta, 1953.

9. Sen, Dineshchandra, History of Bengali Language and Literature, Calcutta, 1954.

10. Sen, Priyaranjan, Western Influence in Bengali Literature, Calcutta, 1932.

11. Sen, Sukumar, History of Bengali Literature, New Delhi 1960.