नाईक, पांडुरंग सातू: (१३ डिसेंबर १८९९ – २१ ऑगस्ट १९७६). चित्रपटक्षेत्रातील प्रसिद्ध छायाचित्रकार. जन्म गोव्यातील म्हार्दोळ या गावी. शिक्षण मराठी तिसऱ्या इयत्तेपर्यंत. १९१५ साली ते मुंबईला गेले. तेथे दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसंस्थेत प्रवेश करून छायाचित्रणातील अगदी प्राथमिक धडे फाळके यांच्या हाताखाली घेतले.

पुढे सहायक छायाचित्रकार म्हणून त्यांनी कोहिनूर फिल्म कंपनी, लक्ष्मी प्रॉडक्शन्स व रणजित फिल्म कंपनी इ. संस्थांमार्फत कामे केली. १९३४ मध्ये छायाचित्रणाचे अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी ते जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांत गेले होते. परदेशातून आल्यावर इंपीरिअल फिल्म कंपनीत त्यांनी प्रवेश केला. तेथे असतानाच १९३४ सालच्या इंदिरा एम्. ए. या बोलपटाच्या वेळी फळ्या बांधून तेथून प्रकाशयोजना करण्याचा अत्यंत यशस्वी प्रयोग त्यांनी केला होता. तो आजही अनेकांकडून अनुसरण्यात येतो. १९३६ साली मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्या भागीत हंस पिक्चर्सची स्थापना करून त्यांनी छाया (१९३६), धर्मवीर, प्रेमवीर (१९३७), ब्रह्मचारी, ज्वाला (१९३८), ब्रँडीची बाटली, देवता, सुखाचा शोध (१९३९), अर्धांगी (१९४०) या गाजलेल्या चित्रपटांचे उत्कृष्ट छायाचित्रण केले तर १९४० मध्ये आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, मा. विनायक व राजगुरू यांच्या नवयुग फिल्म कंपनीचा लग्न पहावं करून (१९४०) हा चित्रपट पांडुरंग नाईक यांनी चित्रित केला होता. १९४१ सालच्या अमृत या कोकणच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटात वि. स. खांडेकर यांचे शब्दसौंदर्य नाईकांच्या छायालेखनानेच साकार झाले होते. १९४२ साली बाबूराव पेंढारकर व पांडुरंग नाईक यांनी न्यू हंस या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. या संस्थेने पहिला पाळणा, भक्त दामाजी (१९४२) व पैसा बोलतो आहे (१९४३) हे चित्रपट सादर केले. त्यांचे छायालेखन नाईकांनीच केले होते. पुढे त्यांनी १९४४ साली प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश करून रामशास्त्री (१९४४) व लाखारानी (१९४५) या चित्रपटांचे छायालेखन केले, तसेच गोयलच्या चिराग कहाँ रोशनी कहाँ या हिंदी चित्रपटाचे छायालेखनही त्यांचेच होते. हाच त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत चित्रित केलेला शेवटचा चित्रपट होता, तर गोयलचाच दूर की आवाज हा त्यांनी चित्रित केलेला पहिला रंगीत चित्रपट होता. आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता हे त्यांच्या छायालेखनाचे वैशिष्ट्ये होते. वयाच्या ७६व्या वर्षी मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. नाईकांचा ‘अँगल’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक संस्मरणीय विशेष होय.

वाटवे, बापू