प्रजापति – २:(युरेनस अथवा हर्शेल). सूर्यकुलातील सूर्यापासून वाढत्या अंतरांच्या क्रमानुसार हा सातवा ग्रह आहे. याच्या शोधाच्या आधी नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे बुध, शुक्र, (पृथ्वी), मंगळ, गुरू व शनी एवढेच ग्रह माहीत होते. यांतील सूर्यापासून सर्वांत दूरचा ग्रह शनी हा असून त्याच्या कक्षेच्या त्रिज्येच्या दुप्पट कक्षा-त्रिज्या प्रजापतीची आहे म्हणून याच्या शोधामुळे सूर्यकुलाची व्याप्ती आधीच्या दुप्पट झाली असे म्हणता येते. दूरदर्शकाच्या (दुर्बिणीच्या) साहाय्याने शोधून काढलेला पहिलाच ग्रह या दृष्टीने हा ग्रह महत्त्वाचा आहे.

शोध :ताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण करीत असताना विल्यम हर्शेल यांना १३ मार्च १७८१ रोजी अभावितपणे प्रजापतीचा शोध लागला. वृषभ व मिथुन या तारकासमूहांच्या सीमेवर वृषभातील बीटा व झीटा आणि मिथुनातील ईटा या ताऱ्यांच्या त्रिकोणात, सात इंची (१७·८ सेंमी.) परावर्तक दूरदर्शकातून पहात असताना त्यांना निळसर हिरवट रंगाचे एक चकतीच्या आकाराचे बिंब दिसले. तो एखादा धूमकेतू असावा असे प्रथम त्यांना वाटले. एक वर्षभर त्याचे वेध घेऊन त्यांची टिपणे हर्शेल यांनी केली. त्यांवरून ए. जे. लेक्सेल यांनी त्याची कक्षा निश्चित केली व ती जवळजवळ वर्तुळाकार आहे, असे निष्पन्न झाले (धूमकेतूंच्या कक्षा अतिविवृत्ताकार – अतिदीर्घवर्तुळाकार – असतात). तसेच धूमकेतूप्रमाणे त्याला शिखाही नाही असे दिसून आले. त्याचे सूर्यापासूनचे अंतर बोडे नियमानुसार [जे. ई. बोडे या ज्योतिर्विदांनी शोधलेल्या व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नियमानुसार ⟶ ग्रह] बरोबर आहे असे आढळून आले. या सर्व गोष्टींवरून तो एक नवा ग्रहच असला पाहिजे, असा निष्कर्ष काढण्यात आला.

नामकरण :इंग्लंडचे राजे तिसरे जॉर्ज यांच्या पदरी हर्शेल हे राजज्योतिषी होते म्हणून आपल्या आश्रयदात्याच्या सन्मानार्थ हर्शेल यांनी या ग्रहाला ‘जॉर्जियम साइडस्‌’ [जॉर्ज यांचा ग्रह (मूळ लॅटिन अर्थ ‘तारा’)] असे नाव दिले पण ते फारसे रूढ झाले नाही. हर्शेल यांनी शोधून काढला म्हणून काही लोकांनी त्याला हर्शेल हेच नाव दिले व अद्यापही हे नाव काही लोक वापरतात. इतर ग्रहांप्रमाणेच यालाही एखाद्या देवतेचे नाव द्यावे अशा कल्पनेने बोडे यांनी त्याला युरेनस (हा रोमन पुराणकथांनुसार सॅटर्नचा पिता होय) हे नाव सुचविले व त्यालाच सार्वत्रिक मान्यता मिळाली. जनार्दन बाळाजी मोडक यांनी त्याला प्रजापती हे अनुरूप भारतीय नाव दिले.

आधीची अवलोकने :सामान्यतः हा ग्रह दूरदर्शकामधून पाहिल्याशिवाय दिसत नाही हे खरे असले, तरी विशेष अनुकूल परिस्थितीत तो नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकतो. हर्शेल यांच्या आधी इ. स. १६९० मध्ये जॉन फ्लॅमस्टीड यांना तो दिसला होता पण त्यांना तो ताराच वाटला. १७६८-६९ मध्ये पी. सी. लमॉन्ये यांना तो आठ वेळा दिसला होता. आणखीही निरनिराळ्या १९ लोकांना तो वेळोवेळी दिसल्याच्या नोंदी आहेत. प्रजापतीची कक्षा निश्चित करताना या सर्व पूर्वावलोकनांचा फार उपयोग झाला.

कक्षा व कक्षीय गती :प्रजापतीची कक्षा विवृत्ताकार असली, तरी तिची विमध्यता (कक्षेच्या मध्यबिंदूपासून सूर्यापर्यंतच्या अंतराला कक्षेच्या अर्धबृहदक्षाने भागून येणारी राशी) अवघी ०·०४७१

इतकी अल्प असल्याने ती जवळजवळ वर्तुळाकार आहे, असे म्हणता येते. या कक्षेची पातळी व पृथ्वीची कक्षापातळी यांच्यामध्ये ०·७३° इतका अल्प कोन आहे. सूर्यापासून प्रजापतीचे कमाल अंतर सु. ३००·६ कोटी किमी., किमान अंतर सु. २७३·९ कोटी किमी. व सरासरी अंतर सु. २८७·७ कोटी किमी.आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यासाठी प्रजापतीला ८४·०१ वर्षे लागतात. सूर्याभोवती भ्रमण करताना प्रजापतीचा सरासरी वेग सु. ६०८ किमी. प्रती से. असतो. याच्या विषुववृत्ताची पातळी व कक्षापातळी यांच्यामध्ये ९७°·९ इतका मोठा कोन आहे, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. सूर्यकुलातील इतर सर्व ग्रहांच्या अक्षीय भ्रमणाच्या दृष्टीने या ग्रहाच्या अक्षीय भ्रमणाची दिशा उलट आहे. स्वतःच्या (आणि पृथ्वीच्याही) कक्षापातळीशी भ्रमण अक्षाचा कल अगदी कमी असल्याने त्याचे ध्रुव प्रदेशही ठराविक कालांतराने (४२ वर्षे, कक्षीय आवर्तनकालार्ध म्हणजे सूर्याभोवती एक प्रदक्षिणापूर्ण करण्यास लागणाऱ्या कालाच्या निम्म्या कालाने) पृथ्वीच्या किंवा सूर्याच्या अभिमुख होतात व तेथे जवळजवळ लंब रेषेत ऊन पडते १९०३ व १९४६ या वर्षी याप्रमाणे परिस्थिती होती. या घटनांच्या २१/२१ वर्षे आगेमागे प्रजापतीचे विषुववृत्तीय प्रदेश पृथ्वीला अभिमुख होतात १८८२ व १९२४ या वर्षी याप्रमाणे घडले. अशा वेळी त्याच्या बिंबावर विषुववृत्ताला समांतर असे काही पुसट पट्टे असल्याचे कधीकधी दिसते. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे याची गणितावरून मिळणारी कक्षा व निरीक्षणावरून मिळणारी कक्षा यांच्यामध्ये थोडी तफावत येत होती. तिच्यावरून प्रजापतीच्या पलीकडे विशिष्ट कक्षेत फिरणारा एखादा अज्ञात ग्रह असला पाहिजे, असे भाकित जॉन कूच ॲडम्स व यूरबँ झां झोझेफ लव्हेऱ्येयांनी १८४५-४६ मध्ये केले व त्यानुसार शोध करता जे. जी. गाले यांना ⇨वरुण(नेपच्यून) ग्रह अपेक्षित ठिकाणी सापडला. आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा हा मोठाच विक्रम मानला गेला.

वस्तुमान, आकारमान व अक्षीय भ्रमण :कोणत्याही ग्रहाच्या उपग्रहाचा कक्षीय आवर्तन काल व कक्षा-त्रिज्या यांचे मापन करून त्यांवरून त्या ग्रहाचे वस्तुमान काढता येते. या पद्धतीने प्रजापतीचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १४·५५ पट आहे, असे निष्पन्न झाले. तसेच कोणत्याही ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर व पृथ्वीवरून दिसणारा त्याच्या बिंबाचा कोनीय व्यास यांच्यावरून त्याचा प्रत्यक्ष व्यास काढता येतो. प्रजापतीचे पृथ्वीपासूनचे अंतर, तो पृथ्वीला जवळात जवळ असतानाही सु. २७० कोटी किमी. इतके प्रचंड असल्याने व अशा परिस्थितीतही त्याच्या बिंबाचा दृश्य व्यास मात्र केवळ सु. ३·६ से. इतका अल्प असल्याने त्याच्या मापनांत साहजिकच काही अनिश्चितता उरते आणि या मापनांवरून काढलेल्या त्याच्या प्रत्यक्ष व्यासाच्या बाबतीतही ती असल्याचे समजावे लागते. १९०२ साली केलेल्या मापनावरून प्रजापतीचा विषुववृत्तीय व्यास ५६,१०० किमी. आला. १९४९ सालच्या मापनावरून तो ४७,४०० किमी. आला. सध्या ५२,७०० किमी.हे मूल्य (± ५%) ग्राह्य समजतात. त्याचप्रमाणे प्रजापतीचा ध्रुवीय व्यास सु. ४८,७०० किमी.आहे व म्हणून त्याचा ‘चपटेपणा’ (विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यांच्यातील फरकाला विषुववृत्तीय व्यासाने भागून येणारी राशी) ०·०७६ आहे.

प्रजापतीचा स्वतःच्या अक्षाभोवतील भ्रमणाचा आवर्तन काल सु. १० तास ४९ मिनिटे आहे. म्हणजेच त्याचा अक्षीय भ्रमणाचा कोनीय वेग पृथ्वीच्यातुलनेने सुमारे दुप्पट आहे. अशा जबरदस्त अक्षीय भ्रमण वेगामुळे अत्यंत उष्ण व मृदू अवस्थेतून ग्रह तयार होत असतानाच त्याला चपटेपणा आला असावा. प्रजापतीचे शिष्ट गुरुत्व सु. १·१५ येते. पृथ्वीचे विशिष्ट गुरुत्व ५·५२ आहे. यावरून प्रजापतीची घटक द्रव्ये पृथ्वीपेक्षा वेगळी व अधिक हलकी असली पाहिजेत, हे स्पष्ट होते. हायड्रोजन, हीलियम, कार्बन, नायट्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांचे प्रमाण तेथे जास्त असले पाहिजे, असा अंदाज करता येतो.

दृश्य स्वरूप :प्रजापतीचा रंग हिरवट निळसर दिसतो. त्याचे कारण म्हणजे त्याच्या वातावरणात तांबड्या प्रकाशाचे विवेचक शोषण होत असले पाहिजे. त्याची दृश्य प्रत [तो पृथ्वीला सर्वांत जवळ असताना ⟶ प्रत] + ५·५ असते. पूर्ण अंधाऱ्या रात्री + ६·५ प्रतीपर्यंतचे तारे नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात, हे लक्षात घेता अनुकूल परिस्थितीत हा ग्रह दूरदर्शकाच्या मदतीशिवायही दिसू शकेल, हे लक्षात येईल.


वातावरण :प्रजापतीच्या वर्णपटात तांबड्या रंगाच्या भागात शोषण पट्ट [⟶ वर्णपटविज्ञान] आढळतात. हे पट्ट मिथेन वायूमुळे निर्माण होत आहेत, हे निश्चित झाले आहे. यावरून त्याच्या वातावरणाचा मुख्य घटक मिथेन आहे. त्याशिवाय प्रजापतीच्या वातावरणात हायड्रोजन, हीलियम, निऑन, अमोनिया, हायड्रोजन सल्फाइड व जलबाष्प हे घटकही असावेत. वर्णपटीय निरीक्षणांवरून प्रजापतीच्या वातावरणाच्या बाह्य भागाचे तापमान -१५०° से. ते -२००° से. असावे असे दिसते.

प्रजापती व त्याचे उपग्रह : (१) एरियल, (२) अंब्रियल, (३) टिटॅनिया, (४) ओबेरॉन, (५) मिरांडा, (६) प्रजापती ( या चित्रात प्रजापतीभोवती दिसणारे तेजोवलय केवळ छायाचित्रणामधून उत्पन्न झालेले आहे).

उपग्रह :१९४८ अखेरपर्यंत प्रजापतीच्या ५ उपग्रहांचा शोध लागलेला होता. यांतील पहिले दोन (ओबेरॉन व टिटॅनिया) हर्शेल  यांनी १७८७ मध्ये शोधून काढले होते. टिटॅनिया हा आकारमानाने सर्वांत मोठा असून त्याचा व्यास १,१०० किमी. आहे. प्रजापतीच्या सर्व उपग्रहांच्या कक्षा प्रजापतीच्या विषुववृत्ताच्या पातळीत आहेत. [⟶ उपग्रह]. हे सर्व उपग्रह प्रजापतीच्या अक्षीय भ्रमणाच्या दिशेनेच, पण अर्थात इतर ग्रहांच्या उपग्रहांच्या कक्षीय भ्रमणांच्या दिशेच्या उलट दिशेने, त्याच्याभोवती फिरत असतात. आकृतीमध्ये प्रजापती व त्याच्या ५ उपग्रहांचे २०८ सेंमी. छिद्रव्यासाच्या दूरदर्शकाच्या साहाय्याने घेतलेले छायाचित्र दिले आहे.

१० मार्च १९७७ रोजी भारतीय ज्योतिर्विद जे. सी. भट्टाचार्य व के. कुप्पुस्वामी यांनी १०२ सेंमी. छिद्रव्यासाच्या दूरदर्शकाच्या साहाय्याने प्रजापतीने एसएओ १,५८,६८७ या ताऱ्याच्या केलेल्या पिधानाचे [⟶ पिधान] निरीक्षण करून प्रजापतीचा सहावा उपग्रह शोधून काढल्याचा दावा केला. कदाचित हा उपग्रह ३ किंवा ४ छोट्या उपग्रहांचा पुंजकाही असण्याचा संभव आहे. या शोधाबद्दल अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही.

वलये :पृथ्वीच्या पृष्ठभागावर १२,५०० मी. उंचीवरून जाणाऱ्या जेट विमानातून प्रजापतीने वर उल्लेखिलेल्या ताऱ्याच्या केलेल्या पिधानांचे निरीक्षण त्याच दिवशी करून जे. एल्‌. एलियट, ई. डनहॅम व डी. मिंक या अमेरिकन शास्त्रज्ञांनी शनीप्रमाणे प्रजापतीभोवतीही वलये आहेत, असा शोध लावला आहे. या वलयांची संख्या ५ असून त्यांच्या त्रिज्या ४४,००० किमी. ते ५५,००० किमी. आहेत. एप्रिल १९७८ मध्ये आणखी तीन वलयांचा शोध एरिक पर्सन या अमेरिकन ज्योतिर्विदांनी लावला आहे.

शनीच्या वलयांच्या तुलनेने प्रजापतीच्या वलयांची रुंदी अत्यंत (१,००० पटींनी) कमी आहे. शनीच्या वलयांपासून प्रकाशाचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते तसे ते प्रजापतीच्या वलयांपासून होत नाही. दोन्ही ग्रहांच्या वलयांच्या त्रिज्या त्यांच्या रोश त्रिज्येपेक्षा म्हणजे त्या त्या ग्रहाभोवतीच्या ज्या विशिष्ट मर्यादेपेक्षा उपग्रह अधिक जवळ आल्यास उपग्रहाचे विघटन होते त्या मर्यादेच्या त्रिज्येपेक्षा (ई. ए. रोश या फ्रेंच शास्त्रज्ञांचे नाव या मर्यादेसदिले आहे) कमी आहेत

 

यावरून या वलयांच्या उत्पत्तीबद्दल दोन पर्यायी कल्पना करता येतात. एक म्हणजे प्रजापती व त्याचे उपग्रह यांच्या उत्पत्तीच्या वेळी विकीर्ण (विखुरलेल्या) स्वरूपातील जे द्रव्य प्रजापतीला फार जवळ (रोश मर्यादेच्या आत) होते त्याचे संघटन होऊ न शकल्याने त्यापासून ही वलये उत्पन्न झाली असावीत. दुसरा पर्याय असा की, काही विक्षोभांमुळे प्रजापतीचा एखादा उपग्रह आपली कक्षा सोडून रोश मर्यादेच्या आत आला असावा व मग त्याचे विघटन होऊन झालेल्या तुकड्यांची वा कणांची वलये बनली असावीत.

पहा : ग्रह सूर्यकुल.

संदर्भ : 1. Alexander, A. F. The Planet Uranus : A History of Observation, Theory and Discovery, New York, 1965.

            2. Bhattacharyya, J. C. Kuppuswamy, K. A New Satellite of Uranus, Nature, Vol. 267, 26 May 1977.

            3. Elliot, J. L. Dunham, E. Mink, D. The Rings of Uranus, Nature, Vol. 267, 26 May 1977.

            4. Hughes, D. W.New Uranian Satellite Belt, Nature, Vol. 266, 14 April 1977.

काजरेकर, स. ग. पुरोहित, वा. ल.