मोराएस, डॉम : (? १९३८–    ). प्रमुख इंडो-अँग्लिअन कवी. जन्म भारतात, मुंबई शहरी. प्रसिद्ध भारतीय पत्रकार फ्रँक मोराएस ह्यांचा हा पुत्र. मुंबई आणि जीझस कॉलेज, ऑक्सफर्ड येथे त्याचे शिक्षण झाले. अ बिगिनिंग (१९५७) हा त्याच्या कवितांचा पहिला संग्रह. त्या संग्रहास हॉथॉर्न्‌डन पारितोषिक मिळाले. त्यानंतर पोएम्स (१९६०), जॉन नोबडी (१९६५), द ब्रास सर्पंट, पोएम्स : १९५५–६५ (१९६६) व कलेक्टेड पोएम्स (१९६९) हे त्याचे अन्य काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. टी. एस्. एलियट, ऑडन, डिलन टॉमस व अतिवास्तववादी संप्रदाय यांचा प्रभाव त्याच्यावर पडलेला दिसतो. त्याच्या कविता बहुतांशी आत्मकथनात्मक आहेत एकाकीपणा व असुरक्षितता हे त्याच्या काव्यात वारंवार लागणारे सूर, तर त्याच्या मंतरलेल्या कल्पनाविश्वात अभिजाततावादी, ख्रिस्ती, मध्ययुगीन व परीकथाजन्य प्रतिमांचे आगळेच मिश्रण आढळते. ही प्रतिमासृष्टी प्रसंगी ज्ञानेंद्रियांना वैशिष्ट्यपूर्ण आवाहन करते. मोराएसला त्याच्या सर्व समकालीनांत आधुनिक इंग्रजीची लय पकडणारा कान जास्त चांगला आहे. म्हणूनच सहजसुलभ, सुभग व संयत भाषेचा ओघ हा त्याच्या कवितेचा एक उल्लेखनीय विशेष ठरावा. माय सन्स फादर (१९६८) हे त्याने लिहिलेले आत्मचरित्र. त्याच्या विशेष उल्लेखनीय अशा अन्य पुस्तकांत गॉन अवे, ॲन इंडियन जर्नल (१९६०) हे प्रवासवृत्त, द टेपेंस्ट विदिन् (१९७०) हा पूर्व पाकिस्तान दौऱ्याचा वृत्तांत, अ मॅटर ऑफ पीपल (१९७४) हे बारा अविकसित देशांचे प्रवासवर्णन आणि मिसेस इंदिरा गांधी (१९८०) हे चरित्र ह्यांचा समावेश होतो.

बी.बी.सी. आणि आय.टी.व्ही. ह्या संस्थांच्या माहितीपटांच्या लेखनाची बाजू त्याने सांभाळली आहे. जेमिनी (ऑक्सफर्ड), नोव्हा (लंडन),व एशिया मॅगझिन (हाँगकाँग) आणि पॉप्यूली (न्यूयॉर्क) ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्याने महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

संदर्भ : 1. Iyengar, K. R. S. Indian Writing in English. 1972.

              2. Naik, M. K. A History of Indian English Literature, New Delhi, 1982 .

              3.Naik, M. K. Desai S. K. and Amur, G. S. Ed. Critical Essays on Indian Writing in English , Madras.1977.

              ४. नाईक, म.कृ. नाईक, शकुंतला, भारतीय इंग्रजी साहित्याचा इतिहास, नवी दिल्ली, १९८५. 

 

देसाई,म.ग.