कर्वे, चिंतामण गणेश : (४ फेब्रु. १८९३ — १६ डिसें. १९६०). मराठी कोशकार आणि लेखक. जन्म बडोद्यास. शिक्षण बडोदा व पुणे येथे. ते गणिताचे पदवीधर (१९१७) असले, तरी डॉ. ⇨ श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या योजनेकडे आकृष्ट होऊन ते त्यांचे साहाय्यक झाले (१९१९). ज्ञानकोशनिर्मिती झाल्यानंतर यशवंत रामकृष्ण दाते ह्यांच्या सहकार्याने त्यांनी ‘महाराष्ट्रीय कोशमंडळा’ची स्थापना केली (१९२८) आणि महाराष्ट्र शब्दकोश (७ खंड, १९३२-३८), महाराष्ट्र वाक्‌संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७), शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) यांसारख्या कोशांच्या रचनेत एक संपादक म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याशिवाय डॉ. केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची सुधारित आवृत्ती सादर करण्याच्या उद्देशाने य. रा. दाते ह्यांच्यासह सुलभ विश्वकोशाची (६ खंड, १९४९ – ५१) रचना केली. 

कोशकार्याखेरीज मानवी संस्कृतीचा इतिहास (१९३१), प्राच्य आणि पाश्चात्य नीतिध्येये (१९३७), आनंदीबाई पेशवे (१९४०), मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी (१९५७), कोशकार केतकर (य. रा. दाते ह्यांच्या सहकार्याने, १९५९) यांसारखी उल्लेखनीय पुस्तकेही लिहिली. तसेच निरनिराळ्या नियतकालिकांतून भाषा, वाङ्मय, इतिहास, संस्कृती आदी विषयांवर चारशेहून अधिक लेख लिहिले. त्यांनी लिहिलेली पेशवेकालीन स्त्रियांची छोटी चरित्रे, पुण्यातील काही प्राचीन अवशेषांवरील टिपणे, लहान लहान शोधनोंदी, व्यक्तिनोंदी आणि व्युत्पत्तिनोंदी लक्षणीय आहेत. माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा व संक्षेप, सूक्ष्म संशोधन बुद्धी आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे चिटणीस (१९३६) व खजिनदार (१९५९) म्हणून त्यांनी काम केले. १९४२ ते १९५२ ह्या काळात ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे ते चिटणीस होते. ते १९४८ पासून पुणे विद्यापीठाचे सभासद, १९५५ पासून महाराष्ट्र सरकारच्या लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आणि १९५८ पासून भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार होते. पुणे येथे ते निधन पावले.  

धुरी, वि.म.