टिळक, नारायण वामन : (६ डिसेंबर १८६१–९ मे १९१९). मराठी कवी. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करंजगाव येथे. बालपणाचा काही काळ तेथेच गेला. शिक्षण कल्याण व नासिक येथे इंग्रजी पाच इयत्तांपर्यंत झाले. नासिक येथील वास्तव्यात गणेशशास्त्री लेले ह्यांच्याकडे त्यांनी संस्कृताचे अध्ययन केले. तेथे काव्याची गोडी लागली. आई जानकीबाई ह्यांना पद्यरचनेचा नाद होता. तिच्यापासून आपणास काव्यशक्ती लाभली, अशी टिळकांची श्रद्धा होती. बहुधा १८८० मध्ये मनूताई गोखले–पुढे स्मृतिचित्रे हे मराठीतील उत्कृष्ट आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहून प्रसिद्धीस आलेल्या ⇨ लक्ष्मीबाई टिळक–ह्यांच्याशी विवाह झाला. पुढे अकरा वर्षे नागपूर, वणी,  मुंबई, मुरबाड इ. ठिकाणी कीर्तनकार, पुराणिक, शिक्षक, जुळारी असे विविध प्रकारचे व्यवसाय केले, १८९३ मध्ये नागपूर येथील बुटी ह्या श्रीमंत गृहस्थांच्या आश्रयाने निघालेल्या व स्वधर्मपरिज्ञानास वाहिलेल्या ऋषि ह्या मासिकाचे संपादन केले. पुढे राजनांदगाव येथे नोकरीनिमित्त जात असता एका ख्रिस्ती गृहस्थाची गाठ पडली आणि ते ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करू लागले. त्या धर्मावर पूर्ण श्रद्धा बसल्यानंतर १८९५ मध्ये ते ख्रिस्ती झाले व आमरण त्या धर्माचे कार्य त्यांनी केले. हे त्यांचे कार्यही वैशिष्ट्यपूर्ण होते. भजन, कीर्तन, पुराणादी धर्मप्रसाराचे आणि धार्मिक उद्‌बोधनाचे भारतीय मार्ग त्यांनी पुरस्कारिले भारतीय ख्रिस्ती समाजाच्या उपासनापद्धतीला अस्सल भारतीय रूप आणि दिशा देण्याचा प्रयत्न केला. ते स्वतः भजन-कीर्तने करीत इतर ख्रिस्ती बंधूंना कीर्तनाची सांथ देत मार्गदर्शन करीत. भजनात टाळ, मृदंग, चिपळ्यांचा वापर करीत. ‘रेव्हरंड’ ही ख्रिस्ती धर्मातील उपाधीही त्यांना मिळाली. ‘रेव्हरंड टिळक’ ह्या नावाने ते महाराष्ट्रात ख्यात होते. त्यांच्या धर्मांतरानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई ह्यांनीही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला (१९००).

नारायण वामन टिळक

  

रेव्हरंड टिळक हे कवी म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांनी स्फुट गद्यलेखनही विपुल केलेले आहे. प्रथम हिंदू धर्मास अनुकूल आणि पुढे ख्रिस्ती धर्मपुरस्कारार्थ त्यांनी केलेल्या लेखनाचा त्यात अंतर्भाव होतो. ज्ञानोदयाचे ते संपादकही होते (१९१२–१९). केशवसुतांच्या आधी त्यांनी काव्यरचनेस आरंभ केला. प्रथम जुन्या पद्धतीच्या, दीर्घ कथनपर काव्यरचनेवर त्यांचा भर होता. तथापि पुढे केशवसुतांच्या नव्या, आधुनिक कवितेचे वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या प्रकारची कविता लिहिण्याकडे त्यांची प्रवृत्ती झाली. साधी, सहज रचना आणि प्रामाणिक भावनोत्कटता हे त्यांच्या काव्यरचनेचे विशेष होते. त्यांनी विविध विषयांवर आपल्या कविता लिहिल्या. तथापि एक प्रकारची व्यापक कुटुंबवत्सलता त्यांच्या एकूण कवितेला व्यापून राहिल्याचे जाणवते. तीतूनच बालोद्यानमधील (प्रथमावृत्ती १९४७) त्यांची शिशुगीते लिहिली गेली. दत्तांसारख्या कवींना त्यांनी दिलेले प्रोत्साहन व बालकवींचे स्वतःच्या घरात उत्कट जिव्हाळ्याने केलेले पालन ह्या संदर्भात बोलके ठरते. निसर्गाबद्दल त्यांना प्रेम वाटे. ‘फुलामुलांचे कवी’ म्हणूनच ते ओळखले जातात. ‘गुलाब’, ‘शुष्क गुलाब’, ‘रानात एकटेच पडलेले फूल’, ‘वनवासी फूल’ ह्यांसारख्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. तथापि त्यांच्या कवितेतून अवतरणारी फुले ही निखळ निसर्गाविष्कारासाठी येत नाहीत बोधप्रवण तत्त्वचिंतनासाठी येतात. ‘वनवासी फूल’ ही त्यांची दीर्घ कविता प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्यांमधील द्वंद्वाचे एक सुंदर, काव्यमय चित्र आहे. त्यांच्या अभंगांजलीतून (१९२०) ख्रिस्ती धर्मावरील उत्कट श्रद्धा प्रकट होते. तिच्यातील उमाळा तुकारामासारख्या संताशी निकटचे नाते सांगणारा आहे. ख्रिस्तायन या रामायणावरून स्फुरलेल्या नावाचे ओवीबद्ध काव्य त्यांनी लिहावयास घेतले होते. भारतीय ख्रिस्ती समाजात पुराणाची पद्धत लोकप्रिय करण्याच्या दिशेने त्यांचा हा एक प्रयत्न होता. तथापि त्याचे पहिले सु. साडेदहा अध्यायच ते पूर्ण करू शकले. नंतरची काव्यरचना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि पुत्र देवदत्त यांनी पूर्ण केली. ख्रिस्ती झाल्याने टिळकांचा मायदेशाचा आणि मायभाषेचा अभिमान सुटला नाही. महाराष्ट्रात ख्रिस्ती झालेल्या लोकांची भाषा व साहित्य मराठीच राहण्यास टिळकांचे लेखन बरेच कारणीभूत झालेले आहे. अर्वाचीन कवितेच्या आघाडीवर केशवसुतांबरोबर असलेल्या ह्या कवीचा मराठीतील आधुनिक कविपंचकात समावेश झालेला आहे. मुंबई येथे ते निधन पावले.

जोग, रा. श्री.