पोवाडा : एक मराठी काव्यप्रकार. पोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाषेत निवेदन करणारे कवन, अशी आजची समजूत परंतु प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत पुढील तीन प्रकारची कवने आढळतात : (१) दैवतांच्या अद्‌भुत लीला आणि तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, (२) राजे, सरदार वा धनिक यांचे पराक्रम, वैभव, कर्तृत्व इत्यादींचा गौरव आणि (३) लढाई, दंगा, दरोडा, दुष्काळ, पूर इ. उग्र वा कुतूहलजनक घटनांचे निवेदन. या तीन प्रकारच्या कवनांचे गायक व श्रोते हेदेखील मुळात वेगवेगळे होते. पहिल्याचे गायक गोंधळी आणि श्रोते भाविक जन, दुसऱ्याचे गायक भाट आणि श्रोते संबंधित व्यक्ती व त्यांचे आश्रित इ. आणि तिसऱ्याचे गायक शाहीर आणि श्रोते सर्वसामान्य जनता. वद् अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. ‘विस्तार’, ‘सामर्थ्य’, ‘पराक्रम’, ‘स्तुती या अर्थी ‘पवाड’ हा शब्द प्राचीन वाङ्‌मयात योजलेला आढळतो. त्याच्याशी ही व्युत्पत्ती सुसंगतच आहे. या अर्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अर्थाने ही संज्ञा वरील तिन्ही प्रकारच्या कवनांस अन्वर्थक वाटते. वरील तीन वर्गांपैकी बहुशः तिसऱ्या वर्गातीलच पोवाडे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. तेही नजीकच्या काळातील अधिक आणि दूरच्या काळातील कमी.

या तिसऱ्या वर्गातील पोवाड्यांचे कार्य हे काही अंशी आजच्या वर्तमानपत्रासारखेच होते. देशात ज्या घटना घडतात त्यांविषयी सर्वांनाच स्वाभाविक कुतूहल असते. आधुनिक काळात कुतूहलाचे क्षेत्र, विषय आणि घटनांचा वेग ही सर्वच विलक्षण वाढली आहेत. दीड-दोनशे वर्षांपूर्वी ही सर्व मर्यादित होती. त्या काळी लढाई, दंगा, दरोडा, दुष्काळ, पूर यांसारख्या घटना हेच सार्वजनिक कुतूहलाचे विषय. शाहीर या प्रसंगांवर लागलीच पोवाडे रचीत आणि गावोगाव गाऊन दाखवीत, यावरून त्यांचा रचनाहेतू स्पष्ट होतो. आजच्या वर्तमानपत्राच्या काळातही उमाजी नायकाचे दरोडे, महात्मा गांधींचा वध, पानशेतचा पूर, कोयनेचा धरणीकंप इत्यादींवर पोवाडे रचून ते गावोगाव गाऊन दाखविले जातातच. कारण खेड्यापाड्यातील जनता आजही बरीचशी निरक्षर आहे आणि साक्षरांतही वर्तमानपत्रे वाचण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

पोवाड्यांची रचना लहानलहान गद्यसदृश वाक्यांची, प्रवाही व स्वैरपद्यात्मक असते. बोलीभाषेतील जिवंतपणा, ओघ व लय यांमुळे ही रचना सहजीच प्रत्ययकारक होते. यातील चरण हे आठ आठ मात्रांच्या-क्वचित चार चार मात्रांच्या-आवर्तनांत गायिले जातात. या मात्रा लघूची एक व गुरूच्या दोन या हिशेबाने मोजीत नाहीत. पोवाडा गाताना चरण त्या मात्रांत बसविले जातात. ही आवर्तने व अन्त्ययमके यांनी पोवाड्याला पद्याचे रूप येते. पोवाड्यातील परिच्छेदाला ‘चौक’ही संज्ञा असून एकेका चौकात कितीही चरण येऊ शकतात. चौकात कित्येक वेळा छोट्या चरणांचे अंतरे असतात. चौकाच्या अंती पालुपद घोळले जाते. चरणाच्या अंती मधूनमधून ‘जी जी’ची जोड साथीदार देत असतो. पोवाड्यात कथेचे वा घटनेचे नुसते निवेदन नसते, तर दर्शन असते. श्रोत्याच्या मनश्चक्षूंना घटना दिसल्या पाहिजेत, त्यांतील जिवंतपणा जाणवला पाहिजे या उद्देशाने गायक त्यांतील पात्रांची भूमिका घेतो. पोवाड्यातील संवादांच्या वेळी हे नाट्य विशेष खुलते. पोवाड्यातील पद्यभागाला जोडून मधेमधे गद्य कथनही येते. संगृहीत झालेल्या पोवाड्यांत हा गद्य भाग नाही. शिवाय त्यांत सर्व चौकही नाहीत. शिवकालीन सिंहगडाच्या पोवाड्यात ५५ चौक आहेत. यांवरून पोवाड्याच्या लांबीची कल्पना यावी.

उपलब्ध पोवाड्यांत जुन्यांत जुने पोवाडे शिवकालातील. शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यसंस्थापनेच्या कार्यामुळे महाराष्ट्रात चैतन्य खेळू लागले, पराक्रमास क्षेत्र मिळाले आणि वरील तिसऱ्या वर्गातील पोवाड्यांच्या निर्मितीस भरती आली. या निर्मितीस सुरुवात केली ती गोंधळ्यांनी. देवीच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारे शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या सरदारांच्या पराक्रमाचे पोवाडे गाऊ लागले. ⇨ अज्ञानदासाने रचिलेल्या अफझलखानवधाच्या आणि तुळशीदासकृत सिंहगडाच्या पोवाड्यात देवीच्या कृपेचा उच्चार वारंवार झाला आहे, तो यामुळेच. पुढे पेशवाईत पराक्रमाबरोबरच विलासाला ऊत आला आणि लावण्यांना बहर आला. कीर्तनकारदेखील तमाशात शिरले. हे तमासगीर पोवाडे रचू लागले तशी पोवाड्यांवर विषय, भाषा, रचना इ. सर्वच दृष्टींनी लावणीची छाप पडू लागली. उत्तर पेशवाईतील पोवाडे आकाराने लहान आणि रचनेने बांधीव झालेले आढळतात, ते यामुळेच.

ब्रिटिश अमदानीत स्वातंत्र्याच्या लढ्यात सावरकर, गोविंद इ. कवींनी शिवाजी, तानाजी, बाजीप्रभू, चाफेकर बंधू इत्यादींवर पोवाडे रचले, ह्या पोवाड्यांचा रचनाहेतू वेगळा आणि त्यांची शैलीही वेगळी, देशप्रेम, निष्ठा, शौर्य, जिद्द, आत्मार्पणबुद्धी यांसारखेच गुण प्रकर्षाने दिसून येतील अशा व्यक्ती व घटना आणि आवेशयुक्त, प्रौढ नागर भाषा व छंददृष्ट्या रेखीव बांधेसूद रचना, हे त्यांचे काही विशेष. आधुनिक पोवाड्यांचा रचनाहेतू मराठशाहीतील पोवाड्यांच्या अंगी लावणे युक्त नव्हे पण ते केले जाते. विनायक, माधव, काव्यविहारी, तिवारी वगैरेंची ऐतिहासिक व्यक्तिप्रसंगांवरील कविता ही सावरकर, गोविंद इत्यादींच्या पोवाड्यांनीच घेतलेली गीतरूपे होत. सत्यशोधक समाज, दलितांची वर्गजागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांसारख्या चळवळींकरिताही पोवाड्यांची रचना झाली आणि निवडणुका, पक्षप्रणालीचा प्रचार इत्यादींकरिता राजकीय पक्ष पोवाड्यांचा उपयोग आजही करीत असतात. ⇨ अमर शेख, ⇨ अण्णाभाऊ साठे, ⇨ वसंत बापट इत्यादींचे पोवाडे या वर्गातील होत.

संगीताच्या दृष्टीने पोवाडा हा प्रांगणीय कंठसंगीताचा एक प्रकार कारण तो चौकाचौकांतून, बाजारपेठांतून, मैदानांतून वा प्रशस्त मोकळ्या जागी मोठ्या जनसमूहासमोर गायिला जातो. लोकसंगीताचाच तो एक प्रकार आहे. त्याच्या ह्या स्वरूपामुळे त्याची गती द्रुत, चाल सहज उचलण्याजोगी आणि फारशी खालच्या अथवा वरच्या स्वरात नसलेली अशी असते. चालीत गुंतागुंतही फारशी नसते. कडव्याकडव्यानुसार ती सहसा बदलतही नाही. पोवाडा ऐकणाऱ्या श्रोत्याचे अवधान चालीपेक्षा कथेकडे अधिक असणे आवश्यक असल्याने चालीतला तोचतोपणा इष्टच असतो. उच्च स्वरात ‘जी जी जी’ म्हटल्यानेही श्रोत्यांचे अवधान खेचून धरण्यास मदत होते. पोवाडा गाताना दूरवर आवाजाची फेक आवश्यक असल्याने बहुतेक वेळ शब्दस्वरांत ‘ह’ कार मिसळल्याचे दिसते.

संदर्भ : १. केळकर, य. न. संपा. ऐतिहासिक पोवाडे किंवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास, भाग, पुणे, १९२८ १९४४ १९६९.

२. केळकर, य. न. मराठी शाहीर व शाहिरी वाङ्‌मय, पुणे, १९७४.

धोंड, म. वा. रानडे, अशोक