मनमोहन, लोककवी : (११ नोव्हेंबर १९११). आधुनिक मराठी कवी. मूळ नाव गोपाळ नरहर नातू. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे. शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण, तळेगाव अशा भिन्न भिन्न ठिकाणी मॅट्रिकपर्यंत तथापि मराठी, संस्कृत ,इंग्रजी, हिंदी, गुजराती, अशा विविध भाषांतील साहित्याचे त्यांनी सखोल वाचन केले. काळकर्ते शिवरामपंत परांजपे, तळेगावाच्या समर्थ विद्यालयातील शिक्षक विष्णू गोविंद विजापूरकर,सुप्रसिध्द कवी जयकृष्ण केशव उपाध्ये आणि अर्वाचीन मराठी वाडःमयसेवककार गं.दे. खानोलकर ह्यांचे संस्कार मनमोहनांवर प्रत्य़क्षाप्रत्य़क्षपणे झाले.

ताई तेलिण हा मनमोहनांनी लिहिलेला ६३ ओळींचा पोवाडा १९२६ साली प्रसिध्द झाला. सुनीतगंगा (१९२८) ,कॉलेजियन (१९२९) उद्वार (१९३३), अफूच्या गोळ्या (१९३३) युगायुगांचे सहप्रवासी (१९४६) शिवशिल्पांजली (१९६५) हे त्यांचे काही निवडक काव्यग्रंथ होत. त्यांतील युगायुगांचे सहप्रवासी ह्या काव्याचा इंग्रजी अनुवाद दिलीप चित्रे ह्यांनी केला असून आदित्य (१९७१) हे त्यांच्या निवडक कवितांचे संकलन शंकर वैद्य ह्यांनी संपादिले आहे.

मनमोहनांनी कादंबरीलेखनही विपुल केले असून टिपरी पडबमघर पडली (१९४८) ही त्यांची कादंबरी विशेष प्रसिध्द आहे.देणे देवाचे (१९४९) हा त्यांचा लघुकथासंग्रह कॅरमचा खेळ (१९३३) जागतिक कीर्तीचा क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन ह्यांचे चरित्र (१९३६) सी.के. नायडू, अँज आय सी हिम (१९४१) अशी काही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. तथापि कवितेला अवघे जीवन वाहिलेला काहीशा विलक्षण आणि दीर्घजीवी प्रतिभेचा कल्पक कवी म्हणूनच त्यांची प्रतिमा मराठी रसिकांच्या मनांत स्थिरावली आहे.

मनमोहनांची प्रारंभीची कविता कथाकाव्यात्मक व सामाजिक आशय व्यक्तविणारी असून तीत विनोद. विडंबन आणि उपहास ह्यांचा मार्मिक वापर त्यांनी केला आहे. आधुनिक काळातील गांधीजी, सुभाषचंद्र, सावरकर तसेच ऐतिहासिक काळातील शिवाजी, संभाजी, त्रिंबकजी डेंगळे ह्यांसारख्या व्यक्तींच्या गौरवगाथांचीही लक्षणीय भर त्यांच्या काव्यात पडली आहे. १९४७ नंतर ते भावकवितेकडे ,भावगीतांकडे वळले आणि आटोपशीर, बांधेसूद अशी रचना त्यांनी केली. त्यांच्या भावगीतांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. राधे तुझा सैल अंबाडा सारखी त्यांची काही भावगीते वादग्रस्तही ठरली.

उपर्युक्त युगायुगांचे सहप्रवासी हे त्यांचे विशेष उल्लेखनीय काव्य होय. ह्या दीर्धकाव्यात ,मुंबईतील हिंदू-मुसलमानांच्या दंग्यातले भीषण नाट्य टिपण्याचा प्रयत्न त्यानी केला आहे. संज्ञाप्रवाहाचे चित्रण करणारे मराठीतील हे पहिलेच काव्य असून दारिद्र सत्तापिपासा, यंत्रयुगामुळे वाढलेले दुःख ह्यांतून मानवी जीवनाला आलेली अवकळा त्यांनी ह्या काव्यात वर्णिली आहे. नवनवीन पुरोगामी जामिवांनी समृध्द असे हे काव्य सौंदर्याच्या सांकेतिक कल्पनांतून बाहेर पडलेले आहे. कवींनी आपले स्वत्व आणि स्वातंत्र्य सदैव जपले पाहिजे. अशी श्रध्दा मनमोहनांनी आपल्या कवितेतून अनेकदा जहालपणे प्रकट केलेली आहे. तसेच कविता आणि कवी ह्यांच्यामधील नाट्यासंबंधीच्या आपल्या स्वतंत्र प्रतिक्रिया आणि जाणिवा त्यांनी स्वानुभवातून अशा जिवंतपणे व्यक्त केलेल्या आहेत, की त्यांतून त्यांच्या कवितेची आणि काव्यात्मक व्यक्तिमत्वाची एक ह्रदयप्रतिमा रसिकमनावर उमटते .मात्र आत्माविष्कार कवितेत स्वंयपूर्ण स्वरूपात उभा राहण्याची कलात्मक प्रक्रिया त्यांच्या काही काव्यांत न घडल्यामुळे तेथे काही प्रमाणात कलादृष्ट्या उणेपणा निर्माण झालेला आहे.

काहीशी लोकविलक्षण, स्वैर आणि अनिर्बंध कल्पकता हे मनमोहनांच्या काव्याचे प्रमुख वैशिष्ट्ये होय. त्यांची कविवृत्ती अत्यंत तल्लख, उत्कट भावनेने तत्काळ प्रक्षुब्ध होणारी आणि विलक्षणी कल्पक असून तिच्या द्वारा प्रकट होणाच्या त्यांच्या अतिशय़ तीव्र वेधक व अभिनव प्रतिक्रिया त्यांच्या समग्र काव्यात भरून राहिल्या आहेत. इतिहासातील अदभुतरम्य व पौरूषसंपन्न वातावरणाशी त्यांच्या मनाचे लागेबांधे दृढपणे जडल्याचे ठळक प्रत्यंतरही त्यांच्या कवितेतून येते. त्यांची वृत्ती कल्पनाविश्वात रमणाऱ्या स्वच्छंद कवीची असली, तरी बौध्दिक दृष्ट्या मात्र ते सतत भोवतालच्या वास्तवाशी आणि वर्तमान काळाशी निगडित राहिले आहेत. लोककवी मनमोहन म्हणूनच ते ओळखले जातात.

पोतदार, अनुराधा