लेंभे, विठ्ठल भगवंत : (१८५०-१९२०). मराठी कवी. जन्म तळेगावचा. तळेगाव येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. इंग्रजी शिक्षण पुण्यास झाले. त्यांच्या वडील बंधूंनी मॅट्रिकच्या परीक्षेची फी देण्याचे नाकारल्यामुळे त्या परीक्षेस ते बसू शकले नाहीत. रेल्वेत त्यांनी नोकरी धरली.

लेंभे ह्यांचे इंग्रजी शिक्षण झालेले असले, तरी इंग्रजी कवितेचा परिणाम त्यांच्या कवितेवर झाला नाही. मराठी संतवाड़्मयाचे आकर्षणही त्यांना नव्हते. विषय, रचना आणि भाषा ह्या तीनही संदर्भांत त्यांची कविता संस्कृत वळणाची होती. कवी म्हणून त्यांची कीर्ती मुख्यतः शोकावर्त (१८९९) ह्या विलापिकेवर अधिष्ठित आहे. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूवर ती लिहिलेली आहे. संस्कृत वळणाची सांकेतिकता ह्या काव्यात कमी झालेली दिसते. विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांच्यावरील विष्णुनिधन (१८८२) आणि विश्र्वनाथ नारायण मंडलिक ह्यांच्या मृत्यूवरील कृतांत-कैतव (१८९०) ह्या त्यांच्या अन्य उल्लेखनीय विलापिका. १९२४ साली प्रसिध्द झालेल्या लेंभे ह्यांची कविता ह्या संग्रहात सुरतरंगिणी, शोकावर्त, आनंदकंद आणि खंडिता ही त्यांची खंडकाव्ये अंतर्भूत आहेत. लेंभे यांनी आपल्या काव्याच्या भाषासौंदर्याने चंद्रशेखरादी समकालिनांवर मोठी मोहिनी घातली होती. समुचित संस्कृत शब्दयोजना, माधुर्य आणि प्रसाद ह्या गुणांनी मंडित अशी त्यांची रचना आहे.

पुणे येथे ते निधन पावले.

जोग, रा.श्री.